Categories
चित्रपट​ संगीत​

पंचम नावाचं वादळ

आवडत्या विषयावर लिहिणं अवघड असतं, विशेषत: तो विषय लोकप्रिय असेल तर. म्हणूनच ग़ालिब किंवा वुडी ऍलन यांच्यावर एक ओळही लिहिणं अजून जमलेलं नाही. कारण यांच्यावर आजवर जे लिहिलं गेलं आहे त्यापेक्षा वेगळं सांगण्यासारखं काही नाही. आणि इथे जन्मला, अमुक केलं अशी नुसती माहिती तर विकीवरही सापडते. असाच एक विषय आर. डी. बर्मन उर्फ पंचमदा. पंचमदांवर लेख लिहिणं महाकठीण काम. त्यांची एकाहून एक अजोड गाणी सगळ्यांना तोंडपाठ आहेत, लेखात आणखी काय सांगायचं? मला अमुक गाणं आवडलं म्हणून? तरीही हा लेख पंचमदांवर आहे आणि याला एक तसंच सबळ कारण आहे.

जे. कृष्णमूर्ती भारताचा उल्लेख बरेचदा ‘धिस अनफॉर्च्युनेट कंट्री’ असा करतात. हे इतक्या बाबतीत पटतं की सांगायची सोय नाही. यातील एक बाब म्हणजे करंटेपणा – हे आपलं ‘न्याशनल कॅरेक्टर’ असावं. आपल्याकडे काय आहे याची आपल्याला कधीही पूर्ण जाणीव नसते. गेल्या शतकात भारतीय चित्रपट सृष्टी अनेक स्थित्यंतरांमधून गेली, कित्येक मोठमोठे कलाकार आले आणि गेले. या सर्व काळाच्या नोंदी अत्यंत त्रोटक आहेत. त्यामुळे एकदा जुने लोक पडद्याआड गेले की या काळातील घटनाही त्यांच्याबरोबरच जातील. शंभर वर्षांचा वारसा असलेल्या या कलेचा प्रवास कसा झाला हे कळणारही नाही कारण वारसा नावाचं काहीतरी असतं आणि ते जतन करावं लागतं याचा पत्ताच नसतो. नोंदी घ्यायच्याच नाहीत, चुकून घेतल्या तरीही जपायच्या नाहीत.

वैधानिक इशारा : पुढच्या ओळी वाचून रक्तदाब वाढण्याची शक्यता आहे. १९६७ मध्ये मार्लन ब्रॅंडो भारतात आला असताना सत्यजित रेंबरोबर त्याची मुलाखत घेतली होती. याची टेप दूरदर्शनने हरविली. कुरोसावा, अन्तोनियोनी आणि इलया कझान भारतात आले असताना सत्यजित रेंबरोबर चर्चासत्र झालं होतं. याचीही टेप दूरदर्शनने गहाळ केली किंवा त्यावर परत टेप केलं.

काही आशेचे किरण दिसतात. यातील एक म्हणजे अनिरुद्ध भट्टाचारजी आणि बालाजी विट्टल यांचं ‘आर. डी. बर्मन – द मॅन, द म्युझिक’ हे पुस्तक. नवलाईची गोष्ट म्हणजे या जोडगोळीचा हिंदी चित्रपट सृष्टीशी कोणताही अधिकृत संबंध नाही. अनिरुद्ध आय. आय. टी खरगपुरचे , सध्या आयबीएममध्ये कामाला, तर बालाजी जाधवपुर विद्यापीठातून उत्तीर्ण झाल्यावर ‘रॉयल बॅंक ऑफ स्कॉटलंड’ मध्ये काम करतात. यांचा आणि पंचमदांचा संबंध एकच – इतर लाखो लोकांप्रमाणे हे पंचमदांचे ‘डाय हार्ड फॅन’ आहेत. पुस्तकात बरेचदा संकेतस्थळांवर होणाऱ्या चर्चांचे उल्लेख येतात, यावरून सर्व संकेतस्थळांची व्यवच्छेदक लक्षणे सारखीच असावीत असं वाटतं. (बहुधा चर्चांमधील बिनबुडाच्या, कोणतेही संदर्भ न देता केलेल्या आरोपांना कंटाळून यांनी पुस्तक लिहिलं की काय अशी शंका येते.) हिंदी चित्रपटांमध्ये संगीताचं अजोड स्थान आहे. केवळ चित्रपट संगीतामध्ये कशी स्थित्यंतरे येत गेली, त्यामागची कारणे काय होती हे स्वतंत्र अभ्यासाचे विषय आहेत. पण कोणतातरी रॅंडम परकीय मापदंड लावून एकदा हिंदी चित्रपट टुकार असा शिक्का मारला की गाण्यांकडे कोण बघणार आणि तिथे काही नवीन प्रयोग केले तरी कुणाचं लक्ष जाणार? साहजिकच कित्येक गायक, गीतकार, संगीतकारांनी जे अमूल्य योगदान दिलं त्याचीही योग्य समीक्षा होत नाही. कित्येक समीक्षकांना गाण्यांसहित हिंदी चित्रपटाचं परीक्षण कसं करावं याचाच पत्ता नसतो कारण गाणं म्हणजे थिल्लर मनोरंजनासाठी टाकलेला ‘फिलर’ यापलीकडे त्यांची कल्पनाशक्ती जातच नाही. या संदर्भात अनिरुद्ध-बालाजी म्हणतात, “The deeper understanding of what a note/chord combination/rhythm pattern depicts and why it has been used, etc., will comprise the new paradigm for critical appraisals of light music today. And between now and the new paradigm, our critics will need to study hard to upgrade themselves.”

Book cover for R D Burman : The Man, The Music

पुस्तक सगळ्याच बाबतीत इतकं उत्कृष्ट आहे की काय सांगावं आणि काय नाही हे कळत नाही. सर्वात महत्त्वाचं – हे फक्त दोन फॅन लोकांनी ओथंबून लिहिलेले लेख नाहीत. यासाठी त्यांनी पंचमदांबरोबर काम केलेल्या अनेक लोकांच्या- शम्मी कपूरपासून देव आनंद पर्यंत – मुलाखती घेतल्या आहेत. यामुळे यात असलेली बरीच माहिती आजपर्यंत अप्रकाशित होती. जोडीला दोघांचाही संगीताचा व्यासंग आणि अभ्यास खोल आहे. त्यामुळे प्रत्येक गाण्याच्या नोट्सपासून रागापर्यंत सर्व बाबींचं सखोल परीक्षण यात आढळतं. फॅन असले तरी आंधळी भक्ती नाही त्यामुळे जिथे पंचमदांच्या संगीताचा दर्जा खालावला तिथे त्यांच्यावर टीकाही केली आहे आणि त्याची संभावित कारणंही दिली आहेत.

