Category: चित्रपट​

  • अजय-अतुलचा मराठमोळा ठेका

    मागच्या शतकामध्ये हिंदी चित्रपटांमध्ये मराठी संस्कृतीचं चित्रण फारसं नसायचं आणि असलंच तर फार केविलवाणं असायचं. उदा. १९७८ चा ‘गमन’ हा चित्रपट. चित्रपट सुरु होतो उत्तर प्रदेशातील एका छोट्या खेड्यात आणि तिथे लोक अवधीच्या जवळ जाणारी एक बोलीभाषा बोलतात. मग गुलाम हसन (फारूक शेख) मुंबईला येतो. इथे तो लालूलाल तिवारी (जलाल आगा) आणि त्याची मैत्रीण यशोधरा (गीता सिद्धार्थ) यांना भेटतो. यशोधरा मराठी मुलगी. ती आपला भाऊ वासू (नाना पाटेकर), आई (सुलभा देशपांडे) आणि वडील (अरविंद देशपांडे) यांच्याबरोबर राहत असते. गंमत म्हणजे हे मराठी कुटुंब आपापसात मराठी न बोलता बंबैय्या हिंदी बोलतात. हे काय गौडबंगाल आहे? बरं, बहुतेक​ प्रेक्षकांना मराठी कळणार नाही असं धरून चालू. पण मग सुरुवातीचं अवधी तरी कुठे कळतंय? त्यासाठी सबटायटल वाचावे लागतातच नं? मग यांनाही बोलूद्या की मराठी.

    पण तो काळ वेगळा होता. नंतर गेल्या शतकाच्या अखेरीस महेश मांजरेकर, आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. नाना पाटेकर हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका करू लागले. याआधी अमोल पालेकर यांनी सत्तरच्या दशकात ही कामगिरी केली होती. एकविसाव्या शतकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपला जम बसवणारे अजय-अतुल पहिले आणि अजून तरी एकमेव मराठी संगीतकार ठरले.

    अजय​-अतुलच्या संगीतातील एक खासियत त्यांनीच एका मुलाखतीत सांगितली होती.

    हे गणपतीबाप्पांवरचं एक जुनं गाणं बघा.

    गाणं चांगलय​, रफी साहेब, भूपिंदर आणि आशा ताईंनी गायलयही छान, पण तालाचं काय​? हा ताल आरडीने ‘जय जय शिव शंकर’ मध्ये वापरला होता तसा उत्तर भारतीय आहे. आणि महाराष्ट्रातील गणेशोत्सव मिरवणुकीत ढोलकी आणि डफली?? ढोलकी तमाशात वापरतात ​राव​, अन​ गणेशोत्सवात ढोल​.

    आता अजय​-अतुलचं ‘अग्निपथ’मधलं हे गाणं बघा. अस्सल मराठमोळा ताल आणि ढोल-ताशा. मजा आली का नै?

    अजय-अतुलच्या संगीताची एक​ खासियत ही की त्यांनी पंजाबी भांगडा आणि उत्तर भारतीय तालाची सवय झालेल्या हिंदी सिनेमाजगताला मराठमोळ्या तालावर नाचायला शिकवलं.


    नागराज मंजुळेंचा ‘सैराट’ मराठी चित्रपटसृष्टीत एक मैलाचा दगड ठरला. सकस कलाकृती असेल तर लोक भाषेचा अडसर मानत नाहीत हेच ‘सैराट’ने दाखवून दिलं. लोकांनी ‘सैराट’चं संगीत डोक्यावर घेतलं पण काही मान्यवरांच्या कपाळावरच्या आठ्या मात्र गेल्या नाहीत. ‘सैराट’मध्ये अजय-अतुलने मराठी गाण्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा प्रयोग केला. मराठीत भव्य ‘ऑर्केस्ट्रा’चा या प्रकारे वापर ‘न भूतो न भविष्यती’ असा होता. हे अर्धसत्य आहे, म्हणजे ‘न भूतो’ खरं आहे. भविष्यात कुणी सांगावं, कदाचित अजय-अतुलच परत हा पराक्रम करून दाखवतील.

