Author: Raj

  • जॅझ, ब्लूज आणि शूबर्ट

    भारतीयांना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचं इतकं आकर्षण का आहे हे मला नेहमी पडणारं कोडं आहे. (घाबरू नका, नेहमीप्रमाणे यूएएसब्याशिंग नाही.) अमेरिकेला कधी जाण्याचा योग आला नाही आणि आलाच तर ब्लॉग वाचून एनएसएवाले पाऊल ठेवू देतील अशी शक्यता कमी. तरीही मला युरोप अमेरिकेच्या तुलनेत हजारपटीने अधिक रोचक वाटतो. युरोपमधल्या गरिबातील गरीब देशातही सांस्कृतिक श्रीमंती – बघण्या/ऐकण्या/वाचण्या –…

    भारतीयांना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचं इतकं आकर्षण का आहे हे मला नेहमी पडणारं कोडं आहे. (घाबरू नका, नेहमीप्रमाणे यूएएसब्याशिंग नाही.) अमेरिकेला कधी जाण्याचा योग आला नाही आणि आलाच तर ब्लॉग वाचून एनएसएवाले पाऊल ठेवू देतील अशी शक्यता कमी. तरीही मला युरोप अमेरिकेच्या तुलनेत हजारपटीने अधिक रोचक वाटतो. युरोपमधल्या गरिबातील गरीब देशातही सांस्कृतिक श्रीमंती – बघण्या/ऐकण्या/वाचण्या – सारखी असते. गैरसमज नको, न्यूयॉर्कपासून कॅलिफोर्नियापर्यंत अनेक प्रकारचे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम किंवा ‘न्यूयॉर्कर’, ‘न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’ अशी उत्तम मासिके यावरून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात सांस्कृतिक दुर्भिक्ष्य आहे असं अजिबात नाही. फरक इतकाच यातील बहुतेक सगळं सांस्कृतिक लेणं सुनेला माहेराकडून रुखवत मिळतो त्याप्रमाणे युरोपीय वाडवडिलांनी आंदण दिलेलं आहे. तिथल्या मातीतून उपजलेलं, स्वतःचं म्हणावं असं सांस्कृतिक वैभव तिथे फार कमी आहे. आणि तिथले जे मूळ रहिवासी होते, त्यांचं उच्चाटन झाल्यावर त्यांची संस्कृतीही लोप पावली, कुठेतरी एखाद्या म्युझियममध्ये किंवा एखाद्या विद्यापीठाच्या संशोधन विभागात काही अवशेष बघायला मिळतील, तेवढेच.

    याला अर्थातच अपवाद आहेत आणि फार रोचक आहेत. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे स्वतःचे म्हणवता येतील असे काही कलाप्रकार आहेत पण गंमत अशी की यांचा उगम युरोपातील उच्चभ्रू जेत्यांकडून न होता आफ्रिकेतून बांधून आणलेल्या गुलामांकडून झाला. दिवसभर जनावरापेक्षा हलाखीच्या परिस्थितीत काम केल्यावर रात्री या गुलामांनी संगीतामध्ये सुटका शोधली. जॅझ आणि ब्लूज या संगीतप्रकारांचा उगम यातून झाला. जसा आधुनिक कादंबरीवर काफ्काचा मोठा प्रभाव आहे तसंच विसाव्या शतकातील अनेक संगीतकारांनी जॅझ आणि ब्लूजपासून प्रेरणा घेतली – यांची यादी इतकी मोठी आहे की एक पुस्तक भरावं. एरिक क्लॅप्टन आणि मार्क नॉफलर (डायर स्ट्रेटस) यांच्या संगीतात याच्या खुणा जागोजागी दिसतात. डायर स्ट्रेट्सच्या गाण्यांमध्ये सहसा रॉक संगीतात न आढळणारा सॅक्सोफोन आहे. कधीकधी गाण्याच्या ओळींमधूनही मार्क आपल्या या सांस्कृतिक वारशाची आठवण काढतो (“The satin jazzmen have put away their horns”). डायर स्ट्रेट्सची गाणी कधीही ओळी गायच्या संपल्या म्हणून लगेच संपत नाहीत. ओळी संपल्या की गिटार आणि इतर वाद्यांची जुगलबंदी चालू होते – हा खास जॅझचा वारसा. यात बरंच ‘इंप्रोव्हायझेशन’ असतं. जॅझ संगीताचा ठेका वेगळा आहे त्यामुळे नेहमीची गाणी ऐकण्याची सवय असल्यावर जॅझ ऐकलं तर हे काय चाललंय असा प्रश्न पडू शकतो. सवय झाल्यावर त्या संगीताची ‘एनर्जी’ लक्षात यायला लागते. याचा सुरेख वापर नुकताच ‘द ग्रेट ट्रेन रॉबरी’ या चित्रपटात बघितला. इथे चित्तथरारक प्रसंगात नेहमीचं ढ्याण-ढ्याण संगीत न वापरता जॅझ संगीताचे तुकडे वापरले आहेत. खरं तर बहुतेक जॅझ संगीताचे सूर मंद असतात त्यामुळे ही कल्पना ‘काउंटर-इंट्यूटीव्ह’ वाटू शकते पण प्रत्यक्षात जॅझ संगीताची ‘एनर्जी’ या चित्तथरारक प्रसंगांना उत्तम साथ देते आणि एक वेगळा अनुभव मिळतो.

