शंकर-जयकिशन

बरेचदा असं दिसतं की भारतीय दिग्दर्शक आधी परदेशात लोकप्रिय होतात, आणि मग त्यांना इथे मान्यता मिळते. सत्यजित रेंच उदाहरण प्रसिद्धच आहे, गुरूदत्तला तिकडे प्रसिद्धी मिळाल्यानंतर बर्‍याच लोकांना त्याच्या महानतेचा शोध लागला. पण इथेही एक गंमत आहे. तिकडची प्रसिद्धी कोणत्या स्तरावर मिळते यावर बरंच काही अवलंबून असतं. तिकडच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिक वगैरे मिळालं तर इकडे मान्यतेचा शिक्का लगेच बसतो. पण जर तिकडेही तुमची प्रसिद्धी सामान्य लोकांमध्ये असेल तर त्याला इथे फारशी किंमत दिली जात नाही. याची अनेक उदाहरणे देता येतील – एक प्रमुख उदाहरण आहे राज कपूरचं. पहिल्यापासून राज कपूरला रशिया, आखाती देश इत्यादी ठिकाणी भरपूर लोकप्रियता मिळाली. ‘आवारा’ आणि ‘बूट पॉलिश’ साठी कॅन चित्रपट महोत्सवात नामांकन देखील मिळालं होतं. असं असूनही भारतातील उल्लेखनीय दिग्दर्शकांची यादी जेव्हा केली जाते तेव्हा त्यात राज कपूरचं नाव दिसत नाही. कशी गंमत आहे बघा. समीक्षक रशियन दिग्दर्शक आयझेन्स्टाइनला मानाचं स्थान देतात. आयझेन्स्टाइन ज्या मातीतून आला, ज्या प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतलं त्याच प्रेक्षकांनी राज कपूरलाही पसंत केलं.

‘आवारा’ आजच्या काळात रुचणं कठीण असलं तरी त्या वेळची परिस्थिती बघता दिग्दर्शन आणि कॅमेरा यांच्यात दाखवलेल्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते. (‘घर आया मेरा परदेसी’चा ड्रीम सीक्वेन्स त्या काळात अविश्वसनीय होता.) त्याचबरोबर त्याने नेहमी समाजातील ज्वलंत विषय निवडले हे ही खरं. (‘आवारा’, ‘श्री ४२०’ मध्ये भ्रष्टाचार, गुन्हेगारी किंवा ‘प्रेम रोग’मध्ये विधवा विवाह इ.) खरं तर ‘आवारा’ रशियात इतका लोकप्रिय का झाला याचं मला नेहमी नवल वाटतं. आजच्या पेक्षा त्या काळात पब्लिसिटी इ. वर अनेक मर्यादा होत्या. शिवाय परकीय संस्कृती, भाषा, मध्येच कधीही न ऐकलेल्या ताल-सुरांमध्ये लोक गाणी गात आहेत किंवा नाचत आहेत. हे सर्व असूनही ‘आवारा’ला रशियामध्ये अपूर्व यश मिळालं. एक दोन कारणं दिसतात. ‘आवारा’चा मुख्य गाभा आहे – ‘रोटी’. माणसाच्या अगदी मूलभूत गरजांमधली एक. त्या काळात कम्युनिस्ट रशियामध्ये जी हलाखीची परिस्थिती होती ती लक्षात घेता रशियन प्रेक्षकांना ‘रोटी’साठी गुन्हेगारीच्या मार्गावर जाणारा नायक आतमध्ये भिडला. दुसरं म्हणजे रशियन संस्कृती बर्‍यापैकी मोकळी-ढाकळी आहे. ब्रिटिश किंवा इतर युरोपियन देशांमध्ये जे अनेक शिष्टाचार प्राणांपलीकडे पाळले जातात ते प्रमाण रशियात कमी आहे. भारतीयांमध्येही हा गुण दिसतो. या दोन संस्कृतीमधला अनौपचारिकपणा कदाचित समान धागा ठरला असावा.

हिंदी गाणी आपल्या जनमानसात किती खोलवर रुजली आहेत याची एक प्रचिती हवी असेल तर विविधभारती ऐकावं. भारतात आजही लाखो लोक आहेत ज्यांचं रेडिओ हे मनोरंजनाचं मुख्य साधन आहे. हातावर पोट असणारे, छोट्या दुकानांचे मालक, आडगावातील विद्यार्थी आणि सर्वात मोठा वर्ग म्हणजे सीमेवरचे जवान – आपल्या आवडत्या गाण्याची फर्माइश हे सर्व लोक आवडीनं करतात आणि यात सैगलपासून रेहमानपर्यंत सर्वांची गाणी असतात. हे पाहिलं की कधीकधी इथे ब्लॉगवर जे लिहिलं जातं ते अल्पसंख्य वाचकांसाठी आहे हे लक्षात येतं. (इथे ‘गांधी’ चित्रपटातील संवाद आठवतो, “भारत का मतलब है खेतों मे काम करनेवाला हर एक किसान, न कि बंबई और दिल्ली के कुछ गिने-चुने वकील.” बाय द वे, ‘गांधी’चं हिंदी रूपांतर किती सुरेख केलं आहे! संवाद कुणाचे आहेत लक्षात नाही पण कुठेही हा अनुवाद आहे असं जाणवत नाही.) याबरोबरच पुणे-मुंबईसारख्या शहरातदेखील हिंदी गाणी आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत आणि म्हणूनच आपल्या चित्रपटांचाही.

