स्टार ट्रेक : फर्स्ट कॉन्टॅक्ट

सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये थोडेसे चित्रपट मनोरंजन हा मुख्य हेतू न बाळगता मुळापासून काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. बाकी चित्रपटांमध्ये मनोरंजन हा मुख्य हेतू असतो आणि तो बरेचदा पूर्ण होतो. कधीकधी मात्र मनोरंजनाच्या वरच्या पातळीखाली आणखी काहीतरी सापडतं आणि मग लहानपणी झाडाझुडपात खेळताना एखादी गोटी मिळाल्यावर जसं वाटावं तसं वाटतं. ‘मेन इन ब्लॅक’ हा खरं तर पूर्णपणे धंदेवाईक चित्रपट. पण बारकाईनं पाहिलं तर काही आणखी काहीतरी सापडतं. संपूर्ण चित्रपटात विल स्मिथचं पात्र हे एकमेव कृष्णवर्णीय पात्र आहे. हा संदर्भ लक्षात घेतला तर मेन इन ब्लॅकच्या नियमावलीला – You don’t exist; you were never even born. Anonymity is your name. Silence your native tongue” एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. पृथ्वीवरील गुप्तपणे राहणाऱ्या परग्रहवासियांकडे अमेरिकेतील बेकायदेशीर इमिग्रंट्स या दृष्टीनेही बघता येतं. चित्रपट मनोरंजक असला तरी त्यात एक ‘सबटेक्स्ट’ आहे हे जाणवतं.

Star Trek First Contact poster

स्टार वॉर्स किंवा स्टार ट्रेक बघताना अपेक्षा वाढतात कारण एक तर त्यांचा इतिहास. हॅडफिल्ड आणि बझ्झ ऑल्ड्रीनसारख्या खऱ्याखुऱ्या अंतराळविरांनाही हे आकर्षण टाळता येत नाही. आणि दुसरं म्हणजे नुसत्या ऍक्शनव्यतिरिक्त त्यातून मिळणारं आणखी काही. हे आणखी काहीतरी म्हणजे नक्की काय? याची नुसती यादी देण्यापेक्षा कदाचित स्टार ट्रेकच्या एखाद्या आवडलेल्या चित्रपटाबद्दल बोललं तर मुद्दा अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट होऊ शकेल. शिवाय ज्यांचा स्टार ट्रेकच्या जुन्या चित्रपटांशी परिचय नाही त्यांना यातून काहीतरी मिळेल अशीही अपेक्षा आहे. स्टार ट्रेकचा ‘रॅथ​ ऑफ खान’ मालिकेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो. मला ‘रॅथ​ ऑफ खान’इतकाच नंतर आलेला ‘फर्स्ट कॉन्टॅक्ट’ही आवडतो. स्टार ट्रेक चित्रपटांमध्ये अभिनय करायला जास्त वाव नसतो आणि तो समर्थपणे करतील असे अभिनेतेही नसतात. पॅट्रिक स्ट्युअर्ट हा मात्र ठळक अपवाद. स्टारशिप एन्टरप्राइजचा कॅप्टन म्हणून कर्कची जागा घेताना स्ट्युअर्टने विचारपूर्वक त्याची इमेज तयार केली. कर्कचा नायक जुन्या पिढीतील जॉन वेन वगैरेंच्या रांगेत बसेल असा होता. स्ट्युअर्टने ज्यां लुक पिकार्डचं पात्र रंगवताना अंडरप्लेवर भर दिला. ‘फर्स्ट कॉन्टॅक्ट’चे दिग्दर्शन रायकरच्या भूमिकेत असलेला सहाय्यक अभिनेता जोनाथन फ्रेकस याने केले. फ्रेकसची दिग्दर्शन शैली पिकार्डच्या अभिनयाला पूरक आहे. जेव्हा ऍक्शन प्रसंग नसतात तेव्हा कॅमेरा कमीत कमी हालचालींमध्ये प्रसंग टिपत असतो. यामुळेच जेव्हा ऍक्शन सुरू होते तेव्हा ती अधिक प्रभावीपणे जाणवते. यातील स्पेशल इफेक्ट आताइतके नेत्रदीपक नसले तरीही तकलादू न वाटण्याइतके सफाईदार आहेत.