    अजय-अतुलची आणखी एक खासियत आहे ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही. ‘सैराट’ची गाणी त्यांनीच लिहिली आहेत (‘सैराट झालं जी’मध्ये नागराज मंजुळे यांचाही सहभाग आहे.) आणि हे पुरेसं नव्हतं म्हणून की काय, म्हणून गाणीही त्यांनीच गायली आहेत​. या प्रकारची प्रतिभा फार दुर्मिळ आहे. हिंदीत या प्रकारे फक्त रविन्द्र जैन यांनी काम केलं. अन्यथा मोठमोठे संगीतकारही गीतकाराकडून जोपर्यंत गाणं लिहून​ येत नाही तोपर्यंत हातावर हात ठेवून बसून राहतात. ‘सैराट’च्या गाण्यांमध्ये जिवंतपणा आहे.  ‘आभाळाला याट आलं जी’ सारख्या रसरशीत ओळी यात आहेत. याचं कारण म्हणजे गाणी बोली भाषेत आहेत. बोली भाषेतील जिवंतपणा प्रमाणभाषेत येणं अशक्य आहे.

    दरवर्षी मराठी दिन आल्यावर मराठीच्या भवितव्याची चिंता करणारे लेख येत असतात. जोपर्यंत नागराज मंजुळे आणि अजय-अतुल सारखे प्रतिभावंत कलाकार मराठीत काम करत आहेत तोपर्यंत मराठीची काळजी करायचं कारण नाही. पुरावा हवा असेल तर युट्युबवर जाऊन ‘सैराट’च्या गाण्यांखालच्या प्रतिक्रिया बघा. चार वर्षे होऊन गेली तरी आजही वर्गात हजेरी होते त्याप्रमाणे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन प्रतिक्रिया देत आहेत. सर्वांचा आशय एकच. ‘मला मराठी येत नाही पण हे गाणं मी रोज ऐकतो/ऐकते.’ काही मोजक्या प्रतिक्रिया इथे.

  • तुंबाड : एक थरारक प्रवास

    ‘तुंबाड’विषयी बोलायचं झालं तर अनेक गोष्टी उल्लेखनीय आहेत. पहिलं म्हणजे याचा जॉन्र. बॉलिवूडला काही प्रकारच्या चित्रपटांचं वावडं आहे. उदा. हिंदी चित्रपटसृष्टीत शेरलॉक होम्स, एर्क्यूल प्वारो किंवा अगदी आपले देशी ब्योमकेश बक्षी यांची गादी चालवू शकेल असं कुणीही नाही. बॉलिवूडला डिटेक्टिव्ह फारसे रुचत नाहीत. तीच गट भयपटांची. नाही म्हणायला रामसे बंधूंनी ‘शैतानी दरवाजा’ वगैरे काढले पण त्यात राम तर सोडा, सीता, सुग्रीव किंवा जाम्बुवंतही नव्हते. नुकतेच आलेले ‘स्त्री’सारखे अपवाद सोडले तर बॉलिवूडमध्ये भयपटांची वानवाच असते.

    ‘तुंबाड’नं हे बदललं आणि असं बदललं की ‘एक ही मारा लेकिन सॉलिड मारा’. त्यांनी केवळ भयपट केला नाही तर त्याला गूढ दंतकथेची जोड दिली. हे बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही झालेलं नाही. (‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’मध्ये काही गडद छटा आहेत पण एकूणात चित्रपट रोमांचकारी साहसपट आहेत.)

    “लोकेशन, लोकेशन, लोकेशन!”

    रिअल इस्टेटचा हा मूलमंत्र चित्रपटांनाही लागू पडतो. आपल्या चित्रपटांमध्ये कोकणभाग किती दुर्लक्षित आहे हे लक्षात आलं तेव्हा खुर्चीवरून खाली पडायचा बाकी होतो. शिमला, काश्मीर इथला इंच न इंच कुठल्यातरी चित्रपटात दाखविला गेला आहे. तीच गत स्वित्झर्लंड किंवा इटलीची. तुंबाड महाराष्ट्राच्या कोकण आणि पुण्याजवळच्या निसर्गरम्य भागात चित्रित केला आहे आणि बघताना डोळे सुखावतात.