पंचमदांच्या कारकीर्दीचा आढावा घेणं अवघड काम आहे आणि यात ही लेखकद्वयी यशस्वी झाली आहे. हा आढावा घेताना नुसती गाण्यांची यादी आणि वर्णन देऊन भागत नाही. पंचमदा ‘ट्रेंड सेटर’ होते, त्यामुळे त्यांच्या आधीचं संगीत कसं होतं, त्यांनी कोणते बदल केले हे सांगणं आवश्यक ठरतं. त्याचबरोबर त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचा आणि कालमानसाचा विचार करणंही गरजेचं आहे. एसडींचा असिस्टंट म्हणून काम करताना त्यांनी दिलेल्या गाण्यांमध्ये पंचमदांची झलक बरेचदा दिसते. ‘तीन देवियां’मधल्या एका प्रसंगाला पार्श्वसंगीत म्हणून पं. शिवकुमार शर्मा यांनी ‘आजा आजा मै हूं प्यार तेरा’ची चाल संतूरवर वाजविली आहे.  ‘गाता रहे मेरा दिल’ मधल्या लांब नोट्स, ‘पिया तोसे नैना लागे रे’ मधला मोठा ऑर्केस्ट्रा वगैरे. ‘छोटे नवाब’, ‘भूत बंगला’ मध्ये माफक यश मिळाल्यावर पंचमदांची कारकीर्द डळमळीत झाली होती. बर्मनदांच्या छायेतून बाहेर पडणं आवश्यक होतं. ‘तिसरी मंझिल’ मिळाल्यावर त्यांना जयकिशनने सांगितलं, “यू मस्ट मेक इट टेरिफिक” आणि पंचमदांनी  नेमकं हेच केलं.  शंकर-जयकिशनचं ऑर्केस्ट्रेशन आणि ओपीचा ठेका सोडला तर हिंदी गाण्यांमध्ये वाद्यांना स्वतंत्र अस्तित्व नव्हतं. पंचमदांनी लतिनो, ब्लूज, सिनात्राने वापरलेल्लं ब्राझिलियन सांबा संगीतातील बोस्सा नोव्हा असे अनेक प्रकार वापरले. ‘आजा आजा मै हूं प्यार तेरा’ मधील सुरुवातीचे अफलातून गिटार आणि ड्रम आणि ‘ओ हसीना’च्या सुरुवातीचा ड्र्म ऐकताना आपण चुकून आर्ट ब्लेकी ऐकतो आहोत की काय अशी शंका येते. ‘ओ हसीना’ला जवळजवळ ८० वादकांचा ऑर्केस्ट्रा होता, त्यात सुमारे ४० व्हायोलिन वादक होते. आजवर श्रोत्यांनी हिंदी गाण्यांमध्ये असं काही ऐकलं नव्हतंच, गायकांनाही हा प्रकार नवीन होता. ‘आजा आजा’ साठी रफी यांना तीन टेक द्यावे लागले. आशाताईंनी या गाण्यासाठी लतादीदींचं मार्गदर्शन घेतलं होतं.

‘तिसरी मंझिल’ची गाणी अमाप लोकप्रिय झाली तरी सनातनी लोकांनी याकडे पाठ फिरवली. पंचमदांनी हिंदी संगीताचं ‘वेस्टर्नायझेशन’ केल्याचे आरोप झाले. ‘तिसरी मंझिल’ला फिल्मफेअर नामांकनही मिळालं नाही. किंबहुना पंचमदांची फिल्मफेअरने नंतरचं सर्व दशक उपेक्षा केली. ‘कटी पतंग’, ‘अमर प्रेम’, आंधी’ यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये उत्तम संगीत देऊन सुद्धा त्यांना एकही पारितोषिक दिलं गेलं नाही. अखेर फिल्मफेअरला जाग आली १९८२ मध्ये. ‘सनम तेरी कसम’साठी पंचमदांना पहिलं फिल्मफेअर पारितोषिक मिळालं. आणि आता फिल्मफेअरने पंचमदांच्या नावाने पुरस्कार सुरू केला आहे. पंचमदांना भारतीय शास्त्रीय संगीताची जाण नाही हा आरोपही बरेचदा झाला. आरती मुखर्जी (मासूम मधल्या ‘दो नैना और एक कहानी’च्या गायिका) एकदा धारवाडला एका संगीत सभेसाठी गेल्या असताना तिथे त्यांना पंडित मल्लिकार्जुन मन्सूर भेटले. ते ‘रैना बीती जाए’ गुणगुणत होते. त्यांचा अवाक झालेला चेहरा पाहून मन्सूर यांनी त्यांना पंचमदांनी या गाण्यात वेगवेगळ्या नोट्स कशा सुरेख मिसळल्या आहेत हे सांगितलं. भारतीय शास्त्रीय संगीताच्या एका विद्वानाकडून मिळालेल्या पावतीहून अधिक काय हवे? (गाण्यातील इराणियन संतूर आणि बासरी शिव-हरी यांची आहे.)

पुस्तकात अनेक रोचक किस्से आहेत. ‘येक चतुर नार’ चे महाअवघड चढउतार आणि करामती ऐकल्यावर किशोरदांसारखा कसलेला गायकही चक्रावला. त्यांनी मन्ना डेबरोबर नऊ तास सराव केला. पडद्यावर होता तसाच हा प्रत्यक्षातही शास्त्रीय तालमीत तयार झालेले मन्ना डे आणि नैसर्गिक किशोरदा यांच्यातला सामना होता. मन्नादांना आपल्या तालमीचा अभिमान होता, त्यामुळे शेवटी किशोरदांसोबत हरावं लागण्याबाबत ते साशंक होते. गाण्यात ‘ओ टेढे, सीधे हो जा रे’ ही किशोरदांनी ऐनवेळी घेतलेली उत्स्फूर्त ऍडीशन आहे. ते ऐकून मन्नादा भांबावले, पण पंचमदांनी ‘चालू ठेव’ अशी खूण केली. नंतर किशोरदा वरचढ ठरल्याचं मन्ना डे यांनी मोठ्या मनाने मान्य केलं होतं. ‘घर’ मधल्या ‘आप की आंखो में’ गाण्यात ‘लब हिले तो मोगरे के फूल खिलते है कहीं’ मध्ये मूळ शब्द ‘जब’ होता तिथे किशोरदांनी चुकून ‘लब’ म्हटलं. गंमत म्हणजे दोन्ही शब्दांमुळे अर्थ बदलला तरी अनर्थ होत नाही. बाकीचं गाणं ओके होतं त्यामुळे पंचम-गुलजारने ‘लब’ तसाच राहू दिला.

पंचमदांनी अनेक संगीतकारांना वाट दाखवली. बप्पी लाहिरी – ‘माना हो तुम’, ‘चलते चलते’, राजेश रोशन – ‘ज्यूली’ ‘दूसरा आदमी’, यांच्यावर त्याचा प्रभाव दिसतोच पण मदन मोहनही ‘तुम जो मिल गए हो’ या गाण्यात पंचमच्या मार्गाने जाताना दिसतात. किनारामधील ‘जाने क्या सोचकर नही गुजरा‘ या गाण्याला सलील चौधरी यांनीही चाल दिली आहे. सलीलदांचं गाणंही एक-दोनदा ऐकल्यावर लक्षात राहतं, पण किशोरदांनी याला जी डेफ्थ दिली आहे तिला तोड नाही. (गुलजारनी याचा मुखडा वापरला, पण अंतऱ्याचे शब्द बदलले. पहिल्या कडव्यात ‘क्यू शब-ए-गम की कर चुके हो सहर’ वर ग़ालिबच्या ‘शम्मा हर रंग में जलती है सहर होने तक’ चा प्रभाव जाणवतो.) भारतीय चित्रपट संगीतामध्ये अनेक नवीन वाद्ये, नवीन मिक्सिंगची उपकरणे आणि बाटल्यांपासून कंगव्यापर्यंत वेगवेगळ्या वस्तूंचा आवाज त्याने कल्पकतेने वापरला. एकदा रणधीर कपूर स्टुडियोत गेले तर पंचमदां आणि त्यांचे सहकारी अर्ध्या भरलेल्या बियरच्या बाटल्या फुंकत होते. यातून जो आवाज आला तो ‘मेहबूबा मेहबूबा’ गाण्यात सुरुवातीला वापरला आहे. कोणताही आवाज पंचमदांना निरर्थक वाटत नसे. एकदा स्टुडियोमधला पंखा बिघडला. प्रत्येक आवर्तनाला तो ठक-ठक आवाज करत होता. त्यावरून पंचमदांना गाणं सुचलं, ‘सुनो, कहो, कहा, सुना, कुछ हुआ क्या?’

