लिहित्या लेखकाचं वाचन

डॉ. विलास सारंग यांचं ‘लिहित्या लेखकाचं वाचन’ हे पुस्तक​. त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या विविध लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. पुस्तक वाचनीय आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक लेखात काहीतरी नोंद घेण्याजोगं सापडतं. बालकवींच्या ‘औदुंबर’ या कवितेची वेगवेगळ्या समीक्षकांनी केलेली समीक्षा किंवा लक्ष्मण माने यांची ‘उपरा’तील लेखनशैली आणि हेमिंग्वेच्या लेखनशैलीशी तिचं असलेलं साम्य यासारखे सखोल वाचन आणि सूक्ष्म निरीक्षणातून आलेले निष्कर्ष हे या पुस्तकाचं ठळक वैशिष्ट्य​ म्हणावं लागेल​. डॉ. सारंग यांनी साहित्यावर बरंच संशोधन केलेलं आहे. मुंब​ई विद्यापीठ आणि इंडियाना विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी त्यांनी स्वतंत्रपणे संशोधन करून दोनदा पीचडी मिळवली आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये लिहिणार्‍या मोजक्या लेखकांमध्ये त्यांचा समावेश होतो.

‘शेक्सपिअरचं भाषांतर’ या लेखात सारंग विंदा करंदीकर यांनी केलेलं ‘किंग लिअर’ आणि अरुण नाईक यांनी केलेलं ‘हॅम्लेट’ या दोन भाषांतरांचा आढावा घेतात​. ‘किंग लिअर’बद्दल त्यांचा मुख्य मुद्दा आहे की इंग्रजीतून मराठीत येताना वाक्यरचनेत जो नैसर्गिक बदल करायला हवा तो विंदांनी केलेला नाही. उदा. ‘I went to school’ याचं भाषांतर ‘मी शाळेला गेलो’ असं व्हायला हवं पण पण विंदांच्या पद्धतीनुसार ते ‘मी गेलो शाळेला’ असं होईल​. मराठी गद्यात अशी वाक्यरचना कृत्रिम वाटते. विंदा इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक होते. त्यांची विद्वत्ता आणि दांडगा व्यासंग त्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनेतून दिसतो असं सारंग नमूद करतात​. तरीही वाक्यरचना उलटी करण्याचं कारण काय​? 1मराठी वर्तमानपत्रेही ही प्रथा का पाळतात हा वैताग आणणारा प्रश्न आहे. कहर म्हणजे अशी वाक्यरचना करून मथळ्यात यमक जुळवलं की उपसंपादकांना दिवस सार्थकी गेल्यासारखं वाटतं. असे मथळे पाहिले की त्या वर्तमानपत्राच्या हापिसात जाऊन फुलटू राडा करावासा वाटतो. जर वर्तमानपत्रांनीच भाषेची बूज राखली नाही तर कसं व्हायचं? सारंग यांच्या मते अशी वाक्यरचना अधिक नाट्यपूर्ण वाटते. यामुळे रसभंग होतो या सारंग यांच्या मताशी पूर्ण सहमती आहे. वर भर म्हणून सुटसुटीत प्रतिशब्द वापरण्याऐवजी विंदा संस्कृताळलेले बोजड शब्द वापरतात​. ‘राइपनेस इज ऑल’ या ओळीचं भाषांतर करताना ‘पिकलेपण’ या सोप्या शब्दाऐवजी विंदा ‘परिपक्वता’ वापरतात​. ‘हॅम्लेट’च्या बाबतीतही हेच​. ‘तूही नाही करणार अन्याय माझ्या कानांवर’ अशी कृत्रिम वाक्यरचना सहन करत सगळं नाटक वाचावं लागतं. ओघवती भाषा हे ज्याचं वैशिष्ट्य असा शेक्सपिअर या प्रकारे वाचावा याहून मोठं दुर्दैव नसावं.

