Categories
बुके वाचिते

थोरोचं वाल्डेन

वाल्डेनची खोली अमर्याद आहे असं ऐकल्यानंतर स्वत: नावेतून तळ्याची खोली मोजणारा, वाल्डेनच्या काठी निसर्गाचं निरिक्षण करत तासनतास घालवणारा, उरलेला दिवस मी काहीही केलं नाही असं नि:संकोचपणे सांगणारा, एका झाडाशी आज भेट ठरली आहे म्हणून मैलोनमैल बर्फ तुडवत जाणारा, असा हा थोरो.

प्रत्येक पुस्तक वाचताना येणारा अनुभव वेगळा असतो. अपवाद अर्थातच लेखकरावांनी एकाच लोकप्रिय साच्यामधून काढलेली अनेक पुस्तके. इथेही लेखक कुशल असेल तर दोन घटका खिळवून ठेवतो पण एकदा पुस्तक खाली ठेवलं की त्यातलं फारसं काही आठवत नाही, आठवायचं कारणही नसतं. ग्रिशॅम ते अगाथा ख्रिस्ती यांची पुस्तकं म्हणजे चटकदार भेळेसारखी आहेत. मधून मधून खायला मस्त, पण सकाळ संध्याकाळ नको. याउलट काही पुस्तकं अशी असतात की एकदा वाचल्यानंतर विसरण्याचा प्रश्नच येत नाही. थोरोचं वाल्डेन हे पुस्तक अशातलच एक.

Book cover of Walden

वाल्डेन मॅसेचुसेट्समधलं एक तळं आहे. या तळ्याच्या काठी थोरोनं दोन वर्षे काढली. तिथे एक घर बांधलं, शेती केली, तिथले हिवाळे, उन्हाळे अनुभवले, मनसोक्त वाचन आणि लेखन केलं. या दोन वर्षांच्या अनुभवाचं सार म्हणजे वाल्डेन हे पुस्तक. थोरोच्या बर्‍याच ओळखी आहेत, लेखक, तत्वज्ञ, कवी, निसर्गवादी. पुस्तक वाचताना यांची प्रचिती येतेच, शिवाय त्याचे इतरही गुण समोर येतात. बहुतेक तत्वज्ञ आणि थोरो यांच्यातील एक महत्वाचा फरक म्हणजे थोरो नुसत्या गप्पा न मारता ‘आधी केले, मग सांगितले’ या उक्तीनुसार करून दाखवायचा. त्याच्या वडिलांच्या पेन्सिलीच्या कारखान्यात त्याने संशोधन करून पेटंट मिळवलं होतं. त्यानुसार तयार केलेल्या पेन्सिली ‘थोरो पेन्सिल’ या नावाखाली बरीच वर्षे लोकप्रिय होत्या. वाल्डेनच्या पूर्वार्धामध्ये थोरो घर कसं बांधावं, कोणती पिके घ्यावीत यावर विस्ताराने बोलतो. घर बांधायला त्याला किती खर्च आला, पिकांमधून किती वसुली झाली आणि शिल्लक किती राहिले याचा ताळेबंद देऊन लोकांनी भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा स्वत: घर बांधावं असा सल्ला देतो.

Henry David Thoreau
हेन्री डेव्हीड थोरो. (छायाचित्र विकीवरुन साभार​.)

वाल्डेन वाचताना बरेचदा थोरोची त्या कॉन्कॉर्ड या चिमुकल्या गावात इमर्सनसारख्या समकालीन बुद्धजीवींचा अपवाद सोडला किती कुचंबणा होत असेल असं वाटत राहतं. तो ज्या निगुतीनं निसर्गाचं निरीक्षण करतो, तेच कुतूहल माणसांच्या निरीक्षणाही दिसतं. त्याचं घर नुकत्याच झालेल्या रेल्वेमार्गाच्या जवळच होतं. गावात यायचा-जायचा रस्ता त्याच्या घरावरूनच जात असे. थोरो शेतात काम करत असताना येणारे जाणारे फुकटचे सल्ले देत असत. “काय राव, भुईमुगाचं पीक काय घेऊन र्‍हायले? औंदा बटाटा तेजीमंदे हाय, बक्कळ कमवलं असतं की!” शेतीमागचा थोरोचा हेतू नफ्यापासून कित्येक योजने लांब होता हे त्या शेतकर्‍याला कुणी सांगावं? अशाच माणसांची निरिक्षणे करण्यासाठी तो कधीकधी गावातही जातो. चावडीवर गप्पा मारत असलेले लोक आयुष्य निरर्थक गोष्टीमध्ये वाया घालवत आहेत हे पाहून त्याला आश्चर्य आणि वैषम्य वाटतं.

