Categories
इतिहास​ बुके वाचिते

पहिल्या महायुद्धाचे भीषण, विदारक चित्रण : रीजनरेशन त्रिधारा

१९१७ सालच्या जुलै महिन्यात सिगफ्राइड ससून या ब्रिटीश सैन्यदलातील अधिकार्‍याने आपल्या वरिष्ठ​ अधिकार्‍यांना उद्देशून एक निवेदन केले. हे निवेदन म्हणजे या एकांड्या शिलेदाराची बंडखोरी होती.

Siegfried Sassoon
सिगफ्राइड ससून

“मी या स्वेच्छेने केलेल्या निवेदनाद्वारे सैन्यदलाच्या अधिकाराचा विरोध करत आहे, कारण युद्ध थांबवण्याची ज्यांची क्षमता आहे त्यांच्याकडूनच युद्ध लांबवले जाते आहे असे मला वाटते.  युद्धातील सैनिकांचे होणारे हाल मला बघवत नाहीत आणि म्हणूनच ही परिस्थिती चालू ठेवण्यामध्ये मला सहभागी व्हायचे नाही. युद्ध ज्या कारणांसाठी सुरू आहे ती कारणे आता अमानुष आणि अनैतिक बनली आहेत. या सर्वांच्या मुळाशी राजकीय पातळीवरील घेतले गेलेले चुकीचे आणि खोटारडे निर्णय आहेत. याचा परिणाम म्हणून यातना भोगणार्‍या सर्वांच्या वतीने मी या फसवणुकीचा निषेध करत आहे. याचबरोबर मायदेशात असलेल्या बहुसंख्य सामान्य जनतेचा युद्धामुळे सैनिकांना होणार्‍या यातनांकडे बघण्याचा उथळ दृष्टीकोन बदलण्यात मला यश येईल अशी मी आशा करतो. या यातना सामान्यांना भोगाव्या लागत नाहीत आणि त्या भोगणार्‍यांचे हाल समजण्याइतकी कल्पनाशक्तीही त्यांच्याकडे नाही.”

साधारण असा या पत्राचा आशय होता. हे पत्र लिहीण्यास ससूनला विचारवंत बर्ट्रांड रसेल आणि लेखक जॉन मरी यांनी मदत केली. या पत्राच्या प्रती वृत्तपत्रांना पाठवण्यात आल्या, तसेच इंग्लंडच्या संसदेतही हे पत्र वाचले गेले. सेकंद लेफ्टनंट ससूनने फ्रान्समध्ये तिसर्‍या बटालियनकडून लढताना दीड तास जर्मन फौजांचा मारा चुकवित सर्व जखमी सैनिकांना सुरक्षित स्थळी आणण्याची महत्वाची कामगिरी बजावली होती. यासाठी त्याचा मिलिटरी क्रॉस देऊन सन्मान करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ससूनचे कोर्ट मार्शल न करता मानसिक संतुलन बिघडल्याचा शेरा देऊन त्याची क्रेगलॉकहार्ट येथील मनोरूग्णालयात रवानगी करण्यात आली.  क्रेगलॉकहार्ट रूग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रिव्हर्स यांनी त्याचा ताबा घेतला.

इतिहासात या आणि अशा त्रोटक, कोरड्या नोंदी आहेत. जुलै १९१७ ते युद्ध संपेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर १९१८ या काळात रिव्हर्स, ससून आणि काही इतर संबंधित व्यक्तींच्या आयुष्यात काय घडले याचे काल्पनिक पण तथ्यांपासून फारकत न घेता केले चित्रण  ‘रीजनरेशन ट्रिलॉजी’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या तीन कादंबर्‍यांमध्ये ब्रिटीश लेखिका पॅट बार्कर यांनी केले आहे. ‘रीजनरेशन’, ‘द आय इन द डोअर’ आणि ‘द घोस्ट रोड’ या त्या तीन कादंबर्‍या. तिसर्‍या कादंबरीबद्दल त्यांना १९९५ मध्ये बुकर पारितोषिकाने गौरवण्यात आले.

Regeneration by Pat Barker

पहिल्या कादंबरीची सुरूवातच या पत्राने होते. नंतर ससून रिव्हर्सकडे आल्यावर तो चहा, दूध कपात ओतत असताना रिव्हर्स त्याचे बारकाईने निरिक्षण करीत असतो. त्याचे हात थरथरत आहेत का, त्याच्या हालचालींमध्ये झटके आहेत का, बॉंबच्या सतत आवाजाचा परिणाम म्हणून तो दचकतो आहे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारार्थी मिळतात. ससूनमध्ये मानसिक संतुलन बिघडल्याचे कुठलेही चिन्ह नसते. उलट तो एक विवेकी, हुषार, देशभक्त तरूण आणि शिवाय एक संवेदनशील कवीही असतो. त्याच्या कविता प्रसिद्ध झालेल्या असतात. अपेक्षेच्या विरूद्ध असा त्याचा स्वभाव पाहून रिव्हर्स काहीसा संभ्रमात पडतो. ससूनच्या मानसिक आंदोलनांच्या मुळाशी जाताना रिव्हर्सला ज्यांची उत्तरे व्यवस्थेमध्ये राहून देणे शक्य नाही असे काही प्रश्न पडतात.

कादंबरीत बिली प्रायर हे सैनिकाचे काल्पनिक पात्र आहे. प्रायर रिव्हर्सला विचारतो, “तुम्ही आम्हाला भावना दाबून ठेवू नका असे सांगता. रणांगणावर आम्ही आमच्या भावनांना मोकळी वाट करून दिली तर तिथे आमचा एक दिवसही पाडाव लागणार नाही.” रणांगणावर मानसिक परिणाम न होता लढू शकणारा सैनिक फक्त तो असतो ज्याच्या सर्व संवेदना बोथट झाल्या आहेत. अशा सैनिकाचे वर्णन करताना ‘अपोकॅलिप्स नाऊ’ मध्ये मार्लन ब्रॅंडो म्हणतो,

“You have to have men who are moral… and at the same time who are able to utilize their primordial instincts to kill without feeling… without passion… without judgment… without judgment. Because it’s judgment that defeats us.”

पण असा अमानुष सैनिक मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून निरोगी म्हणता येईल का? मानसोपचार तज्ञाचे पहिले काम म्हणजे रूग्णाला सुरक्षित आयुष्य जगता यावे यासाठी तयार करणे. पण इथे रिव्हर्स नेमके उलटे करत होता. युद्धामधील अमानुष अनुभवांना सामोरे गेल्यानंतर सैनिकांना अनेक प्रकारचे मानसिक आजार होत होते. वाचा बसणे, धक्क्यामुळे अर्धांगवायू होणे, बोलण्यात तोतरेपणा येणे, रात्री असह्य दु:स्वप्ने. माणसाला सहन करणे अशक्य व्हावे अशा परिस्थितीमध्ये सतत राहील्यावर असे आजार होणे हा त्या सैनिकांच्या मेंदूने केलेला एक प्रकारचा बचाव होता. पण असे झाल्यानंतर ते रूग्णालयात आले की रिव्हर्स त्यांना पूर्वपदावर आणत होता ते कशासाठी? परत मृत्युच्या खाईत लोटायला? मानसोपचार आणि सैन्यदल यांची उद्दिष्टे परस्परविरोधी असली (जशी ती इथे होती) तर सैन्यदलात काम करणार्‍या मानसोपचार तज्ञाने हा नैतिक पेच कसा सोडवावा?

अशा परिस्थितीत ससूनने हे युद्ध आणि त्यामुळे होणारी जिवितहानी व्यर्थ आहे असा निष्कर्ष काढला तर त्यात काय चूक आहे? पण असे केल्यावर त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे असे ठरवून त्याला मनोरूग्णालयात पाठवण्यात आले होते. जोसेफ हेलरने ‘कॅच-२२‘ या कादंबरीत डार्क ह्युमरचा आधार घेऊन मांडलेला मध्यवर्ती मुद्दा हाच आहे.

ससून जरी संतुलित असला तरी आपल्या मनावर युद्धाचे काही ओरखडे उठण्यापासून तो ही स्वत:ला वाचवू शकत नाही. दु:स्वप्ने किंवा मृत सैनिक जवळ उभे आहेत असे भास होणे या त्याच्या लक्षणांच्या मुळाशी जाताना रिव्हर्सला जाणवते की ससून दोन व्यक्तीमत्वांमध्ये वावरतो आहे. रणांगणावर लढतानाही त्याने कविता रचणे थांबवले नव्हते. गंमत अशी की या कविता युद्धाच्या विरोधात, शांततेसाठी होत्या. अतुलनिय शौर्य दाखवून शत्रूपक्षातील सैनिकांना मारणे आणि तिथून परत आल्यावर त्याच्या विरोधात कविता लिहीणे ही दोन्ही कामे तो एकाच वेळी करत होता आणि विशेष म्हणजे युद्धाच्या विरोधात कविता लिहीण्यासाठी त्याला कच्चा माल आपल्याच रणांगणावरील वर्तणुकीतून मिळत होता. हा विरोधाभास दुभंगलेल्या व्यक्तिमत्वाचे लक्षण होते, मात्र इथे ससूनला त्याचा त्रास न होता उलट मदत होत होती. एकीकडे कर्तव्यदक्षतेची चाड आणि दुसरीकडे त्या कर्तव्याच्या उद्दीष्टांमधील फोलपणा अशा कात्रीमध्ये सापडल्यावर दोन वेगवेगळ्या आणि परस्परविरोधी भूमिकांमध्ये जगणे हे ससूनच्या अस्तित्वासाठी अत्यावश्यक होते.

