स्नूपी, चार्ली ब्राऊन आणि मंडळी

कॉमिक स्ट्रिप म्हणजे तीन किंवा चार चौकोन असलेली (रविवारी जास्त), ठराविक पात्रे असलेली आणि त्यांची गोष्ट सांगणारी मालिका. मात्र कॉमिक स्ट्रिपच्या कलाकारांचा उल्लेख कार्टूनिस्ट असाही केला जातो त्यामुळे या दोन प्रकारातील फरक तितका स्पष्ट नाही. कॉमिक स्ट्रिपचा उदय ‘वर्तमानपत्रातील मोकळी जागा भरणे’ या कारणासाठी झाला आणि आजही त्यामागचे मुख्य कारण तेच आहे. अर्थात आता आंतरजालामुळे ‘वेब कॉमिक’ हा नवा प्रकार आला आहे. स्वदेशी कॉमिक स्ट्रिप नसल्या तरी गारफील्ड, कॅल्विन ऍंड हॉब्ज किंवा इचि फीट कॉमिक्स यासारख्या परदेशातील कॉमिक स्ट्रिप इथे बऱ्याच लोकप्रिय आहेत.

या सर्वांमध्ये माझी आवडती कॉमिक स्ट्रिप चार्ल्स शुल्ट्झ याची पिनट्स. २ ऑक्टोबर १९५० रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रकाशित झाला आणि १३ फेब्रुवारी, २००० ला शेवटचा. एकूण १७८९७ भाग प्रकाशित करून शुल्ट्झने एक विक्रमच केला. निवृत्त झाल्यानंतर शुल्ट्झने मालिका बंद करण्याचा निर्णय घेतला. यातील मुख्य पात्र आहे चार्ली ब्राऊन हा मुलगा. सुरुवातीला याचं वय चार वर्षे होतं, नंतर सहा झालं आणि शेवटी आठ. इतर पात्रांमध्ये सॅली, मित्र लिनस, श्रोडर, लिनसची मोठी बहीण लूसी आणि पेपरमिंट पॅटी, फ्रॅकलिन ही मुख्य पात्रे आहेत. चार्ली ब्राऊन नेहमी उदास असतो, त्याला बरंच काही करायची इच्छा असते – बेसबॉलची मॅच जिंकणे, पतंग उडवणे इ. – पण त्याच्या पदरात नेहमी अपयशच येतं. सुरुवातीला त्याचा स्वभाव ऍरोगंट होता, नंतर तो सौम्य झाला. इतर पात्रांची आपापली वैशिष्ट्ये आहेत. लूसी भांडकुदळ आहे, पण पाच सेंट फी घेऊन ती मानसोपचाराचे सल्लेही देते. तिच्याकडे बहुतेक वेळा चार्लीच सल्ला मागायला येतो. बरेचदा हे सल्ले ‘ऑब्व्हियस ट्रूथ्स’ असतात पण कधीकधी विचार करायला लावणारेही असतात. श्रोडर पियानो वाजवतो आणि बेथोवनचा भक्त आहे. (श्रोडर पियानो वाजवत असताना मागे उमटणारी स्वरलिपी नेहमी मूळ बेथोवनची असते. बरेच कानसेन वाचक लिपीवरून कोणत्या सिंफनीतील कोणती मूव्हमेंट आहे याचा शोध घेत असतात.) लिनस नेहमी एक ब्लॅकेट घेऊन वावरत असतो – ते जवळ नसेल तर त्याला चैन पडत नाही. हे वर्णन वाचल्यावर कदाचित असं वाटू शकेल की या लहान मुलांच्या गोष्टींमध्ये मोठ्यांना काय रस असणार? अशा गोष्टी – उदा. हॅरी पॉटर – फक्त लहान मुलांसाठीच असतात असाही एक समज असतो. पीनट्समध्ये चार्ली ब्राऊनला त्याच्या वयानुसार ज्या अडचणी येतात आणि त्यावर त्याची जी प्रतिक्रिया होते ती बरेचदा व्यापक स्वरूपाची असते. त्यामुळे त्याच्या अडचणी बालसुलभ आहेत हे लक्षात येऊनही मोठी माणसेही त्यात गुंतत जातात.