‘फर्स्ट कॉन्टॅक्ट’मध्ये पिकार्डचा सामना बोर्गशी होतो. बोर्ग नेहमीच्या शत्रूंपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. यंत्रमानव आणि सजीव यांच्या सीमारेषेवर असलेल्या बोर्गची जाणीव ही एका जीवात मर्यादित नसून सर्व जीवांमध्ये सामायिक आहे. ‘कलेक्टिव्ह कॉन्शसनेस’ असलेल्या बोर्गचे वैशिष्ट्य म्हणजे ते शत्रूला मारत नाहीत तर आपल्यात सामावून घेतात. हे झाल्यानंतर त्याचे स्वतंत्र अस्तित्व समाप्त होते, सामावून घेतलेल्या जीवाची जी वैशिष्ट्ये आहेत ती आता बोर्गची होतात. बोर्गच्या यानाचा पाठलाग करत असताना पिकार्ड आणि सहकारी टाइम वॉर्पमध्ये सापडतात आणि चोविसाव्या शतकातून ४ एप्रिल २०६३ मध्ये जाऊन पोचतात. पृथ्वीला परग्रहवासियांनी भेट देण्याच्या आधीचा हा दिवस – द डे बिफोर फर्स्ट कॉन्टॅक्ट. ५ एप्रिलला झेफ्रम कॉक्रन या शास्त्रज्ञाने पहिल्या वॉर्प ड्राइव्हचे यशस्वी उड्डाण केले. त्याचवेळी पृथ्वीजवळून जाणाऱ्या परग्रहवासियांनी हे पाहिले, इथे प्रगत सजीव राहतात हे कळल्यावर ते पृथ्वीवर आले. त्यांच्या सहकार्याने पृथ्वीची भरभराट झपाट्याने झाली. बोर्ग यानातून टॉर्पीडोंचा मारा करून कॉक्रनची प्रयोगशाळा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. एन्टरप्राइज बोर्गचे यान उद्ध्वस्त करते पण त्याआधी बोर्ग गुप्तपणे एन्टरप्राइजवर येऊन पोचतात. आता पिकार्डसमोर दोन आव्हाने असतात. पृथ्वीवर जाऊन कॉक्रनच्या वार्प ड्राइव्हचे उड्डाण यशस्वी करणे आणि यानावर आलेल्या बोर्गची विल्हेवाट लावणे. जुन्या स्टार ट्रेक चित्रपटांचे साहित्यिक संदर्भ नेहमी रोचक असतात. ‘अनडिस्कव्हर्ड कंट्री’मधील खलनायक वेळोवेळी शेक्सपिअरपासून कॉनन डॉयलपर्यंतच्या ओळी उद्धृत करत असतो. यानावर पिकार्ड आणि पृथ्वीवरील एक रहिवासी लिली यांच्या मागे बोर्ग लागलेले असताना पिकार्ड एक अभिनव शक्कल लढवतो. यानावर कोणत्याही कादंबरीचं होलोग्राफिक प्रोजेक्शन करायची सोय असते. पिकार्ड आणि लिली रेमंड शॅंडलरच्या ‘द बिग गुडबाय’ कादंबरीत जातात. त्यांच्या पाठलागावर असलेल्या बोर्गना तिथून मिळालेल्या मशीनगनच्या साहाय्याने मारतात.

या दरम्यान यंत्रमानव डेटा बोर्गच्या हाती सापडतो. डेटाचं पात्र रोचक आहे. माणसासारखं वागता येणं हे त्याचं अंतिम ध्येय आहे. यासाठी त्याच्या मेंदूत एक इमोशन चिपसुद्धा बसवलेली आहे. डेटाकडून बोर्गना यानाची माहिती हवी आहेच, पण त्याचबरोबर डेटाला आपल्यात सामावून घेणे हे ही त्यांचे ध्येय आहे. बोर्गचा ‘कलेक्टिव्ह कॉन्शसनेस’ बोर्गच्या राणीमध्ये केंद्रित झाला आहे. ही राणी आणि डेटा यांच्यात जो संवाद होतो तो न्युरोसायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोन्ही क्षेत्रांत सध्या चाललेल्या घडामोडींचे प्रतिबिंब आहे. बोर्ग राणीचं म्हणणं आहे की मुळात माणूस परिपूर्ण नसल्यामुळे डेटाचं ध्येयच चुकीचं आहे. उलट माणूस जे देऊ शकत नाही ते डेटाला बोर्गकडून मिळू शकतं. याचं उदाहरण म्हणून बोर्ग डेटाच्या हातावर त्वचा चढवतात. माणसाला त्वचेमुळे ज्या संवेदना होतात तशाच संवेदना डेटाला अनुभवता येतात. पण त्याचबरोबर त्या त्वचेला इजा झाली तर त्याला वेदनाही होतात. यालाच डॉ. रामचंद्रन ‘क्वालिया’ म्हणतात.

