बिहाइंड एव्ह्री ग्रेट फॉर्च्यून…

जागतिक इतिहासामध्ये इ.स. १४०० च्या पुढची काही शतके महत्वाची मानली जातात. रेनेसान्स हा काळ इटालियन भाषेत रिनाशिता (Rinascita) असाही ओळखला जातो. रिनाशिता याचा अर्थ पुनर्जन्म. साहित्य, चित्रकला, शिल्पकला, वास्तुशास्त्र अशा अनेक शाखांमध्ये आविष्कारांचा सुवर्णकाल म्हणता येईल असा रेनेसान्स, नंतर एनलायटनमेंट आणि औद्योगिक क्रांती या सर्व घडामोडींचे जगावर दूरगामी परिणाम झाले. या सर्वांचा उल्लेख करताना बहुतेक इतिहासकारांच्या वर्णनांमध्ये गर्व, अभिमान इ. भावनांच्या छटा आढळतात. अर्थात सर्वच इतिहासकार पूर्वग्रहदूषित नसतात पण इतिहास जेत्यांकडूनच लिहीला जातो हे पूर्वापार चालत असलेले मत जेते आणि पराभूत यांची आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती बदलली असतानाही बरेचदा खरे ठरते आहे. याचे एक उदाहरण नियाल फर्गसन यांच्या ‘सिव्हिलायझेशन : द वेस्ट ऍण्ड द रेस्ट‘ या पुस्तकामध्ये दिसते. फर्गसनच्या मते जगाची आजची प्रगत अवस्था इंग्लंड, फ्रान्स, स्पेन इ. देशांनी शतकानुशतके इतर देशांवर केलेल्या राज्यांचा परिणाम आहे. पाश्चात्य संस्कृतीने अंगिकारलेल्या विविध गुणांमुळे ती राष्ट्रे वरचढ ठरली पण आता इतर राष्ट्रांनीही ते गुण आत्मसात केले आहेत. थोडक्यात ‘साम्राज्य’ धोक्यात आहे.

प्रत्येक घटनेचे – विशेषत: ती ऐतिहासिक घटना असेल तर – अनेक पैलू असतात, तिचे चांगले आणि वाइट दोन्ही प्रकारचे परिणाम बघायला मिळतात. अशा वेळी फक्त चांगले परिणाम लक्षात घेऊन त्या घटनेचे समर्थन करणे मूर्खपणा आहे. ६५० लाख वर्षांपूर्वी डायनॉसॉर नष्ट झाले, नंतर आताचे सस्तन प्राणी उत्क्रांत होऊन बलाढ्य झाले आणि त्यातून माणूस अस्तित्वात आला. जर डायनॉसॉर नष्ट झाले नसते तर काय झाले असते? त्याचप्रमाणे युरोपियन साम्राज्यांनी जगावर राज्य केले नसते तर जगाची प्रगती थांबली असती का? कुणी सांगावे? इतिहासात जर-तरला अर्थ नसतो. याच न्यायाने अमेरिकेत मंदी आली हे एका प्रकारे बरेच झाले असे म्हणता येईल. निदान इराकच्या अजूबाजूचे देश आक्रमणापासून तरी वाचले.

पंधराव्या शतकाच्या सुरूवातीला इटलीमध्ये फ्लोरेन्स या शहरात कलाविष्कारांचा अतुलनिय संगम झाला होता. वेगवेगळ्या क्षेत्रांमधील कलाकार एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करत होते. व्यापाराच्या निमित्ताने अरब देशांशी किंवा टर्कीमधील बलाढ्य ऑटमन साम्राज्याशी असणारा संपर्कही यासाठी फायदेशीर ठरला. यातून पुढे अनेक क्षेत्रांमध्ये नवीन विचार, नवीन संकल्पना आल्या. छापखान्याच्या शोधामुळे आतापर्यंत काही लोकांपर्यंत सिमित असलेले विचार घरोघरी पोचू लागले. याच काळात मजेलन, कोलंबस, वास्को द गामा यांच्या प्रयत्नांमुळे नव्या जगाचा शोध लागला. दक्षिण अमेरिका, भारत, इंडोनेशिया येथील समृद्धीच्या बातम्या युरोपात पोचल्यावर या प्रदेशांवर वर्चस्व मिळवण्याची एकच चढाओढ सुरू झाली. नंतरच्या काही शतकांमधील इतिहास आफ्रिका, भारत आणि दक्षिण अमेरिका येथील स्थानिक रहीवासी आणि युरोपियन साम्राज्ये यांच्यातील कटू संघर्षांचा साक्षीदार आहे.

हा इतिहास वाचताना मला एक विरोधाभास प्रखरपणे जाणवत राहतो. रेनेसान्स आणि एनलायटनमेंट हा काळ माणसाला सुसंस्कृत बनवणारा म्हणून ओळखला जातो. (परत इथे माणूस म्हणजे पाश्चात्य माणूस असाच अर्थ घ्यायला हवा. अन्यथा इजिप्त, चीन, भारत अशा अनेक भागांमध्ये वेगवेगळ्या संस्कृतींची भरभराट या काळाच्या आधीपासून चालू होती.) निक्कोलो मकियवेल्ली याने लिहीलेले इल प्रिंचिपे – द प्रिंस हे आदर्श राजा कसा असावा यावरचे पुस्तक किंवा कास्तिलोयोने याने समाजात वागण्याच्या नियमांचे – एटिकेट्सचे – द कोर्टियर हे पुस्तक – ही तेव्हाच्या युरोपमध्ये बेस्टसेलर पुस्तके होती. कोणत्याही विषयावर अधिकारवणीने बोलू शकणारा, समाजात कुठे कसे वागावे याची माहिती असणारा आदर्श पुरूष म्हणून ओळखला जाणारा रेनेसान्स मॅन याच काळात जन्माला आला. थोडक्यात आधीच्या अंधारयुगात टोळीयुद्धे करणारा युरोपियन माणूस या काळात सभ्य आणि सुसंस्कृत बनायला सुरूवात झाली.

