डायरेक्टर्स कट : द गॉडफादर

TheGodfatherMoviePoster

बरेचदा डीव्हीडीसोबत ‘डायरेक्टर्स कट’ नावाचा प्रकार यायचा. यात चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी केलेली कमेंट्री असायची. चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याचे विश्लेषण करून ते चित्रित करताना काय काय अडचणी आल्या, काय गमती झाल्या हे खुद्द दिग्दर्शक महाशयांकडून ऐकायला मजा यायची. आता डीव्हीडी लुप्त पावल्यावर हा प्रकारही नामशेष होणार की काय असं वाटायला लागलं आहे.

माझ्याकडे प्रागैतिहासिक काळातील काही डीव्हीडी आहेत. त्यांच्यावर ओरखडे पडून त्यांनी राम किंवा रावण म्हणण्याआधी त्यातील मुख्य बिंदू (आणि रेखा, हेलन वगैरे ) यांची नोंद करावी म्हणतो. यातील पहिला चित्रपट आहे ‘द गॉडफादर’ आणि याचं विश्लेषण केलं आहे चित्रपटाचे दिग्दर्शक दस्तूरखुद्द फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांनी.

या मालिकेतील इतर चित्रपट आहेत : ‘डायरेक्टर्स कट : ऑल द प्रेसिडेंट्स मेन‘ आणि ‘डायरेक्टर्स कट : द फ्युजिटिव्ह

१. कोपोला यांच्या चित्रपटात लेखकाचं नाव सगळ्यात आधी येतं, उदा. Mario Puzo’s The Godfather किंवा John Grisham’s The Rainmaker. हा पायंडा पाडल्याचा त्यांना सार्थ अभिमान आहे.

२. सुरुवातीला ब्रँडोच्या मांडीवर जे मांजर खेळताना दिसतं तो केवळ योगायोग होता. ते मांजर दिवसभर सेटवर फिरायचं ते कोपोलानं पाहिलं आणि काही न बोलता त्याला ब्रँडोच्या हातात दिलं. ब्रँडोला प्राण्यांची आवड होती, दोघांची गट्टी जमली आणि कपोलानं मांजरासकट दृश्य चित्रित केलं.

३. चित्रपट सुरू करण्याआधी कोपोला यांनी नवोदित अभिनेत्यांना संधी देण्यासाठी ‘ओपन कॉल’ दिला होता. यात त्यांना दोन गुणी अभिनेते सापडले – तेस्सियोची भूमिका करणारा आबे व्हिगोदा आणि अमेरिगो बोनासेराचीभूमिका करणारा साल्वातोरे कोर्सीत्तो. कोपोला यांच्या मते प्रत्येक दिग्दर्शकाने चित्रपटाआधी नवीन अभिनेत्यांना संधी देण्यासाठी ‘ओपन कॉल’ द्यायला हवा.

४. चित्रपटाच्या सुरुवातीला जो लग्नसमारंभाचा प्रसंग आहे तो चित्रित करण्यासाठी त्यांच्याकडे केवळ अडीच दिवस होते आणि सगळं युनिट प्रचंड तणावाखाली काम करत होतं. कोपोलानी प्रत्येक प्रसंग थोडक्यात सांगणारे कार्ड बनवले होते उदा. “क्लेमेंझा नाचतोय आणि वाइन मागतोय.”

५. लूका ब्रासीची भूमिका करणारा लेन्नि मोंताना हा एक कुस्तीपटू होता. ब्रँडोसोबत अभिनय करताना त्याला जाम टेन्शन यायचं आणि तो त्याचे संवाद विसरायचा. मग कोपोलानं एक शक्कल लढवली. लूका ब्रासी त्याचे संवाद पाठ करतोय असा प्रसंग चित्रित केला त्यामुळे नंतरचा त्याचा वाईट अभिनय कथानकाचा भाग बनून गेला.

६. ‘द गॉडफादर’ चित्रित करायला ६२ दिवस लागले आणि याला ६५ लाख डॉलर इतका खर्च आला. कोपोला यांच्या मते चित्रपट फार घाईघाईत आणि बेशिस्तपणे चित्रित झाला आहे.

