Categories
इतर

मन की आंखे खोल बाबा

मागच्या ब्याकग्राउंडला शहनाईचे मंद-बिंद सूर, दिवाळीच्या मंगल-बिंगलमय वातावरणात, साहित्यिक जाणिवा-बिणिवांना नवे-बिवे धुमारे-बिमारे फुटत असताना मध्येच जुन्या हिंदी-बिंदी चित्रपटातील आंधळ्या-बिंधळ्या भिकाऱ्याप्रमाणे ‘मन की आंखे खोल, बाबा’ असं गात विसंवादी सूर-बिर काढणं फार जीवावर येतं आहे पण इलाज नाही. हल्ली सर्वांना आपल्या समाजाच्या अभिरुचीचा स्तर कसा उंचावता येईल याची काळजी लागली असते.

आदर्श समीक्षक म्हणजे ज्याने बरेच कलाप्रकार पाहिलेले असतात, आणि नुसते पाहिलेले नाही तर आतून अनुभवलेले असतात, ज्याला त्यांच्या इतिहासाची सखोल माहिती असते आणि जो एखाद्या कलाकृतीमधली सौंदर्यस्थळं उलगडून दाखवू शकतो, असा प्राणी असतो. हे बरेचदा खरं असतं. पण बहुतेक वेळा समीक्षक लोक ही सौंदर्यस्थळं वगैरे दाखविण्यापेक्षा तलवारबाजी करण्यात इतके मग्न होतात की त्यांचा दॉन किहोते होऊन जातो. जे समोर येईल त्याला शत्रू समजून कापायचं. उदा. इथे विश्राम गुप्ते म्हणतात, “म्हणून आपल्याकडे शास्त्रज्ञ नाहीत, गणितज्ञ नाहीत.. ” खरंच? आपल्याकडे एकही शास्त्रज्ञ किंवा गणितज्ञ नाही? मग रामानुजम कोण होता? टीआयएफआर, आयआयएससी, आरआरआयमध्ये जी फ्याकल्टी लिष्ट आहे ती काय शोभेसाठी लावलीये? इस्रोच्या ज्या दर वर्षी नवीन मोहिमा निघतात; चंद्र, मंगळावर यानं जातात ती कोण पाठवतं? (बादवे, लेखात एकाच वाक्यात नायपॉल एकेरी आणि श्याम मनोहर दुहेरी हे काय गौडबंगाल आहे? ) हे असं लिहितात कसं, लिहिलं तरी संपादक लोक छापतात कसं आणि छापल्यावर एकही प्रतिक्रिया येत नाही की हे काय चाललंय?

लेख वाचून चित्र डोळ्यासमोर आलं. इ. स. २०१३. भारत देश अंधारात बुडलेला, वीज नाही कारण इंजिनियर नाहीत, लोकांना वीज म्हणजे काय हेच माहीत नाही कारण देशात शास्त्रज्ञ नाहीत. गावकुसावर लोक डोक्याला हात लावून बसलेले, घराघरात अंधी बहन और विधवा मां खडकम-खडकम करत अनुक्रमे भांडी घासणे आणि कपडे शिवणे या कामात मग्न आहेत. वरून हेलिकॉप्टरमधून पुढारलेले पाश्चात्त्य देश आपली दुर्दशा बघत आहेत. एखाद वेळेस दया आली तर अन्नाची पाकिटं फेकतात, मग खाली दंगल होते. शांतता झाल्यावर ब्याक टू गावकूस आणि अंधी बहन और विधवा मां खडकम-खडकम. आपल्याकडे सरकार नाही, कारण लोकशाही म्हणजे काय हे माहीतच नाही. शाळा, कॉलेज, समाज या कल्पना आपल्या मनाला कधी शिवल्याच नाहीत. सगळे लोक दिवसा शिकार करतात आणि रात्री शेकोटी पेटवून भाले फिरवीत त्याभोवती नाचतात. मुंबईत रात्री रस्त्यांवर गाई, म्हशी, याक, रेनडिअर, कोल्हे, सिंह, झेब्रे, लांडगे, फुरसू, सरसू, त्से त्से माश्या, गेंडे, गेंडिण्या, आर्मडिल्लो, आर्मडिल्लीण्या, बोनोबो, ओरांग-ओटांग, कांगारू, पेग्विन यांचं राज्य असतं कारण रस्त्यांवर दिवे नाहीत. पण एक दिवस हे बदलेल. पश्चिमेकडून एक गोरापान, निळ्या डोळ्यांचा देवदूतासारखा दिसणारा देवदूत येईल. (मॅग्नुस कार्लसन नाय बरं का! ) तो या देशात क्रांती आणेल. आपल्याला सोई-सुविधा देईल. बदल्यात मरेस्तोवर खजिने लुटून नेईल पण हा देवाला दिलेला प्रसाद समजायचा. कारण पश्चिमेकडचा हा देव कधीही चुकत नाही. त्याच्या देशात सदैव सुबत्ता नांदत असते, तिथे कधीही कुणीही गुन्हा करत नाही. केलाच तरी शासन इतकं सक्षम असतं की गुन्हेगाराला लगेच शिक्षा होते. भारतासारख्या मागासलेल्या देशाची प्रगती कशी होईल या विचाराने (किंवा कालची जास्त होऊन रात्रभर वकार युनुस झाल्याने) या निळ्या डोळ्यांच्या देवदूताला रात्र-रात्र झोप येत नाही. आयुष्यभर त्याच्या खांद्यावर गोऱ्या माणसाचं ओझं असतं. अतिशयोक्ती वाटते? गुप्ते यांचं पाश्चात्त्य देशांबद्दलचं मत वाचा. “पाश्चात्त्य जगात अशी फिर्याद करण्याची आवश्यकता नाही. तिथे चिरेबंदी सिस्टिम आहे. लॉ अँड ऑर्डर आहे, डिसिप्लिन आहे, रॅशनल आणि इंटेलेक्चुअल जगण्याची पूर्ण संधी आहे. ” पुढचं अस्पष्ट दिसतय कारण डोळे पाणावलेत. इथे हिटलर, स्टालिन, मॅकार्थी, किसिंजर, चाउसेस्क्यू, निक्सन, बुश छोटे, डिक चेनी, रम्सेफिल्ड इ. महात्म्यांचं स्मरण करून मी माझं भाषण संपवतो.