महात्मा बसवेश्वर आणि बेन यिशु

स्त्रीशिक्षण हा विचार ज्या काळात लोकांच्या कुवतीबाहेर होता तेव्हाच इथे नगम्मा, सत्यक्का अशा अनेक स्त्री सभासद होत्या. आंतरजातीय विवाह इथे खुलेपणाने होत होते. ‘कायक वे कैलास’ – कायेने आचरलेले व्यवसायकर्म निष्ठेने करावे – हे महात्मा बसवेश्वर यांचे जीवनसूत्र होते.

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचे ‘प्रेरणा’ हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. पुस्तक मुलांसाठी आहे. प्राचार्यांच्याच शब्दात हे पुस्तक म्हणजे पराक्रमांच्या शिखरांचे दर्शन आहे. यातील आइनस्टाइन, मेरी क्युरी पासून टॉलस्टॉय आणि कार्ल मार्क्सपर्यंत बरीच नावे सर्वश्रुत आहेत. इंदिरा गांधीसारख्या वादग्रस्त व्यक्तिमत्वांचाही यात समावेश आहे. इंदिरा गांधींच्या कारकीर्दीबद्दल लिहीताना प्राचार्यांना थोडी कसरत करावी लागली आहे असे जाणवते. प्राचार्यांची इंदिराजी आणि त्यांची कारकीर्द याबद्दलची परखड मते काय असतील आणि प्रोत्साहनपर ओळख करून द्यायची असे बंधन नसते तर त्यांनी हा परिचय कसा करून दिला असता असा एक विचार मनात येऊन गेला. असा लेख वेगळा झाला असता असे मानायला जागा आहे कारण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा परिचय करून देताना, आपल्या विशेष जिव्हाळ्याच्या अशा शिक्षणक्षेत्राबद्दल बोलताना प्राचार्य म्हणतात, “अकारण चार-दोन महाविद्यालये काढणे हा काही मंडळींचा छंद आहे. त्यांना त्यामुळे सहज शिक्षणमहर्षी पद मिळण्याची शक्यता वाढते.”

तर पुस्तकातील बहुतेक सर्व नावे ओळखीची होती, काही अतिपरिचयाची तर काही त्या मानाने कमी परिचयाची. मात्र एका नावापाशी अडखळायला झाले. हे नाव शाळेत इतिहासाचा अभ्यास करताना कानावर पडले असेल तर माहीत नाही. (आणि पडले असेल तर विस्मरण होण्यास कारण शाळेतील वातावरण की आमची अभ्यासाविषयीची अनास्था हे ही माहीत नाही.) हे नाव होते महात्मा बसवेश्वर (इ. स. ११३१ ते इ. स. ११६१) यांचे. आपल्या देशात संत, महात्मा यांची कमी नाही. आजच्या काळात गूगल पांडित्यामुळे हवी ती माहीती चुटकीसरशी उपलब्ध आहे. बहुतेक वेळा कुणी नवीन विचार मांडला तर त्यामागे चौफेरवाचन आहे हे जाणवते पण त्यात मनन किंवा विचारमंथन असेलच अशी खात्री नसते. ‘कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन’ – माहितीचे साठवण ही एक गोष्ट झाली आणि माहितीचा उपयोग करून त्यातून नवीन विचार मांडणे ही दुसरी गोष्ट झाली. एक करण्यासाठी स्मरणशक्ती पुरेशी असते, दुसर्‍या गोष्टीसाठी प्रतिभा लागते. ज्या काळात कुणी मेल्याची बातमी यायलासुद्धा महीने-वर्ष लागत असे, त्या काळात माहितीचे स्त्रोत फारच कमी होते. ‘सर्व माणसे सारखी, सर्व व्यवसाय समान योग्यतेचे, सगळ्या जाती समान. वर्णभेद, जातिभेद हे अनैसर्गिक आहेत. मठांची उठाठेव आवश्यक नाही.’ हे विचार आज आपल्याला फारसे क्रांतिकारी वाटणार नाहीत, पण बाराव्या शतकात हे विचार किती आधुनिक होते हे लक्षात आल्यावर महात्मा बसवेश्वर यांचे वेगळेपण विशेष जाणवते आणि त्यांची ओळख इतक्या उशिरा झाल्याबद्दल खंतही वाटते.

