Category: संगीत​

  • शंकर-जयकिशन

    बरेचदा असं दिसतं की भारतीय दिग्दर्शक आधी परदेशात लोकप्रिय होतात, आणि मग त्यांना इथे मान्यता मिळते. सत्यजित रेंच उदाहरण प्रसिद्धच आहे, गुरूदत्तला तिकडे प्रसिद्धी मिळाल्यानंतर बर्‍याच लोकांना त्याच्या महानतेचा शोध लागला. पण इथेही एक गंमत आहे. तिकडची प्रसिद्धी कोणत्या स्तरावर मिळते यावर बरंच काही अवलंबून असतं. तिकडच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिक वगैरे मिळालं तर इकडे मान्यतेचा शिक्का लगेच बसतो. पण जर तिकडेही तुमची प्रसिद्धी सामान्य लोकांमध्ये असेल तर त्याला इथे फारशी किंमत दिली जात नाही. याची अनेक उदाहरणे देता येतील – एक प्रमुख उदाहरण आहे राज कपूरचं. पहिल्यापासून राज कपूरला रशिया, आखाती देश इत्यादी ठिकाणी भरपूर लोकप्रियता मिळाली. ‘आवारा’ आणि ‘बूट पॉलिश’ साठी कॅन चित्रपट महोत्सवात नामांकन देखील मिळालं होतं. असं असूनही भारतातील उल्लेखनीय दिग्दर्शकांची यादी जेव्हा केली जाते तेव्हा त्यात राज कपूरचं नाव दिसत नाही. कशी गंमत आहे बघा. समीक्षक रशियन दिग्दर्शक आयझेन्स्टाइनला मानाचं स्थान देतात. आयझेन्स्टाइन ज्या मातीतून आला, ज्या प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं त्याच प्रेक्षकांनी राज कपूरलाही पसंत केलं.

    ‘आवारा’ आजच्या काळात रुचणं कठीण असलं तरी त्या वेळची परिस्थिती बघता दिग्दर्शन आणि कॅमेरा यांच्यात दाखवलेल्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते. (‘घर आया मेरा परदेसी’चा ड्रीम सीक्वेन्स त्या काळात अविश्वसनीय होता.) त्याचबरोबर त्याने नेहमी समाजातील ज्वलंत विषय निवडले हे ही खरं. (‘आवारा’, ‘श्री ४२०’ मध्ये भ्रष्टाचार, गुन्हेगारी किंवा ‘प्रेम रोग’मध्ये विधवा विवाह इ.) खरं तर ‘आवारा’ रशियात इतका लोकप्रिय का झाला याचं मला नेहमी नवल वाटतं. आजच्या पेक्षा त्या काळात पब्लिसिटी इ. वर अनेक मर्यादा होत्या. शिवाय परकीय संस्कृती, भाषा, मध्येच कधीही न ऐकलेल्या ताल-सुरांमध्ये लोक गाणी गात आहेत किंवा नाचत आहेत. हे सर्व असूनही ‘आवारा’ला रशियामध्ये अपूर्व यश मिळालं. एक दोन कारणं दिसतात. ‘आवारा’चा मुख्य गाभा आहे – ‘रोटी’. माणसाच्या अगदी मूलभूत गरजांमधली एक. त्या काळात कम्युनिस्ट रशियामध्ये जी हलाखीची परिस्थिती होती ती लक्षात घेता रशियन प्रेक्षकांना ‘रोटी’साठी गुन्हेगारीच्या मार्गावर जाणारा नायक आतमध्ये भिडला. दुसरं म्हणजे रशियन संस्कृती बर्‍यापैकी मोकळी-ढाकळी आहे. ब्रिटिश किंवा इतर युरोपियन देशांमध्ये जे अनेक शिष्टाचार प्राणांपलीकडे पाळले जातात ते प्रमाण रशियात कमी आहे. भारतीयांमध्येही हा गुण दिसतो. या दोन संस्कृतीमधला अनौपचारिकपणा कदाचित समान धागा ठरला असावा.