यानावरून काही लोक कॉक्रनला मदत करायला पृथ्वीवर गेलेले असतात. त्यांच्या दृष्टीने कॉक्रन म्हणजे ज्याने वार्प ड्राइव्हचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं आणि ज्याच्यामुळे स्टार ट्रेक शक्य झालं असा जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ. त्याला प्रत्यक्ष पाहून ते भारावून गेलेले असतात. प्रत्येक जण त्याच्याशी हात मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे भविष्यातील जगात जी क्रांती झाली ती त्याला सांगायला प्रत्येक जण उत्सुक असतो. कॉक्रन बराच वेळ हे सहन करतो आणि शेवटी न राहवून रायकरला म्हणतो, “तुमच्या माझ्याबद्दल ज्या काही कल्पना आहेत – मी व्हिजनरी आहे वगैरे – त्या कुठून आल्या मला ठाऊक नाही. पण मी हे सगळं का केलं माहीत आहे का? पैशासाठी. मला भरपूर पैसे कमावून उरलेलं आयुष्य सुखात काढायचं होतं. मानवजातीच्या भविष्यामध्ये मला काडीचाही रस नाही.”

चित्रपटाचा उच्च बिंदू पिकार्ड आणि लिली यांच्या एका प्रसंगात येतो. बोर्गनी यानाचा बराचसा भाग ताब्यात घेतल्यावर एकच उपाय असतो. छोट्या यानांमधून पृथ्वीवर जाणे आणि स्टारशिप उद्ध्वस्त करणे. याला सर्व सहकाऱ्यांचा पाठिंबा असूनही पिकार्ड ठाम नकार देतो. शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहून स्टारशिपचे रक्षण करा असा आदेश देतो. यावरून लिलीसोबत त्याची बरीच वादावादी होते. शेवटी लिली त्याला म्हणते, “Captain Ahab has to go to hunt his whale.” ते ऐकल्याबरोबर पिकार्डला झटका बसतो. मेलव्हिलच्या ‘मोबी डिक’ कादंबरीतील नायक कॅप्टन एहॅब ज्या पांढऱ्या व्हेलमुळे त्याला अपंगत्व आले त्याचा पाठलाग करण्यात आयुष्य घालवतो आणि शेवटी यातच त्याचा अंत होतो. एकोणिसावे शतक असो की चोविसावे, माणसाच्या आदिम भावना बदलत नाहीत.

“And he piled upon the whale’s white hump the sum of all the rage and hate felt by his whole race. If his chest had been a cannon he would have shot his heart upon it.”

—-

१. याउलट नुकत्याच आलेल्या ‘इन्टु द डार्कनेस’ची आणखी एक वैताग आणणारी गोष्ट म्हणजे अब्राम्सची दिग्दर्शन शैली. हिला नक्की काय म्हणायचे कल्पना नाही कारण ही नुसती ‘शेकी कॅमेरा’ ची हालचाल नाही. शेकी कॅमेरा बऱ्याच लोकांनी वापरला आहे – सत्यजित रेंनी ‘प्रोतीद्वांदी’मध्ये किंवा स्पिलबर्गने ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’मध्ये. अब्राम्स जे करतो ते काहीतरी वेगळंच आहे. उदा. ‘इन्टु द डार्कनेस’ मध्ये एक प्रसंग आहे. स्कॉटी गुडघ्यांवर बसून दाराच्या कडीला दोरी बांधतो आहे. वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी हा प्रसंग त्यांच्या शैलीत चित्रित केला असता. मिड-शॉटमध्ये कॅमेरा स्थिर ठेवून, हातांचे क्लोज-अप आणि मिड-शॉट यांचे एकत्रीकरण करून वगैरे. अब्राम्सचा कॅमेरा एकाच शॉटमध्ये एकदा त्याचा चेहरा आणि एकदा हात अशा वरखाली उठाबशा काढत बसतो. बहुधा एखादा माणूस बघत असेल तर त्याची नजर जशी फिरेल तशी ही शैली म्हणता यावी. पण पडद्यावर बघताना हा प्रकार प्रचंड इरिटेटिंग वाटला.