यासुनारी कावाबाटाचं तरल भावविश्व

मुराकामी वाचून झपाटून गेल्यानंतर जपानी साहित्याबद्दलच्या उत्सुकतेपोटी इतर जपानी लेखकांचा शोध घेणं सुरू झालं. काझुओ इशिगुरो सापडला पण इशिगुरोचा जन्म पूर्वेकडचा असला तरी त्याचं सर्व आयुष्य इंग्लंडमध्ये गेलं, शिवाय तो लिहितो इंग्रजी भाषेत आणि बरेचदा त्याच्या लिखाणाचे विषय ब्रिटिश असतात. अर्थात ‘ऍन आर्टिस्ट इन अ फ्लोटिंग वर्ल्ड’ सारखे युद्धानंतरच्या जपानी समाजाच्या नैतिकतेचा धांडोळा घेणारे अपवाद आहेतच. मग हाती लागला यासुनारी कावाबाटा आणि त्याची अप्रतिम कादंबरी ‘द साउंड ऑफ द माउंटन.’

Book cover of The Sound of the Mountain by Yasunari Kawabata

कावाबाटाबद्दल काहीही माहिती नसलं तरी कादंबरीचं नाव वाचताक्षणीच एक सेकंद थबकायला होतं. समुद्राला आवाज असतो – वादळी हवेत रोरावणारा किंवा नुसत्या भरतीचा. नदी, झरे, धबधबा इतकंच कशाला झाडांचाही आवाज येतो कारण या सर्व ठिकाणी हालचाल होत असते. पण पर्वताचा आवाज म्हणजे काय? पर्वताला आवाज असतो का? की लेखकाला पर्वतावरून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज अभिप्रेत आहे? प्रश्न बाजूला ठेवून वाचायला सुरुवात केली. गोष्ट आहे शिंगो आणि त्याच्या कुटुंबाची. शिंगोनं नुकतीच साठी पार केली आहे. शिंगो, त्याची बायको यासुको, मुलगा सुईची आणि सून किकुको हे सगळे एकत्र राहत आहेत. शिंगोच्या कंपनीमध्येच आता मुलगाही काम करतो. त्याच्या मुलीचं – फुसाकोचं – लग्न झालंय आणि ती तिच्या नवऱ्याबरोबर स्वतंत्र राहते आहे.

काही लेखक पुस्तकात पात्राचा परिचय झाल्याबरोबर ‘आपण यांना पाहिलंत का?’ ची सूचना असल्याप्रमाणे रंग, उंची, बांधा, पेहराव, विशेष खूण असं सगळं वर्णन देतात. विशेषतः लोकप्रिय थ्रिलर किंवा तत्सम प्रकारच्या कादंबऱ्यांमध्ये हे बरेचदा दिसून येतं पण हे फक्त तिथेच होतं असं नाही. ही सवय डिकन्ससारख्या थोर लेखकालाही असते. (किंबहुना डिकन्सच्या प्रभावाखाली आल्यामुळे इतर लोकप्रिय लेखकांनी असं केल्याची शक्यताही नाकारता येत नाही.) याउलट विक्रम सेठसारखे लेखक उलटा मार्ग पत्करतात. कथेच्या ओघात वर्णन आलं तर ठीक पण मुद्दाम कोणतंही पात्र कसं दिसतं हे सांगण्याच्या फंदात ते अजिबात पडत नाहीत. कावाबाटाही याच गटात मोडतो. त्याला जे सांगायचं आहे त्याहून एक शब्दही अधिक तो सांगत नाही. त्यामुळे शिंगो कसला बिझनेस करतो, त्याचा जन्म कुठे झाला, शिक्षण किती, वडील काय करत होते असले सगळे तपशील गाळलेले आहेत. फुसाकोचं तिच्या नवऱ्याशी पटत नाही म्हणून ती दोन मुलांना घेऊन माहेरी येते आणि सुईचीचं एका बाईबरोबर प्रेमप्रकरण चालू असतं. या दोन मध्यवर्ती घटनांच्या अनुषंगाने कथा शिंगोच्या दृष्टिकोनातून सांगितली आहे. याखेरीज इतर संदर्भही येत राहतात. सुईची युद्धावरून परत आला आहे हे त्याच्या बोलण्यातून कळतं. शिंगोचे वर्गमित्र एक-एक करून मरतात आणि त्यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी जाताना त्याला आपलं काय होणार हा विचार पोखरत असतो. सुईची आणि शिंगो दोघांवरही युद्धाचा वेगवेगळ्या प्रकारे परिणाम झाला आहे आणि याचे कधी स्पष्ट तर कधी पुसट असे परिणाम जाणवत राहतात.