    इथे एक पूर्वी कधीही न झालेली आणि बहुधा होणारही नाही अशी तुलना करण्याचा मोह होतो आहे. मराठी लेखक जागतिक पातळीवर का पोचत नाहीत यातील अनेक कारणांपैकी बहुधा १६ (क) क्रमांकाचं कारण इथे सापडावं. हारुकी मुराकामी आणि गौरी देशपांडे. खरं तर या दोन लेखकांमध्ये फारसं साम्य नसावं, त्यात मी मुराकामीचं लेखन तुलनेनं अधिक वाचलं आहे. देशपांडेबाईंचं जे थोडं-फार वाचलं त्यावरून एक साम्य लक्षात आलं. दोघेही आशियाई लेखक आहेत आणि तरीही दोघांच्या लेखनात पाश्चात्त्य शास्त्रीय संगीत आणि जॅझ-ब्लूज यांचे उल्लेख येतात. इथे साम्य संपतं. पहिल्यांदा बाईंच्या लेखनात हा उल्लेख पाहिला तेव्हा उत्सुकता वाटली होती, लवकरच त्या उत्सुकतेचे डोळे आणि हात बांधून टकमकटोकावरून तिचा कडेलोट करण्यात आला. देशपांडेबाईंच्या – ‘दुस्तर हा घाट’ आणि ‘थांग’ – या पुस्तकात दर काही पानांनंतर असे उल्लेख येतात,

    ‘मग बसून तिला मोत्सार्टबद्दल काय काय ऐकवले’,

    ‘आणि त्याने तिला जॅझ-ब्लूज-सोलवर एक व्याख्यान दिले,’

    ‘मग वनमाळी म्हणे,..”बा़ख वगैरे येरागबाळ्याचं काम नाही!” मग अ‍ॅलिस्टर चिडून त्याच्या ‘उच्चभ्रूपणावर टीका करी आणि जॅझ, ब्लूज, सोल, रॉक हे कसे लोकांचे संगीत आहे, राजेरजवाड्यांचे नाही, ते पटवून देई.’

    नवशिक्या लेखकांना नेहमी एक सल्ला दिला जातो, ‘शो, डोंट टेल.’ म्हणजे ‘त्याला राग आला’ असं न लिहिता राग आल्यावर त्याने काय केलं? – दार आपटलं, शेंडीला आग लावली – हे लिहा. देशपांडेबाईंच्या पात्रांना पाश्चात्त्य संगीताचं इतकं सखोल ज्ञान असूनही बाई ते ज्ञानकण वाचकांपर्यंत कधीच पोचवीत नाहीत. आणि जिथे या संगीताचं थोडंफार विश्लेषण होतं तिथेही ही मर्यादा दिसते. ‘दुसर्‍या ‘ब्रँडेनबुर्ग’मधलं हृदय भेदून टाकणारं ट्रंपेट’. बाखच्या दुसर्‍या ब्रँडेनबुर्ग काँन्चेर्तॉमध्ये ट्रंपेट हे मुख्य वाद्य आहे ही अगदी प्राथमिक माहिती आहे. हे म्हणजे ‘झाकिरभाईंच्या तबल्याचा जीवघेणा ठेका’ म्हणण्यासारखं आहे. आणि करुण प्रसंगासाठी हे संगीत कितपत योग्य आहे याची शंका वाटते. किंवा कधीकधी उलटं वाटतं जेव्हा नायिकेचे सासरे मरण पावतात तेव्हा तिला मोत्झार्टचं ‘रेक्वियम’ का आठवत नाही?

    आता मुराकामीकडे वळू. ‘काफ्का ऑन द शोर‘ या कादंबरीत दोन पात्रे शूबर्टबद्दल चर्चा करतात. ही चर्चा एक-दोन पानं चालते, एक उदाहरण. ‘..the Sonata in D Major. It’s a tough piece to master. Some pianists can play one or maybe two of the movements perfectly, but if you listen to all four movements as a unified whole, no one has ever nailed it. A lot of famous pianists have tried to rise to the challenge, but it’s like there’s always something missing.” अशी वर्णने, रसग्रहणात्मक चर्चा मुराकामीच्या लेखनात पानोपानी दिसते. आणि इथे शूबर्टचा सोनाटा कधीच मनासारखा वाजवता येत नाही ह्या अपूर्णतेला कथानकातही संदर्भ आहे. संगीत, त्याचा पात्रांशी संबंध आणि त्या पात्रांनी त्याचं केलेलं विश्लेषण या सर्वांचं कथानकामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. फक्त ‘मग त्याने शूबर्टवर तासभर व्याख्यान दिलं’ असं म्हणून मुराकामी गप्पा बसत नाही. किंबहुना मुराकामी वाचल्यानंतर त्याने ज्या संगीताचं वर्णन केलं आहे त्याचा खप वाढल्याची उदाहरणे आहेत. यूट्यूबवर बीटल्सचं ‘नॉर्वेजियन वुड’ गाणं आहे त्याखालच्या प्रतिसादांमध्ये अनेक प्रतिसाद आपण मुराकामीची याच नावाची कादंबरी वाचून इथे आल्याची कबुली देतात.