”उपरा’ आणि हेमिंग्वे’ या लेखात लक्ष्मण माने यांच्या भाषाशैलीबद्दल सारंग म्हणतात​, “मराठी भाषेत अशी भाषाशैली क्वचितच आढळते…ज्याने मराठीला एक नवीन​, ताजी भाषाशैली दिली आणि ज्याची शैली हेमिंग्वेची आठवण करून देते, असे लेखक मराठीत किती आहेत​?” इथे दुर्गाबाईंची शैलीदार भाषा किंवा ‘बलुतं’मध्ये केलेलं जाणीवपूर्वक वाड़मयीन लेखन याच्याशी ‘उपरा’ची तुलना करतात​. एक उदाहरणार्थ लेखही आहे पण तो टीकात्मक असल्याने ‘पंथी’यांना उदाहरणार्थ कितपत रुचेल कल्पना नाही. ‘जातककथांमधील वास्तववाद’ हा लेख दुर्गाबाईंनी मूळ पाली भाषेतून अनुवाद केलेल्या सिद्धार्थ जातक च्या आठ खंडांवर आहे. सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या या ग्रंथांवरील हा लेख दुर्गाबाईंच्या विद्वत्तेची झलक दाखविणारा आहे. हे सर्व आठ खंड वाचून होणं अशक्य वाटतं, निदान काही भाग तरी वाचावा अशी इच्छा मात्र नक्कीच होते. पुस्तकातील अनेक गोष्टी उल्लेखनीय आहेत​. किंबहुना प्रत्येक लेखाबद्दल विशेष​ असं काहीतरी लिहिता येईल​. खरं तर अशी दोन​-तीन उदाहरणे देऊन लेख संपवायला आवडलं असतं पण पुस्तकात जश्या अनेक उल्लेखनीय गोष्टी आहेत तशाच काही गोष्टी खटकणार्‍याही आहेत​. यातील काही किरकोळ आहेत​, पुढील आवृत्त्यांमध्ये सहज सुधारता येतील आणि काही गंभीर आहेत​. इथे केवळ छिद्रान्वेषीपणा करण्याचा हेतू नाही, मात्र इतक्या गंभीर चुकांकडे दुर्लक्ष करता येणेही अशक्य आहे.

पहिला मुद्दा किरकोळ आहे – लेखक किंवा उपसंपादक यांची डुलकी या सदरात मोडणारा. बा. सी, मर्ढेकर यांच्यावरील लेखात सारंग त्यांच्या कवितांवर इटालियन कवी दान्तेचा प्रभाव होता काय याची मीमांसा करतात​. सुरुवातीला “दान्ते (इंग्रजी सवयीप्रमाणे आपण डाण्टे असं म्हणू)” असं वाक्य येतं. मग मर्ढेकरांच्या ‘शिशिरागम’ कवितेतील ओळी येतात​. “दान्ते-नि-शेक्सपिअर-संगत आपणास​” (मर्ढेकरांनी दान्ते हा मूळ उच्चार वापरला आहे हे विशेष​.) नंतर सारंग आपण आधी काय लिहिलं होतं ते विसरून जातात आणि ‘दान्ते’ वापरतात​. मग हा उच्चार जर इतका नैसर्गिक आहे तर इंग्रजी उच्चाराच्या फंदात पडायचंच कशाला? खरं तर इटालियन भाषेतील​ उच्चार अत्यंत सोपे आहेत​, आपल्याकडचे ‘त’ आणि ‘द’ चे उच्चार त्यांच्याकडे जसेच्या तसे आहेत​. तरीही मराठीत इटालियन (किंवा इतर भाषेतीलही) नावं लिहिताना जे अनंत घोळ घातले जातात त्याला तोड नाही. सर्वात विहंगम घोळ​ – भाषेचं नाव​ बरेच लोक ‘इतालियन’ असं लिहितात​. इथे ‘त’ कशासाठी? देशाचं नाव कसं लिहाल​? इटली का इतली? मग भाषेचं नावही तसंच लिहा नं – इटालियन. बरं पुढे जाऊन ‘इतालियन’ हा शब्द सोडला तर बाकी सर्व शब्दांमध्ये ‘त’ च्या जागी ‘ट​’. उदा. ‘इतालियन’ संस्कृतीमध्ये ‘कियांटी’ ही वाइन प्रसिद्ध आहे. पिऊन झाल्यावर टीच​​ बातली हाणा आमच्या तालक्यात म्हणजे निदान आमची ट्रेधाटिरपीत टरी थांबेल​. (पूर्वी भयाण मनोजकुमारच्या भयाण चित्रपटांमध्ये टॉम अल्टर आणि बॉब क्रिस्टो अशी भयाण वाक्ये भयाणपणे बोलत असत​.) हिंदीमध्ये ‘इतालवी’ असं लिहितात पण तिथे तो स्वतंत्र शब्द आहे आणि बाकी सर्व गोष्टींसाठी ‘त’ च वापरतात​. ‘इटली’ हे इंग्रजीकरण झालेलं नाव आहे. मूळ नाव वापरायचं असेल तर ‘इतालिया’ असं म्हणायला लागेल​. बरेच​ देश किंवा शहरं यांच्या नावांचं इंग्रजीकरण झालं आहे. आता ही नावं रुळली आहेत त्यामुळे ती बदलण्यात अर्थ नाही. पण माणसांच्या नावाचं काय​? माझ्या मते कोणत्याही माणसाच्या नावात कुणालाही बदल करण्याची मुभा नसावी. नाव ही माणसाच्या मूलभूत ओळखींपैकी एक महत्त्वाची ओळख आहे. असं असतानाही मराठी लेखक परकीय नावांबद्दल जो निष्काळजीपणा दाखवतात ते पाहून वाईट वाटतं. मग Foucault (फूको)चा उच्चार फूकोल्ट, Da Vinci (दा विंची)चा दा व्हिंसी, Antonioni (अंतोनियोनी)चा अंटोनियोनी किंवा le Carré (ल कारे)चा ल कार​. (‘इ’ वर ऍक्सेंट असेल तर त्याचा उच्चार ‘ए’ होतो.) एक गोष्ट खरी की सर्वांना सर्व उच्चार माहीत असावेत ही अपेक्षा नाही. पण मग थोडे कष्ट घेऊन शोधा की. फोर्वो आहेच​ किंवा यूट्यूबवर ‘How do you pronounce Foucault’ असा सर्च करा. बहुतेक सर्व परकीय नावांचे उच्चार ऐकता येतील​. गांधींचं नाव घँडी किंवा बुद्धाचं नाव बूडा हे इंग्रजीकरणाचे प्रताप आहेत​. निदान मराठीत लिहिताना तरी आपण माणसांच्या नावांचं इंग्रजीकरण न करता मूळ​ नावं लिहायला हवीत​.

