वर्णभेदाच्या वास्तवाचे प्रभावी चित्रण – द हेल्प

इतिहास बरीच गुंतागुंतीची गोष्ट आहे. जेव्हा एखादी क्रांतीकारक घटना घडते तेव्हा तिची इतिहासात कोरडी नोंद असते. इतिहास कोण लिहीतो यावर त्या नोंदीचे स्वरूप अवलंबून असते मात्र त्यात इतर आयामांना फारशी जागा नसते. त्या घटनेचे तिथल्या लोकांवर काय परिणाम झाले, त्यांचे रोजचे आयुष्य यामुळे कसे बदलले यावर इतिहास बहुतेक वेळा मौनच बाळगतो. कोरड्या नोंदींच्या ओळींमध्ये हजारो…

इतिहास बरीच गुंतागुंतीची गोष्ट आहे. जेव्हा एखादी क्रांतीकारक घटना घडते तेव्हा तिची इतिहासात कोरडी नोंद असते. इतिहास कोण लिहीतो यावर त्या नोंदीचे स्वरूप अवलंबून असते मात्र त्यात इतर आयामांना फारशी जागा नसते. त्या घटनेचे तिथल्या लोकांवर काय परिणाम झाले, त्यांचे रोजचे आयुष्य यामुळे कसे बदलले यावर इतिहास बहुतेक वेळा मौनच बाळगतो. कोरड्या नोंदींच्या ओळींमध्ये हजारो आयुष्ये, भावना, आशाआकांक्षा दडलेल्या असतात, त्यांना एखाद वेळेस वाट मिळते ती साहित्याकडून. समर्थ लेखक या ओळींमध्ये आपल्या मनाचे रंग भरतो आणि आपल्याला त्या काळचा काल्पनिक का होईना पण अनुभव घेता येतो.

‘गॉन विथ द विंड’ मध्ये मार्गारेट मिशेलचा फोकस स्कार्लेट ओ हारा आणि र्‍हेट बटलर यांच्यावर आहे. त्यांच्या आयुष्यातील नाट्यमय घटना बघताना इतर पात्रांकडे साहजिकच दुर्लक्ष होते. पण समजा लेन्स बदलली आणि कॅमेरा फिरवला तर त्यात डिल्सी किंवा प्रिसी दिसतील. त्यांना काय म्हणायचे आहे? त्यांच्या आयुष्यात काय होते आहे? याचे उत्तर देण्याचा एक प्रयत्न कॅथेरिन स्टॉकेटने ‘द हेल्प’ या पुस्तकात केला आहे.

Book cover for The Help

गोष्ट सुरू होते अमेरिकेत, मिसिसिपी राज्यात, ऑगस्ट १९६० मध्ये. कापसाच्या शेतात काम करणार्‍या किंवा गोर्‍या अमेरिकनांच्या घरात मेड सर्व्हंट म्हणून काम करणार्‍या कृष्णवर्णीय बायका. प्रमुख पात्रे तीन. एबिलीन आणि मिनी या दोन नोकराण्या आणि मिस स्कीटर ही गोरी मुलगी. निवेदन या तिघींच्या दृष्टीकोनातून होते. कथा बघायला गेले तर साधी आहे. मिस स्कीटरला लेखिका व्हायचे आहे. नवोदित लेखक ज्या सर्व असुरक्षित आंदोलनांमधून जातात त्यातून ती ही जाते आहे. आई लग्नासाठी मागे लागली आहे. एक दिवस योगायोगाने तिचा एका प्रसिद्ध प्रकाशनाच्या संपादिकेशी संपर्क होतो. तिच्या सूचनेनुसार मिस स्कीटर तिला ज्याबद्दल मनापासून लिहावेसे वाटते आहे असा विषय शोधायला लागते. असुरक्षित वाहतूक, गुन्हेगारी असे नेहेमीचे विषय रद्द केल्यानंतर अखेर तिला एक विषय सापडतो – मेड सर्व्हंट म्हणून काम करणार्‍या बायकांना सद्य परिस्थितीबद्दल काय वाटते? परिस्थिती बदलावी किंवा बदलू शकेल अशी आशा त्यांच्या मनात आहे का?