    फरक एव्हाना स्पष्ट झाला असावा. इथे मुद्दा शूबर्ट किंवा जॅझचा नाही. जर तुमचं पात्र या संगीतामध्ये बुडून गेलं आहे तर ते दिसायला हवं आणि यासाठी मुळात लेखकाला त्या संगीतामध्ये बुडून जाता यायला हवं. हे झालं नाही तर पात्राची संगीताची आवड वरवरची आहे हे लक्षात येतं आणि पात्रे कृत्रिमपणाकडे झुकू लागतात. आता मोत्झार्ट किंवा जॅझ जितके देशपांडेबाईंच्या संस्कृतीला परके तितकेच मुराकामीच्याही. तरीही एखाद्या परकीय कलाप्रकारामध्ये स्वतःला झोकून देण्याची वृत्ती मुराकामीत आहे (त्याच्या जागतिक लोकप्रियतेचं हे एक मुख्य कारण आहे, पाश्चात्त्य लोक त्याच्या कादंबर्‍यांशी ‘रिलेट’ करू शकतात) ती देशपांडेबाईंच्या लेखनात दिसत नाही. आणि हा अपवाद नाही, दुर्दैवाने ही वृत्ती बहुतेक भारतीयांमध्ये दिसते.

    अमेरिकेला जायचं नक्की झाल्यावर भारतीय लोक हुरळून जातात, मात्र ‘ आता मला जॅझ-ब्लूजच्या पंढरीत जायला मिळेल’ या जाणिवेने आनंदित झालेला भारतीय माझ्या बघण्यात नाही. तिथे पिढ्यानपिढ्या राहूनही बहुतेक लोकांची ‘प्ले-लिस्ट’ बाबूजी, लता-आशा, कुमारजी यांच्या पलीकडे जात नाही. सर्वांना जॅझ आवडायलाच हवं असा आग्रह नाही, हा प्रश्न वृत्तीचा आहे. बरेचदा भारतीय जाण्याच्या आधीच तिथे इतर भारतीय कोण आहेत याचा शोध घेतात. यात अर्थातच प्रॅक्टिकल भाग असतो. परकीय देशात मदत लागल्यावर ओळखीचं कुणी असेल तर बरं असतं. पण सेटल झाल्यानंतरही भारतीय इतर भारतीयांची साथ सोडत नाहीत. मग तिथे आपली संस्कृती जपण्याचे प्रयत्न सुरू होतात. यात हेतू शुद्ध असतो मात्र साध्य फारसं काही होत नाही. कुमारजी इथे ऐकले काय किंवा तिथे ऐकले काय सारखंच. (आणि कुमारजी ऐकणं सोडून द्या असंही म्हणायचं नाही.) पण एक वेगळी संस्कृती अनुभवण्याची संधी असेल तर का घेऊ नये? जेवताना टेबलावर भारतीय असेल तर बहुतेक वेळा गप्पा ठराविक विषयांवरच होतात – राजकारण, भारत- परदेश तुलना, इथे किती सोप्पं आहे इ किंवा सर्वात फेवरिट विषय – वडापावपासून टपरीवरच्या चहापर्यंत सर्वांसाठी अतीव नोस्टाल्जिक होणं. (नोस्टाल्जियाच्या मी अजिबात विरुद्ध नाही पण तो प्रमाणात असेल तरच रुचकर लागतो असं वाटतं.) याउलट एखादा जपानी किंवा ग्रीक माणूस असेल तर तुम्हाला एका परकीय संस्कृतीचा खजिना सापडू शकतो. इथे अर्थातच सर्वांनी हे करायलाच हवं असं नाही, व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर आहेच.

    आणि आता तर यासाठी कुठे जायचीही गरज नाही. आंतरजालामुळे जी हवी ती संस्कृती चुटकीसरशी उपलब्ध आहे.

    —-

    १. देशपांडेबाईंवर सरसकट टीका करण्याचा हेतू नाही याची कृपया त्यांच्या फ्यानिणींनी नोंद घ्यावी. (वाघ – वाघीण, फ्यान – फ्यानीण. वाघिणींच्या संख्येत घट होत असली तरी फ्यानिणींची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.)

  • मतांचं रिसायकलिंग​

    मी हल्ली चित्रपटांवरचे लेख वाचणं सोडून दिलं आहे – अर्थात काही अपवाद वगळता. आणि सगळे लेख नव्हे, तर जे उत्कृष्ट म्हणता येतील असे लेख वाचणं सोडून दिलं आहे. लेखाच्या सुरुवातीलाच धक्कादायक वाक्य टाकलं (इथे “स्टंटबाजी करणं हा माझा प्रकृतीधर्म नाही हे आपण जाणताच” असं म्हणणारे विश्वासराव दाभाडे आठवले, असो.) तर वाचक शेवटपर्यंत टिकण्याची शक्यता वाढते…

