व्हॅटिकन : एक अनभिषिक्त, कलंकित साम्राज्य

व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स चौकात गेल्यावर पहिला शब्द मनात आला तो म्हणजे भव्यता. जे समोर दिसते आहे त्याचे वर्णन शब्दातीतच नव्हे तर इतर कुठल्याही प्रकारे करणे अशक्य आहे याची जाणीव होते. म्हणूनच कॅमेराही निरूपयोगी ठरतो. मग सेंट पीटर्स बसिलिकेमध्ये गेल्यावर मायकेल एंजेलोच्या दैवी देणगीचा आविष्कार बघताना ही भावना द्विगुणित होते. कथिड्रलच्या डोमपर्यंत ३३० पायर्‍या चढताना…

व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर्स चौकात गेल्यावर पहिला शब्द मनात आला तो म्हणजे भव्यता. जे समोर दिसते आहे त्याचे वर्णन शब्दातीतच नव्हे तर इतर कुठल्याही प्रकारे करणे अशक्य आहे याची जाणीव होते. म्हणूनच कॅमेराही निरूपयोगी ठरतो. मग सेंट पीटर्स बसिलिकेमध्ये गेल्यावर मायकेल एंजेलोच्या दैवी देणगीचा आविष्कार बघताना ही भावना द्विगुणित होते. कथिड्रलच्या डोमपर्यंत ३३० पायर्‍या चढताना जुनी दारे, बंद केलेले मार्ग दिसतात. या भिंतींनी, या दारांनी काय काय पाहिले असेल असा विचार मनात येतो. इथे पहिल्यांदा गेलो तेव्हा व्हॅटिकनबद्दल विशेष माहिती नव्हती त्यामुळे या भव्यतेच्या भावनेला एक विशिष्ट आकार किंवा स्वरूप नव्हते. तरीही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे या भव्यतेमागे एक विशिष्ट हेतू होता. ही धार्मिकता नव्हती, हे सरळ सरळ सत्तेचे प्रदर्शन होते.

पॉल जेफ़्रीज यांचे ‘द डार्क मिस्टरीज ऑफ द व्हॅटिकन’ हे पुस्तक नुकतेच वाचले आणि चित्र आणखी स्पष्ट झाले. ‘दा विंची कोड’ किंवा ‘गॉडफादर ३’ मध्ये व्हॅटीकनबद्दल बर्‍याच सुरस आणि चमत्कारिक गोष्टी दिल्या आहेत. ‘ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन’ यानुसार वास्तव याहून कितीतरी पटींनी भयानक आहे. साहित्यामधून व्हॅटिकनचे जे स्वरूप समोर आले आहे ते केवळ हिमनगाचे टोक आहे. प्रत्यक्षात व्हॅटीकनच्या बंद दारांमागे खून, भ्रष्टाचार, राजनैतिक कट, लैंगिक स्वैराचार आणि शोषण अशा अनेक कलंकित घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत.

इथे व्हॅटिकनला साम्राज्य का म्हटले आहे ते बघूयात. काहींच्या मते आजच्या घडीला कॅथोलिक चर्च जगातील सर्वात श्रीमंत संस्था आहे आणि या संस्थेचा प्रमुख या नात्याने पोप सर्वात श्रीमंत मनुष्य आहे. होली सी या नावाने ओळखल्या जाणार्‍या या संस्थेचे गल्फ ऑइल, आइबीएम, जनरल मोटर्स, शेल या कंपन्यांमध्ये अब्जावधी डॉलरचे समभाग आहेत. याखेरीज रिअल इस्टेट, अब्जावधी डॉलरचे सोने, दरवर्षी येणार्‍या देणग्या हे सर्व आहेतच. होली सीच्या ताब्यात जगातील सर्वाधिक मूल्यवान कलाकृती आहेत. यापैकी बहुतेकांचे मूल्य ठरवणे अशक्य आहे त्यामुळे त्यांची किंमत १ युरो धरली जाते. पोप हा या साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर किमान महाभियोग खटला चालवता येतो, पोपवर महाभियोग चालवणेही शक्य नाही. पोप निवृत्त होत नाही, मरण हीच निवृत्ती. व्हॅटिकन शहरात कुठलाही कायदा चालत नाही, व्हॅटिकनचे स्वत:चे कायदे आहेत. यांना कॅनन लॉज म्हणतात. व्हॅटिकनमध्ये खून झाल्यास पोलिसांना तपास सोडाच, आत येण्याचीही परवानगी नाही. किंबहुना पोस्टमार्टेमही व्हॅटिकनच्या अधिकार्‍यांना वाटले तर त्यांच्यातर्फे करण्यात येते आणि ते जो निर्णय देतील तो अंतिम असतो. या बाबतीत जगातील कुठलेही न्यायालय काहीही करू शकत नाही.

