• एलेमेंटरी, माय डिअर..

    सहारा वाळवंटातल्या एका लहानशा खेड्यात आपलं आयुष्य काढलेला एक माणूस पहिल्यांदा शहरात मुलाकडे गेला. त्याचा पोरगा उत्साहाने त्याला मोठ्या पडद्यावर “टायटॅनिक” दाखवायला घेऊन गेला.
    चित्रपट संपल्यावर त्याने आतुरतेनं बापाला विचारलं,
    “काय, आवडला का?”
    “हो तर,” बाप म्हणाला, “इतकं मुबलक पाणी असल्यावर कुणाला नाही आवडणार?”

    हे आठवायचं कारण शेरलॉक होम्सच्या कथा बघताना आणि वाचताना लोक त्याच्या प्रखर बुद्धीमतेमुळे, अजोड तर्कामुळे प्रभावित होतात, मात्र आमचं लक्ष भलतीकडेच असतं.

    जेव्हा बघावं तेव्हा होम्स त्या बिचार्‍या मिसेस हडसनना दुस्वासाने वागवत असतो. कल्पना करा, त्यांच्या जागी एखादी भारतीय मोलकरीण असती तर?

    होम्स : वॉटसन, आता एक क्षणही दवडून चालणार नाही. तो लंडनचा नकाशा या टेबलावर पसर. गंगूबाई, गंगूबाई, किती पसारा झाला आहे या टेबलावर?
    गंगूबाई : पसारा झालाय तर मी काय करू? द्येवानं दोनच हात दिलत की मला. सकाळधरनं उभी हाय मी, कंबरेचा काटा ढिला झालाय निस्ता. सुनामी आल्यागत घरात पसारा करून ठेवायचा आन मग गंगूबाईला आवरायला सांगायचा. आन ह्या आठवड्यात बोनस देनार हुते त्याचं काय झालं? उद्यापर्यंत बोनसचं बघा नायतर मोरियार्टीकडं खुल्ली ऑफर हाय मला! नंतर म्हनू नगा, न सांगता गेली म्हनून. जाते आता, पोरगं यायचय शाळेतून. किचनमधी कपबश्या पडल्यात, त्या धुऊन ठेवा, उद्यापर्यंत र्‍हायल्या तर मुंग्या लागतील.

    होम्स कपाळ बडवून घेतो.

    या कथांमधील दुसरे आश्चर्यजनक पात्र म्हणजे टांगेवाले. कधीही, कुठेही जायला एका पायावर तयार असतात. बरं, भाड्याविषयी चकार शब्द काढत नाहीत. जे दिलं ते निमूटपणे घेतात, थांबावं लागलं तर वेटींग चार्जही लावत नाहीत. त्या जागी पुण्याचा टांगेवाला असता तर?

    होम्स : (वॉटसनबरोबर धावत येत) मित्रा, चल लवकर. रेल्वे स्टेशन.
    टांगेवाला : होम्स आणि वॉटसनला बाजूला व्हा अशी खूण करतो. ते लगबगीने बाजूला होतात तसा तो दोन बोटांनी ओठांसमोर ‘व्ही’ चा आकार करून दोघांच्या मधून पानाची पिंक टाकतो आणि जिभेने ‘चक्क’ असा आवाज करतो.
    होम्स : म्हणजे?
    टांगेवाला : जमनार नाय.
    वॉटसन : जमणार नाही? अरे बाबा, हा कुणाच्या तरी जगण्या-मरण्याचा प्रश्न आहे.
    टांगेवाला : रेलवे ठेसन म्हंजी मला उलट पडतय, तिकडून सवारी भेटत नाय. मधे अंधार हाय, घोडं बिचकतं.. हाफ रिटन पडेल बघा..
    वॉटसन : हे बघा, तुम्ही कायद्याने असे करू शकत नाही.
    टांगेवाला : ओ सायेब, बिधास कंप्लेंट करा ना. आपन कुनाला डरत नाय. आन यवढ्या रातचं ठेसनला जाताच कशापायी तुम्ही, सकाळी जावा की आरामशीर.

    होम्स परत कपाळ बडवून घेतो.

    होम्सच्या अजरामर कथांमधील एक म्हणजे ‘ऍबी ग्रेंजचे प्रकरण’. हा प्रसंग पुस्तकात नाहीये मात्र मालिकेत आहे. यात होम्स आणि वॉटसन रेलवे स्टेशनच्या बाकावर बसलेले असतात.
    होम्स म्हणतो “आपली गाडी आली.”
    वॉटसन म्हणतो, “मला तर गाडीचा आवाज नाही आला.”
    मग होम्स म्हणतो, “मलाही नाही आला.” पण त्याला गाडीचा धूर दिसला, हातात हिरवे निशाण घेतलेला गार्ड दिसला, त्यावरून त्याने अनुमान काढलं, वगैरे वगैरे, नेहेमीची शायनिंग.

    जर इथे आपली भारतीय रेलवे असती तर?

    “आपली गाडी आली.” होम्स.
    “होम्स, गाडी येते आहे हे खरे आहे. पण ती कालची गाडी आहे. २४ तास लेट.” इति वॉटसन.
    घोषणा : सभी यात्रियों से निवेदन है की होशियारपुरसे दिल्ली जानेवाली आकांक्षा एक्सप्रेस २४ घंटे देरी से प्लॅटफॉर्म क्रमांक २ पर आ रही है. यात्रियों की असुविधा के लिये खेद है.

    होम्सच्या कपाळावर पिटुकले टेंगूळ आले आहे.

    होम्सचा भारतीय कर्मचार्‍यांशी संबंध आला नाही हे बरेच म्हणायचे. त्याहीपेक्षा एकाही हिंदी चित्रपट निर्मात्याला होम्सवर चित्रपट काढावासा वाटला नाही याचा अर्थ देव जागा आहे असे म्हणायला जागा आहे.
    होम्सचे हिंदी चित्रपटात काय कडबोळे झाले असते कुणास ठाउक. मध्यंतरापर्यंत तर वॉटसन-मिसेस हडसनचे विनोद वगैरे. गुंडाच्या भूमिकेत रंजीतच्या यक्ष्ट्रा करिकुलर ऍक्टिव्हीटीज. होम्स सज्जनांचा तारणहार आणि दुर्जनांचा कर्दनकाळ आहे अशा अर्थाचे एक गाणे.  इंटरव्हलनंतर काली घाटीमधल्या रंजीतच्या अड्ड्याचा होम्सला पत्ता लागणार. मग होम्स गुंडाला पकडणार इतक्यात गुंडीणीच्या भूमिकेत बिंदू तिरछी नजरोंसे होम्सला घायाळ करण्याचा प्रयत्न करत गाणं म्हणणार. त्याच वेळी मिसेस हडसन येशूच्या मूर्तिसमोर प्रार्थना करीत आणखी एक गाणे म्हणणार. शेवटी गुंड ताब्यात आल्यावर ‘कानून के हाथ बहोत लंबे होते हय’ – इति लस्ट्रेडच्या भूमिकेतील अंजन श्रीवास्तव.

    अर्थात होम्सवर मराठी किंवा हिंदी मालिका निघाली तर हे सर्व ऑस्करपात्र वाटायला लागेल. मालिकेचे २५-३० भाग तर मिसेस हडसन घराची सफाई करताना दाखवण्यातच निघून जातील. मग वॉटसनच्या क्लिनिकमध्ये १०-१५ एपिसोड, त्यातल्या एखाद्या पेशंटचा आजार, त्याच्या घरातल्या अडचणी, पेशंटच्या सासूला निमोनिया होतो, त्याचा घटस्फोट आणि प्रेमप्रकरण(हे फारच इंटरेष्टींग व्हायला लागलं तर सगळी मालिका इथेच), त्याच्या ऑफिसमधील क्लार्कच्या वडीलांच्या मित्राचा धाकटा मुलगा शिकारीला गेलेला असताना जखमी होतो, हे सगळं होईपर्यंत दीडशे-एक भाग सहज निघून जातील. (काळजी करू नका, जोपर्यंत पडद्यावर हालचाल होते आहे तोपर्यंत प्रेक्षक नेटानं बघत राहतात. जातील कुठं?) मग अखेर (नाइलाजास्तव) होम्सचं आगमन. वीस-पंचवीस भाग होम्सची दिनचर्या, तो आणि वॉटसन गप्पा मारणार, चहा पिणार, गप्पा मारणार, सिगरेट पिणार, गप्पा मारणार, जेवणार, गप्पा मारणार, मिसेस हडसनशी किरकोळ कारणावरून खटके उडणार, गप्पा मारणार, खिडकीतून बघणार, गप्पा मारणार.

    असे २०० भाग झाले की एक दिवशी एक क्लायंट येणार. (इतके एक्साइट होऊ नका, अजून क्लायंट यायला २०-३० भाग बाकी आहेत. कुठं काश्मीर-सिंगापूर-हवाई-अंटार्क्टिका ट्रिप वगैरे करायची असेल तर खुशाल करून या.)

    मग संवाद पुढीलप्रमाणे.

    होम्स : मित्रा..
    वॉटसन : बोल ..
    होम्स : एक बातमी आहे. (ढ्याण-ढ्याण-ढ्याण)
    क्यामेरा होम्स वर तीनदा, वॉटसनवर तीनदा.
    वॉटसन : बातमी? बातमी? बातमी? (मूळ बातमीचे दोन एको)
    होम्सचा तीव्र कटाक्ष. वॉटसनाचा प्रत्युत्तर म्हणून आणखी तीव्र कटाक्ष.
    होम्स : हो..
    वॉटसन : बोल..
    होम्स : माझ्या ..
    वॉटसन : तुझ्या?
    होम्स : माझ्या.. माझ्या..
    वॉटसन : तुझ्या.. तुझ्या काय मित्रा?
    होम्स त्याच्या हात उंच करून हातातील बाटली दाखवतो. क्यामेरा स्लोमोशनमध्ये बाटलीला तीन प्रदक्षिणा घालतो.
    होम्स : माझ्या.. माझ्या.. माझ्या बाटलीतील शाई संपली आहे.
    होम्सचा तीव्र कटाक्ष. वॉटसनाचा प्रत्युत्तर म्हणून आणखी एक जळजळीत कटाक्ष.
    (ढ्याण-ढ्याण-ढ्याण)
    क्यामेरा होम्स वर तीनदा, वॉटसनवर तीनदा.
    चित्र फ्रीझ होते.

    होम्ससहीत इतर सर्व अभिजात कलाकृतींकडे आपल्या मालिका निर्मात्यांचे लक्ष जाऊ नये हीच प्रार्थना.
    इत्यलम.

    तळटीपा :

    [१] पुणे-मुंबई परिसरातील होम्सचे पंखे आणि पंखिण्या यांची संख्या लक्षात घेता लेख वाचल्यानंतर लेखकाच्या घरावर मोर्चा – बहुतांशी लाटणे मोर्चा – येण्याची दाट शक्यता आहे. स्वसंरक्षणार्थ लेखक हे स्पष्ट करू इच्छितो की होम्स त्याचाही अत्यंत आवडता आहे. लेखातील विनोद हे आपण घरातील एखाद्या आवडत्या माणसाची थट्टा करतो त्या पद्धतीने घ्यावेत आणि लाटणी परत फडताळात ठेवावीत.

    [२]मिसेस हडसनसारखी मोलकरीण भारतात सापडली तर तिला पद्मश्री द्यायला काहीच हरकत नाही.

    [३] इथे मिसेस हडसन नऊवारीत कशा दिसतील असा विचार मनात आला.

    [४] सध्याच्या काळातील भारतीय रेलवे बरीच सुधारली आहे. पूर्वी रेलवे प्रवासाला जाताना घड्याळाऐवजी क्यालेंडर घेऊन जावे असे म्हणत असत.


  • प्रतिभेच्या आविष्काराचे वेगळे रूप

    मेंदू नक्की काय चीज आहे ते मेंदूलाच अजून माहीत नाही. संगणकाच्या भाषेत हा प्रश्न म्हणजे ‘एखाद्या भाषेत लिहीलेला कंपायलर पहिल्यांदा कसा कंपाईल करणार?’ यासारखा आहे. अर्थात इथे  ‘बूटस्ट्रॅपिंग‘ हे उत्तर आहे पण मेंदूच्या बाबतीत मात्र अजून तरी ठाम उत्तर नाही. तरीही उत्तराच्या दिशेने प्रवास चालू आहे हे निश्चित. मेंदूची तुलना नेहेमी संगणकाबरोबर केली जाते पण मेंदू बर्‍याच बाबतीत वरचढ आहे. मेंदू आणि संगणकात अनेक फरक आहेत त्यातील एक महत्वाचा फरक म्हणजे मेंदू प्रतिभावंत आहे. या प्रतिभेचं प्रकटीकरण मेंदूमध्ये कसं होतं हा प्रश्न रोचक आहे. गेल्या काही वर्षात एमआरआय किंवा कॅटस्कॅन सारख्या सुविधा उपलब्ध झाल्याने मेंदूची चिरफाड न करता आत काय होतं आहे हे बघणे शक्य झालं आहे.

    Book cover of Creating Brainया संदर्भात नॅन्सी आंद्रेआसन यांचं ‘क्रिएटींग ब्रेन’ (Creating Braib) हे पुस्तक वाचनात आलं.  आंद्रेआसन बाईंची कारकीर्द अचंबित करायला लावणारी आहे. त्यांनी इंग्रजी साहित्यामध्ये पीएचडी केलं आणि तीन वर्ष कॉलेजात रेनेसान्स साहित्य शिकवलं. नंतर वैद्यकीय शाखेत प्रवेश घेऊन मानसशास्त्रामध्ये डॉक्टरची पदवी घेतली. विविध मानसिक आजारांच्या संशोधनामध्ये नवीन इमेंजिंग पद्धतींचा वापर करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. यासाठी इ. स. २००० मध्ये राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्या हस्ते ‘नॅशनल मेडल ऑफ सायन्स’ या पारितोषिकाने त्यांचा गौरव करण्यात आला. या पुस्तकात मात्र त्या एका वेगळ्या विषयाबद्दल बोलतात. साहित्याचा अभ्यास करताना त्यातील प्रतिभेचे आविष्कार पाहून त्या अवाक होत असत. नंतर मेंदूचे संशोधन करताना ही प्रतिभा मेंदून कुठे असते, तिला कशी वाट मिळते असे प्रश्न त्यांना पडायचे. पण मेंदूच्या संशोधनामध्ये हा विषय फारसा लोकप्रिय नाही आणि आजारांचे संशोधन अधिक महत्वाचे मानले जाते त्यामुले याला निधी मिळण्याची शक्यताही कमी. अखेर एका खाजगी देणगीदाराकडून निधी मिळाल्यावर त्यांना या दिशेने वाटचाल करता आली.

    या पुस्तकात ‘रेनेसान्स साहित्य आणि कलाप्रकार’ यांचा व्यासंग आणि मेंदूचे सखोल ज्ञान यांचा सुरेख मिलाफ झाला आहे. चर्चा करताना लेखक नील सायमन, संगीतकार मोझार्ट, चायकोव्स्की, गणितज्ञ प्वंकारे यांचे अनुभव दिले आहेत. बेंझीन रेणूचा आकार केकूलेला स्वप्नात दिसला हे सर्वश्रुत आहे. मात्र इतर अनेक प्रतिभावंतांचे आविष्कार अशाच पद्धतीने झाले हे पाहील्यावर प्रतिभेचे एक वेगळे रूप समोर येते. मेंदूचे निरनिराळे भाग एकमेकांशी संवाद साधण्यासाठी चेतापेशींचा (neuron) वापर करतात. आपल्या मेंदूमध्ये १००,००० कोटी चेतापेशी असतात आणि त्या एकमेकांसोबत सतत संदेशांची देवाणघेवाण करत असतात. यावरून मेंदूचे कार्य किती गुंतागुंतीचे असेल याची कल्पना यावी. एखाद्या समस्येवर जाणीवेमध्ये मेंदूची झटापट चालू असते, तेव्हा हातात काहीच येत नाही. नंतर कलाकार किंवा संशोधक दुसर्‍या कामात लक्ष घालतात पण त्याच काळात त्यांच्या नेणिवेमध्ये (sub-conscious mind) यावर काम चालू असते. मेंदूचे निरनिराळे भाग कलाकाराच्या नकळत एकमेकांशी ‘बोलत’ असतात. सुरूवातीला हे ‘बोलणं’ तर्कशुद्ध किंवा स्पष्ट नसतं. उत्तर – मग ती कविता असेल, रेणूचा आकार असेल, नवीन सिंफनी असेल किंवा गणिताचे सूत्र असेल – मेंदूमध्ये तयार होत असताना त्याचा जाणिवेला पत्ता नसतो. फक्त काही धूसर अशा कल्पना पृष्ठभागावर असतात. आणि मग एके दिवशी अचानक हवे ते भाग जोडले जातात आणि उत्तर जाणिवेत प्रकट होतं, याला आपण प्रतिभेचा आविष्कार म्हणतो. म्हणूनच लेखिका याचं वर्णन करताना म्हणतात, “In general, creativity is not a rational, logical process.”

    हे उत्तर जाणिवेत (conscious mind) आल्यावर कलाकारांना ते कुठून आलं याचा पत्ता नसतो. मग यालाच म्यूझ किंवा इन्स्पिरेशन असं नाव दिलं जातं. मोझार्टला आख्खी सिंम्फनी मन:चक्षूंवर दिसत असे, आणि सिंफनीचे सर्व भाग एकाच वेळी ‘ऐकू’ येत असत. हे मनासारखं झालं की तो फक्त सिंफनी कागदावर उतरवण्याचे काम करत असे. प्वंकारे जेव्हा जाणीवपूर्वक गणित सोडवण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा उत्तर मिळायचे नाही. मग पडद्यामागचे काम संपले की अचानक त्याला हायपरजॉमेट्रिक सीरीजची सूत्रे डोळ्यापुढे दिसत असत.

    प्रतिभावंत मेंदूसाठी कोणते घटक आवश्यक आहेत याचे उत्तर देताना लेखिका काही सुचवण्या करतात. यात काही सुचवण्या सर्वांसाठी आहेत तर काही विशेषत: लहान मुलांसाठी.

    १. प्रतिभेचा संपर्क: इतिहासात विशिष्ट वेळी प्रतिभेच्या आविष्कारांचे स्फोट झाल्याचे बरेच पुरावे आहेत, चौथ्या-पाचव्या शतकातील ग्रीस किंवा एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील पॅरीस. इटलीमधील इ. स. १४०० – १७०० हा रेनेसान्स काळ एक ठळक उदाहरण. आजूबाजूला प्रतिभा असेल तर मेंदूला आपोआप चालना मिळते, नवीन विचारांची देवाणघेवाण होते. हवे ते करण्याचे स्वातंत्र्य, वेगळ्या वाटा चोखाळण्याची निकड, आर्थिक सुबत्ता यासारख्या गोष्टी प्रतिभेला निश्चितच मदत करणार्‍या ठरतात.

    २. यूज इट ऑर लूझ इट : जिममध्ये तासनतास घाम गाळून बरेच लोक सिक्स प्याक कमावण्यावर भर देतात. मात्र शरीरातील सर्वात महत्वपूर्ण भागाला व्यायाम कसा मिळेल याचा जाणीवपूर्वक विचार क्वचितच होताना दिसतो. आपण मेंदू वापरला की चेतापेशींची नवीन जाळी तयार होतात. जो भाग आपण वापरतो त्याचा आकार वाढतो. उदा. संगीतकारांमध्ये मेंदूच्या विशिष्ट भागांचा आकार नेहेमीपेक्षा मोठा असल्याचे आढळले आहे. प्रत्येक नवीन कल्पना, नवीन पद्धत, नवीन तंत्र शिकल्यानंतर आपला मेंदू थोडासा बदलतो आणि हे आपल्या आयुष्यभर अव्याहतपणे चालत असते. मेंदू लवचिक करायचा असेल तर तुमच्या नेहेमीच्या क्षेत्रापेक्षा एखादे नवीन क्षेत्र निवडा आणि त्याचा जाणीवपूर्वक अभ्यास करा. तुम्ही आयटीमध्ये असाल तर इतिहासाचा अभ्यास करा. एखादी नवीन भाषा शिका, एखादे वाद्य वाजवायला शिका. मेंदूला चालना मिळेल असे काहीतरी करत रहा. या प्रकारच्या व्यायामाला वयाचे बंधन नाही. मेंदू लवचिक असेल तर अल्झायमरसारख्या रोगांपासून बचाव होण्यासही मदत होते.

    ३. ध्यान (meditation) – ध्यानासंबंधी बोलताना लेखिका म्हणतात,
    If you think that meditation is a silly practice that is performed primarily by warmed-over hippies, think again. The study of the effects of meditation on the brain has become a serious area of research in neuroscience, and it indicates that practicing meditation has measurable beneficial effects on brain function.

    बुद्ध भिक्षूंच्या मेंदूचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या मेंदूमध्ये ध्यान करताना लक्षणीय बदल आढळून आले आहेत. हे बदल ध्यान संपल्यानंतरही बराच काळ राहतात.

    ४. टीव्ही बंद करा : विशेषत: लहान मुलांसाठी. टिव्हीवर नेहेमी दाखवल्या जाणार्‍या प्रतिमांचा एक परिणाम म्हणजे मुलांच्य जाणिवा बोथट होतात. त्याऐवजी लेखिका मुलांना वाचनाची सवय लावा असे सांगतात. मुलांना पुस्तके वाचून दाखवणे मूल पाच-सहा महिन्यांचे असतानाच सुरु करायला हवे. ‘वाचाल तर वाचाल’ हा क्लिशे आहे पण सत्य आहे.

    तळटीप :

    योगायोगाने पुस्तक वाचल्यावर आंतरजालावर मेंदूला व्यायाम देणारे अंकी (Anki)  हे सॉफ्टवेअर सापडले. समजा तुम्ही एखादी भाषा शिकत असाल तर अंकी तुम्हाला रोज त्या भाषेतील काही शब्दांचा अर्थ विचारते. रोज नवीन शब्द देणार्‍या बर्‍याच सायटी आहेत पण त्या शब्दाची उजळणी झाली नाही तर तो विस्मृतीत जाण्याची शक्यता अधिक. याचा मुख्य उपयोग नवीन भाषा, तिचे शब्द, व्याकरण लक्षात ठेवण्यासाठी आहे. याची उत्तरे देणे सोपे गेले की कठीण याची नोंद तुम्ही केल्यानंतर अंकी परत तो प्रश्न किती दिवसांनी विचारायचा हे ठरवते. विविध उपलब्ध प्रकारांमधून तुम्हाला हवी ती प्रश्नावली उतरवून घेता येते. तयार प्रकारांमध्ये बहुतेक भाषेवर आहेत पण जीआरई, अमिनो ऍसिड पासून पायथॉन किंवा जावा अशा गोष्टींवरही प्रश्नावली दिसल्या. तुम्ही पाहिजे त्या विषयावर तुमची प्रश्नावलीही तयार करू शकता. याखेरीज विद्यार्थ्यांना गणिताची सूत्रे, देश-राजधान्या, रसायनशास्त्रातील समीकरणे वगैरे गोष्टी लक्षात ठेवायलाही याची मदत होईल. रोजच्या उजळणीला काही मिनिटे पुरतात.