    मी हल्ली चित्रपटांवरचे लेख वाचणं सोडून दिलं आहे – अर्थात काही अपवाद वगळता. आणि सगळे लेख नव्हे, तर जे उत्कृष्ट म्हणता येतील असे लेख वाचणं सोडून दिलं आहे. लेखाच्या सुरुवातीलाच धक्कादायक वाक्य टाकलं (इथे “स्टंटबाजी करणं हा माझा प्रकृतीधर्म नाही हे आपण जाणताच” असं म्हणणारे विश्वासराव दाभाडे आठवले, असो.) तर वाचक शेवटपर्यंत टिकण्याची शक्यता वाढते असं नुकतंच मिनेसोटा, हेलसिंकी आणि इस्लामाबाद विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या एकत्रित संशोधनात सिद्ध झालं आहे. तर यामागचं कारण काय​? इथे खरं तर लेखात पाणी घालायला चांगली संधी आहे – माहिती-तंत्रज्ञानाचा विस्फोट​, सोशल मीडिया याडा-याडा. लेख कशावरही असो, त्यातली धकाधकीच्या जीवनावरची चिंता वाचून वीट आला आहे. त्यात एक प्यारा (किंवा प्यारी – समानता) यात घातला की उरले दोन प्यारे (किंवा प्याऱ्या). शेवटी किती लाइक्स मिळतात ते महत्त्वाचं. वाचकांचा धृष्टद्द्युम्न हेच आमचे ध्येय​! (संतोष रजेवर आहे.)

    कोणत्याही गोष्टीवर आपण​ आपलं मत कसं बनवतो? इतरांची मतं वाचून किंवा ऐकून​. उदा. सरकार संविधानात बदल करणार अशी बातमी आहे. मी यावर एक-दोन लेख​, मुलाखती, संपादकीय वाचतो, माझं मत बनवतो आणि एखादं वेळेस लेख लिहितो. मग ज्या वाचकांनी हे इतर लेख वाचलेले नसतात त्यांना लेख लय भारी वाटतो, ज्यांनी वाचलेले असतात त्यांना सो-सो वाटतो. किंवा ‘ग्लोबल वोर्मिंग’वर पुस्तक वाचलं, त्याची माहिती देणारा लेख लिहिला. हे करताना माझा वाटा फक्त माहितीचं संकलन आणि ती पुस्तक न वाचताही कुणालाही कळावी अश्या भाषेत मांडणं हा असतो. तरीही लोक वाचतात कारण सगळं पुस्तक वाचण्याइतका वेळ​/इंटरेस्ट बहुतेक लोकांना नसतो. कोणत्याही गोष्टीवरचं आपलं मत हे सतत आपण जे वाचतो, बघतो, ऐकतो आणि अनुभवतो त्यानुसार बदलत असतं. राजकारणापासून ‘ग्लोबल वोर्मिंग’पर्यंत कोणत्याही विषयावर मत बनवायचं असेल तर इतर मते वाचल्याशिवाय पर्याय नाही. थोडक्यात, कोणत्याही विषयावरचं माझं मत हे त्या-त्या विषयात जे तज्ञ लोक आहेत त्यांच्या मतांचं रिसायकलिंग असतं. फार​-फार तर एखाद्या लेखात मतं एकत्रित करून त्यावर भाष्य केलेलं असतं किंवा लेखकाने या सर्व मतांचा आढावा घेतलेला असतो. बरेचदा लेखक ही तसदीही घेत नाहीत​. काफ्कावर दोन जाहिरातींमध्ये दाटीवाटीने बसविलेल्या इन​-मीन तीन प्यारांचा लेख​. पहिल्या प्याऱ्यात इथे जन्मला, इथे बागडला, खूप खस्ता खाल्ल्या, मॅजिकल​ रिअलिझ्मचा जनक इ. इ. (इथे मॅजिकल​ रिअलिझ्म म्हणजे काय हे सांगण्याची तसदी घ्यायची गरज नाही, माहिती कोंबणं महत्त्वाचं)

    इथे मुद्दा येतो की असा एखादातरी विषय आहे का की ज्यावर मी इतरांचं न ऐकता माझं मत बनवू शकतो आणि ते मत ग्राह्य मानलं जाऊ शकतं? माझ्या मर्यादित वकुबानुसार असे दोन विषय दिसतात – पुस्तके आणि चित्रपट​. या विषयांवर कोणतंही मत असलं तरी ते चूक किंवा बरोबर नसतं, उलट आवडनिवड सापेक्ष असते असं म्हणून वेळ मारून नेता येते. दुसरं असं की हल्ली चित्रपट बघण्याआधी त्यावरचा लेख वाचला तर चित्रपट बघण्याचा अनुभव कमअस्सल झाल्यासारखा वाटतो. समीक्षकाचं चित्रपटावरचं लेखन म्हणजे एका प्रकारची रोरशाक टेस्टच बनली आहे – त्यावरून चित्रपट कसा आहे यापेक्षा समीक्षकाच्या आवडीनिवडीच अधिक लक्षात येतात​. कुणाला हॉलिवूड अजिबात आवडत नाही, कुणाला बॉलीवूड​. कुणाच्या मते निओरिअलिझ्म आणि सत्यजित रे म्हणजे सिनेमाचा सर्वोच्च बिंदू, तर कुणाच्या मते क्युब्रिक आणि स्कोरसेझी सर्वोत्कृष्ट​. यात काही गैर आहे असं अजिबात नाही, आवडीनिवडी प्रत्येकाच्या असतातच​. फरक हा की समीक्षा करताना त्यावर शक्यतो निष्पक्षपणे लिहिणं अपेक्षित असतं ते होत नाही. समीक्षकाच्या जागी जर मी मला ठेवलं तर हे किती अवघड आहे याची कल्पना येते. कधीकधी एकाच माणसाला ‘डॉन​’, ‘गॉडफादर​’, ‘राशोमोन’ आणि ‘अंदाज अपना अपना’ हे सगळं आवडू शकतं हेच मान्य नसतं कारण प्रेक्षकांची आणि चित्रपटांची विभागणी काटेकोर असते. रे म्हणजे ‘पाथेर पांचाली’, ‘चारुलता’ फारतर ‘महानगर​’. दि सिका म्हणजे ‘बायसिकल थीव्ह्ज’​. हे समज पूर्णपणे खोटे आहेत असं नाही पण ही या दिग्दर्शकांची अपुरी ओळख आहे. दि सिकाचं नाव घेतलं की त्याने सामान्य माणसांकडून ‘बायसिकल थीव्ज’ सारखा गंभीर चित्रपट कसा करवून घेतला यावर अनेक प्यारे वाचायला मिळतात​. पण याच दि सिकाचा ‘यस्टरडे, टुडे ऍड टुमारो’ फारसा चर्चेत येत नाही – ऑस्कर मिळून सुद्धा! इथे त्याने नवखे कलाकार न घेता मार्चेल्लो मास्त्रोय्यानी आणि सोफिया लोरेन सारखे कसलेले कलाकार घेतले. (निओरिअलिझ्म म्हणजे अंतिम सत्य या मताच्या विरोधात हा पुरावा पुरेसा ठरावा.) शिवाय हाताळणीही हलकीफुलकी, काहीशी विनोदी ठेवली. मार्चेल्लोला नेहमी गंभीर भूमिकांमध्ये बघायची सवय असेल तर तो विनोदी भूमिकाही किती समर्थपणे हाताळू शकतो याचं हा चित्रपट उत्तम उदाहरण आहे.

