Category: बुके वाचिते

  • लिहित्या लेखकाचं वाचन

    डॉ. विलास सारंग यांचं ‘लिहित्या लेखकाचं वाचन’ हे पुस्तक​. त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या विविध लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. पुस्तक वाचनीय आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक लेखात काहीतरी नोंद घेण्याजोगं सापडतं.

    डॉ. विलास सारंग यांचं ‘लिहित्या लेखकाचं वाचन’ हे पुस्तक​. त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या विविध लेखांचं संकलन या पुस्तकात आहे. पुस्तक वाचनीय आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक लेखात काहीतरी नोंद घेण्याजोगं सापडतं. बालकवींच्या ‘औदुंबर’ या कवितेची वेगवेगळ्या समीक्षकांनी केलेली समीक्षा किंवा लक्ष्मण माने यांची ‘उपरा’तील लेखनशैली आणि हेमिंग्वेच्या लेखनशैलीशी तिचं असलेलं साम्य यासारखे सखोल वाचन आणि सूक्ष्म निरीक्षणातून आलेले निष्कर्ष हे या पुस्तकाचं ठळक वैशिष्ट्य​ म्हणावं लागेल​. डॉ. सारंग यांनी साहित्यावर बरंच संशोधन केलेलं आहे. मुंब​ई विद्यापीठ आणि इंडियाना विद्यापीठ या दोन्ही ठिकाणी त्यांनी स्वतंत्रपणे संशोधन करून दोनदा पीचडी मिळवली आहे. इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये लिहिणार्‍या मोजक्या लेखकांमध्ये त्यांचा समावेश होतो.

    ‘शेक्सपिअरचं भाषांतर’ या लेखात सारंग विंदा करंदीकर यांनी केलेलं ‘किंग लिअर’ आणि अरुण नाईक यांनी केलेलं ‘हॅम्लेट’ या दोन भाषांतरांचा आढावा घेतात​. ‘किंग लिअर’बद्दल त्यांचा मुख्य मुद्दा आहे की इंग्रजीतून मराठीत येताना वाक्यरचनेत जो नैसर्गिक बदल करायला हवा तो विंदांनी केलेला नाही. उदा. ‘I went to school’ याचं भाषांतर ‘मी शाळेला गेलो’ असं व्हायला हवं पण पण विंदांच्या पद्धतीनुसार ते ‘मी गेलो शाळेला’ असं होईल​. मराठी गद्यात अशी वाक्यरचना कृत्रिम वाटते. विंदा इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक होते. त्यांची विद्वत्ता आणि दांडगा व्यासंग त्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनेतून दिसतो असं सारंग नमूद करतात​. तरीही वाक्यरचना उलटी करण्याचं कारण काय​? मराठी वर्तमानपत्रेही ही प्रथा का पाळतात हा वैताग आणणारा प्रश्न आहे. कहर म्हणजे अशी वाक्यरचना करून मथळ्यात यमक जुळवलं की उपसंपादकांना दिवस सार्थकी गेल्यासारखं वाटतं. असे मथळे पाहिले की त्या वर्तमानपत्राच्या हापिसात जाऊन फुलटू राडा करावासा वाटतो. जर वर्तमानपत्रांनीच भाषेची बूज राखली नाही तर कसं व्हायचं? सारंग यांच्या मते अशी वाक्यरचना अधिक नाट्यपूर्ण वाटते. यामुळे रसभंग होतो या सारंग यांच्या मताशी पूर्ण सहमती आहे. वर भर म्हणून सुटसुटीत प्रतिशब्द वापरण्याऐवजी विंदा संस्कृताळलेले बोजड शब्द वापरतात​. ‘राइपनेस इज ऑल’ या ओळीचं भाषांतर करताना ‘पिकलेपण’ या सोप्या शब्दाऐवजी विंदा ‘परिपक्वता’ वापरतात​. ‘हॅम्लेट’च्या बाबतीतही हेच​. ‘तूही नाही करणार अन्याय माझ्या कानांवर’ अशी कृत्रिम वाक्यरचना सहन करत सगळं नाटक वाचावं लागतं. ओघवती भाषा हे ज्याचं वैशिष्ट्य असा शेक्सपिअर या प्रकारे वाचावा याहून मोठं दुर्दैव नसावं.