या पार्श्वभूमीवर या साम्राज्यात पडद्यामागे जे प्रकार चालतात ते वाचून थक्क व्हायला होते. व्हॅटिकनचे माफियापासून ते सीआयएपर्यंत सर्वांशी संबंध आहेत. दुसर्‍या महायुद्धात व्हॅटिकनने आधी मुसोलिनीशी आणि नंतर हिटलरशी करार केला. यामुळे जर्मन फौजा व्हॅटिकनच्या दारापर्यंत येऊनही आत आल्या नाहीत कारण तसे करू नये अशी हिटलरची सक्त ताकीद होती. महायुद्ध संपल्यानंतर आइकमनसारख्या अनेक नाझी गुन्हेगारांना बनावट कागदपत्रे देऊन अर्जेंटिनामध्ये पाठवण्यामध्ये व्हॅटिकनने मदत केली. या कामासाठी इतालियन माफियाची मदतही घेतली गेली. व्हॅटिकन नेहेमीच डाव्या विचारसरणीच्या विरोधात राहिले आहे. यामुळे अमेरिकेशी सलगी आणि शीतयुद्धाच्या काळात रशियाशी वैर हे साहजिक होते. ८० च्या दशकात रेगन अध्यक्ष असताना सीआयएच्या मदतीने व्हॅटिकनने पोलंडमध्ये कम्युनिस्ट राजवटीविरूद्ध लढणार्‍यांना सर्व प्रकारे प्रोत्साहन आणि मदत केली. पूर्व युरोपमधील कम्युनिस्टांच्या पराभवामागे आणि शीत युद्ध संपवण्यामागे व्हॅटिकनाचा सक्रिय सहभाग होता. गुप्त कारवायांसाठी सीआयएच्या दृष्टीने व्हॅटिकन महत्वपूर्ण आहे. यासारख्या गेल्या दीड एक हजार वर्षांमधील कित्येक घटनांचे पुरावे आजही व्हॅटिकनमध्ये कागपत्रांच्या स्वरूपात आहेत. व्हॅटिकन सीक्रेट अर्काइव्ह्ज या नावाने ओळखल्या जाणार्‍या या संग्रहाची लांबी ५२ मैल आहे. (एंजल्स ऍंड डिमन्स चित्रपटात याचे चित्रीकरण दाखवले आहे.) इ. स. ११९८ नंतरची कागदपत्रे बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत. यातील निवडक कागदपत्रे वेळोवेळी संशोधकांसाठी खुली करण्यात आली आहेत. यामध्ये गॅलिलिओवर चालवण्यात आलेल्या खटल्याची कागदपत्रेही आहेत.

२६ ऑगस्ट, १९७८ रोजी जॉन पॉल १ यांची पोपच्या पदावर नियुक्ती झाली. यांची विचारसरणी खुली होती आणि आल्याबरोबर त्यांनी व्हॅटिकनच्या कायद्यांमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे संकेत दिले. याच काळात व्हॅटिकन बॅंकेमध्ये इतालियन माफियाच्या सहाय्याने केलेले गैरव्यवहार उघडकिस आले. यावर नवीन पोप कडक धोरण स्वीकारतील अशी चिन्हे होती. उण्यापुर्‍या १ महिन्यात, २९ सप्टेंबरच्या सकाळी आपल्या बिछान्यात ते मृतावस्थेत आढळले. मरताना त्यांच्या हातात व्हॅटिकनच्या महत्वाच्या पदाशिकार्‍यांचे गौप्यस्फोट करणारी कागदपत्रे होती. कुठलाही तपास किंवा शवविच्छेदन न करता ते हृदयविकाराने मरण पावले असे अधिकृतरीत्या घोषित करण्यात आले. यानंतर पुढच्या ५-६ वर्षात गैरव्यवहाराशी संबंधित चार ते पाच उच्चपदस्थ आणि इटालियन माफियोझी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. यातील सर्वात गाजलेली केस म्हणजे व्हॅटिकनशी संबंधित बॅंकर रॉबेर्तो काल्वी लंडनमधील एका पुलावर गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला.

व्हॅटिकनवर याच प्रकारची आणखीही पुस्तके आहेत. पॉल जेफ्रीज यापैकी काहींचा संदर्भ देतात. पुस्तक वाचताना बरेचदा आपण एका धार्मिक संस्थेबद्दल वाचतो आहोत याचा विसर पडतो. पुस्तक २०१० मधील असल्याने संदर्भ अद्ययावत आहेत. जगात घडणार्‍या अनेक घटनांमागे व्हॅटिकनचा अदृश्य हात आहे हे कधीही उघडकीला येत नाही. कायदे, न्यायालय यापासून अलिप्त, कुठल्याही प्रकारच्या सत्तेला न जुमानता बंद दारांमागे या साम्राज्याच्या घडामोडी चालू रहातात. या संदर्भात लेखिका डोन्ना लिओन यांची प्रतिक्रिया बोलकी आहे, “What did Italy do to deserve to have both the Vatican and the Mafia?”