    समजा, तुम्हाला यासुजिरो ओझुचं नावही माहीत नाही. (मलाही काही महिन्यांपूर्वी माहीत नव्हतं.) त्याचा चित्रपट बघण्याचा योग आला तर त्याआधी तुम्ही त्यावर एक दोन लेख वाचता. मूळ लेख जर उत्कृष्ट असेल तर (उत्कृष्ट नसला तरीही बहुतेक वेळा तो उत्कृष्ट लेखांवर आधारित असतो त्यामुळे त्यात रिसायकल्ड मतं सापडण्याची शक्यता अधिक​.) तर अर्ध्या-एक तासात तुम्हाला ओझुची सगळी वैशिष्ट्ये रेडीमेड मिळून जातात – कॅमेऱ्याची हालचाल अगदी कमी, चित्रीकरणाचे नेहमीचे नियम तोडलेले, पात्रं बरेचदा पाठमोरी दाखवलेली इ. इ. तासाभरात तुम्ही ओझुवर एक लेखही लिहून टाकू शकता – हाय काय आन नाय काय​! नंतर चित्रपट बघताना तुम्ही काय करता? जे वाचलं त्याचा पडताळा घेता कारण चित्रपट सुरू व्हायच्या आतच तुमचं ओझुविषयी एक मत बनलेलं असतं. एकदा एक मत बनलं की आपण त्याच चश्म्यातून सगळीकडे बघतो. म्हणूनच होम्स सगळी तथ्ये समोर आल्याशिवाय कोणतंही मत बनवीत नसे. दुसरा पर्याय म्हणजे ओझुविषयी कोणतीही माहिती न मिळवता कोऱ्या मनाने चित्रपट बघणे. सध्या मी हा पर्याय स्वीकारलेला आहे.

    हे पुस्तकांच्या बाबतीतही खरं असायला हवं पण तसं अजून तरी आढळलेलं नाही – काही अपवाद वगळता. मी मुराकामीच्या पुस्तकांचे ‘अर्थ’ लावणारे लेख वाचणं सोडून दिलं आहे. तरीही पुस्तक वाचणे आणि चित्रपट बघणे यामध्ये काही मूलभूत फरक आहेत​. पुस्तक वाचताना मेहनत करावी लागते, पात्रे प्रसंग​, घटना डोळ्यासमोर आणाव्या लागतात​. चित्रपटात हे सगळं तयार असतं. उगीच का बहुतेक लोक वाचायचा कंटाळा करतात​? दहा जिने चढून जाणे आणि लिफ्टचं बटण दाबणे यात जो फरक आहे तोच पुस्तक वाचणे आणि त्यावरचा चित्रपट बघणे यात आहे. ही चित्रपटांवर किंवा चित्रपट बघणाऱ्यावर टीका नाही उलट चित्रपट या माध्यमाची जबरदस्त ताकद दाखविण्याचा प्रयत्न आहे. पुस्तक वाचताना काही तास ते कित्येक महिने जाऊ शकतात​, अनुभव खंडित असतो. चित्रपट दोन​-तीन तासात एकाग्रपणे बघण्याचा दृक​-श्राव्य अनुभव आहे. म्हणूनच मला एकाच दिवशी सात-आठ चित्रपट बघणाऱ्याविषयी (किंवा दिवसाला एका पुस्तकाचा फडशा पाडणाऱ्या बुकरच्या जजांविषयी) आदरयुक्त कुतूहलमिश्रित हेवा वाटतो. म्याट्रिक्समध्ये निओ जसं सगळं मेंदूत डाउनलोड करतो तसा काहीसा प्रकार​. कोरी पाटी घेऊन चित्रपट बघण्याचा अनुभव वेगळा असतो. इथे अर्थातच ज्यांच्यावर विचार करावा लागतो असे चित्रपट अपेक्षित आहेत​.