    ”उपरा’ आणि हेमिंग्वे’ या लेखात लक्ष्मण माने यांच्या भाषाशैलीबद्दल सारंग म्हणतात​, “मराठी भाषेत अशी भाषाशैली क्वचितच आढळते…ज्याने मराठीला एक नवीन​, ताजी भाषाशैली दिली आणि ज्याची शैली हेमिंग्वेची आठवण करून देते, असे लेखक मराठीत किती आहेत​?” इथे दुर्गाबाईंची शैलीदार भाषा किंवा ‘बलुतं’मध्ये केलेलं जाणीवपूर्वक वाड़मयीन लेखन याच्याशी ‘उपरा’ची तुलना करतात​. एक उदाहरणार्थ लेखही आहे पण तो टीकात्मक असल्याने ‘पंथी’यांना उदाहरणार्थ कितपत रुचेल कल्पना नाही. ‘जातककथांमधील वास्तववाद’ हा लेख दुर्गाबाईंनी मूळ पाली भाषेतून अनुवाद केलेल्या सिद्धार्थ जातक च्या आठ खंडांवर आहे. सहाव्या शतकात लिहिल्या गेलेल्या या ग्रंथांवरील हा लेख दुर्गाबाईंच्या विद्वत्तेची झलक दाखविणारा आहे. हे सर्व आठ खंड वाचून होणं अशक्य वाटतं, निदान काही भाग तरी वाचावा अशी इच्छा मात्र नक्कीच होते. पुस्तकातील अनेक गोष्टी उल्लेखनीय आहेत​. किंबहुना प्रत्येक लेखाबद्दल विशेष​ असं काहीतरी लिहिता येईल​. खरं तर अशी दोन​-तीन उदाहरणे देऊन लेख संपवायला आवडलं असतं पण पुस्तकात जश्या अनेक उल्लेखनीय गोष्टी आहेत तशाच काही गोष्टी खटकणार्‍याही आहेत​. यातील काही किरकोळ आहेत​, पुढील आवृत्त्यांमध्ये सहज सुधारता येतील आणि काही गंभीर आहेत​. इथे केवळ छिद्रान्वेषीपणा करण्याचा हेतू नाही, मात्र इतक्या गंभीर चुकांकडे दुर्लक्ष करता येणेही अशक्य आहे.

    पहिला मुद्दा किरकोळ आहे – लेखक किंवा उपसंपादक यांची डुलकी या सदरात मोडणारा. बा. सी, मर्ढेकर यांच्यावरील लेखात सारंग त्यांच्या कवितांवर इटालियन कवी दान्तेचा प्रभाव होता काय याची मीमांसा करतात​. सुरुवातीला “दान्ते (इंग्रजी सवयीप्रमाणे आपण डाण्टे असं म्हणू)” असं वाक्य येतं. मग मर्ढेकरांच्या ‘शिशिरागम’ कवितेतील ओळी येतात​. “दान्ते-नि-शेक्सपिअर-संगत आपणास​” (मर्ढेकरांनी दान्ते हा मूळ उच्चार वापरला आहे हे विशेष​.) नंतर सारंग आपण आधी काय लिहिलं होतं ते विसरून जातात आणि ‘दान्ते’ वापरतात​. मग हा उच्चार जर इतका नैसर्गिक आहे तर इंग्रजी उच्चाराच्या फंदात पडायचंच कशाला? खरं तर इटालियन भाषेतील​ उच्चार अत्यंत सोपे आहेत​, आपल्याकडचे ‘त’ आणि ‘द’ चे उच्चार त्यांच्याकडे जसेच्या तसे आहेत​. तरीही मराठीत इटालियन (किंवा इतर भाषेतीलही) नावं लिहिताना जे अनंत घोळ घातले जातात त्याला तोड नाही. सर्वात विहंगम घोळ​ – भाषेचं नाव​ बरेच लोक ‘इतालियन’ असं लिहितात​. इथे ‘त’ कशासाठी? देशाचं नाव कसं लिहाल​? इटली का इतली? मग भाषेचं नावही तसंच लिहा नं – इटालियन. बरं पुढे जाऊन ‘इतालियन’ हा शब्द सोडला तर बाकी सर्व शब्दांमध्ये ‘त’ च्या जागी ‘ट​’. उदा. ‘इतालियन’ संस्कृतीमध्ये ‘कियांटी’ ही वाइन प्रसिद्ध आहे. पिऊन झाल्यावर टीच​​ बातली हाणा आमच्या तालक्यात म्हणजे निदान आमची ट्रेधाटिरपीत टरी थांबेल​. (पूर्वी भयाण मनोजकुमारच्या भयाण चित्रपटांमध्ये टॉम अल्टर आणि बॉब क्रिस्टो अशी भयाण वाक्ये भयाणपणे बोलत असत​.) हिंदीमध्ये ‘इतालवी’ असं लिहितात पण तिथे तो स्वतंत्र शब्द आहे आणि बाकी सर्व गोष्टींसाठी ‘त’ च वापरतात​. ‘इटली’ हे इंग्रजीकरण झालेलं नाव आहे. मूळ नाव वापरायचं असेल तर ‘इतालिया’ असं म्हणायला लागेल​. बरेच​ देश किंवा शहरं यांच्या नावांचं इंग्रजीकरण झालं आहे. आता ही नावं रुळली आहेत त्यामुळे ती बदलण्यात अर्थ नाही. पण माणसांच्या नावाचं काय​? माझ्या मते कोणत्याही माणसाच्या नावात कुणालाही बदल करण्याची मुभा नसावी. नाव ही माणसाच्या मूलभूत ओळखींपैकी एक महत्त्वाची ओळख आहे. असं असतानाही मराठी लेखक परकीय नावांबद्दल जो निष्काळजीपणा दाखवतात ते पाहून वाईट वाटतं. मग Foucault (फूको)चा उच्चार फूकोल्ट, Da Vinci (दा विंची)चा दा व्हिंसी, Antonioni (अंतोनियोनी)चा अंटोनियोनी किंवा le Carré (ल कारे)चा ल कार​. (‘इ’ वर ऍक्सेंट असेल तर त्याचा उच्चार ‘ए’ होतो.) एक गोष्ट खरी की सर्वांना सर्व उच्चार माहीत असावेत ही अपेक्षा नाही. पण मग थोडे कष्ट घेऊन शोधा की. फोर्वो आहेच​ किंवा यूट्यूबवर ‘How do you pronounce Foucault’ असा सर्च करा. बहुतेक सर्व परकीय नावांचे उच्चार ऐकता येतील​. गांधींचं नाव घँडी किंवा बुद्धाचं नाव बूडा हे इंग्रजीकरणाचे प्रताप आहेत​. निदान मराठीत लिहिताना तरी आपण माणसांच्या नावांचं इंग्रजीकरण न करता मूळ​ नावं लिहायला हवीत​.