    हिंदी गाणी आपल्या जनमानसात किती खोलवर रुजली आहेत याची एक प्रचिती हवी असेल तर विविधभारती ऐकावं. भारतात आजही लाखो लोक आहेत ज्यांचं रेडिओ हे मनोरंजनाचं मुख्य साधन आहे. हातावर पोट असणारे, छोट्या दुकानांचे मालक, आडगावातील विद्यार्थी आणि सर्वात मोठा वर्ग म्हणजे सीमेवरचे जवान – आपल्या आवडत्या गाण्याची फर्माइश हे सर्व लोक आवडीनं करतात आणि यात सैगलपासून रेहमानपर्यंत सर्वांची गाणी असतात. हे पाहिलं की कधीकधी इथे ब्लॉगवर जे लिहिलं जातं ते अल्पसंख्य वाचकांसाठी आहे हे लक्षात येतं. (इथे ‘गांधी’ चित्रपटातील संवाद आठवतो, “भारत का मतलब है खेतों मे काम करनेवाला हर एक किसान, न कि बंबई और दिल्ली के कुछ गिने-चुने वकील.” बाय द वे, ‘गांधी’चं हिंदी रूपांतर किती सुरेख केलं आहे! संवाद कुणाचे आहेत लक्षात नाही पण कुठेही हा अनुवाद आहे असं जाणवत नाही.) याबरोबरच पुणे-मुंबईसारख्या शहरातदेखील हिंदी गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत आणि म्हणूनच आपल्या चित्रपटांचाही.

    राज कपूरच्या परदेशातील लोकप्रियतेचा इतका अनुल्लेख का होतो? एक कारण असं दिसतं की लोकप्रियता म्हणजे टाकाऊ दर्जा असं समीकरण फक्त इथेच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. अर्थात हे समीकरण उच्चभ्रू समीक्षक आणि कलाकारांमध्ये प्रचलित आहे, सामान्य प्रेक्षक बिचारे जे आवडेल, रुचेल, पचेल ते बघतात. ‘लोकप्रिय ते सवंग’ अशा अर्थाची विधानं भल्याभल्यांनी केली आहेत. त्यात भर म्हणजे आपण हिंदी चित्रपटांबद्दल बोलतो आहोत. हिंदी चित्रपट म्हणजे नाच-गाण्यांनी भरलेला एक बिनडोक प्रकार असं गृहीतक असेल तर पुढे बोलायला फारशी जागा उरत नाही. खरं तर परदेशात ‘म्युझिकल’ नावाचा कलाप्रकार असतो तसंच व्यावसायिक हिंदी चित्रपट हा एक वेगळा कलाप्रकार मानायला हवा. समीक्षा करताना त्या प्रकारच्या चित्रपटांच्या बलस्थानांचा विशेष विचार व्हायला हवा.

    फक्त भारतच नव्हे, तर इतर देशातील सामान्य जनतेनेही हिंदी चित्रपट गाण्यासकट स्वीकारला. याचं एक सुरेख उदाहरण नुकतंच बघायला मिळालं. ६० वर्षे उलटून गेली तरी ‘आवारा हूं’ गाणं टोरांटोपासून तुर्कस्थानापर्यंत अजूनही जिवंत आहे. विक्रम सेठनेही ‘फ्रॉम हेवन्स लेक’ पुस्तकात तिबेट-चीन सीमा पार करताना या गाण्याने अनेक वेळा अडचणीत हात दिल्याचं नमूद केलं आहे. हे बघितलं की वाईट वाटतं. राज कपूरला त्याच्या कामामुळे जगभर प्रसिद्धी मिळाली – ‘गार्डीयन’ किंवा ‘न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’मध्ये त्याच्यावर लेख आले नाहीत आणि येणारही नाहीत – पण समीक्षकांची त्याला कधीच फिकीर नव्हती. सामान्य लोकांना त्याचे चित्रपट मनापासून आवडले आणि त्याची पावती आजही त्याला मिळत आहे. पण इतर कलाकारांचं काय? बिचारे शंकर-जयकिशन कुणाला आज आठवतही नाहीत. कधी चर्चा झालीच तर एक त्या कुठल्यातरी साईटचा दाखला देऊन त्यांनी किती चाली चोरल्या यांची यादी देण्यात येते आणि सगळे हिंदी चित्रपट संगीतकार चोर असं तात्पर्य काढण्यात येतं. आज ६० वर्षांनंतरही त्यांच्या चाली जिवंत आहेत याचा अर्थ संस्कृतींना भेदून जाणारं त्यात काहीतरी आहे. (अभिजात कलाकृतीची व्याख्या काय हो?) पण आज याची दखल घेणारे फार थोडे आहेत. जुन्या पिढीतील लोक आजही त्यांच्या आठवणी काढतात पण त्यांच्या संगीताचं निष्पक्ष मूल्यमापन करणारी समीक्षा युनिकॉर्नइतकी दुर्मिळ आहे. कारण एकदा हिंदी चित्रपट भिकार असं ठरवलं की त्यातल्या संगीताकडे कोण बघणार? आणि राज कपूरमुळे किमान शंकर-जयकिशनची ओळख जगाला झाली. सैगलपासून खय्यामपर्यंत बाकीच्या अनेक संगीतकारांचं काय? पुढच्या शतकात त्यांची कुणाला आठवणही नसेल.

