रोमांचकारी कायगो हिगाशिनो

तो परत आलाय. खरं तर तो याआधीही अनेकदा येऊन गेलाय. वेगळा देश, वेगळा वेष, वागणूकही बदलली आहे. मात्र डिडक्शनला एक शास्त्र मानणारा, तर्काला सर्वोच्च स्थान देणारा डीएनए – जो २२१ बी, बेकर स्ट्रीटच्या ‘पेइंग गेस्ट’मध्ये होता – तो याच्यातही आहे. पण कथा पुढे सरकते तसा आणखी एक, तितकाच तल्लख मेंदू समोर येतो. हा ही तितकाच हुशार, त्याच मार्गावर चालणारा. हळू हळू आकृत्या किंचित स्पष्ट होतात. पहिली आकृती मॉरियार्टीच्या जवळ जाणारी आणि दुसरी शेरलॉकच्या. अर्थात इथे दोघे शत्रू नाहीत तर उलट मित्र आहेत. आणि वॉटसनची उगीच लुडबुडही नाही, पण लस्ट्रेड मात्र आहे.

Devotion of Suspect X book cover

जपानी लेखक आणि दिग्दर्शकांच्या शोधात असताना सापडलेली आणखी एक नोंदवून ठेवावी अशी भर – लेखक कायगो हिगाशिनो. त्याचं ‘डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ हे पुस्तक बरंच गाजलं आणि वाचल्यावर का ते लगेच लक्षात येतं. इशिगामी गणिताचा शिक्षक, रोज सकाळी तो घराजवळच्या शाळेत शिकवायला जातो. जाताना रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येकाचं अचूक निरीक्षण आणि त्यावरून काढलेले निष्कर्ष – अगदी बेकर स्ट्रीटवरून आल्यासारखे. शाळेजवळ असलेल्या रेस्तरॉंमध्ये यासुको काम करते. यासुको इशिगामीच्या समोरच्या फ्लॅटमध्ये आपली मुलगी – मिसातोबरोबर राहते. इशिगामीचं तिच्यावर एकतर्फी प्रेम आहे. यासुकोचा घटस्फोट झाला आहे पण तरीही तिचा नवरा सारखा तिला त्रास देतो आणि पैशांची मागणी करतो. त्या दिवशी तो घरी येतो, त्यांच्यात वादावादी होते आणि दोघींबरोबरच्या झटापटीत तो मरतो. मर्डर मिस्ट्रीच्या २० व्या पानातच खून झाला. कुणी केला, कसा झाला ते ही दिसलं, मग पुढे काय राहिलं? इशिगामी आवाज ऐकून सगळं ठीक आहे ना हे बघायला येतो. यासुको त्याला खोटंच ‘सगळं ठीक आहे’ असं सांगते पण त्याच्या तीक्ष्ण नजरेला फसवणं अशक्य असतं. इशिगामी तिला मदत करायचं ठरवतो. कोणत्याही सामान्य लेखकाने यासुकोचा नवरा मेलेला दाखवला असता पण कुणी मारला हे सांगितलं नसतं. ते शेवटच्या पानात उघड केलं असतं. हिगाशिनो हा क्रम उलटा करतो. (अर्थात खुनी पहिल्यांदाच उघड करणं ही चाकोरीबाहेरची गोष्ट असली तरी तितकी दुर्मिळही नाही. याचं एक उत्तम उदाहरण – हिचकॉकचा ‘फ्रेंझी‘.)

इशिगामी गणितज्ञ आहे. गणिताचे प्रश्न सोडवताना त्याची तहानभूक विसरते. गणितातला रिमान हायपोथेसिस (P = NP) प्रसिद्ध आहे. साध्या शब्दात सांगायचं तर – काय अधिक सोपं आहे? एखादा प्रश्न तुम्ही मुळापासून सोडवणं की दुसऱ्या कुणीतरी सोडवलेलं प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासणं? इशिगामी हा खून लपवण्यासाठी जे काही करतो ते पोलिसांना घातलेलं एक कोडं असतं. तो हा खून कसा लपवतो हे शेवटपर्यंत उघड केलं जात नाही. दोन दिवसात नदीकाठी एक प्रेत सापडतं. इन्स्पेक्टर कुसानागी तपासाचं काम हाती घेतो. मृतदेह यासुकोच्या नवऱ्याचा असल्याचे पुरावे मिळतात. विद्यापीठातील पदार्थविज्ञानाचा प्राध्यापक युकावा हा कुसानागीचा मित्र आहे. कुसानागीला याआधीही अनेक गुन्हे सोडवण्यात युकावाने मदत केली आहे. कुसानागीने त्याला ‘डिटेक्टिव्ह गॅलिलिओ’ असं टोपणनाव दिलं आहे. याही वेळी कुसानागी त्याची मदत घेतो. योगायोगाने युकावा विद्यापीठात शिकत असताना त्याची गणित शिकत असलेल्या इशिगामीशी मैत्री झालेली असते. आता उंदीर-मांजराचा खेळ सुरू होतो. युकावा गुन्ह्याची उकल करण्याचा प्रयत्न करतो आणि इशिगामी पोलीस आणि युकावा यांचं पुढचं पाऊल काय असेल याचा अंदाज घेत त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो. याहून अधिक कथा उघड करणं हा वाचकांवर अन्याय ठरेल. होम्सच्या एका प्रसिद्ध कथेची बीजं या कथेत सापडतात. इशिगामीला विद्यार्थ्यांना भुलभुलैयात टाकणारे प्रश्न द्यायला आवडतं. प्रश्न वरून भूमितीचा वाटतो पण खरं तर तो बीजगणिताचा असतो. ज्यानं समजून न घेता नुसती घोकंपट्टी केली आहे तो हमखास फसणार. गुन्हा लपवतानाही इशिगामी हीच पद्धत वापरतो. पोलीस त्यांच्या सहज प्रवृत्तीनुसार जसे वागतील ते गृहीत धरून त्याने सर्व डाव रचला आहे. यातून मार्ग काढू शकतो तर तो फक्त युकावा. इशिगामी रोज संध्याकाळी यासुकोला फोन करून पुढे काय करायचं, पोलिसांना काय उत्तरं द्यायची याच्या सूचना देतो.