    डोळे सुखावतात याचं कारण अप्रतिम छायांकन (cinematography). या तोडीचं छायांकन हिंदी चित्रपटात यापूर्वी बघितल्याचं आठवत नाही. बरंचसं चित्रीकरण पावसाळ्यात, खऱ्या पावसात केलं गेलं आणि यासाठी चार पावसाळे खर्ची पडले. पूर्ण चित्रपटाला सहा वर्षे लागली. हे करायला अमर्याद संयम आणि कामाप्रति असीम​ निष्ठा यांची गरज असते.

    सोहम शाह, आनंद एल. राय, आनंद गांधी, मुकेश शाह, अमिता शाह (निर्माते), राही अनिल बर्वे, आनंद गांधी (दिग्दर्शक), पंकज कुमार (छायांकन), मितेश शाह, आदेश प्रसाद, राही अनिल बर्वे, आनंद गांधी (पटकथा), राज शेखर (गीतकार), अजय-अतुल, जेस्पर किड (संगीतकार), संयुक्त काझा (संकलन) आणि चित्रपटाची सर्व टीम यांचं मन:पूर्वक अभिनंदन. या सर्वांची नावे देण्याचं कारण हे की ही मंडळी नेहेमी पडद्यामागेच राहतात. अभिनेते आणि दिग्दर्शक यांची नावे सर्वच समीक्षक देतात. संकलक,छायाचित्रकार आणि गीतकार यांची नावे एखादवेळेस द्यायला काय हरकत आहे?

    तुंबाड रूढार्थाने भयपट असला तरी चित्रपटात ठाशीव भयप्रसंग कमीच आहेत. त्याऐवजी वातावरण आणि प्रेक्षकांच्या कल्पनेतून भयनिर्मिती केली आहे. लोकेशनबद्दल बोलायचं तर बघूनच जागा झपाटलेल्या आहेत असं वाटतं. बहुतेक चित्रपट वाड्यांमध्ये घडतो. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी असे निर्जन वाडे शोधले जिथे चिटपाखरूही नव्हतं. ते जीर्ण वाडे, करकरणारे दरवाजे, गंजलेली कुलुपे. चित्रपटात छोट्या-छोट्या गोष्टींकडेही पूर्ण लक्ष दिलेलं आहे.

    चित्रपटाचा मुख्य हेतू भयनिर्मिती असला तरी नीट पाहिलं तर त्यात त्या काळाच्या अन्यायांचंही चित्रण दिसतं. उदा. विनायक राव (सोहम शाह) याचं नंतरच्या काळातील घर. घरात बायको, तीन मुलं आणि एक रखेल. बायकोची स्थिती एका मोलकरणीपेक्षा वेगळी नाही आणि रखेल  घरावर सत्ता गाजवते आहे. गंमत म्हणजे ती घरात आली तेव्हा परिस्थिती नेमकी उलटी होती. विनायकाचा मुलगा सदाशिव (रुद्र सोनी). हा तुमच्या बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्ये नेहेमी मुलं दिसतात तसा निष्पाप, निरागस मुळीच नाही. पौगंडावस्थेतील मुलांच्या मनोव्यापारात डोकावण्याचं धाडस भलेभले दिग्दर्शक करत नाहीत. इथे ते केलंय. स्पिलबर्गचा ‘एम्पायर ऑफ द सन‘ हा एक उल्लेखनीय अपवाद.

    इतकी मेहनत करूनही चित्रपटाने केवळ ₹१३.५७ कोटींचा गल्ला जमवला. शिरा पडों हेंच्या तोंडार! आपल्या प्रेक्षकांनी ‘माझिया प्रियाला, मला आणि प्रेक्षकांना काहीच कळेना’ याचे ७६४ भागच बघावेत. सुदैवाने ओटीटीवर हा चित्रपट आहे आणि बराच काळ राहील. पूर्वीच्या चित्रपट पडला की शब्दश: डब्यात जायचा. आता ती वेळ येत नाही.

