Categories
बुके वाचिते

दोन आयुष्यं

१९६९ मध्ये उच्च शिक्षणासाठी विक्रम सेठ इंग्लंडला गेला. तेव्हा त्याचं वय १७ वर्षे होतं. त्याला पाठवायला त्याची आई अजिबात तयार नव्हती. आपला मुलगा तिकडे जाऊन बिघडेल की काय अशी तिला भीती वाटत होती. अखेर उपाय निघाला तो विक्रमच्या शांतीकाकांच्या रूपात. शांतीकाका लंडनमध्ये दंतवैद्य होते. त्यांनी ‘लोकल गार्डीयन’म्हणून विक्रमवर लक्ष ठेवावं अशी तडजोड निघाली. विक्रम सुरुवातीला त्यांच्यासोबत राहत होता. नंतर त्याला ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाल्यावर तो त्यांच्या वसतिगृहात राहायला गेला. पण तोपर्यंत शांतीकाकांच्या घराशी त्याचा चांगला परिचय झाला होता. सुट्टी मिळाल्यावर तो लगोलग घरी यायचा.

शांतीकाका एकटे नव्हते, बरोबर हेन्नीकाकूही होत्या. हेन्नीकाकू जर्मनीच्या. शांतीकाकांचं दंतवैद्यकाचं शिक्षण जर्मनीत झालं. त्यादरम्यान ते हेन्नीकाकूंच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहिले. जर्मन लोकांना साजेसा असा शिस्तशीर आणि काहीसा रुक्ष स्वभाव असलेल्या हेन्नीकाकूशी नंतर विक्रमची चांगलीच गट्टी जमली. मूलबाळ नव्हतं त्यामुळे विक्रमला शांतीकाका आणि हेन्नीकाकूंनी आपल्या मुलाप्रमाणेच वागवलं. विक्रमला जर्मन भाषा शिकावी लागेल अन्यथा पदवी मिळणार नाही असं कळताच हेन्नीकाकूंनी आता घरात फक्त जर्मन बोलायचं असा फतवा काढला. जेवणाच्या टेबलावर विक्रमला जे हवं ते जर्मनमधून मागितलं तरच मिळत असे. शांतीकाका बरेचदा त्यांच्या भावांबद्दल आणि इतर नातेवाइकांबद्दल बोलायचे. विक्रमचे आई-बाबा लंडनला आल्यावर बऱ्याच भेटीगाठीही व्हायच्या. पण हेन्नीकाकू कधीही त्यांच्या आई गॅब्रिएल कारो किंवा बहीण लोला यांच्याबद्दल किंवा त्यांच्या गतआयुष्याबद्दल बोलत नसत.

ऑक्सफर्डचं शिक्षण संपवून विक्रम स्टॅनफर्डला अर्थशास्त्रात पीएचडी करण्यासाठी गेला. पण मध्येच चिनी भाषाच शीक किंवा कविताच लिही असे प्रकार केल्यामुळे पीएचडी बरीच रेंगाळली. दरम्यान ‘गोल्डन गेट’ ही त्याची पद्य कादंबरी प्रसिद्ध झाली. १९८९ मध्ये दीर्घ आजारानंतर हेन्नीकाकू गेल्या. शांतीकाका एकटेच होते आणि त्यांचीही प्रकृती ढासळायला लागली होती. १९९४ मध्ये सगळे लंडनमध्ये भेटले असताना विक्रमच्या आईनं त्याला शांतीकाकांच्या आयुष्यावर का लिहीत नाहीस असं विचारलं. आधी विक्रमने ती कल्पना धुडकावून लावली पण नंतर त्याला ती आवडली. शांतीकाकांची संमती घेऊन त्याने त्यांच्या बऱ्याच मुलाखती घेतल्या. त्याचं चरित्र लिहिण्याइतकं मटेरियल जमा झालं होतं.