    या सर्वांच्या मुळाशी कलेतील जातिभेद आहे. यावर आधीही लिहून झालं आहे. कलेच्या क्षेत्रात रोज नवे आविष्कार होतच असतात. काहींना हे नवे आविष्कार अधिक भावतात, काहींना जुने. नेहमीप्रमाणे आम्ही कुंपणावर. सगळ्यांचं म्हणणं ऐकून जे भावतं त्याला डोक्यावर घेणारे. मुराकामी वाचला तेव्हा हा कुठल्या प्रकारात बसतो याची कल्पनाही नव्हती आणि माहीत करून घ्यायची गरजही पडली नाही. ज्याला जे आवडतं ते त्यानं घ्यावं पण इतरांना अमुक आवडतं याचा अर्थ त्यांची अभिरुची हीन असं सामान्यीकरण व्हायला लागलं की अडचण येते. याहूनही पुढे जाऊन काही लोक अमुक कलाप्रकार सर्वात श्रेष्ठ, आधी जे काही झालं ते चुलीत घाला अशा आरोळ्या मारायला लागतात तेव्हा प्रकरण गंभीर होतं.

    ‘लिव्ह अँड लेट लिव्ह’ ही उक्ती कलाक्षेत्रात (खरं तर सगळीकडेच) येईल तो सुदिन.

  • रॉकस्टार

    काय बोलायचं? जितकी प्रशंसा करणं शक्य आहे ती आधीच करून झाली आहे. आता नवीन शब्द कुठून आणायचे? या पोतडीतून निघालेला लेटेश्ट आविष्कार म्हणजे ‘रॉकस्टार’. रहमानची गाणी ऐकताना नेहेमीप्रमाणे आपल्या ऐकण्यात बदल होत जातात. पहिल्यांदा वाटतं, काय केलय हे? ह्याला गाणं म्हणायचं? नंतर एक दोनदा ऐकलं की ते गाणं आपोआप मनात वाजायला लागतं आणि तुम्हाला कळायच्या आत तुम्ही त्या गाण्याचे पंखे होऊन जाता. मग वाटतं, हे गाणं आपल्याला पहिल्यांदा आवडलं नव्हतं? कसं शक्य आहे आहे हे? आमिर खान एका मुलाखतीत म्हणाला होता, “रंगीलाच्या वेळेस रामू गाण्यांची कॅसेट घेऊन माझ्याकडे आला आणि आम्ही ‘मंगता है क्या, वो बोलो’ ऐकत होतो. मी रामूला म्हणालो, ‘हे काय आहे? तू चुकून साउथच्या गाण्याची कॅसेट तर नाही आणलीस?’ चार-पाच वेळा ऐकल्यावर ते गाणं आमच्या रक्तात भिनलं.”