    पुढचा मुद्दा गंभीर आहे. औदुंबरवरच्या समीक्षांची चर्चा करताना सारंग म्हणतात​, “जगात (कलेच्या वा वास्तव​) शक्यता एकवटलेल्या नसतात​, तर विखुरलेल्या असतात​. या भूमिकेला वैज्ञानिक पाठबळ आहे. अद्ययावत विज्ञान आपल्याला सांगतं की वस्तुस्थिती काय आहे, हे आपल्याला कधीच खात्रीपूर्वक सांगता येत नाही. फॅक्ट किंवा सत्य हे आपल्या कधीच हाती लागत नाही…वेर्नर हायझेनबर्ग या वैज्ञानिकाचं अनिश्चिततेचं तत्त्व आता बहुतेकांना माहीत झालं आहे.” थोडक्यात औदुंबर कवितेचा विविध समीक्षकांनी लावलेल्या अर्थाचा संबंध सारंग हायझेनबर्गच्या अनिश्चिततेच्या तत्त्वाशी जोडतात​. स्पष्ट सांगायचं तर याला काहीही अर्थ नाही. हे म्हणजे एखाद्या कडून पैसे उसने घेतले आणि त्याला “परत देईन किंवा देणार नाही मात्र या दोन्ही भूमिकांना वैज्ञानिक पाठबळ आहे” असं म्हणण्यासारखं आहे. विज्ञान म्हणजे अनिश्चितता हे साफ चूक आहे. असं असतं तर मंगळापर्यंत यान गेलंच नसतं. हायझेनबर्गचं तत्त्व अत्यंत काटेकोर सीमांमध्ये लागू होतं, त्याबाहेर न्यूटनचे नियम लागू होतात​. मंगळयानाच्या कक्षेचं गणित करताना हायझेनबर्ग कामाचा नाही, तिथे न्यूटनलाच साकडं घालावं लागतं. हे मत सारंग यांचं आहे की सौंदर्यशास्त्रातील इतरांचंही हे ठाऊक नाही. हे सर्वमान्य मत असेल तर साहित्याच्या संशोधकांनी एकदा पदार्थविज्ञानवाल्यांशी बोलणं गरजेचं वाटतं.

    ‘आजची कादंबरी – आणि उद्याची’ या शेवटच्या प्रकरणात सारंग म्हणतात​, “दुसऱ्या महायुद्धात पोळलेले समाज – उदाहरणार्थ, फ्रान्स​-सार्त्र व काम्यू यांसारखे लेखक निर्माण करू शकले. प्रदीर्घ काळ स्थिरतेच्या दडपणाखाली घुसमटणारे समाज – सोव्हिएट रशिया व चीन – यांच्याकडून काहीच मिळालं नाही. (पास्तरनॅक व सोल्झेनित्सिन वगळून​, तेही राज्यविरोधी).” इथे दोन मोठ्या गफलती आहेत​. चीन, रशियाला महायुद्धाची झळ लागली नाही??? फार तर झळ लागली पण थोर लेखक निर्माण झाले नाहीत असं म्हणा पण तसं केलं तर सारंग यांचं पहिलं वाक्य बाद ठरतं. एकूणातच महायुद्ध आणि थोर लेखक यांचा संबंध बादरायण वाटतो. शिवाय चिनी लेखक अनुल्लेखाने मारण्याइतके चिल्लर आहेत का?

    शेवटचा मुद्दा विचित्र​ म्हणजे इंग्रजीत ज्याला आपण ‘बिझार’ म्हणतो अशा प्रकारचा आहे. मागे विश्राम गुप्ते यांनी ‘या देशात शास्त्रज्ञ नाहीत‘ असं विधान केलं होतं त्या जातीचा. म्हणजे हे विधान खरं नाही हे कुणालाही कळेल मग ते लेखकाला का कळलं नाही? कादंबरीवरच्याच प्रकरणात सारंग म्हणतात​, “पण पेपरबॅक पुस्तकं एकदा वाचल्यावरही खराब होतात​.” म्हणजे काय याचा अर्थ मला अजूनही लागलेला नाही. माझ्याकडे असलेली ९९% पुस्तकं पेपरबॅक आहेत​. किंवा उलटा प्रश्न – एकदा वाचल्यावर खराब होईल असं करण्यासाठी पुस्तक किती दांडगाईने वाचावं लागेल​? खुद्द सारंग यांचं पुस्तक आणि मराठीतील बहुतेक पुस्तक पेपरबॅक याच वर्गात मोडतात हे आणखी रोचक​.

