जन अरण्य

सत्यजित रे यांचं नाव आलं की ‘पाथेर पांचाली’ आणि ‘चारुलता’ हे दोन चित्रपट नेहमी चर्चेला येतात कारण हे दोन्ही त्यांच्या सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी आहेत. यामुळे आता या चित्रपटांबद्दल बोलण्यासारखं फारसं काही उरलेलं नाही. दुसरं म्हणजे त्यांच्या इतर तितक्या न गाजलेल्या चित्रपटांबद्दल कुणी बोलताना दिसत नाही. चर्चा सोडाच, साधे उल्लेखही दिसत नाहीत. मला त्यांचे सगळे चित्रपट आवडतात, काही जास्त, काही कमी. त्यांचा कलाप्रवास बघितला तर काही गोष्टी जाणवतात. त्यांचे बहुतेक चित्रपट सकस साहित्यकृतींवर आधारलेले आहेत – बिभूतीभूषण बॅनर्जी, टागोर, प्रेमचंद, शंकर, इ. सुरुवातीच्या अपू त्रिधारेनंतर ६० च्या दशकात त्यांनी ‘देवी’, ‘चारुलता’ सारखे नायिकाप्रधान चित्रपट केले, महानगर हा चित्रपटही नायिकाप्रधान म्हणता यावा. या दरम्यान ‘गोपी गाईन, बाघा बाईन’ किंवा शोनार केल्ला सारखे फॅंटसीपट केले. सत्तरच्या दशकात ते सामाजिक चित्रपटांकडे वळले. आजूबाजूला जे चाललं होतं त्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नव्हतं असं ते या बाबतीत म्हणतात. यातून कलकत्ता त्रिधारा या नावाने ओळखले जाणारे तीन चित्रपट आले – ‘प्रतिद्वंदी’, ‘सीमाबद्ध’ आणि ‘जन अरण्य’. ८० च्या दशकात ज्याला ‘इन-हाउस ड्रामा’ म्हणता येईल असे चित्रपट त्यांनी केले. याला काही वेळा त्यांचं प्रकृती अस्वास्थ्यही कारणीभूत होतं. ‘घरे-बायरे’, ‘आगंतुक’, ‘शाखा प्रोशाखा’ आणि इब्सेनच्या नाटकावर आधारलेला ‘गणशत्रू’. आणखी एक विशेष म्हणजे हे सर्व चित्रपट रंगीत होते. या आधी कांचनजंघासारखे अपवाद सोडले तर रे यांचा कल कृष्णधवल चित्रपटांकडेच होता. मला त्यांचे साठ आणि सत्तरच्या दशकातील चित्रपट सर्वात जास्त आवडतात. ८० च्या दशकातील चित्रपट त्यांनी रंगीत करायला नको होते असं वाटतं. रे यांच्या शैलीतही उत्तरोत्तर फरक जाणवतो. पाथेर पांचालीचा ‘ट्रेन सिक्वेन्स’ ज्याला ‘व्हिज्युअल पोएट्री’ म्हणता येईल असा आहे. नंतर चारुलतामधला सुरुवातीचा प्रसंग – कंटाळलेली नायिका झरोक्यांतून बघते आहे किंवा कांचनजंघामधले काही प्रसंग असे अपवाद सोडले तर नंतरच्या चित्रपटांमध्ये असे प्रसंग फारसे दिसत नाहीत.

‘कांचनजंघा’, ‘अरण्येर दिनरात्री’ आणि ‘कलकत्ता त्रिधारा’ हे विशेष आवडलेल्या चित्रपटांपैकी. ‘जन अरण्य’ हे नाव पहिल्यांदा ऐकलं तेव्हा लोकांचा महासागर असा काहीतरी अर्थ असावा असं वाटलं. इथे सपशेल फसवणूक झाली. ‘जन अरण्य’ चा अर्थ आहे मध्यस्थ. कलकत्ता त्रिधारा त्या काळातील तरुणांवर आधारलेली आहे. जन अरण्य आणि प्रतिद्वंदी दोन्हीकडे नुकताच पदवी मिळालेला तरुण आणि नोकरी मिळवण्यासाठी त्याने केलेला संघर्ष ही मध्यवर्ती कल्पना आहे. ‘सीमाबद्ध’मध्ये नायक नोकरी करतो आहे पण नोकरी टिकवण्यासाठी त्याला काय तडजोडी कराव्या लागतात याचं चित्रण आहे. जन अरण्य या त्रिधारेतील शेवटचा चित्रपट. प्रतिद्वंदीमध्ये रे यांनी ‘शेकी कॅमेरा’सारखे प्रयोग केले होते, जन अरण्यमध्ये ते दिसत नाहीत. चित्रपट मणी शंकर मुखर्जी यांच्या याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.

