Categories
बुद्धिबळ

गॅरी कास्पारोव्ह आणि बर्लिनची भिंत

बुद्धिबळ विश्वविजेतेपद स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू स्पर्धेआधी आणि नंतर ढीगभर मुलाखती देतात पण यामध्ये बहुतेक वेळा महत्त्वाचे तपशील उघड केले जात नाहीत. यामागे बरीच कारणे आहेत. एक तर बहुतेक वेळा मुलाखत घेणारे पत्रकार ‘आता कसं वाटतंय?’ यापलीकडे जातच नाहीत. जे थोडे बहुत जातात त्यांना उत्तरे देतानाही दोन्ही खेळाडू सावध असतात. उदा. मागची स्पर्धा जिंकल्यानंतरही कार्लसनने त्याचे सेकंड्स कोण आहेत हे जाहीर केलं नाही कारण या वर्षी त्याला परत स्पर्धा खेळायची आहे. यामुळे होतं काय की बुद्धिबळाची विश्वविजेतेपद स्पर्धा म्हणजे दोन खेळाडू खेळणार आणि त्यातला एक विजयी होणार यापलीकडे याबद्दल फारशी माहिती बाहेर येत नाही. आणि याबाबतीत हिमनग ९/१० पाण्याखाली असण्याची उपमा अगदी सार्थ आहे.

नेहमी होणाऱ्या स्पर्धा आणि विश्वविजेतेपद स्पर्धा यात अनेक महत्त्वाचे फरक आहेत. विश्वविजेतेपद स्पर्धा एकाच खेळाडूबरोबर असते त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सखोल अभ्यास करता येतो. इथे काही बाबतीत पोकर या खेळाशी साम्य जाणवतं. दोन्ही खेळाडू बुद्धिबळाच्या सर्व ‘ओपनिंग्ज’ कोळून प्यायलेले असतात. मग प्रतिस्पर्ध्याला चकित कसं करणार? प्रतिस्पर्ध्याच्या आवडत्या ओपनिंग्ज कोणत्या आहेत हे लक्षात घेतलं जातं. पण प्रतिस्पर्ध्यानं तुम्ही हे लक्षात घेणार हे लक्षात घेतलेलं असतं. त्यामुळे कदाचित तो पूर्वी कधीही न खेळलेली ओपनिंग खेळू शकतो. किंवा त्याहीपुढे जाऊन तुम्ही तो त्याच्या आवडत्या ओपनिंग्ज खेळणार नाही हे गृहीत धरणार असं गृहीत धरून त्याच्या आवडत्या ओपनिंग्ज खेळूनच तुम्हाला चकित करायचा प्रयत्न करतो. इंग्रजीत ‘कॉलिंग युअर ब्लफ’ नावाचा वाक्प्रचार आहे तो इथे चपखल बसतो. अर्थातच हे फार ढोबळ आणि प्राथमिक अंदाज आहेत. स्पर्धेची तयारी नेमकी कशी होते हे कधीही बाहेर येत नाही. खुद्द खेळाडू किंवा त्यांचे सेकंड्स यांनी याबद्दल लिहिलं तरच हे शक्य होतं आणि हे फारच क्वचित घडतं.

९० च्या दशकामध्ये बुद्धिबळ विश्वविजेतेपदाची स्पर्धा पूर्णपणे फिडेच्या नियंत्रणाखाली नव्हती. १९९३ साली कास्पारोव्ह आणि शॉर्ट यांनी फिडेशी काडीमोड घेऊन आपली वेगळी चूल मांडली. त्यावेळी कास्पारोव्ह विश्वविजेता होता. यानंतर फिडे आणि कास्पारोव्ह यांनी स्वतंत्र स्पर्धा घेतल्या त्यामुळे काही काळासाठी बुद्धिबळाच्या जगात एक सोडून दोन विश्वविजेते होते. १९९९ मध्ये कास्पारोव्हने विश्वविजेतेपद स्पर्धेसाठी आनंदशी बोलणी केली. आनंदने १९९५ सालच्या स्पर्धेचा कटू अनुभव लक्षात घेऊन ‘बक्षिसासाठी प्रायोजकांचे पैसे बॅकेत जमा झालेले दाखव’ अशी मागणी केली. नंतर ही बोलणी फिसटकली. २००० साली कास्पारोव्ह आणि क्रामनिक अशी स्पर्धा निश्चित झाली.

Book cover for From London to Elista

त्या काळात क्रामनिकचा सेकंड बारीव्ह आणि जवळचा मित्र लेव्हिटॉव्ह यांनी नंतर ‘फ्रॉम लंडन टू एलिस्ता’ हे पुस्तक लिहिलं. पुस्तकात पडद्यामागची तयारी उलगडून दाखवताना बारीव्ह आणि लेव्हिटॉव्ह यांच्या गप्पा दिलेल्या आहेत. शिवाय आवश्यक तिथे क्रामनिक, कास्पारोव्ह आणि इतरांची मतंही मांडलेली आहेत. पुस्तकात प्रत्येक डावाचं अत्यंत खोलात जाऊन विश्लेषण केलं आहे त्यामुळे बुद्धिबळात ज्यांना इतका रस नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक नाही. रस असेल तर स्पर्धेची तयारी किती खोलात जाऊन केली जाते हे बघायला मिळतं. क्रामनिक रोज डाव खेळून आल्यानंतर आज रात्री काय करायचं हे सेकंड्सना सांगत असे. उदा. १४ व्या चालीत राजा सी८ ऐवजी ई८ वर नेला तर काय होईल? सकाळी क्रामनिक उठल्यावर रात्रभर काय काम झालं बघत असे. आधी म्हटल्याप्रमाणे प्रतिस्पर्ध्याला चकित करण्यावर सगळं अवलंबून असतं. सातव्या डावात क्रमनिकच्या ४…ए६ या खेळीमुळे कास्पारोव्ह इतका चक्रावून गेला की त्याने पटकन ११ खेळ्यांतच बरोबरीचा प्रस्ताव मांडला. कास्पारोव्हशी जिंकल्यानंतर क्रामनिकचा पुढचा सामना पीटर लेकोशी झाला. पुस्तकाचा दुसरा भाग यावर आहे. तिसऱ्या भागात २००६ साली झालेल्या टोपोलॉव्हबरोबरच्या सामन्याचं वर्णन आहे.