अशा कात्रीमध्ये सापडलेला कवी या भूमिकेत ससून एकटा नव्हता. त्याचा सहकारी विल्फ्रेड ओवेन हा ही अशाच परिस्थितीमध्ये कविता करण्याकडे वळला. क्रेगलॉकहार्टमध्ये ससूनबरोबर असताना त्याला या बाबतीत ससूनचे मार्गदर्शनही लाभले. या दोघांबरोबरच एडवर्ड थॉमस हा पहिल्या महायुद्धादरम्यानचा कवी/सैनिक म्हणून ओळखला जातो. थॉमसला त्याच्या कवितांमधून रणांगणावरील मानसिक तणावांना मोकळी वाट करून देता आली. ‘द घोस्ट रोड’ ही कादंबरी त्याच्या ‘रोड्स’ या कवितेमधील काही ओळींनी सुरु होते. या कादंबरीच्या नावामागेही या ओळींची प्रेरणा आहे असे वाटते.

Now all roads lead to France

And heavy is the tread

Of the living; but the dead

Returning lightly dance

या तीन कादंबर्‍यांमध्ये पॅट बार्कर युद्ध या विषयाकडे वेगवेगळ्या आणि बहुतकरून अपरिचित अशा दृष्टीकोनांमधून बघतात. रिव्हर्स एक सिव्हिलियन आणि मानसोपचार तज्ज्ञ आहे. त्याने युद्ध प्रत्यक्षात अनुभवलेले नाही, मात्र युद्धामुळे सैनिकांच्या मनावर जे परिणाम होतात ते त्याला चांगलेच ठाउक आहेत. ससून, ओवेन आणि प्रायर (काल्पनिक पात्र) हे तिघेही सैनिक आहेत. त्यांचे अनुभव, त्यांची दु:स्वप्ने आणि त्या स्वप्नांचे विश्लेषण यामधून रणांगणावर जे घडते आहे त्याची झलक मिळते. युद्धाबाबत सर्वात अनपेक्षित प्रतिक्रिया लिझीची आहे. तिचा नवरा युद्धावर गेल्यावर त्याच्यापासून सुटका झाली याचा तिला अत्यानंद झाला आहे. म्हणूनच ती म्हणते, “On August 4, 1914, peace broke out.” युद्ध सुरू झाल्यावर त्या काळातील स्त्रियांवरील बरीचशी बंधने शिथील झाली. त्यांच्या दृष्टीने हा काळ एक प्रकारचे स्वातंत्र्यच होते.

त्या काळात घडलेल्या इतर काही महत्वपूर्ण घटना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कादंबर्‍यांमध्ये येतात. युद्धाच्या विरोधात असलेल्या शांततावादी गटांना त्या काळात सरकारकडून तुरूंगवास, एकांतवास असे अत्याचार सहन करावे लागले. त्यांच्यावर पाळत ठेवण्यात येत होती. याचे सर्वात ठळक उदाहरण म्हणजे ऍलीस व्हील्डन हिला कोणताही सबळ पुरावा नसताना तत्कालीन पंतप्रधान लॉइड जॉर्ज यांच्या हत्येचा कट रचल्याबद्दल दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. ‘द आय इन द डोअर’ ही कादंबरी तिची बाजू मांडते.

रिव्हर्स हा एक मानवशास्त्रज्ञही (Anthropologist) होता.  १८९८ मध्ये त्याने ‘टोरेस स्ट्रेट्स’ येथील बेटांवर जाऊन तिथे राहणार्‍या काही प्राचीन जमातींचा अभ्यास केला. ‘द घोस्ट रोड’ या तिसर्‍या कादंबरीत त्याचे तिथले अनुभव आणि प्रायरचे रणांगणावरील अनुभव एकामागून एक दाखवून बार्कर यांनी त्यातील साम्ये आणि विरोधाभास समोर आणला आहे. रिव्हर्सच्या या बेटांवरील वास्तव्यामध्ये एक प्रसंग उल्लेखनीय आहे. किमान संभाषण करण्याइतकी तेथील स्थानिकांची भाषा आत्मसात केल्यानंतर रिव्हर्सला एका बोटीवरील प्रवासात स्थानिकांचा एक गट भेटतो. रिव्हर्स त्यांना विचारतो, “तुमच्याकडे एक गिनी असेल तर ती तुम्ही कुणाबरोबर वाटून घ्याल?” या प्रश्नाची निरनिराळी उत्तरे मिळाल्यावर त्या लोकांच्या नातेसंबंधांची नावे आणि त्यांचे महत्व याचा उलगडा होत असे आणि त्यानंतर त्या अनुषंगाने त्यांना बरेच इतर प्रश्न विचारता येत असत. त्यांच्याकडून हवी ती माहिती मिळाल्यावर रिव्हर्स जायला निघतो तेव्हा त्यांच्यातील एक बाई त्याला थांबवते आणि तिच्या मोडक्यातोडक्या इंग्लिशमध्ये म्हणते, “Your turn.” रिव्हर्सला भाऊ, बहीणी असतात तरीही तो कुणाबरोबरही गिनी वाटून घेणार नाही असे उत्तर देतो. ते लोक आश्चर्यचकित होतात आणि जसजशी रिव्हर्सच्या आयुष्याबद्दल अधिकाधिक माहिती मिळत जाते तसतसे ते आयुष्य, त्या चालीरीती त्यांना अधिकाधिक असंबद्ध वाटू लागतात. ही असंबद्धता त्यांना विनोदी वाटते. त्यांची ती अनपेक्षित प्रतिक्रिया पाहून रिव्हर्सला साक्षात्कार होतो – त्याची नैतिक मूल्ये आणि त्या स्थानिकांची नैतिक मूल्ये सारख्याच पातळीवर आहेत. ज्या मूल्यांना त्याने आयुष्यभर जिवापाड जपले ती मूल्ये संदर्भांची चौकट बदलली तर हास्यास्पद ठरतात. ही प्रतिक्रिया किपलिंगच्या ‘व्हाइट मॅन्स बर्डन’च्या अगदी उलट आहे. नंतरही या अनुषंगाने आपण जी मूल्ये, ज्या रीती स्थानिकांवर लादत आहोत त्यांच्याबद्दल रिव्हर्सला अपराधीपणा वाटतो. बेटांना भेट देणारे ख्रिश्चन मिशनरी आपल्याबरोबर अनेक रोग घेऊन येतात आणि स्थानिक लोकांकडे त्या रोगांविरूद्ध लढण्याची प्रतिकारशक्ती नसल्याने ते त्या रोगांना बळी पडतात. मिशनर्‍यांची शिकवण आणि त्यांच्या वर्तनामुळे होणार्‍या परिणामांकडे त्यांचे दुर्लक्ष यातील विरोधाभास त्याला बेचैन करतो.

लेखकांनी वेगवेगळे अनुभव घेतल्याशिवाय त्यांचे लेखन कसदार होणार नाही असा समज आहे आणि तो बहुतांशी खरा आहे. फरक इतकाच की अनुभव घेण्यासाठी लेखकाला त्या परिस्थितीतूनच जायला हवे अशी अट नाही. त्याची कल्पनाशक्ती सशक्त असेल तर असे घडू शकते. पॅट बार्कर यांच्या पहिल्या काही कादंबर्‍या स्त्रियांच्या प्रश्नांवर आधारित होत्या. त्या प्रसिद्ध झाल्यानंतर मिडीयाने त्यांना फेमिनिस्ट, मध्यमवर्गीय स्त्रियांवर  लिहीणारी लेखिका असे लेबल देऊन टाकले. याचा उबग येऊन त्यांनी वेगळ्या विषयावर लिहायचे ठरवले. रीजनरेशन त्रिधारा यातून जन्माला आली. बार्कर यांची शैली भीडभाड न ठेवता रोखठोक वर्णन करण्याची आहे. युद्धकाळातील अमानुष आणि अमानवी प्रसंगांचे चित्रण करताना किंवा त्यावर टिप्पणी करताना त्या कोणताही मुलाहिजा बाळगत नाहीत.

She’d never learnt to read the casualty lists over breakfast and then go off and have a perfectly pleasant day as the vast majority of civilians did.

A society that devours it’s own young deserves no automatic or unquestioning allegiance.