    असं का होतं याची बरीच कारणं आहेत. एक तर रहमान कधीही नियम पाळत नाही. त्याच्या गाण्यात पुढच्या ओळीत, अंतर्‍यात काय असेल याची कल्पना करणं अशक्य असतं. म्हणूनच जुन्या रूढी प्रिय असणार्‍या लोकांना रहमान भावत नाही. मग त्याच्यावर सिंथेटीक असल्याचा शिक्का मारला जातो. लगान, भगतसिंग किंवा रंग दे बसंतीच्या संगीताला सिंथेटीक कसे म्हणता येईल हे तो दयाघन प्रभूच जाणे. टीकाकारांचे मुख्य ध्येय टीका करणे असते, त्यात सत्याचा अंश किती ही बाब गौण असते. म्हणूनच सत्यजित रेंवर गरीबीचे भांडवल केल्याचा आरोप होतो, ‘खालील अशुद्ध बंगालीतील उतारा शुद्ध बंगालीत लिहा’ असे म्हणून परीक्षेत टागोरांचा उतारा घालण्यात येतो आणि बेथोवनची नववी सिंफनी ऐकताना मला जागे रहाणे अशक्य झाले असे एक टीकाकार म्हणतो. या सर्वांमध्ये एक समान धागा आहे. हे सर्व लोक चाकोरीच्या बाहेर जाऊन काहीतरी नवीन, वेगळे देण्याचा प्रयत्न करीत होते. सत्यजित रेंनी ‘पाथेर पांचाली’ बनवताता तत्कालीन बंगाली सिनेमातील बटबटीत मेलोड्रामा कटाक्षाने टाळला, टागोरांची वैश्विक जाणीव क्षुद्र मनांच्या कुवतीबाहेरची होती आणि क्लासिकल संगीताचे नियम धाब्यावर बसवून बेथोवनने ‘सेल्फ एक्सप्रेशन’चा घालून दिलेला पायंडा काळाच्या पुढे होता.

    गेली काही वर्षे रहमान जागतिक पातळीवर संगीत देतो आहे आणि याचे पडसाद त्याच्या संगीतामध्ये दिसतात. रॉकस्टार हा चित्रपट नावाप्रमाणेच एका गायकाच्या प्रवासावर आधारीत आहे. यात रहमानने तब्बल १३ गाणी दिली आहेत आणि प्रत्येक गाणे वेगळे आहे. मुख्य गायक म्हणून मोहीत चौहानने कमाल केली आहे. ‘मसक्कली’मध्ये जी त्याच्या आवाजाची कसोटी लागली होती तो ट्रेलर होता. ‘रॉकस्टार’ची गाणी गायल्यावर त्याला डबल मॅरॅथॉन केल्यासारखे वाटले असणार. ‘शहर में’ किंवा ‘हवा-हवा’ मध्ये किशोरच्या यॉडलिंगची आठवण करून देणार्‍या करामती आहेत. इथे किशोरदा आणि रहमान एकत्र आले असते तर बहार आली असती असा विचार मनात येतो. रॉकस्टार नाव असूनही रहमानने सर्व गाणी रॉकच्या मुशीत बसवलेली नाहीत. ‘सदा-हक’ हिंदी चित्रपटातील पहिले रॉक गाणे म्हणून ओळखले जावे. (अवधूत गुप्तेंचा ‘कांदेपोहे’ हा मराठीतील प्रयत्न उल्लेखनीय होता. मराठी रांगडी भाषा आहे हे खरेच, मात्र भूतकाळच्या आणि अट्टहास हे शब्द टाळता आले नसते का?) ‘कुन-फाया-कुन‘ ऐकल्यावर ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्यात गेल्याचा भास होतो तर कतेयां करू बाबा बुल्लेशाहची आठवण करून देते. गाण्यातील रहमानच्या प्रयोगांबद्दल काय बोलावे? अरेबिक संगीत, फ्लेमेंको ते पारंपारिक कव्वाली – या माणसाला काहीही वर्ज्य नाही. रॉकस्टारची गाणी तब्बेतीने ऐकण्यासारखी आहेत. त्यातील करामती, लटके-झटके लक्षात यायलाही वेळ लागतो. ‘शीला की जवानी’ साडेतीन मिनिटात ऐकून होते, तसे इथे नाही. हे संगीत अंगात मुरावे लागते.