विश्वविजेतेपद स्पर्धेची तयारी ज्या पातळीवर केली जाते त्याची कल्पना करणंही अशक्य आहे. जगातील सर्व एलीट ग्रॅडमास्टर्स या स्पर्धेकडे डोळ्यात तेल घालून बघत असतात. याचं मुख्य कारण असं की दोन्ही खेळाडू स्पर्धेसाठी जी तयारी करतात आणि त्यातून ज्या नवीन चाली उघड होतात त्यातून इतर खेळाडूंना बरंच शिकायला मिळतं. हे एक प्रकारे बुद्धिबळाच्या क्षेत्रात नवीन संशोधन प्रकाशित करण्यासारखं असतं. बरेचदा विश्वचषक स्पर्धेत वापरल्या गेलेल्या नवीन चाली नंतर काही काळ प्रामुख्याने वापरल्या जातात. स्पर्धेची तयारी चालू असताना क्रामनिकचा दिनक्रम काहीसा असा होता. सकाळी ९ ला उठायचं, १० ला नाश्ता, ११ ते १ सराव, १ ते २ समुद्रावर फिरायला जाणं, २.३० जेवण, ३ ते ४ वामकुक्षी, ४ ते ८ सराव, ८ ते ९ जेवण, ९ ते पहाटे ३ सराव.

पहिल्या डावात कास्पारोव्हकडे पांढरे मोहरे होते. त्याने १. ई४ ही त्याची आवडती खेळी केली. यातून त्याची प्रतिस्पर्ध्यावर सुरुवातीलाच वर्चस्व गाजवण्याची मनीषा स्पष्ट झाली. डावातील पुढील खेळ्या अशा होत्या. १. ई४ ई५ २. घो एफ ३ घो सी ६ ३. उं बी ५ घो एफ ६ क्रामनिकने ३…घो एफ ६ ही खेळी केल्याबरोबर कास्पारोव्हने चमकून क्रामनिककडे बघितलं, किंचित हसला आणि मान हालवली. ही खेळी रॉय लोपेझ या प्रकारातील बर्लिन बचाव या उपप्रकारात येते. बर्लिन बचाव १९ व्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला खेळला जात असे. नंतर उच्च दर्जाच्या स्पर्धांमध्ये हा जवळजवळ दिसेनासाच झाला. क्रामनिकने ही खेळी केल्यावर त्याने कसून तयारी केली आहे हे कास्पारोव्हच्या लक्षात आलं. त्या काळात बर्लिन बचाव काहीसा खालच्या दर्जाचा मानला जात असे. हा खेळल्यावर काळ्याला बचाव करायला फारसा वाव नाही असं बहुतेकांचं मत होतं. नंतर कास्पारोव्हने उघड केलं की त्याच्या टीमने पेट्रॉव्ह बचावाची तयारी केली होती, त्यांना बर्लिन बचावाची अजिबात अपेक्षा नव्हती. हा डाव बरोबरीत सुटला पण पुढच्या डावात मात्र काळ्याकडून खेळताना कास्पारोव्हने चूक केली आणि डाव गमावला. नंतर काळ्या बाजूने खेळताना क्रामनिकने बर्लिन बचावाचा पुरेपूर उपयोग केला. शेवटापर्यंत कास्पारोव्हला ही बर्लिनची भिंत भेदता आली नाही. तिसऱ्या डावानंतर कास्पारोव्ह आणि टीमच्या लक्षात आलं की बर्लिन बचाव क्रामनिकचं मुख्य अस्त्र आणि मग त्यांनी यावर तयारी सुरू केली, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. आता क्रामनिक एका गुणाने आघाडीवर होता. बाकीचे सर्व डाव बरोबरीत सुटले असते तर त्याला विजेतेपद मिळालं असतं.

पाचव्या डावाआधी क्रामनिकच्या हेरांनी बातमी आणली की आज कास्पारोव्ह टॉयलेटबद्दल खुसपट काढून तमाशा करणार आहे आणि तसंच घडलं. कास्पारोव्हने मागणी केली की क्रामनिक टॉयलेटला जाताना एक गार्ड बरोबर हवा आणि त्याने दार संपूर्ण लवता कामा नये. क्रामनिकने मागणी मान्य केली पण कास्पारोव्हलाही हे लागू होणार असेल तरच. या सर्वामुळे फारसा फरक पडला नाही. मानसिक दबाव टाकण्याचा कास्पारोव्हचा प्रयत्न फुकट गेला. दहाव्या डावात कास्पारोव्ह परत एकदा हरला. क्रामनिकची आघाडी दोन गुणांची झाली. तेराव्या डावानंतर क्रामनिक परत जात असताना पाच दारुड्यांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. क्रामनिकने जीव वाचवून पळ काढला. नंतर एका सिक्युरिटी गार्डची सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली. स्पर्धेत अनेकदा संधी मिळूनही कास्पारोव्ह तिचं विजयात रूपांतर करू शकला नाही. मागच्या वर्षी आनंदची जी अवस्था झाली होती तशी अवस्था त्याचीही होती.

या स्पर्धेनंतर बर्लिन बचावाला पुनरुज्जीवन मिळालं. मागच्या विश्वचषक स्पर्धेतही याचा वापर करण्यात आला. पांढऱ्याच्या ई ४ ला भक्कम बचाव म्हणून आज बर्लिन बचाव लोकप्रिय आहे.

Categories
इतर चित्रपट​ भाषा

संवादाचा सुवावो

बंगाली चित्रपट बघताना माझी पंचाईत होते. एखाद्या छोटुकल्याला पहिल्यांदा सर्कसला न्यावं, आणि समोर मौत का कुआ सारखे चित्तथरारक खेळ चालू असताना त्याचं सगळं लक्ष मात्र विदूषकाकडे असावं, तसं काहीस होतं. याचं कारण म्हणजे बंगाली भाषा. एखादा मस्त शब्द कानावर पडतो, सबटायटलमुळे त्याचा अर्थ लागतो आणि तो शब्द निरखण्याकडेच सगळं लक्ष जातं. पहिल्यांदा उत्तमकुमार-शर्मिलाचा ‘नायक’ बघताना असंच झालं. त्यात उत्तमकुमार एके ठिकाणी म्हणतो, “आपणा नाम शोनेछी, लेखा पोढेछी, तेयाप्रोशान आलाप केरी गेलान.” (ऐकलं तसं, चूभूद्याघ्या) ते ऐकल्यावर मला लगेच “शुंदर! ओद्भुत!” असं ओरडावसं वाटलं. जन्मभर क्लार्क केंटला सरळ भांग पाडून, ढापण्या लावून, बावळटपणा करताना पहावं आणि एखादे दिवशी त्यालाच सुपरमॅनच्या वेशात जग वाचवताना पहावं. की चोमोत्कार!