लोकांनी तत्वचिंतन आणि आत्मशोधन करावे हा हेतू मनात धरून बसवेश्वर यांनी ‘अनुभव मंडप’ या विद्यापीठाची स्थापना केली. ज्या काळात विद्यार्जन ही काही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती, त्या काळात अनुभव मंडपामध्ये चांभार, लोहार, सुतार, व्यापारी हे सर्व लोक एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करीत होते. स्त्रीशिक्षण हा विचार ज्या काळात लोकांच्या कुवतीबाहेर होता तेव्हाच इथे नगम्मा, सत्यक्का अशा अनेक स्त्री सभासद होत्या. आंतरजातीय विवाह इथे खुलेपणाने होत होते. ‘कायक वे कैलास’ – कायेने आचरलेले व्यवसायकर्म निष्ठेने करावे – हे महात्मा बसवेश्वर यांचे जीवनसूत्र होते. ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्याप्रमाणेच बसवेश्वर यांनी कवितेमधून समाजसुधारणा केली. त्यांनी कन्नडमध्ये लिहीलेल्या या कविता ‘वचन साहित्य’ या नावाने ओळखल्या जातात. समाजसुधारक, विचारवंत आणि साहित्यिक म्हणून ओळखल्या जाणार्‍या महात्मा बसवेश्वर यांना कर्नाटकाच्या इतिहासात मानाचे स्थान आहे.

योगायोगाने बाराव्या शतकातील जीवनावर आधारित आणखी एक पुस्तक नुकतेच वाचनात आले ते म्हणजे अमिताव घोष यांचे ‘इन ऍन ऍंटीक लॅंड’. हे पुस्तक म्हणजे खरेतर मानवशास्त्रावरील एक निबंध आहे पण एखादा चित्रकार साधी घराची भिंत रंगवतानाही त्यात आपला वेगळा ठसा उमटवून जाईल तसेच अमिताव घोष यांनी त्यांची साहित्यिक प्रतिभा वापरून या निबंधाला एक वेगळे रूप दिले आहे. अमिताव घोष ऑक्सफर्डमध्ये मानवशास्त्रामध्ये पी. एच. डी करत असताना संशोधनासाठी त्यांना इजिप्तमध्ये काही काळ घालवावा लागला. या पुस्तकात त्यांनी आपले संशोधन आणि इजिप्तमध्ये आलेले अनुभव यांची सुरेख गुंफण केली आहे. यामुळे पुस्तक तथ्यांची माहिती असलेला एक रूक्ष निबंध न राहता त्याला भावनिक मिती प्राप्त होते.

पुस्तक आहे अब्राहम बेन यिशुबद्दल. बेन यिशु हा ट्युनिशियामध्ये जन्माला आला, मात्र नंतर इजिप्त, भारत, येमेन इ. ठिकाणी त्याने प्रवास आणि वास्तव्य केले. भारतात त्याचा मुक्काम मंगलोर इथे होता. बेन यिशु याने इ. स. ११३२ मध्ये मंगलोरमधून लिहीलेले एक पत्र घोष यांना योगायोगाने मिळाले आणि नंतरची काही वर्षे त्यांनी भारतात वास्तव्य केलेल्या या व्यापार्‍याची पत्रे शोधणासाठी रशिया, अमेरिका, इंग्लंड इ. ठिकाणी जाऊन पुराणवस्तूसंग्रहालय आणि विद्यापीठांमध्ये शोध घेतला. या पत्रांमधून आणि त्याच्या अनुषंगाने त्यावेळची भाषा, समाज, रीती इ. लक्षात घेऊन घोष बेन यिशुच्या आयुष्याचे एक चित्र उभे करतात. बेन यिशु मंगलोरला आल्यावर त्याने आशु नावाच्या एका भारतीय गुलाम स्त्रीला विकत घेतले, गुलामगिरीतून मुक्त केले आणि नंतर तिच्याशी विवाह केला. बेन यिशुने इजिप्त आणि आसपासच्या इतर व्यापार्‍यांना पाठवलेल्या पत्रांमधून त्या काळातील मंगलोरमधील औद्योगिक उलाढालींची कल्पना येते.

याला समांतर असे कथानक घोष यांच्या इजिप्तमधील वास्तव्याचे. त्यांना तेथे ‘दोक्तोर-अल-हिंद’ – भारतीय डॉक्टर अशी हाक मारत असत. इजिप्तमधील तेव्हाचे तरूण इराकमध्ये जाऊन पैसे कमवण्याची स्वप्ने पहात होते. इराक म्हणजे त्यांच्यासाठी स्वर्ग होता. घोष १० वर्षांनी परत गेले तेव्हा त्यांना आठवत असलेली बरीचशी मुले इराकमध्ये मिळेल त्या कामावर गेली होती, पहिले इराक युद्ध सुरू असल्याने इराकमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा होता. त्यामुळे आलेल्या सुबत्तेच्या खुणा त्यांच्या घरात दिसत होत्या. इजिप्तमधील कट्टर मुस्लीम संस्कृती, त्यांचे हिंदूंविषयीचे गैरसमज आणि त्यामधून उद्भवणार्‍या कधी गमतीदार तर कधी गंभीर अडचणी हे सर्व नोंदतानाही त्यांच्यातील मानवशास्त्रज्ञ दक्ष असल्याचे जाणवते.

जवळजवळ दोन टोकाच्या दोन पुस्तकांमधून आठ-नऊशे वर्षांपूर्वी राहणार्‍या एकाच राज्यातील दोन व्यक्ती भेटाव्यात हा योगायोग रोचक वाटला, म्हणून हा लेखन प्रपंच.