पंचमदांचं खाजगी आयुष्य आणि कारकीर्द यांचा समतोल या पुस्तकात साधलेला दिसतो. खाजगी आयुष्याचं वर्णन करताना त्याचं ‘गॉसिप’ होऊ दिलेलं नाही, पण यामुळे पंचमदांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू समोर येतात. शिवाय याचा त्याच्या कारकीर्दीवर कसा परिणाम झाला हे ही कळायला मदत होते. पुस्तकासाठी प्रचंड संशोधन केलं आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी संदर्भ दिलेले आहेत. जिथे पडताळून पाहणं शक्य नव्हतं किंवा संदिग्धता होती तिथे तसं स्पष्ट सांगितलेलं आहे. या पुस्तकाला २०११ सालचा चित्रपटावरील उत्कृष्ट पुस्तकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

पंचमदांच्या काळात जग छोटं होतं. आज रहमानला जो फायदा मिळतो आहे तो त्यांना मिळाला नाही. तरीही आज त्यांचं संगीत नवीन लोकांपर्यंत पोचतं आहे. ‘क्रोनोस क्वार्टेट‘ या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ग्रूपने पंचमदांच्या चाली वापरून आशाताईंबरोबर केलेल्या ‘यू हॅव स्टोलन माय हार्ट‘ या अल्बमला २००६ साली ग्रॅमी नामांकन मिळालं होतं. ग्रूपचा प्रमुख संगीतकार डेव्हिड हॅरींग्टन म्हणतो, “As an orchastrator, Burman is up there with Stravinsky; as a writer of melodies he is as good as Schubert.” आपल्या समीक्षकांना ही जाण कधी येईल याची वाट बघायला हवी.

परकीय समीक्षकांनी चांगलं म्हटलं काय आणि नाही म्हटलं काय, भारतीय चित्रपट संगीताच्या चाहत्यांच्या मनात पंचमदांची जागा अढळ आहे हे नक्की.

—-

१. नोंदीचा एक उत्तम मार्ग म्हणजे कलाकारांच्या मुलाखती. रेडीओ सिटी ९१.१ एफएमवर दर रविवारी दुपारी १२ आणि रात्री ९ ला ‘संगीत सितारों की महफिल – अमीन सायानी के साथ’ हा कार्यक्रम असतो. मागच्या वेळी नौशाद यांची अमीन सायानी यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. नौशादसाहेबांचं उर्दू -‘शाम का समय था, सूरज गुरुग हो रहा था’, ‘शेरो-ओ-सुखन से वाकफियत’ – ऐकून कान तृप्त झाले. (वाकफियत! काय शब्द आहे, वा!) यात त्यांनी सांगितलेला एक किस्सा. मेहबूब यांच्या ‘अनमोल घडी’ मधल्या ‘अफसाना लिख रही हूं’ गाण्याचं रेकॉर्डींग चालू होतं. मेहबूब तिथे आले आणि त्यांनी सूर-तालासंबंधी काही सूचना केल्या. नौशादना ते आवडलं नाही पण ते गप्प बसले. काही दिवसांनी ते सेटवर गेले तेव्हा मेहबूब कॅमेऱ्या च्या व्ह्यूफाइंडरमधून फ्रेम बघत होते. नौशाद यांनी त्यांना “मी बघू का” म्हणून विचारलं. बघितल्यानंतर त्यांनी मेहबूबना “हे टेबल हालवा, ती खुर्ची हालवा” अशा सूचना केल्या. मेहबूब वैतागून म्हटले, “जनाब, ये आप का काम नही है. आप जाके वो तबला-पेटी बजाइये.” “बस, मै यही सुनना चाहता था.” मेहबूब काय समजायचं ते समजले. परत त्यांनी रेकॉर्डींग स्टुडिओमध्ये पाऊल ठेवलं नाही.

१०५.६ मेगाहर्डझ वर ‘ग्यानवाणी’ स्टेशनवर ‘लेख कसा लिहावा’ यापासून ते प्राथमिक जर्मन व्याकरणापर्यंत अनेक रोचक कार्यक्रम असतात. पुन्हा रेडिओ हे मनोरंजनाचं साधन झालं तर बरं असं वाटतं आहे.

२. ‘रुप तेरा मस्ताना‘ हे सगळं गाणं एका टेकमध्ये चित्रित केलं आहे. आज कॅमेरा कुठेही असला तरी काही वाटत नाही, सिजीआयच्या साहाय्याने काहीही दाखवता येतं. कमीत कमी तांत्रिक साहाय्य असताना हे गाणं चित्रित करणं किती अवघड गेलं असेल. कॅमेरा ट्रॅकवर आहे, बहुतेक वेळ कॅमेरा आणि राजेश-शर्मिला शेकोटीभोवती फिरतात पण क्लोज अप आणि मिड शॉटचं बेमालूम मिश्रण आणि कलाकारांच्या सापेक्ष कॅमेऱ्याची वेगवेगळ्या दिशेने हालचाल यामुळे हे सहज लक्षात येत नाही. नंतर दोघे खिडकीजवळ जातात तेव्हा मिड-लॉंग शॉट आहे. हे गाणं फिल्म इन्स्टिट्यूटच्या अभ्यासक्रमात होतं.

Categories
चित्रपट​ संगीत​

शंकर-जयकिशन

बरेचदा असं दिसतं की भारतीय दिग्दर्शक आधी परदेशात लोकप्रिय होतात, आणि मग त्यांना इथे मान्यता मिळते. सत्यजित रेंच उदाहरण प्रसिद्धच आहे, गुरूदत्तला तिकडे प्रसिद्धी मिळाल्यानंतर बर्‍याच लोकांना त्याच्या महानतेचा शोध लागला. पण इथेही एक गंमत आहे. तिकडची प्रसिद्धी कोणत्या स्तरावर मिळते यावर बरंच काही अवलंबून असतं. तिकडच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिक वगैरे मिळालं तर इकडे मान्यतेचा शिक्का लगेच बसतो. पण जर तिकडेही तुमची प्रसिद्धी सामान्य लोकांमध्ये असेल तर त्याला इथे फारशी किंमत दिली जात नाही. याची अनेक उदाहरणे देता येतील – एक प्रमुख उदाहरण आहे राज कपूरचं. पहिल्यापासून राज कपूरला रशिया, आखाती देश इत्यादी ठिकाणी भरपूर लोकप्रियता मिळाली. ‘आवारा’ आणि ‘बूट पॉलिश’ साठी कॅन चित्रपट महोत्सवात नामांकन देखील मिळालं होतं. असं असूनही भारतातील उल्लेखनीय दिग्दर्शकांची यादी जेव्हा केली जाते तेव्हा त्यात राज कपूरचं नाव दिसत नाही. कशी गंमत आहे बघा. समीक्षक रशियन दिग्दर्शक आयझेन्स्टाइनला मानाचं स्थान देतात. आयझेन्स्टाइन ज्या मातीतून आला, ज्या प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं त्याच प्रेक्षकांनी राज कपूरलाही पसंत केलं.

‘आवारा’ आजच्या काळात रुचणं कठीण असलं तरी त्या वेळची परिस्थिती बघता दिग्दर्शन आणि कॅमेरा यांच्यात दाखवलेल्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते. (‘घर आया मेरा परदेसी’चा ड्रीम सीक्वेन्स त्या काळात अविश्वसनीय होता.) त्याचबरोबर त्याने नेहमी समाजातील ज्वलंत विषय निवडले हे ही खरं. (‘आवारा’, ‘श्री ४२०’ मध्ये भ्रष्टाचार, गुन्हेगारी किंवा ‘प्रेम रोग’मध्ये विधवा विवाह इ.) खरं तर ‘आवारा’ रशियात इतका लोकप्रिय का झाला याचं मला नेहमी नवल वाटतं. आजच्या पेक्षा त्या काळात पब्लिसिटी इ. वर अनेक मर्यादा होत्या. शिवाय परकीय संस्कृती, भाषा, मध्येच कधीही न ऐकलेल्या ताल-सुरांमध्ये लोक गाणी गात आहेत किंवा नाचत आहेत. हे सर्व असूनही ‘आवारा’ला रशियामध्ये अपूर्व यश मिळालं. एक दोन कारणं दिसतात. ‘आवारा’चा मुख्य गाभा आहे – ‘रोटी’. माणसाच्या अगदी मूलभूत गरजांमधली एक. त्या काळात कम्युनिस्ट रशियामध्ये जी हलाखीची परिस्थिती होती ती लक्षात घेता रशियन प्रेक्षकांना ‘रोटी’साठी गुन्हेगारीच्या मार्गावर जाणारा नायक आतमध्ये भिडला. दुसरं म्हणजे रशियन संस्कृती बर्‍यापैकी मोकळी-ढाकळी आहे. ब्रिटिश किंवा इतर युरोपियन देशांमध्ये जे अनेक शिष्टाचार प्राणांपलीकडे पाळले जातात ते प्रमाण रशियात कमी आहे. भारतीयांमध्येही हा गुण दिसतो. या दोन संस्कृतीमधला अनौपचारिकपणा कदाचित समान धागा ठरला असावा.