७. टॉम हेगन (रॉबर्ट डुव्हाल​) आणि जॅक वोल्ट्झ (जॉन मार्ली) यांचा बागेत फिरतानाचा एक प्रसंग आहे. हा दुसऱ्या युनिटने लॉस अँजेलिसमध्ये चित्रित केला. यासाठी दोन्ही अभिनेते उपलब्ध नव्हते मग कोपोलाने त्याच्या दोन मित्रांना त्यांचे कपडे घालून बागेत फिरायला सांगितलं आणि प्रसंग चित्रित केला.

८. जॅक वोल्ट्झच्या बिछान्यात जे घोड्याचं मुंडकं आहे तो खरा घोडा होता. युनिटने मेलेल्या घोड्यामधून तसा दिसणारा घोडा निवडला आणि त्याचं मुंडकं घेऊन आले.

९. डॉन कोर्लिओने (मार्लन ब्रँडो) आणि सोलोझ्झो (ऍललेत्तिएरी) यांच्या भेटीचा प्रसंग चित्रित होत असताना कोपोलाला कळलं की त्या आठवड्याच्या शेवटी त्याची हकालपट्टी होणार आहे. त्या काळात स्टुडिओ नेहमीआठवड्याच्या शेवटी नोटीस देत असत म्हणजे सोमवारपासून नवीन दिग्दर्शक घ्यायला सोयीचं जाई. तो बुधवार होता. कपोलानं उलटी खेळी केली – स्टुडिओचे चार लोक जे कोपोलावर नजर ठेवत असत त्यांना काढून टाकलं. यात सहाय्यक दिग्दर्शक आणि इतर कर्मचारी होते. यामुळे स्टुडिओतील बडी मंडळी संभ्रमात पडली. दरम्यान कपोलाला ‘पॅटन‘ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनासाठी ऑस्कर पारितोषिक मिळालं आणि त्याची नोकरी वाचली.

१०. चित्रपटात मायकेल कोर्लिओने (ऍल पचिनो) आणि के एडम्स (डायान कीटन) नाताळाची खरेदी करण्यासाठी थेटरामधून बाहेर पडतात असा प्रसंग आहे. हा पहिल्या दिवशी चित्रित झालेला पहिला प्रसंग. यात मायकेलला त्याच्या वडिलांवर झालेल्या हल्ल्याबद्दल कळतं आणि तो वर्तमानपत्र उघडून बातमी शोधायला लागतो. यातील वर्तमानपत्राचे शॉट ‘स्टार वॉर्स’चा दिग्दर्शक जॉर्ज लूकास याने चित्रित केले होते. तो कोपोलालानिर्मितीमध्ये मदत करत होता.

११. टॉम हेगन आणि एमिलीयो बार्झिनी (रिचर्ड कोन्ते) यांच्या भेटीचा प्रसंग चित्रित होत असताना बातमी आली की बर्फाचं वादळ येणार आहे. कोपोला पाऊस किंवा वादळ यासाठी शूटिंग कधीही थांबवीत नाही. याला तो “special effects for free” म्हणतो. इथेही तेच झालं आणि वादळामुळे उलट प्रसंगाला अधिक उठाव आला.

१२. मायकेल हॉस्पिटलमध्ये जातो त्या प्रसंगात जॉर्ज लूकासने सुचवलं की प्रसंगाची नाट्यमयता वाढवण्यासाठी रिकाम्या खोल्या आणि कॉरिडॉरचे काही शॉट्स घ्यायला हवेत. मग लूकासने चित्रित केलेल्या प्रसंगांमधून काही शॉट्स निवडले. दिग्दर्शकाने ‘कट’ म्हटल्यानंतर रिकाम्या फ्रेमचे काही प्रसंग होते जे इथे कामी आले. इथे कोपोला म्हणतो, “एरवी निरुपयोगी वाटणाऱ्या गोष्टीही प्रसंगी उपयोगी पडू शकतात.”

