Category: टिव्ही

  • जपानी बटर राईस? छे! हा तर आपला तूप भात

    या दोन्ही मालिकांमध्ये जपानी संस्कृती, विशेषतः त्यांची आस्वाद घेण्याची वृत्ती प्रकर्षाने जाणवते. आपली भारतीय खाद्यसंस्कृतीही समृद्ध आहे पण आपल्याकडे अशी मालिका किंवा चित्रपट बनल्याचे आठवत नाही. जर कुणी बनवलाच तर त्यात इतर फाफटपसारा इतका असतो की पदार्थाचा आस्वाद घ्यायचे कुठेतरी राहून जाते.

    ‘सामुराई गॉर्मे’ मालिका सुरू होते तेव्हा ताकेशी कासुमी झोपेतून जागा होतो, घड्याळाकडे बघतो आणि जपानीतल्या ज्या काही शेलक्या शिव्या असतील त्या हासडत बायकोवर कातावतो, “मला लवकर का उठवलं नाहीस? ऑफिसला जायला किती उशीर होईल आता?” बायको शांतपणे टेबलाकडे बोट दाखवते. तिथे एक भला थोरला बुके आणि शुभेच्छा कार्ड पडलेली. मग त्याला आठवतं, आपण तर काल  रिटायर झालो. बायको म्हणते, मला योगा क्लासला जायचंय, दुपारी काहीतरी खाऊन घ्या.

    निवृत्तीचा पहिला दिवस. बाहेर जावं म्हणून निघतो आणि सवयीने रेलवे क्रॉसिंगजवळ पोचतो तेव्हा लक्षात येतं आज तर ऑफिस नाहीये. मग रस्ता बदलतो आणि वाटेवर एक हाटेल दिसतं. रोज त्या वाटेवरुन जायचा पण हे हाटेल इथे आहे हे त्याला ठाऊक नव्हतं. मग एका हाटेलात जाऊन ऑर्डर देतो तर तिथे मेन्यूवर बिअर दिसते. घ्यायची इच्छा होते पण भर दुपारी? तेवढ्यात तिथे एक सामुराई प्रगट होतो आणि भर दुपारी साके मागवून पितो. ते पाहून ताकेशीला धीर येतो आणि तो ही बिअर मागवतो. बहुतेक भागांमध्ये हाच पॅटर्न दिसतो. ऐनवेळी सामुराई प्रगट होऊन मार्ग दाखवतो. सुरुवातीला ताकेशीची ओळख करून देताना निवेदक हा आधुनिक सामुराई नव्हे असं मुद्दाम सांगतो.

    मालिकेची विशेषता म्हणजे प्रत्येक भागात ताकेशी पुढे असेल तो पदार्थ इतका मन लावून खातो की ते पाहून आपण रोज जे करतो ते फक्त उदरभरण असं वाटायला लागतं. दुर्दैवाने सगळे पदार्थ मांसाहारी आहेत मात्र ते जसे अपेक्षित आहेत तसे समरसून खाल्लेले बघून त्यामागची भावना पोचते. यात अर्थात संस्कृतीचा भाग आहे. क्रोकेट (तळलेले मांसाचे तुकडे) बिअरसोबतच चांगले लागतात. इथे परत ताकेशीला लहानपणी तो मित्रांबरोबर क्रॉकेट खायला जायचा ते आठवतं.

    एक जगप्रसिद्ध समीक्षक याला ‘फूड पॉर्न’ म्हणतात. म्हणोत बापडे. आम्ही याला आयुष्यातील साध्या गोष्टींचा निर्भेळ आनंद घेणे म्हणतो. जिवाजीराव म्हणतात तसं “असतो एकेकाचा दृष्टिदोष.”

    दुसरी जपानी मालिका आहे ‘मिडनाईट डायनर : टोकियो स्टोरीज.’ दुसऱ्या एका समीक्षकांना (हे ही जगप्रसिद्ध बरं का!) ही मालिका बघून मुराकामी आठवला. ते वाचून आम्हाला आमची आणि बिचाऱ्या हारुकीची वायली वायली दया आली. मूळ पुस्तक न वाचता नुसते पुस्तकावरचे लेख वाचून मतं बनवली की असे वांधे होतात, असो. हे डायनर म्हणजे एक लहानसं हाटेल वजा बार. उघडतो रात्री १२ ला आणि बंद होतो सकाळी ७ ला. रात्रपाळी करणारे, पोलीस, चोर, याकूझा माफिया, बारामधल्या नर्तक्या अशी इथली नेहेमीची गिऱ्हाईकं. डायनर चालवणारा मास्टर (जपानीत ‘मास्ता’) तुम्हाला जो पदार्थ हवा तो बनवून देतो जर त्याच्याकडे सामग्री असेल तर. मग कधीकधी गिऱ्हाईकं येताना सामग्री घेऊन येतात.

