मानवी उत्क्रांतीमधील एक महत्वाचा टप्पा – ऑस्ट्रोलोपिथेकस सेडिबा

शाळेत असताना उत्क्रांतीच्या धड्यामध्ये माकड ते माणूस हा प्रवास चार किंवा पाच पायर्‍यांमध्ये दाखवला होता. सुरूवातीचं माकड रांगतय, मग हळू हळू दोन पायांवर चालतय आणि शेवटी आज दिसणारा ताठ कण्याचा माणूस. धड्यामध्ये काय वर्णन केलं होतं आठवत नाही पण यावरून असा समज झाला होता की हे सगळं पद्धतशीरपणे झालं. म्हणजे माकड ते माणूस हा प्रवास ठराविक टप्प्यांमध्ये, एका निश्चित दिशेने झाला. उत्क्रांतीचं हे चित्र किती दिशाभूल करणारं आहे याचा प्रत्यय थोडं खोलात गेल्यावर आला.

माणसाचा उगम आफ्रिकेमध्ये झाला या मताला गेल्या ५०-६० वर्षांमध्येच मान्यता मिळाली आहे. त्याआधी आफ्रिकेमध्ये सापडलेल्या अर्वाचीन मानवांच्या सांगाड्याकडे शास्त्रज्ञांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. विसाव्या शतकाच्या सुरूवातीला ब्रिटीश साम्राज्य सामर्थ्यवान असताना माणसाचा उगम ब्रिटनमध्येच झाला असावा असं मत लोकप्रिय होतं. १९०८ साली ब्रिटनमधील पिल्टडाउन इथल्या खाणीमध्ये सापडलेले काही अवशेष ‘पिल्टडाउन मॅन’ या नावाखाली प्रसिद्ध झाले. हे अवशेष नकली असल्याचे लक्षात यायला आणखी ४० वर्षे जावी लागली. आज आफ्रिका जन्मभूमी असण्याबद्दल दुमत नसलं तरी गेल्या शंभर-एक वर्षांमध्ये सापडलेल्या विविध सांगाड्यांमुळे गुंतागुंत इतकी वाढली आहे की माकड ते माणूस या प्रवासाचं स्पष्ट चित्र नजीकच्या भविष्यकाळात तरी समोर येणं अवघड आहे.

सध्या प्रचलित असलेला आराखडा काहीसा असा आहे. सुमारे ७० लाख वर्षांपूर्वी चिंपांझी, गोरिला आणि माणसाचा अर्वाचीन वंशज यांच्या शाखा वेगळ्या झाल्या. ४० लाख वर्षांपूर्वीचा ऑस्ट्रोलोपिथेकस अफारेन्सिस या साखळीतील एक महत्वाचा दुवा. ऑस्ट्रोलोपिथेकस प्रजातीची वैशिष्ट्ये म्हणजे त्यांचा मेंदू सध्याच्या आपल्या मेंदूच्या आकाराच्या ३५ % इतका लहान होता (सुमारे ४४० घ.सें.मी.), उंची पावणेचार ते साडेचार फूट. मात्र ऑस्ट्रोलोपिथेकस दोन पायांवर चालत होता याच्या पुष्ट्यर्थ पुरावे असूनही याबद्दल आजही तीव्र मतभेद आहेत. याच मुद्द्याशी निगडीत मुद्दा म्हणजे मेंदूची वाढ आणि दोन पायांवर चालणे यांचा परस्परसंबंध होता किंवा नाही. एक मत असे आहे की दोन पायांवर चालायला सुरूवात केल्यावर हात मोकळे झाले, हातांनी ह्त्यारे तयार करण्यासारखी विविध कामे करण्याची प्रवृत्ती वाढली आणि परिणामत: मेंदूचाही आकार वाढला. ऑस्ट्रोलोपिथेकस प्रजातीमधून सुमारे वीस लाख वर्षांपूर्वी होमो प्रजाती उत्क्रांत झाली. सध्याचा माणूस – होमो सापियन्स – या प्रजातीचा एकमेव वंशज आहे. होमो प्रजातीची वैशिष्ट्ये म्हणजे आकाराने वाढलेला मेंदू, दगड आणि प्राण्यांच्या हाडांपासून हत्यारे करण्याची क्षमता. ऑस्ट्रोलोपिथेकसपासून होमो उत्क्रांत होण्यामागे वातावरणामधील बदल असल्याचेही काही शास्त्रज्ञ मानतात. वीस लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेचे हवामान बदलले, जंगले नष्ट होऊन गवताळ प्रदेश वाढले. झाडे कमी झाल्यामुळे सपाट प्रदेशामध्ये चालण्यासाठी दोन पायांवर चालणारा, धावणारा होमो अस्तित्वात आला. हे सगळे अर्थातच तर्क आहेत.