  • मिल गया…

    रहमानवर लेख लिहिला की प्रतिक्रिया येतात “काही म्हणा, आरडी तो आरडीच.” अहो, पण आम्हाला आरडीही बेहद्द आवडतो म्हणून मग आरडीवर लेख लिहिला की मग म्हणतात, “जयदेव किंवा खय्याम सारख्यांना जी प्रसिद्धी मिळायला हवी होती ती मिळाली नाही. आरडीने उगाच ऑरकेस्ट्रेशनचा ध्यास घेतला.” एक रेघ मोठी करण्यासाठी बाकीच्या लहान का कराव्या लागतात देव जाणे. परवा आंग्लभाषेत लिहिणार एक देशी समीक्षक ‘वोल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’ पाहून इतका प्रभावित झाला की त्याने कपोला आणि स्पिलबर्ग दोघांचीही इज्जत काढली. स्कोरसेझी उत्तम आहेच पण त्याचं कौतुक करण्यासाठी इतरांचा अपमान करण्याची काय गरज? प्रत्येकाचे आवडते कलाकार असतात – लेखक, गायक, संगीतकार. सुरुवातीला ही आवड फॅन असण्याच्या स्वरूपात असते ते ठीकच. पण नंतरही या पातळीवरून पुढे जाता आलं नाही तर अडचण होते. आणि जर तुम्ही समीक्षक असाल तर हे पुढे जाणं अधिक महत्त्वाचं ठरतं. कोणत्याही कलाकाराचे गुण-दोष स्वीकारून शक्य तितक्या निष्पक्षपणे मूल्यमापन करणे ही समीक्षकाची जबाबदारी असते. पण बरेचदा समीक्षा वाचताना रोशाक टेस्टप्रमाणे समीक्षकांचे पूर्वग्रहच अधिक ठळकपणे समोर येतात.

    सुरुवातीच्या मुद्द्याकडे येताना – आरडीचं नाव काढलं की बरेचदा लोक उचलेगिरीचा शिक्का मारून मोकळे होतात. आरडीने आणि इतर हिंदी चित्रपट संगीतकारांनी कमी-अधिक प्रमाणात इतर चालींवरून प्रेरणा घेतली हे सत्य आहे. प्रश्न असा येतो की आजच्या काळात त्यांचं मूल्यमापन कसं करायचं? की या कारणासाठी त्यांची सगळी गाणी बाद ठरवायची? अनिरुद्ध भट्टाचारजी आणि बालाजी विट्टल त्यांच्या आरडीवरच्या पुस्तकात म्हणतात, “Plagiarism and inspiration have been in vogue for quite some time. Previously, there was hardly any stigma attachaed to the same. A stratling example would be ‘Fandango’ in Mozart’s The Marraige of Figaro, which was in fact a note-by-note copy from a movement in C. W. Gluck’s ballet Don Juan. This surely does not make Mozart any less a composer.”

    हे समर्थन आहे का? अजिबात नाही. पण त्या काळातील परिस्थिती लक्षात घ्यायला हवी. बरेचदा निर्मात्याला एखादी पाश्चात्त्य चाल आवडली तर संगीतकाराला त्या चालीवर गाणे बनवावे लागे. मग नासिर हुसेनच्या आग्रहास्तव आरडीला आबाच्या ‘मामा मिया’वरून ‘मिल गया’ बनवावं लागलं. किंवा कधीकधी ‘बॅड पॅच’ चालू असताना संगीतकारांनी असं केल्याचीही उदाहरणे आहेत. हे ऐकल्यावर चाहत्यांना धक्का बसतो त्याचं कारण त्यांनी कलाकाराला कायमचं देव्हाऱ्यात बसवून टाकलेलं असतं. कलाकार माणूस आहे, त्याच्याकडूनही चुका होतात हे त्यांना मान्य नसतं. मग आरडीने वाईट काळ चालू असताना टुकार गाणी दिली हे कबूल करायला जड जातं. पूर्वी मीही कुमार सानूवर प्रखर टीका करत असे. पण नंतर लक्षात आलं की ‘आशिकी’, ‘चुराके दिल मेरा’ अशी गाणी आजही आवडतात. कुमार सानूचं आत्यंतिक सानुनासिक होणं ही चूक होती पण यासाठी या कलाकारांवर संपूर्ण काट मारणं कितपत बरोबर आहे? मग (बरंच उशिरा) लक्षात आलं, टीका कलाकृतीवर असावी, कलाकारावर नको.

