तुमकू बैदा होना क्या?

च्या मारी, डोक्याचं गांगेय साम्राज्य झालंय नुसतं . काय म्हणालात, गांगेय साम्राज्य म्हणजे काय? अरेरे.. गांगेय साम्राज्य यासारख्या साध्या शब्दाला जर तुमची गाडी अडली तर समाजमनाच्या तात्कालिक आंदोलनांचे अवगाहन, परिशीलन आणि अश्वारोहण तुम्हाला कसे जमणार? मग ती आंदोलने अनवट आहेत की कनवट, वारली आहेत की एकारली हे कळणे तर दूरच राहीले.

बोले तो तुम्हारे बेसिक फंडेमें लोचा है. हमारे खाला के चचेरे फूफाका दिमाग बी ऐसाईच था. सुबा सुबा नाश्ते के टैम पेच झिकझिक शुरू.
रोज सुबा मेरे खाला के फूफा पेपर पढते थे, तबीच मेरे खाला की फूफी उनको पूछती थी,

“तुमकू खारी होना क्या?”
“नको.”
“तुमकू चाय-रोटी होना क्या?”
“नको.”
“तुमकू बैदा होना क्या?”
“नको.”
“मेरा कलेजा देती भूनके, होना क्या? क्या बई, खालूजान इकबाल का रिश्ता लेके आए थे, हां बोलती तो आज दुबई में होती. लेकिन जमीला ने उसी टैम पे मेरेकू ‘लव ष्टोरि’ दिखाई और मै बोली नई, मेरेकू ये रिश्ता नै होना. “
“नको.”

‘शैतानी दरवाजा’ या चित्रपटात एक हृद्य प्रसंग आहे. एका स्मशानात एका बाईचं भूत फिरतं आहे. भुतांसाठी झाडाला उलटे लटकणे किंवा कुणी दिसल्यास खदाखदा हसणे यापलिकडे ‘रिक्रिएशनल फसिलिटीज’ नसतात त्यामुळे रात्री नुसतं फिरून फिरून तिला/त्याला कंटाळा येतो. जगायचा कंटाळा आला म्हणून तिने/त्याने जीव दिलेला असतो . नंतरही कंटाळा आल्यावर काय करायचं इतका पुढचा विचार करण्याइतकी दूरदृष्टी तिला/त्याला नसते. कंटाळवाणा भूतकाळ असल्यावर भुतालाही त्या भूतकाळाचा कंटाळा येणारच, पण त्या गेलेल्या काळाचे भूत या भुतापुढे सदैव उभे असते. अचानक काही कवट्यांच्या खाली तिला/त्याला एक ओळखीची कवटी दिसते, हिंजवडे मास्तरांची. हिंजवडे मास्तर उत्क्रांती शिकवायचे. सर्व्हायव्हल, सिलेक्शन . ती/ते भूतकाळाच्या आठवणींमध्ये रमून जाते…

——–

तळटीपा

१. प्रेरणा [अ] : Once I had multiple personalities, but now all of us are doing well.

२. वारली गाव किंवा अनंतात विलीन होणे [ब] किंवा ब्रूस लीचा चुलतभाऊ वार ली. साहित्य जितके संदिग्ध तितके ते थोर असा दंडक असल्याने आम्ही आमच्या साहित्याच्या प्रत्येक कानाकोपर्‍यामध्ये संदिग्धता ठाकून-ठोकून भरली आहे. तरीही कुणाला काही अर्थबोध झाल्यास त्याला लेखक जबाबदार नाही. ग्राहकांचा संतोष [क] हेच आमचे ध्येय. अधिक माहीतीसाठी पहा आमची ‘कमिंग जावई’ कादंबरी – दामाजीची जागृती.

३. बाईच्या भुतालाही समान हक्क मिळू नयेत याला काय म्हणावे? तिला – भूत झालेल्या बाईला की त्याला – बाईच्या भुताला? मृत्यूनंतरच्या आयुष्यामधील व्याकरणाच्या अडचणी अजूनही सोडवल्या गेलेल्या नाहीत ही शरमेची बाब आहे. गेल्या दोनशे वर्षांमध्ये दिवंगत झालेल्या भाषातज्ज्ञांनी या बाबतीत कामचुकारपणा केलेला आहे हे उघड आहे. संबंधित अधिकारी इकडे लक्ष देतील काय? या प्रश्नात लक्ष घालण्यासाठी गरज पडल्यास भाषातज्ज्ञांची कुमक पाठवावी काय या प्रश्नावरही गंभीर विचार होण्याची आवश्यकता आहे.

४. तिने/त्याने जीव दिलेला असतो – भूत झालेल्या बाईने जिवंत असताना जीव दिलेला असतो असे म्हटले तर एक वेळ ठीकै पण बाईच्या भुताने जीव दिलेला असतो म्हणजे काय? भूत जीव कसे देणार? पण बाई जिवंत असते तेव्हा भूत नसते म्हणजे एका अर्थी बाई जिवंत असताना भूत मेलेले असते. म्हणजे त्याने जीव दिलेला असतो असे म्हणता येईल का? तसे असले तर आत्ता आपल्या सगळ्यांच्या भुतांनी जीव दिलेले आहेत असे म्हणता येईल का? इथे अर्थातच भुताचा जन्म होतो का आणि झाला तर कधी होतो हा कळीचा मुद्दा आहे. भुताचे सगळे उलटे त्यामुळे त्याचे मरण आधी आणि जन्म नंतर असे तार्किक दृष्टीने मानायला हरकत नसावी.

——–

तळतळटीपा

अ. तळतळटीप क पहावी.

ब. विलीन होणे याची एक फोड ‘विली न होणे’ अशीही करता येते. सोळाव्या शतकात टोपीकरांच्या देशात ग्रीक नाटकांवरून कॉपीपेष्ट करून इंग्रजी नाटके लिहीणारा विलियम उर्फ विली नावाचा नाटककार होऊन गेला. त्याच्या सन्मानार्थ आजही इंग्लंडात ‘न झाला असा विली न होणे’ ही म्हण लोकप्रिय आहे. थोर्थोर लेखकांचे आणि साहित्याचे संदर्भ/निर्देश/अप्रत्यक्ष उल्लेख दिल्यावर साहित्याचे मूल्य आणखी वाढते असाही एक दंडक आहे.

क. संतोष ही भावना (मुलगी की इमोसन? त. २. प. ) की संतोष ग्राहक नावाचा मुलगा? आमी नै सांगणार जा! तळटीप २ पहा गडे!

ड. देव अभिनेता की कुणालाही हार जात नाही असा परमेश्वर? प्रश्न, प्रश्न, प्रश्न – साहित्यात नुसते प्रश्न आले पाहिजेत, उत्तरे शोधायला रिकामटेकडे वाचक आहेत की. आणखी एक दंडक. थोर्थोर साहित्याचे इतके दंडक पाळता पाळता आम्ही जणू दंडकारण्यातच वास्तव्य करत आहोत असा कधीकधी आम्हाला भास होतो.
——–

वि. सू. : या सर्वांतून काही अर्थबोध झाल्यास लेखकाची सहानूभूती स्वीकारावी.