पण हाच सुसंस्कृत माणूस जेव्हा घरापासून दूर परक्या संस्कृतींमध्ये गेला तेव्हा काय झाले? त्याने आपला सर्व सुसंस्कृतपणा सोईस्करपणे बाजूला ठेवला आणि त्या भागातील स्थानिकांवर मन मानेल तसे अत्याचार केले. सोळाव्या शतकाच्या सुरूवातीला मेक्सिकोच्या स्थानिकांची लोकसंख्या २५० लाख होती. स्पॅनिश आक्रमणानंतर इ. स. सोळाशेमध्ये ही संख्या दहा लाखावर आली. यात युरोपियन लोकांनी बरोबर आणलेल्या कांजण्यासारख्या रोगांचाही समावेश होता आणि युद्ध, अविचारी नरसंहार यांचाही. या काळात येथील सोन्याचांदीच्या खाणींमधून युरोपमध्ये दरवर्षी हजारो टन सोने आणि चांदीची वाहतूक होत होती.

जगातील जास्तीत जास्त प्रदेश बळकावून आपले सामर्थ्य वाढवणे ही त्या काळातील प्राथमिक गरज होती. पण घरी सालस आणि सुसंस्कृत वागणारा युरोपियन बाहेरच्या देशांमध्ये इतका क्रूर का झाला? डिकन्ससारखे संवेदनशील लेखक आणि बर्नाड शॉ, बर्ट्रांड रसेल सारखे विचारवंत इंग्लंडमध्ये असतानाही त्यांना भारतातील ब्रिटीश राज्याची अमानुषता जाणवू नये याला काय म्हणावे? कॉनन डॉयलच्या होम्सकथांमध्ये भारतातून लुटून आणलेल्या संपत्तीचे उल्लेख बाजारातून भाजी आणावी तितक्या सहजपणे येतात! किपलिंगने तर ‘व्हाइट मॅन्स बर्डन’ मध्ये नेटिव्हांना सुसंस्कृत करण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर आहे अशी चोराची उलटी ठोकली. यातील दांभिकता लक्षात न येण्याइतकी सटल होती की सगळा ब्रिटीश समाजच अफूच्या नशेखाली निद्रिस्त होता? चर्चिलसारख्या चतुरस्त्र आणि दूरदृष्टी असणार्‍या नेत्याची भारताबद्दलची मते आणि त्याच्या अनुषंगाने त्याने केलेली कृत्ये हे बघितल्यावर ‘धिस वॉज देअर फाइनेस्ट अवर’ म्हणणारा नेता तो हाच का असा प्रश्न पडतो. ही दांभिकता आपल्या कृत्यांचे रॅशनलायझेशन म्हणावे की मानवी स्वभावातील गुंतागुत? कदाचित गांधीजींना हा विरोधाभास कुठेतरी आतून जाणवला असावा. ‘तुम्हालाच तुमच्या अमानुषतेची जाणीव होईल आणि मग तुम्ही इथून परत जाल’ ही त्यांची प्रतिक्रिया आरसा दाखवणारी होती. (भारताला स्वातंत्र्य यामुळे मिळाले किंवा कसे किंवा असा मार्ग पत्करण्याचे फायदे आणि तोटे कोणते हे निराळे विषय आहेत.)

तेव्हाचा भारतीय समाज हा ही संशोधनाचा विषय ठरावा. आपल्या पारतंत्र्यामागे स्थानिक लोकंमध्ये एकी नसणे, स्वकीयांविरूद्ध परकीयांशी हातमिळवणी अशी अनेक कारणे होती. ‘इन ऍन ऍंटीक लॅंड’ या पुस्तकात अमिताभ घोष एक वेगळा मुद्दा मांडतात. वास्को द गामाच्या जहाजातून पोर्तुगीज खलाशी जेव्हा इथे आले तेव्हा इथली सुबत्ता आणि संपत्ती पाहता येथील राजाला नजराणे देण्यासाठीही त्यांच्याकडे योग्य काही नव्हते. स्थानिक आणि पाहुणे यांच्यातील आर्थिक विषमता नंतरच्या आक्रमणाला कारणीभूत झाली हे उघडच आहे. पण स्थानिक लोक या आक्रमणासाठी तयार नव्हते याचे एक कारण हे ही आहे की याची त्यांना गरज वाटली नाही. जेव्हा एखाद्या देशावर केलेले आक्रमण आपल्यावर झालेल्या आक्रमणाइतके यशस्वी ठरते तेव्हा या घटनेची पराभूतांच्या दृष्टीकोनातून दखल घेतली जात नाही. एखाद्या श्रीमंत माणसाला चाकूच्या धाकावर लुबाडणारा दरोडेखोर या दोघांमध्ये शिक सुसंस्कृत कोण? की सुसंस्कृतपणा फक्त कट्या-चमच्यांनी खाणे किंवा लोकांसाठी दारे उघडणे अशा वरवरच्या गोष्टींपर्यंतच मर्यादिस आहे?

फर्गसनच्या पुस्तकामागची वृत्ती चिंताजनक आहे. इराकवर केलेले आक्रमण इराकच्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केले होते अशी सारवासारव याच मनोवृत्तीतून केली जाते.

पुस्तक महत्वाचे नाही पण फर्गसन सोकावतोय.