Movie poster for Jana Aranya

चित्रपट सुरू होतो कोलकाता विद्यापीठाच्या एका खोलीत. परीक्षा चालू आहे आणि दोन शिक्षक देखरेख करत आहेत. ही देखरेख नावालाच आहे कारण विद्यार्थी सरळ सरळ कॉप्या करत आहेत. मात्र नायक सोमनाथ बॅनर्जी या फंदात न पडता प्रामाणिकपणे उत्तरे लिहितो आहे. सोमनाथच्या पेपरवर कॅमेरा काही क्षण रेंगाळतो, त्याचं अक्षर बारीक असल्याचं जाणवतं. पुढच्या प्रसंगात एक शिक्षक पेपरचा गठ्ठा घेऊन घरी येतो आणि पेपर तपासायला लागतो. पुढचा पेपर घेतल्यावर तो डोळे बारीक करून वाचायचा प्रयत्न करतो, हा पेपर सोमनाथचा असावा. मध्येच डास चावत आहेत, बायकोला फ्लिट मारायला सांगतो. मुलाला शेजाऱ्यांकडून चष्मा उसना आणायला सांगतो पण ते गावी गेले आहेत. बायकोशी वादावादी होते. या सर्वात सोमनाथच्या पेपरचं भवितव्य काय? रिझल्ट लागतो तेव्हा सोमनाथचा नुसता पास झाल्याचं कळतं. या प्रसंगातून चित्रपटाची रूपरेखा स्पष्ट होते. इथे नायक-खलनायक असा संघर्ष नाही कारण कोण नायक आणि कोण खलनायक हेच संदिग्ध आहे. सत्तरच्या दशकातील गरिबीने गांजलेल्या मध्यमवर्गाची परिस्थितीमुळे कशी पिळवणूक होत होती याचं हे प्रभावी चित्रण आहे. पुढे नोकरी शोधायचे प्रयत्न. नोकरीचे अर्ज टाइप करत असताना टाईपरायटरवरच्या क्लोज-अपमध्ये शब्द दिसतात, “I beg to apply… “

यात वर्ष निघून जातं. एकदा मित्राबरोबर एका खासदाराला भेटायला जातो, भिंतीवर नेत्यांचे फोटो. खासदार त्यांना देशासाठी त्याग करायचा संदेश देतो. पुढच्या प्रसंगात उत्पल दत्त – बिशूदा – केळ खाताना दिसतात. केळ खाता-खाता केळीवाल्याला विचारतात, “पुस्तकविक्रेते विकत असलेली पुस्तकं वाचत नाहीत. तू तुझी केळी खातोस का? ” केळाचं साल ते निष्काळजीपणे फेकून देतात आणि त्यावर घसरून सोमनाथ पडतो. त्यांची जुनी ओळख निघते. बिशूदा सोमनाथला बिझनेस करायचा सल्ला देतात. यासाठी जागा आणि इतर मदत द्यायची हमी घेतात. हा बिझनेस कसा करायचा याचं चित्रण रे यांनी इतकं तपशीलवार केलं आहे की त्या काळात कदाचित हे पाहिल्यावर कुणालाही व्यवसाय सुरू करता यावा.

व्यवसाय कोणता तर मध्यस्थाचा. स्टेशनरीपासून केमिकल्सपर्यंत कंपन्यांना जे लागतं त्याचा पुरवठा करायचा आणि कमिशन घ्यायचं. सुरुवातीला हे सोपं असतं. एक बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर त्याला जुने बंगले असतील तर सांग असं म्हणतो. ‘शाहेबबाडी’ – इंग्रजांनी बांधलेले बंगले. हे पाडून त्यातील माल विकायचा. सोमनाथने एक बंगला दाखवल्यावर काही दिवसांनी त्याला याचं कमिशन मिळतं. पैसे मिळवणे इतकं सोपं आहे यावर त्याचा विश्वास बसत नाही. सुरुवातीचा सोमनाथ इतका सरळ की कुणी पैसे दिले तर त्या माणसासमोर मोजायचीही त्याला लाज वाटते. हळूहळू त्याला व्यावसायिक खाचाखोचा लक्षात येतात. कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी बरेचदा क्लायंटना खूश करावं लागतं. पार्ट्या, इम्पोर्टेड गोष्टी – क्लायंटचा जो वीक पॉइंट असेल त्यानुसार त्याला काय हवं आहे ते द्यायचं आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं.

