Categories
संगीत​

रहमानचा सोनाटा

रहमानचा नवीन चित्रपट आला की सगळी गाणी ऐकावी लागतात. याचं कारण असं की रहमान कोणत्याही गाण्यात पाटी टाकत नाही त्यामुळे एखादा ‘जेम’ निसटून जायला नको. दुसरं म्हणजे पहिल्यांदा गाणं ऐकताना हमखास ‘हे काय आहे?’ अशी प्रतिक्रिया असते. गाणं काही दिवस ऐकल्याशिवाय पर्याय नसतो. नंतर गाणं आवडलं तर यात आधी विचित्र काय वाटत होतं ते कळत नाही. रहमानचं ‘ऐला ऐला’ हे गाणं ऐकताना रहमानच्या बर्‍याच गमती कळल्या, शिवाय सर्वांना रहमान आवडावा अशी अपेक्षा किती चूक आहे हे ही लक्षात आलं.

पुढे जाण्याआधी काही इशारे. गाणं आहे तमिळ भाषेत आणि ते त्याच भाषेत ऐकायला हवं. याचं हिंदी डबिंग होणार आहे की नाही कल्पना नाही पण ‘रोजा’सारखे अपवाद वगळले तर रहमानच्या तमिळ गाण्यांचं हिंदी रूपांतरइतकं टुकार असतं की सांगायची सोय नाही. चाली तमिळ गाण्यावर केलेल्या, तिथे हिंदी शब्द (ते ही कैच्याकै) टाकले तर चाल आणि शब्द यांचा ताळमेळ जुळत नाही (‘टेलेफोन धून में हसने वाली’ आठवा). दुसरं असं की इथे गाण्याची आत्यंतिक चिकित्सा केली आहे. ‘इतका इचार कशापायी भौ? गाणं ऐकायचं आणि सोडून द्यायचं’ अशी विचारधारा असेल लेख न वाचलेलाच बरा. इतक्या खोलात जायची सवय जुनी आहे. लोक पिच्चर बघताना हिरो-हिरविणींच्या त्वांडाकडं बघत असतात, आम्ही क्यामेरा अ‍ॅंगल, लेन्सचा फोकस, कंटिन्यूइटी बघत असतो, चालायचंच.

‘ऐला ऐला’ हे गाणं पहिल्यांदा ऐकल्यावर काहीचं कळलं नाही. नेहमीप्रमाणे अंतरा, मुखडा कशाचाही पत्ता नव्हता. रहमानच्या गाण्यांचा अनुभव असा की काही वेळा ऐकल्यावर एखादी लकेर अचानक आठवते आणि रुतून बसते. मग ते गाणं आवडायला लागतं. ‘ऐला ऐला’ आवडलं तरीही हे काय चाललंय याचा पत्ता लागत नव्हता. अंतरा-मुखडा नाही पण मग मनात येईल तशा रॅंडम ओळी टाकल्यात का? याचं उत्तर सापडत नव्हतं. गाणं पुरतं मनात बसल्यावर अचानक कुलूप उघडावं तसा साक्षात्कार झाला आणि रहमानभाईंना मनातल्या मनात दंडवत घातला.

रहमानच्या संगीताला इंग्रजीत एक चपखल शब्द आहे – eclectic. याचा अर्थ सर्व प्रकारच्या कल्पना, स्रोत यामधून जे जे उत्तम ते निवडून घेणे. रहमानच्या संगीतात रेगे-हिपहॉपपासून ऑपेरापर्यंत सगळं काही सापडतं. बरेचदा लोक म्हणतात ‘रोजाचा रहमान आता राहिला नाही’. गोष्ट खरी आहे पण इथे अपेक्षा अशी आहे की रहमानने रोजासारखंच संगीत देत राहायला हवं होतं. हिंदी चित्रपटसृष्टीत एकदा स्वतःची स्टाइल सापडली की तिला शेवटापर्यंत न सोडणे ही लोकप्रिय परंपरा आहे आणि अनेक दिग्गजांनी ती पाळली आहे – शंकर-जयकिशन म्हणजे ऑर्केस्ट्रा, ओपी म्हणजे ठेका. रहमानकडून तीच अपेक्षा करणे हा त्याच्यातल्या कलाकारावर अन्याय आहे.