हिंदी गाणी आपल्या जनमानसात किती खोलवर रुजली आहेत याची एक प्रचिती हवी असेल तर विविधभारती ऐकावं. भारतात आजही लाखो लोक आहेत ज्यांचं रेडिओ हे मनोरंजनाचं मुख्य साधन आहे. हातावर पोट असणारे, छोट्या दुकानांचे मालक, आडगावातील विद्यार्थी आणि सर्वात मोठा वर्ग म्हणजे सीमेवरचे जवान – आपल्या आवडत्या गाण्याची फर्माइश हे सर्व लोक आवडीनं करतात आणि यात सैगलपासून रेहमानपर्यंत सर्वांची गाणी असतात. हे पाहिलं की कधीकधी इथे ब्लॉगवर जे लिहिलं जातं ते अल्पसंख्य वाचकांसाठी आहे हे लक्षात येतं. (इथे ‘गांधी’ चित्रपटातील संवाद आठवतो, “भारत का मतलब है खेतों मे काम करनेवाला हर एक किसान, न कि बंबई और दिल्ली के कुछ गिने-चुने वकील.” बाय द वे, ‘गांधी’चं हिंदी रूपांतर किती सुरेख केलं आहे! संवाद कुणाचे आहेत लक्षात नाही पण कुठेही हा अनुवाद आहे असं जाणवत नाही.) याबरोबरच पुणे-मुंबईसारख्या शहरातदेखील हिंदी गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत आणि म्हणूनच आपल्या चित्रपटांचाही.

राज कपूरच्या परदेशातील लोकप्रियतेचा इतका अनुल्लेख का होतो? एक कारण असं दिसतं की लोकप्रियता म्हणजे टाकाऊ दर्जा असं समीकरण फक्त इथेच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. अर्थात हे समीकरण उच्चभ्रू समीक्षक आणि कलाकारांमध्ये प्रचलित आहे, सामान्य प्रेक्षक बिचारे जे आवडेल, रुचेल, पचेल ते बघतात. ‘लोकप्रिय ते सवंग’ अशा अर्थाची विधानं भल्याभल्यांनी केली आहेत. त्यात भर म्हणजे आपण हिंदी चित्रपटांबद्दल बोलतो आहोत. हिंदी चित्रपट म्हणजे नाच-गाण्यांनी भरलेला एक बिनडोक प्रकार असं गृहीतक असेल तर पुढे बोलायला फारशी जागा उरत नाही. खरं तर परदेशात ‘म्युझिकल’ नावाचा कलाप्रकार असतो तसंच व्यावसायिक हिंदी चित्रपट हा एक वेगळा कलाप्रकार मानायला हवा. समीक्षा करताना त्या प्रकारच्या चित्रपटांच्या बलस्थानांचा विशेष विचार व्हायला हवा.

फक्त भारतच नव्हे, तर इतर देशातील सामान्य जनतेनेही हिंदी चित्रपट गाण्यासकट स्वीकारला. याचं एक सुरेख उदाहरण नुकतंच बघायला मिळालं. ६० वर्षे उलटून गेली तरी ‘आवारा हूं’ गाणं टोरांटोपासून तुर्कस्थानापर्यंत अजूनही जिवंत आहे. विक्रम सेठनेही ‘फ्रॉम हेवन्स लेक’ पुस्तकात तिबेट-चीन सीमा पार करताना या गाण्याने अनेक वेळा अडचणीत हात दिल्याचं नमूद केलं आहे. हे बघितलं की वाईट वाटतं. राज कपूरला त्याच्या कामामुळे जगभर प्रसिद्धी मिळाली – ‘गार्डीयन’ किंवा ‘न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’मध्ये त्याच्यावर लेख आले नाहीत आणि येणारही नाहीत – पण समीक्षकांची त्याला कधीच फिकीर नव्हती. सामान्य लोकांना त्याचे चित्रपट मनापासून आवडले आणि त्याची पावती आजही त्याला मिळत आहे. पण इतर कलाकारांचं काय? बिचारे शंकर-जयकिशन कुणाला आज आठवतही नाहीत. कधी चर्चा झालीच तर एक त्या कुठल्यातरी साईटचा दाखला देऊन त्यांनी किती चाली चोरल्या यांची यादी देण्यात येते आणि सगळे हिंदी चित्रपट संगीतकार चोर असं तात्पर्य काढण्यात येतं. आज ६० वर्षांनंतरही त्यांच्या चाली जिवंत आहेत याचा अर्थ संस्कृतींना भेदून जाणारं त्यात काहीतरी आहे. (अभिजात कलाकृतीची व्याख्या काय हो?) पण आज याची दखल घेणारे फार थोडे आहेत. जुन्या पिढीतील लोक आजही त्यांच्या आठवणी काढतात पण त्यांच्या संगीताचं निष्पक्ष मूल्यमापन करणारी समीक्षा युनिकॉर्नइतकी दुर्मिळ आहे. कारण एकदा हिंदी चित्रपट भिकार असं ठरवलं की त्यातल्या संगीताकडे कोण बघणार? आणि राज कपूरमुळे किमान शंकर-जयकिशनची ओळख जगाला झाली. सैगलपासून खय्यामपर्यंत बाकीच्या अनेक संगीतकारांचं काय? पुढच्या शतकात त्यांची कुणाला आठवणही नसेल.

या सर्वांच्या मुळाशी कलेतील जातिभेद आहे. यावर आधीही लिहून झालं आहे. कलेच्या क्षेत्रात रोज नवे आविष्कार होतच असतात. काहींना हे नवे आविष्कार अधिक भावतात, काहींना जुने. नेहमीप्रमाणे आम्ही कुंपणावर. सगळ्यांचं म्हणणं ऐकून जे भावतं त्याला डोक्यावर घेणारे. मुराकामी वाचला तेव्हा हा कुठल्या प्रकारात बसतो याची कल्पनाही नव्हती आणि माहीत करून घ्यायची गरजही पडली नाही. ज्याला जे आवडतं ते त्यानं घ्यावं पण इतरांना अमुक आवडतं याचा अर्थ त्यांची अभिरुची हीन असं सामान्यीकरण व्हायला लागलं की अडचण येते. याहूनही पुढे जाऊन काही लोक अमुक कलाप्रकार सर्वात श्रेष्ठ, आधी जे काही झालं ते चुलीत घाला अशा आरोळ्या मारायला लागतात तेव्हा प्रकरण गंभीर होतं.

‘लिव्ह अँड लेट लिव्ह’ ही उक्ती कलाक्षेत्रात (खरं तर सगळीकडेच) येईल तो सुदिन.