पुढचा मुद्दा गंभीर आहे. औदुंबरवरच्या समीक्षांची चर्चा करताना सारंग म्हणतात​, “जगात (कलेच्या वा वास्तव​) शक्यता एकवटलेल्या नसतात​, तर विखुरलेल्या असतात​. या भूमिकेला वैज्ञानिक पाठबळ आहे. अद्ययावत विज्ञान आपल्याला सांगतं की वस्तुस्थिती काय आहे, हे आपल्याला कधीच खात्रीपूर्वक सांगता येत नाही. फॅक्ट किंवा सत्य हे आपल्या कधीच हाती लागत नाही…वेर्नर हायझेनबर्ग या वैज्ञानिकाचं अनिश्चिततेचं तत्त्व आता बहुतेकांना माहीत झालं आहे.” थोडक्यात औदुंबर कवितेचा विविध समीक्षकांनी लावलेल्या अर्थाचा संबंध सारंग हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्त्वाशी जोडतात​. स्पष्ट सांगायचं तर याला काहीही अर्थ नाही. हे म्हणजे एखाद्या कडून पैसे उसने घेतले आणि त्याला “परत देईन किंवा देणार नाही मात्र या दोन्ही भूमिकांना वैज्ञानिक पाठबळ आहे” असं म्हणण्यासारखं आहे. विज्ञान म्हणजे अनिश्चितता हे साफ चूक आहे. असं असतं तर मंगळापर्यंत यान गेलंच नसतं. हायझेनबर्गचं तत्त्व अत्यंत काटेकोर सीमांमध्ये लागू होतं, त्याबाहेर न्यूटनचे नियम लागू होतात​. मंगळयानाच्या कक्षेचं गणित करताना हायझेनबर्ग कामाचा नाही, तिथे न्यूटनलाच साकडं घालावं लागतं. हे मत सारंग यांचं आहे की सौंदर्यशास्त्रातील इतरांचंही हे ठाऊक नाही. हे सर्वमान्य मत असेल तर साहित्याच्या संशोधकांनी एकदा पदार्थविज्ञानवाल्यांशी बोलणं गरजेचं वाटतं.

‘आजची कादंबरी – आणि उद्याची’ या शेवटच्या प्रकरणात सारंग म्हणतात​, “दुसऱ्या महायुद्धात पोळलेले समाज – उदाहरणार्थ, फ्रान्स​-सार्त्र व काम्यू यांसारखे लेखक निर्माण करू शकले. प्रदीर्घ काळ स्थिरतेच्या दडपणाखाली घुसमटणारे समाज – सोव्हिएट रशिया व चीन – यांच्याकडून काहीच मिळालं नाही. (पास्तरनॅक व सोल्झेनित्सिन वगळून​, तेही राज्यविरोधी).” इथे दोन मोठ्या गफलती आहेत​. चीन, रशियाला महायुद्धाची झळ लागली नाही??? फार तर झळ लागली पण थोर लेखक निर्माण झाले नाहीत असं म्हणा पण तसं केलं तर सारंग यांचं पहिलं वाक्य बाद ठरतं. एकूणातच महायुद्ध आणि थोर लेखक यांचा संबंध बादरायण वाटतो. विरोधात मार्क्वेझपासून प्रूस्तपर्यंत कितीतरी उदाहरणं देता येतील​. शिवाय चिनी लेखक अनुल्लेखाने मारण्याइतके चिल्लर आहेत का? मो यान किंवा गाओ वाचलेले नाहीत त्यामुळे कल्पना नाही.