आता वह्या-पुस्तकं बाहेर काढा, थोडा इतिहासाचा धडा. चौदाव्या शतकात इटलीमध्ये रेनेसान्स आल्यानंतर युरोपमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती झाली. या प्रगतीचे ठराविक टप्पे होते. अठराव्या शतकाच्या मध्यात संगीतामध्ये ‘सोनाटा‘ या प्रकाराचा उदय झाला. सोनाटा प्रकाराची वैशिष्ट्ये अशी – सुरुवात एका सुरावटीने होते, हिला A म्हणूयात. ही संपली की वेगळी सुरावट येते, ही B. बहुतेक वेळा या संगीतामध्ये या दोन सुरावटींचा प्रवास असतो. कधी एक आनंदी स्वरांमध्ये असेल तर दुसरी दु:खी. बेथोवनच्या सुप्रसिद्ध पाचव्या सिंफनीत या दोन प्रकारच्या सुरावटी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. याचे अनेक प्रकारचे अर्थ लावता येतात. सुरुवातीला A आणि B येतात त्याला एक्स्पोझिशन म्हणतात – म्हणजे या सुरावटींची आपल्याला ओळख करून देणे. नंतरचा भाग डेव्हलपमेंट. इथे दोन सुरावटींचं स्वरूप बदलतं, त्या A′ आणि B′ होतात. शेवटच्या भागात A आणि B परत येतात, त्यांचं स्वरूप मात्र बदललेलं असू शकतं. याखेरीज ‘कोडा’ (C) नावाची एक महत्त्वाची सुरावट यात असते. डेव्हलपमेंट सुरू होण्याआधी एक्सपोझिशन जिथे संपतं तिथे हा कोडा येतो. कोडाचं वैशिष्ट्य असं की तिथे संगीत थांबतं. त्या ‘पॉझ’नंतर वेगळ्या सुरावटीचं संगीत सुरू होतं.

हे सगळं पुराण लावण्याचं कारण रहमानने ‘ऐला ऐला’ गाणं सोनाटा फॉर्मवर बेतलं आहे. नेहमीप्रमाणे गायक-गायिका सुप्रसिद्ध नाहीत. गायिका आहे कॅनडाची नताली दी लूचिओ आणि गायक आदित्य राव. (इथे आमचा फेवरिट एसपी असायला हवा होता असं वाटून गेलं.) आता हे गाणं सोनाटा फॉर्ममध्ये कसं बसतं बघूयात. एक सोयीचा भाग असा की रहमानने A, B, C तिन्ही सुरावटींसाठी गायक आणि गायिका आलटून पालटून वापरले आहेत त्यामुळे A कुठे संपते आणि B कुठे सुरू होते ते कळायला सोपं आहे.

sonata form in Rahman's song

गाणं सुरू होतं – A नतालीच्या आवाजात, मग B आदित्यच्या आवाजात आणि शेवटी कोडा C नतालीच्या आवाजात. कोडानंतर क्षणभर गाणं थांबतं. नंतर परत A नतालीच्या आवाजात आणि मग रहमानने कोरसमध्ये एक-दोन हिंदी ओळी वापरल्या आहेत. मग आदित्य येतो, पण इथे परत आधीची सुरावट B न वापरता त्यात बदल केला आहे B’. B’ ओळखायची सोपी युक्ती म्हणजे यात ‘हेय्या-होय्या’ अशा लकेरी आहेत. दोन B’ मध्ये परत नताली येते आणि शेवटी रहमानने परत गंमत केली आहे. अगदी सुरुवातीला जी B सुरावट आदित्यने म्हटली होती ती आता नताली म्हणते आणि कोडा C, जो सुरुवातीला नतालीच्या आवाजात होता तो आता आदित्यच्या आवाजात आहे. पण इथेही अगदी शेवटी कोडा संपताना परत नताली येते, आदित्य थांबतो आणि कोडा गाण्यासकट नतालीच्या आवाजात पूर्ण होतो. कोडा खास ऑपेरेटीक शैलीत वापरला आहे, यावरूनच सोनाटा शैलीविषयी क्लू मिळाला. तर असा हा रहमानचा सोनाटा.

रहमानच्या संगीताविषयी समीक्षक राजू भारतन म्हणतात, “..Rahman created his own scoring revolution…Saddening as such a development might have been to the old order, it is imperative for such a pre-set listenership to take a less snobbish peek at Rahman’s musical output and discern how his tunes have been as catchy, in their own way, as anything that C. Ramchandra or Shankar-Jaikishan fashioned in their salad days.”

—-

१. मराठी साहित्य जागतिक पातळीवर न पोचण्यात मराठी भाषेत हवं ते व्यक्त करता येणार्‍या शब्दांच्या कमतरतेचा वाटा किती? चर्चा करा.