    Japanese butter rice
    जपानी बटर राईस

    प्रत्येक भागात एक किंवा अधिक पात्रांची गोष्ट, बरेचदा गुंतागुंतीची आणि भावनोत्कट. मालिकेची खासियत ही की ज्या कथानकावर तीन तास चित्रपट ओढता येईल किंवा साताठशे भागांची ‘कुणालाही काहीच कळेना’ टाइप​ मालिका सहज खपेल ते इथे वीस मिनिटात संपतं. प्रत्येक कथानकाशी निगडित एक पदार्थ, पात्रे तो खात असताना कथा पुढे सरकते. शेवटी पदार्थाची कृती. दोन ताटातूट झालेले भाऊ किंवा कधीही ना भेटलेले बाप आणि मुलगी वीस मिनिटात आपल्या अडचणी सोडवतात आणि आवडत्या पदार्थावर यथेच्छ ताव मारतात.’मिडनाईट डायनर : टोकियो स्टोरीज’च्या एका भागात एका सुप्रसिद्ध खाद्य समीक्षकाला त्याचा चेला डायनरमध्ये घेऊन येतो. नेहेमी पंचतारांकित हाटेलात जेवणारा समीक्षक या जागेकडे काहीश्या तुच्छतेने बघत असतो. मग एक गिऱ्हाईक येतं आणि बटर-राईस मागतं. बटर-राईस म्हणजे गरम भातावर लोण्याचा गोळा सोडायचा. लोण्यात मीठ असतं त्यामुळे वरून घालायची गरज नाही. वाटल्यास थोडं सोया सॉस. ते पाहून मी म्हणालो, “हा तर आपला तूप-भात!” ते गिऱ्हाईक ज्या तन्मयतेने तो बटर-राईस खातं ते पाहून समीक्षकाला जाग येते आणि तोही तीच डिश मागवतो.या दोन्ही मालिकांमध्ये जपानी संस्कृती, विशेषतः त्यांची आस्वाद घेण्याची वृत्ती प्रकर्षाने जाणवते. आपली भारतीय खाद्यसंस्कृतीही समृद्ध आहे पण आपल्याकडे अशी मालिका किंवा चित्रपट बनल्याचे आठवत नाही. जर कुणी बनवलाच तर त्यात इतर फाफटपसारा इतका असतो की पदार्थाचा आस्वाद घ्यायचे कुठेतरी राहून जाते.

  • मिर्झापूर सिझन २

    ‘मिर्झापूर सिझन २’ चा पहिला भाग जरा कंटाळवाणा वाटला. तीच ती गुंडगिरी, प्रत्येक दोन शब्दानंतर माता-भगिनी स्मरण​, डास​-चिलटे मारावीत तशी माणसे मारणे – हे सगळे कथानकाच्या ओघात आले तर ठीक वाटते. हे सोडून दुसरे काही कथानकच नसेल तर कंटाळा यायला लागतो. एक भाग बघितला आहे आता बहुधा फास्ट फारवर्ड करून शेवटी कोण मरतो आणि कोण…

    ‘मिर्झापूर सिझन २’ चा पहिला भाग जरा कंटाळवाणा वाटला.

    तीच ती गुंडगिरी, प्रत्येक दोन शब्दानंतर माता-भगिनी स्मरण​, डास​-चिलटे मारावीत तशी माणसे मारणे – हे सगळे कथानकाच्या ओघात आले तर ठीक वाटते. हे सोडून दुसरे काही कथानकच नसेल तर कंटाळा यायला लागतो. एक भाग बघितला आहे आता बहुधा फास्ट फारवर्ड करून शेवटी कोण मरतो आणि कोण राहतो ते बघावे आणि मुक्ती मिळवावी.

    पुढचे भाग बघितल्यावर अगदी सोडून देण्याइतकी वाईट आहे असे वाटत नाही. अभिनय चांगला आहे त्यामुळे एकदा बघू शकतो. पण आधीचा मुद्दा आत्ताही ग्राह्य आहे. सगळ्या सीझनचा एकच हेतू आहे – बदला. त्यामुळे हिंसाचार अती झाला आहे. हिंसाचार असणेही गैर नव्हे पण​ तो कसा दाखविला आहे यावर बरेचसे अवलंबून असते. ‘गॉडफादर’ हा गुन्हेगारीवरचा अजरामर चित्रपट​. पण त्यात पडद्यावर फारच कमी हिंसा दाखवली आहे. तरीही तो परिणामकारक आहे. मिर्झापूरमधली हिंसा बटबटीत आहे त्यामुळे ती बघायचा कंटाळा येतो. उघड हिंसा कलात्मक रीतीने दाखवणे फार कमी लोकांना जमते. टेरेन्टीनोची ‘किल बिल‘ मालिका ठळक अपवाद.

    पंकज त्रिपाठी हा या मालिकेचा आधारस्तंभ. त्याचा अखंडा त्रिपाठी लक्षात राहतो. त्याची मुलाखत बघितल्यावर त्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी किती समृद्ध हे लक्षात येतं.

    ‘गॉडफादर’वरून आठवले. सहाव्या एपिसोडमध्ये गोलू आणि गुड्डू बिहारमध्ये बोलणी करायला जातात तो प्रसंग गॉडफादरवरून जसाच्या तसा उचलला आहे. तिथे डॉन कोर्लिओने सोलोझ्झोबरोबर बोलणी करताना कोकेन व्यापाराला नकार देतो. इथे दद्दा अफीम व्यापाराला नकार देतो. आणि दद्दाचं पात्र ‘गेम ऑफ थ्रोन्स‘च्या टायरियन लॅनिस्टर​वर बेतलेलं आहे.

    या सिझनची एक खासियत म्हणजे स्त्रियांना समान हक्क दिले आहेत​. त्यामुळे गुंडांबरोबर गुंडिणीही बघायला मिळतात​. (यक्ष : यक्षिणी, गुंड : गुंडिणी). ह्याआधी हे ‘सुबुर्रा : ब्लड इन रोम‘ या इटालियन मालिकेत बघितले होते.