सन्माननीय अपवाद वगळता बहुतेक कादंबर्‍या किंवा चित्रपटांमधील युद्धाचे चित्रण बेगडी असते. युद्ध म्हणजे लाखो आयुष्ये उध्वस्त करणारी किती विदारक घटना आहे याची जाणीव रीजनरेशन त्रिधारा वाचल्यावर होते. बार्कर यांच्या म्हणण्यानुसार ठराविक आवाज, गंध, प्रकाश, चवी यांच्या सहाय्याने रणांगणावरील वातावरण उभे करता येऊ शकते. एका डोळ्यामधे गोळी लागून ती कानावाटे बाहेर गेल्यावर मेंदूचा काही भाग गमावूनही आठवडाभर जिवंत राहणार सैनिक किंवा विमानातून पॅराशूटने उडी घेतल्यानंतर जमिनीवरील मृत जर्मन सैनिकाच्या पोटात डोके घुसल्यामुळे त्याचे रक्त-मांस यांनी चेहेरा बरबटवून घेणारा सैनिक अशी अंगावर काटा आणणारी वर्णने वाचल्यानंतर बार्कर यांच्या वातावरणनिर्मितीचा खरेपणा जाणवतो. तरीही बहुधा या रणकंदनाला चितारण्यामध्ये शब्द थिटे पडत आहेत याची जाणीव कुठेतरी त्यांना असावी. ‘द घोस्ट रोड’मध्ये प्रायर आपल्या डायरीत म्हणतो,

I honestly think that if the war went on for a hundred years another language would evolve, one that was capable of describing the sound of bombardment or the buzzing of flies on a hot August day on the Somme. There are no words. There are no words for what I felt when I saw the setting Sun rise.

तीनही कादंबर्‍यांमध्ये कथानक सलगपणे पुढे जाते. यामुळे दुसरी किंवा तिसरी कादंबरी पहिल्यांदा वाचली तर तितकाच प्रभाव पडेल का अशी शंका वाटते.

न्युरॉलॉजीमध्ये संशोधन करताना डॉ. रिव्हर्स यांनी त्यांचे सहकारी डॉ. हेन्री हेड यांच्याबरोबर बरेच प्रयोग केले होते. एका प्रयोगात डॉ. हेड यांच्या उजव्या हातामधील चेतातंतू (Nerves) कापून परत शिवण्यात आले. यानंतर चेतातंतूंची वाढ होऊन ते परत पूर्वस्थितीमध्ये येण्याच्या प्रक्रियेला ‘रीजनरेशन’ असे नाव दिले गेले होते. चेतातंतू जुळून येत असताना डॉ. हेड यांच्या हाताची संवेदनशीलता कमालीची वाढली होती. नेहेमी किरकोळ वाटेल अशा स्पर्शानेही त्यांना प्रचंड वेदना होत असत. रीजनरेशन ही एक हळू आणि यातनादायी प्रक्रिया होती.

युद्धातून परत आलेल्या सैनिकांची दुभंगलेली शरीरे आणि मने जुळवण्याचे काम हे ही असेच होते. एका प्रकारचे रीजनरेशन.

—-
१. ‘व्हाइट मॅन्स बर्डन’ उपरोधिक आहे किंवा कसे याबद्दल वाद आहेत. इथे मार्क ट्वेन आणि हेन्री जेम्स यांना प्रमाण मानून कविता गंभीर आहे असे गृहीत धरले आहे.

Categories
इतिहास​ बुके वाचिते

इंडिया आफ्टर गांधी : एका अनपेक्षित देशाचा इतिहास

शाळेत असताना डोक्यावर विज्ञानाचे भूत होते. याचा एक परिणाम म्हणजे कला शाखा आणि प्रामुख्याने इतिहास, नागरिकशास्त्र यांच्याकडे दुर्लक्ष झाले. सनावळी आणि तहांच्या तारखा घोकून पाठ करण्यापलिकडे इतिहासाचे महत्व काय हे ठाऊक नव्हते. ते महत्व लक्षात आणून द्यायला देतील असे शिक्षकही नव्हते, किंबहुना त्या शिक्षकांनाही ते महत्व कळले होते की नाही याबद्दल शंका वाटते. शाळेत शिकलेल्या इतिहासाबद्दल आणखी एक रोचक मुद्दा म्हणजे हा इतिहास गौतम बुद्ध, सम्राट अशोक यांच्यापासून ते टिळक, गांधी यांच्यापर्यंत भरभरून बोलत असे. मात्र १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले असे सांगून हा इतिहास तिथेच थांबत असे. नंतर १९५० मध्ये घटनेची स्थापना किंवा नंतरच्या पंचवार्षिक योजना यांचे काही उल्लेख येत, पण गेल्या पन्नास वर्षात नेमके काय घडले, काय अडचणी आल्या याबद्दल बहुतकरून मौन बाळगलेले असे. (सध्याचा अभ्यासक्रम पाहिलेला नाही त्यामुळे त्यात बदल केला असल्यास चांगलेच आहे.)

खरं म्हणजे विद्यार्थ्यांचा तत्कालीन इतिहासाशी परिचय असणे सर्वात महत्वाचे आहे. देश ज्या परिस्थितीत आहे तिथपर्यंत तो कसा पोचला हे जाणून घेणे रोचक आहेच शिवाय प्रसारमाध्यमांमधून देशाचे जे चित्र बहुतकरून रंगवले जाते, ते कितपत बरोबर आहे हे ही यावरून उमजायला मदत होते. अर्थात हे शाळेत शिकवले गेले नाही तर लोक यापासून अनभिज्ञ राहतात असे अजिबात नाही. पुस्तके, लेख, चर्चा इ. माध्यमांमधून या इतिहासाचे विविध पैलू समोर येत असतातच. पण यात एक धोका असतो. बहुतेक पुस्तके – चरित्रे, आत्मचरित्रे, तेंव्हाच्या घटनांची प्रत्यक्ष वर्णने करणारी पुस्तके – एकांगी असण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी या पुस्तकांची इतर माहितीसूत्रांशी तुलना करून त्यात सत्याचा अंश किती हे ठरवावे लागते आणि हे ठरवणारा इतिहासकार शक्य तितका निष्पक्ष असायला हवा. ( असे झाले नाही तर काय होते याचे एक ठळक उदाहरण म्हणजे लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लापिएर यांचे ‘फ्रीडम ऍट मिडनाइट’ हे गाजलेले पुस्तक. ‘इंडिया आफ्टर गांधी’ वाचल्यानंतर ‘फ्रीडम ऍट मिडनाइट’ अतिरंजित वाटायला लागते. प्रा गुहा यांच्या मते ‘फ्रीडम ऍट मिडनाइट’ मधील लॉर्ड माउंटबॅटन यांचे चित्रण पक्षपाती आहे. त्यांच्या चुकांकडे दुर्लक्ष केले गेले आहे आणि त्यांच्या योगदानाचे वर्णन अतिशयोक्तीपूर्ण आहे.) पुस्तकांपेक्षाही माहितीचा अधिक धोकादायक स्त्रोत म्हणजे चर्चा, मग त्या घराघरात चालणार्‍या असोत की वेगवेगळ्या च्यानेलवरच्या. अशा चर्चांमधील बहुतेक सर्व सहभागी व्यक्तींची मते ठाम असतात. त्यात पूर्वग्रहांचा वाटा बराच असतो, घटनांकडे एकाच चश्म्यातून पाहिले जाते.

Book cover for India After Gandhi

प्रा. रामचंद्र गुहा यांचे ‘इंडिया आफ्टर गांधी’ हे पुस्तक स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास शक्य तितक्या निष्पक्षतेने मांडण्याचा प्रयत्न करते. प्रा. गुहा यांनी देश आणि परदेशातील मान्यवर संस्थांमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहिले. नंतर बंगलोर येथे स्थायिक होऊन लेखन करण्याचा निर्णय घेतला. ‘इंडिया आफ्टर गांधी’साठी त्यांचा २०११ चे साहित्य अकादेमी पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. गेल्या पन्नास वर्षातील घटनांचा आढावा घेताना प्रा. गुहा अनेक स्त्रोतांचा दाखला देतात. पुस्तके, लेख, लोकसभेतील नोंदी हे आहेतच, याशिवाय विविध व्यक्तींची खाजगी कागदपत्रे, सीबीआय/पोलिस यांचे अहवाल, गुप्तचर खात्याचे गोपनीय अहवाल असे अनेक संदर्भ यात येतात. संदर्भसूची जवळपास नव्वद पानांची आहे यावरून संशोधनाची व्याप्ती लक्षात यावी. प्रा. गुहा यांनी याआधी भारतातील पर्यावरणवादी किंवा क्रिकेट खेळाचा इतिहास यासारख्या विषयांवर पुस्तके लिहीली आहेत. मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची सर्व कारकीर्द एका तर्‍हेने ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकासाठी केलेली दीर्घ (आणि काहीशी यातनामय ) अशी पूर्वतयारी होती.