    हिंदी चित्रपट संगीतकारांवर टीका करत असताना आणखी एक पूर्वग्रह समोर येतो आणि हा पूर्वग्रह अधिक व्यापक स्वरूपाचा आहे. पाश्चात्त्य देशांशी तुलना करताना नेहमी आपण स्वत:ला मुलीच्या बापाचा दर्जा देऊन पडतं का घेतो हे अनाकलनीय आहे. हिंदी चित्रपट संगीतकार सगळे चोर मात्र पाश्चात्त्य संगीतकार सगळेच्या सगळे ‘वरिजिनल’ हा असाच एक गैरसमज. गूगल हाताशी असतानाही हा गैरसमज हावा हे आणखी एक दुर्दैव. थोडं गुगलून पाहिलं तर पाश्चात्त्य संगीतामधली मोठमोठी नावं यात दिसतील – जॉन लेनन, लेड झॅपलिन, रॉड स्ट्युअर्ट, रोलिंग स्टोन्स, बी जीज, एल्टन जॉन, ब्रूस स्प्रिंगस्टीन. फरक इतकाच की तिकडे प्रताधिकार कायदे पाळले जाण्याचं प्रमाण अधिक आहे म्हणून त्यांच्यावर खटले भरले गेले. काही खटले सिद्ध झाले, काही नाही. आता या सगळ्या संगीतकारांनाही बाद करायचं का?

    गोरी कातडी, सोनेरी केस, निळे डोळे, स्वच्छ रस्ते आहेत म्हणून लोकही आदर्श आहेत असं नाही. हौशे, नवशे, गवशे इथेही आहेत आणि तिथेही. प्रगत देश असल्यामुळे सुबत्ता आहे आणि कायदे पाळले जाण्याचं प्रमाण अधिक आहे. तिथे लोक निमूटपणे चलान भरतात आणि इथे चहापाणी करतात पण ट्रॅफिक सिग्नल दोन्हीकडे मोडले जातात कारण शेवटी दोन्हीकडे माणसंच आहेत. दोन्हीकडचे कलाकारही यातच येतात. कलाकारांना अनेक दिशांनी प्रेरणा मिळत असते. १००% वरिजिनल कलाकृती शोधत बसलात तर शेक्सपियरपासून सर्वांना बाद करावं लागेल. (‘हॅम्लेट’चं कथाबीज ‘उर-हॅम्लेट‘ नावाचं नाटक आहे असं काही अभ्यासकांचं मत आहे.)

  • रंगरेजा

    रहमान गाण्यांचे कोणतेही नियम पाळत नाही हे बरेचदा दिसलं आहे. पण काही वेळा गाण्याचं स्वरूपच असं असतं की त्यात बदल करायला फारशी संधीच नसते. उदा. पारंपारिक कव्वाली. अशा वेळेस रहमान काय करतो हे बघणं रोचक असतं आणि बारकाईनं पहिलं तर काही गमती दिसतात. हे म्हणजे ऑफ साइडला सात-आठ गड्यांची अभेद्य भिंत, ग्लेन मॅग्रा गुडलेंग्थ अधिकउणे १.७५ इंच अशा लेव्हलचा बॉल टाकतोय आणि या सगळ्यांना न जुमानता बॉल बाउंडरी लाइन के पार. गोरा हमाल लोक, चेंडू लाव. जल्दी. बॅट्समन – पैचान कोन?

    रॉकस्टारमधली ‘कुन फाया कुन’ ही कव्वाली ऐकताना असाच अनुभव येतो.

