आपण पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत असताना, आपल्या निर्मात्यांची अर्थव्यवस्था एक नवी ऊर्जा आणत आहे.
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी
संगीतक्षेत्रामध्ये सर्वाधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रम कुणाच्या नावावर आहे? या प्रश्नाचे उत्तर देताना एक भारतीय म्हणून गर्व वाटतोच, शिवाय एक मराठी माणूस म्हणूनही अभिमान वाटतो. प्रश्नाचं उत्तर आहे – आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताई. २० पेक्षा अधिक भाषांमध्ये ११,००० पेक्षा जास्त गाणी गायलेल्या आशाताईंचं नाव ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदवलं गेलं आहे. आणि नुकतंच आशाताईंनी त्यांचं नवीन गाणं यूट्यूबवर प्रकाशित केलं आहे.
गाण्याच्या व्हिडिओच्या सुरुवातीला आशाताई पं. दिनानाथ मंगेशकरांना वंदन करतात. नंतर ज्यांच्याबरोबर काम करुन त्यांनी अवीट गाणी दिली ते संगीतकार आणि गायक – मदन मोहन जी, सचिनदा, रफी साहेब, किशोरदा, लतादीदी, आणि अर्थात पंचमदा. गाण्याच्या दुसऱ्या भागात आपल्याला त्यांची नात झनाई भोसलेच्या नृत्याची झलक बघायला मिळते. म्हणजे एका अर्थी पं. दिनानाथांपासुन लतादीदी, आशाताईंनी कलेचा जो वारसा जपला आणि वाढवला तो आता नव्या पिढीच्या हाती सुपुर्द केल्याचं एक प्रतीक.
व्हिडिओमध्ये जे संगीतकार आणि गायक दिसतात ते आणि जे दिसत नाहीत ते – यात हेमंतदा, शंकर-जयकिशन, मुकेशजी, खय्याम साहेब, जयदेव जी, रविंद्र जैन जी, नावं तरी किती घ्यायची – या सर्वांनी मागच्या शतकात हिंदी संगीताचा जो अमूल्य ठेवा संगीत रसिकांना दिला आहे तो अवर्णनीय आहे. ६०-७० वर्षे उलटून गेली तरी या गाण्यांची गोडी कायम आहे. कॉन्सर्ट असो वा गायनस्पर्धा, मुख्यत्वे हीच गाणी गायली जातात. गाणी ज्या चित्रपटासाठी केली होती, तो बरेचदा कुणाला माहीतही नसतो पण गाणं मात्र पाठ असतं. ही गाणी कितितरी लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहेत 1. आज स्ट्रिमिंगच्या जमान्यातही ऑल इंडिया रेडियोवर देशाच्या कानाकोपऱ्यातून या गाण्यांची फर्माईश होत असते 2.
दरम्यान, गेल्या दोन दशकांत कंटेंट क्रिएशनचे चित्र आमूलाग्र बदलले आहे. स्टुडिओच्या देखरेखीखालून न जाता आता आपल्या कलाकृती जगाशी शेअर करू शकणाऱ्या तरुण संगीत कलावंतांच्या निर्मितीची यूट्यूबवर त्सुनामी आली आहे. दिलजीत दोसांझ आणि ग्रॅमी विजेते रिकी केज यांच्यासारख्या दिग्गज गायकांनी आंतरराष्ट्रीय पटलावर पाऊल ठेवले असले, तरी अत्यंत प्रतिभावान कलाकारांचा कंटेंट दररोज प्रदर्शित होत असतो.
केवळ संगीतातच नव्हे, तर विविध क्षेत्रांत आशय निर्मिती करणाऱ्या प्रतिभेच्या या अद्भुत लाटेला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वात भारत या आघाडीवर मोठी प्रगती करत आहे. गेल्या वर्षी प्रथमच शिक्षण आणि खाण्यापासून ते सामाजिक परिवर्तन आणि कथाकथन अशा विविध क्षेत्रात कंटेंट तयार करणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सना राष्ट्रीय निर्माते पुरस्कार देण्यात आले होते.
यावर्षी भारत जगातील पहिली वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट किंवा वेव्ह्स २०२५ आयोजित करणार आहे. पंतप्रधान मा. श्री. मोदी जी यांनी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात‘मध्ये सांगितल्याप्रमाणे, वेव्ह्ज 2025 जगभरातील सामग्री निर्माते, चित्रपट निर्माते, टीव्ही उद्योग व्यावसायिक, ऍनिमेशन तज्ञ, गेमिंग किंवा मनोरंजन तंत्रज्ञान इनोव्हेटर्सना संधी ओळखण्यासाठी आणि विचारमंथन करण्यासाठी आमंत्रित करेल.
भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतानाच, मीडिया आणि मनोरंजन उद्योगातील अग्रगण्य बनण्याच्या मार्गावर आहे. वेव्ह्स २०२५ समिट भारताला कंटेंट निर्मितीसाठी एक महत्त्वाचे स्थान बनण्यास मदत करेल.
बुद्धिबळात भारतीय महिलांची पुन्हा शानदार कामगिरी
२०२१ मध्ये आम्हाला वाटले होते की आम्हाला प्रतिभावान बुद्धिबळपटू मिळतील परंतु आता आमच्याकडे एक विश्वविजेती (हम्पी) आणि एक कांस्यपदक विजेती (वैशाली) आहे.