१३. ऍल पचिनोने दंतवैद्याकडे जाऊन त्याचा जबडा खरोखरीच शिवून घेतला होता. नेहमी आपण चित्रपटात बघतो की अभिनेता मार खाल्ल्यानंतरही नंतरच्या प्रसंगात ताजातवाना दिसतो. कोपोलाला हे टाळायचं होतं.

१४. सोलोझ्झोला मारल्यानंतर पोलीस अंडरवर्ल्डच्या गुन्हेगारांचा सफाया करतात या प्रसंगात एक माणूस पियानो वाजविताना दिसतो. हे कोपोलाचे वडील आणि ते त्यांनीच बनविलेली एका धून वाजवीत होते.

१५. शूटिंग सुरू व्हायला दोन आठवडे असताना कोपोलाने सगळ्या कलाकारांना एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला बोलावलं. ब्रँडो टेबलाच्या अग्रभागी, त्याच्या एका बाजूला ऍल पचिनो, जिमी कान. दुसऱ्या बाजूला रॉबर्ट डुव्हाल. कोपोलाची बहीण तालिया शायर जिने कोनीची भूमिका केली ती किचनमधून पदार्थ आणून वाढत होती. कोपोलाने सगळ्यांना त्यांच्या भूमिकांप्रमाणे वागायला सांगितलं. त्याच्या मते यामुळे कलाकारांना एकमेकांबरोबर संवाद साधण्यात बरीच मदत झाली.

१६. चित्रपटाच्या शेवटी मायकेलच्या मुलाचा बाप्तिस्मा होताना दाखवला आहे. हे बाळ म्हणजे कोपोलाची मुलगी सोफिया कोपोला. चित्रपटात तिचा बाप्तिस्मा मुलगा म्हणून होतो.

१७. लॉस अँजेलिसमध्ये चित्रपटाचे संकलन चालू असताना स्टुडिओकडून कोपोलाला इतकी तुटपुंजी रक्कम मिळायची की तो जिमी कानच्या नोकराणीच्या खोलीत राहायचा जेणेकरून जे काही थोडेबहुत पैसे वाचतील त्यातून घर चालवायला मदत व्हावी.

१८. चित्रपटात पीटर क्लेमेंझाच्या तोंडी एक अजरामर संवाद आहे, “Leave the gun. Take the cannoli.” हा संवाद क्लेमेंझाचे काम करणाऱ्या रिचर्ड कास्तेलानोला ऐनवेळी सुचला.

१९. “इटालियन-अमेरिकन संस्कृती इतक्या बारकाईने चित्रित करणे आणि ते ही एका माफियावर आधारित चित्रपटात ही त्या काळात एका नवलाईची गोष्ट होती.”

२०. “द गॉडफादर चित्रित करताना मी फारच असंतुष्ट होतो. मला सगळ्यांनी सांगितलं होतं की माझ्या कल्पना अवास्तव आणि निरुपयोगी आहेत. तेव्हा माझ्यात अजिबात आत्मविश्वास नव्हता. मी तिशीच्या आसपास होतो आणि परिस्थितीशी कसाबसा लढा देत होतो. त्यावेळी मला हा चित्रपट एका भयानक स्वप्नासारखा वाटत होता. मला कल्पनाही नव्हती की पुढे जाऊन हा केवळ यशस्वीच नव्हे तर चित्रपटाच्या इतिहासात एका मैलाचा दगड म्हणून ओळखला जाईल. म्हणून मला काम करणाऱ्या तरुण मुला-मुलींबद्दल नेहमी आत्मीयता वाटते. लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या कल्पनांना तुच्छ मानतात आणि ज्यामुळे कदाचित तुमची नोकरीही जाऊ शकते, ३० वर्षांनंतर त्याच कल्पनांसाठी तुमचा गौरव केला जाईल. तुम्हाला आवश्यकता आहे ती धैर्याची.”

Comments

2 responses to “डायरेक्टर्स कट : द गॉडफादर”

  1. Sumitra kshirsagar Avatar
    Sumitra kshirsagar

    Excellent …👌🏻👌🏻👌🏻💐

    1. Raj Avatar
      Raj

      Thanks!