Categories
बुके वाचिते

गूढ​, रहस्यमय, अद्भुत : हारुकी मुराकामी

मुराकामी वाचल्यानंतर इतर लेखक प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला सकाळ कशी होती, हवा कशी होती, ट्रॅफिक कसे होते, हिरो किंवा हिरविणिने काय घातले होते याचे वर्णन करण्यात पानेच्या पाने खर्च का करतात असे वाटायला लागते.

सवयी फार विचित्र असतात. जाता जात नाहीत. अशीच एक निरर्थक सवय लागलेली. कुठलेही पुस्तक वाचायला सुरुवात केली की लेखकाला कुठल्यातरी चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करायचा. आणि विशेष म्हणजे भल्या भल्या लेखकांच्या बाबतीत हे करायला जमले. डिकन्स म्हटल की दु:ख, दु:ख, दु:ख आणि मणमोहण देसाई लाजतील असे योगायोग. पण माणसाच्या मनात डोकावण्याचे कसब विलक्षण. आणि एखादे वाक्य इतके अप्रतिम की तिथे थांबून दहा मिनिटे विचार करावा लागतो. सॉमरसेट मॉमचे वैशिष्ट्य म्हणजे कथा साध्या, सरळ शब्दांमध्ये सांगितलेली. पण परत मनोव्यापारांची गुंतागुंत समोर आणायची हातोटी विलक्षण.

पण कधीकधी असे एखादे पुस्तक हाती लागते की आपले सगळे अंदाज ढासळून पडतात. (थोडक्यात मस्त स्विंगींग यॉर्करवर आपली दांडी उडते. ) असेच एक पुस्तक परवा वाचले. हारूकी मुराकामीचे ‘काफ्का ऑन द शोर’. पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या काही पानात एक अंदाज बांधला, तो ढासळल्यावर दुसरा, त्यानंतर तिसरा. असे चार-पाच वेळा झाल्यावर शरणागती पत्करली आणि मुकाट मुराकामी नेईल तिथे त्याच्यामागून जाऊ लागलो. यातले सर्वच विलक्षण, काहीसे फँटसीच्या अंगाने जाणारे. सुरूवातीला तर्कशुद्ध मन हे असे का, ते तसे का असे प्रश्न विचारत रहाते. नंतर गोष्टीत रंगून गेल्यावर या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत हे लक्षातही रहात नाही. मग नाकाता मांजरांशी बोलतो किंवा जळवांचा पाऊस पाडू शकतो अशा गोष्टी ‘रूटीन’ वाटायला लागतात.

Book cover of Kafka on the Shore

गोष्ट सुरू होते तेव्हा जवळपास प्रत्येक प्रकरणात एखादा नवीन धागा येतो. काही काळ आपण भंजाळतो. काय चाललय काहीच कळत नाही. नंतर रूबिक क्युबचे चौरस जुळावेत तसे धागे जुळत जातात. याच्या जोडीला निवेदन इतकं प्रभावी की पुस्तक खाली ठेवायचा प्रश्नच येत नाही. फँटसी आणि रहस्य यांचा सुंदर मिलाफ. मग आधीच्या काही प्रश्नांची उत्तरेही मिळत जातात. सुप्रसिद्ध ओडीपल थीम भेटते. (यामुळेच या कादंबरीला मॉडर्न ग्रीक ट्रॅजेडी म्हटले आहे.) काही प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरित रहातात. मुराकामीच्या मते प्रत्येक वाचकाची उत्तरे वेगळी असतील. पुस्तकातील विनोदही आलाच तर अगदी कळेल-न-कळेल असा. गूढतेला कुठेही तडा न जाऊ देणारा. The kind of fallen-from-grace building you find in any city, the kind Charles Dickens could spend ten pages describing. यावरून आठवले. डिकन्स किंवा इतरही काही प्रसिद्ध लेखक त्यांच्या जाडजूड पुस्तकांमध्ये पानेच्या पाने वर्णने देत बसतात. आणि खरे सांगायचे तर हे वाचायला कंटाळा येतो. बर, वाचल्याशिवाय रहावतही नाही कारण एखादे अप्रतिम वाक्य सुटायला नको. मुराकामीचे असे अजिबात नाही. शक्यतो वर्णन नाही, जिथे आहे तिथे इतके प्रभावी की वाचल्याशिवाय रहावतच नाही. मुराकामी वाचल्यानंतर इतर लेखक प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला सकाळ कशी होती, हवा कशी होती, ट्रॅफिक कसे होते, हिरो किंवा हिरविणिने काय घातले होते याचे वर्णन करण्यात पानेच्या पाने खर्च का करतात असे वाटायला लागते.

यातली सर्व पात्रे नॉर्मलच्या थोडी बाहेर जाणारी आहेत, किंबहुना ऍबनॉर्मल म्हटलं तरी चालेल. मुराकामीच्या म्हणण्याप्रमाणे त्याला ‘जरा हटके’ पात्रांबद्दल जास्त उत्सुकता असते. यात दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपानमध्ये घडलेल्या एका गूढ प्रसंगाचे अमेरिकन संरक्षण खात्याने नोंदलेले वर्णनही आहे, अर्थातच काल्पनिक (The Rice Bowl Hill incident). पण मुराकामी स्वतः पत्रकार आहे आणि त्याला याबद्दल अधिक विचारले असता त्याने फक्त ‘नो कमेंट्स’ एवढेच उत्तर दिले.

बरेचदा कलाकृतींमध्ये इतर प्रसिद्ध लेखकांचे संदर्भ आले तर लेखकाचे स्फूर्तीस्थान कळते. साइनफेल्डमध्ये वूडी ऍलनचा संदर्भ पाहिल्यावर त्याचा दर्जा फ्रेंड्सपेक्षा इतका वर का हे लक्षात येते. इथे तर नावातच काफ्का, त्यामुळे कथा अब्जर्ड असल्यास नवल नाही. (आणि काफ्का त्याचा आवडता लेखक असल्याचे मुराकामीनेही सांगितले आहे.) इतरही बरेच संदर्भ आहेत. ग्रीक ट्रॅजेडी, अरेबियन नाईट्स, मॅकबेथ, प्लेटोचे सिंपोझियम, मोझार्ट आणि शूबर्ट यांच्या संगीतातील बारकावे किंवा पुचिनीचा ला बोहेम ऑपेरा. लेखकाचा व्यासंग किती अफाट आहे याची यावरून कल्पना येते. शिवाय हेही लक्षात येते की या आणि अशा प्रकारच्या बर्‍याच लेखकांना/पुस्तकांना मुराकामी कोळून प्यायला आहे. तो जे लिहीतो आहे त्याची त्याला पूर्ण कल्पना आहे. ही सगळी नावे केवळ नेम-ड्रॉपिंगच्या उद्देशाने दिलेली नाहीत.

जर तुम्हाला गूढ, रहस्यमय, काहीशा फँटसीच्या अंगाने जाणार्‍या कथा आवडत असतील तर ‘काफ्का ऑन द शोर’ वाचून बघायला हरकत नाही.