मध्यस्थ हा शब्द सभ्य आहे. याला समानार्थी शब्द आहे दलाल. कॉन्ट्रॅक्टच्या मागे धावताना जेव्हा सोमनाथवर या शब्दाचा सर्वात कुप्रसिद्ध अर्थ खरा करण्याची वेळ येते तेव्हा तो नखशिखांत हादरतो. सुरुवातीला नको म्हणतो पण परिस्थितीच्या दबावाला अखेर शरण जातो. शेवटी ‘कहानी में ट्विस्ट’ ही आहे पण तो पडद्यावरच पाहिलेला बरा. ‘प्रतिद्वंदी’मध्ये शेवट आशादायी आहे, शेवटी नायकाला बागेत पक्ष्यांच गाणं ऐकू येतं. ‘जन अरण्य’मध्ये मात्र नायकाचं इतकं अध:पतन होतं की यापुढे तो कधीही आरशात स्वत:ला पाहू शकणार नाही. या संपूर्ण सिनेमात रे आशेचा कोणताही किरण दाखवीत नाहीत. सिनेमात कुणीही खलनायक नाही. सगळेजण वेगवेगळ्या प्रमाणात परिस्थितीशी तडजोड करत आहेत. अपवाद सोमनाथचे वडील – जुन्या पिढीतले, अजूनही सदाचार, मूल्याधिष्ठित आचरण यावर विश्वास असणारे. रेंच्या चित्रपटात अनेक ‘थीम्स’ परत परत येताना दिसतात. जेवणाच्या टेबलावर सोमनाथ, त्याचा मोठा भाऊ, वहिनी आणि वडील चर्चा करत असतात. विषय – भ्रष्टाचार. (असाच प्रसंग शाखा प्रशाखामधेही आहे. ) सोमनाथचा भाऊ म्हणतो की भ्रष्टाचार आदिम काळापासून अस्तित्वात आहे कारण संस्कृतमध्येही याला शब्द आहे. सोमनाथच्या वडिलांना यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. आजच्या काळात हा मूल्यांचा संघर्ष कितपत समयोचित आहे कल्पना नाही. एके काळी वशिला असं कुजबूज करून सांगायचे त्याला आता नेटवर्किंग अशी प्रतिष्ठा मिळाली आहे. मात्र चित्रपटात मांडलेला मूल्यांच्या ‘रेलेव्हन्स’चा प्रश्न आजही लागू आहे असं वाटतं.

रे यांच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे ज्या सहजतेने ते वेगवेगळ्या गोष्टी सूचित करतात त्याला तोड नाही. अर्थातच कथानकाच्या सोयीसाठी या गोष्टी बरेचदा मुद्दाम घालाव्या लागतात कारण रे यांनी नेहमी पारंपरिक कथानकाचा आधार घेतला आहे. पण कधीही, कुठेही ही प्रतीकं कृत्रिम वाटत नाहीत.

सोमनाथ आणि बिशूदा पहिल्यांदा भेटतात तेव्हा कॅमेरा रस्त्यातल्या खड्ड्यांवर रेंगाळतो. बिशूदा सोमनाथला बजावतात, “जपून चाल, शॉर्बत्र पिटफॉल. “

१. बंगाली नावं मराठीत लिहिणं डोक्याला ताप आहे. बंगालीत बरेचदा व्यंजनाचा उच्चार ऑ आणि ओच्या मध्ये कुठेतरी असतो. त्यामुळे जॉन ऑरण्य की जोन ऑरण्य असा प्रश्न पडतो. ऑ लिहिला तरी उच्चार ‘वॉक’ इतका स्पष्ट नसतो आणि ओ लिहिलं तरी तेच होतं. त्यामुळे वाचताना मराठीवाचक तो उच्चार बरोबर करेलच याची खात्री नाही म्हणून शेवटी इंग्रजी उच्चार ठेवले आहेत. दुसरं – हे तीन चित्रपट ‘द कलकत्ता ट्रिलॉजी’ या नावाने ओळखले जातात. आता शहराचं नाव बदलल्यावर त्रिधारेचं नावंही बदलायचं का? प्रश्न ऑप्शनला टाकला आहे. उपप्रश्न : अमिताभ घोष यांच्या ‘द कलकत्ता क्रोमोसोम’चं काय करायचं?