Categories
बुके वाचिते

उंबेर्तो एको यांचा चक्रव्यूह – द नेम ऑफ द रोझ

कथा थोडक्यात सांगायची झाली तर एका मठात एका भिक्षुचे प्रेत सापडते. मठात आलेले दोन पाहुणे याचा शोध घेत असतानाच एकामागून एक इतर भिक्षुंची प्रेते संशयास्पद स्थितीमध्ये आढळतात. शेवटी – पाचशेव्या पानावर – रहस्याचा उलगडा होतो. यात नवीन काय? अगाथा ख्रिस्तीच्या जवळपास प्रत्येक कथेमध्ये याहून वेगळं काही नाही. पण पुस्तक वाचायला सुरूवात केल्यावर हळूहळू फरक जाणवायला लागतात आणि शेवट येईपर्यंत ही दरी इतकी वाढते की खून कुणी केले किंवा रहस्य काय होते हे प्रश्न काहीसे बाजूला पडतात. शीर्षकामध्ये आलेल्या चक्रव्यूह या शब्दाचा अर्थ कथानक किंवा रहस्य गोंधळून टाकणारे आहे इतका सरळ नाही – अर्थात रहस्यकथेला आवश्यक असलेल्या क्रमवार नाट्यमय घटना यात आहेतच – पण ही एक सरळसोट रहस्यकथा नसून रहस्यकथा हे एक माध्यम म्हणून वापरले गेले आहे. या माध्यमातून एको यांना काय सांगायचे आहे हा कळीचा मुद्दा आहे. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्याचे विविध अर्थ लावले गेले. नंतर एको यांनी ‘द की टु द नेम ऑफ द रोझ’ हे पुस्तक लिहून त्यांना अभिप्रेत असलेले अन्वयार्थ मांडले. याचे अन्वयार्थ लावणारी इतर लेखकांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. पुस्तकावर आधारलेला शॉन कॉनेरी आणि ख्रिश्चियन स्लेटर अभिनित चित्रपटही येऊन गेला.

एको हे पूर्ण वेळ लेखक नाहीत. बोलोन्या (Bologna) विद्यापीठामध्ये ते मध्ययुगीन कालखंड आणि चिन्ह विज्ञान (semiotics) यावर संशोधन करतात. त्यांनी या विषयांवर अनेक पुस्तके, निबंध लिहीले आहेत. ‘द नेम ऑफ द रोझ’ त्यांची पहिली आणि सर्वात गाजलेली कादंबरी. चौदाव्या शतकातील एका भिक्षुने त्याच्या मठात घडलेल्या काही घटनांचे वर्णन योगायोगाने एको यांच्या हाती पडले. हे वर्णन एका फ्रेंच लेखकाने सतराव्या शतकात लॅटिनमधून अनुवादित केले होते. याचे इतर संदर्भ मिळवून, फ्रेंच अनुवादातील अतिरिक्त भाग टाळून एको यांनी ही कादंबरी लिहीली. थोडक्यात – चौदाव्या शतकात एका जर्मन भिक्षुने उत्तर इटलीमधील एका मठात घडलेल्या काही घटनांचे लॅटीनमध्ये केलेले वर्णन एका फ्रेंच लेखकाने अनुवादित केल्यानंतर एको यांनी ते इटालियन भाषेत आणले. (त्याच्या इंग्रजी अनुवादावर आधारित हा लेख मराठीत लिहीला आहे.)

एको यांची बरीच वैशिष्ट्ये आहेत. त्यातले एक म्हणजे त्यांचा छाती दडपायला लावणारा व्यासंग. मिलानमध्ये त्यांच्या घराच्या बहुचर्चित ग्रंथालयामध्ये ५०,००० पुस्तके आहेत. त्यांचा हा व्यासंग त्यांच्या लिखाणातही दिसतो. त्यांच्या टीकाकारांचे म्हणणे आहे की हा केवळ देखावा आहे. एको मुद्दाम आपल्या वाचकांना न्यूनगंड देण्यासाठी असे करतात असे म्हणायलाही एकाने कमी केले नाही. अर्थातच एको यांना हा आरोप मान्य नाही. जेवढी आवश्यक आहे तेवढी माहिती मी देतो, तिचा उपयोग वाचकांनी हवा तसा करावा असे त्यांचे म्हणणे आहे.