    सारंग आंतरराष्ट्रीय पातळीवर लिहिणारे लेखक आहेत त्यामुळे त्यांच्या पुस्तकात अशा चुका आढळल्या तर ते विशेष​ खटकतं. काळजीपूर्वक पुस्तक लिहायचं तर तितके कष्ट घ्यावे लागतात आणि हे झटपट होत नाही, याला वेळ द्यावा लागतो. ‘ऑक्सफर्ड शेक्सपिअर’ मालिकेतील ‘मॅकबेथ’ची आवृत्ती काढायला दहा वर्षे लागल्याचं तिचे संपादक प्रस्तावनेत सांगतात​. किती मेहनत घेतली असेल याची यावरून कल्पना यावी. या गोष्टी खटकत असल्या तरी पुस्तक वाचनीय आहे. डॉ. हरिश्चंद्र थोरात यांच्या ‘कादंबरीविषयी’ या ग्रंथाबद्दल बोलताना सारंग त्यातील काही भाग उद्धृत करतात​. डॉ. थोरात म्हणतात​, “विचार हा शब्द येथे गंभीरपणे वापरला आहे. विचार नेटकेपणाने करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते…मनात येणार्‍या स्वैर कल्पनाविलासालाच विचार म्हणण्याची प्रथा या काळात रूढ झाली.” इथे डॉ. थोरात जरी समीक्षेविषयी बोलत असले तरी आज सगळीकडेच​ सुसूत्रपणे विचार करणे कालबाह्य होऊ लागलं आहे की काय अशी शंका येते. हे किती खरं आहे याची प्रचिती आजूबाजूला येणारे बहुतेक लेख वाचले तर येते. फुटका नळ गळावा तसे शद्ब गळत असतात​. आपल्या मनातील विचारांचा गुंता जसाच्या तसा ओतला की झाला लेख​. आणि हे नवशिके लेखकच करतात असं नाही. संपादक​, विचारवंत अशी बिरुदं मिरवणारे लेखात फक्त त्यांनी जे वाचलं ते कोंबत असतात​. सगळा मामला वरवरचा, खोलात जायचं काम नाही. प्रत्येक परिच्छेदात नवीन विचार हवा हा नियम कालबाह्य होतो आहे अशी शंका कधीकधी येते कारण मुळात परिच्छेदाचाच पत्ता नसतो. अर्धीमुर्धी वाक्ये हिंदी चित्रपटात पूर्वी नायिका जशी कड्याला धरून लोंबकळायची तशी लोंबकळत असतात​. त्यात ‘ललित’ नावाचा प्रकार तर लय टेररबाज​.

    रखरखीत दुपार​……………………..
    मी कॉलेजच्या वाटेवर​……………………………..
    इतक्यात​………………………
    आरं मावसभावा, ही रांगोळी कशापायी रं भुसनळ्या?

  • गूढ​, रहस्यमय, अद्भुत : हारुकी मुराकामी

    मुराकामी वाचल्यानंतर इतर लेखक प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला सकाळ कशी होती, हवा कशी होती, ट्रॅफिक कसे होते, हिरो किंवा हिरविणिने काय घातले होते याचे वर्णन करण्यात पानेच्या पाने खर्च का करतात असे वाटायला लागते.

    सवयी फार विचित्र असतात. जाता जात नाहीत. अशीच एक निरर्थक सवय लागलेली. कुठलेही पुस्तक वाचायला सुरुवात केली की लेखकाला कुठल्यातरी चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करायचा. आणि विशेष म्हणजे भल्या भल्या लेखकांच्या बाबतीत हे करायला जमले. डिकन्स म्हटल की दु:ख, दु:ख, दु:ख आणि मणमोहण देसाई लाजतील असे योगायोग. पण माणसाच्या मनात डोकावण्याचे कसब विलक्षण. आणि एखादे वाक्य इतके अप्रतिम की तिथे थांबून दहा मिनिटे विचार करावा लागतो. सॉमरसेट मॉमचे वैशिष्ट्य म्हणजे कथा साध्या, सरळ शब्दांमध्ये सांगितलेली. पण परत मनोव्यापारांची गुंतागुंत समोर आणायची हातोटी विलक्षण.

    पण कधीकधी असे एखादे पुस्तक हाती लागते की आपले सगळे अंदाज ढासळून पडतात. (थोडक्यात मस्त स्विंगींग यॉर्करवर आपली दांडी उडते. ) असेच एक पुस्तक परवा वाचले. हारूकी मुराकामीचे ‘काफ्का ऑन द शोर’. पुस्तक वाचायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या काही पानात एक अंदाज बांधला, तो ढासळल्यावर दुसरा, त्यानंतर तिसरा. असे चार-पाच वेळा झाल्यावर शरणागती पत्करली आणि मुकाट मुराकामी नेईल तिथे त्याच्यामागून जाऊ लागलो. यातले सर्वच विलक्षण, काहीसे फँटसीच्या अंगाने जाणारे. सुरूवातीला तर्कशुद्ध मन हे असे का, ते तसे का असे प्रश्न विचारत रहाते. नंतर गोष्टीत रंगून गेल्यावर या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत हे लक्षातही रहात नाही. मग नाकाता मांजरांशी बोलतो किंवा जळवांचा पाऊस पाडू शकतो अशा गोष्टी ‘रूटीन’ वाटायला लागतात.