जीएम विशी आनंद, पाच वेळा जागतिक बुद्धिबळ विश्वविजेते
भारतीय बुद्धिबळपटू नेत्रदीपक कामगिरी करत आहेत. २०२४ मध्ये भारताने ऑलिंपिकमध्ये दुहेरी सुवर्णपदक जिंकले, त्यानंतर जीएम डी गुकेश खेळाच्या १३८ वर्षांच्या इतिहासात सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ विश्वविजेता बनला. आणि आता भारताची टॉप रेटेड महिला बुद्धिबळपटू जीएम हम्पी कोनेरूने वर्ल्ड रॅपिड २०२४ महिला चॅम्पियनशिप जिंकली आहे तर जीएम आर वैशालीने वर्ल्ड ब्लिट्झ वुमन चॅम्पियनशिप २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकले आहे.
जीएम हम्पी कोनेरूने गतविश्वविजेत्या जीएम वेनजुन जू आणि वर्ल्ड रॅपिड चॅम्पियन जीएम कॅटरीना लागनो यांच्याविरुद्ध दोन बरोबरी साधल्या आणि अंतिम फेरी आणि विजेतेपद ८.५/११ गुणांसह जिंकले. हे तिचे दुसरे वर्ल्ड रॅपिड विजेतेपद आहे.
आत कुठेतरी स्वत:चे मूल्य सिद्ध करण्याचा निर्धार माझ्या मनात होता.
जीएम हम्पी कोनेरू, वर्ल्ड रॅपिड महिला विश्वविजेती
काही महिन्यांपूर्वी बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये जीएम आर. वैशाली ने आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी काळे मोहरे घेऊन जास्तीत जास्त सामने खेळले होते. हे क्रिकेटमध्ये नवीन चेंडूला तोंड देण्यासारखे होते. वर्ल्ड ब्लिट्झ चॅम्पियनशिपच्या महिला गटात जीएम वैशालीने उपांत्य फेरीत चीनच्या जीएम झू जिनरचा २.५-१.५ असा पराभव करून ब्राँझपदक पटकावले.
जीएम वैशाली वेस्टब्रिज आनंद बुद्धिबळ अकादमी (वाका) ची प्रशिक्षणार्थी आहे. वाकाने विद्यमान विश्वविजेता जीएम डी गुकेश, जीएम प्राग, जीएम निहाल सरीन आणि जीएम अर्जुन एरिगाइसी यासह अनेक युवा प्रतिभावान खेळाडूंना वर्षानुवर्षे सहाय्य केले आहे.
भारतीय बुद्धिबळाची नेत्रदीपक प्रगती बघता लवकरच भारतीय बुद्धिबळप्रेमींना कोड्यात टाकणारी परिस्थिती येऊ शकेल. समजा, बुद्धिबळ विश्वविजेता आणि त्याला आव्हान देणारा, दोघेही भारतीय आहेत. मग तुम्ही कुणाला पाठिंबा देणार?
हे म्हणजे आयपीएलची फायनल बघण्यासारखं आहे. मुंबई इंडियन्स जिंकले तेव्हाही आम्ही जल्लोष केला कारण एमआय म्हणजे घरचं कार्य. पण चेन्नई सुपर किंग्ज जिंकले तेव्हाही आम्ही टाळ्या पिटल्या कारण सिएसके म्हणजे आमच्या माही भाईंची टीम. एकूणात वर आणि वधू दोन्ही बाजूंनी आहेर मिळाल्यासारखं आहे. 😊
पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजींचे उद्गार ‘मन की बात‘ कार्यक्रमातील आहेत. जीएम विशी आनंद यांचे उद्धृत न्यूज 18 च्या अहवालातील आहे. जीएम हम्पी कोनेरू यांचे उद्गार चेसबेस इंडियाच्या मुलाखतीतील आहेत.
- याचं उत्तम उदाहरण म्हणजे युट्युबवर गाण्याखाली टाकलेल्या कॉमेंट्स. कुणाला एखादं दु:खी गाण आवडतं कारत तिच्या रिझल्टची आनंदाची बातमी आली तेव्हा ते गाणं वाजत होतं. किंवा कुणाला एखादं आनंदी गाणं आवडतं कारण तिच्या दिवंगत आई किंवा बाबांना ते गाणं आवडायचं. युट्युब कॉमेंट्स समाजशास्त्रज्ञ आणि कथालेखक यांच्यासाठी नवीन कल्पनांचा खजिना आहे. ↩︎
- मी ऑल इंडिया रेडीओ ऐकत लहानाचा मोठा झालो. केबल टीव्हीपासून ओटीटीपर्यंत अनेक नवीन वेळखाऊ व्यवधानं आली पण तरीही शेवटी रेडीओ तो रेडीओच. आजही लतादीदी, किशोरदा, रफी साहेब किंवा हेमंतदा यांचा आवाज न ऐकता एक-दोन दिवस गेले तर चुकल्याचुकल्यासारखं वाटतं. ऑल इंडिया रेडीओची आणखी एक खासियत म्हणजे सीमेवरच्या जवानांसाठी प्रक्षेपित केले जाणारे विशेष कार्यक्रम. स्मार्टफोन आणि जलद कनेक्टिव्हिटीच्या काळापूर्वी या शूर सैनिकांना कडक उन्हात किंवा शून्यापेक्षा कमी तापमानात दुर्गम सीमेवर देशाचे रक्षण करताना नागरी जगाशी रेडिओ हा एकमेव संबंध होता. ↩︎
Leave a Reply