गावाबाहेर, सगळ्यांपासून वेगळं रहायचा निर्णय का घेतला याच्या कारणांमध्ये थोरोचं एक कारण आहे – त्याला वसंतऋतूचं आगमन जवळून बघायचं होतं. हिवाळ्यात वाल्डेन गोठून जायचं. सगळ्या तळ्यावर बर्फाचा थर साचलेला. मग मार्च किंवा एप्रिलमधल्या एखाद्या सकाळी – किंवा संध्याकाळी रॉबिन पक्षाची लकेर ऐकू यायची. ही वसंतऋतूच्या आगमनाची पहिली हाक ऐकली की ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं थोरोला वाटायचं.

I looked out the window, and lo! where yesterday was cold gray ice there lay the transparent pond already calm and full of hope as in a summer evening, reflecting a summer evening sky in its bosom, though none was visible overhead, as if it had intelligence with some remote horizon. I heard a robin in the distance, the first I had heard for many a thousand years, methought, whose note I shall not forget for many a thousand more—the same sweet and powerful song as of yore.

आणखी काही वर्षांनी भारतातला एक निसर्गवादी कवी पौषाच्या आगमनानं भारावून जाईल आणि म्हणेल,

পৌষ তোদের ডাক দিয়েছে, আয় রে চলে, আ য় আ য় আয়.

थोरो निसर्गवादी आहे पण ‘प्राण्यांवर प्रेम करा’ असा सरळसोट सल्ला तो देत नाही. निसर्गाच्या ‘जीवो जीवस्य जीवनम’ या तत्वामुळे तो प्रभावित होतो. वाल्डेनच्या जंगलात तो शिकार करतो, तळ्यात मासे पकडतो. कधीकधी शिकारीच्या धुंदीत असताना ३०,००० वर्षांपासून चालत आलेल्या प्रेरणांना तो नाकारत नाही. पण त्याचबरोबर बरेचदा हे वागणं हिंस्त्र आहे हे ही त्याला पटतं. आपल्या स्वभावात असलेल्या या विरोधाभासाला तो सहज स्वीकारतो आणि पुस्तकाच्या शेवटी शेवटी त्याचं पारडं सहिष्णुतेकडं झुकतं. आजच्या काळात व्यासंगाची व्याख्या बदललेली आहे. आंतरजालामुळे कोणत्याही नव्या संकल्पनेचं विकी पान वाचलं की पाच-दहा मिनिटात जवळजवळ कुठल्याही विषयात तज्ज्ञ होता येतं. दीडशे वर्षांपूर्वी शेजारच्या गावात काय चाललं आहे हे कळायची मारामार असताना थोरो विष्णुपुराण, भगवद्गीता आणि वेदांताचे संदर्भ देतो. आणि तरीही त्याच्या विचारांमागे नुसतं वाचन नाही तर सखोल मनन आहे हे जाणवत राहतं. “The universe is wider than our views of it.” यासारखी वाक्ये कालातीत आहेत याची खात्री पटते.