    Book cover of Kafka on the Shore

    गोष्ट सुरू होते तेव्हा जवळपास प्रत्येक प्रकरणात एखादा नवीन धागा येतो. काही काळ आपण भंजाळतो. काय चाललय काहीच कळत नाही. नंतर रूबिक क्युबचे चौरस जुळावेत तसे धागे जुळत जातात. याच्या जोडीला निवेदन इतकं प्रभावी की पुस्तक खाली ठेवायचा प्रश्नच येत नाही. फँटसी आणि रहस्य यांचा सुंदर मिलाफ. मग आधीच्या काही प्रश्नांची उत्तरेही मिळत जातात. सुप्रसिद्ध ओडीपल थीम भेटते. (यामुळेच या कादंबरीला मॉडर्न ग्रीक ट्रॅजेडी म्हटले आहे.) काही प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरित रहातात. मुराकामीच्या मते प्रत्येक वाचकाची उत्तरे वेगळी असतील. पुस्तकातील विनोदही आलाच तर अगदी कळेल-न-कळेल असा. गूढतेला कुठेही तडा न जाऊ देणारा. The kind of fallen-from-grace building you find in any city, the kind Charles Dickens could spend ten pages describing. यावरून आठवले. डिकन्स किंवा इतरही काही प्रसिद्ध लेखक त्यांच्या जाडजूड पुस्तकांमध्ये पानेच्या पाने वर्णने देत बसतात. आणि खरे सांगायचे तर हे वाचायला कंटाळा येतो. बर, वाचल्याशिवाय रहावतही नाही कारण एखादे अप्रतिम वाक्य सुटायला नको. मुराकामीचे असे अजिबात नाही. शक्यतो वर्णन नाही, जिथे आहे तिथे इतके प्रभावी की वाचल्याशिवाय रहावतच नाही. मुराकामी वाचल्यानंतर इतर लेखक प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला सकाळ कशी होती, हवा कशी होती, ट्रॅफिक कसे होते, हिरो किंवा हिरविणिने काय घातले होते याचे वर्णन करण्यात पानेच्या पाने खर्च का करतात असे वाटायला लागते.

    यातली सर्व पात्रे नॉर्मलच्या थोडी बाहेर जाणारी आहेत, किंबहुना ऍबनॉर्मल म्हटलं तरी चालेल. मुराकामीच्या म्हणण्याप्रमाणे त्याला ‘जरा हटके’ पात्रांबद्दल जास्त उत्सुकता असते. यात दुसर्‍या महायुद्धाच्या काळात जपानमध्ये घडलेल्या एका गूढ प्रसंगाचे अमेरिकन संरक्षण खात्याने नोंदलेले वर्णनही आहे, अर्थातच काल्पनिक (The Rice Bowl Hill incident). पण मुराकामी स्वतः पत्रकार आहे आणि त्याला याबद्दल अधिक विचारले असता त्याने फक्त ‘नो कमेंट्स’ एवढेच उत्तर दिले.

    बरेचदा कलाकृतींमध्ये इतर प्रसिद्ध लेखकांचे संदर्भ आले तर लेखकाचे स्फूर्तीस्थान कळते. साइनफेल्डमध्ये वूडी ऍलनचा संदर्भ पाहिल्यावर त्याचा दर्जा फ्रेंड्सपेक्षा इतका वर का हे लक्षात येते. इथे तर नावातच काफ्का, त्यामुळे कथा अब्जर्ड असल्यास नवल नाही. (आणि काफ्का त्याचा आवडता लेखक असल्याचे मुराकामीनेही सांगितले आहे.) इतरही बरेच संदर्भ आहेत. ग्रीक ट्रॅजेडी, अरेबियन नाईट्स, मॅकबेथ, प्लेटोचे सिंपोझियम, मोझार्ट आणि शूबर्ट यांच्या संगीतातील बारकावे किंवा पुचिनीचा ला बोहेम ऑपेरा. लेखकाचा व्यासंग किती अफाट आहे याची यावरून कल्पना येते. शिवाय हेही लक्षात येते की या आणि अशा प्रकारच्या बर्‍याच लेखकांना/पुस्तकांना मुराकामी कोळून प्यायला आहे. तो जे लिहीतो आहे त्याची त्याला पूर्ण कल्पना आहे. ही सगळी नावे केवळ नेम-ड्रॉपिंगच्या उद्देशाने दिलेली नाहीत.

    जर तुम्हाला गूढ, रहस्यमय, काहीशा फँटसीच्या अंगाने जाणार्‍या कथा आवडत असतील तर ‘काफ्का ऑन द शोर’ वाचून बघायला हरकत नाही.