    या कव्वालीमध्ये गिटारचा वापर केला आहे. कव्वाली सुरू होते हजरत निझामुद्दीन औलिया यांच्या स्मरणाने. नंतर येते ‘रंगरेजा’ ची हाक. रंगरेजा म्हणजे कपडे रंगवणारा, ‘कुन’ म्हणजे ‘हो जा’ किंवा ‘तथास्तु’. ‘कुन फाया कुन’ चा अर्थ होतो ‘जशी इच्छा होती तसंच झालं’. कव्वालीचं पहिलं कडवं संपल्यावर एक ओळ येते, ‘सदक उल्लाह अल्लीउम अज़ीम’ आणि यानंतर गिटारचा एक तुकडा. या ओळीचा उत्तरार्ध – सदक रसुलहम नबी यूनकरीम, सलल्लाहु अलाही वसललम’ – नंतरच्या कडव्यानंतर येतो. ही रहमानची खासियत आहे. बहुतेक गाण्यांमध्ये दोन कडव्यांच्या मध्ये एकाच प्रकारचा तुकडा असेल तर तो प्रत्येक वेळी तसाच वाजवला जातो. रहमान शक्यतो तोच तुकडा वापरतच नाही, पण वापरायचाच झाला तरी त्यात असे बदल करतो. यामुळे दुसर्‍या कडव्यानंतर संपूर्ण तुकडा ऐकताना त्याच्या नाविन्यामुळे गोडी आणखी वाढते. शिवाय गाण्यात हे कडवं अधिक महत्वाचं आहे. ‘मुझ को हो दीदार मेरा’ ही सूफी वाटेने जाणारी मागणी त्यात केली आहे.

    कव्वालीच्या शेवटी मुख्य स्वर चालू असतानाच पार्श्वभूमीत रंगरेजाचा आलापही चालू असतो. एकाच वेळी दोन किंवा अधिक स्वतंत्र सुरावटी/मेलडी वाजवण्याचा हा ‘पलीफनी‘ नावाचा प्रकार पाश्चात्य शास्त्रीय संगीतात विशेष लोकप्रिय आहे. सतराव्या शतकातील बरोक संगीतामध्ये बाखने पलीफनीचे अफलातून प्रयोग केले आहेत. बाख म्हणजे पलीफनीचा बेताज बादशहा. त्याच्या संगीतामध्ये अनेक सुरावटी स्वतंत्रपणे मनमुराद हिंडतात, मोक्याच्या ठिकाणी एकत्र येऊन एकमेकांना साथ देतात आणि परत स्वतंत्र वाटांनी जातात. नमुन्यादाखल चवथ्या ब्रॅंडेनबर्ग कोंचेर्तोचा हा भाग ऐकून पहा. यातलं प्रत्येक प्रमुख वाद्य स्वतंत्र सुरावट वाजवतं आहे. तुमचा कान जितका जास्त ‘तयार’ असेल तितके अधिकाधिक खजिने यात तुम्हाला सापडू शकतील. रहमानने ‘कुन फाया कुन’ मध्ये पलीफनीचा फारच थोडा वापर केला आहे. यापेक्षा रंगीला मधल्या ‘मंगता है क्या’ गाण्याच्या शेवटचा एक मिनिटभर श्वेता आणि रहमान यांनी गायलेली पलीफनी अशक्य आहे. आणि जुनं उदाहरण हवं असेल तर आरडी-किशोर-आशा यांचं ‘जाने जां, ढूंढता फिर रहा’ ऐकाच ऐका.

    इतकं सगळं झाल्यावर कव्वालीत हे सगळं खरंच आहे का असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. पण कलेमध्ये हा एक फायदा असतो. तुम्हाला त्यातून जे मिळतं ते तुमच्यापुरतं सत्य असतं आणि अशी प्रत्येकाची सत्यं वेगळी असली तरी चालतं. म्हणूनच गोलमालमध्ये लकी शर्मा म्हणतो, “गाने में दोन और दो चार ही नही पाच हो सकते है, तीन हो सकते है, जीरो भी हो सकता है.”

    ‘गोलमाल’वरून आठवलं. ‘गोलमालमध्ये उत्पल दत्तने अमोल पालेकरला खाल्लं’ अशा अर्थाचं वाक्य एकदा कुठेतरी वाचनात आलं होतं. ते वाचल्यावर मला उत्पल दत्त, अमोल पालेकर आणि ऋषिदा तिघांचीही आळीपाळीने दया आली. अर्थात पुढच्याच क्षणाला त्यांच्यावर दया करणारा ‘तू कोण टिकोजीराव’ असा प्रश्नही मनात आला.