Categories
बुके वाचिते

शब्दांचा जादूगार : विक्रम सेठ

विक्रम सेठची ओळख त्याच्या कवितांमधून झाली. ‘द हम्बल ऍडमिनिस्ट्रेटर्स गार्डन’ आणि ‘ऑल यू हू स्लीप टुनाइट’ हे दोन कवितासंग्रह वाचनात आले. माझ्या तुटपुंज्या वाचनप्रवासात असं काही कधी वाचायला मिळालं नव्हतं. म्हटलं तर अगदी साध्या वाटणाऱ्या कविता, कधीकधी इतक्या सोप्या की वाचल्यावर वाटावं हे आपल्यालाही सहज जमायला हरकत नाही. काही कविता चित्रांसारख्या, मोजक्या शब्दांमधून वातावरणाचा एखादा क्षण अलगद पकडणाऱ्या. मग ‘बीस्टली टेल्स – फ्रॉम हिअर ऍंड देअर’ वाचलं – नुसती धमाल. दहा कविता पण त्या कशा तर भारत, चीन, ग्रीस, युक्रेन इथल्या रूपककथांवर आधारित. प्रत्येक कथेत दोन-दोन प्राणी – मांजर आणि कोंबडी किंवा मगर आणि माकड. वेगवेगळ्या शब्दांची, जोडशब्दांची, नादांची आणि यमकांची नुसती लयलूट चाललेली, आपण फक्त आनंद लुटायचा. मग हाती आलं – गोल्डन गेट. हे काय प्रकरण आहे हे कळल्यावर छाती दडपली. दोन-एकशे पानांची कादंबरी पण पूर्णपणे सुनीतांमध्ये. यातल्या सुनीतांचं स्वरूप रशियन लेखक पुश्किनच्या ‘युजीन ओंजिन’वर आधारित आहे. कॅलिफोर्नियातल्या आयुष्यांवर आधारित या कादंबरीचं वर्णन गोर विदालनं ‘द ग्रेट कॅलिफोर्निया नॉव्हेल’ या शब्दात केलं आहे. ‘थ्री चायनीज पोएट्स’ या चिनी कवितांच्या अनुवादासाठी विक्रम सेठ एका वर्षात चिनी भाषा शिकला हे कळल्यावर या माणसाबद्दल आदरयुक्त भीती आणि भीतियुक्त आदर वाटायला लागला.

पण अजूनही गद्य काही वाचलं नव्हतं. ‘ऍन इक्वल म्युझिक’ खूप अपेक्षेनं वाचायला घेतलं पण फारसं आवडलं नाही. अर्थात आता ते नेमकं का आवडलं नव्हतं ते ही आठवत नाही त्यामुळे परत चाळून बघायला हवं असं वाटतं आहे. पण अजूनही एका पुस्तकाशी लपंडाव चालला होता – ‘अ सूटेबल बॉय’ (A Suitable Boy). काही साहित्यिक त्यांच्या विशिष्ट पुस्तकांबरोबर जोडले गेलेले असतात. त्यांचं नाव घेतलं की ते पुस्तक आठवतच. मेलव्हिल – मोबी डिक, डिकन्स – डेव्हिड कॉपरफिल्ड वगैरे. तसं विक्रम सेठ म्हटलं की ‘सुटेबल बॉय’ आलंच. एकदा लायब्रीत त्याचा एक भाग मिळाला तो वाचला पण दुसरा उपलब्ध नव्हता. या ना त्या कारणानं वाचायचं राहून जात होतं. अखेर आख्खं पुस्तक हाती आलं एकदाचं. मग मारली बैठक आणि घेतलं वाचायला.

Book Cover for A Suitable Boy

साल १९५१. सूटेबल बॉयच्या पहिल्याच पानावर मिसेस रूपा मेहता यांची मुलगी सविता हिच्या लग्नाचा सोहळा चालू आहे. या दरम्यान त्या धाकटी मुलगी लता हिला म्हणतात, “मी ठरवेन त्या मुलाशीच तुझं लग्न होणार. ” खरं तर कथेचा गाभा पुस्तकाचं नाव आणि या पहिल्याच वाक्यानं स्पष्ट व्हायला हवा. पण सूटेबल बॉयची कथा म्हणजे लतासाठी योग्य मुलगा शोधणं असं म्हणणं म्हणजे “ताजमहाल म्हणजे फार कै नै, मुमताज बेगमची कबर आहे” असं म्हणण्यासारखं आहे.

गोष्ट आहे चार कुटुंबांची – मेहरा, कपूर, खान आणि चॅटर्जी. मिसेस रूपा मेहरा, त्यांची चार मुलं – अरूण, सविता, लता, वरूण; महेश कपूर आणि मिसेस कपूर यांची तीन मुलं – प्राण, वीणा आणि मान; बैतारचे खानसाहेब यांची तीन मुलं – झैनाब, इम्तियाझ आणि फिरोझ; आणि सगळ्यात शेवटी जस्टीस चॅटर्जी आणि मिसेस चॅटर्जी यांची पाच मुलं – मीनाक्षी, अमित, दिपांकर, काकोली, तपन. अरूण मेहराचं लग्न मीनाक्षी चॅटर्जीशी झालंय तर प्राण कपूरचं सविता मेहराशी. मान कपूर, फिरोझ खान यांची आणि त्यांचे वडील महेश कपूर आणि नवाबसाहेब यांची घट्ट मैत्री आहे. दमलात? ही तर फक्त मुख्य पात्रं झाली. याशिवाय मिसेस मेहरा यांचे वडील डॉ. किशनचंद सेठ आणि त्यांची दुसरी बायको पार्वती, वीणाचा नवरा केदारनाथ टंडन, मुलगा भास्कर आणि मैत्रीण प्रिया, रूपा मेहरा यांची मैत्रीण-कम-मानलेली मुलगी कल्पना, महसूलमंत्री महेश कपूर यांचे सहकारी – मुख्यमंत्री शर्मा आणि प्रतिस्पर्धी – गृहमंत्री अगरवाल, गावातील प्रख्यात कोठेवाली सईदा बेगम, तिची बहीण तस्नीम आणि नोकराणी बिब्बो, प्रसिद्ध गायक उस्ताद माजिद खान, सारंगीवादक इश्फाक, उर्दू शिक्षक राशीद, लताची घनिष्ठ मैत्रीण मालती, इंग्लिश विभागात लेक्चरर असलेल्या प्राण कपूरचे वरिष्ठ प्राध्यापक शर्मा, गणित विभागातला मित्र सुनील पटवर्धन, त्याचे वरिष्ठ प्राध्यापक दुर्राणी, त्यांचा मुलगा कबीर अशी अनेक पात्रं. आणि तीन-चार पानांसाठी ‘पेशल अपीअरन्स’ – पं. जवाहरलाल नेहरू.