  • उंबेर्तो एको यांचा चक्रव्यूह – द नेम ऑफ द रोझ

    कथा थोडक्यात सांगायची झाली तर एका मठात एका भिक्षुचे प्रेत सापडते. मठात आलेले दोन पाहुणे याचा शोध घेत असतानाच एकामागून एक इतर भिक्षुंची प्रेते संशयास्पद स्थितीमध्ये आढळतात. शेवटी – पाचशेव्या पानावर – रहस्याचा उलगडा होतो. यात नवीन काय? अगाथा ख्रिस्तीच्या जवळपास प्रत्येक कथेमध्ये याहून वेगळं काही नाही. पण पुस्तक वाचायला सुरूवात केल्यावर हळूहळू फरक जाणवायला…

    कथा थोडक्यात सांगायची झाली तर एका मठात एका भिक्षुचे प्रेत सापडते. मठात आलेले दोन पाहुणे याचा शोध घेत असतानाच एकामागून एक इतर भिक्षुंची प्रेते संशयास्पद स्थितीमध्ये आढळतात. शेवटी – पाचशेव्या पानावर – रहस्याचा उलगडा होतो. यात नवीन काय? अगाथा ख्रिस्तीच्या जवळपास प्रत्येक कथेमध्ये याहून वेगळं काही नाही. पण पुस्तक वाचायला सुरूवात केल्यावर हळूहळू फरक जाणवायला लागतात आणि शेवट येईपर्यंत ही दरी इतकी वाढते की खून कुणी केले किंवा रहस्य काय होते हे प्रश्न काहीसे बाजूला पडतात. शीर्षकामध्ये आलेल्या चक्रव्यूह या शब्दाचा अर्थ कथानक किंवा रहस्य गोंधळून टाकणारे आहे इतका सरळ नाही – अर्थात रहस्यकथेला आवश्यक असलेल्या क्रमवार नाट्यमय घटना यात आहेतच – पण ही एक सरळसोट रहस्यकथा नसून रहस्यकथा हे एक माध्यम म्हणून वापरले गेले आहे. या माध्यमातून एको यांना काय सांगायचे आहे हा कळीचा मुद्दा आहे. पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्याचे विविध अर्थ लावले गेले. नंतर एको यांनी ‘द की टु द नेम ऑफ द रोझ’ हे पुस्तक लिहून त्यांना अभिप्रेत असलेले अन्वयार्थ मांडले. याचे अन्वयार्थ लावणारी इतर लेखकांची पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. पुस्तकावर आधारलेला शॉन कॉनेरी आणि ख्रिश्चियन स्लेटर अभिनित चित्रपटही येऊन गेला.

    एको हे पूर्ण वेळ लेखक नाहीत. बोलोन्या (Bologna) विद्यापीठामध्ये ते मध्ययुगीन कालखंड आणि चिन्ह विज्ञान (semiotics) यावर संशोधन करतात. त्यांनी या विषयांवर अनेक पुस्तके, निबंध लिहीले आहेत. ‘द नेम ऑफ द रोझ’ त्यांची पहिली आणि सर्वात गाजलेली कादंबरी. चौदाव्या शतकातील एका भिक्षुने त्याच्या मठात घडलेल्या काही घटनांचे वर्णन योगायोगाने एको यांच्या हाती पडले. हे वर्णन एका फ्रेंच लेखकाने सतराव्या शतकात लॅटिनमधून अनुवादित केले होते. याचे इतर संदर्भ मिळवून, फ्रेंच अनुवादातील अतिरिक्त भाग टाळून एको यांनी ही कादंबरी लिहीली. थोडक्यात – चौदाव्या शतकात एका जर्मन भिक्षुने उत्तर इटलीमधील एका मठात घडलेल्या काही घटनांचे लॅटीनमध्ये केलेले वर्णन एका फ्रेंच लेखकाने अनुवादित केल्यानंतर एको यांनी ते इटालियन भाषेत आणले. (त्याच्या इंग्रजी अनुवादावर आधारित हा लेख मराठीत लिहीला आहे.)

    एको यांची बरीच वैशिष्ट्ये आहेत. त्यातले एक म्हणजे त्यांचा छाती दडपायला लावणारा व्यासंग. मिलानमध्ये त्यांच्या घराच्या बहुचर्चित ग्रंथालयामध्ये ५०,००० पुस्तके आहेत. त्यांचा हा व्यासंग त्यांच्या लिखाणातही दिसतो. त्यांच्या टीकाकारांचे म्हणणे आहे की हा केवळ देखावा आहे. एको मुद्दाम आपल्या वाचकांना न्यूनगंड देण्यासाठी असे करतात असे म्हणायलाही एकाने कमी केले नाही. अर्थातच एको यांना हा आरोप मान्य नाही. जेवढी आवश्यक आहे तेवढी माहिती मी देतो, तिचा उपयोग वाचकांनी हवा तसा करावा असे त्यांचे म्हणणे आहे.