कथा आत्ताच्या उत्तर इटली आणि फ्रान्स यांच्या सीमेवरील एका मठात घडते. मूळ हस्तलिखितामध्ये ठिकाणाचा उल्लेख नाही. मठात येणारे दोन पाहुणे आहेत – बास्करव्हिलचा विल्यम आणि त्याचा शिष्य अद्सो. ही पात्रे सरळसरळ शेरलॉक होम्स आणि वॉटसन यांच्यावर आधारलेली आहेत. कॉनन डॉयलच्या प्रसिद्ध ‘हाउंड ऑफ बास्करव्हिल’ मधले बास्करव्हिल हे विल्यमचे गाव. विल्यमचे वर्णन आणि स्वभाव होम्सशी बराच मिळताजुळता आहे. पुस्तकाच्या सुरूवातीलाच विलियम मठातील घोडा नाहीसा झालेला असताना त्याच्या टापाच्या खुणांवरून तो कुठे असेल याचे भाकित करतो आणि ते खरे ठरते. कथा पुढे गेल्यानंतर मात्र विल्यम आणि होम्समधील फरक जाणवू लागतात. किंबहुना होम्स आणि त्या अनुषंगाने त्या ढंगाच्या रहस्यकथांवर टिप्पणी करायच्या हेतूनेच एको यांनी ही पात्रे निवडली असावीत असे वाटते. कथेचा निवेदक अद्सो आहे मात्र तो ही कथा सांगतो तेव्हा त्याच्या आयुष्याचा शेवट जवळ आला आहे. तरूण असताना घडलेल्या एक अविस्मरणीय अनुभवाची नोंद करावी असे त्याला वाटते.

कथा ज्या काळात घडते त्या वेळेस युरोपात बर्‍याच गुंतागुंतीच्या घडामोडी चालू होत्या. रोममध्ये पोप ख्रिस्ती धर्मावर स्वत:चे वर्चस्व मिळवण्यासाठी झगडत होता. त्याला फ्लोरेन्स किंवा बोलोन्या अशा ठिकाणी संघटीत झालेल्या फ्रान्सिस्कन आणि दोमिनिकन शाखांच्या धर्मोपदेशकांकडून विरोध होत होता. फ़्रान्सिस्कन विचारसरणी स्वीकारणार्‍यांमध्ये रॉजर बेकन आणि ‘ओकॅम वस्तरा’ फेम विल्यम ओकॅम यांचा समावेश होता. येशू ख्रिस्त गरीब होता आणि आयुष्यभर गरिबीतच राहीला. त्यामुळे त्याच्या भक्तांनीही तसेच रहायला हवे असे फ्रान्सिस्कन गटाचे म्हणणे होते. अर्थातच हे पोपला मान्य नव्हते कारण असे झाल्यास कॅथोलिक चर्चची सार्वभौम सत्ता अवैध ठरली असती. यावर तोडगा काढण्यासाठी या गटांमध्ये अनेक बैठका झाल्या. विल्यम आणि अद्सो अशाच एका बैठकीची बोलणी करण्यासाठी मठात आलेले असतात.

कथेचा काळ अत्यंत महत्वाचा आहे. रेनेसान्सचा सुवर्णकाल यायला अवकाश होता, छपाईयंत्राचा शोध लागायचा होता. छापखाना माणसाच्या प्रगतीमध्ये किती महत्वपूर्ण होता याची कल्पना आज करणे कठीण जाते. ज्याप्रमाणे भारतात वैदिक कालापासून ज्ञान मिळवणे ही काही विशिष्ट वर्गांचीच मक्तेदारी होती तसाच प्रकार या काळात युरोपमध्ये होत होता. जी पुस्तके ख्रिस्ती धर्माच्या विरोधी होती त्या पुस्तकांवर बंदी घातलेली होती. कथेतील मठामध्ये एक विशाल ग्रंथालय असते. तिथे ठिकठिकाणाहून नक्कल करून आणलेली अमूल्य पुस्तके असतात. मात्र ही पुस्तके वाचायची परवानगी सर्वांना नसते. एखादे पुस्तक वाचायचे तर मठाच्या मुख्याची परवानगी घ्यावी लागते. मठातील ग्रंथालय ही आजच्यासाखी सोपी, सुटसुटीत इमारत नसून एक प्रकारचा भूलभुलैय्या असते. ग्रंथालयाची रचना ही एका प्रकारे कथानकाच्या गुंतागुंतीचे रूपक आहे. ग्रंथपालाची आज्ञा मोडून रात्री ग्रंथालयात चोरून पुस्तके वाचायला जाणार्‍या भिक्षूंना अंधारात रहस्यमय आकृत्या दिसतात. ज्या भिक्षुंचा खून होतो ते सर्व एक विशिष्ट पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत असतात. हे पुस्तक असते ऍरिस्टॉटलचे विनोदावरचे पुस्तक. आज याची एकही प्रत उरलेली नाही.

वॉटसनप्रमाणेच अद्सो विल्यमला सतत प्रश्न विचारत राहतो. इतर भिक्षु आणि विल्यम यांच्यात बरेच वादविवाद होतात. या सर्वांमधून त्या काळातील नियमांची, परिस्थितीची ओळख होत जाते. चर्चला विनोदाचे इतके वावडे का या प्रश्नाचेही उत्तर शेवटी मिळते. येशू ख्रिस्त हसल्याचा कुठेही उल्लेख नाही. विनोदाचे हत्यार सामान्य लोकांच्या हातात पडले तर चर्च आणि देव यांची त्यांना भीती रहाणार नाही. ते बेबंदपणे वागतील. विनोदाबद्दल समर्थांच्या ‘टवाळा आवडे विनोद’ सारखीच पण तुलनेने कितीतरी कठोर मानसिकता समोर येते.