याखेरीज कावाबाटाचं वैशिष्ट्य म्हणजे निसर्ग. हिवाळा, उन्हाळा किंवा शरदाचं आगमन यासारखे बदल, बागेतल्या चेरीचा बदलणारा रंग, दर वर्षी मे महिन्यात छतावर येणारी घार, वसंताच्या आगमनाबरोबर डोंगरावरच्या बुद्धाच्या देवळात वाजणारी घंटा, आणि अर्थातच साकुरा किंवा चेरी ब्लॉसम यासारखे असंख्य बदल कावाबाटा अचूकपणे टिपतो. पण यातही तो पानच्या पानं वर्णन करत बसत नाही तर एक-दोन ओळीत तो बदल असा काही नजाकतीने अलगद पकडतो की त्याची तुलना फक्त हायकूबरोबरच होऊ शकते. आणि कावाबाटाच्या लिखाणावर हायकूचा प्रभाव नक्कीच असावा कारण त्याचे संदर्भही येत राहतात. मिनिमलिस्टीक म्हणता यावं अशा या लिखाणाचं एक अप्रतिम उदाहरण. शिंगो सकाळी कंपनीत जायला निघतो तेव्हा त्याची नात त्याच्या मागे मागे येते. शिंगो तिचा हात धरून तिला परत घराकडे नेतो आणि ती पळत पळत घरात जाते. एखाद्या सामान्य लेखकानं हे सांगायला गेलाबाजार पंचवीस-तीस वाक्य नक्कीच खाल्ली असती. कावाबाटा फक्त चार वाक्यांमध्ये याचं वर्णन करतो. ‘Grandfather.’ She followed after him. He led her by the hand to the corner of the main street. There was summer in the figure running back toward home. हायकूचे पाच-सात-पाच चे जे काही नियम असतील ते असोत, ही चार वाक्य मूर्तिमंत हायकू आहेत. पहिली दोन वाक्य सरळ आहेत, लहान मुलं नेहमी मोठ्यांच्या मागे मागे येतच असतात. त्यातही बाहेर जाताना असं होणं अगदी नेहमीची गोष्ट. तिसऱ्या वाक्यातून आपल्याला कळतं की आजोबांनी तिचा हात धरला आहे. पण ते तिला बरोबर घेऊन जात आहेत की परत घरी नेत आहेत हे संदिग्ध आहे. याचं उत्तर चवथ्या वाक्यात मिळतं पण ते ही किती काव्यमय पद्धतीने! There was summer in the figure running back toward home. पानंच्या-पानं वर्णन करून जे सांगता आलं नसतं ते या एका वाक्यातून कावाबाटा सांगून जातो. ती नुसती जात नाहीये, तिच्या जाण्यामध्ये ‘समर’ आहे. या जागी एखादं नेहमीचं विशेषण वापरलं असतं तर हा प्रसंग तितका प्रभावशाली ठरला नसता. ‘समर’ म्हटल्याबरोबर कोवळ्या उन्हात, दुडक्या चालीने, घराकडे पळत जाणारी छोटुकली डोळ्यासमोर लख्ख उभी राहते, अन्तोनियो विवाल्दीचा ‘समर’ आठवतो.

शिंगोला पडणाऱ्या स्वप्नांचे उल्लेख येत राहतात. घडणाऱ्या घटना आणि ही स्वप्नं यांचा जवळचा संबंध आहे असं आपल्या लक्षात यायला लागतं. बरेचदा कावाबाटा काही गोष्टी उघडपणे न मांडता अशा स्वप्नांच्या माध्यमातून सूचित करतो. वर्तमानपत्रात शाळकरी मुलींनी गर्भपात केल्याची बातमी येते, त्या रात्री शिंगोलाही त्याबद्दल स्वप्न पडतं, दुसऱ्या दिवशी किकुकोला तिच्या मैत्रिणीचं पत्र येतं. तिनेही गर्भपात केलेला असतो. या सगळ्या योगायोगांमुळे शिंगो संभ्रमित होतो आणि त्याला वेगळीच शंका यायला लागते. ‘But, as he gazed at her, unable to speak, he felt in himself a flicker of something youthful, and was startled as another thought flashed across his mind, that Kikuko was pregnant and was thinking of an abortion.’ हा त्याचा अंदाज पुढे खरा ठरतो मात्र कावाबाटा यावर कोणतंही भाष्य करत नाही. यात गूढता असल्याचा भास झाला तरीही कथेचा बाज कुठेही या बाजूला झुकत नाही. मुराकामी आणि कावाबाटामध्ये हा एक महत्त्वाचा फरक जाणवतो. ज्या गूढतेच्या मर्यादेला हलकासा स्पर्श करून कावाबाटा परत येतो तिथे मुराकामीची कथा सुरू होते.

१९६८ चं नोबेल पारितोषिक कावाबाटाला देण्यात आलं. नोबेल पारितोषिकाच्या भाषणात कावाबाटाने इक्क्यु या धर्मगुरुचं वाक्य उद्धृत केलं होतं, “Among those who give thoughts to things, is there one who does not think of suicide?” यानंतर चार वर्षांनी १६ एप्रिल १९७२ रोजी कावाबाटाचा मृतदेह टोक्योमध्ये त्याच्या राहत्या घरी सापडला. त्याने कोणतीही चिठ्ठी लिहिली नसल्याने ही आत्महत्या होती की अपघात याबद्दल वेगवेगळी मते आहेत.