संस्कृतच्या आजोळी  ‘लप’ या धातूपासून आलाप हा शब्द झाला. तिथून तो मराठी, हिंदी आणि बंगालीत आला. पण हिंदी-मराठीमध्ये या शब्दाची कुचंबणा झाली. एखाद्या बोर्डीग शाळेत कडक शिस्तीत पोरं जशी काटेकोरपणे वागतात तसा हा बिचारा आलाप संगीताची उपासना करणारे गायक, रसिक, समीक्षक यांच्या कडक देखरेखीखाली, सकाळ संध्याकाळ रियाज करत, शिस्तीत वाढला. याउलट कोलकात्याला गेल्यावर शांतिकेतनमध्ये ऍडमिशन झाली, तिथं त्याला सांगितलं, “तुला जे आवडेल ते कर.” तिथं तो बहरला आणि “आलाप करणे” असा त्याचा पुनर्जन्म झाला. नाही म्हणायला हिंदीमध्ये “वार्तालाप करना” अशी एक व्होकेशनल स्कालरशिप मिळाली त्याला, पण आलाप करण्यात जे मार्दव आहे ते वार्तालापात नाही. जे आपल्याकडे नाही ते दुसरीकडे पाहीलं की त्याची निकड जास्त जाणवते. मला मराठीचं प्रेम नाही अशातला भाग नाही. पण बंगालीत जी गोडी आहे ती मराठीत नाही हे कबूल करण्यावाचून पर्याय नाही. आलापला उत्तर म्हणून मराठीत “मला तुमच्याशी बोलायचं आहे” अगदी रोखठोक वाटतं. किंवा “मला तुमच्याशी चर्चा करायची आहे” (नको! महाराज, माफी!) म्हणजे आता ‘अमेरिकेच्या अर्थसंकल्पाचे तिसर्‍या जगात उमटलेले पडसाद’ यावर एक तास स्वगत ऐकावं लागणार असं वाटतं. आलापला तोडीस तोड प्रतिशब्द फक्त उर्दूमध्ये आहे, गुफ्तगू करना. इथे अर्थाच्या सूक्ष्म छटांमध्ये मात्र फरक आहेत. गुफ्तगू म्हणजे थोडासा प्रायव्हेट मामला वाटतो.

आपल्याकडच्या बर्‍याच गुन्हेगारांचं तिकडे पुनर्वसन झालं. मराठीतल्या शिष्टला तिकडे म्यानर्सच्या क्लासमध्ये घातलं, त्याचा अर्थ बंगालीत सुसंस्कृत असा झाला. संस्कृतचे कितीतरी शब्द मराठीत उपरे, औपचारिक वाटतात, त्यांचा बंगालीत पूर्ण कायापालट होतो. ‘नायक’मधलाच उत्तमकुमारचा आणखी एक संवाद, “देखलेन तो, आपणार देबोतुल्य नायक?” मराठीमध्ये ‘देवतुल्य नायक’ रोजच्या संभाषणामध्ये वापण्याची कल्पनाही करवत नाही. बंगालीत ही उपजत गोडी कुठून आली? नाही म्हणायला गुजराथीही कानाला गोड आहे पण काही वेळातच एक किलो जिलबी खाल्ल्यानंतर जसा गोडपणा नकोसा वाटेल तसं गुजराथीचं होतं. याउलट बंगाली म्हणजे मधुर हापूस आंबा. ओनुमान, प्रयोजन, ब्यॅपार, शोत्यकोथा, पोरिष्कार​ – आपल्याकडे कडक इस्त्रीचा सफारी सूट, हातात फाइल आणि कपाळावर आठ्या अशा शासकीय पेहेरावात वावरणारे हे सगळे शब्द तिकडे जीन्स, टी शर्ट घालून, रे ब्यान लावून मोकळेपणाने हिंडत आहेत असं कधीकधी वाटतं.

‘संवादाचा सुवावो’ हे महेश एलकुंचवार यांनी प्राचार्य राम शेवाळकरांशी मारलेल्या गप्पांचं पुस्तक नुकतंच वाचलं. संवादाचा सुवावो – संवादाचा अनुकूल वारा – ही सुंदर शब्दरचना ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायातील आहे.

म्हणोनि संवादाचा सुवावो ढळे |

तर्‍ही हृदयाकाश सारस्वते बोळे |

आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे |

मांडला रसु ||

(संवादाचा अनुकूल वारा सुटला की, हृदयाकाश सारस्वताने भरून येते. मग श्रोत्यांचे मन थार्‍यावर नसले, तरी वितळते व त्यातून रस उत्पन्न होतो.)

आलाप करणे, गुफ्तगू करणे यांच्या तोडीचा वाक्प्रचार आज मराठीत प्रचलित नसला तरी कधीकाळी नक्कीच होता.

Categories
इतिहास​ बुके वाचिते

आर्यांच्या शोधात

नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्रजो नो व्योमपरो यत्
किमावरीवः कुहकस्यशर्मन्नंभः किमासीद्गहनं गभीरं 

ऋग्वेद, मंडल १०, सूक्त १२९

दूरदर्शन वयात येत असतानाची गोष्ट, जेव्हा मालिका या शब्दाआधी दर्जेदार हे विशेषण नि:संकोचपणे वापरता येऊ शके. त्या काळात दर रविवारी रात्री नऊ वाजता ऋग्वेदातील नासदीय सूक्ताचे हे श्लोक आणि नंतर पं. वसंत देव यांनी केलेला हिंदीतील अनुवाद कानावर पडत असे. ‘भारत एक खोज’ बघताना पहिल्यांदाच शाळेत शिकवला जातो त्यापेक्षा पूर्वीचा आपला इतिहास कसा होता याविषयी उत्सुकता निर्माण झाली. नुकतेच प्रा. मधुकर केशव ढवळीकर यांचे ‘आर्यांच्या शोधात’ हे पुस्तक वाचले आणि हा विषय किती गहन, जटील आणि तरीही रोचक आहे याची जाणीव झाली. प्रा. ढवळीकर यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग, नागपूर विद्यापीठ आणि पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये पुरातत्वशास्त्र विषयात अनेक वर्षे संशोधन केले. यातील काही काळ डेक्कन कॉलेजचे संचालक आणि उपसंचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. नुकताच त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला.

Book Cover for Aryanchya Shodhat by M K Dhavalikar

भारतात आर्यांचे आगमन कधी, कुठून झाले याबद्दल निरनिराळ्या विद्वानांनी मांडलेली मते, त्यातील त्रुटी, उपलब्ध पुरावे आणि त्यावरून आर्यांचे मूळ उत्तर हिंदू संस्कृतीत असले पाहिजे हा निघणारा निष्कर्ष या सर्वांचा उहापोह ‘आर्यांच्या शोधात’ या पुस्तकात करण्यात आला आहे. पुस्तकाच्या सुरूवातीलाच प्रा. ढवळीकर या संदर्भात लोकमान्य टिळक, हार्वड विद्यापीठाचे मायकेल विट्झेल, केंब्रिज विद्यापीठाचे कोलीन रेनफ्र्यु यांच्यासह २० विद्वानांच्या वेगवेगळ्या मतांचा आढावा घेतात. लो. टिळक वेदांमधील खगोलशास्त्रीय पुराव्यांच्या आधारावर वेदांचा काळ इ. पू. ६००० असा ठरवतात. आर्य उत्तर ध्रुवावरून आले असावेत असे त्यांचे मत आहे तर रेनफ्र्यु यांच्या मते आर्यांचे उगमस्थान तुर्कस्तानात होते. विट्झेल आर्य भारतात दोनदा आले असे मानतात. पण तलगेरींना हे अजिबात मान्य नाही. आर्य भारतातीलच आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. या मतांमधील प्रचंड वैविध्य पाहिल्यावर ‘ही मानवी इतिहासातील एक कूट समस्या आहे’ या पुस्तकाच्या पहिल्याच वाक्याची सत्यता पटते.