    चांदोबातल्या गोष्टीत राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा माझा जीव चित्रपटात कोणती भाषा बोलत आहेत याकडे लागलेला असतो. कथा मराठी माणसांची, महाराष्ट्रातली तरीही पात्रे हिंदी बोलतात कारण हा हिंदी चित्रपट आहे. बहुतेकवेळा हे वैतागवाणं होतं उदा. गमन हा चित्रपट. पण इथे तसं झालं नाही. एकतर चित्रपट इतक्या पातळींवर उत्कृष्ट आहे की या छोट्याशा तपशीलाबद्दल फारसं काही वाटत नाही. आणि दुसरं म्हणजे चित्रपटात संवाद मुळातच कमी आहेत.

    तरीही मराठीत हा चित्रपट कसा वाटला असता हा विचार मनात आल्यावाचून रहात नाही. माझ्या मते आदर्श चित्रपटात प्रत्येक पात्र त्याला नैसर्गिकपणे जी भाषा येते ती बोलेल. ‘दि लोंगेस्ट डे‘ हा असा एक चित्रपट.

    श्री. ना. पेंडसेंच्या ‘तुंबाडचे खोत’वरून तुंबाड हा शब्द घेतला आहे. कथा नारायण धारप यांच्या एका कथेवर बेतलेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी लेखकांना फारसं स्थान मिळालेलं नाही – विजय तेंडुलकर किंवा महेश एलकुंचवार हे सन्माननीय अपवाद. भविष्यात गोनीदा, जयवंत दळवी किंवा जीएंच्या कथा रुपेरी पडद्यावर बघायला मिळतील अशी आशा आहे.

  • डायरेक्टर्स कट : ऑल द प्रेसिडेंट्स मेन

    बरेचदा डीव्हीडीसोबत ‘डायरेक्टर्स कट’ नावाचा प्रकार यायचा. यात चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी केलेली कमेंट्री असायची. चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याचे विश्लेषण करून ते चित्रित करताना काय काय अडचणी आल्या, काय गमती झाल्या हे खुद्द दिग्दर्शक महाशयांकडून ऐकायला मजा यायची. आता डीव्हीडी लुप्त पावल्यावर हा प्रकारही नामशेष होणार की काय असं वाटायला लागलं आहे.

    या मालिकेतील इतर चित्रपट आहेत : ‘डायरेक्टर्स कट : द गॉडफादर ‘ आणि ‘डायरेक्टर्स कट : द फ्युजिटिव्ह

    Poster for All The Presidents Men

    ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’ या चित्रपटाचं विश्लेषण केलं आहे चित्रपटाचे निर्माते रॉबर्ट रेडफर्ड यांनी.

    १. चित्रपट सुरू होतो तेव्हा आपल्याला एक पांढरा पडदा दिसतो. हे नेमकं काय आहे ते कळत नाही. प्रेक्षकांना सुरूवातीलाच धक्का द्यायचा असं रेडफर्ड आणि दिग्दर्शक पाकुला यांनी ठरवलं होतं. त्यांच्या असं लक्षात आलं की जर १७ सेकंद पडद्यावर काहीच घडलं नाही तर प्रेक्षक चुळबुळ करायला लागतात. जवळजवळ १७ सेकंदांनंतर एक मोठ्ठा आवाज होतो आणि पडद्यावर ‘J’ हे अक्षर उमटतं. आपण एका टाइपरायटरचा ‘क्लोजअप’ बघतो आहोत हे लक्षात येईपर्यंत पूर्ण ओळ टाईप झालेली असते : June 1, 1972. इथे टाईपरायटर हे एक शस्त्र आहे. इतर शस्त्रे आहेत – टेलिफोन, पेन आणि कागद.

    २. गॉर्डन विलिस ज्यांचं टोपणनाव ‘प्रिन्स ऑफ डार्कनेस‘ होतं त्यांनी हा चित्रपट चित्रित केला. पत्रकारितेच्या जगात बहुतेक वेळा सत्य काय हे माहित नसतं. हे दर्शविण्यासाठी बराचसा चित्रपट अंधारात चित्रित केला आहे. फक्त न्यूजरूम दाखविताना फ्लुरोसंट, भगभगीत प्रकाश आहे कारण तिथे सत्य उघडकीला येतं.