टॉलस्टॉयबद्दल अशी तक्रार बरेचदा ऐकली आहे की त्याची पात्रं लक्षात राहत नाहीत. ‘सुटेबल बॉय’च्या बाबतीत असं अजिबात झालं नाही. प्रत्येक पात्र त्याच्या सगळ्या वैशिष्ट्यांसकट डोळ्यापुढे उभं राहतं. विशेष म्हणजे विक्रम फारच क्वचित पात्रांचं वर्णन करतो. काही लेखकांना पात्र कथेत आलं रे आलं की हरवलेल्या व्यक्तींची वर्णनं देतात त्याप्रमाणे त्यांची उंची, चेहरा, वर्ण अशी सगळी माहिती द्यायची सवय असते. ‘सूटेबल बॉय’मध्ये कथेच्या दृष्टीनं अगदी महत्त्वाचं असेल तरच पात्रांच्या एखाद्या वैशिष्ट्याचा उल्लेख केला आहे अन्यथा ते पात्र कसं दिसतं हे ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य वाचकाला आहे. हे सुरूवातीला लक्षात आलं नव्हतं पण कथानकानं पकड घेतल्यानंतर ही पात्रं आपोआप डोळ्यापुढं आली – काही प्रत्यक्षातली, काही सिनेमातली. महेश कपूर म्हटलं की मला काळा कोट घातलेले बलराम जाखड आठवतात. मिसेस रूपा मेहता – गोलमालमधली दीना पाठक, अमित चॅटर्जी – ‘प्रोतिद्वंदी’मधला ध्रितिमान मात्र तितका गंभीर नाही, प्राण कपूर – रजनीगंधामधला दाढीवाला, केदारनाथ टंडन – जन अरण्यमधला सोमनाथ. कोणतंही वर्णन न वाचता हा चिमित्कार कसा झाला ते विक्रमलाच ठाऊक. आणखी एक म्हणजे कसं कोण जाणे पण वाचताना आपल्या मनात काय चाललं आहे हे निवेदकाला आणि पर्यायाने विक्रम सेठला कळत असावं. पहिल्याच पानावर मिसेस मेहरांचं वाक्य वाचून जेन ऑस्टीनच्या ‘प्राइड ऍंड प्रेज्युडीस’ची आठवण न झाली तरच नवल. नंतर जेन ऑस्टीनचा उल्लेख येतो आणि लता ‘एम्मा’ वाचताना दिसते. प्रियाच्या नोकराचं वर्णन एका ओळीपुरतंच येतं पण तरीही तो लक्षात राहतो कारण त्याला सगळ्यांची औषधं चोरून खायची सवय असते. ते वाचल्यावर वाटतं, हे तर डिकन्ससारखं चाललं आहे – छोट्याहून छोट्या पात्रालाही काहीतरी विशिष्ट लकब किंवा सवय देऊन ते लक्षात राहील असं करायचं. असा विचार येतो न येतो तो लगेच पुढच्या पानावर उरिया हीपचा संदर्भ येतो. जणू विक्रम सेठ म्हणतो आहे, “मलाही माहिती आहेत यांची प्रेरणास्थानं, काळजी नसावी. ” हे ऐकून मी खजील होतो आणि चिकित्सा बाजूला ठेवून निमूट वाचायला लागतो.

कथानकाचा काळ फार काळजीपूर्वक निवडलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून चार वर्षं झाली आहेत. स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक याच सालात झाली. याखेरीज तेव्हाच्या संसदेपुढे असलेल्या काही प्रश्नांचा संदर्भ कथानकात येतो. स्त्रियांना समान कायदे देणारे ‘हिंदू कोड बिल’ (Hindu Code Bill), जमिनदारी संपुष्टात आणणारे ‘जमिनदारी अबोलिशन बिल’ (Zamindari Abolition Bill). पैकी ‘जमिनदारी अबोलिशन बिल’ अस्तित्वात आणि अमलात आणण्याचे अधिकार केंद्राने प्रत्येक राज्याला दिले होते. सुटेबल बॉयची कथा पूर्व प्रदेश या काल्पनिक राज्यातील ब्रह्मपूर या शहरात घडते. जमिनदारी संपवण्याच्या बिलाचे कर्ते महसूल मंत्री महेश कपूर असतात. मात्र हे बिल अमलात आल्यावर त्यांचे मित्र बैतारचे नवाबसाहेब यांची मालमत्ताही जप्त होणार. यामुळे त्यांच्या संबंधात येणारे चढउतार कथानकाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हे बिल घटनेच्या विरोधात आहे या मुद्द्यावरून कोर्टातही जाते. ब्रह्मपूरमध्ये चौकात असलेल्या मशीदीच्या शेजारीच शिवमंदिर बांधण्याचे प्रयत्न चालू असतात आणि या अनुषंगाने ब्रह्मपुरमधील हिंदू आणि मुसलमान समाजात संघर्षांचे बरेच प्रसंग येतात. सुटेबल बॉय १९९३ मध्ये प्रकाशित झाले. १९९२ मधल्या बाबरी मशीद प्रकरणाचा प्रभाव यावर असण्याची शक्यता आहे.

१९५१ मध्ये पंतप्रधान नेहरू आणि काँग्रेसचे अध्यक्ष पुरूषोत्तमदास टंडन यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरुंनी पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष ही पदे एकाच व्यक्तीकडे असू नयेत अशी भूमिका घेऊन पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. टंडन यांच्या अल्पसंख्यांक आणि अर्थव्यवस्थेच्या भूमिकांच्या विरोधात रफी अहमद किडवाई, मौलाना आझाद आणि आचार्य कृपलानी यांनी राजीनामा देऊन वेगळा पक्ष स्थापन केला. नंतर टंडन आणि नेहरू यांच्यातील मतभेद विकोपाला गेले आणि नेहरू काँग्रेस सोडणार अशी परिस्थिती निर्माण झाली. अखेर नेहरूंची सरशी झाली आणि तेव्हापासून काँग्रेसमध्ये पंतप्रधान आणि पक्षाध्यक्ष हे शक्यतो एकच व्यक्ती असावेत किंवा निदान एकाच मताचे असावेत असा अलिखित नियम बनला. कथेमध्ये महेश कपूर आझाद आणि कृपलानी यांच्या पक्षात सामील होतात. अशा प्रकारच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये कथानक ऐतिहासिक घटनांवर आधारित पण काल्पनिक आहे अशा प्रकारची नोटिस असते. सुटेबल बॉयमध्ये अशी कोणतीही नोटिस दिलेली नाही. इथे एक रोचक विचार येतो. महेश कपूर यांचे पात्र तेव्हाच्या एखाद्या नेत्यावर आधारलेले असावे का? पूर्व प्रदेश आणि ब्रह्मपूर हे काल्पनिक करण्यामागचे कारण काय असावे?

विक्रम कवी आहे याचे इतर पुरावेही त्याचं गद्य साहित्य वाचताना मिळतात. चॅटर्जी मुलांबद्दल बोलताना ‘None of them worked, but each had an occupation’ सारखी वाक्यं तो सहज लिहून जातो. याखेरीज बहुतेक प्रकरणांचा किंवा प्रकरणातील विभागांचा शेवटचं वाक्य स्तब्ध करायला लावणारं असतं. असं वाक्य वाचताना हायकूमध्ये जसं शेवटची ओळ अर्थ बदलून टाकते किंवा एक वेगळाच ‘टच’ देते तसं वाटतं. जणू काही एखाद्या चित्रकारानं चित्र पूर्ण केल्यानंतर एक शेवटचा फटकारा मारताना छोटासा बदल करावा आणि त्यामुळे चित्राला वेगळाच अर्थ मिळावा तसं काहीसं. तर काही वेळा एखाद्या वाक्यानं पाश्चात्य संगीतातील ‘कोडा’ आठवतो. (एक मूव्हमेंट संपली आहे हे दर्शविण्यासाठी त्या मूव्हमेंटच्या शेवटी एक निर्णायक सूर येतो – बहुतेक वेळा व्हायोलिन किंवा पियानोचा – तोच कोडा. )

‘सुटेबल बॉय’चा टोन मुख्यत्वे ‘सटायर’ (satire) आहे असं वाटतं. दु:खद प्रसंग वगळता बाकीच्या प्रसंगांमध्ये निवेदक हळूच एक एक विसंगती, कधी गंभीरपणे तर कधी नर्मविनोदी शैलीत आपल्यासमोर आणत असतो. मशीदीच्या शेजारीच शिवमंदिर बांधायचं नक्की झाल्यावर उस्ताद माजिद खान रियाज करता करता व्यथित होतात. मंदिर मशीदीच्या पश्चिमेला – म्हणजे रोज नमाज पढताना आपण या काफिरांच्या देवासमोर झुकणार. काय म्हणावं याला? पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की जो भैरव राग ते गात होते त्याचं नाव शिवाचंच एक नाव आहे. किंवा पंडित नेहरू निवडणुकांच्या आधी सलिमपुरमध्ये भाषण करताना कधी ब्रह्मपूरपर्यंतही न गेलेल्या खेडुतांसमोर कोरियन क्रायसिस किंवा इजिप्तच्या प्रश्नांबद्दल बोलतात. बेन्स्टन ऍंड प्राइस या ब्रिटिश कंपनीत मोठ्या हुद्द्यावर असलेल्या अरूणला एकदाही इंग्लंडला न जाताही लंडनची इत्थंभूत माहिती असते. आपल्या निवडणुकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना तो आणि त्याचे सहकारी चर्चिल परत निवडून येईल किंवा नाही यावर समरसून चर्चा करत असतात.