यासारख्या प्रचंड व्याप्तीच्या विषयावर सुलभ पुस्तक लिहीताना त्यातील पुरातत्वशास्त्र, तौलनिक भाषाशास्त्र यासारख्या शाखांमध्ये संशोधन कसे केले जाते याच्या तपशिलात जाणे अशक्यप्राय गोष्ट आहे. त्याऐवजी ओघाने येतील तसे विषय आणि ते समजण्यासाठी लागणारी पुरेशी पार्श्वभूमी यांचा समन्वय पुस्तकात साधलेला दिसून येतो. इतिहासामध्ये संशोधन करताना विविध प्रकारच्या पुराव्यांचा आधार घेतला जातो. भाषाशास्त्रीय पुरावे – विविध भाषांमधील समान शब्दांचा अभ्यास करून त्यांच्या मूळ भाषेविषयी आणि त्यावरून ती भाषा बोलणार्‍या लोकांविषयी अंदाज बांधता येतात. त्या काळच्या वाङमयाचा अभ्यास करून तेव्हाची भौगोलिक परिस्थिती, तेव्हा घडलेल्या महत्वाच्या घटना याविषयी मौलिक माहिती मिळू शकते. मायकेल विट्झेल यांच्या मते ऋग्वेदाचे सातवे मंडल म्हणजे निखळ इतिहास आहे. याखेरीज सर्वात महत्वाचे पुरावे म्हणजे उत्खनन केल्यावर मिळणारे प्राचीन संस्कृतींचे अवशेष. भारतीय इतिहासातील एक चमत्कृतीजन्य विशेष म्हणजे आर्यांच्या संस्कृतीचे वाङमयीन पुरावे भरपूर आहेत मात्र त्यांचे पुरातत्वीय अवशेष अजिबात सापडत नाहीत. याउलट सिंधू संस्कृतीचे अवशेष भरपूर आहेत पण त्याबद्दलचा लिखित पुरावा अद्याप उपलब्ध नाही कारण सिंधू लिपी अजून वाचली गेलेली नाही.

‘ऋग्वेदातील संस्कृती’ या प्रकरणात त्या काळातील आर्यांच्या राहणीमानाबद्दल रोचक माहिती दिली आहे. ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाणे आर्यांची वस्ती सप्तसिंधूच्या प्रदेशात होती. सप्तसिंधू म्हणजे पश्चिमेकडे सिंधू आणि पूर्वेकडे सरस्वती यांच्यामधला भूभाग. ऋग्वेदामध्ये सर्वाधिक वर्णन केले आहे अशी प्राचीन सरस्वती नदी म्हणजे आताची कोणती याबद्दल पुन्हा वाद आहेत. तरीही सध्याच्या भारतातील घग्गर आणि पाकीस्तानातील हाक्रा ही सरस्वती आहे असे मानायला पुरावे आहेत. ऋग्वेदकालीन आर्य शेती करत असले तरी त्यांच्या उपजीवीकेचे मुख्य साधन पशुपालन होते. दगडी हत्यारे, मौल्यवान दगडांचे तसेच सोन्याचे मणी, लाकडाची आणि मातीची भांडी यांचा वापर ते करीत असत.

आर्यांच्या वापरातील एका गोष्टीवरून विद्वानांमध्ये परत रण माजले आहे, ती गोष्ट म्हणजे घोडा. यावर सर मॉर्टिमर व्हीलर म्हणतात, “No horse, No Aryans.” ऋग्वेदामध्ये आर्यांचा सर्वात आवडता प्राणी म्हणजे घोडा, मात्र तिथे अश्व याचा अर्थ गाढव असाही होतो. सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये काही हाडे सापडली ती घोड्याची की गाढवाची यावर बरीच वर्षे खल चालू होता. यावर भारत सरकारने हंगेरीमधील ‘घोडा’ या विषयावरील जगन्मान्य तज्ज्ञ सांडोर बोकोनी यांना पाचारण केले. त्यांनी सर्व हाडे तपासून ती घोड्याची असल्याचा निर्वाळा दिला. पण हार्वर्ड विद्यापीठातील तज्ज्ञ रिचर्ड मिडो यांनी ती हाडे गाढवाची असल्याचे जाहीर केले. घोडा भारतात पहिल्यांदा इ. पू. २००० मध्ये आल्याचे विश्वसनीय पुरावे आहेत.

‘आर्यांचे पुरातत्वीय अवशेष’ या प्रकरणात उपलब्ध पुरातत्वीय पुरावे आणि त्यातून काढता येणारे निष्कर्ष दिले आहेत. भारतात लोखंडाचा वापर इ. पू. १५०० पासून सुरू झाला. ऋग्वेदामध्ये मात्र लोखंडाचा उल्लेख नाही. तिथे येणार्‍या अयस या शब्दाचा अर्थ तांबे असा होतो. हा पुरावा आणि घोड्याचा पुरावा या दोन गोष्टींवरून वेदांचा काळ इ. पू. २०००-१५०० असा निश्चित करता येतो. एकदा काल निश्चित झाला की त्यांच्या वसाहती कुठे होत्या याबद्दल अनुमान बांधता येते. सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये ज्या वसाहती समोर आल्या आहेत, त्यामध्ये पूर्व सिंधू (इ. पू. ३२५०-२६५०), नागरी सिंधू (इ. पू. २६००-२२००) आणि उत्तर सिंधू (इ. पू. २०००-१४००) या प्रमुख वसाहती आहेत. प्रा. ढवळीकर आर्यांची वस्ती म्हणजे उत्तर सिंधू संस्कृती असे समीकरण मांडतात. याच्या पुष्ट्यर्थ तेव्हाच्या नद्या, पर्यावरण यांची वर्णने तसेच घरे, शेती, स्थापत्य, अवजारे, भांडी, नाणी असे उत्खननात सापडलेले अनेक पुरावे त्यांनी दिले आहेत. ही उत्खनने सिंधू खोरे, मोहेंजोदारो, हरप्पा, कालीबंगन, भगवानपुरा इ. ठिकाणी केली आहेत. हे मत बहुतेक पाश्चात्य विद्वानांना मान्य नाही. सबळ पुरावा असूनही आर्य बाहेरूनच आले याच मताला ते चिकटून आहेत. मात्र यातही अपवाद आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठाचे सुप्रसिद्ध मानववंधशास्त्रज्ञ प्रा. केनेथ केनेडी यांनी भारतीय उपखंडात सापडलेया जवळजवळ सर्व मानवी सांगाड्यांचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या मते गेल्या पाच हजार वर्षांमध्ये भारतीय उपखंडात कोणतेही नवे लोक आले नाहीत.