सुरुवातीला या पात्रांची मालिका सुरू झाल्यावर नंतर त्यात एका भू-भूचा प्रवेश झाला – स्नूपी. बहुतेक वेळा दीर्घकालीन मालिकांमध्ये सुरुवातीची पात्रे आणि त्यांचं नंतरचं स्वरूप यात बराच फरक असतो. ‘साइनफेल्ड’ मालिकेतील कॉस्मो क्रेमरच्या पात्राची झालेली प्रगती हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. स्नूपीच्या बाबतीतही हेच झालं. सुरुवातीला सामान्य कुत्रा असणारं हे पात्रं नंतर प्रचंड बदललं. स्नूपी हा कुत्रा असला तरी तो इतर कुत्र्यांप्रमाणे कधीच वागत नाही. चार्ली ब्राऊन त्याला खायला घालतो पण स्नूपी त्याचं स्वामित्व कधीच स्वीकारत नाही. इतर कुत्र्यांप्रमाणे सर्कशीत चालतात तश्या करामती करणं त्याला कमीपणाचं वाटतं. स्नूपीला बोलता येत नाही पण त्याच्या मनात काय विचार चालू आहेत हे वाचकांना ‘थॉट बलून’च्या द्वारे कळतं. सुरुवातीला हे विचार फक्त ‘फूड’सारख्या शब्दांपर्यंतच मर्यादित होते. नंतर स्नूपी प्रगल्भ झाला. दोन पायांवर चालण्यापासून सुरुवात करून व्हॅन गॉची चित्रे गोळा करण्यापर्यंत त्याची मजल गेली. तो टाईपरायटरवर कादंबरीही लिहू लागला. कादंबरीची सुरुवात नेहमी “It was a dark and stormy night…” अशी होत असे. नंतर एकदा त्याला प्रकाशकांकडून कादंबरी स्वीकारल्याचं पत्रही येतं, मात्र ते एकच प्रत छापणार असतात, ती खपली तर पुढची. स्नूपीच्या पात्रामध्ये झालेला एक मोठा बदल म्हणजे त्याचा ‘अल्टर-इगो’. हा अंगात शिरला की स्नूपी पहिल्या महायुद्धातील एक फायटर पायलट होतो आणि त्याचा नेहमीचा शत्रू – रेड बॅरनशी – युद्ध करतो. (स्वत: शुल्ट्झने दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता.) याखेरीज स्नूपी कामचलाऊ फ्रेंच “बोलतो”, टेनिस खेळतो, ऍकॉर्डियन, गिटार वाजवतो, ‘वॉर ऍंड पीस’ एक शब्द रोज या वेगाने वाचतो. कदाचित पीनट्सची ओळख नसेल तर हे सगळं कैच्याकै वाटू शकेल. यावर शुल्ट्झचं म्हणणं असं की सहसा कुत्रे आपल्याला वाटतं त्यापेक्षा बरेच हुशार असतात. या विचाराची अतिशयोक्ती इथे दिसते. यावर विचार केल्यावर एक वेगळा मुद्दा सुचला. बरेचदा कुत्रे आपल्याच नादात असतात. रात्री-अपरात्री सूर लावून रडणे किंवा कुठेतरी घाईघाईत जाताना दिसणे हे सर्व पाहून हे प्राणी आपल्याच भावविश्वात मग्न असतात असं वाटतं. (कुत्रे क्वचितच टंगळमंगळ करत जाताना दिसतात. बहुतेक वेळा एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगला जाताना जी घाई असते तीच त्यांच्या चालीत असते. याउलट मांजर.) स्नूपीखेरीज वुडस्टॉक नावाचा एक पक्षीही आहे पण याला आपले विचार शब्दांत मांडता येत नाहीत. त्याऐवजी तो “| | | | | | |” अशा खुणांमध्ये बोलतो.