शेवटचा मुद्दा विचित्र​ म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण ‘बिझार’ म्हणतो अशा प्रकारचा आहे. मागे विश्राम गुप्ते यांनी ‘या देशात शास्त्रज्ञ नाहीत‘ असं विधान केलं होतं त्या जातीचा. म्हणजे हे विधान खरं नाही हे कुणालाही कळेल मग ते लेखकाला का कळलं नाही? कादंबरीवरच्याच प्रकरणात सारंग म्हणतात​, “पण पेपरबॅक पुस्तकं एकदा वाचल्यावरही खराब होतात​.” म्हणजे काय याचा अर्थ मला अजूनही लागलेला नाही. माझ्याकडे असलेली ९९% पुस्तकं पेपरबॅक आहेत​. किंवा उलटा प्रश्न – एकदा वाचल्यावर खराब होईल असं करण्यासाठी पुस्तक किती दांडगाईने वाचावं लागेल​? खुद्द सारंग यांचं पुस्तक आणि मराठीतील बहुतेक पुस्तक पेपरबॅक याच वर्गात मोडतात हे आणखी रोचक​.

सारंग आंतरराष्ट्रीय पातळीवर लिहिणारे लेखक आहेत त्यामुळे त्यांच्या पुस्तकात अशा चुका आढळल्या तर ते विशेष​ खटकतं. काळजीपूर्वक पुस्तक लिहायचं तर तितके कष्ट घ्यावे लागतात आणि हे झटपट होत नाही, याला वेळ द्यावा लागतो. ‘ऑक्सफर्ड शेक्सपिअर’ मालिकेतील ‘मॅकबेथ’ची आवृत्ती काढायला दहा वर्षे लागल्याचं तिचे संपादक प्रस्तावनेत सांगतात​. किती मेहनत घेतली असेल याची यावरून कल्पना यावी. या गोष्टी खटकत असल्या तरी पुस्तक वाचनीय आहे. डॉ. हरिश्चंद्र थोरात यांच्या ‘कादंबरीविषयी’ या ग्रंथाबद्दल बोलताना सारंग त्यातील काही भाग उद्धृत करतात​. डॉ. थोरात म्हणतात​, “विचार हा शब्द येथे गंभीरपणे वापरला आहे. विचार नेटकेपणाने करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते…मनात येणार्‍या स्वैर कल्पनाविलासालाच विचार म्हणण्याची प्रथा या काळात रूढ झाली.” इथे डॉ. थोरात जरी समीक्षेविषयी बोलत असले तरी आज सगळीकडेच​ सुसूत्रपणे विचार करणे कालबाह्य होऊ लागलं आहे की काय अशी शंका येते. हे किती खरं आहे याची प्रचिती आजूबाजूला येणारे बहुतेक लेख वाचले तर येते. फुटका नळ गळावा तसे शद्ब गळत असतात​. आपल्या मनातील विचारांचा गुंता जसाच्या तसा ओतला की झाला लेख​. आणि हे नवशिके लेखकच करतात असं नाही. संपादक​, विचारवंत अशी बिरुदं मिरवणारे लेखात फक्त त्यांनी जे वाचलं ते कोंबत असतात​. सगळा मामला वरवरचा, खोलात जायचं काम नाही. प्रत्येक परिच्छेदात नवीन विचार हवा हा नियम कालबाह्य होतो आहे अशी शंका कधीकधी येते कारण मुळात परिच्छेदाचाच पत्ता नसतो. अर्धीमुर्धी वाक्ये हिंदी चित्रपटात पूर्वी नायिका जशी कड्याला धरून लोंबकळायची तशी लोंबकळत असतात​. त्यात ‘ललित’ नावाचा प्रकार तर लय टेररबाज​.

रखरखीत दुपार​……………………..
मी कॉलेजच्या वाटेवर​……………………………..
इतक्यात​………………………
आरं मावसभावा, ही रांगोळी कशापायी रं भुसनळ्या?

  • 1
    मराठी वर्तमानपत्रेही ही प्रथा का पाळतात हा वैताग आणणारा प्रश्न आहे. कहर म्हणजे अशी वाक्यरचना करून मथळ्यात यमक जुळवलं की उपसंपादकांना दिवस सार्थकी गेल्यासारखं वाटतं. असे मथळे पाहिले की त्या वर्तमानपत्राच्या हापिसात जाऊन फुलटू राडा करावासा वाटतो. जर वर्तमानपत्रांनीच भाषेची बूज राखली नाही तर कसं व्हायचं?