उत्तर सिंधुकालीन लोक वैदिक आर्य होते असे मानले तर ते कुठून आले या प्रश्नाच्या मुळाशी जाता येते. ‘वैदिक आर्यांचे पूर्वज’ या प्रकरणात याची सखोल चर्चा केली आहे. मेहेरगढ येथील उत्खननावरून असे दिसून येते की ९००० वर्षांपासून ते सुमारे ७००० वर्षांपर्यंत तेथे एकाच प्रकारचे लोक राहत होते. इ. पू. ४५०० च्या सुमारास नव्या लोकांचे आगमन भारतीय उपखंडात झाले. इथून पुढे टोगाओ संस्कृती (इ. पू. ४५००-३८००) सुरू झाली. तेच लोक इ. पू. १७५० म्हणजे उत्तर सिंधू संस्कृतीचा र्‍हास होईपर्यंत राहत होते. या नव्या लोकांची दातांची ठेवण आधीच्या नवाश्मयुगीन लोकांपेक्षा वेगळी होती. त्यांची विशिष्ट प्रकारची दाढेची ठेवण युरोपियन आणि दक्षिण आशियातील काही लोकांमध्ये आढळते. या नवीन लोकांनी बर्‍याच नवीन गोष्टी आपल्याबरोबर आणल्या. या लोकांची भाषा इंडो-आर्यन (संस्कृतसारखी) असावी. यातील काही लोकांनी पूर्वेकडे स्थलांतर केले, त्यातून हाक्रा संस्कृती (इ. पू. ३८००-३२००) उदयास आली. त्यामधून पूर्व, नागरी आणि उत्तर सिंधू अशी वाटचाल झाली. या सांस्कृतिक विकासाचे चित्र आपल्याला आज ऋग्वेदात दिसते.

नागरी सिंधू संस्कृतीच्या काळात राजस्थानमध्ये हवामान अनुकूल होते, १८ इंच पावसामुळे सरस्वती दुथडी भरून वहात होती. परिणामत: नागरी सिंधू संस्कृती बहरली. परंतू इ. पू. २२००-२००० च्या दरम्यान झालेल्या भूकंपांमुळे पर्यावरणात बदल होऊन हवामान दुष्काळी झाले. सिंधू खोरे राहण्यास प्रतिकूल झाल्यावर आर्यांची बर्‍याच प्रमाणात स्थलांतरे झाली. याची चर्चा ‘आर्यांची स्थलांतरे’ या प्रकरणात केली आहे. इ. पू. १८००-१६०० दरम्यान आर्य इराणमध्ये गेले. तेथील नद्यांना त्यांनी आपल्याकडची नावे दिली. हरैवती-सरस्वती, हरोयु-शरोयु. सप्तसिंधूमधून इराणमध्ये जाताना ज्या क्रमाने नद्या लागतात बरोबर त्याच क्रमाने त्यांचे वर्णन अवेस्तामध्ये आहे. आर्य इराणमध्ये गेल्यानंतर त्यातील काही त्याहून पुढे म्हणजे तुर्कस्तान, इजिप्त, इथियोपिया आणि ग्रीसपर्यंत पोचल्याचे पुरावे आहेत.

आर्यांची भारतातही स्थलांतरे झाली. राजस्थानातून सिंधु संस्कृती मध्य प्रदेशात कायथा संस्कृती (इ. पू. २४५०-२०००) या नावाने पसरली. कायथा (जि. उज्जैन) येथे तिचे पहिले अवशेष सापडले म्हणून तिला कायथा संस्कृती हे नाव दिले गेले. याचा विस्तार पुढे महाराष्ट्रात माळवा संस्कृतीच्या (इ. पू. १७००-१४००) रूपाने झाला. ती इ. पू. १४०० मध्ये लयास गेली पण तत्पूर्वी तिच्यामधून निर्माण झालेली जोर्वे संस्कृती (इ. पू. १५००-९००) कोकण किनारपट्टी सोडल्यास सबंध महाराष्ट्रात पसरली होती. इनामगाव (जि. पुणे), दायमाबाद, नेवासे (जि. अहमदनगर) आणि प्रकाश (जि. नंदूरबार) ही या संस्कृतीची महत्वाची ठिकाणे होती. याखेरीज सौराष्ट्र, कच्छ तसेच पूर्वेकडे बिहारमध्ये आर्यांनी स्थलांतरे केल्याची उदाहरणे आहेत. गंगेच्या खोर्‍यातही आर्यांच्या वस्तीच्या खुणा सापडतात.

सुमारे १०,००० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या इतिहासाचे वाङमयीन उल्लेख आणि पुरातत्वीय पुरावे यांच्या आधारावर जे चित्र उभे राहते त्याचा सारांश उपसंहार या शेवटच्या प्रकरणात आहे.

आर्यांच्या उगमासारख्या कूट समस्येवर सर्व थरातील लोकांपर्यंत पोचेल असे पुस्तक लिहीणे निश्चितच कठीण काम आहे. ‘आर्यांच्या शोधात’ पुस्तकामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत, तेवढा पुस्तकाचा व्यापही नाही. मात्र या प्रश्नाबद्दल उत्सुकता निर्मांण करण्यात पुस्तक नक्कीच यशस्वी ठरते. सुरूवातीच्या प्रकरणांमध्ये काही गोष्टींची पुनरावृत्ती होते. तसेच काही ठिकाणी तारखांचा थोडा गोंधळ होतो. उदा. वर दिलेले प्रा. केनेडी यांचे मत – ‘गेल्या पाच हजार वर्षांमध्ये भारतीय उपखंडात कोणतेही नवीन लोक आले नाहीत’ – इथे इ. पू. ५००० की इ. पू. ३००० हे स्पष्ट होत नाही. या किरकोळ दुरूस्त्या पुढच्या आवृत्त्यांमध्ये करता येऊ शकतील असे वाटते. पुस्तकाच्या शेवटी दिलेली अद्ययावत संदर्भसूची या विषयात खोलात जाऊ इच्छिणाऱ्या वाचकांसाठी नक्कीच उपयोगी ठरावी.