बहुतेक प्रथितयश लेखकांची एक विशिष्ट शैली असते. हेमिंग्वे कमीत कमी शब्द आणि छोट्या वाक्यांसाठी प्रसिद्ध आहे, डिकन्स विस्तृत वर्णनांसाठी. विक्रम इतक्या साध्या आणि सोप्या शब्दात सगळं सांगतो की शैली वगैरे शोधायचा विचारच मनात येत नाही. पूर्ण पुस्तक वाचताना फक्त एकदाच एक शब्द आवर्जून शब्दकोशात बघावासा वाटला. (फारच सुरेख शब्द – Acrostic – जिच्या प्रत्येक ओळीचं पहिलं अक्षर जुळवलं तर गुप्त संदेश मिळतो अशी कविता. ) साध्या शब्दांतून हे अनोखं विश्व उभारणं विक्रमला कसं जमलं? कादंबरीची आणखी एक खासियत म्हणजे तपशील. ब्रह्मपूरमधील चांभार उद्योग – बूट, चपला बनवण्याच्या प्रक्रियेपासून ते आपल्या घटनेचं १४ वं कलम आणि अमेरिकेची १४ वी अमेंडमेंट यांच्यातील साम्य अशा अनेक विषयांचं खोलात जाऊन वर्णन केलं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातलं सामान्य जीवन कसं होतं याचं सुरेख चित्र या कादंबरीत बघायला मिळतं. खुशवंत सिंग यांनी हा काळ अनुभवला आहे. त्यांना या कथेत शोधूनही एकही तपशिलाची चूक आढळली नाही. गंमत म्हणजे विक्रम सेठचा जन्म कादंबरीतील काळ संपल्यानंतर १९५२ साली झाला.

इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो. १९५१ हे साल निवडण्याचं कारण काय? ज्या चार मुख्य कुटुंबांची ही कथा आहे ती कुटुंबं सुखवस्तू आहेत. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांनाही फाळणीचे चटके बसले होते. कपूर कुटुंबाला लाहोरमधून इकडे प्राण मुठीत धरून यावं लागलं, त्याचे संदर्भ येत असतात. येताना हल्ला झाला त्याचे व्रण अजूनही प्राण कपूरच्या हातावर आहेत. कादंबरी चार वर्ष आधी – १९५१ ऐवजी १९४७ मध्ये बेतली असती तर कितीतरी मोठं नाट्य रंगवायला मिळालं असतं. मग विक्रमनं असं का केलं असावं? १९५१ मध्ये पात्रांच्या समोर अडचणी आहेत पण त्या जीवनमरणाच्या नाहीत, “रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग” या स्वरूपाच्या आहेत. मिसेस रूपा मेहरांच्या समोर असलेले प्रश्न – लताचं लग्न कधी होईल, वरूणच्या नोकरीचं काय – अवघड आहेत, अशक्य नाहीत.

टॉलस्टॉयची प्रसिद्ध शोकांतिका – ऍना कॅरॅनिनाचं पहिलंच वाक्य आहे, “Happy families are all alike; every unhappy family is unhappy in its own way. ” साहित्यामध्ये आनंदी कथांपेक्षा दु:खी कथांना झुकतं माप मिळाण्याची परंपरा ग्रीक शोकांतिकांपासून चालू आहे. विक्रमने सुटेबल बॉयमध्ये या प्रवाहाच्या विरूद्ध गेलं तर काय होतं हे शोधलं आहे. दुष्काळ, महामारी, देशोधडी यासारख्या आपत्तींना सामोरे जाणाऱ्या लोकांपेक्षा रोजच्या आयुष्यातल्या छोट्या-छोट्या संघर्षांना तोंड देणारे लोक त्याला अधिक रोचक वाटतात. सुटेबल बॉय वाचल्यानंतर इतके दिवस निमूटपणे स्वीकारलेल्या टॉलस्टॉयच्या वाक्याबद्दल प्रश्न उभे राहिले. कोणतंही कुटुंब शंभर टक्के सुखी असू शकतं का? आणि रंजलेल्या-गांजलेल्या, भकास-उदास कुटुंबांमध्येच साहित्यिक मूल्याच्या कथा असतात का? साहित्य हे आयुष्याचं प्रतिबिंब मानलं तर सुखी आयुष्यांमध्येही मानवी स्वभावाचे पैलू दिसायला काय हरकत आहे?

आवडणारी पुस्तकं बरीच असतात, ती आवडण्याची कारणंही वेगवेगळी असतात. फार क्वचित एखादं पुस्तक भारून जायला होतं. यापूर्वी असा अनुभव मुराकामीच्या बाबतीत आला आहे. पण मुराकामी वाचून येणारी अनुभूती आणि विक्रम सेठ वाचून येणारी अनुभूती यांच्या जातकुळीमध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. मुराकामीचं जग जादुई असतं, स्वप्न आणि सत्य यांच्या सीमारेषेवरचं. विक्रम सेठचं जग जे आपल्याला आजूबाजूला दिसतं तेच आहे. आपल्याला कुठेतरी रूपा मेहरा किंवा अमित चॅटर्जी भेटलेले असतात. मग त्यांच्या या साध्याश्या वाटणाऱ्या कथेनं संमोहित का करावं? कदाचित जेम्स वुड सुटेबल बॉयबद्दल म्हणतो तसं असावं, “Such writing reminds us that there are secrets beyond technique, beyond even style, which have to do with a quality of soul on the part of the writer.”

‘अ सुटेबल बॉय’ लवकरच छोट्या पडद्यावर बघायला मिळेल​. मीरा नायर यांनी बीबीसीसाठी याचे दिग्दर्शन केले आहे.

—-

१. मुराकामीसारखे काही अपवाद सोडले तर आधुनिक साहित्यापेक्षा मला पारंपरिक साहित्य अधिक भावतं. आधुनिक साहित्यामध्ये जे वेगवेगळे प्रयोग होतात ते स्वागतार्ह आहेत यात शंका नाही. मात्र यामुळे त्याआधी आलेला वास्तववाद (Realism) बाद होतो हे पटत नाही. आधुनिकतावादाची (Modernism) रेघ मोठी करण्यासाठी वास्तववादाची रेघ पुसण्याचे कारण का पडावे हे आकलनाबाहेरचे आहे. म्हणूनच विल सेल्फसारखा नावाजलेला लेखक “मी आणि माझे काही आवडते लेखक हेच सर्वश्रेष्ठ, बाकी सगळे टुकार. आधुनिकतावाद हेच अंतिम सत्य, बाकी सगळं भिकार. ” असं म्हणतो तेव्हा त्याला ‘सेल्फ ऑब्सेस्ड रॅंट’ या पलीकडे फारसं महत्त्व द्यावंस वाटत नाही. आधुनिक साहित्य वाचताना येणारी एक मोठी अडचण म्हणजे यातले हंस कोण आणि बगळे कोण हे ओळखणं अवघड असतं. पारंपरिक साहित्यामध्ये यशस्वी होण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या गुणवत्तेची गरज असते. लोकांच्या वेगवेगळ्या रूची आणि त्यामुळे येणारा सापेक्षपणा बाजूला ठेवला तर पारंपरिक साहित्यामध्ये प्रभावीपणे कथा सांगू शकणारे साहित्यिक यशस्वी होतात असं दिसतं. आधुनिक साहित्यामध्ये बरेचदा लेखक किती हुशारीने शब्दखेळ करू शकतो, पारंपरिक नियम मोडू शकतो, वाचकांना कोड्यात टाकू शकतो यावरच सगळा भर असतो. याचं टोकाचं उदाहरण म्हणजे जेम्स जॉइसची ‘फिनेगन्स वेक’ ही एक सर्वश्रेष्ठ कादंबरी आहे की जॉइसचा ‘अल्टिमेट प्रॅंक’ आहे याबद्दल अजूनही समीक्षकांमध्ये चर्चा होते आहे.