कुठलाही सांगाडा किंवा अवशेष सापडल्यावर त्याला विशिष्ट प्रजातीमध्ये बसवणे अत्यंत जिकीरीचे काम असते. ऑस्ट्रोलोपिथेकस आणि होमो प्रजातींमधील सीमारेषा धूसर आहे. २० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या होमो हाबिलीसची बरीचशी वैशिष्ट्ये ऑस्ट्रोलोपिथेकसशी जुळतात, फक्त मेंदूचा आकार किंचित मोठा आहे. त्यामुळे हाबिलीसला कोणत्या गटात टाकायचे याबद्दल मतभेद आहेत. होमो प्रजातीचा स्पष्ट वारसदार होमो एरगॅस्टर मानला जातो. याची बाह्य वैशिष्ट्ये आताच्या माणसाशी मिळतीजुळती होती, मेंदुचा आकारही बराच मोठा होता. (८८० घ.सें.मी.) या प्रवासामध्ये इतरही फांद्या आहेत. यातील बाकीच्या सर्व फांद्या यथावकाश नामशेष झाल्या.

२०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पुरातत्वशास्त्रज्ञ ली बर्जर याला सुमारे १९ लाख वर्षांपूर्वीचा एक सांगाडा सापडला. याला त्याने ऑस्ट्रोलोपिथेकस सेडिबा हे नाव दिलं. याच्या अभ्यासाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाल्यावर पुरातत्वशास्त्राच्या जगात एकच खळबळ माजली आहे कारण सेडिबाने बर्‍याच शास्त्रज्ञांची गोची केली आहे. उत्खनन करताना संपूर्ण सांगाडा मिळणं फारच दुर्मिळ असतं. बहुतेक वेळा काही हाडे किंवा कवटी मिळते. याच्या आधारे शास्त्रज्ञ बाकीच्या शरीराचा आराखडा बनवण्याचा प्रयत्न करतात. उदा. ऑस्ट्रोलोपिथेकस प्रजातीची वैशिष्ट्ये असणारे हाड सापडले तर सांगाडा त्या प्रजातीचा होता असं गृहीत धरले जात असे. तीच गत होमो प्रजातीचीही. अडचण अशी आहे की सेडीबामध्ये ऑस्ट्रोलोपिथेकस आणि होमो दोन्ही प्रजातींची वैशिष्ट्ये सापडतात. त्याच्या मेंदूचा आकार ऑस्ट्रोलोपिथेकसइतका आहे (४२० घ. सें. मी.) तर कपाळाचा आकार होमो प्रजातीशी मिळताजुळता आहे. त्याची बोटे छोटी, सरळ – हत्यारे तयार करण्यासाठी उपयोगी अशी आहेत. त्याचे हात वानरांसारखे लांब आहेत. टाचेचे हाड ऑस्ट्रोलोपिथेकससारखे पण पायाच्या घोट्याचे हाड होमोसारखे आहे. सेडिबा प्रजातीच्या एका स्त्रीचा सांगाडाही सापडला आहे. तिच्या कंबरेचा आकार ऑस्ट्रोलोपिथेकस प्रजातीच्या सांगाड्यांपेक्षा बराच मोठा आहे. म्हणजे मोठ्या आकाराच्या मेंदूला जन्म देण्यासाठी कंबरेचा आकार मोठा झाला हा सिद्धांत सेडिबाने खोटा ठरवला आहे. या गोंधळामध्ये एक नवीन अडचण म्हणजे सेडिबा कुणाचा वंशज आहे आणि कुणाचा पूर्वज हे ठरवणे.