या पुस्तकात प्रा. गुहा १९५० ते १९९० या काळातील घटनांचा क्रमवार परिचय करून देतात. पुस्तकाच्या सुरूवातीलाच ते तकालीन इतिहासाची नोंद करण्यामधील धोके कोणते आहेत याची जाणीव करून देतात. सम्राट अशोकाबद्दल वाचताना वाचकांचे मत बहुतकरून तटस्थ असते कारण त्या काळाशी घनिष्ठ परिचय नसतो. मात्र गेल्या पन्नास वर्षातील घटनांबद्दल, व्यक्तींबद्दल वाचकांची आणि इतिहासकाराचीही ठाम मते असतात. इतिहासकाराने नोंदवलेल्या घटनांचा वाचक सरळसरळ विरोध करू शकतात. बरेचदा इतिहासकारही नकळत पूर्वग्रहांच्या प्रभावाखाली येऊ शकतो. १९९० नंतरच्या घटना मांडताना प्रा. गुहा या मुद्याला अधोरेखित करतात. साधारणपणे तत्कालीन इतिहासाची मर्यादा ३० वर्षे ठरवली जाते. याचे कारण ३० वर्षांनंतर त्या घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन तटस्थ होऊन भावनांची तीव्रता कमी झाली असेल अशी अपेक्षा असते. या कारणासाठी प्रा. गुहा १९९० नंतर नोंदवलेल्या घटनांना इतिहास न म्हणता शोधपत्रकारितेचे नाव देतात.

गेल्या दहा-बारा वर्षांत भारताची झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था हा एक चमत्कार मानला जातो आहे. प्रा. गुहा यांच्या मते खरं तर याहून मोठा चमत्कार आधीच घडून गेला आहे आणि घडतो आहे पण त्याकडे कुणाचे फारसे लक्ष गेलेले दिसत नाही. हे म्हणजे पी. सी. सरकारांनी आधी ताजमहाल अदृश्य करावा, तेंव्हा प्रेक्षक शांत. मग पिशवीतून ससा काढून दाखवावा आणि त्याला टाळ्या मिळाव्यात तसे काहीसे झाले आहे. हा चमत्कार आहे भारताच्या अस्तित्वाचा. निरनिराळे राजकारणी, विश्लेषक, संशोधक गेली शंभर वर्षे भारताची शकले कधी होणार यावर पैजा लावून बसले होते. स्वातंत्र्य मिळायच्या आधी भारताला स्वातंत्र्य दिले तर ते विघातक ठरेल ही चर्चिल आणि इतर इंग्रज अधिकार्‍यांची आवडती सबब होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक दशकात ज्या घटना घडल्या त्यानंतर जगभरात ‘आता लोकशाही संपणार, इतर आशियाई देशांप्रमाणेच भारतात सैन्यदलाचे राज्य येणार’ असे अंदाज वर्तवले जात होते. सुरूवातीला हे केवळ पाश्चात्य देशांपुरते मर्यादित होते, पण ८० च्या दशकामध्ये काही भारतीय विश्लेषकही असा विचार मांडत होते. दर वेळेस अत्यवस्थ दिसणारी लोकशाही परत नव्या जोमाने उभी राहीली. १९७५ मध्ये आलेली आणीबाणीही या लोकशाहीला मुळापासून नष्ट करू शकली नाही. समाजशास्त्रशात्राचे नियम, युरोपियन इतिहासावरून बांधलेले आडाखे या सर्वांना न जुमानता भारत अजूनही एकसंध आहे.

भारताची गेल्या पन्नास वर्षांतील वाटचाल बघताना स्टीव्ह जॉब्जचे प्रसिद्ध ‘कनेक्ट द डॉट्स’ भाषण आठवते. आता साधारण वाटणार्‍या घटना भविष्यामध्ये अभूतपूर्व महत्वाच्या ठरतात. स्वातंत्र मिळाल्यानंतर नेहरू आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घेतलेले काही निर्णय नंतर फार महत्वाचे ठरले. वर चर्चांमधून दिशाभूल होण्याचा उल्लेख आला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे कोणत्याही चर्चेत नेहरूंचा उल्लेख आला की १९६२ चा चीनकडून झालेला पराभव आणि काश्मिर प्रश्नाची बेजबाबदार हाताळणी हे दोनच मुद्दे प्रामुख्याने चर्चेला असतात. अशा चर्चा ऐकल्या तर यापलिकडे नेहरूंचे काही कर्तुत्व होते किंवा नाही अशी शंका यायला लागते. प्रा. गुहा याचे सविस्तर आणि सखोल उत्तर देतात. इथे उदात्तीकरण किंवा ‘फिल गुड’ असा हेतू नसून एका प्रदीर्घ कारकीर्दीचे योग्य मूल्यमापन करणे हा उद्देश आहे हे ध्यानात घ्यायला हवे.

भारताला स्वातंत्र्य मिळणार हे निश्चित झाल्यावर कोणत्या पद्धतीचे सरकार असावे यावर कॉंग्रेसमध्ये बराच खल झाला. अमेरिका आणि युरोपमधील सरकारांचा अभ्यास करून अखेर लोकशाही पद्धत निवडण्यात आली. काही निरीक्षकांच्या मते वसाहत राजवटीमधून नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशांसाठी हुकूमशाही अधिक योग्य असते कारण या देशातील लोक लोकशाहीसाठी तयार नसतात. इंडोनेशिया किंवा पाकिस्तानचे उदाहरण भारतानेही स्वीकारले असते तर फारसे आश्चर्य वाटण्याचे कारण नव्हते. भारतात सैन्यदलाची हूकूमत कधी येणार याबद्दलही बरीच चर्चा होती. यासंबंधात नेहरूंचे विचार किती स्पष्ट होते याचे उदाहरण स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर घडलेल्या एका प्रसंगातून दिसते. पहिल्या झेंडावंदनाच्या प्रसंगी आम जनतेला ध्वजाजवळ येण्याची परवानगी देऊ नये असे मत तत्कालीन सैन्यदलाच्या ब्रिटीश प्रमुखांनी व्यक्त केले होते. नेहरूंनी त्यांना लिहीलेल्या उत्तरामध्ये ‘सैन्यदलाचे काम सरकारला लागेल ती मदत करण्याचे आहे, धोरण ठरवण्याचे नाही’ असे ठणकावले. नंतरही जनरल करियप्पा यांचा सरकारी कामात हस्तक्षेप होतो आहे हे लक्षात आल्यावर नेहरूंनी त्यांना समज दिली होती. याचा परिणाम म्हणजे नंतरच्या काळात परिस्थिती कितीही बिकट असली तरीही सरकारच्या कामात सैन्यदलाने हस्तक्षेप केल्याचे एकही उदाहरण नाही. आपल्या शेजारच्या देशातील परिस्थिती पाहिली तर ही किती चांगली गोष्ट आहे याची खात्री पटावी.

उद्योगधंद्यांवरील चर्चांमध्ये नेहेमी भारताची तुलना जपानशी केली जाते. प्रा. गुहा एक उलटी तुलना करतात. भारताची घटना निश्चित करण्याचे ठरल्यानंतर देशभरातील जनतेकडून यासाठी सुचवण्या मागवण्यात आल्या. १९४६ ते १९४९ या काळात ११ सत्रांमध्ये चर्चा केल्यानंतर ११ खंड आणि ३४९ कलमे असलेली भारताची घटना अस्तित्वात आली. याच काळात जपानची घटनाही अस्तित्वात आली. फरक हा की ही घटना २४ अमेरिकन लोकांनी (त्यातील १६ सैन्यदलातील होते) एका खोलीत बसून तयार केली. नंतर जपानी संसदेत घटनेवर चर्चा झाली पण कोणतीही दुरूस्ती करण्यासाठी अमेरिकन अधिकार्‍यांची परवानगी आवश्यक होती. याउलट १९३० मध्येच कॉंग्रेसने आमची घटना आम्हीच तयार करू असे इंग्रज अधिकार्‍यांना सांगितले होते.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रज सरकारच्या काळात अस्तित्वात आलेल्या प्रशासकीय सेवेचे – इंडियन सिव्हिल सर्व्हिसचे – काय करायचे असा प्रश्न आला. काही मंडळींची मागणी होती की आयसीएस बरखास्त करावी. याचे मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय नेत्यांना तुरूंगवासात पाठवण्यामागे आयसीएसचा महत्वाचा सहभाग होता आणि यासाठी ही नेते मंडळी त्यांच्यावर नाराज होती. पण नेहरू आणि सहकार्‍यांनी आयसीएसचे कौशल्य आणि ताकद ओळखून त्यांना भारतीय सरकारमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अचूक असल्याचा पहिला दाखला दोन वर्षातच मिळाला. स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुका पार पाडण्याचे शिवधनुष्य तत्कालीन निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी यशस्वीपणे पेलून दाखवले. याखेरीज गांधीवादापासून फारकत घेऊन भारताला उद्योगधंद्यांमध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी नेहरूंनी दूरदृष्टी ठेवून पहिल्या आणि दुसर्‍या पंचवार्षिक योजनेअंतर्गत अनेक महत्वपूर्ण पावले उचलली. नेहरूंनी नंतरच्या काळात केलेल्या चुका हिमालयाएवढ्या होत्या. त्याची जबाबदारी त्यांच्याकडे जातेच. पण नेहरूंचे किंवा त्यांच्यानंतर आलेल्या शास्त्रींचे राजकारण मूल्याधिष्ठीत होते हे त्यांचे विरोधकही मान्य करतील. याउलट इंदिरा गांधींपासून व्यक्तीनिष्ठ राजकारणाची सुरूवात झाली, आधीचे सर्व आयाम बदलले. आणीबाणीच्या काळात व्यक्त झालेली एक टिप्पणी या बाबतीत बोलकी आहे. “नेहरू आज असते तर त्यांनाही तुरूंगात जावे लागले असते आणि तिथून त्यांनी परत आपल्या मुलीला पत्रे लिहीली असती.”