शेवटी काही क्षण कादंबरी एका वेगळ्याच – अस्तित्ववादाच्या पातळीवर जाते. तुरुंगवासाचा हेतू कैद्याला शिक्षा देण्याचा असतो. पण जर तुरुंगातच कैद्याला अंतिम उत्तर, सत्याची दिशा सापडली तर? इथे कम्यूच्या ‘द स्ट्रेंजर’मधला मेर्सो आठवतो. पण हे एक-दोन पानंच – नंतर परत कथा आपल्या नेहमीच्या पातळीवर येते. एक ढोबळ चूक सापडली. आधी म्हणतात इशिगामीकडे सेलफोन नाही, नंतर इशिगामी सेलफोनवर बोलतो पण ही कदाचित अनुवादाचीही गफलत असू शकते.

सहसा स्त्रियांमध्ये पुरुषांच्या तुलनेत निरीक्षणशक्ती अधिक असते मात्र रहस्यकथांमध्ये एखादी ‘मिस मार्पल’ सोडली तर याचा फारसा वापर झालेला दिसत नाही. आर्थर कॉनन डॉयलने एक-दोनदा याचा वापर केला आहे. ‘द सेकंड स्टेन’मध्ये लेडी हिल्डा होम्सला भेटायला येते तेव्हा याची एक चुणूक दिसते. मात्र ‘स्कॅंडल इन बोहेमिया’मधली आयरिन ऍडलर या संदर्भात एक उत्तम उदाहरण ठरावे. होम्सला जश्यांस तसे उत्तर देणाऱ्या मोजक्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये आयरिनचा समावेश होतो. हिगाशिनोची दुसरी कादंबरी – ‘सॅल्व्हेशन ऑफ अ सेंट’ मध्ये त्याने या कथाबीजाचा वापर केला आहे. याची पावती म्हणून या कादंबरीच्या नायिकेचे नावही आयाने असे आहे.

Book cover for Salvation of a Saint

आयाने आणि तिचा नवरा योशिताका – लग्न होऊन एक वर्ष झालं आहे. त्यांच्या एका वादावादीने कादंबरीची सुरुवात होते. भांडण संपल्यावर आयाने माहेरी जाते. दुसऱ्या दिवशी योशिताका मृतावस्थेत आढळतो. त्याला कॉफीमधून आर्सेनिक दिलेलं असतं. कॉफी त्याने स्वत:च केलेली असते. परत इन्स्पेक्टर कुसानागी आणि त्याचा भौतिकशास्त्रज्ञ मित्र युकावा रहस्यभेद करण्याच्या मागे लागतात. यावेळी कुसानागीच्या बरोबर एक नवीन उमेदवार स्त्री-पोलिस अधिकारी – उत्सुमी – आहे. तपास चालू असताना उत्सुमी अनेकदा कुसानागीच्या लक्षातही येणार नाहीत अशा गोष्टी उघडकीला आणते. आयाने आणि उत्सुमी या दोन पात्रांमागे आयरिन ऍडलरची प्रेरणा स्पष्ट दिसते. काहीही पुरावा नसतानाही उत्सुमीची अंत:प्रेरणा आयाने दोषी असल्याचं सांगत असते. सर्वात मोठा प्रश्न – कुणीही घरी नसताना योशिताकावर विषप्रयोग कसा झाला? यामागे कोणतं वैज्ञानिक तत्त्व वापरलं गेलं आणि हे नेमकं कसं झालं याची उकल शेवटी प्राध्यापक युकावा करतो. अर्थातच शेवटी जी कलाटणी मिळते ती आपल्या सर्व अंदाजांच्या पलीकडे जाणारी असते. याहून अधिक तपशील सांगण्यात अर्थ नाही. हा रोमांचकारी प्रवास करायचा असल्यास ज्याचा त्याने केलेला बरा. शेवटच्या पानापर्यंत हिगाशिनो उत्कंठा ताणून धरण्यात यशस्वी ठरतो.