सेडिबामुळे आणखीही काही रोचक दुवे मिळाले आहेत. सेडिबाच्या कवटीचा सीटीस्कॅन केल्यावर एके ठिकाणी हाडामध्ये छोटीशी पोकळी दिसली. या पोकळीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर तिचा आकार त्वचेसारखा आहे असे दिसून आहे. सेडिबाच्या त्वचेचा अंश मिळू शकला तर त्यावरून कितीतरी अमूल्य माहीती मिळू शकते. त्याचा रंग कसा होता, शरीराचे तपमान किती होते -यावरून तो किती सक्रिय होता हे ही कळू शकेल. याआधी त्वचेसारखे अवशेष सांगाड्यांमधून मिळू शकतात ही शक्यताच विचारात घेतली गेली नव्हती. सेडीबाच्या दातांवर डाग आहेत. प्रचलित पद्धतीनुसार असे दात स्वच्छ केले जातात. पण बर्जरला या डागांमध्ये अन्नाचे अवशेषही असू शकतील असे वाटले. असे असल्यास यातून त्याच्या आहाराविषयी माहिती मिळू शकेल. बर्जरच्या मतानुसार सेडिबाचे कोणतेही एक हाड मला मिळाले असते तर मी त्याला कुठलाही विचार न करता होमो किंवा ऑस्ट्रोलोपिथेकस प्रजातीमध्ये टाकले असते. पण सेडिबामुळे हे सिद्ध झाले आहे की या दोन्ही प्रजातींची वैशिष्ट्ये एकाच सांगाड्यात आढळू शकतात. याचा अर्थ याआधी मिळालेल्या सर्व अपूर्ण सांगांड्यांचा फेरविचार करण्यची गरज आहे. इतर शास्त्रज्ञांना अर्थातच हे मत मान्य नाही. पुरातत्वशास्त्राच्या या शाखेतील शास्त्रज्ञांची भांडणे कोणत्याही थराला जाऊ शकतात. (एकदा प्रकरण पोलीसांपर्यंत गेल्याचीही नोंद आहे.)

या शाखेतील संशोधनाचा प्रवास पाहीला तर हत्ती आणि सात आंधळे यांची गोष्ट आठवते. प्रत्येक आंधळ्याप्रमाणेच प्रत्येक पुरातत्वशास्त्रज्ञ त्याला किंवा तिला जे अवशेष सापडतील ते सर्वात प्राचीन किंवा महत्वाचे आहेत असे दाखवण्याचा प्रयत्न करतो. अवशेषांवरून उत्क्रांतीचा सर्व प्रवास उभा करणे जिकीरीचे आहेच, शिवाय यात काही मूलभूत अडचणी आहेत. एक तर प्रवासातील सर्व प्रजातींचे अवशेष जीवाश्म रूपामध्ये सापडतीलच असे नाही. बहुतेक अवशेष नष्ट होतात. त्यामुळे यावरून बनवलेल्या सिद्धातांमध्ये बर्‍याच मोकळ्या जागा आहेत. त्यात भर पडली ती इतर शास्त्रांमधून मिळणार्‍या माहितीची. उदा. जगातील विविध वंशाच्या लोकांचे डीएनए तपासल्यावर त्यांच्या आईच्या डीएनएचा माग काढता येतो. म्हणजे मागे-मागे जात सर्व जगाची जननी कोण, कुठे होती याचा सुगावा लागू शकतो. यानुसार ही जगन्माता सुमारे २००,००० वर्षांपूर्वी आफ्रिकेत राहत होती. पण हा निष्कर्ष प्रसिद्ध झाल्यावर पुरातत्वशास्त्रज्ञ चवताळून उठले. एक तर हे त्यांच्या क्षेत्रावर आक्रमण होतं. आम्ही जन्मभर फिल्डमध्ये कष्ट करून सांगाडे शोधतो आणि हे फक्त रक्त तपासून असे निष्कर्ष काढतात म्हणजे काय? भावनिक पातळीवर यात तथ्य असलं तरी ही डीएनए तपासण्याची पद्धत आता सर्वमान्य झाली आहे.

बर्‍याच नंतर आलेल्या निएंडरथाल आणि होमो सापियन्स सापियन्स एकत्र राहिल्याचे पुरावे आहेत. अर्वाचीन प्रजातीही एकमेकांच्या सहवासात राहत होत्या का? भाषेचा उगम कधी झाला? कोणत्याही सांगाड्यामध्ये घशाचे स्नायू सापडणे अशक्य त्यामुले या प्रश्नाचे उत्तर महाकठीण आहे. माणसाला आपण आहोत ही जाणीव कधी झाली? मेंदूचा आकार वाढल्यानंतरच हे झालं असणार पण हे एकदम झालं की हळूहळू? मुळात मेंदूचा आकार का वाढला? असे बरेच अनुत्तरित प्रश्न आहेत. कोहम

सेडीबा जिथे सापडला त्या साइटवर आणखी बरेच सांगाडे मिळण्याची शक्यता आहे. यथावकाश उत्क्रांतीच्या प्रवासामध्ये ऑस्ट्रोलोपिथेकस सेडिबाचे नेमके स्थान कोणते आहे हे स्पष्ट होईल अशी बर्जरला आशा आहे.