सर्व नियमांना अपवाद ठरून भारत अजूनही का तग धरून आहे? या प्रश्नाचे उत्तर प्रा. गुहा उपसंहारात देतात. भारतीय मानस स्वाभाविकपणे लोकशाहीकडे झुकणारे आहे. १९५२ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकांमध्ये मतदानाशी आधी कधीही संबंध न आलेल्या बहुतांशी जनतेने मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. नंतरही काश्मिर किंवा इतर भागात अतिरेक्यांच्या धमक्या जनतेला मतदानापासून रोखू शकल्या नाहीत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विविधता. जागतिक इतिहासात विविध भाषा, संस्कृतीचे लोक आपापली ओळख कायम ठेऊन एक राष्ट्र निर्माण करण्यासाठी एकत्र आल्याचे दुसरे कोणतेही उदाहरण नाही. अमेरिकेत हे घडले पण भारताच्या अगदी उलट तर्‍हेने. अमेरिका ‘मेल्टींग पॉट’ म्हणून ओळखली जाते. जगभरातील लोक एकत्र येऊन अमेरिकन संस्कृती स्वीकारतात. याउलट भारतात ‘सॅलड कल्चर’ आहे, प्रत्येक वेगळी संस्कृती आपली ओळख कायम ठेवते. सुरूवातीला पाश्चात्य निरीक्षकांना अशा सरमिसळीतून एकसंध राष्ट्र उभे राहू शकेल यावर विश्वास बसत नव्हता. सध्या युरोपियन युनियनमध्ये हाच प्रयत्न चालू असताना किती अडचणी येत आहेत ते आपण पहातोच. भारतात हे घडू शकले याचे मुख्य कारण ‘सॅलड संस्कृती’ आणि विशेषत: भाषावार प्रांतरचना आहे असे प्रा. गुहा म्हणतात. असे केले नसते तर काय झाले असते याची उदाहरणे जवळच आहेत. श्रीलंकेत जवळजवळ अर्ध्या भागात तमिळ लोक असूनही त्यांच्यावर सिंहली भाषा लादण्यात आली, त्याचे परिणाम आजही दिसत आहेत. पूर्व पाकिस्तान अस्तित्वात आल्यावर पहिल्याच दिवशी भाषणात जिना यांनी पाकिस्तानमध्ये बंगाली भाषेला कोणतेही स्थान नाही, त्यांना उर्दू शिकावी लागेल असे स्पष्ट सांगितले. बांग्लादेश निर्मितीची बीजे इथेच रोवली गेली. कॉंग्रेसमध्ये १९२० पासूनच भाषावार प्रांतरचना असावी असे मत व्यक्त केले जात होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंचा विचार बदलला पण सुदैवाने देशभरातून उमटलेल्या तीव्र प्रतिक्रिया लक्षात घेऊन त्यांनी याला मान्यता दिली. यामुळे प्रत्येक प्रांताची ओळख अबाधित राहीली आणि आज ‘अनेकता में एकता’ सारखी वाक्ये म्हणता येऊ लागली. आज अमेरिकेत हिस्पॅनिक लोकांची संख्या लक्षणीय आहे, मात्र राजकारणी लोकांचे धोरण ‘मेल्टींग पॉट’ संस्कृती सोडेल अशी चिन्हे दिसत नाहीत.

आजच्या भारतात नेमकी काय परिस्थिती आहे? आपली खरंच प्रगती होते आहे का? अशा प्रश्नांना बहुतेक वेळा ‘ब्लॅंकेट जनरलायझेशन’ या प्रकारात मोडतील अशी उत्तरे मिळतात. ‘काय होणार या देशाचं’ या चालीवर म्हटलेली वेगवेगळ्या कवींची गाणी निरनिराळ्या सुरांमध्ये ऐकायला मिळतात. या प्रकाराशी बराच चांगला परिचय आहे कारण एकेकाळी अशी गाणी गाण्यात माझाही आवाज होता. बहुतेक वेळा याच्या मुळाशी परदेशात दिसणार्‍या आणि जाणवणार्‍या वरवरच्या परिस्थितीशी केलेली तुलना असते. पण भारत आणि अमेरिका किंवा युरोप यांच्यामध्ये मूलभूत फरक आहेत, ते लक्षात घेतले नाहीत तर अशा तुलना बहुतांशी निरर्थक ठरतात. फ्रेंच किंवा जपानी लोकांच्या भाषाप्रेमाचे उदाहरण नेहेमी दिले जाते. भारतात असे होणे शक्य नाही कारण प्रत्येक माणसाला किमान तीन भाषा शिकाव्याच लागतात. फ्रेंच लोकांचे भाषाप्रेम त्यांच्या राष्ट्रप्रेमाला कारणीभूत ठरले आणि या आणि यासारख्या उदाहरणांवरून भारतासारखा देश एकसंध राष्ट्र म्हणून कधीही टिकू शकणार नाही असे अंदाज कित्येक दिग्गजांनी वर्तवले. मुळात युरोपियन इतिहासावरून भारताविषयी अंदाज वर्तवणे फारसे बरोबर नाही.

भारताचा इतिहास पाहिल्यावर आणखी एक गोष्ट जाणवते. व्यवस्थापन शास्त्रामध्ये ८०-२० चा नियम असतो. थोडक्यात, कोणत्याही गोष्टीमध्ये २० % ना बाकीच्या ८० % पेक्षा अधिक महत्व असते. उदा. तुम्ही ज्या गोष्टी करता त्यातील २० % गोष्टी खरोखर महत्वाच्या असतात. आपल्या राजकारण्यांकडे पाहिल्यावर हा देश कसा चालतो असा प्रश्न कुणालाही पडावा. इथे हा नियम लागू होतो असे वाटते. याचे एक उदाहरण म्हणजे आतापर्यंत आलेले कोणतेही सरकार पाहिले तर असे दिसते की त्यांनी कितीही गलथान कारभार केला तरीही काही कामे अशी केली ज्यामुळे देशाच्या प्रगतीला अभूतपूर्व अशी कलाटणी मिळाली. नेहरूंचे योगदान वर आलेच आहे, इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये बांग्लादेश प्रश्नावर जागतिक दबावाला न जुमानता निर्णायक भूमिका घेतली. मिझोराम, पंजाब करार आणि देशातील दूरसंचार क्षेत्रातील क्रांती राजीव गांधींमुळे झाली तर खुल्या अर्थव्यवस्थेचे सर्व श्रेय नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांना जाते. अगदी आणीबाणीनंतर आलेल्या अल्पायुषी जनता सरकारनेही आणिबाणीच्या काळात केलेल्या लोकशाहीच्या विरोधातील घटनादुरूस्त्या बदलल्या आणि आणीबाणी लागू करायला मंत्रीमंडळाची परवानगी हवी असा महत्वाचा बदल केला. देश का चालतो तर देशातील २० % लोक जी कामे करतात त्यामुळे बाकीच्या ८० % लोकांचा गलथानपणा चालून जातो. या २० % मध्ये अर्थातच प्रशासकीय सेवेमध्ये असणार्‍या सक्षम अधिकार्‍यांचाही महत्वाचा वाटा आहे.

आपली लोकशाही खरी आहे की आभासी? या प्रश्नावर प्रा. गुहा म्हणतात, ‘फिफ्टी फिफ्टी’. निवडणुका, प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य अशा गोष्टीमध्ये आपल्याकडे लोकशाही आहे पण राजकारण, राजकारणी आणि त्यांच्याशी संलग्न संस्था यामध्ये चालणारे व्यवहार बरेचदा लोकशाही दिसत नाही. आजवरच्या इतिहासात काश्मीर, पंजाब आणि नागालॅंड इथे भारतापसून वेगळे होण्यासाठी सर्वात आक्रमक प्रयत्न झाले. आजही जवळपास वीस टक्के भारतामध्ये अशांतता आहे, पण चार पंचमांश भारत शांत आहे. या भागातील जनतेला लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा मिळतो आहे. आशिया खंडातील आपल्या शेजार्‍यांकडे पाहिल्यास ही किती मौल्यवान गोष्ट आहे याची खात्री पटावी.