नंतर एक दिवस शांतीकाकांचं घर आवरावं म्हणून विक्रमचे बाबा साफसफाई करत होते. त्यांना माळ्यावर एक ट्रंक सापडली. शांतीकाका आणि विक्रम बाहेर बागेत बसले होते. ट्रंक बाहेर आणून उघडल्यावर दोघेही आश्चर्यचकित झाले. ट्रंकेत हेन्नीकाकूंची पत्रं, डायऱ्या असं सामान होतं आणि ते शांतीकाकांनीही कधीच पाहिलं नव्हतं. शांतीकाकांनी ते सगळं सामान विक्रमला पुस्तकात वापरण्यासाठी दिलं. ती सगळी पत्रं, डायऱ्या वाचल्यानंतर हेन्नीकाकूंच्या आयुष्यातले आतापर्यंत उघड न झालेले पैलू समोर आले. ते वाचल्यानंतर विक्रमला जाणवलं की हे पुस्तक फक्त शांतीकाकांवर लिहिणं बरोबर नाही. यात हेन्नीकाकूही यायला हव्यात. एकाऐवजी या दोन आयुष्यांचं पुस्तक अखेर तयार झालं – टू लाईव्ह्ज.

१९३० च्या दशकात शांतीकाका जर्मनीत असताना हेन्नी, लोला आणि त्यांच्या इतर मित्रमैत्रिणींशी त्यांची चांगली मैत्री झाली होती. शांतीचा पीएचडी थेसिस टाइप करायला लोलानं त्याला बरीच मदत केली. सुरुवात पेइंग गेस्ट म्हणून झाली असली तरी लवकरच शांती त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य होऊन गेला. १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेनंतर शांतीला दंतवैद्यकाची पदवी मिळाली आणि सहा महिन्यांनी पीएचडीही. शांती नोकरी शोधायला इंग्लंडला आला मात्र त्याचा कारो कुटुंबाशी संपर्क तुटला नाही. मध्ये एकदा सुट्टी असताना तो जर्मनीलाही जाऊन आला. १९३९ मध्ये युद्ध पेटलं. त्याच्या एक महिना आधीचं हेन्नी इंग्लंडला आली. इंग्लंडमध्ये शांती सोडून तिचं दुसरं कुणीही ओळखीच नव्हतं. शांतीच्या मदतीनं तिला छोट्या नोकऱ्या मिळाल्या. पुढच्याच वर्षी, १९४० मध्ये, शांती इंग्लंडतर्फे लेफ्टनंटच्या हुद्द्यावर सैन्यात रुजू झाला आणि त्याची रवानगी आफ्रिकेला झाली. युद्धाची तीव्रता वाढत गेली तसतशी गॅब्रिएल आणि लोला यांची जर्मनी बाहेर पडण्याची शक्यता मावळत गेली. हेन्नीनं जर्मनी सोडायचं कारण त्यांचा धर्म होता. १९३९ पासून ज्यू लोकांवरचे निर्बंध अधिकाधिक कडक होत गेले. ज्यू लोकांच्या व्यवसायांवर गदा आल्या, त्यांना सिनेमा, थिएटरमध्ये जाण्यास बंदी घातली गेली. त्यांच्याजवळचं सगळं सोनं-नाणं हिरावून घेण्यात आलं. अखेर १९४३ ‘फायनल सोल्युशन’च्या अंतर्गत ज्यूंच्या याद्या तयार करण्यात आल्या. गॅब्रिएलचं वय बघता तिला सॅनिटोरियमध्ये पाठवण्यात आलं. लोला स्टेनोग्राफर होती त्यामुळे तिचं जाणं शेवटापर्यंत लांबलं पण टळू शकलं नाही.

लोलाची रवानगी ऑश्वित्झमध्ये झाली.