इथे लेखिकेची कादंबरीच्या कालाची निवड किती अचूक आहे हे दिसते. गॉन विथ द विंड प्रमाणे अठराशेमध्ये ही कादंबरी बेतली असती तर अजिबात टिकली नसती. १९६० ते १९६२ या काळात अमेरिकेत आणि विशेषत: मिसिसिपीमध्ये वंशभेदाच्या संदर्भात क्रांतीकारक घटना घडल्या. कृष्णवर्णीय हक्कांच्या संघटनेचा सचिव मेडगर एव्हर्स याची मिसिसिपीमध्ये हत्या, जेम्स मेरेडिथ या पहिल्या कृष्णवर्णीय विद्यार्थ्याला न्यायालय आणि नंतर खुद्द अध्यक्ष केनेडी यांच्या हस्तक्षेपानंतर मिसिसिपी विद्यापीठात प्रवेश, मार्टिन लूथर किंग ज्युनियर यांचे समान हक्कांसाठी आंदोलन, राष्ट्राध्यक्ष केनेडी यांची हत्या या सर्व घटनांमुळे परिस्थिती वेगाने बदलत होती. कॅथेरिनने या सर्व घटनांचा कथानकाला वेग देण्यासाठी किंवा वळण देण्यासाठी सुरेख उपयोग करून घेतला आहे. कॅथेरिनचे लहानपण मिसिसिपीमध्ये गेले. तिची काळजी घेण्यासाठी जी मेड होती तिच्याशी कॅथेरीन तासनतास गप्पा मारत असे. कथेतील एबिलीनचे पात्र या मेडवर आधारित आहे तर मिस स्कीटर बरीचशी कॅथेरीनवरच बेतलेली आहे. रोजच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीमध्ये वर्णभेद किती खोलवर रूजलेला होता याचे सुरेख चित्रण कॅथेरिनने केले आहे. याचा परिणाम म्हणजे संपूर्ण कादंबरी वाचताना कोणत्याही क्षणाला याचा विसर पडत नाही. ही कादंबरी वर्णभेदाच्या पार्श्वभूमीवर आधारलेली आहे असे म्हणणे तितकेसे बरोबर होणार नाही कारण प्रत्येक पानावर वर्णभेद पार्श्वभूमीत न राहता तुमच्या अंगावर येतो. यामुळेच तीन बायकांची गोष्ट असूनही आणि कोणत्याही पुरूष पात्राला फारसा वाव नसतानाही कादंबरी चिक लिट किंवा फेमिनिस्ट लिटरेचर अशा कप्प्यांमध्ये अडकून पडत नाही. तिचा कॅनव्हास विस्तृत होतो.

त्या काळातील वर्णभेदाचे सर्वव्यापी स्वरूप बघताना अंगावर काटा येतो. कृष्णवर्णीयांना स्वतंत्र स्वच्छतागृहे दिली जात कारण त्यांच्यामुळे विविध प्रकारच्या रोगांचा संसर्ग होतो असा समज होता. याच काळात रोझा पार्क्सच्या आंदोलनामुळे किमान बसमध्ये बसण्याची जागा मिळू लागली. चित्रपटगृहे, हॉटेल, बागा, दुकाने अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांची विभागणी कशी करावी यासाठी जिम क्रो या इसमाने कायदे बनवले होते. यांना जिम क्रो लॉज म्हणून ओळखले जाते. हे कायदे वाचनीय आहेत. उदा.

Books shall not be interchangeable between the white and colored schools, but shall continue to be used by the race first using them.

It shall be unlawful for a white person to marry anyone except a white person. Any marriage in violation of this section shall be void.

अशा परिस्थितीमध्ये आंतरवंशीय विवाह अशक्य गोष्ट होती. यातही किती प्रकारच्या गुंतागुंती होऊ शकतात याची चूणूक कादंबरीमध्ये बघायला मिळते. एबिलीनला कापसाच्या शेतामध्ये काम करणार्‍या एका कृष्णवर्णीय तरूणापासून दिवस जातात. पण त्याच्या वंशामध्ये कुणीतरी श्वेतवर्णीय असते कारण मुलगी श्वेतवर्णीय निघते. वडीलांनी जबाबदारी नाकारलेली, अशा परिस्थितीमध्ये अबिलीनला मुलीचा त्याग करण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही. कृष्णवर्णीय जोडप्याबरोबर श्वेतवर्णीय मुलगी दिसली तर काहीतरी काळेबेरे आहे असे समजून पोलिस अटक करण्याची शक्यता जास्त. जरी रंग गोरा असला तरी आईवडील गोरे नाहीत त्यामुळे गोर्‍यांचे अनाथालय मिळणेही अशक्य. शेवटी अबिलिन तिला कृष्णवर्णीय अनाथालयात दत्तक दाखल करते.

कादंबरीमध्ये मिस स्कीटरला प्रकाशक मिळण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागत नाही पण प्रत्यक्षात कॅथेरिनच्या बाबतीत याच्या उलट झाले. कॅथेरिनची ही पहिलीच कादंबरी. ९/११ च्या दुसर्‍या दिवशी सगळे ठप्प असताना तिने ही लिहायला घेतली. तब्बल ६० प्रकाशकांनी ही कादंबरी साभार परत पाठवली. अखेर ६१ व्या प्रकाशिकेला ती पसंत पडली. द हेल्प १०० हून अधिक आठवडे न्यू यॉर्क टाइम्सच्या बेस्ट सेलर लिस्टवर होती. यावर आधारित चित्रपट येत्या ऑगस्टमध्ये प्रदर्शित होईल असा अंदाज आहे.