चांगली ऐतिहासिक पुस्तके वाचताना होणारा एक रोचक परिणाम म्हणजे त्या कालमानसाची (zeitgeist) स्पष्ट कल्पना येते. मेंदू नेहेमी नवीन अनुभव संदर्भांच्या चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करत असतो. संदर्भ जितके अचूक असतील तितके नवीन अनुभव आत्मसात करायला सोपे जाते. ‘इंडिया आफ्टर गांधी’ वाचल्यानंतर पहीली बदललेली चौकट जाणवली ती म्हणजे जुने हिंदी (आणि इतरभाषिक) चित्रपट बघताना येणार्‍या अनुभवाची. सुनील दत्तचे ‘हम हिंदुस्थानी’ गाणे पूर्वी भाबडे आणि भावुक वाटायचे. आता पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे चित्रपट १९६० चा आहे. दोन पंचवार्षिक योजना यशस्वीपणे अमलात आल्या होत्या, दोन निवडणुका झाल्या होत्या, भिल्लईचा नवीन स्टील प्लांट उभा राहीला होता. भाक्रा-नांगल येथील अजस्त्र धरणाच्या कामाला सुरूवात झाली होती. चीनच्या आक्रमणाला दोन वर्षे बाकी होती. नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याची नवलाई अजूनही ओसरली नव्हती. हे सर्व लक्षात घेतल्यावर या भावुकतेबद्दल काहीशी कौतुकमिश्रित भावना होते. आता सीईओ असणार्‍या मुलाच्या लहानपणचे व्हीडीओ बघताना आईवडीलांना वाटत असेल तसे काहीसे. नंतर ६०, ७० च्या दशकातील उलथापालथी बघितल्यावर सत्यजित रेंच्या ‘जन अरण्य’, ‘महानगर’ किंवा ‘प्रतिद्वंदी’ सारख्या सामजिक चित्रपटांमागची भूमिका लक्षात येते. या सर्वांची आधीही अजिबात कल्पना नव्हती असे नाही, पण आता चौकटी अधिक रेखीव झालेल्या जाणवतात.

Categories
इतिहास​

ऑपरेशन ओव्हरलॉर्ड

६ जून १९४४ – आज या दिवसाला ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. दुसर्‍या महायुद्धातील जर्मनीविरूद्ध निर्णायक ठरलेली नॉर्मंडी या दक्षिण फ्रान्सच्या तटावरील दोस्त राष्ट्रांची चढाई या दिवशी झाली. ७००० जहाजे, १३,००० वेगवेगळ्या प्रकारची विमाने आणि १५०,००० ते १७५,००० भूदल सैनिक असा अगडबंब ताफा असलेली ही चढाई मानवी इतिहासातील सर्वात मोठी सुनियोजित चढाई म्हणून ओळखली जाते. प्रत्येक पिढीच्या भाग्यात काही निर्णायक घटना असतात ज्यांचा विसर पडणे कधीच शक्य नसते. या घटनेनंतरच्या आमच्या पिढ्यांना याचे वर्णन वाचून किंवा यावरील चित्रफिती पाहून याबद्दल केवळ कल्पना करणेच शक्य आहे.

नॉर्मंडीच्या चढाईला ‘ऑपरेशन ओव्हरलॉर्ड’ असे सांकेतिक नाव दिले गेले होते. या चढाईची आखणी १९४३च्या उन्हाळ्यातच सुरू झाली. चढाई फ्रान्सच्या कोणत्या किनार्‍यावर करायची हा महत्वाचा प्रश्न होता. इथे दोन पर्याय उपलब्ध होते, पा द कॅले (Pas de Calais) आणि नॉर्मंडी. पा द कॅलेपासून जर्मनी जवळ आहे त्यामुळे आक्रमण इथेच होणार अशी जर्मन अधिकार्‍यांची पक्की समजूत होती. (आणि आक्रमणाच्या दुसर्‍या दिवशीपर्यंत ती बर्‍याच अंशी तशीच होती.) नॉर्मंडी लांब असूनही तिथे शेर्बोर्ग (Cherbourg) आणि ले हाव्र (Le Havre) इथे बंदरे आहेत, साहजिकच आक्रमण केल्यानंतर रसद, शस्त्रे इ. नेण्यासाठी नॉर्मंडी अधिक सोईस्कर होते. तरीही तटावर इतर ठिकाणी बंदर नसण्याची अडचण होतीच. यावर चर्चा चालू असताना एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला, “तिथे बंदर नसेल तर आपण आपल्याबरोबरच बंदर नेले पाहिजे.” या साध्याश्या वाटणार्‍या कल्पनेची परिणीती शेवटी मलबेरी या जहाजाबरोबर घेऊन जाता येणार्‍या बंदरामध्ये झाली.

चढाई कुठे होणार आहे याबद्दल जर्मनीला अंधारात ठेवण्यात दोस्त राष्ट्रांच्या गुप्तचर खात्यांचा मोठा सहभाग होता. खोट्या छावण्या आणि सैंन्यांचे तळ उभारणे, नकली संदेशांचे दळणवळण, डबल एजंटांनी खोटी माहिती पुरवणे अशी सर्व आयुधे यासाठी वापरण्यात आली. जर्मनीची दिशाभूल करण्यासाठी दोन अफवा पसरवण्यात आल्या. एक म्हणजे आक्रमण पा द कॅलेच्या जवळपास होईल आणि दुसरे म्हणजे अजून एक आक्रमण नॉर्वेमध्ये होईल. यामुळे जर्मन सैन्याचा बचाव मुख्यत: पा द कॅलेच्या आसपास केंद्रित झाला. शिवाय नॉर्वेच्या बचावासाठी १३ डिव्हिजन राखून ठेवण्यात आल्या. या सर्व तयारीमध्ये कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. चढाईची कल्पना अत्युच्च पातळीवरील अधिकारी सोडल्यास इतर सर्वांना ‘नीड टू नो’ धर्तीवरच देण्यात येत होती. आक्रमणाच्या काही तास आधीपर्यंत सैनिकांना आक्रमण कुठे होणार आहे हे माहित नव्हते. आक्रमणाची पूर्वतयारी म्हणून नॉर्मंडीच्या आसपासचे रेल्वेचे रूळ आणि इतर दळणवळणाचे रस्ते यावर बॉंम्बचा वर्षाव करून त्यांचे बरेच नुकसान केले गेले. मात्र हे फक्त नॉर्मंडीमध्ये न करता पा द कॅलेतही केले गेले.

दोस्त राष्ट्रांच्या सैन्याचे प्रमुख म्हणून ड्वाइट आयसेनहॉवर यांची नियुक्ती करण्यात आली. संपूर्ण आक्रमणामध्ये आयसेनहॉवर यांनी घेतलेला सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे हवामान योग्य नसतानाही ६ जूनला चढाईचा निर्णय न बदलणे हा होता. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ५, ६ आणि ७ जून या तीनच दिवशी भरती-ओहोटी, चंद्रप्रकाश चढाईसाठी योग्य होते. ५ जूनला चढाई करण्याचे ठरल्यानंतर केवळ काही तास आधी हवामान बिघडल्यामुळे निर्णय बदलावा लागला. अशा परिस्थितीत ६ जूनला हवामान फारसे सुधारलेले नसतानाही आणखी विलंब लावला तर सैन्याचे मनोबल कमी होईल याची आयसेनहॉवर यांना कल्पना होती. याखेरीज आत्ताची संधी हुकली तर जुलैपर्यंत परत संधी नव्हती. या सर्व शक्यतांचा विचार करून अखेर ६ जूनला चढाई करण्यासाठी आयसेनहॉवर यांनी हिरवा झेंडा दाखवला. खराब हवामानात चढाई होईल अशी अजिबात कल्पना नसल्याने जर्मन अधिकारी निर्धास्त होते, बरेच उच्चपदस्थ सुट्टीवर गेले होते. त्यामुळे जर्मन सैन्याला आश्चर्याचा धक्का देण्याच्या दृष्टीने हा निर्णय दोस्त राष्ट्रांच्या पथ्यावरच पडला.

