तुंबाड : एक थरारक प्रवास

‘तुंबाड’विषयी बोलायचं झालं तर अनेक गोष्टी उल्लेखनीय आहेत. पहिलं म्हणजे याचा जॉन्र. बॉलिवूडला काही प्रकारच्या चित्रपटांचं वावडं आहे. उदा. हिंदी चित्रपटसृष्टीत शेरलॉक होम्स, एर्क्यूल प्वारो किंवा अगदी आपले देशी ब्योमकेश बक्षी यांची गादी चालवू शकेल असं कुणीही नाही. बॉलिवूडला डिटेक्टिव्ह फारसे रुचत नाहीत. तीच गट भयपटांची. नाही म्हणायला रामसे बंधूंनी ‘शैतानी दरवाजा’ वगैरे काढले पण…

‘तुंबाड’विषयी बोलायचं झालं तर अनेक गोष्टी उल्लेखनीय आहेत. पहिलं म्हणजे याचा जॉन्र. बॉलिवूडला काही प्रकारच्या चित्रपटांचं वावडं आहे. उदा. हिंदी चित्रपटसृष्टीत शेरलॉक होम्स, एर्क्यूल प्वारो किंवा अगदी आपले देशी ब्योमकेश बक्षी यांची गादी चालवू शकेल असं कुणीही नाही. बॉलिवूडला डिटेक्टिव्ह फारसे रुचत नाहीत. तीच गट भयपटांची. नाही म्हणायला रामसे बंधूंनी ‘शैतानी दरवाजा’ वगैरे काढले पण त्यात राम तर सोडा, सीता, सुग्रीव किंवा जाम्बुवंतही नव्हते. नुकतेच आलेले ‘स्त्री’सारखे अपवाद सोडले तर बॉलिवूडमध्ये भयपटांची वानवाच असते.

‘तुंबाड’नं हे बदललं आणि असं बदललं की ‘एक ही मारा लेकिन सॉलिड मारा’. त्यांनी केवळ भयपट केला नाही तर त्याला गूढ दंतकथेची जोड दिली. हे बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही झालेलं नाही. (‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’मध्ये काही गडद छटा आहेत पण एकूणात चित्रपट रोमांचकारी साहसपट आहेत.)

“लोकेशन, लोकेशन, लोकेशन!”

रिअल इस्टेटचा हा मूलमंत्र चित्रपटांनाही लागू पडतो. आपल्या चित्रपटांमध्ये कोकणभाग किती दुर्लक्षित आहे हे लक्षात आलं तेव्हा खुर्चीवरून खाली पडायचा बाकी होतो. शिमला, काश्मीर इथला इंच न इंच कुठल्यातरी चित्रपटात दाखविला गेला आहे. तीच गत स्वित्झर्लंड किंवा इटलीची. तुंबाड महाराष्ट्राच्या कोकण आणि पुण्याजवळच्या निसर्गरम्य भागात चित्रित केला आहे आणि बघताना डोळे सुखावतात.

डोळे सुखावतात याचं कारण अप्रतिम छायांकन (cinematography). या तोडीचं छायांकन हिंदी चित्रपटात यापूर्वी बघितल्याचं आठवत नाही. बरंचसं चित्रीकरण पावसाळ्यात, खऱ्या पावसात केलं गेलं आणि यासाठी चार पावसाळे खर्ची पडले. पूर्ण चित्रपटाला सहा वर्षे लागली. हे करायला अमर्याद संयम आणि कामाप्रति असीम​ निष्ठा यांची गरज असते.

सोहम शाह, आनंद एल. राय, आनंद गांधी, मुकेश शाह, अमिता शाह (निर्माते), राही अनिल बर्वे, आनंद गांधी (दिग्दर्शक), पंकज कुमार (छायांकन), मितेश शाह, आदेश प्रसाद, राही अनिल बर्वे, आनंद गांधी (पटकथा), राज शेखर (गीतकार), अजय-अतुल, जेस्पर किड (संगीतकार), संयुक्त काझा (संकलन) आणि चित्रपटाची सर्व टीम यांचं मन:पूर्वक अभिनंदन. या सर्वांची नावे देण्याचं कारण हे की ही मंडळी नेहेमी पडद्यामागेच राहतात. अभिनेते आणि दिग्दर्शक यांची नावे सर्वच समीक्षक देतात. संकलक,छायाचित्रकार आणि गीतकार यांची नावे एखादवेळेस द्यायला काय हरकत आहे?