    खरं तर या चित्रपटात उत्पल दत्तपेक्षा अमोल पालेकरची भूमिका अधिक गुंतागुंतीची आहे. भवानीशंकरची व्यक्तीरेखा चित्रपटातच डेव्हीड म्हणतो त्याप्रमाणे ‘स्ट्रॉंग लाइक्स ऍंड डिसलाइक्स’ असलेली आहे. उत्पल दत्तने तिला पूरेपूर न्याय दिला आहे यात वादच नाही पण उत्पल दत्तसारख्या कसलेल्या कलाकाराकडून​ हे अपेक्षित आहे. याउलट रामप्रसादच्या भूमिकेमध्ये डबल नाही तर ट्रिपल रोल आहे आणि तिन्ही भूमिका अमोलने अशा खुबीने रंगवल्या आहेत की चित्रपट कितीही वेळा पाहीला तरी त्याचा ताजेपणा कमी होत नाही. चित्रपटाच्या सुरूवातीला आपल्याला दिसणारा रामप्रसाद क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यांच्यामध्ये रमणारा आहे पण तो खुशालचेंडू नाही. आपल्यावर असलेल्या जबाबदारीची त्याला जाणीव आहे म्हणूनच फक्त १२% विद्यार्थी पास झाले असतानाही त्यात त्याचाही नंबर लागतो. या रामप्रसादला नोकरी मिळवण्यासाठी रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा व्हावं लागतं. या भूमिकेत अमोलने आधीच्या भूमिकेतील मजा करणारा भाग काढून टाकला आहे आणि गंभीर असणारा भाग अतिशयोक्ती वाटावी इतका ‘प्रोजेक्ट केला आहे. पण रामप्रसाद नुसता खाली मान घालून अभ्यास करणारा स्कालर नाही. या भूमिकेत असताना त्याला बरेचदा चलाखी वापरावी लागते. कधी ‘अगं अगं म्हशी मला कुठे नेशी’ म्हणत उत्पल दत्तला हवं तसं ‘मनूव्हर’ करायचं, तर कधी खुंटा हलवून बळकट करायचा आणि हे सगळं करताना पितळ उघडं पडलं तर हुशारीनं वेळ मारुन न्यायची, हे सगळे प्रकार त्याला करावे लागतात. ही चलाखी मूळ रामप्रसादमध्येच असणार हे उघड आहे.

    नंतर कर्मधर्मसंयोगाने लक्ष्मणप्रसाद उर्फ लकी अवतरल्यावर या भूमिकेत अमोलने आधी केलं त्याच्या उलटं करताना कसलंही गांभीर्य नसणारा खुशालचेंडू तरूण रंगवला आहे. पण या तरूणात काही नव्या छटाही आहेत. मूळ रामप्रसाद वडीलधार्‍यांचा मान राखून असतो, लकी कुणाचीही बूज राखत नाही हे त्याच्या एंट्रीच्या ‘हाय माली! बुढ्ढा… है घर में?’ या वाक्यावरूनच स्पष्ट होतं. या तिन्ही भूमिकांमध्ये अमोलची देहबोली वेगवेगळी आहे. लकीचं किल्ली फिरवणं, देव आनंदची ष्टाइल मारणं किंवा प्रकरण हाताबाहेर जायला लागल्यावर मूळ रामप्रसादने डोक्यावर हात आपटून घेणं अशा अनेक लकबी यासाठी त्याने वापरल्या आहेत. या भूमिका बजावताना कधीकधी त्या एकमेकांत सांडतात. तीन वाजता फोन आल्यावर रामप्रसाद जोरात ‘सर, फोन’ म्हणून ओरडतो किंवा अचानक भवानीप्रसाद घरी आल्यावर आतून आईची हाक येते आणि लकी ‘मां’ म्हणून ओरडतो.

    तर प्रत्येक वेळी ‘गोलमाल’ बघताना हे खाण्यापिण्याचं आठवायचं. तेव्हा या चित्रपटात कुणीही कुणाला खाल्लेलं नाही, सगळे उपाशीपोटीच कामं करत होते हे एकदा स्पष्ट करावं असं वाटलं.