पुस्तक वाचण्याचा अनुभव कसा असेल हे बरेचसे पुस्तक कोणत्या प्रकारचे आहे यावर अवलंबून असते. ललित साहित्य किंवा कविता यांचा आस्वाद घेताना येणारी अनुभूती वेगळी असते. खगोलशास्त्रज्ञ कार्ल सगानच्या ‘कॉसमॉस’ या पुस्तकात व्हॉयेजर अंतराळयानातून घेतलेले पृथ्वीचे चित्र दिले आहे. सूर्यमालेच्या बाहेरून घेतलेल्या या चित्रात सूर्यप्रकाशाच्या झोतात मध्यभागी एक छोटासा निळा बिंदू दिसतो, तीच पृथ्वी. याला इंग्रजीत एक चपखल वाक्प्रचार आहे, ‘लुकिंग ऍट द बिग पिक्चर.’ संस्कृती हा शब्द सामाजिक, नैतिक आणि राजकीय संदर्भांमध्ये ज्या बेधडकपणे वापरला जातो त्याचा परिणाम म्हणून संस्कृतीचा अर्थ एखादी कोणत्याही धक्क्याने सहज तुटणारी नाजूक वस्तू इतकाच होऊन बसला आहे. बहुतेक धार्मिक चालीरीतींचे व्यावसायिकीकरण झाले आहे. वेद, पुराणे यांचा उल्लेख आल्यावर त्यावर भक्तीभावाने विश्वास ठेवणारे धार्मिक किंवा त्यांना कोणतीही किंमत न देणारे विज्ञानवादी अशी दोन परस्परविरोधी टोके प्रामुख्याने दिसतात. पण यातच आपल्या इतिहासाच्या खुणा लपलेल्या आहेत याची जाणीव क्वचितच दिसते. ‘आर्यांच्या शोधात’ सारखे आपल्या पूर्वजांचा मागोवा घेणारे पुस्तक वाचल्यावर समाज आणि संस्कृती यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. आपण कळत आणि नकळत ‘मोठ्या चित्राचा’ विचार करायला लागतो. संस्कृतीच्या नावाखाली आपण आज ज्या चालीरीती क्षणाचाही विचार न करता वापरतो, त्यांचा उगम आणि प्रसार कुठे, कधी, कसा झाला हे जाणून घेणे हा एक रोमांचकारी अनुभव ठरतो.

Categories
इतर

मर्मबंधातली ठेव ही

चौदाव्या शतकात इटलीमधल्या फ्लोरेन्स शहरात काही टाळकी एकत्र जमली आणि त्यांनी विचारांचं आदानप्रदान करायला सुरुवात केली. याची परिणिती नंतर रेनेसान्समध्ये झाली. प्रत्येक क्षेत्रामध्ये डोळे दिपवणारी प्रगती झाली आणि यात बरेच टप्पे होते. त्या काळच्या संगीतावर चर्चची घट्ट पकड होती. या काळच्या आधीचं संगीत पाहिलं तर त्यात कुठेही ठेका नसतो कारण संगीतात ठेका आला की त्यावर नाचावंसं वाटतं, नाचलं की कंबर हालणार आणि हे चर्चला मान्य नव्हतं. संगीताचा वापर केवळ देवाच्या आराधनेसाठी केला जावा असं चर्चचं ठाम मत होतं. रेनेसान्सनंतर सोळाव्या ते अठराव्या शतकात बरोक काळ आला. (हे काळ आला वगैरे आपण जे आता म्हणतो ते पश्चातबुद्धीने. त्या काळी कुणीतरी बटण दाबलं आणि नवीन काळ सुरू झाला असं झालं नाही. किंबहुना आपण कोणत्या काळात आहोत हे ही त्या लोकांना माहीत नव्हतं.) कलेचा धर्मासाठी केलेला वापर या काळात उत्कर्षाला पोचला. बाखसारख्या संगीतकारांनी भरीव कामगिरी केली. नंतर अठरावं शतक संपत असताना चर्चची पकड सुटू लागली. याला सर्वात प्रबळ कारण गुटेनबर्गने लावलेला छपाई यंत्राचा शोध. यामुळे ज्ञान एका गटाची मक्तेदारी न राहता सामान्य लोकांपर्यंत पोचायला मदत झाली. दुसरं कारण म्हणजे सोळाव्या शतकात मार्टीन लूथरने प्रोटेस्टंट पंथ स्थापन करून कॅथॉलिक पंथाला आव्हान दिलं होतं. कला चर्चच्या पगड्यातून सुटली आणि कलाकाराच्या व्यक्तिगत अभिव्यक्तीला प्राधान्य आलं. रोमँटिक काळात मोत्झार्ट, बेथोवन, हायडेन यासारख्या संगीतकारांनी आपलं कसब दाखवलं. (इथे बेथोवन साहेबांना नेमक्या कोणत्या काळात टाकायचं याबद्दल मतभेद आहेत कारण कोणतेही नियम न पाळता त्याला हवं तसं संगीत त्याने दिलं.) पुढे रोमँटिकची सद्दी ओसरली, एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी पॅरिसमध्ये परत एक क्रांती आली. रूढीला झुगारून देत कलाकारांनी बंडखोरी केली. आधुनिक काळाची ही सुरुवात मानली जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर यातही बरेच फाटे फुटले. आज युरोपात जी कला दिसते तिचा इतिहास असा प्रदीर्घ आहे.

हा परिच्छेद लिहिताना खरं तर लाज वाटते आहे. मानवी इतिहासातील एका सुवर्णकालाला एका प्यारेग्राफमध्ये कोंबायचं याहून दुसरं पाप नसावं. रेनेसान्सला दोन बाजू आहेत. एक सोनेरी, दुसरी काळी. काळ्या बाजूमध्ये हे देश आशिया, अमेरिका आणि आफ्रिका खंडात अमानुष अत्याचार करत होते, तिथून मरेस्तोवर खजिने लुटून आणत होते – हे सुवर्णकालाचं इंधन. या ब्लॉगवर बहुतेक वेळा काळ्या बाजूवर टीका असते पण याचा अर्थ सोनेरी बाजूचं महत्त्व कमी लेखायचा अजिबात नाही. संगीत, स्थापत्यशास्त्र, साहित्य, वेशभूषा अशा अनेक क्षेत्रांमध्ये या काळात जी प्रगती झाली ती डोळे दिपवणारी आहे. आणि म्हणूनच दुसरीकडे कुठे प्रगतीचे काही धुमारे फुटले आणि त्याला रेनेसान्स म्हटलं की कीव येते – अमेरिकन रेनेसान्स किंवा बंगाल रेनेसान्स. गणेशमंडळाची डेकोरेशन आणि बेजिंग ऑलिंपिक सोहळा यांची तुलना केली तर कसं वाटेल तसं काहीसं. कदाचित चंद्रगुप्त मौर्याच्या काळात विविध क्षेत्रात जी भरभराट झाली तिच्याशी तुलना होऊ शकेल पण याचा अभ्यास नसल्याने काही बोलता येत नाही.