    ३. बॉब वुडवर्डचे (रॉबर्ट रेडफर्ड) कपडे नीटनेटके असायचे मात्र इतर बाबतीत तो तितका व्यवस्थित नसायचा. तो कधी झोपायचा नाही, नेहेमी कामात मग्न. कार्ल बर्नस्टीन (डस्टीन हॉफमन) हुशार होता. त्याचे आईवडील मूलगामी विचारसरणीचे पुरस्कर्ते होते त्यामुळे त्याचा कल न्याय आणि समानता यांच्याकडे होता. बातमी मिळवण्यासाठी तो निरनिराळ्या युक्त्या करत असे. शिवाय तो एक उत्तम लेखक होता.

    ४. ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या कार्यालयातील प्रत्येक गोष्टीची चित्रपटाच्या सेटवर नक्कल करण्यात आली होती. यात खुर्च्या, टेबलं, फोन इतकंच नाही तर कचरापेट्यांचाही समावेश होता. यासाठी त्यांनी कार्यालयातील सर्व वस्तूंची यादी केली. तिथल्या कचरापेटीतील कागदं जमा करुन  सेटवर वापरण्यात आले.

    ५. वॉटरगेट प्रकरण उघडकीला आल्यापासून रेडफर्ड यासंबंधीच्या बातम्यांवर लक्ष ठेवून होता. त्याच्या लक्षात आलं की बातम्यांमध्ये दोन नावे नेहेमी दिसतात : कार्ल बर्नस्टीन आणि बॉब वुडवर्ड. नंतर बातम्यांचा ओघ वाघायला लागल्यानंतर त्याची भेट या दोघांशी झाली. दोघांच्या स्वभावातील फरक त्याला प्रकर्षाने जाणवला. यावर त्याला एक छोटा कृष्णधवल चित्रपट करावासा वाटला. नंतर चित्रपट तयार होईपर्यंत वॉटरगेट प्रकरण संपलं होतं आणि यात आता कुणाला रस असेल का याबद्दल स्टुडिओला शंका होती. रेडफर्डच्या मते जरी चित्रपटाचा शेवट ठाऊक असला तरी तो रोमांचकारी होता आणि हा प्रेक्षकांना नक्कीच बघायला आवडला असता.

    ६. चित्रपटाची तयारी करताना रेडफर्ड आणि हॉफमन यांनी फक्त स्वतःचेच नाही तर एकमेकांचेही संवाद पाठ केले. याचा परिणाम असा झाला की त्यांच्याबरोबर काम करणारे जे इतर कलाकार होते ते अनेकदा अवाक होत असता कारण हे दोघे आपल्या संवादांची अदलाबद्ल करत असत.

    ७. आउटडोअरमध्ये चित्रित केलेल्या बहुतेक प्रसंगांमध्ये रस्ता ओला दिसतो. खरंतर त्या काळात वॉशिंग्टनमध्ये इतका पाऊस होत नसे. ही गॉर्डन विलिस यांनी वापरलेली एका युक्ती होती जेणेकरून ओल्या रस्त्यांवरुन प्रकाश परिवर्तित होईल आणि चित्रीकरणाला मदत होईल.

    ८. वुडवर्ड केन डॉलबर्गबरोबर फोनवर बोलतो तो प्रसंग एकसलग सहा मिनिटांचा होता आणि त्यात एकही कट नव्हता. वुडवर्ड एकामागून एक फोन करतो आहे आणि पार्श्वभूमीत इतर लोक गप्पा मारत आहेत, टीव्ही बघत आहेत. यामध्ये पार्श्वभूमीही तितकीच फोकसमध्ये राहावी यासाठी विशेष तंत्रज्ञान वापरण्यात आलं.

    ९. अकाउंटंटची भूमिका करणाऱ्या जेन अलेक्झांडरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या ऑस्कर पुरस्काराचं नामांकन मिळालं. ती सेटवर आली तेव्हा तिने निळा ड्रेस घातला होता. पाकुलाने तिला मेकअप वगैरे काही न करता तसेच कॅमेऱ्यासमोर पाठवले.

    १०. ‘डीप थ्रोट’चे पात्र खूप काळजीपूर्वक निवडण्यात आले. तो नेहेमीचा मिश्यांना पीळ देणारा खलनायक नव्हता. रेडफर्ड आणि पाकुला दोघांनाही असं वाटलं की या पात्राला ‘डिग्निटी’ असायला हवी. ‘डीप थ्रोट’ आपल्या तत्वांशी प्रामाणिक असणारा आणि त्यांच्याशी तडजोड करायची वेळ आल्यावर आतल्याआत व्यथित होणारा माणूस होता. त्याला एफबीआय वाचवायची होती कारण निक्सन या संस्थेला उध्वस्त करणार असं त्याला वाटत होतं आणि यात तथ्य होतं.