राज कपूरच्या परदेशातील लोकप्रियतेचा इतका अनुल्लेख का होतो? एक कारण असं दिसतं की लोकप्रियता म्हणजे टाकाऊ दर्जा असं समीकरण फक्त इथेच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. अर्थात हे समीकरण उच्चभ्रू समीक्षक आणि कलाकारांमध्ये प्रचलित आहे, सामान्य प्रेक्षक बिचारे जे आवडेल, रुचेल, पचेल ते बघतात. ‘लोकप्रिय ते सवंग’ अशा अर्थाची विधानं भल्याभल्यांनी केली आहेत. त्यात भर म्हणजे आपण हिंदी चित्रपटांबद्दल बोलतो आहोत. हिंदी चित्रपट म्हणजे नाच-गाण्यांनी भरलेला एक बिनडोक प्रकार असं गृहीतक असेल तर पुढे बोलायला फारशी जागा उरत नाही. खरं तर परदेशात ‘म्युझिकल’ नावाचा कलाप्रकार असतो तसंच व्यावसायिक हिंदी चित्रपट हा एक वेगळा कलाप्रकार मानायला हवा. समीक्षा करताना त्या प्रकारच्या चित्रपटांच्या बलस्थानांचा विशेष विचार व्हायला हवा.

फक्त भारतच नव्हे, तर इतर देशातील सामान्य जनतेनेही हिंदी चित्रपट गाण्यासकट स्वीकारला. याचं एक सुरेख उदाहरण नुकतंच बघायला मिळालं. ६० वर्षे उलटून गेली तरी ‘आवारा हूं’ गाणं टोरांटोपासून तुर्कस्थानापर्यंत अजूनही जिवंत आहे. विक्रम सेठनेही ‘फ्रॉम हेवन्स लेक’ पुस्तकात तिबेट-चीन सीमा पार करताना या गाण्याने अनेक वेळा अडचणीत हात दिल्याचं नमूद केलं आहे. हे बघितलं की वाईट वाटतं. राज कपूरला त्याच्या कामामुळे जगभर प्रसिद्धी मिळाली – ‘गार्डीयन’ किंवा ‘न्यू यॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’मध्ये त्याच्यावर लेख आले नाहीत आणि येणारही नाहीत – पण समीक्षकांची त्याला कधीच फिकीर नव्हती. सामान्य लोकांना त्याचे चित्रपट मनापासून आवडले आणि त्याची पावती आजही त्याला मिळत आहे. पण इतर कलाकारांचं काय? बिचारे शंकर-जयकिशन कुणाला आज आठवतही नाहीत. कधी चर्चा झालीच तर एक त्या कुठल्यातरी साईटचा दाखला देऊन त्यांनी किती चाली चोरल्या यांची यादी देण्यात येते आणि सगळे हिंदी चित्रपट संगीतकार चोर असं तात्पर्य काढण्यात येतं. आज ६० वर्षांनंतरही त्यांच्या चाली जिवंत आहेत याचा अर्थ संस्कृतींना भेदून जाणारं त्यात काहीतरी आहे. (अभिजात कलाकृतीची व्याख्या काय हो?) पण आज याची दखल घेणारे फार थोडे आहेत. जुन्या पिढीतील लोक आजही त्यांच्या आठवणी काढतात पण त्यांच्या संगीताचं निष्पक्ष मूल्यमापन करणारी समीक्षा युनिकॉर्नइतकी दुर्मिळ आहे. कारण एकदा हिंदी चित्रपट भिकार असं ठरवलं की त्यातल्या संगीताकडे कोण बघणार? आणि राज कपूरमुळे किमान शंकर-जयकिशनची ओळख जगाला झाली. सैगलपासून खय्यामपर्यंत बाकीच्या अनेक संगीतकारांचं काय? पुढच्या शतकात त्यांची कुणाला आठवणही नसेल.

या सर्वांच्या मुळाशी कलेतील जातिभेद आहे. यावर आधीही लिहून झालं आहे. कलेच्या क्षेत्रात रोज नवे आविष्कार होतच असतात. काहींना हे नवे आविष्कार अधिक भावतात, काहींना जुने. नेहमीप्रमाणे आम्ही कुंपणावर. सगळ्यांचं म्हणणं ऐकून जे भावतं त्याला डोक्यावर घेणारे. मुराकामी वाचला तेव्हा हा कुठल्या प्रकारात बसतो याची कल्पनाही नव्हती आणि माहीत करून घ्यायची गरजही पडली नाही. ज्याला जे आवडतं ते त्यानं घ्यावं पण इतरांना अमुक आवडतं याचा अर्थ त्यांची अभिरुची हीन असं सामान्यीकरण व्हायला लागलं की अडचण येते. याहूनही पुढे जाऊन काही लोक अमुक कलाप्रकार सर्वात श्रेष्ठ, आधी जे काही झालं ते चुलीत घाला अशा आरोळ्या मारायला लागतात तेव्हा प्रकरण गंभीर होतं.

‘लिव्ह अँड लेट लिव्ह’ ही उक्ती कलाक्षेत्रात (खरं तर सगळीकडेच) येईल तो सुदिन.