पुस्तक आवडल्यानंतर त्याची शिफारस करणं साहजिक आहे पण आजच्या काळात वाल्डेन किती लोकांना आवडेल याबद्दल शंका वाटते. वाल्डेनची शैली काही प्रमाणात जुन्या काळातली आहे. त्यामुळे प्रसंगी पानभर धावणारी लांबच्या लांब वाक्ये, जुन्या इंग्लिशचे काही शब्द, पक्षी, पाने, फुले यांची अपरिचित नावे, या सर्वांना तोंड द्यावे लागते. यात काहीही कूल किंवा हॅपनिंग नाही. त्यात थोरो आस्तिक होता त्यामुळे मधून मधून देवाबद्दलही बोलतो. म्हणजे विज्ञानवादी या पुस्तकावर काट मारणार. (काट मारली तर ठीक आहे, जाळू नये म्हणजे झालं.) विचारांच्या अनुषंगानं थोरो काळाच्या पुढे होता असंही म्हणायाला जीभ कचरते कारण त्याचे काही विचार आजच्या समाजालाही पटण्यासारखे नाहीत. आजच्या फेसबुकच्या जमान्यात नेटवर्किंग हा जगायचा मुख्य उद्देश आहे. केस कापण्यापासून हनीमूनपर्यंत सर्व गोष्टी जगाशी शेअर केल्या नाहीत तर जगणं निरर्थक आहे. माणूस सामाजिक प्राणी आहे या पूर्वापार चालत असलेल्या गृहीतकाला थोरो धुडकावून लावतो. गावातून भेटायची आमंत्रणं आल्यावर तो म्हणतो, “आपण दिवसातून इतक्यांदा भेटतच असतो की, कधी पोस्ट-ऑफिसमध्ये, कधी दुकानात. इतक्या वेळा भेटल्यानंतर आपल्याजवळ एकमेकांना देण्यासारखी नवीन मूल्ये आहेत का याचा विचार आपण कधी करणार? केवळ जनरीत आहे म्हणून असले निरर्थक शिष्टाचार पाळणं यामुळे आपण एकमेकांबद्दलचा आदर गमावतो आहोत.”

थोरोला राहण्यासाठी जमीन इमर्सनने दिली होती. इथे गांधीजींना गरीबीत ठेवण्यासाठी बिर्लांना किती खर्च येत होता हे आठवतं. आजच्या जगात थोरोचे सगळेच विचार पटणं किंवा त्यांना स्वीकारणं शक्य नाही. पण विचार पटले नाहीत तरीही काही काळ वेगळ्या बाजूनं विचार करून बघणं हे ही आवश्यक असतं. मात्र वाल्डेनच्या बाबतीत त्याची अमाप प्रसिद्धीच कदाचित हानीकारक ठरेल की काय अशी शंका येते. दीडशेव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत जॉन अपडाइक म्हणतो, “…the book itself risks being as revered and unread as the Bible.”

वाल्डेनची खोली अमर्याद आहे असं ऐकल्यानंतर स्वत: नावेतून तळ्याची खोली मोजणारा, वाल्डेनच्या काठी निसर्गाचं निरिक्षण करत तासनतास घालवणारा, उरलेला दिवस मी काहीही केलं नाही असं नि:संकोचपणे सांगणारा, एका झाडाशी आज भेट ठरली आहे म्हणून मैलोनमैल बर्फ तुडवत जाणारा, असा हा थोरो. अमेरिकेतील श्रेष्ठ लेखकांमध्ये याची गणना होते, मात्र नंतरच्या अमेरिकेने आपल्या संस्कृतीमध्ये थोरोचे विचार अंगिकारल्याची कोणतीही खूण दिसत नाही. रेल्वेच्या आगमनामुळे काहीशा व्यथित झालेल्या थोरोवर आज कदाचित luddite हे लेबल चिकटण्याची शक्यता आहे. पण थोरोचा विरोध हा आंधळा विरोध आहे असं वाटत नाही. आपण जी प्रगती करतो आहोत तिचा अंतिम उद्देश काय आहे यात त्याला जास्त रस आहे. तंत्रज्ञान हे साधन आहे, साध्य नाही. पण मग साध्य काय आहे हे शोधण्याचा तो प्रयत्न करतो. आजच्या अमर्याद स्पर्धेच्या आणि बेहिशेबी शॉपिंगच्या जगात थोरोचे विचार अंतर्मुख करायला लावणारे आहेत.

हे विचार किती लोकांना पटतील माहीत नाही. ज्याला रूचतील, पटतील आणि पचतील त्याने घ्यावेत. पुस्तक इथे उपलब्ध आहे.

—-

१. शंभर वर्षांनी आलेला हेमिंग्वे याच्या उलट होता. तो छोटी वाक्ये लिहायचा. काही वाक्ये. छोटी. काही शब्द. तुटक. आणि कथानक, त्रोटक. तरीही प्रभावी.