मराठी ब्लॉगलेखन

मराठीत येणारे बहुतेक माहितीपर लेख फक्त माहिती देतात. (आणि बरेचदा एका लेखात इतकी माहिती देतात की वाचताना धाप लागते.) हे कंटाळवाणं होतं.

श्रोत्यानें आशंका घेतली | ते तत्काळ पाहिजे फेडिली |
स्वगोष्टीनें  स्वगोष्टी  पेंचली  |  ऐसें  न व्हावें  ||२||
पुढें धरितां मागें पेंचला  |  मागें  धरितां पुढें उडाला | 
ऐसा सांपडतचि गेला | ठाइं ठाइं ||३||
पोहणारचि  गुचक्या  खातो | जनास कैसा काढूं
पाहातो | आशय लोकांचा राहातो | ठाइं ठाइं ||४||

समर्थ रामदास​

दिवाळीबरोबर मराठी लेखांचा पाऊस हे समीकरण दिवसेंदिवस अधिक पक्कं होतं आहे. हे बरं की वाईट हे वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून आहे. या निमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर अनेक चांगले लेख वाचायला मिळू शकतात हे बरं, अशा लेखांची संख्या मात्र फारच कमी असते हे वाईट. शिवाय यासाठी किमान चार महिने अनेक लोकांची ‘क्रिएटीव्ह एनर्जी’ पणाला लागते हे ही आहेच. असं झाल्यानंतर जर अंक वाचनीय असेल तर ही एनर्जी सार्थकी लागली असं म्हणता येतं पण बरेचदा हे होत नाही. मी छापील दिवाळी अंक विकत घेणं सोडून दिलं आहे, यामागे दोन-तीन कारणं आहेत. खरं सांगायचं तर दिवाळी अंकांची अनुक्रमणिका बघितली तर प्रत्येक अंकात फार-फार तर दोन किंवा तीन लेख वाचनीय असतात. त्यातही नेहमीचेच यशस्वी लेखक आणि त्यांचे राखीव कुरणातील यशस्वी विषय यांचा मनसोक्त कंटाळा आलेला आहे. त्यांच्यासाठी सगळा अंक विकत घेणं सोयीचं वाटत नाही. शिवाय हल्ली अंकांच्या किमती बघता त्याच किमतीत पुस्तकं सहज घेता येऊ शकतात त्यामुळे साहजिकच पुस्तकाला कधीही प्राधान्य.

सध्या प्रसिद्ध होणारी माहिती आणि तिचं वाचन यांचा ताळमेळ बसवायचा असेल तर काही उपाय गरजेचे ठरतात. हे प्रातिनिधिक नाहीत, प्रत्येकाचे वेगळे असू शकतात. सर्वात आधी प्रवासवर्णनांवर काट. जे लोक पहिल्यांदा जातात त्यांच्यासाठी हा अनुभव नक्कीच रोचक असतो पण आता जगातल्या कोणत्याही ठिकाणी कुणी गेलं, त्यांनी तिथले कितीही दिलखेचक फोटो काढले, तिथे त्यांना कितीही मनमिळावू लोक भेटले (पॉलकाका, लिंडाआजी वगैरे), त्यांनी त्यांचं कितीही मनापासून आदरातिथ्य केलं (सेरामावशीचं आवडतं पायनॅपलचं लोणचं इ.) तरी त्यात स्वारस्य वाटणं या जन्मात शक्य नाही. नंतर माहितीपर लेखांवर काट, अपवाद अर्थातच जी माहिती त्या वेळेस रोचक असेल तिच्यावरचे लेख. तिसर्‍या शतकातील नृत्यकलेवर लेख असेल तर तो कितीही चांगला असला तरी सध्या माझ्या कामाचा (आणि/किंवा इंटरेस्टचा) नाही त्यामुळे त्याला पास. त्याऐवजी ‘आणीबाणी’वर काहीही असलं तरी त्याला प्राधान्य कारण सध्या मला त्या विषयात रस आहे. हे करणं गरजेचं ठरतं कारण असं केलं नाही तर विकीवर आणि इतरत्र जन्मभर पडीक राहण्याइतकी माहितीआहे. मराठीत येणारे बहुतेक माहितीपर लेख फक्त माहिती देतात. (आणि बरेचदा एका लेखात इतकी माहिती देतात की वाचताना धाप लागते.) हे कंटाळवाणं होतं. नुसती माहिती विकीवरही आहे, लेखकाने ती माहिती कशी मांडली आहे आणि त्या माहितीचं कसं विश्लेषण केलं आहे हे अधिक महत्त्वाचं आणि इथे बहुतेक मराठी लेख कमी पडतात. असा लेख लिहिण्यासाठी वाचन लागतंच पण त्याचबरोबर मननही आवश्यक असतं. बरेचदा लेखक नुसती पुस्तकांची जंत्री आणि त्यात काय आहे अशी त्रोटक माहिती देतात. ‘लोकसत्ता’ किंवा ‘सकाळ’मध्येही असे लेख दिसतात. अशा लेखांमधून फारसं काही हातात पडत नाही. काही लेखक चांगले असतात, विषयही रोचक असतो पण ते शैलीमध्ये कमी पडतात. लेख वाचल्यावर लेखकाने हे लेख लिहिल्यानंतर परत वाचून बघितला होता की नाही अशी शंका येते.