पुस्तकाला निश्चित असा शेवट नाही. नायक शेरलॉक होम्सवर बेतला असल्याने हा विरोधाभास अधिक प्रखरपणे जाणवतो. होम्स कथेच्या शेवटी सगळ्या अडचणी बिनचूक सोडवतो मात्र विल्यम शेवटी रहस्य उलगडल्यानंतरही अधिकच गोंधळतो. तो म्हणतो, “निश्चित असे रहस्य नव्हतेच, आणि उलगडले ते ही अपघातानेच.” ऍरिस्टॉटलचे पुस्तक विल्यमला शेवटी सापडते पण ते पूर्ण न वाचताच तो या पुस्तकात काय असेल हे सांगतो. पुस्तकांमध्ये नेहेमी इतर पुस्तकांचा संदर्भ असतो. एके ठिकाणी अद्सो म्हणतो, “Until then I had thought each book spoke of the things, human or divine, that lie outside books. Now I realized that not infrequently books speak of books: it is as if they spoke among themselves.”

कथेतील मुख्य पात्रे इतर पुस्तकांमधून घेतलेली आहेत. कथेवर अर्जेंटिनाचे प्रसिद्ध लेखक होर्हे लुई बोर्हेस यांचा कथांचाही बराच प्रभाव आहे. कथेतील एका आंधळ्या ग्रंथपालाचे पात्र खुद्द बोर्हेस यांच्यावर आधारित आहे. आणखी एक महत्वाची प्रेरणा आहे जेम्स जॉइसची युलिसिस. युलिसिसमध्ये जॉइसने जो शब्दांचा चमत्कार केला आहे तसाच काहीसा प्रकार इथेही घडतो फक्त इथे शब्दांऐवजी कल्पना आहेत. पुस्तकाचे नावही पुरेशी संदिग्धता निर्माण करते. रोझ म्हणजे नेमके काय? कालौघात ऍरिस्टॉटलचे हरवलेले पुस्तक? शेवटी ग्रंथालयाला आग लागते त्या आगीत भस्म झालेली अमूल्य पुस्तके? की शेक्सपिअरच्या ‘अ रोझ बाय एनी अदर नेम..” या प्रसिद्ध वाक्याचे विडंबन? एको यांच्या मते कथेमध्ये वाचक हा एक महत्वाचा घटक आहे. दिलेले सर्व संदर्भ वाचकाला कळतील असे ते गृहीत धरून चालतात. अशा वाचकाला ते आदर्श वाचक मानतात. पुस्तकातील प्रथमदर्शनी खुणा फसव्या आहेत. होम्सकथेसारखी सुरूवात होते पण शेवट नाही. वाचकांच्या ठरलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी इथे अपेक्षाभंगच होतो – मात्र परत काळजीपूर्वक वाचन करताना कथेत लपलेल्या खुणा त्याला उमगतील. गंमत म्हणजे ‘काफ्का ऑन द शोर’ या कादंबरीबाबत वाचकांनी प्रश्न विचारले असताना मुराकामीनेही पुस्तक परत वाचण्याचा सल्ला दिला.

‘द नेम ऑफ द रोझ’ बर्‍याच पातळ्यांवर भावते. मात्र हे पुस्तक ‘दा विंची कोड’ सारखी झटपट भूक भागवणारे ‘फास्ट फूड’ नाही. हा सकस आहार आहे आणि तो पचवण्यासाठी कष्ट करावे लागतात. एकोंच्या म्हणण्यानुसार पुस्तकाची पहिली १०० पाने बरीच दुर्बोध आहेत पण जो वाचक यातून तरेल तोच खरा. जणू पूर्वीच्या काळी भिक्षुंची जशी सत्वपरीक्षा घेतली जात असे तसे काहीसे. असे असले तरी या पुस्तकाची लोकप्रियता अबाधित आहे. फिट्झेराल्डच्या ग्रेट गॅट्स्बीला नाकारणार्‍या वाचकांनी या पुस्तकाची भरभरून प्रशंसा केली आहे. तब्बल १७,००० वाचकांनी याला पाच तारे दिले आहेत. एको यांना अभिप्रेत असलेला आदर्श वाचक होणे फार थोड्या लोकांना जमेल तरीही बाकीच्यांनाही या कथेतून बरेच काही मिळते आहे याची ही पावती आहे. रेनेसान्सच्या आधीचे जग, तेव्हाच्या लोकांची विचारसरणी या सर्वांचे विहंगम दर्शन या कथेतून होते. पुस्तके सहजासहजी उपलब्ध होणे ही साधीशी वाटणारी घटना किती क्रांतीकारी ठरली याची कल्पना येते.