२. इतकं लिहिलं म्हणजे याचा अर्थ ‘कादंबरी वाचाच’ असा नव्हे. हा इशारा देण्याचं कारण बरंच वजनदार आहे. जगातील सर्वात मोठ्या कादंबऱ्यांमध्ये सुटेबल बॉयचा समावेश होतो. दीडदोनशे पानांचं पुस्तक किंवा दोन-एक तासांचा चित्रपट ‘खुशाल वाचा किंवा बघा’ म्हणायला काही वाटत नाही. सव्वा किलो वजनाची, १४७४ पानं वाचा असं म्हणायला जीभ अडखळते. रोज पन्नास पानं वाचलीत तर एक महिना लागेल, रोज दहा वाचलीत तर पाच महिने. इतका वेळ द्यायचा किंवा नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं. म्हणूनच आभार मानताना विक्रम वाचकांना उद्देशून म्हणतो, “Buy me before good sense insists, You’ll strain your purse and sprain your wrists. “

Categories
बुके वाचिते

फसलेली पुस्तकं

माझी एक सवय सांगायला हवी. कोणतंही पुस्तक वाचताना ते फसलय असं लक्षात आलं रे आलं की माझा त्यातला इंटरेस्ट संपतो. मग एक तर मी तिथेच थांबवतो किंवा कथानकाचं पुढं काय झालं हे बघायचं असेल तर भरभर चाळून शेवटाला जातो आणि पंधरा-वीस मिनिटात ते पुस्तक (एकदाचं) संपवतो. ही सवय आपोआप आलेली नाही. पुस्तक धो-धो बोअर झालं तरी नेटानं संपवायचंच असा शेवटपर्यंत खिंड लढवण्याचा बाणेदार पवित्रा एकेकाळी होता. नंतर त्यातला फोलपणा लक्षात यायला लागला. आधीच वेळ कमी, पुस्तकं अमर्याद. मग न आवडलेल्या पुस्तकावर वेळ घालवण्यापेक्षा आवडीच्या पुस्तकावर का घालवू नये?

काही महिन्यांपूर्वी एक पुस्तक वाचलं, ‘व्हेन वी वेअर ऑर्फन्स.’ लेखक – काझुओ इशिगुरो. इशिगुरोचा जन्म जपानमधला, पण लहापणीच आई-वडीलांबरोबर इंग्लंडला गेला आणि तिथेच स्थाईक झाला. त्याची लेखनशैली विलक्षण आहे. एका गार्डीयनच्या टीकाकारानं लिहीलं होतं, ‘हे पुस्तक वाचताना मला बराच वेळ काहीतरी चुकतय अशी जाणीव होत होती पण काय ते लक्षात येत नव्हतं. मग अचानक लक्षात आलं – इशिगुरो फ्राजल व्हर्ब वापरतच नाही. त्यामुळे त्याचं इंग्रजी फार वेगळं वाटतं.’
इशिगुरो अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये जे वर्णन करतो ते इतर लेखकांना दहा पानं खर्च करूनही जमलं नसतं. त्याचं ‘ऍन आर्टीस्ट इन फ्लोटिंग वर्ल्ड’ याआधी वाचलं होतं त्यामुळे अपेक्षा खूपच वाढल्या होत्या.

काही पुस्तकं फसत आहेत हे पहिल्या काही पानातच उमगतं. या पुस्तकाबाबत मात्र वेगळंच झालं. पुस्तकाच्या जवळजवळ २०९ व्या पानापर्यंत सगळं काही ठीक होतं. नंतर काही पानातच कळून चुकलं की हे फसतय. असं फार कमी पुस्तकांच्या बाबतीत होतं. हे असं का झालं याचा उलगडा इशिगुरोची मुलाखत वाचल्यावर झाला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने या पुस्तकात अगाथा ख्रिस्तीप्रमाणे रहस्यकथा लिहायचा प्रयत्न केला होता. मात्र अगाथा ख्रिस्तीच्या कथेच्या शेवटी सर्व धागे जसे आपसूक जोडले जातात तसे त्याला इथे करणं जमलं नाही. यावरून ‘अगाथा ख्रिस्ती नेहेमी एकाच साच्याच्या कथा पाडत असते’ अशी टीका जरी होत असली तरी त्यातही किती कौशल्य असावे लागते याची जाणीव होते.

ही कथा आहे ख्रिस्तोफर बॅंक्स डिटेक्टीव्हची. यामागे शेरलॉक होम्सची प्रेरणा होती असं इशिगुरो म्हणतो. याचं लहानपण शांघायमध्ये जातं. तेव्हाच्या चीनमध्ये ओपियमचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालू होता. याला बॅक्सच्या आईचा विरोध असतो. परिस्थिती टोकाला गेल्यानंतर अचानक त्याचे आईवडील बेपत्ता होतात. त्याला पुढील शिक्षणासाठी इग्लंडमध्ये पाठवलं जातं. यथावकाश तो एक प्रथितयश डिटेक्टीव्ह बनतो आणि योगायोगाने एका केसच्या संदर्भात आपल्या आई-वडीलांचं काय झालं याचा शोध घेण्याची संधी त्याला मिळते. यासाठी तो शांघायला परत जातो. कथानक घडतं दुसर्‍या महायुद्धाच्या आधी आणि ही केस यशस्वीपणे सोडवली तर एक जागतिक आपत्ती टळू शकेल असंही सूचित केलं जातं.

इथपर्यंत सगळं ठीक आहे. इशिगुरोची वर्णनं, संवाद, व्यक्तिरेखा नेहेमीप्रमाणेच मंत्रमुग्ध करणारे आहेत. पण जसजसा बॅक्स रहस्य सोडवण्याच्या जवळजवळ जातो, तसतशी त्याची कथानकावरची पकड सुटत आहे असे जाणवते. कथेचे निवेदन प्रथम पुरूषामध्ये आहे. अचानक निवेदकाचे स्वत:वरचे नियंत्रण सुटले आहे असे जाणवते. इतक्या वेळ भरवशाचा असलेला निवेदक अचानक बेभरवशाचा बनतो. मग आधी जे सांगितलं त्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न पडतोच. शिवाय प्लॉट कुठच्याकुठे जातो ते वेगळंच. एकूणात इशिगुरोला नेमकं काय साध्य करायचं होतं याबाबतचा गोंधळ शेवटपर्यंत कायमच राहतो. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला ‘मिस्टरी इन अ मिस्टरी’ करायची होती, पण उत्तरार्धात ही मिस्टरी इतकी ढिसाळ होते की होम्स किंवा अगाथा ख्रिस्तीशी तुलनाही अशक्य होते.

हे पुस्तक आवडलं का असा प्रश्न विचारला तर अमुक पानापर्यंत आवडलं असं उत्तर देईन. पूर्वार्धात इशिगुरोनं रंगवलेलं लंडनमधील वास्तव्य, त्याचं शांघायमध्ये गेलेलं बालपण केवळ अप्रतिम आहे. नंतर जे काय होतं ते वाचणं म्हणजे भारतीय संघ मजबूत स्थितीतून पराभवाच्या छायेत जाताना जसं वाटतं तसं काहीसं आहे.

—-

१. नुकतंच आर्थर सी. क्लार्कचं ‘रॉंदेवू विद रामा’ – वाचलं म्हणणार नाही – चाळलं. ‘हे राम’ म्हणायची पाळी आली. इतकं तूफान बोअर झालं की त्यापुढे ‘शैतानी दरवाजा’ बघणं, स्वत:च्या नखांचा रोज फोटो काढून ती किती वाढली आहेत ते मोजणं, ऑरकुटवरच्या कविता वाचणं, एक चमचा साखरेत किती दाणे येतात हे मोजणं हे सगळे प्रकार बंजी जंपिंग इतके इंटरेस्टींग वाटले असते.