नमनालाच हे सुमारे दोन क्विंटल तेल बदाबदा ओतण्याचं कारण विश्राम गुप्ते यांचा लेख. यात गुप्ते म्हणतात, “संतवाङ्मयातून उत्क्रांत होणार्‍या मराठी साहित्याने गेल्या सातशे वर्षांत जो प्रवास केला त्यात क्लासिसिझम, रोमँटिसिझम, मॉडर्निझम आणि पोस्टमॉडर्निझम हे चार प्रमुख टप्पे बघितले.” पहिला प्रश्न, युरोपमध्ये ज्या प्रकारे प्रगती झाली अगदी तश्शीच प्रगती इथे झाली हे सिद्ध करण्याचा अट्टहास का? युरोपमध्ये ही जी अनेक स्थित्यंतरे आली त्याचा परिणाम प्रत्येक क्षेत्रात झाला. रोमच्या प्रत्येक कोपऱ्यावर गतकाळाच्या खुणा दिसतात. आपल्याकडे विविध क्षेत्रांमध्ये असं काहीही झालं नाही. तुकोबांच्या काळात जे धोतर-मुंडासं बांधणं चालू होतं तेच आजही आहे. युरोपियन संगीत चर्चच्या पगड्याखाली होतं, भारतीय संगीताला अशी कोणतीही बंधने नव्हती. एकाच वेळी गणिका गावू शकत होत्या आणि भजनातून देवाची आराधनाही चालू होती. नृत्याला आपल्याकडे अजिबात बंदी नव्हती. ताल-सुरांनी सजलेलं संगीत प्राचीन काळापासून लोकप्रिय होतं. संतवाङ्मय या भक्तिमार्गाने जाणाऱ्या आविष्काराला कुठे बसवणार? दोन्हीकडे देवाची आराधना असली म्हणजे दोन्ही एकच झाले का? देवाच्या आराधनेसाठी साहित्यरचना अनेक ठिकाणी दिसते. हा एकमेव घटक प्रमाण मानून मीराबाई, कबीर या सर्वांना बरोकमध्ये टाकायचं का? की जसे पदार्थविज्ञानाचे नियम सगळीकडे लागू होतात तसेच कलेच्या प्रगतीचेही मूलभूत नियम आहेत? ज्ञानेश्वरी किंवा तुकारामगाथा हे केवळ देवाची आराधना करण्यासाठी रचलेले ग्रंथ नव्हेत. त्यात सखोल असं तत्त्वज्ञान आहे. असं नसतं तर यावर शेकडो पीएचड्या व्हायचं कारण नव्हतं. नंतरच्या काळात साहित्यात स्थित्यंतरं आली हे खरं – नेमाडे, श्याम मनोहर इ. – त्यामुळे मॉडर्निझम आणि पोस्टमॉडर्निझमचा मुद्दा ठीक आहे. पण या संज्ञा अनेक क्षेत्रांमध्ये वापरल्या जातात. काही लोक मॅग्नुस कार्लसनच्या खेळाला ‘पोस्टमॉडर्निस्ट चेस’ म्हणत आहेत. अशी लेबलं लावणं कितपत योग्य आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्यातून नेमका काय फायदा होतो यावर मतभेद असू शकतील. इथे श्रीराम लागूंचं लमाणमधलं वाक्य आठवलं, “मराठी नाटक पुरते ‘आधुनिक’ व्हायच्या आत एकदम आधुनिकोत्तर कसे झाले?”

सध्या लोकप्रिय असलेला एक विषय म्हणजे मराठी माणसाचं भूतकाळाबद्दलचं प्रेम. दिवाळी अंकांत यावर सडकून (सडेतोड वगैरे) टीका करणे हा लोकप्रिय छंद आहे. भूतकाळात रमण्यावर जितके लेख असतील कदाचित तितकेच टीका करणारेही असावेत. बहुतेक वेळा टीकेमध्ये सत्याचा अंश असतो तसाच इथेही आहे. ऐतिहासिक कादंबऱ्या लोकप्रिय आहेत, लोक बालगंधर्वांपासून ते सैगलपर्यंत आठवणी काढतात आणि त्यामुळे सध्याच्या संगीताकडे दुर्लक्ष करतात वगैरे अनेक मुद्दे आहेत. पण खरंच भूतकाळात रमणे ही केवळ मराठी माणसाची मक्तेदारी आहे का? सध्या सगळीकडे गाजत असलेला ग्रंथ मार्सेल प्रूस्तचा ‘इन सर्च ऑफ लॉस्ट टाइम’. न वाचलेल्या पुस्तकाबद्दल भरभरून बोलण्याची कला अवगत नसल्याने यावर अधिक बोलणे शक्य नाही पण याबद्दल जे वाचलं आहे त्यावरून हा ग्रंथराज पूर्णपणे नॉस्टाल्जियाला वाहिलेला आहे असं मानायला जागा आहे. गुप्ते इतिहासात रमलेल्या मराठी माणसावर टीका करतात. उत्तरआधुनिक साहित्याची कास धरायची असेल तर भूतकाळाचा त्याग करा असा सल्ला ते देतात.

हे वाचलं आणि इतकी मज्जा वाटली म्हणून सांगू. म्हंजे किनई जम्माडी जंमतच बरं का! इथे लहान तोंडी मोठा बाईट घेऊन गुप्तेकाकांना ओरहान पामुक या लेखकाचं नाव सुचवावंसं वाटतं. पामुक उत्तरआधुनिक साहित्याचा एक खंदा पुरस्कर्ता. पण त्याचं साहित्य पाहिलं तर काय दिसतं? तुर्कस्थानामध्ये एके काळी जे वैभव होतं, इस्तंबूल एके काळी ज्या दिमाखात होतं ते सर्व गेल्याची हळहळ ही पामुकच्या साहित्याचा आधारस्तंभ आहे. तुर्कस्थानाचे चित्रकार इंप्रेशनिझ्म आणि क्युबिस्ट मूव्हमेंटच्या आहारी गेल्यामुळे आपली परंपरागत मिनिएचर पेंटींगची कला लयाला गेली ही त्याची ठसठसणारी वेदना आहे. त्याच्या इस्तंबूल पुस्तकात लहानपणच्या आठवणी, त्या काळचं शहर, तिथले चौक, रस्ते, सिनेमा थेटर, हाटेलं या सर्वांच भावुकपणे केलेलं वर्णन आहे. तुर्की भाषेत एक शब्द आहे – Hüzün – याचा अर्थ समजावून सांगणं अवघड आहे. पामुकच्याच शब्दामध्ये “We might call this confused, hazy state melancholy, or perhaps we should call it by its Turkish name, hüzün, which denotes a melancholy that is communal, rather than private.” पामुकच्या मते सर्व इस्तंबूल शहरावर एखादी धुक्याची चादर पसरावी तशी या Hüzün ची छाया आहे. पामुकने हे जे वर्णन केलं आहे ते केवळ लाजबाब आहे.