    लेख टीकात्मक नाही. जे लोक लेख वाचून चित्रपट बघतात ते चूक असंही म्हणणं नाही. उदाहरण द्यायचं झालं तर काही लोकांना नवीन शहर बघताना टुरिष्ट गाइड आणि गायडेड टूर आवडते. इथे फायदा असा की शहराची मुख्य आकर्षणे कमीत कमी वेळात बघून होतात​. काही लोकांना शहराची जुजबी माहिती घेऊन मग मनाला वाटेल तसं फिरायला आवडतं. या प्रकारे चित्रपट बघितला तर तो अनुभव अविस्मरणीय असतो हे मात्र नक्की. मग ‘पास्तिश’ म्हणजे काय हे ठाऊक नसलं तरी चालतं पण ‘किल बिल १’ मध्ये शेवटचा बर्फातील मारामारीचा प्रसंग ‘sheer visual poetry’ या प्रकारात मोडतो हे सांगण्यासाठी समीक्षकाची मदत लागत नाही.

    पोलिन केल​ महान समीक्षका (की समीक्षक​?) आहेत​ पण तोटा असा की त्यांचा लेख वाचल्यावर चित्रपटाविषयी न बघताच इतकी सखोल आणि आशयपूर्ण​ माहिती मिळते की नंतर चित्रपट बघताना त्याची छाप पुसणे केवळ अशक्य असतं. याचा अर्थ​​ चित्रपटांविषयी वाचन सोडून दिलं आहे असा नाही. चित्रपटाच्या इतर गोष्टी उलगडून दाखविणारे लेख नेहमीच रोचक असतात​. निओरिअलिझ्म म्हणजे काय याविषयी माहिती असेल तर ते चित्रपट बघताना अनुभव नक्कीच समृद्ध होतो. कुरोसावाचं आत्मचरित्र वाचल्यावर त्याच्या चित्रपटांकडे बघण्याची दृष्टी अधिक व्यापक होते. थोडक्यात सांगायचं तर (टू लेट​) कुरोसावा किंवा अंतोनियोनी या लोकांनी जिवापाड​ मेहनत घेऊन चित्रपट केले आहेत आणि त्याद्वारे ते मला काहीतरी सांगू इच्छित आहेत​. इथे मला समीक्षकाच्या मध्यस्थाची गरज नाही. चित्रपट बघितल्यानंतर वाटलंच तर लेख जरूर वाचेन पण चित्रपटाचा पहिला अनुभव घेताना शक्यतो पाटी कोरी असावी असा प्रयत्न आहे. म्हणून हल्ली लेख वाचताना हे जरूर बघा, इथे दिग्दर्शकाने अमुकसाठी अमुक प्रतीक वापरलं आहे, इथे त्याला असं म्हणायचं आहे अशी वाक्ये आली की मी लेख वाचणं सोडून देतो. निदान एखाद्या क्षेत्रात तरी मला रिसायकल्ड मत असण्यापेक्षा स्वतः​:चं मत असणं अधिक आवडेल​.

  • श्री चावुण्डराजे करवियले

    रोमच्या कलोसियमजवळ उत्खनन करताना एक व्याकरणाचं हस्तलिखित सापडलं. याचा काळ अंदाजे इ. स. ३०० च्या आसपास असावा. यात एका भाषाशिक्षकाने त्याच्या विद्यार्थ्याच्या चुका दुरूस्त केल्या आहेत. त्या काळात लॅटीन ही राजभाषा होती. सगळे अधिकृत व्यवहार लॅटीनमधून चालायचे, पण रोजच्या संभाषणात ही कुठलीही सुरकुती न पडू देणारी भाषा कामाची नव्हती. त्यासाठी लोक लॅटीनची वेगवेगळी भ्रष्ट रूपे…

    रोमच्या कलोसियमजवळ उत्खनन करताना एक व्याकरणाचं हस्तलिखित सापडलं. याचा काळ अंदाजे इ. स. ३०० च्या आसपास असावा. यात एका भाषाशिक्षकाने त्याच्या विद्यार्थ्याच्या चुका दुरूस्त केल्या आहेत. त्या काळात लॅटीन ही राजभाषा होती. सगळे अधिकृत व्यवहार लॅटीनमधून चालायचे, पण रोजच्या संभाषणात ही कुठलीही सुरकुती न पडू देणारी भाषा कामाची नव्हती. त्यासाठी लोक लॅटीनची वेगवेगळी भ्रष्ट रूपे वापरत असत. त्या विद्यार्थ्याने शब्दांची त्या काळी भ्रष्ट समजली जाणारी रूपे लिहीली होती आणि शिक्षकाने त्यावर काट मारून त्या शब्दांचे शुद्ध लॅटीन रूप लिहीले होते. हजार-बाराशे वर्षानंतर इटालियन भाषा अस्तित्वात आली तेव्हा विद्यार्थ्याने लिहीलेले शब्द अधिकृत झाले होते आणि शिक्षकाची लॅटीन भाषा लयाला जाण्याच्या मार्गावर होती.