    कथा आत्ताच्या उत्तर इटली आणि फ्रान्स यांच्या सीमेवरील एका मठात घडते. मूळ हस्तलिखितामध्ये ठिकाणाचा उल्लेख नाही. मठात येणारे दोन पाहुणे आहेत – बास्करव्हिलचा विल्यम आणि त्याचा शिष्य अद्सो. ही पात्रे सरळसरळ शेरलॉक होम्स आणि वॉटसन यांच्यावर आधारलेली आहेत. कॉनन डॉयलच्या प्रसिद्ध ‘हाउंड ऑफ बास्करव्हिल’ मधले बास्करव्हिल हे विल्यमचे गाव. विल्यमचे वर्णन आणि स्वभाव होम्सशी बराच मिळताजुळता आहे. पुस्तकाच्या सुरूवातीलाच विलियम मठातील घोडा नाहीसा झालेला असताना त्याच्या टापाच्या खुणांवरून तो कुठे असेल याचे भाकित करतो आणि ते खरे ठरते. कथा पुढे गेल्यानंतर मात्र विल्यम आणि होम्समधील फरक जाणवू लागतात. किंबहुना होम्स आणि त्या अनुषंगाने त्या ढंगाच्या रहस्यकथांवर टिप्पणी करायच्या हेतूनेच एको यांनी ही पात्रे निवडली असावीत असे वाटते. कथेचा निवेदक अद्सो आहे मात्र तो ही कथा सांगतो तेव्हा त्याच्या आयुष्याचा शेवट जवळ आला आहे. तरूण असताना घडलेल्या एक अविस्मरणीय अनुभवाची नोंद करावी असे त्याला वाटते.

    कथा ज्या काळात घडते त्या वेळेस युरोपात बर्‍याच गुंतागुंतीच्या घडामोडी चालू होत्या. रोममध्ये पोप ख्रिस्ती धर्मावर स्वत:चे वर्चस्व मिळवण्यासाठी झगडत होता. त्याला फ्लोरेन्स किंवा बोलोन्या अशा ठिकाणी संघटीत झालेल्या फ्रान्सिस्कन आणि दोमिनिकन शाखांच्या धर्मोपदेशकांकडून विरोध होत होता. फ़्रान्सिस्कन विचारसरणी स्वीकारणार्‍यांमध्ये रॉजर बेकन आणि ‘ओकॅम वस्तरा’ फेम विल्यम ओकॅम यांचा समावेश होता. येशू ख्रिस्त गरीब होता आणि आयुष्यभर गरिबीतच राहीला. त्यामुळे त्याच्या भक्तांनीही तसेच रहायला हवे असे फ्रान्सिस्कन गटाचे म्हणणे होते. अर्थातच हे पोपला मान्य नव्हते कारण असे झाल्यास कॅथोलिक चर्चची सार्वभौम सत्ता अवैध ठरली असती. यावर तोडगा काढण्यासाठी या गटांमध्ये अनेक बैठका झाल्या. विल्यम आणि अद्सो अशाच एका बैठकीची बोलणी करण्यासाठी मठात आलेले असतात.

    कथेचा काळ अत्यंत महत्वाचा आहे. रेनेसान्सचा सुवर्णकाल यायला अवकाश होता, छपाईयंत्राचा शोध लागायचा होता. छापखाना माणसाच्या प्रगतीमध्ये किती महत्वपूर्ण होता याची कल्पना आज करणे कठीण जाते. ज्याप्रमाणे भारतात वैदिक कालापासून ज्ञान मिळवणे ही काही विशिष्ट वर्गांचीच मक्तेदारी होती तसाच प्रकार या काळात युरोपमध्ये होत होता. जी पुस्तके ख्रिस्ती धर्माच्या विरोधी होती त्या पुस्तकांवर बंदी घातलेली होती. कथेतील मठामध्ये एक विशाल ग्रंथालय असते. तिथे ठिकठिकाणाहून नक्कल करून आणलेली अमूल्य पुस्तके असतात. मात्र ही पुस्तके वाचायची परवानगी सर्वांना नसते. एखादे पुस्तक वाचायचे तर मठाच्या मुख्याची परवानगी घ्यावी लागते. मठातील ग्रंथालय ही आजच्यासाखी सोपी, सुटसुटीत इमारत नसून एक प्रकारचा भूलभुलैय्या असते. ग्रंथालयाची रचना ही एका प्रकारे कथानकाच्या गुंतागुंतीचे रूपक आहे. ग्रंथपालाची आज्ञा मोडून रात्री ग्रंथालयात चोरून पुस्तके वाचायला जाणार्‍या भिक्षूंना अंधारात रहस्यमय आकृत्या दिसतात. ज्या भिक्षुंचा खून होतो ते सर्व एक विशिष्ट पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत असतात. हे पुस्तक असते ऍरिस्टॉटलचे विनोदावरचे पुस्तक. आज याची एकही प्रत उरलेली नाही.