  • ऍलिस, कृष्णविवर आणि जळत्या भिंतीचे रहस्य

    या वर्षीच्या उन्हाळ्यात कॅलिफोर्नियातील सांता बार्बरा विज्ञापीठाच्या जोसेफ पोल्चिन्स्की आणि सहकाऱ्यांनी एक निबंध प्रकाशित केला. निबंधाचा विषय होता कृष्णविवरामध्ये पडल्यावर माणसाचे नक्की काय होते? या निबंधामध्ये मांडलेल्या कल्पनांनी आतापर्यंतच्या कृष्णविवराबाबत असलेल्या समजुतींना छेद दिला. निबंधाचे निष्कर्ष बरोबर आहेत असे गृहीत धरले तर विरोधाभास (Paradox) निर्माण होऊन सामान्य सापेक्षता किंवा पुंजभौतिकी यांच्यापैकी एका विषयाच्या गृहीतकाला तिलांजली द्यावी लागेल. हे लक्षात आल्यावर पदार्थविज्ञान जगतामध्ये बरीच खळबळ माजली आणि त्यावरील गरमागरम चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

    सूर्यासकट कोणत्याही ताऱ्यामध्ये मुख्यत्वे दोन प्रकारची परस्परविरोधी बले कार्यान्वित असतात. ताऱ्याच्या वस्तुमानामुळे जे गुरुत्वाकर्षणाचे बल निर्माण होते त्यामुळे तारा आकुंचन पावत असतो पण ताऱ्याच्या केंद्रामध्ये होणाऱ्या अणुप्रक्रियांमुळे या बलाच्या विरोधी बल निर्माण होते आणि तारा संतुलित राहू शकतो. पण केंद्रातील इंधनाचा साठा संपला की विविध प्रक्रिया होऊन शेवटी तारा गुरूत्वीय बलाखाली आकुंचन पावतो. ताऱ्याचे सुरुवातीचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या चौपट किंवा अधिक असेल तर त्याचे कृष्णविवरामध्ये रूपांतर होते. १९७४-७६ मध्ये स्टीफन हॉकिंग यांनी कृष्णविवरांबाबत क्रांतिकारक सिद्धांत मांडले. कृष्णविवरांमधून कोणतीच गोष्ट – अगदी प्रकाशकिरणेही – बाहेर येऊ शकत नाहीत हा समज तंतोतंत खरा नाही असे हॉकिंग यांनी सिद्ध केले. कृष्णविवरांमधून विविध किरणे आणि कण वेळोवेळी फेकले जातात. या किरणांना ‘हॉकिंग रेडिएशन’ असे नाव देण्यात आले. हॉकिंग रेडिएशन कृष्णविवराच्या क्षितिजावरून बाहेर फेकले जाते. या क्षितिजाला ‘इव्हेंट होरायझन’ असे म्हणतात. या प्रक्रियेमुळे कृष्णविवराचे वस्तुमान हळूहळू कमी होत जाते आणि शेवटी कृष्णविवर नष्ट होते. हॉकिंग यांचा दुसरा सिद्धांत अधिक धक्कादायक होता. पुंजभौतिकीच्या नियमांप्रमाणे विश्वातील प्रत्येक प्रणालीबरोबर (system) एक वेव्ह फंक्शन असते. त्या प्रणालीबद्दलची सर्व माहिती या वेव्ह फंक्शनमध्ये साठवलेली असते. हॉकिंग यांच्या सिद्धान्तानुसार कृष्णविवर नष्ट झाल्यानंतर त्याच्याबरोबर त्या प्रणालीचे वेव्ह फंक्शन आणि सर्व माहितीही नष्ट होते. याचे वर्णन हॉकिंग यांनी “Not only does God play dice, but he sometimes confuses us by throwing them where they can’t be seen.” अशा शब्दात केले. माहिती नष्ट झाली तर असा काय फरक पडणार आहे असे वाटू शकते पण इथे पदार्थविज्ञानातील काही मूलभूत तत्त्वांना आव्हान दिले गेले आहे.

    १९९३ मध्ये स्टॅनफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक लेनी ससकिंड यांनी यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. ससकिंड यांच्या मते माहिती नष्ट होत नाही. कृष्णविवराच्या आत आणि बाहेर असणाऱ्या सर्वांना एकाच प्रकारची माहिती उपलब्ध असते. बाहेर असणाऱ्यांना ही माहिती हॉकिंग रेडिएशनच्या रूपात मिळते. ससकिंड आणि हॉकिंग यांच्यात या मुद्द्यावरून बरेच वादविवाद झाले. हॉकिंग आणि किप थॉर्न यांनी कॅलटेक विद्यापीठातील प्रेस्कील यांच्याबरोबर पैजही लावली होती. २००४ मध्ये हॉकिंग यांनी माहिती नष्ट होत नाही असे मान्य केले. मात्र सध्या चालू असलेल्या वादविवादांनंतर हॉकिंग यांचे आधीचेच मत बरोबर होते की काय अशीही चर्चा चालू आहे.