    हे आठवायचं कारण म्हणजे नुकतेच मराठी भाषा दिवसाच्या निमित्ताने काही लेख वाचले. दरवर्षी पावसाळा येतो तसंच नित्यनेमाने मराठी कशी धोक्यात आहे यावर लेखही येत असतात. लेखकाच्या आवडीनुसार हा धोका ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट या पातळीमध्ये कुठेतरी असतो. लेख मराठी कशी भ्रष्ट होते आहे, तिची दैन्यावस्था वगैरे नेहेमीच्याच चीजा वेगवेगळ्या सुरांमध्ये आळवणारे होते. इथे लेखकांशी काही प्रमाणात सहमत आहे. म्हणजे किमान वृत्तपत्रांमध्ये निर्दोष मराठी वाचायला मिळावं ही माफक अपेक्षा आहे. लेखक आणि संपादक भाषेच्या बाबतीत अधिक काटेकोर असायला हवेत. दुध, केशवसूत अशा चुका टाळायला हव्यात.

    पण याचबरोबर मराठीचं बदलतं रूपही लक्षात घ्यायला हवं. पूर्वी सर्व इंग्रजी शब्द हद्दपार केले पाहीजेत असं म्हणणारे भाषारक्षक आता जरा मवाळ होत आहेत असं वाटतय. इंग्रजी शब्द चालतील, पण त्यांना मराठीचे नियम लागू पडत असतील तरच असा वेगळा वाटणारा पवित्रा काही लोक घेतात. अर्थात नंतरच्याच वाक्यात मराठीत परकीय शब्दांची भेसळ फार वाढली आहे आणि त्यामुळं मराठी भ्रष्ट होते आहे असं म्हणून समतोल साधला जातो. खरी गोम अशी आहे की इंग्रजी शब्दांसाठी संस्कृतमधून आणलेले प्रतिशब्द ज्याने तयार केले आहेत ते त्याच्याव्यतिरिक्त कुणीच वापरायला तयार नाही. काही दिवसांनी त्याला स्वत:लाही कंटाळा येतो. सारखं-सारखं भ्रमणध्वनी, कार्यालय किंवा उपाहारगृह कोण म्हणणार? प्रतिशब्द तयार करणं फार सोपं आहे, ते लोकांना वापरायला लावणं दहा-बारा मांजरांना एका रांगेत आणण्याइतकं अवघड आहे.

    भाषा हे साधन आहे, साध्य नव्हे. भाषा जपायला हवी पण याचा अर्थ तिला राजपुत्र सिद्धार्थाप्रमाणे कोणत्याही दु:खी अनुभवापासून दूर ठेवायचं असा नाही. असं केलं तर भाषा कृत्रिम, तकलादू होते, तिचा आत्मा हरवतो. भाषेला संस्कृतीशिवाय वेगळं अस्तित्व नाही, भाषा संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पण याचा परिणाम म्हणजे संस्कृती जशी बदलते तशी भाषाही बदलत जाते. मराठी आणि जगातील इतर सर्व भाषा बदलत आहेत आणि बदलत राहणार. त्यांच्यावर इतर भाषांचे अधिकाधिक प्रभाव पडत जातील. या संक्रमणातून जी तावून सुलाखून निघते त्या भाषेला आपला लहेजा असतो. त्यातून जी भाषा तगेल ते तिचे तत्कालीन स्वरूप. बाकी सगळं बदलत असताना भाषा तशीच राहील अशी अपेक्षा करणं व्यर्थ आहे.

    इथे एक मूलभूत गैरसमज असावा असं वाटतं तो म्हणजे मोठमोठे भाषातज्ज्ञ, पंडित भाषेचे नियम ठरवतील आणि जनता निमूटपणे ते नियम पाळेल. असं झाल्याचं उदाहरण इतिहासात कुठेही सापडत नाही. जे घडतं ते नेमकं उलट असतं. जनता भाषा वापरते, तिला वेगवेगळी वळणे देते, तिच्यात वैविध्य आणते आणि भाषेचे अभ्यासक ते नियम संकलित करून त्याला व्याकरण म्हणतात. म्हणूनच प्रत्येक भाषेला तिची स्वत:ची अशी वैशिष्ट्ये असतात. यातूनच कोणतेही नियम नसताना प्रत्येक वस्तूला ती, तो, ते म्हणण्याचा प्रघात पडतो किंवा बहुतेक सर्व क्रियापदांची रूपं नियमानुसार वागत नाहीत. भाषा कवायत करणार्‍या सैनिकांप्रमाणे शिस्तीत वागत नाही, तिला मनसोक्त हुंदडायला आवडतं.