    वॉटसनप्रमाणेच अद्सो विल्यमला सतत प्रश्न विचारत राहतो. इतर भिक्षु आणि विल्यम यांच्यात बरेच वादविवाद होतात. या सर्वांमधून त्या काळातील नियमांची, परिस्थितीची ओळख होत जाते. चर्चला विनोदाचे इतके वावडे का या प्रश्नाचेही उत्तर शेवटी मिळते. येशू ख्रिस्त हसल्याचा कुठेही उल्लेख नाही. विनोदाचे हत्यार सामान्य लोकांच्या हातात पडले तर चर्च आणि देव यांची त्यांना भीती रहाणार नाही. ते बेबंदपणे वागतील. विनोदाबद्दल समर्थांच्या ‘टवाळा आवडे विनोद’ सारखीच पण तुलनेने कितीतरी कठोर मानसिकता समोर येते.

    पुस्तकाला निश्चित असा शेवट नाही. नायक शेरलॉक होम्सवर बेतला असल्याने हा विरोधाभास अधिक प्रखरपणे जाणवतो. होम्स कथेच्या शेवटी सगळ्या अडचणी बिनचूक सोडवतो मात्र विल्यम शेवटी रहस्य उलगडल्यानंतरही अधिकच गोंधळतो. तो म्हणतो, “निश्चित असे रहस्य नव्हतेच, आणि उलगडले ते ही अपघातानेच.” ऍरिस्टॉटलचे पुस्तक विल्यमला शेवटी सापडते पण ते पूर्ण न वाचताच तो या पुस्तकात काय असेल हे सांगतो. पुस्तकांमध्ये नेहेमी इतर पुस्तकांचा संदर्भ असतो. एके ठिकाणी अद्सो म्हणतो, “Until then I had thought each book spoke of the things, human or divine, that lie outside books. Now I realized that not infrequently books speak of books: it is as if they spoke among themselves.”

    कथेतील मुख्य पात्रे इतर पुस्तकांमधून घेतलेली आहेत. कथेवर अर्जेंटिनाचे प्रसिद्ध लेखक होर्हे लुई बोर्हेस यांचा कथांचाही बराच प्रभाव आहे. कथेतील एका आंधळ्या ग्रंथपालाचे पात्र खुद्द बोर्हेस यांच्यावर आधारित आहे. आणखी एक महत्वाची प्रेरणा आहे जेम्स जॉइसची युलिसिस. युलिसिसमध्ये जॉइसने जो शब्दांचा चमत्कार केला आहे तसाच काहीसा प्रकार इथेही घडतो फक्त इथे शब्दांऐवजी कल्पना आहेत. पुस्तकाचे नावही पुरेशी संदिग्धता निर्माण करते. रोझ म्हणजे नेमके काय? कालौघात ऍरिस्टॉटलचे हरवलेले पुस्तक? शेवटी ग्रंथालयाला आग लागते त्या आगीत भस्म झालेली अमूल्य पुस्तके? की शेक्सपिअरच्या ‘अ रोझ बाय एनी अदर नेम..” या प्रसिद्ध वाक्याचे विडंबन? एको यांच्या मते कथेमध्ये वाचक हा एक महत्वाचा घटक आहे. दिलेले सर्व संदर्भ वाचकाला कळतील असे ते गृहीत धरून चालतात. अशा वाचकाला ते आदर्श वाचक मानतात. पुस्तकातील प्रथमदर्शनी खुणा फसव्या आहेत. होम्सकथेसारखी सुरूवात होते पण शेवट नाही. वाचकांच्या ठरलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याऐवजी इथे अपेक्षाभंगच होतो – मात्र परत काळजीपूर्वक वाचन करताना कथेत लपलेल्या खुणा त्याला उमगतील. गंमत म्हणजे ‘काफ्का ऑन द शोर’ या कादंबरीबाबत वाचकांनी प्रश्न विचारले असताना मुराकामीनेही पुस्तक परत वाचण्याचा सल्ला दिला.

    ‘द नेम ऑफ द रोझ’ बर्‍याच पातळ्यांवर भावते. मात्र हे पुस्तक ‘दा विंची कोड’ सारखी झटपट भूक भागवणारे ‘फास्ट फूड’ नाही. हा सकस आहार आहे आणि तो पचवण्यासाठी कष्ट करावे लागतात. एकोंच्या म्हणण्यानुसार पुस्तकाची पहिली १०० पाने बरीच दुर्बोध आहेत पण जो वाचक यातून तरेल तोच खरा. जणू पूर्वीच्या काळी भिक्षुंची जशी सत्वपरीक्षा घेतली जात असे तसे काहीसे. असे असले तरी या पुस्तकाची लोकप्रियता अबाधित आहे. फिट्झेराल्डच्या ग्रेट गॅट्स्बीला नाकारणार्‍या वाचकांनी या पुस्तकाची भरभरून प्रशंसा केली आहे. तब्बल १७,००० वाचकांनी याला पाच तारे दिले आहेत. एको यांना अभिप्रेत असलेला आदर्श वाचक होणे फार थोड्या लोकांना जमेल तरीही बाकीच्यांनाही या कथेतून बरेच काही मिळते आहे याची ही पावती आहे. रेनेसान्सच्या आधीचे जग, तेव्हाच्या लोकांची विचारसरणी या सर्वांचे विहंगम दर्शन या कथेतून होते. पुस्तके सहजासहजी उपलब्ध होणे ही साधीशी वाटणारी घटना किती क्रांतीकारी ठरली याची कल्पना येते.