चिंटू किंवा कॅल्विन ऍंड हॉब्ज यासारख्या मालिका आणि पीनट्समध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. पीनट्समध्ये एकही मोठ्या माणसाचे पात्र नाही. मोठ्या माणसांचे उल्लेख येतात पण ती कधीही दिसत नाहीत. पीनट्समध्ये वाचकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी मुलांच्या पातळीवरचा आहे. स्पिलबर्गने ‘ई. टी.’ चित्रित करताना हेच केलं होतं. चित्रपट सुरू झाल्यावर बराच वेळ कॅमेरा अडीच-तीन फुटापेक्षा वरचं काही बघतच नाही, सगळ्या मोठ्या माणसांचे पायच दिसतात. गंमत म्हणजे स्पिलबर्गने लहानपणी डिस्नेचे लूनी टून्स कार्टून बघितले होते त्यातही असंच होतं. यावरूनच त्याला ही कल्पना सुचली. यामुळे पीनट्स इतर लहान मुलांच्या मालिकेपेक्षा वेगळ्या पातळीवर जाते. मोठ्या माणसांशी वागताना येणाऱ्या अडचणी हा इथे महत्त्वाचा मुद्दा नाही, उलट सर्वस्वी लहान मुलांच्या जगात जाऊन तिथून जग कसं दिसतं हे बघायचा प्रयत्न आहे. होम्सला मारल्यानंतर कॉनन डॉयलला लोकांचा रोष पत्करावा लागल्याची कहाणी सर्वश्रुत आहे. साठच्या दशकात शुल्ट्झने लिनस आणि लूसी यांच्या बाबांची दुसऱ्या गावी बदली होते असं दाखवलं आणि ते दोघे सगळ्यांना सोडून गेले. लगेच फोन, पत्रे, तारा यांचा भडिमार सुरू झाला. खरं तर शुल्ट्झ यथावकाश हे परत येतात असं दाखविणारंच होता, पण लोकाग्रहास्तव त्याला हे काम तातडीने उरकावं लागलं.

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे कॉमिक स्ट्रिप या कलाप्रकाराबद्दल वाचकच नव्हे तर समीक्षकांमध्येही अनास्थाच आहे. याचं एक मुख्य कारण म्हणजे प्रत्येक दिवशी कॉमिक स्ट्रिप ३० ते ४० सेकंदात वाचून होते. आवडती कॉमिक स्ट्रिप नसेल तर वाचक बेचैन होतात पण असली तरी मिनिटभरापेक्षा जास्त वेळ तिला दिला जात नाही. साहजिकच कॉमिक स्ट्रिप या प्रकाराकडे गंभीरपणे बघितलं जात नाही. साहजिकच याची समीक्षा वगैरे फारच लांबची गोष्ट होते. शुल्ट्झने ज्या अनेक बारकाव्यांमधून मालिका फुलवली आहे ते बरेच वेळा दुर्लक्षितच राहतात. (उदा. स्नूपी खुनशी मोडमध्ये आला की किंचित दात दाखवीत इंग्रजीत ज्याला ‘एव्हिल ग्रिन’ म्हणतात तसं हसतो किंवा रागावला की त्याच्या भुवया किंचित वक्र होतात.) अशा परिस्थितीत हे कलाकार आणि त्यांची कला यांच्याबद्दल अधिक माहिती मिळणं जवळजवळ दुरापास्तच असतं. सुदैवाने शुल्ट्झने वेळोवेळी लिहिलेले लेख आणि दिलेली भाषणे यांचं संकलन ‘माय लाईफ विथ चार्ली ब्राऊन’ या पुस्तकात केलं आहे. पीनट्सच्या चाहत्यांना हे पुस्तक रोचक वाटेलच, शिवाय जर कॉमिक स्ट्रिप या कलाप्रकारात रुची असेल तर अशा लोकांसाठीही उपयोगी आहे. या पुस्तकात शुल्ट्झ त्याच्या सुरुवातीच दिवसांपासूनचा प्रवास, आलेल्या अडचणी, नवीन कार्टुनिस्ट म्हणून सुरुवात करतानाचे धोके इ. बद्दल विस्ताराने बोलतो. रोजच्या कॉमिक स्ट्रिपला प्रेरणा कुठून मिळते याचीही सविस्तर चर्चा करतो. एकदा जेवणाच्या टेबलावर सगळे जमले असताना शुल्ट्झची मुलगी एमी दंगा करत होती. शुल्ट्झने तिला दटावल्यानंतर ती काही वेळ गप्प झाली. मग तिने एक ब्रेड घेतला आणि त्याला लोणी लावायला सुरुवात केली आणि शुल्ट्झला विचारलं, “Am I buttering too loud for you?” हीच पंचलाईन वापरून शुल्ट्झने त्याचं पुढचं कॉमिक बनवलं.

स्नूपी पहिल्या महायुद्धातील फायटर पायलट असतो या कल्पनेचा नंतर शुल्ट्झने ‘डी-डे’ च्या आठवणीसाठी अनोख्या पद्धतीने उपयोग करून घेतला. ६ जून, १९९३ रोजी प्रकाशित झालेल्या कॉमिक स्ट्रिपमध्ये नॉर्मंडीच्या बीचवर स्नूपी एकटाच हेल्मेट घालून पोहत जाताना दिसतो. खाली लिहिलेलं असतं, June 6, 1944,”TO REMEMBER”.