    पोल्चिन्स्की आणि सहकाऱ्यांनी एक रोचक प्रश्न विचारला. जर ऍलिसला कृष्णविवरामध्ये टाकले तर काय होईल? आतापर्यंत याचे उत्तर होते – नो ड्रामा सिनारियो. आईन्स्टाईनच्या सामान्य सापेक्षता सिद्धान्तानुसार ऍलिसला काहीही जाणवणार नाही. कृष्णविवराच्या केंद्रापाशी गेल्यावर मात्र गुरुत्वाकर्षण तीव्र झाल्यामुळे तिचे शरीर ताणले जाईल आणि ती ऑफ होईल. पण पोल्चिन्स्की यांच्या सिद्धान्तानुसार ऍलिसने उडी मारल्याबरोबर तिला एक प्रचंड आगीच्या भिंतीचा सामना करावा लागेल. केंद्रापर्यंत जाण्याचीही गरज नाही, ती लगेचच ऑफ होईल. आता तुम्ही म्हणाल की येनकेनप्रकारे बिचारी ऍलीस मरणारच आहे तर ती कशीही मेली तरी काय फरक पडतो?

    यावर शास्त्रज्ञ म्हणतील ‘फर्क तो पडता है भय्या.’ ऍलिस नक्की कशी मरणार यावर पदार्थविज्ञानातील काही मूलभूत तत्त्वांचे भवितव्य अवलंबून आहे.

    एखाद्या प्रक्रियेतून दोन किंवा अधिक कण तयार झाले तर त्या कणांचे एकमेकांशी नाते तयार होते. याला पुंजभौतिकीच्या भाषेत ‘एनटॅंगलमेंट’ असे म्हणतात. एकदा तयार झाल्यानंतर हे कण परस्परांपासून कितीही दूर गेले तरीही त्यांची एनटॅंगलमेंट अबाधित राहते. यामुळे एका कणाचे वेव्ह फंक्शन मोजले तर दुसऱ्या कणाबद्दल माहिती मिळू शकते. एनटॅंगलमेंट अनेक प्रयोगांमध्ये सिद्ध झाली आहे. समजा ऍलिस आणि बॉब दोघेही कृष्णविवराच्या क्षितिजावर उभे आहेत. ऍलिस म्हणते, लय बिल झालं बॉस! आता मी बघतेच उडी मारून. ती उडी मारते आणि बॉब बाहेरच थांबतो. हे दोघेही एनटॅंगल्ड आहेत. कृष्णविवरातून हॉकिंग रेडिएशन बाहेर पडते आहे, त्यामुळे कृष्णविवर आणि सभोवतालचा प्रदेश आधीच एनटॅंगल्ड आहेत. इथे बॉबला ऍलिसशी एनटॅंगल्ड असल्यामुळेही माहिती मिळते आहे आणि हॉकिंग रेडीएशनमुळेही. बॉबला कोणत्यातरी एका पद्धतीने माहिती मिळणे शक्य आहे, दोन्ही पद्धतींनी नाही. जेव्हा ऍलिस उडी मारते तेव्हा तिला काय दिसेल? वर म्हटल्याप्रमाणे तिला काहीच फरक जाणवणार नाही. बॉब – जो बाहेर आहे त्याला काय दिसेल? त्याला हॉकिंग रेडिएशन दिसेल. पण बॉब आणि ऍलिस एनटॅंगल्ड आहेत त्यामुळे ऍलिसलाही हॉकिंग रेडिएशन दिसायला हवे. पण तसे झाले तर त्या रेडिएशनमुळे ती लगेच जळून खाक होईल.

    एकुणात शास्त्रज्ञांपुढे अवघड पर्याय आहेत. ऍलिस जळाली तर कृष्णविवराच्या आत सामान्य सापेक्षता सिद्धान्ताला रामराम. ऍलिसला क्षितिजाजवळ काहीच झाले नाही तर सापेक्षता सिद्धांत वाचतो पण एनटॅंगलमेंटचा बळी जातो आणि माहिती नष्ट होते, म्हणजे पुंजभौतिकी गडगडते. हे म्हणजे पाणी हवे का ऑक्सिजन असे विचारण्यासारखे आहे. निबंध लिहिल्यानंतर पोल्चिन्स्की यांनी तो इतर तज्ज्ञांना दाखवून यात काही चूक असली तर दाखवा असे सांगितले. आतापर्यंत यात कुणालाही चूक सापडलेली नाही.

    गुरुत्वाकर्षण आणि पुंजभौतिकी यांचे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. यांचे समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नामध्ये ‘क्वांटम ग्रॅव्हिटी’ हे नवीन क्षेत्र उदयाला आले. बहुतेक वेळा यांचा संबंध येत नाही कारण पुंजभौतिकी अत्यंत सूक्ष्म अंतरांवर प्रभावी असते आणि गुरुत्वाकर्षणाचा विचार मोठ्या अंतरांवर होतो. मात्र कृष्णविवरासारख्या ठिकाणी दोघेही एकमेकांसमोर येतात. पोल्चिन्स्की यांच्या अभिनव ‘थॉट एक्सपेरिमेंट’मुळे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यातून जे उत्तर मिळेल ते क्रांतीकारी असेल हे नक्की.

    —-

    विसू : लेखातील सगळ्या कल्पना स्पष्ट झाल्या नाहीत तर त्यात आश्चर्यकारक काहीच नाही. हे विषय जगातील अत्यंत गहन आणि जटिल विषयांमध्ये येतात. यातील प्रत्येक मुद्दा अनेक पुस्तके भरतील इतका विस्तृत आहे. यात सर्व आयुष्य घालवल्यानंतरही केवळ प्रश्नांचे स्वरूप कळू शकते. उत्तरे शोधायची तर त्याला आईन्स्टाईन किंवा हॉकिंगसारखी प्रतिभा लागते. समस्यांचे स्वरूप जरी लक्षात आले तरी पुष्कळ झाले. बाडी में क्या रख्खा है, भावनाओं को समझो.


  • गॅरी कास्पारोव्ह आणि बर्लिनची भिंत

    बुद्धिबळ विश्वविजेतेपद स्पर्धेत भाग घेणारे खेळाडू स्पर्धेआधी आणि नंतर ढीगभर मुलाखती देतात पण यामध्ये बहुतेक वेळा महत्त्वाचे तपशील उघड केले जात नाहीत. यामागे बरीच कारणे आहेत. एक तर बहुतेक वेळा मुलाखत घेणारे पत्रकार ‘आता कसं वाटतंय?’ यापलीकडे जातच नाहीत. जे थोडे बहुत जातात त्यांना उत्तरे देतानाही दोन्ही खेळाडू सावध असतात. उदा. मागची स्पर्धा जिंकल्यानंतरही कार्लसनने त्याचे सेकंड्स कोण आहेत हे जाहीर केलं नाही कारण या वर्षी त्याला परत स्पर्धा खेळायची आहे. यामुळे होतं काय की बुद्धिबळाची विश्वविजेतेपद स्पर्धा म्हणजे दोन खेळाडू खेळणार आणि त्यातला एक विजयी होणार यापलीकडे याबद्दल फारशी माहिती बाहेर येत नाही. आणि याबाबतीत हिमनग ९/१० पाण्याखाली असण्याची उपमा अगदी सार्थ आहे.

    नेहमी होणाऱ्या स्पर्धा आणि विश्वविजेतेपद स्पर्धा यात अनेक महत्त्वाचे फरक आहेत. विश्वविजेतेपद स्पर्धा एकाच खेळाडूबरोबर असते त्यामुळे आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सखोल अभ्यास करता येतो. इथे काही बाबतीत पोकर या खेळाशी साम्य जाणवतं. दोन्ही खेळाडू बुद्धिबळाच्या सर्व ‘ओपनिंग्ज’ कोळून प्यायलेले असतात. मग प्रतिस्पर्ध्याला चकित कसं करणार? प्रतिस्पर्ध्याच्या आवडत्या ओपनिंग्ज कोणत्या आहेत हे लक्षात घेतलं जातं. पण प्रतिस्पर्ध्यानं तुम्ही हे लक्षात घेणार हे लक्षात घेतलेलं असतं. त्यामुळे कदाचित तो पूर्वी कधीही न खेळलेली ओपनिंग खेळू शकतो. किंवा त्याहीपुढे जाऊन तुम्ही तो त्याच्या आवडत्या ओपनिंग्ज खेळणार नाही हे गृहीत धरणार असं गृहीत धरून त्याच्या आवडत्या ओपनिंग्ज खेळूनच तुम्हाला चकित करायचा प्रयत्न करतो. इंग्रजीत ‘कॉलिंग युअर ब्लफ’ नावाचा वाक्प्रचार आहे तो इथे चपखल बसतो. अर्थातच हे फार ढोबळ आणि प्राथमिक अंदाज आहेत. स्पर्धेची तयारी नेमकी कशी होते हे कधीही बाहेर येत नाही. खुद्द खेळाडू किंवा त्यांचे सेकंड्स यांनी याबद्दल लिहिलं तरच हे शक्य होतं आणि हे फारच क्वचित घडतं.

    ९० च्या दशकामध्ये बुद्धिबळ विश्वविजेतेपदाची स्पर्धा पूर्णपणे फिडेच्या नियंत्रणाखाली नव्हती. १९९३ साली कास्पारोव्ह आणि शॉर्ट यांनी फिडेशी काडीमोड घेऊन आपली वेगळी चूल मांडली. त्यावेळी कास्पारोव्ह विश्वविजेता होता. यानंतर फिडे आणि कास्पारोव्ह यांनी स्वतंत्र स्पर्धा घेतल्या त्यामुळे काही काळासाठी बुद्धिबळाच्या जगात एक सोडून दोन विश्वविजेते होते. १९९९ मध्ये कास्पारोव्हने विश्वविजेतेपद स्पर्धेसाठी आनंदशी बोलणी केली. आनंदने १९९५ सालच्या स्पर्धेचा कटू अनुभव लक्षात घेऊन ‘बक्षिसासाठी प्रायोजकांचे पैसे बॅकेत जमा झालेले दाखव’ अशी मागणी केली. नंतर ही बोलणी फिसटकली. २००० साली कास्पारोव्ह आणि क्रामनिक अशी स्पर्धा निश्चित झाली.

    Book cover for From London to Elista

    त्या काळात क्रामनिकचा सेकंड बारीव्ह आणि जवळचा मित्र लेव्हिटॉव्ह यांनी नंतर ‘फ्रॉम लंडन टू एलिस्ता’ हे पुस्तक लिहिलं. पुस्तकात पडद्यामागची तयारी उलगडून दाखवताना बारीव्ह आणि लेव्हिटॉव्ह यांच्या गप्पा दिलेल्या आहेत. शिवाय आवश्यक तिथे क्रामनिक, कास्पारोव्ह आणि इतरांची मतंही मांडलेली आहेत. पुस्तकात प्रत्येक डावाचं अत्यंत खोलात जाऊन विश्लेषण केलं आहे त्यामुळे बुद्धिबळात ज्यांना इतका रस नाही त्यांच्यासाठी हे पुस्तक नाही. रस असेल तर स्पर्धेची तयारी किती खोलात जाऊन केली जाते हे बघायला मिळतं. क्रामनिक रोज डाव खेळून आल्यानंतर आज रात्री काय करायचं हे सेकंड्सना सांगत असे. उदा. १४ व्या चालीत राजा सी८ ऐवजी ई८ वर नेला तर काय होईल? सकाळी क्रामनिक उठल्यावर रात्रभर काय काम झालं बघत असे. आधी म्हटल्याप्रमाणे प्रतिस्पर्ध्याला चकित करण्यावर सगळं अवलंबून असतं. सातव्या डावात क्रमनिकच्या ४…ए६ या खेळीमुळे कास्पारोव्ह इतका चक्रावून गेला की त्याने पटकन ११ खेळ्यांतच बरोबरीचा प्रस्ताव मांडला. कास्पारोव्हशी जिंकल्यानंतर क्रामनिकचा पुढचा सामना पीटर लेकोशी झाला. पुस्तकाचा दुसरा भाग यावर आहे. तिसऱ्या भागात २००६ साली झालेल्या टोपोलॉव्हबरोबरच्या सामन्याचं वर्णन आहे.