    एखाद्या व्यक्तीच्या प्रयत्नांमुळे भाषेत आमूलाग्र बदल होतच नाहीत असं नाही. पण ती व्यक्ती शेक्सपियर, दान्ते किंवा तुकाराम असावी लागते. यातही महत्वाचा मुद्दा असा की या सर्वांचा मूळ हेतू भाषेची समृद्धी नव्हता. त्यांना सखोल आशय असलेलं काहीतरी सांगायचं होत, त्यासाठी त्यांनी आपली भाषा निवडली. हे व्यक्त करण्यासाठी जिथे ती भाषा तोकडी पडत होती तिथे तिला नवीन आधार दिले, नवीन शब्द बनवले. या लोकांनी हजारांनी वाक्प्रचार तयार केले आणि ते आजही वापरात आहेत. का? कारण त्या वाक्प्रचारांच्या माध्यमातून त्यांनी जे व्यक्त केलं ते जनतेला विसरणं अशक्य झालं. फॅक्टरीमधून निघावेत तसे किलोकिलोनी नुसते नवीन शब्द तयार करायचे पण त्यातून व्हॅलेंटाइन डेच्या कविता आणि विडंबनं यापलिकडे काही निघणार नसेल तर असे शब्द आणि त्यामागचा आशय कुणाच्या लक्षात राहणार? भाषा बदलायची असेल तर त्यासाठी प्रतिभावंत कवी हवेत, पण असे प्रतिभावंत तयार करता येत नाहीत. फार फार तर ते तयार होतील असं वातावरण बनवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मराठीत गेल्या पन्नास वर्षात नवीन शब्दकोष झालेला नाही. नवीन शब्दांची भर घालून शब्दकोष अद्ययावत ठेवणं ही जबाबदारी जे पंडित भाषा बुडाली असं सतत ओरडत असतात त्यांची आहे.

    जगातील सर्व भाषांमध्ये परकीय आक्रमण होतय म्हणून आरडाओरड चालू आहे. फ्रेंच मध्ये इंग्रजी शब्द, इंग्रजी आणि चिनी भाषेमधून तयार झालेलं चिंग्लीश. फ्रेंचवरून आठवलं, प्रत्येक वेळी मराठीची दुर्दशा सांगताना तिची तुलना फ्रेंच किंवा जपानी लोकांच्या भाषाप्रेमाशी केली जाते. “फ्रेंच बघा आपल्या भाषेवर किती प्रेम करतात नाहीतर आपण!” हा मराठीवर अन्याय आहे. फ्रेंच एका देशाची भाषा आहे. तिच्यामागे त्या देशाची संपत्ती, कित्येक शतके चालत आलेल्या साम्राज्याची ताकद आहे. फ्रेंच माणसाला जन्मल्यापासून मरेपर्यंत दुसरी कोणतीही भाषा आली नाही तरी त्याच्या देशात त्याचे काही बिघडत नाही. याउलट भारतात कुठेही जन्माला आलात तर किमान तीन भाषा शिकाव्याच लागतात, आणि कानावर किमान पाच-सहा भाषा नक्कीच पडतात. मराठी ही प्रादेशिक भाषा आहे, राष्ट्रीय भाषा नव्हे. तिला २२ अधिकृत आणि कित्येकशे बोलीभाषांच्या सहवासात रहावं लागत आहे. त्यांचा परिणाम तिच्यावर होणारच. महाराष्ट्राची तुलना फ्रान्सशी न करता भारताची तुलना युरोपशी करायला हवी.

    लेखाच्या सुरूवातीला जे उदाहरण आलं त्याचा शेवट रोचक आहे. तेराव्या शतकापर्यंत इटालियन भाषेला स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. वेगवेगळ्या भागांमध्ये बोलल्या जाणार्‍या गावंढळ बोलीभाषा घरादारात वापरताना सगळेच वापरायचे पण साहित्य, कला किंवा अधिकृत व्यवहारांमध्ये लॅटीन श्रेष्ठ मानली जायची, तिथे या बोलीभाषांना प्रवेश नव्हता. तेराव्या शतकात दांते अलिगिएरीच्या रूपाने इटालियन भाषेला तिचा तारणहार मिळाला. ‘ला कॉमेदिया’ लिहीण्यासाठी दांतेनं लॅटीन न वापरता मध्य इटलीच्या तोस्कानी भागात बोलल्या जाणार्‍या बोलीभाषेची निवड केली. या भाषेला त्यानं इटालियन असं नाव दिलं. ला कॉमेदिया प्रकाशित झाल्यावर इटालियन लोक या महाकाव्याने वेडे झाले. ज्याच्या त्याच्या तोंडी दांतेच्या ओळी होत्या. इटालियन लोकांना त्यांची स्वत:ची अशी ओळख मिळण्यामध्ये कॉमेदियाचा महत्वाचा वाटा आहे. आजही कोणत्याही इटालियन माणसाला दांतेची पानेच्या पाने पाठ असतात. त्याचा वाक्प्रचार ऐकू आला नाही असा दिवस इटलीमध्ये काढणं अशक्य. रॉबेर्तो बेनिन्यीने केलेली कॉमेदियाची वाचने आजही हाउसफुल असतात.

    मला मराठी लई आवडते. (आवडत नसती तर इथे इतकं खरडलं असतं का?) पण ती जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे किंवा ती बोलतो म्हणून मी सुदैवी असं मला वाटत नाही. बंगाली, उर्दू, इटालियन, जपानी, पंजाबी, मालवणी मला तितक्याच आवडतात. त्या मातृभाषा असत्या तरी हरकत नव्हती. ‘सारे जहां से अच्छा’ पटत नाही ते अशासाठी की ते खरं नाही. आपलीच रेघ सर्वात मोठी असं दाखवणं निदान आजच्या जगात तरी कालबाह्य मानलं जावं अशी अपेक्षा आहे.

    —-

    १. श्रवणबेळगोळ येथील हा शिलालेख मराठीतील पहिला शिलालेख आहे (इ. स. १११६-१७) असं मानलं जात होतं. अक्षी इथे सापडलेला इ. स. १०१२ मधला शिलालेख आता पहिला मानला जातो.