यासुजिरो ओझुची मनमोहक बंडखोरी

जपानी दिग्दर्शक यासुजिरो ओझुच्या चित्रपटात काय आहे हे सांगण्यापेक्षा ‘नेति नेति’ प्रमाणे काय नाही हे सांगणं जास्त सयुक्तिक ठरावं. १९४९ साली बनविलेला ‘लेट स्प्रिंग’ हा मी पाहिलेला ओझुचा पहिला चित्रपट. बघताना पंधरा-वीस मिनिटं गेल्यावर काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलं. कॅमेरामन शॉट सुरू करून सारखा ‘चाय-बिडी’साठी जातो आहे की काय? असं वाटण्याचं कारण म्हणजे ओझुच्या चित्रपटांमध्ये…

जपानी दिग्दर्शक यासुजिरो ओझुच्या चित्रपटात काय आहे हे सांगण्यापेक्षा ‘नेति नेति’ प्रमाणे काय नाही हे सांगणं जास्त सयुक्तिक ठरावं. १९४९ साली बनविलेला ‘लेट स्प्रिंग’ हा मी पाहिलेला ओझुचा पहिला चित्रपट. बघताना पंधरा-वीस मिनिटं गेल्यावर काहीतरी चुकतंय असं वाटायला लागलं. कॅमेरामन शॉट सुरू करून सारखा ‘चाय-बिडी’साठी जातो आहे की काय? असं वाटण्याचं कारण म्हणजे ओझुच्या चित्रपटांमध्ये कॅमेरा जागचा हलत नाही. ट्रॅक, पॅन, पात्र चालत जात असताना त्यांच्या मागे-मागे फिरणं, क्लोज-अप, उंचावरून घेतलेले शॉट, खुर्चीच्या किंवा माणसांच्या पायातून कॅमेरा रोखणं – यापैकी काहीही ओझुच्या चित्रपटांमध्ये सापडणार नाही. दामे दामे (ダメダメ). शिवाय कॅमेरा जिथे ठेवला आहे त्याच जागी परत परत ठेवलेला आढळतो. एखाद्या घरात ओझुच्या चार किंवा पाच ठरलेल्या जागा असतात, तिथूनच तो सगळा चित्रपट चित्रित करतो. बरं, कॅमेरा एका जागी आहे हे ठीक पण त्याची उंचीही आपण मांडी घालून बसलो तर ज्या आपलं डोकं ज्या पातळीला येईल तिथे. ओझुच्या बहुतेक सर्व चित्रपटांमध्ये घरात लोक टेबल खुर्च्या न वापरता मांडी घालून बसलेले दिसतात. ओझु बहुतेक सर्व शॉटमध्ये याच पातळीला कॅमेरा ठेवतो. शिवाय जोडीला मंद असं पार्श्वसंगीत सतत चाललेलं. चित्रपटामध्ये प्रसंग चित्रित करण्याचे काही लिखित किंवा अलिखित नियम असतात, ओझु हे सर्व नियम धुडकावून लावतो.

ओझुने सुरुवात मूकपटांपासून केली आणि नंतर बोलपट काढले. त्याचे शेवटचे काही चित्रपट रंगीत आहेत. त्याच्या चित्रपटांमध्ये पात्रांवर कधीही अशक्य कोटीतील प्रसंग गुदरत नाहीत. अडचणी असतात पण त्या अशक्यप्राय नसतात. रोज दिसणारी माणसं, त्यांचे रोजचेच प्रसंग. हल्लीचे चित्रपट दिग्दर्शक बहुतेक वेळा कथेवरील पकड ढिली वगैरे होत नाही ना अशा विवंचनेत असतात. मग त्यांच्या पात्रांच्या आयुष्यात अनाकलनीय घटना घडतात, कथेला अनपेक्षित वळणे मिळतात. ओझु हे सगळं एखाद्या सिगारेटवरची राख झटकावी तसं उडवून लावतो. त्याच्या बहुतेक कथा एका परिच्छेदात बसतील अशा असतात. कथांमध्ये बहुतेक वेळा ठराविक थीम परत परत वापरलेली असते, इतकंच नव्हे तर मुख्य कलाकारही तेच असतात. कलाकारांच्या वेषभूषेत किंवा मेकअपमध्येही फारसा फरक नसतो. बहुतेक कथासूत्रे साधी. ओहायो – गुड मॉर्निंग – मध्ये दोन मुलं टीव्हीचा हट्ट धरतात आणि तो पूर्ण होईपर्यंत मौनव्रत पत्करतात. बस्स, हीच कथा. पण ओझु अशा नजाकतीने ही पडद्यावर मांडतो की ज्याचं नाव ते. ‘टोक्यो स्टोरी’ गंभीर आहे – क्योटोमधून आई-वडील टोक्योमधल्या आपल्या मुलांना भेटायला येतात. शहरी धावपळीशी जमवून घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना आलेल्या अडचणी यावर कथा आधारलेली आहे. या चित्रपटात एक विशेष म्हणजे ओझु चक्क एक ट्रॅकिंग शॉट घेऊन कॅमेरा हालवतो!

चेखॉव्ह म्हणायचा, “पहिल्या अंकात स्टेजवर पिस्तूल दिसलं तर तिसऱ्या अंकात कुणीतरी गोळी झाडायला हवी.” ओझुला हे मंजूर नाही. ‘ऍन ऑटम आफ्टरनून’मध्ये एका बारमधली वेट्रेस नायकाच्या मृत पत्नीसारखी दिसते. हे तो घरी आल्यावर मुलांनाही सांगतो. पण याचं पुढे ती तिची जुळी बहीण असणं असलं काही होत नाही. याचा कथानकाशी संबंध असलाच तर तो शेवटी असावा पण तो ही इतका अस्पष्ट आहे की नक्की काहीच सांगता येत नाही. ओझुचे चित्रपट वरून साधे दिसत असले तरी कधीकधी खोलात गेल्यावर तळ बराच खाली आहे हे जाणवतं.