    विश्वविजेतेपद स्पर्धेची तयारी ज्या पातळीवर केली जाते त्याची कल्पना करणंही अशक्य आहे. जगातील सर्व एलीट ग्रॅडमास्टर्स या स्पर्धेकडे डोळ्यात तेल घालून बघत असतात. याचं मुख्य कारण असं की दोन्ही खेळाडू स्पर्धेसाठी जी तयारी करतात आणि त्यातून ज्या नवीन चाली उघड होतात त्यातून इतर खेळाडूंना बरंच शिकायला मिळतं. हे एक प्रकारे बुद्धिबळाच्या क्षेत्रात नवीन संशोधन प्रकाशित करण्यासारखं असतं. बरेचदा विश्वचषक स्पर्धेत वापरल्या गेलेल्या नवीन चाली नंतर काही काळ प्रामुख्याने वापरल्या जातात. स्पर्धेची तयारी चालू असताना क्रामनिकचा दिनक्रम काहीसा असा होता. सकाळी ९ ला उठायचं, १० ला नाश्ता, ११ ते १ सराव, १ ते २ समुद्रावर फिरायला जाणं, २.३० जेवण, ३ ते ४ वामकुक्षी, ४ ते ८ सराव, ८ ते ९ जेवण, ९ ते पहाटे ३ सराव.

    पहिल्या डावात कास्पारोव्हकडे पांढरे मोहरे होते. त्याने १. ई४ ही त्याची आवडती खेळी केली. यातून त्याची प्रतिस्पर्ध्यावर सुरुवातीलाच वर्चस्व गाजवण्याची मनीषा स्पष्ट झाली. डावातील पुढील खेळ्या अशा होत्या. १. ई४ ई५ २. घो एफ ३ घो सी ६ ३. उं बी ५ घो एफ ६ क्रामनिकने ३…घो एफ ६ ही खेळी केल्याबरोबर कास्पारोव्हने चमकून क्रामनिककडे बघितलं, किंचित हसला आणि मान हालवली. ही खेळी रॉय लोपेझ या प्रकारातील बर्लिन बचाव या उपप्रकारात येते. बर्लिन बचाव १९ व्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीला खेळला जात असे. नंतर उच्च दर्जाच्या स्पर्धांमध्ये हा जवळजवळ दिसेनासाच झाला. क्रामनिकने ही खेळी केल्यावर त्याने कसून तयारी केली आहे हे कास्पारोव्हच्या लक्षात आलं. त्या काळात बर्लिन बचाव काहीसा खालच्या दर्जाचा मानला जात असे. हा खेळल्यावर काळ्याला बचाव करायला फारसा वाव नाही असं बहुतेकांचं मत होतं. नंतर कास्पारोव्हने उघड केलं की त्याच्या टीमने पेट्रॉव्ह बचावाची तयारी केली होती, त्यांना बर्लिन बचावाची अजिबात अपेक्षा नव्हती. हा डाव बरोबरीत सुटला पण पुढच्या डावात मात्र काळ्याकडून खेळताना कास्पारोव्हने चूक केली आणि डाव गमावला. नंतर काळ्या बाजूने खेळताना क्रामनिकने बर्लिन बचावाचा पुरेपूर उपयोग केला. शेवटापर्यंत कास्पारोव्हला ही बर्लिनची भिंत भेदता आली नाही. तिसऱ्या डावानंतर कास्पारोव्ह आणि टीमच्या लक्षात आलं की बर्लिन बचाव क्रामनिकचं मुख्य अस्त्र आणि मग त्यांनी यावर तयारी सुरू केली, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. आता क्रामनिक एका गुणाने आघाडीवर होता. बाकीचे सर्व डाव बरोबरीत सुटले असते तर त्याला विजेतेपद मिळालं असतं.

    पाचव्या डावाआधी क्रामनिकच्या हेरांनी बातमी आणली की आज कास्पारोव्ह टॉयलेटबद्दल खुसपट काढून तमाशा करणार आहे आणि तसंच घडलं. कास्पारोव्हने मागणी केली की क्रामनिक टॉयलेटला जाताना एक गार्ड बरोबर हवा आणि त्याने दार संपूर्ण लवता कामा नये. क्रामनिकने मागणी मान्य केली पण कास्पारोव्हलाही हे लागू होणार असेल तरच. या सर्वामुळे फारसा फरक पडला नाही. मानसिक दबाव टाकण्याचा कास्पारोव्हचा प्रयत्न फुकट गेला. दहाव्या डावात कास्पारोव्ह परत एकदा हरला. क्रामनिकची आघाडी दोन गुणांची झाली. तेराव्या डावानंतर क्रामनिक परत जात असताना पाच दारुड्यांनी त्याला घेरण्याचा प्रयत्न केला. क्रामनिकने जीव वाचवून पळ काढला. नंतर एका सिक्युरिटी गार्डची सुरक्षेसाठी नेमणूक करण्यात आली. स्पर्धेत अनेकदा संधी मिळूनही कास्पारोव्ह तिचं विजयात रूपांतर करू शकला नाही. मागच्या वर्षी आनंदची जी अवस्था झाली होती तशी अवस्था त्याचीही होती.

    या स्पर्धेनंतर बर्लिन बचावाला पुनरुज्जीवन मिळालं. मागच्या विश्वचषक स्पर्धेतही याचा वापर करण्यात आला. पांढऱ्याच्या ई ४ ला भक्कम बचाव म्हणून आज बर्लिन बचाव लोकप्रिय आहे.