इथे अनेक मुद्दे आहेत. एक म्हणजे मराठी भाषा. क्लिष्ट संकल्पना समजावून सांगण्यासाठी मराठीत सुटसुटीत शब्द नाहीत, आहेत ते शब्द वापरले तर लेख बोजड होतो. त्यात एक एक पॅरेग्राफ लांबीची वाक्ये असतील तर लेख वाचणं अशक्य होतं. नरहर कुरूंदकर किंवा दुर्गा भागवत यांचं लेखन पाहिलं तर त्यात बोजड शब्द फार क्वचित आढळतात, उलट क्लिष्ट संकल्पनाही स्वच्छ शब्दांत सहजपणे ते सांगतात. लेख लिहिल्यानंतर तो शक्य तितक्या त्रयस्थ नजरेतून वाचून त्यातून नेमका काय अर्थ निघतो आहे हे बघणं गरजेचं आहे. बरेचदा लेखक ज्या कल्पनांवर एक-एक स्वतंत्र पुस्तक निघू शकेल अशा कल्पना एका वाक्यात बसवायचा प्रयत्न करतात. साहजिकच परिणाम बोजड होतो. क्लिष्ट संकल्पना असेल तर एक तर ती सुटसुटीत शब्दांत सांगता यायला हवी आणि ज्या वाचकाचा तिच्याशी अजिबात परिचय नाही त्यालाही ती कळायला हवी. मुख्य म्हणजे वाचकाला शून्य पार्श्वभूमी आहे असं गृहीत धरूनच लेख लिहायला हवा. मग कल्पना स्पष्ट करण्यासाठी उपमा किंवा तत्सम संकल्पना वापरायला हव्यात. इथे परत मननाचा मुद्दा येतो. एखाद्या संकल्पनेवर बरंच वाचन आहे पण त्यावर विचार केलेला नसेल तर जे पुस्तकात वाचलं तेच लेखात परत ‘रिपीट’ होतं पण त्यापुढे जाता येत नाही. ती कल्पना सोप्या शब्दांत समजावून सांगता येत नाही. जे कृष्णमूर्ती एकदा म्हटले होते, “फ्रॉइड असं म्हणतो, मार्क्स तसं म्हणतो, युंग असं म्हणतो हे सगळं ठीक आहे, पण तू काय म्हणतोस?” आपण जितकं वाचलं आहे ते सगळं वाचकापर्यंत पोचायलाच हवं असं नाही. क्लिष्ट आणि अपरिचित कल्पनांवर पाच-पाच पानी लांब लेख वाचताना वाचकाला शीण येतो. एका लेखात दहा कल्पना कोंबण्यापेक्षा एक-दोन मध्यवर्ती कल्पना सुटसुटीतपणे, विस्तार करून सांगितल्या तर वाचकाच्या पदरात अधिक पडतं. मग त्याला रस वाटला तर तो त्यावर अधिक माहिती मिळवेलच. बरेचदा लेखक पार आफ्रिकेतून माणूस कसा उत्क्रांत झाला इथपासून सुरुवात करतात आणि लेख असतो आंतरजालाचं आधुनिकीकरण यासारख्या एखाद्या विषयावर. यावर खगोलशास्त्रज्ञ शॉन कॅरल याने एक ब्लॉग पोस्ट लिहिलं होतं. एखादी कल्पना कशी मांडावी किंवा मांडू नये.

क्ष ही ती कल्पना असेल तर सर्वात सोपा मार्ग. ‘क्ष’. फक्त ती कल्पना मांडा.

याहून थोडा अवघड प्रकार म्हणजे – ‘क्ष’. ही कल्पना खरंच क्ष आहे.

आणखी गुंतागुंतीचा प्रकार. ‘क्ष ही कल्पना अ, ब किंवा क सारखी वाटू शकते पण ते इथे अपेक्षित नाही. इथे अपेक्षित आहे – क्ष.’

मराठी लेखांसाठी याहूनही गुंतागुंतीचा प्रकार असतो. ‘कोट्यवधी वर्षांपूर्वी आफ्रिकेतून माणूस बाहेर पडला..उत्क्रांती..आगीचा शोध..संस्कृती..शेती..इजिप्शियन संस्कृती..पूर्व-पश्चिम व्यापार..कोलंबस..अमेरिका..अमेरिकन राज्यक्रांती..वसाहतवाद आणि त्याचे व्यामिश्र परिणाम..तंत्रज्ञानाचा विस्फोट.. धकाधकीचं आयुष्य..सोशल मिडिया..आणि मग मध्यवर्ती कल्पना – क्ष. त्याचबरोबर इतर दहा कल्पना अ, ब, क, ड’. या सर्व गर्दीत मूळ मुद्दा काय, लेखकाला नेमकं काय म्हणायचंय हे कुठेतरी हरवून जातं. बरेचदा किती लिहिलं यापेक्षा किती कापलं यावर लेखाचा दर्जा अवलंबून असतो.

मराठी वर्तमानपत्रातील बहुतेक लेख (कुरुंदकरांसारखे माननीय अपवाद अर्थातच आहेत) आणि ‘गार्डीयन’ किंवा ‘न्यूयॉर्कर’मधले लेख यात हा एक महत्त्वाचा फरक दिसतो. अर्थात याचा अर्थ तिकडचे सगळेच लेख चांगले असतात असा नाही, पण चांगल्या लेखांचं प्रमाण तिकडे जास्त आहे. त्या लेखांमध्ये लेखकाचं वाचन जास्त दिसत नाही, मनन मात्र भरपूर असतं. आपल्याकडे बहुतेक वेळा उलटं दिसतं. लेखकाचं वाचन आणि मनन किती आहे हे ओळखणं अवघड नसतं. वाचन अधिक असेल तर लेखक स्वतःच ते दाखवायला उत्सुक असतो. लेखात पुस्तकातले विचार किती आणि लेखकाचे स्वतःचे विचार किती हे दोन्ही अनुक्रमे वाचन आणि मनन यांचे निदर्शक आहेत. आपल्याकडे काही गैरसमजही आहेत. उदा. चित्रपटाचं परीक्षण किंवा रसग्रहण म्हणजे सगळी कथा सांगणे. मागे एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीने एका जगप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या तितकाच गाजलेल्या चित्रपटावर लिहिलं होतं. लेख उत्सुकतेने वाचायला घेतला. उत्सुकता अशासाठी की लेख ती त्या क्षेत्रात असल्याने अभिनय, दिग्दर्शन इत्यादी क्षेत्रांवर तिचे विचार रोचक ठरावेत. वाचल्यानंतर मात्र निराशा झाली कारण तिने फक्त चित्रपटाची कथा सांगितली होती. कथा सांगण्यात काही गैर नाही पण तिच्याबरोबर तुमचे विचार असणं गरजेचं आहे.

आता हे सगळं ‘प्रिचिंग’ थाटाचं वाटू शकतं. किंवा हे सांगणारा तू कोण टिकोजीराव असा प्रश्न मनात येणंही साहजिक आहे. (तसंही मराठी ब्लॉगलेखनाला कुणीही ‘शिरियसली’ घेतच नाही. लेख जोपर्यंत छापून येत नाही तोपर्यंत तुम्ही लेखक नव्हे अशी समजूत पक्की आहे.) यावर उत्तर असं की हे विचार काही फार क्रांतिकारी आहेत असं नाही. किंबहुना कुणालाही सुचावेत असेच आहेत. लेख लिहून झाल्यावर त्याचा नेमका काय अर्थ लागतो आहे आणि तो अर्थ बरोबर नसेल किंवा वाचल्यावर गोंधळ होत असेल तर त्यात सुधारणा/संपादन करणे यासारखी साधी-सरळ गोष्ट नसावी. असं असतानाही नियमितपणे स्तंभलेखन करणारे लेखक/संपादकही जेव्हा या चुका करताना दिसतात तेव्हा आश्चर्य वाटतं.

शेवटी या सर्व कल्पनांचा परिपाक एखादा समाज किती प्रगल्भ आहे यावर होतो. इथे सरसकटीकरण अपेक्षित नाही. मराठीतील सगळंच लेखन या प्रकारात मोडतं असंही नाही. या चुका जर एखाद्या नुकत्याच ब्लॉग सुरू केलेल्या लेखकाने केल्या तर त्यात आश्चर्य नाही पण जेव्हा मान्यवरांच्या लेखणीतून आलेलं लेखन या प्रकारात मोडतं तेव्हा त्यावर विचार करावा असं वाटतं.

—-

१. मराठी ब्लॉगलेखन ही दुखरी नस आहे. मराठी ब्लॉगर्स ही जमात नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. सध्या नियमितपणे चांगलं लिहीणार्‍या मराठी ब्लॉगांची संख्या भारतातील वाघांच्या शंभरपट कमी आहे. खरं तर आपलं लेखन चिरंतन टिकवण्यासाठी ब्लॉगसारखा दुसरा मार्ग नाही. पाच वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखावरही जेव्हा प्रतिसाद येतात त्यावरून हे दिसतं. एखाद्या लेखकाचं सगळं लिखाण सर्वात सोईस्कररीत्या लगेच उपलब्ध होण्यासाठी ब्लॉग हा उत्तम उपाय आहे.

Comments

2 responses to “मराठी ब्लॉगलेखन”

  1. Ashish Avatar

    ब्लॉगच नाही तर लेखन करू इच्छिणाऱ्यांना खरेच अनुकरणीय विचार आहेत.

    1. Raj Avatar
      Raj

      अनेक आभार​.