दोस्त राष्ट्रांच्या बाजूने एक जमेची गोष्ट म्हणजे त्यांचे वायुदल कैक पटींनी श्रेष्ठ होते. अमेरिका युद्धात उतरल्यानंतर मिशिगन येथील फोर्डच्या कारखान्यात बी-२४ लढाऊ विमानांचे घाऊक उत्पादन सुरू झाले. त्यात भर म्हणजे १९४३ च्या शेवटी दोस्त राष्ट्रांकडे पी-५१ “मस्टॅंग” विमाने आली. या विमानांचा पल्ला ६०० मैलांपेक्षा जास्त होता. बर्लिनपर्यंत पोचू शकणारी पी-५१ विमाने जर्मन सैन्याचे दु:स्वप्न ठरली. १९४४च्या फेब्रुवारी ते मे मध्ये दोस्त राष्ट्रांच्या वायुदलाने हॅम्बर्ग आणि बर्लिन येथील जर्मन विमानांच्या कारखान्यांची धूळदाण उडविली. लुफ्तवाफ (Luftwaffe) या नावाने ओळखल्या जाणार्‍या जर्मन वायुदलाकडील २३९५ लढाऊ पायलटांपैकी २२६२ पायलट यात कामी आले, म्हणजे प्रशिक्षित मनुष्यबळ ९९% ने घटले. ६ जूनला, आक्रमणाच्या दिवशी समुद्रतटाचे रक्षण करणे लुफ्तवाफच्या दृष्टीने अशक्य गोष्ट होती.

दोस्त राष्ट्रांच्या विजयामध्ये भूमिगत फ्रेंच रेझिस्टन्सचा मोलाचा वाटा होता. गेस्टापोपासून बचाव करत त्यांनी मोलाची माहिती दोस्त राष्ट्रांपर्यंत पोचविली. त्यांना गुप्त संदेश पाठवण्यासाठी दोस्त राष्ट्रांनी बीबीसीद्वारे सांकेतिक वाक्ये व्यक्तिगत निरोप या सदराखाली पाठविली. या संदेशांचा अर्थ प्रत्येक गटासाठी वेगवेगळा होता.’फासे टेबलावर आहेत’ म्हणजे ‘रेलवेचे रूळ उध्वस्त करा’, ‘सुएझमध्ये उकाडा आहे’ म्हणजे ‘टेलीफोनच्या तारा तोडा’. यातील सर्वात महत्वाचा संदेश १ जून रोजी पाठवण्यात आला. हा संदेश म्हणजे फ्रेंच कवी पॉल व्हर्लेन याच्या ‘ऑटम सॉंग’ या कवितेची पहिली ओळ होती. ‘ले सोंग्ला लों दे व्हियोलों देलोतन’ – ‘शरदातील व्हायोलिनचे लांब हुंदके,’ याचा अर्थ ‘आक्रमण लवकरच होणार आहे’. ओळीचा उत्तरार्ध ५ जून रोजी रात्री सव्वाअकरा वाजता प्रसारित करण्यात आला. ‘ब्लेस मॉ कर द उन लॉंगर मोनोतोन’ – ‘आक्रमण आज रात्री होईल.’

चढाई नॉर्मंडीच्या परिसरातील गोल्ड, जूनो, स्वॉर्ड, उटा आणि ओमाहा या तटांवर झाली. चढाईच्या वेळी ओहोटी असल्याने सैन्याला बरेच अंतर तटावरील जर्मन बंकरचा मारा सहन करत कापावे लागले. ओमाहा तटावर हे अंतर ३०० यार्ड होते. चढाईच्या आधी विमानांचा हल्ला करून तटावरील जर्मन संरक्षक फळी उध्वस्त करण्याची योजना होती.आणखी सैन्याच्या तुकड्या येतच होत्या. त्याचबरोबर तटावरून आतल्या भागात घुसून तेथील जर्मन ठाणी उध्वस्त करणेही गरजेचे होते. दुर्दैवाने ओमाहा तटावरील जर्मन फळी विमानांच्या कचाट्यातून वाचली. परिणामत: तिथे चढाई करणार्‍या सैनिकांची अक्षरश: कत्तल झाली. सूर्य मावळेपर्यंत तिथे २५०० सैनिक मरण पावले होते. तटांवर नौदलाच्या सहाय्याने सैनिक आणण्याखेरीज विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने तीन डिव्हिजन उतरवल्या गेल्या. दिवसअखेर गोल्ड, जूनो आणि स्वॉर्ड तटांवर चढाई बर्‍यापैकी यशस्वी झाली होती. ओमाहा तटावर परिस्थिती बिकट होती. दुसर्‍या दिवशी वेगवेगळ्या तटांवरील चढाई करणार्‍या सैन्याला एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले.

हे सर्व चालू असताना जर्मन संरक्षणाची काय तयारी चालू होती अशी प्रश्न पडणे साहजिक आहे आणि त्याचे उत्तर रोचक आहे. आक्रमण सुरू झाल्यानंतर ७११ इन्फन्ट्री डिव्हिजनचा कमांडर जोसेफ रेचर्ट याने तत्काळ परिस्थिती ओळखून वरिष्ठ अधिकार्‍यांना सुचना दिली पण जर्मन हाय कमांडचा यावर विश्वास बसला नाही. नॉर्मंडीच्या संरक्षणार्थ दोन पॅंन्झर डिव्हिजन सज्ज होत्या, मात्र त्यांना आज्ञा देण्याचा अधिकार हिटलरने स्वत:कडे राखून ठेवला होता. आक्रमण सुरु झाले तेव्हा हिटलर झोपी गेला होता आणि त्याला उठवण्याची हिम्मत कुणातही नव्हती. दुसर्‍या दिवशी सकाळी हिटलरला परिस्थिती कळूनही त्याने तत्काळ निर्णय घेतला नाही. पॅंझर डिव्हिजनना कूच करण्याचा आदेश मिळेपर्यंत दुपारचे चार वाजले होते. वेळ निघून गेली होती.

६ जूनला सुरू झालेली चढाई केवळ सुरूवात होती. नंतरचे तीन महिने जर्मन सैन्याशी वेगवेगळ्या तटांवर झुंज देण्यात गेले. १५ जुलैला जनरल रोमेल याने हिटलरची भेट घेऊन तह करण्याविषयी सुचवले. संतप्त हिटलरने ही सूचना धुडकावून लावली. ९ ऑगस्टला परत जर्मन अधिकार्‍यांनी हिटलरचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यातही अपयश आले. २५ ऑगस्ट रोजी पॅरिस मुक्त करण्यात आले. ऑगस्ट संपेपर्यंत जर्मन सैन्य उध्वस्त झाले होते. २००,००० सैनिक जखमी किंवा मरण पावले होते आणि आणखी २००,००० सैनिक कैद झाले होते.

इतिहासामध्ये जर-तरचा खेळ खेळणे रोचक असते. आक्रमण अयशस्वी झाले असते तर दोस्त राष्ट्रांना परत या तोडीची चढाई करणे केवळ अशक्य होते. युद्ध १९४६पर्यंत लांबले असते तर कदाचित रशियानेही आक्रमण केले असते आणि युरोपचा नकाशा निश्चितच बदलला असता. दुसरे महायुद्ध ही मानवी इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे. सातपैकी सहा खंडांवर झालेल्या या युद्धात ५०० लाख लोक मरण पावले आणि कित्येक लाख जखमी झाले. या युद्धात सहभागी झालेल्या दोस्त राष्ट्रामधील सैनिकांना ‘द ग्रेटेस्ट जनरेशन’ असे संबोधले जाते.

Categories
इतिहास​ बुके वाचिते

बिहाइंड एव्ह्री ग्रेट फॉर्च्यून…

जागतिक इतिहासामध्ये इ.स. १४०० च्या पुढची काही शतके महत्वाची मानली जातात. रेनेसान्स हा काळ इटालियन भाषेत रिनाशिता (Rinascita) असाही ओळखला जातो. रिनाशिता याचा अर्थ पुनर्जन्म. साहित्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र अशा अनेक शाखांमध्ये आविष्कारांचा सुवर्णकाल म्हणता येईल असा रेनेसान्स, नंतर एनलायटनमेंट आणि औद्योगिक क्रांती या सर्व घडामोडींचे जगावर दूरगामी परिणाम झाले. या सर्वांचा उल्लेख करताना बहुतेक इतिहासकारांच्या वर्णनांमध्ये गर्व, अभिमान इ. भावनांच्या छटा आढळतात. अर्थात सर्वच इतिहासकार पूर्वग्रहदूषित नसतात पण इतिहास जेत्यांकडूनच लिहीला जातो हे पूर्वापार चालत असलेले मत जेते आणि पराभूत यांची आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती बदलली असतानाही बरेचदा खरे ठरते आहे. याचे एक उदाहरण नियाल फर्गसन यांच्या ‘सिव्हिलायझेशन : द वेस्ट ऍण्ड द रेस्ट‘ या पुस्तकामध्ये दिसते. फर्गसनच्या मते जगाची आजची प्रगत अवस्था इंग्लंड, फ्रान्स, स्पेन इ. देशांनी शतकानुशतके इतर देशांवर केलेल्या राज्यांचा परिणाम आहे. पाश्चात्य संस्कृतीने अंगिकारलेल्या विविध गुणांमुळे ती राष्ट्रे वरचढ ठरली पण आता इतर राष्ट्रांनीही ते गुण आत्मसात केले आहेत. थोडक्यात ‘साम्राज्य’ धोक्यात आहे.