तुंबाड रूढार्थाने भयपट असला तरी चित्रपटात ठाशीव भयप्रसंग कमीच आहेत. त्याऐवजी वातावरण आणि प्रेक्षकांच्या कल्पनेतून भयनिर्मिती केली आहे. लोकेशनबद्दल बोलायचं तर बघूनच जागा झपाटलेल्या आहेत असं वाटतं. बहुतेक चित्रपट वाड्यांमध्ये घडतो. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी असे निर्जन वाडे शोधले जिथे चिटपाखरूही नव्हतं. ते जीर्ण वाडे, करकरणारे दरवाजे, गंजलेली कुलुपे. चित्रपटात छोट्या-छोट्या गोष्टींकडेही पूर्ण लक्ष दिलेलं आहे.

चित्रपटाचा मुख्य हेतू भयनिर्मिती असला तरी नीट पाहिलं तर त्यात त्या काळाच्या अन्यायांचंही चित्रण दिसतं. उदा. विनायक राव (सोहम शाह) याचं नंतरच्या काळातील घर. घरात बायको, तीन मुलं आणि एक रखेल. बायकोची स्थिती एका मोलकरणीपेक्षा वेगळी नाही आणि रखेल  घरावर सत्ता गाजवते आहे. गंमत म्हणजे ती घरात आली तेव्हा परिस्थिती नेमकी उलटी होती. विनायकाचा मुलगा सदाशिव (रुद्र सोनी). हा तुमच्या बॉलिवूड किंवा हॉलिवूडमध्ये नेहेमी मुलं दिसतात तसा निष्पाप, निरागस मुळीच नाही. पौगंडावस्थेतील मुलांच्या मनोव्यापारात डोकावण्याचं धाडस भलेभले दिग्दर्शक करत नाहीत. इथे ते केलंय. स्पिलबर्गचा ‘एम्पायर ऑफ द सन‘ हा एक उल्लेखनीय अपवाद.

इतकी मेहनत करूनही चित्रपटाने केवळ ₹१३.५७ कोटींचा गल्ला जमवला. शिरा पडों हेंच्या तोंडार! आपल्या प्रेक्षकांनी ‘माझिया प्रियाला, मला आणि प्रेक्षकांना काहीच कळेना’ याचे ७६४ भागच बघावेत. सुदैवाने ओटीटीवर हा चित्रपट आहे आणि बराच काळ राहील. पूर्वीच्या चित्रपट पडला की शब्दश: डब्यात जायचा. आता ती वेळ येत नाही.

चांदोबातल्या गोष्टीत राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा माझा जीव चित्रपटात कोणती भाषा बोलत आहेत याकडे लागलेला असतो. कथा मराठी माणसांची, महाराष्ट्रातली तरीही पात्रे हिंदी बोलतात कारण हा हिंदी चित्रपट आहे. बहुतेकवेळा हे वैतागवाणं होतं उदा. गमन हा चित्रपट. पण इथे तसं झालं नाही. एकतर चित्रपट इतक्या पातळींवर उत्कृष्ट आहे की या छोट्याशा तपशीलाबद्दल फारसं काही वाटत नाही. आणि दुसरं म्हणजे चित्रपटात संवाद मुळातच कमी आहेत.

तरीही मराठीत हा चित्रपट कसा वाटला असता हा विचार मनात आल्यावाचून रहात नाही. माझ्या मते आदर्श चित्रपटात प्रत्येक पात्र त्याला नैसर्गिकपणे जी भाषा येते ती बोलेल. ‘दि लोंगेस्ट डे‘ हा असा एक चित्रपट.

श्री. ना. पेंडसेंच्या ‘तुंबाडचे खोत’वरून तुंबाड हा शब्द घेतला आहे. कथा नारायण धारप यांच्या एका कथेवर बेतलेली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी लेखकांना फारसं स्थान मिळालेलं नाही – विजय तेंडुलकर किंवा महेश एलकुंचवार हे सन्माननीय अपवाद. भविष्यात गोनीदा, जयवंत दळवी किंवा जीएंच्या कथा रुपेरी पडद्यावर बघायला मिळतील अशी आशा आहे.