ऑश्वित्झमधून लोलानं पाठवलेलं शेवटचं पोस्टकार्ड तिच्या बॉसच्या नावे होतं. ते नंतर त्यानं हेन्नीला पाठवलं. त्यातलं अक्षर एखाद्या लहान मुलानं लिहिला असावं असं आहे. एखाद्याला पेन्सिल धरण्याइतकीही शक्ती नसेल आणि तरीही निकरानं लिहायचा प्रयत्न करत असेल तसं. लोलाचा शेवट कसा झाला याचा अंदाज ऑश्वित्झमध्ये कैद असलेल्या ओटा क्राउस आणि एरिक कुल्का यांनी युद्धानंतर लिहिलेल्या ‘द डेथ फॅक्टरी’ या पुस्तकावरून येतो.

शेवटच्या यादीत निवड झाल्यावर लोलाला ब्लॉक २५ मध्ये नेण्यात आलं. तिच्याबरोबर असलेल्या इतर स्त्रिया, पुरूष आणि लहान मुलं यांना प्रत्येकी पाचच्या रांगांमध्ये क्रिमेटोरियम क्रमांक १ किंवा २ मध्ये नेण्यात आलं. इथे त्यांना कपडे आणि चपला काढून ठेवा असं सांगण्यात आलं. निर्जंतुक करण्याची प्रक्रिया संपली की परत आपलं सामान सापडावं म्हणून देण्यात आलेला क्रमांक नीट लक्षात ठेवा असंही बजावण्यात आलं. ‘डिसन्फेक्शन रूम’मध्ये जमिनीपासून छताला टेकणारे खांब उभारले होते पण हे खांब पोकळ होते आणि त्यांना छिद्रं होती. लोलाला इतर दोन हजार लोकांबरोबर या खोलीत डांबण्यात आलं. दिवे घालवण्यात आले असतील किंवा कमी केले असतील. बाहेर एक SS अधिकारी आणि एक सामान्य अधिकारी दोन मोठे हिरवे सिलिंडर घेऊन छतावर गेले. पोकळ खांबांचं झाकण काढून त्यात या सिलिंडरमधून झायक्लॉन-बी या विषाचे खडे टाकण्यात आले. झायक्लॉन-बीचा हवेशी संपर्क आला की तात्काळ विषारी वायू तयार होतो. हे खडे टाकल्यावर लगेच लोला आणि इतर कैद्यांची श्वास घेण्यासाठी धडपड सुरू झाली. पाच ते वीस मिनिटे असह्य वेदना सहन केल्यानंतर लोला मरण पावली असेल. अर्ध्या तासाने विषारी वायू पंपांद्वारे खेचून घेण्यात आला आणि दरवाजे उघडण्यात आले. आतमध्ये शेवटचा श्वास घेण्यासाठी केलेल्या धडपडीत चेंगराचेंगरी होऊन प्रेतांचा खच पडलेला असेल. लोलाचा निळा पडलेला आणि रक्तानं माखलेला देह लिफ्टने उचलण्यात आला आणि पाण्याचा फवारा केल्यानंतर तळमजल्यावर नेण्यात आला. तिच्या तोंडात सोन्याचे दात असले तर ते पक्कड वापरून काढून घेण्यात आले. शेवटी फर्नेस रूममध्ये मोठ्या लोखंडी ओव्हनमध्ये तिच्या देहाची विल्हेवाट लावण्यात आली. यातून मिळणारी चरबी इंधन म्हणून वापरण्यात आली. तिचे केस विविध वापरांसाठी आधीच काढून घेण्यात आले होते. हाडे शिल्लक राहिल्यास त्यांची भुकटी करून सोला नदीत टाकून देण्यात आली.

पुस्तक लिहीत असताना विक्रम एका परिषदेसाठी जेरूसलेमला गेला. तिथे होलोकॉस्टवरच्या एका संग्रहालयात त्याला तेव्हाची कागदपत्रं बघायला मिळाली. एकेक धागा जुळता जुळता अखेर गॅब्रिएल आणि लोला यांच्या नावांची यादी त्याला सापडली. या यादीबरोबर दिलेलं पत्रही होतं. पत्र गुप्तचर पोलिस विभागाने अर्थमंत्रालयाला लिहिलेला होतं. सोबत जोडलेली ज्यूंची ‘ट्रान्स्पोर्ट लिस्ट’ जमा करावी आणि त्यांची सर्व मिळकत जर्मन राइखमध्ये सामील करावी असा आदेश यात दिला होता. खाली सही न करता फक्त नागमोडी रेघा मारलेल्या होत्या. या पत्राची फिल्म बघत असताना अचानक विक्रमचा उजवा गुडघा थरथरायला लागला आणि थांबायचं नाव घेईना. मागून जर्मन ऍक्सेंटच्या इंग्रजीत आवाज आला, “हवं असेल तर मी तुम्हाला जर्मनबद्दल मदत करू शकतो.” त्यानं मागे वळून बघितलं तर सतरा-एक वर्षांचा शाळेच्या सहलीबरोबर आलेला जर्मन मुलगा. त्याचा प्रश्न निरागस आहे हे कळत असूनही विक्रम त्याच्या रागावर नियंत्रण ठेवू शकला नाही. त्यानं त्याला करड्या शब्दात नकार दिला. थोड्या वेळानं त्याचा गुडघा पूर्ववत झाला. हेन्नीकाकूंबरोबर विक्रमला जर्मनची गोडी लागली होती. नंतर हाईने, लीडर यांच्या कविता त्याला आवडू लागल्या. पण हे पत्र वाचल्यानंतर अचानक त्याला जर्मन भाषा नकोशी झाली. यात काहीही तर्कसंगती नाही हे माहीत असूनही जर्मन कविता वाचताना त्याला ‘…Das Vermögen ist nicht verfallen, sondern durch Einziehung auf das Deutsche Reich übergegangen…[The property has not fallen into dispair, but through confiscation has passed into the ownership of the German Reich…]’ असे शब्द ऐकू यायला लागले. सुदैवाने हा परिणाम अल्पकाळ टिकला. नंतर हेन्नीकाकूंची युद्धानंतरची पत्रं वाचताना विक्रमला हळूहळू जर्मन भाषा परत आवडू लागली.

हेन्नीकाकूंची पत्रं वाचताना त्या काळाचं एक चित्र समोर येतं. युद्धानंतर जर्मनीची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. हेन्नीकाकू आणि शांतीकाका त्यांच्या जर्मनीतील स्नेह्यांना तेल-पिठापासून चॉकोलेट, स्वेटरपर्यंत शक्य तितक्या वस्तू पाठवीत होते. हेन्नीकाकूंच्या ज्यू मित्रमैत्रिणींपैकी फारच थोडे शिल्लक राहिले होते. जे जर्मन शिल्लक होते त्यातल्या बहुतेकांना प्रचंड अपराधी वाटत होतं तर इतकं झाल्यावरही एक मैत्रीण म्हणत होती की होलोकास्ट झालंच नाही. हा सगळा ‘प्रोपोगंडा’ आहे, हेन्नीची आई-बहीण ‘एक्सेप्शन्स’ आहेत. तिच्याशी हेन्नीकाकूंनी सर्व संबंध तोडले. युद्धानंतर जर्मन सरकारशी झालेला हेन्नीकाकूंचा पत्रव्यवहारही आहे. त्यांच्या जप्त झालेल्या मिळकतीबद्दल नुकसानभरपाई मिळावी म्हणून हेन्नीकाकूंची बर्लिनमधील एक मैत्रीण त्यांना मदत करत होती. अनेक वर्षे सरकारी लाल फितीमधून गेल्यावर नुकसानभरपाई म्हणून जी रक्कम मिळाली ती अत्यंत तुटपुंजी होती.

युद्धकाळात शांतीकाकांना अनेक ठिकाणी फिरावं लागलं. आधी आफ्रिका, मग इजिप्त आणि नंतर युद्धाच्या अंतिम काळात इटलीच्या मॉन्ते कसीनोमध्ये. शांतीकाकांचं धोरण नेहमी दात कसा वाचवता येईल हे बघणे असे. दात काढणे हा शेवटचा पर्याय. मात्र युद्धकाळात त्यांना हे धोरण बदलावं लागलं. सैनिकांना लवकरात लवकर सीमेवर पाठवण्यासाठी वाचवता येणारे दातही काढून टाकणे श्रेयस्कर होते कारण वेळ अत्यंत महत्त्वाचा होता. मॉन्ते कसीनोमध्ये शांतीकाकांना एका बॉम्बहल्ल्यात उजवा हात गमवावा लागला. नंतरची दोन-तीन वर्षे या नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्यात गेली. कृत्रिम हात बसवला असला तरी व्यावसायिक दृष्टीने त्याचा काही उपयोग नव्हता. त्यांच्या एका दंतवैद्य मित्राने त्यांना डाव्या हाताने काम करायला सुचवलं पण शांतीकाकांचा धीर होत नव्हता. एकदा विकांत असताना त्यांच्या या मित्राचा दात दुखायला लागला. त्याने शांतीकाकांना उपचार करायला भाग पाडले. ही केस जमल्यावर थोडा धीर आला. मग त्यांनी त्यांच्या त्या मित्राच्या दवाखान्यात त्याला मदत करायला सुरुवात केली. मित्रही त्यांना अधिकाधिक अवघड केसेस देऊ लागला. अखेर एकदा डाव्या हाताने दात काढल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास परत आला. पुढे त्यांनी स्वतंत्र दवाखाना टाकला. त्यांच्याकडे पहिल्यांदा येणाऱ्या रूग्णाला बहुतेक वेळा त्यांचा उजवा हात नाही हे माहीत नसे. रूग्ण आल्यानंतर नर्स त्याला खुर्चीत बसवेपर्यंत शांतीकाका समोर येत नसत. रूग्णाला परिस्थिती कळेपर्यंत शांतीकाकांचे काम चालू झालेले असे. अर्थात एकदा त्यांच्याकडे आल्यानंतर रूग्ण कधीही दुसरीकडे जात नसे.

पुस्तक वाचल्यानंतर याविषयी लिहावं की नाही असा प्रश्न होता. मध्ये एका प्रकरणात हेन्नीकाकूंचा पत्रव्यवहार समोर येत असताना विक्रम अचानक नाझी राजवट, ज्यू, इस्राइल-पॅलेस्टाइन प्रश्न याबद्दल बोलायला लागतो. इतक्या वेळ फक्त निष्पक्षपणे निवेदन करणारा निवेदक आता अचानक समोर का यावा याचा उलगडा होत नाही. शेवटी शांतीकाका गेल्यानंतर कुटुंबात बरेच वादविवाद झाले. शेवटच्या प्रकरणात त्यांचं वर्णन आहे. हा भाग वगळला असता तरी चाललं असतं एकदा असं वाटून जातं. पण त्याचबरोबर यामुळे शांतीकाकांचे आधी समोर न आलेले पैलू उघड होतात हे ही खरं. एकुणात पुस्तकाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघावं याचा निर्णय होत नव्हता.

अखेर उत्तर सापडलं. ही विक्रमच्या जवळच्या नातलगांची गोष्ट आहेच पण ही ज्या काळात घडली त्या काळामुळे तिचं महत्त्व वाढतं. माथेफिरू लोकांच्या हातात शस्त्रं आली की त्याचे परिणाम निरपराधांना भोगावे लागतात. पण माथेफिरू लोकांच्या हातात सत्ता येणं त्याहून वाईट. असं झालं की अगणित आयुष्यांची होळीच सुरू होते. या होळीत जे जळतात त्यांच्या यातना महाभयंकर असतात पण त्यांना सुटका तुलनेनं लवकर मिळते. जे वाचतात त्यांना मात्र यातना आयुष्यभर पुरतात.

टू लाईव्ह्ज अशा दोन आयुष्यांची गोष्ट आहे.