मागच्या शतकामध्ये हिंदी चित्रपटांमध्ये मराठी संस्कृतीचं चित्रण फारसं नसायचं आणि असलंच तर फार केविलवाणं असायचं. उदा. १९७८ चा ‘गमन’ हा चित्रपट. चित्रपट सुरु होतो उत्तर प्रदेशातील एका छोट्या खेड्यात आणि तिथे लोक अवधीच्या जवळ जाणारी एक बोलीभाषा बोलतात. मग गुलाम हसन (फारूक शेख) मुंबईला येतो. इथे तो लालूलाल तिवारी (जलाल आगा) आणि त्याची मैत्रीण यशोधरा (गीता सिद्धार्थ) यांना भेटतो. यशोधरा मराठी मुलगी. ती आपला भाऊ वासू (नाना पाटेकर), आई (सुलभा देशपांडे) आणि वडील (अरविंद देशपांडे) यांच्याबरोबर राहत असते. गंमत म्हणजे हे मराठी कुटुंब आपापसात मराठी न बोलता बंबैय्या हिंदी बोलतात. हे काय गौडबंगाल आहे? बरं, बहुतेक प्रेक्षकांना मराठी कळणार नाही असं धरून चालू. पण मग सुरुवातीचं अवधी तरी कुठे कळतंय? त्यासाठी सबटायटल वाचावे लागतातच नं? मग यांनाही बोलूद्या की मराठी.
पण तो काळ वेगळा होता. नंतर गेल्या शतकाच्या अखेरीस महेश मांजरेकर, आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. नाना पाटेकर हिंदी चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका करू लागले. याआधी अमोल पालेकर यांनी सत्तरच्या दशकात ही कामगिरी केली होती. एकविसाव्या शतकात हिंदी चित्रपटसृष्टीत आपला जम बसवणारे अजय-अतुल पहिले आणि अजून तरी एकमेव मराठी संगीतकार ठरले.
अजय-अतुलच्या संगीतातील एक खासियत त्यांनीच एका मुलाखतीत सांगितली होती.
हे गणपतीबाप्पांवरचं एक जुनं गाणं बघा.
गाणं चांगलय, रफी साहेब, भूपिंदर आणि आशा ताईंनी गायलयही छान, पण तालाचं काय? हा ताल आरडीने ‘जय जय शिव शंकर’ मध्ये वापरला होता तसा उत्तर भारतीय आहे. आणि महाराष्ट्रातील गणेशोत्सव मिरवणुकीत ढोलकी आणि डफली?? ढोलकी तमाशात वापरतात राव, अन गणेशोत्सवात ढोल.
आता अजय-अतुलचं ‘अग्निपथ’मधलं हे गाणं बघा. अस्सल मराठमोळा ताल आणि ढोल-ताशा. मजा आली का नै?
अजय-अतुलच्या संगीताची एक खासियत ही की त्यांनी पंजाबी भांगडा आणि उत्तर भारतीय तालाची सवय झालेल्या हिंदी सिनेमाजगताला मराठमोळ्या तालावर नाचायला शिकवलं.
नागराज मंजुळेंचा ‘सैराट’ मराठी चित्रपटसृष्टीत एक मैलाचा दगड ठरला. सकस कलाकृती असेल तर लोक भाषेचा अडसर मानत नाहीत हेच ‘सैराट’ने दाखवून दिलं. लोकांनी ‘सैराट’चं संगीत डोक्यावर घेतलं पण काही मान्यवरांच्या कपाळावरच्या आठ्या मात्र गेल्या नाहीत. ‘सैराट’मध्ये अजय-अतुलने मराठी गाण्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच पाश्चात्य शास्त्रीय संगीताचा प्रयोग केला. मराठीत भव्य ‘ऑर्केस्ट्रा’चा या प्रकारे वापर ‘न भूतो न भविष्यती’ असा होता. हे अर्धसत्य आहे, म्हणजे ‘न भूतो’ खरं आहे. भविष्यात कुणी सांगावं, कदाचित अजय-अतुलच परत हा पराक्रम करून दाखवतील.
अजय-अतुलची आणखी एक खासियत आहे ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही. ‘सैराट’ची गाणी त्यांनीच लिहिली आहेत (‘सैराट झालं जी’मध्ये नागराज मंजुळे यांचाही सहभाग आहे.) आणि हे पुरेसं नव्हतं म्हणून की काय, म्हणून गाणीही त्यांनीच गायली आहेत. या प्रकारची प्रतिभा फार दुर्मिळ आहे. हिंदीत या प्रकारे फक्त रविन्द्र जैन यांनी काम केलं. अन्यथा मोठमोठे संगीतकारही गीतकाराकडून जोपर्यंत गाणं लिहून येत नाही तोपर्यंत हातावर हात ठेवून बसून राहतात. ‘सैराट’च्या गाण्यांमध्ये जिवंतपणा आहे. ‘आभाळाला याट आलं जी’ सारख्या रसरशीत ओळी यात आहेत. याचं कारण म्हणजे गाणी बोली भाषेत आहेत. बोली भाषेतील जिवंतपणा प्रमाणभाषेत येणं अशक्य आहे.
दरवर्षी मराठी दिन आल्यावर मराठीच्या भवितव्याची चिंता करणारे लेख येत असतात. जोपर्यंत नागराज मंजुळे आणि अजय-अतुल सारखे प्रतिभावंत कलाकार मराठीत काम करत आहेत तोपर्यंत मराठीची काळजी करायचं कारण नाही. पुरावा हवा असेल तर युट्युबवर जाऊन ‘सैराट’च्या गाण्यांखालच्या प्रतिक्रिया बघा. चार वर्षे होऊन गेली तरी आजही वर्गात हजेरी होते त्याप्रमाणे देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन प्रतिक्रिया देत आहेत. सर्वांचा आशय एकच. ‘मला मराठी येत नाही पण हे गाणं मी रोज ऐकतो/ऐकते.’ काही मोजक्या प्रतिक्रिया इथे.