    ११. वुडवर्ड आणि ‘डीप थ्रोट’ रात्री दोनला भेटतात ते गॅरेज. हे एक भीतीदायक ठिकाण वाटायला हवं होतं जिथे काहीही होऊ शकतं. एक शांत जागा, पाण्याच्या थेंबांचा बारिकसाही आवाज लगेच ऐकू येतो. आणि अचानक गाडीचे टायर घासले गेल्याचा प्रचंड आवाज होतो आणि तुम्ही बसल्या जागी दचकता.

  • डायरेक्टर्स कट : द फ्युजिटिव्ह

    डायरेक्टर्स कट : द फ्युजिटिव्ह

    बरेचदा डीव्हीडीसोबत ‘डायरेक्टर्स कट’ नावाचा प्रकार यायचा. यात चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी केलेली कमेंट्री असायची. चित्रपटाच्या प्रत्येक दृश्याचे विश्लेषण करून ते चित्रित करताना काय काय अडचणी आल्या, काय गमती झाल्या हे खुद्द दिग्दर्शक महाशयांकडून ऐकायला मजा यायची. आता डीव्हीडी लुप्त पावल्यावर हा प्रकारही नामशेष होणार की काय असं वाटायला लागलं आहे.

    या मालिकेतील इतर चित्रपट आहेत : डायरेक्टर्स कट : द गॉडफादर आणि डायरेक्टर्स कट : ऑल द प्रेसिडेंट्स मेन

    ‘द फ्युजिटिव्ह’ या चित्रपटाचं विश्लेषण केलं आहे दिग्दर्शक अँड्रू डेव्हिस आणि अभिनेता टॉमी ली जोन्स यांनी.

    १. सुरवातीला पोलीस डॉ. रिचर्ड किंबलला (हॅरिसन फोर्ड) प्रश्न विचारत असतात. हा प्रसंग पूर्णपणे improvise केलेला आहे. कोणते प्रश्न विचारले जातील हे हॅरीसनला आधी ठाऊक नव्हतं. त्याला कथेचं जेवढं ज्ञान होतं त्यावरुन त्याने जमेल तशी उत्तरे दिली.

    २. आगगाडीचा अपघात खरा होता, सीजीआय नव्हे. २७ क्यामेरे लावून हा चित्रित करण्यात  आला. जमिनीखाली दडलेल्या रुळांमुळे गाडीचं इंजिन वेगळ्या दिशेने गेलं आणि योग्य त्या ठिकाणी अपघात झाला.

    ३. यात सॅम्युएल जेरार्ड (टॉमी ली जोन्स) याचा एका प्रसिद्ध डायलॉक आहे, “Well, think me up a cup of coffee and a chocolate doughnut with some of those little sprinkles on top, while you’re thinking.” हा टॉमी ली जोन्सने चित्रीकरणाच्या दिवशी सकाळी बसल्या जागी लिहिला.

    ४. बोगद्यातील पाठलागाचा प्रसंग स्टेज आणि लोकेशन दोन्हीकडे चित्रित करण्यात आला. हा प्रसंग चालू असताना अँड्रू डेव्हिस प्रसिद्ध इटालियन दिग्दर्शक फेदेरिको फेल्लिनी यांची आठवण काढतो. ते म्हणाले होते, “Movies are light.”

    ५. जुलिऍन मूर या चित्रपटात कुक कौंटी हॉस्पिटलमधल्या एका डॉक्टरची भूमिका करते. आधी तिचा रोल बराच मोठा होता. ती किंबलला घरी नेते आणि खुनी शोधण्यात मदत करते. पण यांचा प्रेमप्रकरण दाखवलं तर किंबलचा त्याच्या बायकोचा खुनी शोधण्यातील फोकस जाईल अशी भीती वाटू लागली आणि मूरच्या भूमिकेला कात्री लागली ती इतकी की प्रमुख भूमिकेवरून तिची भूमिका पाहुण्या कलाकाराइतकी उरली.