इथे कदाचित असं म्हणू शकता की एखादा अपवाद असणारच. म्हणून खास गुप्तेकाकांसाठी – पेश-ए-खिदमत है एक्झिबिट नंबर टू. हारुकी मुराकामी. हा सुद्धा उत्तरआधुनिक साहित्याचा सलामीचा फलंदाज. (पामुक-मुराकामी ओपनिंगला म्हणजे सॉलिड स्कोर होणार बघा!च्यामारी या पारंपरिक, बूर्झ्वा टीमला फॉलोऑन नाय दिला तर नाव सांगणार नाही.) याच्या कादंबऱ्यांमध्ये काय दिसतं? सत्तरचं दशक, मध्यम वयाचा नायक, बारमध्ये जाऊन बियर पिता-पिता बीटल्स, जॅझ ऐकणारा, ग्रामोफोन रेकॉर्ड गोळा करणारा, त्या काळातील पुस्तकं वाचणारा. मुराकामीसाठी सत्तरचं दशक एका प्रकारे ‘मर्मबंधातली ठेव’ आहे. परत परत वेगवेगळ्या कथानकांमध्ये तो या आत्मचरित्र म्हणावं अशा नायकाला ठेवतो आणि त्या काळातील स्पंदनं अनुभवतो. पामुकप्रमाणेच या अभिव्यक्तीची जी पातळी आहे ती मंत्रमुग्ध करणारी आहे. लेबल सोडा हो, एकदा अनुभव घेऊन पहा.

इथे प्रश्न पडतो की हे खंदे लोक जर भूतकाळात रमू शकतात तर बिचाऱ्या मराठी माणसानेच काय घोडं मारलं आहे? मुद्दा वेगळा आहे. भूतकाळात रमणे हा गुन्हा नाही, पण रमल्यानंतर तुम्ही त्या अभिव्यक्तीला कोणत्या प्रकारे प्रगट करता हे महत्त्वाचं आहे. उदा. मला मराठी भावगीतांचं फारसं प्रेम नाही. आता एखादा लेखक जर भावगीतांच्या आठवणी काढून लिहायला लागला तर मला त्याचा कंटाळा येतो. पण इथे त्या लेखकाची नॉस्टाल्जियाची भावना पामुक किंवा मुराकामीइतकीच सच्ची आहे, फक्त तिला व्यक्त करण्याच्या पद्धतीमुळे तिच्यावर बंधने येत आहेत. म्हणजे दोष नॉस्टाल्जियाचा नाही, मराठी लेखकांचा आवाका लहान आहे त्याचा आहे. असं व्हायचं कारण काय असावं? एक शक्यता आहे अनुभवविश्वाच्या मर्यादा. परदेशात पिढ्यानपिढ्या राहणारी बहुतेक मंडळी काय करतात? गेल्याबरोबर तिथे मराठी लोकांना शोधतात आणि मग त्याच गप्पा, तीच गाणी, त्याच चर्चा. असे लोक पुणे-३० मध्ये राहीले काय किंवा अंटार्क्टिकावर, फारसा फरक पडत नाही. मराठी माणूस खाण्यापिण्याच्या बाबतीत जे धाडस दाखवतो ते तो इतर कलांच्या बाबतीत का दाखवत नाही हा रोचक प्रश्न आहे. पिझ्झ्यापासून तिरामिसूपर्यंत सगळं खाल्ल्यावरही घरी जाताना प्लेलिस्ट बाबूजी आणि लतादीदींच्या पुढे जात नाही. इथे अर्थातच अपवाद आहेत पण ते तुलनेने बरेच कमी. किती लोक जॅझ, ऑपेरा, हिपहॉप, काबुकी यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतात?(आणि याहून महत्त्वाचं म्हणजे अनुभव घेतल्यावर त्याबद्दल मराठीत लिहितात. नोंदी ठेवण्याचा कंटाळा असणारं गुणसूत्र नुकतंच मराठी माणसात सापडलं आहे म्हणे.) तिकडे मराठी संस्कृती जपण्यापेक्षा मराठी माणसाने त्या देशातील संस्कृतीचा समरसून अनुभव घेतला तर मराठीला त्याचा फायदा अधिक आहे. महागुरूंचे कार्यक्रम इथे झाले काय आणि तिथे झाले काय, मराठीला त्यामुळे काहीही फरक पडत नाही. आणि आता हे सगळं करण्यासाठी तर परदेशात असायचीही गरज नाही, सगळं घरच्या घरी उपलब्ध आहे. परदेशात संस्कृती जपणे वगैरे प्रकाराला फारसा अर्थ नसतो. पुढच्या पिढीला आजूबाजूची संस्कृती आत्मसात करायला उत्तेजन देणे अधिक योग्य. अल पचिनोचे आईवडील इटालियन पण ते इटालियन संस्कृती जपण्याच्या फंदात पडले नाहीत, पचिनोला इटालियन बोलताही येत नाही. पण ब्रॉक्सची संस्कृती आत्मसात केल्यामुळे त्याचं अनुभवविश्व किती समृद्ध झालं. आणि इटलीमध्ये इटालियन संस्कृतीही जोरात आहे, तिलाही धाड भरलेली नाही.

गुप्तेकाकांचा शेवटचा मुद्दा. इतिहास विसरून जा, वर्तमानकाळात जगा. प्राचीन संस्कृतीशी आपली नाळ तुटलेली आहे, दोन दशकांच्या पलीकडे बघायचं कारण नाही. खरंच? फक्त दोन दशकं म्हणजे १९९०. आयला? गॉडफादर बघणं सोडून द्यायचं? (बादवे, हा वीस वर्षांचा म्याजिक नंबर कुठे मिळाला?) पण त्याआधीचं आवडत असेल तर काय करायचं? आणि आवडतं ह्याला कित्येक पुरावे आहेत. आजही ब्रॉडवेवर शेक्सपियरची नाटकं हाऊसफुल का होतात? होम्सवर आजही चित्रपट, मालिका का निघतात? पियानोचा शोध लागल्यावर बाखने जे हार्प्सिकॉर्ड वापरलं त्याची सद्दी संपली पण आजही बाखचं संगीत टिकून आहे, ते का? लोक आजही हट्टाने हार्प्सिकॉर्ड शिकतात आणि बाख वाजवतात. गुप्तेकाका लेखकाच्या बहुसंपर्काबद्दल बोलतात पण मुराकामी मुलाखती न देण्याबद्दल प्रसिद्ध आहे. कोणताही सोशल मीडिया न वापरता तो एकांतात लेखन करत असतो आणि तरीही त्याची पुस्तकं हातोहात खपतात. बहुसंख्य लोकप्रिय लेखक याच प्रकारात मोडतात.

आजवरच्या इतिहासाने जर काही शिकवलं असेल तर ते हे की कोणतीही विचारसरणी परिपूर्ण नसते. त्यामुळे गुप्तेकाका जेव्हा सर्व रोगांवर रामबाण औषध म्हणून एका ‘इझम’चा पुरस्कार करतात तेव्हा ते पटणे कठीण जाते.