प्रत्येक घटनेचे – विशेषत: ती ऐतिहासिक घटना असेल तर – अनेक पैलू असतात, तिचे चांगले आणि वाइट दोन्ही प्रकारचे परिणाम बघायला मिळतात. अशा वेळी फक्त चांगले परिणाम लक्षात घेऊन त्या घटनेचे समर्थन करणे मूर्खपणा आहे. ६५० लाख वर्षांपूर्वी डायनॉसॉर नष्ट झाले, नंतर आताचे सस्तन प्राणी उत्क्रांत होऊन बलाढ्य झाले आणि त्यातून माणूस अस्तित्वात आला. जर डायनॉसॉर नष्ट झाले नसते तर काय झाले असते? त्याचप्रमाणे युरोपियन साम्राज्यांनी जगावर राज्य केले नसते तर जगाची प्रगती थांबली असती का? कुणी सांगावे? इतिहासात जर-तरला अर्थ नसतो. याच न्यायाने अमेरिकेत मंदी आली हे एका प्रकारे बरेच झाले असे म्हणता येईल. निदान इराकच्या अजूबाजूचे देश आक्रमणापासून तरी वाचले.

पंधराव्या शतकाच्या सुरूवातीला इटलीमध्ये फ्लोरेन्स या शहरात कलाविष्कारांचा अतुलनिय संगम झाला होता. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील कलाकार एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करत होते. व्यापाराच्या निमित्ताने अरब देशांशी किंवा टर्कीमधील बलाढ्य ऑटमन साम्राज्याशी असणारा संपर्कही यासाठी फायदेशीर ठरला. यातून पुढे अनेक क्षेत्रांमध्ये नवीन विचार, नवीन संकल्पना आल्या. छापखान्याच्या शोधामुळे आतापर्यंत काही लोकांपर्यंत सिमित असलेले विचार घरोघरी पोचू लागले. याच काळात मजेलन, कोलंबस, वास्को द गामा यांच्या प्रयत्नांमुळे नव्या जगाचा शोध लागला. दक्षिण अमेरिका, भारत, इंडोनेशिया येथील समृद्धीच्या बातम्या युरोपात पोचल्यावर या प्रदेशांवर वर्चस्व मिळवण्याची एकच चढाओढ सुरू झाली. नंतरच्या काही शतकांमधील इतिहास आफ्रिका, भारत आणि दक्षिण अमेरिका येथील स्थानिक रहीवासी आणि युरोपियन साम्राज्ये यांच्यातील कटू संघर्षांचा साक्षीदार आहे.

हा इतिहास वाचताना मला एक विरोधाभास प्रखरपणे जाणवत राहतो. रेनेसान्स आणि एनलायटनमेंट हा काळ माणसाला सुसंस्कृत बनवणारा म्हणून ओळखला जातो. (परत इथे माणूस म्हणजे पाश्चात्य माणूस असाच अर्थ घ्यायला हवा. अन्यथा इजिप्त, चीन, भारत अशा अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या संस्कृतींची भरभराट या काळाच्या आधीपासून चालू होती.) निक्कोलो मकियवेल्ली याने लिहीलेले इल प्रिंचिपे – द प्रिंस हे आदर्श राजा कसा असावा यावरचे पुस्तक किंवा कास्तिलोयोने याने समाजात वागण्याच्या नियमांचे – एटिकेट्सचे – द कोर्टियर हे पुस्तक – ही तेव्हाच्या युरोपमध्ये बेस्टसेलर पुस्तके होती. कोणत्याही विषयावर अधिकारवणीने बोलू शकणारा, समाजात कुठे कसे वागावे याची माहिती असणारा आदर्श पुरूष म्हणून ओळखला जाणारा रेनेसान्स मॅन याच काळात जन्माला आला. थोडक्यात आधीच्या अंधारयुगात टोळीयुद्धे करणारा युरोपियन माणूस या काळात सभ्य आणि सुसंस्कृत बनायला सुरूवात झाली.

पण हाच सुसंस्कृत माणूस जेव्हा घरापासून दूर परक्या संस्कृतींमध्ये गेला तेव्हा काय झाले? त्याने आपला सर्व सुसंस्कृतपणा सोईस्करपणे बाजूला ठेवला आणि त्या भागातील स्थानिकांवर मन मानेल तसे अत्याचार केले. सोळाव्या शतकाच्या सुरूवातीला मेक्सिकोच्या स्थानिकांची लोकसंख्या २५० लाख होती. स्पॅनिश आक्रमणानंतर इ. स. सोळाशेमध्ये ही संख्या दहा लाखावर आली. यात युरोपियन लोकांनी बरोबर आणलेल्या कांजण्यासारख्या रोगांचाही समावेश होता आणि युद्ध, अविचारी नरसंहार यांचाही. या काळात येथील सोन्याचांदीच्या खाणींमधून युरोपमध्ये दरवर्षी हजारो टन सोने आणि चांदीची वाहतूक होत होती.

जगातील जास्तीत जास्त प्रदेश बळकावून आपले सामर्थ्य वाढवणे ही त्या काळातील प्राथमिक गरज होती. पण घरी सालस आणि सुसंस्कृत वागणारा युरोपियन बाहेरच्या देशांमध्ये इतका क्रूर का झाला? डिकन्ससारखे संवेदनशील लेखक आणि बर्नाड शॉ, बर्ट्रांड रसेल सारखे विचारवंत इंग्लंडमध्ये असतानाही त्यांना भारतातील ब्रिटीश राज्याची अमानुषता जाणवू नये याला काय म्हणावे? कॉनन डॉयलच्या होम्सकथांमध्ये भारतातून लुटून आणलेल्या संपत्तीचे उल्लेख बाजारातून भाजी आणावी तितक्या सहजपणे येतात! किपलिंगने तर ‘व्हाइट मॅन्स बर्डन’ मध्ये नेटिव्हांना सुसंस्कृत करण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर आहे अशी चोराची उलटी ठोकली. यातील दांभिकता लक्षात न येण्याइतकी सटल होती की सगळा ब्रिटीश समाजच अफूच्या नशेखाली निद्रिस्त होता? चर्चिलसारख्या चतुरस्त्र आणि दूरदृष्टी असणार्‍या नेत्याची भारताबद्दलची मते आणि त्याच्या अनुषंगाने त्याने केलेली कृत्ये हे बघितल्यावर ‘धिस वॉज देअर फाइनेस्ट अवर’ म्हणणारा नेता तो हाच का असा प्रश्न पडतो. ही दांभिकता आपल्या कृत्यांचे रॅशनलायझेशन म्हणावे की मानवी स्वभावातील गुंतागुत? कदाचित गांधीजींना हा विरोधाभास कुठेतरी आतून जाणवला असावा. ‘तुम्हालाच तुमच्या अमानुषतेची जाणीव होईल आणि मग तुम्ही इथून परत जाल’ ही त्यांची प्रतिक्रिया आरसा दाखवणारी होती. (भारताला स्वातंत्र्य यामुळे मिळाले किंवा कसे किंवा असा मार्ग पत्करण्याचे फायदे आणि तोटे कोणते हे निराळे विषय आहेत.)

तेव्हाचा भारतीय समाज हा ही संशोधनाचा विषय ठरावा. आपल्या पारतंत्र्यामागे स्थानिक लोकंमध्ये एकी नसणे, स्वकीयांविरूद्ध परकीयांशी हातमिळवणी अशी अनेक कारणे होती. ‘इन ऍन ऍंटीक लॅंड’ या पुस्तकात अमिताभ घोष एक वेगळा मुद्दा मांडतात. वास्को द गामाच्या जहाजातून पोर्तुगीज खलाशी जेव्हा इथे आले तेव्हा इथली सुबत्ता आणि संपत्ती पाहता येथील राजाला नजराणे देण्यासाठीही त्यांच्याकडे योग्य काही नव्हते. स्थानिक आणि पाहुणे यांच्यातील आर्थिक विषमता नंतरच्या आक्रमणाला कारणीभूत झाली हे उघडच आहे. पण स्थानिक लोक या आक्रमणासाठी तयार नव्हते याचे एक कारण हे ही आहे की याची त्यांना गरज वाटली नाही. जेव्हा एखाद्या देशावर केलेले आक्रमण आपल्यावर झालेल्या आक्रमणाइतके यशस्वी ठरते तेव्हा या घटनेची पराभूतांच्या दृष्टीकोनातून दखल घेतली जात नाही. एखाद्या श्रीमंत माणसाला चाकूच्या धाकावर लुबाडणारा दरोडेखोर या दोघांमध्ये शिक सुसंस्कृत कोण? की सुसंस्कृतपणा फक्त कट्या-चमच्यांनी खाणे किंवा लोकांसाठी दारे उघडणे अशा वरवरच्या गोष्टींपर्यंतच मर्यादिस आहे?

फर्गसनच्या पुस्तकामागची वृत्ती चिंताजनक आहे. इराकवर केलेले आक्रमण इराकच्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केले होते अशी सारवासारव याच मनोवृत्तीतून केली जाते.

पुस्तक महत्वाचे नाही पण फर्गसन सोकावतोय.