    ६. ‘सेंट पॅट्रिक डे परेड’चा प्रसंग लोकेशनवरच चित्रित करण्यात आला. गर्दीत एका माणूस हॅरीसनला ओळखतो आणि हसतो. तो वगळता बाकी कुणालाही इथे शूटिंग चालू आहे याचा पत्ताही नव्हता. नंतर वेळोवेळी जे पत्रकार पोलिसाना प्रश्न विचारत असतात ते शिकागोमधले खरेखुरे पत्रकार होते. याचप्रमाणे बरेचसे पोलीस आणि डॉक्टरही खरेच होते. वैद्यकीय क्षेत्रातील जितके लोक यात सामील होऊ शकले त्या सर्वांचा समावेश करण्यात आला.

    ७. क्लायमॅक्समध्ये कॉन्फरन्स हॉलचा प्रसंग आहे. यातील बसलेले सर्व लोक हे पेशाने अभिनेते होते. हा महत्वाचा प्रसंग होता आणि यात कुणीही ओव्हरऍक्टिंग करु नये यासाठी ही काळजी घेतली गेली.

    ८. शेवटी हाटेलात जे पाठलागाचे प्रसंग आहेत ते स्टेडीकॅम चित्रित केलेले आहेत. क्यामेरा अभिनेत्यांच्या मार्गातून जातो आणि यात कमीतकमी कट्स आहेत जेणेकरून प्रसंग वेगवान भासावेत.

    ९. किंबल आणि डॉ. चार्ल्स निकल्स (येरुन क्राबे) हे मारामारी करताना  आणि खालून येणाऱ्या लिफ्टमध्ये पडतात. निकल्स आधी बाहेर येतो आणि लिफ्ट बंद होऊ लागते. तेवढ्यात एका हात मध्ये येतो आणि दरवाजा थांबतो. ही कल्पना हॅरीसनची होती.

    १०. क्लायमॅक्सबद्दल बऱ्याच चर्चा झाल्या. हॅरीसनच्या पात्राने किती हिंसक झालं तारा चालेल, शेवटी कॉज्मो रेंफ्रो (जो पोंतोलियानो) मरणार किंवा कसे वगैरे वगैरे.

    ११. अगदी शेवटचा प्रसंग मिशिगन एव्हेन्यूवर पहाटे ३.३० ला क्रेन वापरून चित्रित करण्यात आला.

    —–

    ता.क. : प्रत्येक वेळी हा चित्रपट बघताना याची प्रेरणा काय हा प्रश्न पडत असे. आतापर्यंत बघितलेल्या चित्रपटांमध्ये काही सुगावा लागला नाही. मग ‘द डे ऑफ द जॅकाल’ हा चित्रपट बघितला आणि उत्तर मिळालं. १९६३ साली फ्रेंच राष्ट्राध्यक्ष चार्ल्स द गॉल यांच्या हत्येचा प्रयत्न झाला. या घटनेवर फ्रेडरिक फोर्सिथ यांनी याच नावाची एक कादंबरी लिहिली होती, चित्रपट त्यावर बेतलेला आहे. यातील खुनी जॅकाल (एडवर्ड फॉक्स) उर्फ पॉल डुग्गन उर्फ पेर लूंडक्विस्ट हा इटलीमध्ये फ्रेंच पोलिसांचा ससेमिरा चुकवीत फरार आहे. त्याने एका बाईचा खून केला आणि मग वेश बदलण्यासाठी केसांचा रंग काळा केला. या चित्रपटाचा क्लायमॅक्स पॅरिस मध्ये २५ ऑगस्टच्या परेडमध्ये चित्रित केला आहे. ‘द फ्युजिटिव्ह’मध्ये अशाच प्रसंगासाठी ‘सेंट पेट्रिक्स डे’ परेड वापरली आहे. ‘द डे ऑफ द जॅकाल’मध्ये नायक खुनीच आहे, ‘द फ्युजिटिव्ह’मध्ये हॅरिसन फोर्डवर खुनाचा आळ येतो पण तो निष्पाप असतो. दोन्हींकडे पाठलाग करणाऱ्या पोलिसाची भूमिका सशक्त आहे.