बरं, कथेत एखादा नाट्यमय प्रसंग असला तरी ओझु त्याला टाळून पुढे जातो. ‘लेट स्प्रिंग’ आणि त्याच कथेवर थोडे फेरफार करून बनविलेला ‘ऍन ऑटम आफ्टरनून’ दोन्हीमध्ये मुलीचं लग्न हा कथेतील सर्वात महत्त्वाचा प्रसंग आहे. असं असेल तर बहुतेक दिग्दर्शकांना आता काय दाखवू आणि काय नको असं होतं. पण दोन्हीकडे लोक तयार होऊन लग्नाला जातात आणि पुढच्याच प्रसंगात लग्नाहून परत आलेले लोक गप्पा मारताना दिसतात. त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला कळतं की लग्न उरकलं. नवऱ्यामुलाचा चेहराही बघायला मिळत नाही. ओझुने महाभारतातील युद्ध फक्त धृतराष्ट्र आणि संजय यांच्या संवादावरून एका खोलीत चित्रित केलं असतं. बरेचदा कलाकार अगदी साध्या गोष्टी करत असतात आणि कॅमेरा कोपऱ्यात उभं राहून हे टिपत असतो. प्रत्येक कलाकार बोलताना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव दिसायलाच हवेत असंही नाही, बरेचदा त्याची पाठ दिसते. दोन पात्रांचा संवाद चित्रित करताना एकाच्या खांद्यावरून दुसऱ्याकडे बघणं असे प्रकार तो कधीच करत नाही.

अभिनयाचं काय? ओझुच्या चित्रपटांमध्ये कलाकार इतक्या साधेपणाने वावरतात की बराच वेळ ते कसलेले कलाकार आहेत आणि साधा अभिनय करत आहेत की मुळातच बेतास बात कलाकार आहेत हेच कळत नाही. कलाकाराने ‘मेथड ऍक्टींग’ वगैरे वापरून बैल मुसंडी मारतो तसं भूमिकेत घुसणं (आणि मग दिग्दर्शकाने त्यांच्या नाकपुडीतील केस मोजता येतील इतक्या जवळ जाऊन प्रसंग चित्रित करणं) असला प्रकार अजिबात दिसत नाही. फक्त दारू पिऊन झिंगल्याच्या एखाद्या प्रसंगात बारकाईनं पाहिलं तर मात्र छोट्या-छोट्या हालचालींवरून त्यांचा अभिनय सुरेख आहे याची खात्री पटते. हे सगळं वाचून प्रश्न पडावा की ही टीका आहे की स्तुती? दोन्ही नाही, जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न आहे. खरं तर इतकं सगळं नसल्यावर चित्रपटात काय राहिलं असा प्रश्न पडावा. पण होतं उलटंच. ओझुचा कोणताही चित्रपट, कितीही वेळा बघितला तरी अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. आणि मग प्रश्न पडतो की असं का? चांगला चित्रपट कशामुळे बनतो याच्या व्याख्या तपासून बघाव्याश्या वाटतात. ओझु सगळे नियम बाजूला ठेवून त्याला जे दाखवायचं आहे ते शांतपणे दाखवत राहतो. बरेचदा कलाकार फ्रेममधून गेल्यावर काही सेकंद कॅमेरा मोकळी फ्रेम दाखवतो. दोन प्रसंगांच्या मध्ये नेहमी रिकामी खोली, रिकामा जिना, दोन बिल्डिंगच्या मध्ये असलेला दिवा, फॅक्टरीच्या चिमण्यांमधून येणारा धूर – ही ठरलेली चित्रे काही सेकंद येऊन जातात. रस्त्यावरून कलाकार जात असेल तर तो ही बरेचदा दोन घरांच्या फटीतून जाताना दिसतो.

हे सगळं वर्णन करण्याचा उद्देश हा की आजच्या काळात किती लोकांना हे बघायला आवडेल याची खात्री नाही. ३६० कोनातून कॅमेरा फिरवून, आकाश, पाताळ सगळीकडे ३-डी मधला मुक्त संचार असूनही प्रेक्षक कंटाळतात. अशा परिस्थितीत न हालणारा कॅमेरा बघायला आवडेल की नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं. ओझु बघायचा तर नेहमीच्या अपेक्षा बाजूला ठेवायला हव्यात. ओझु जेव्हा एखाद्या गावाची गोष्ट सांगतो तेव्हा ती सांगताना गाव कसं आहे, तिथल्या विशिष्ट जागांवरून काय दिसतं, आगगाडी येताना कशी दिसते, रात्री कुणी नसताना रस्ता कसा दिसतो हे सगळंही सांगत असतो. फक्त कथेत पुढे काय झालं इतकाच हेतू असेल तर ओझु बघून निराशा होणं साहजिक आहे. जपानी चित्रपट म्हणजे कुरोसावा आणि त्याचे ‘इंटेन्स’ सामुराई हे समीकरण (नको इतकं) पक्कं झालं आहे. याच्या अगदी उलट संवेदनशीलता बाळगणारा ओझु बघताना वेगळाच अनुभव मिळतो.

ओझुचे काही चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहेत.