शब्दांच्या पलिकडले

दोन दिवसांपूर्वी शुक्र ग्रहाचं सूर्यावर ‘अधिक्रमण’ होत असल्याच्या बातम्या, फोटू सगळीकडे झळकले. ही घटना आपल्या आयुष्यात परत घडणार नाही कारण परत असा योग २११७ मध्ये येणार आहे. वर्तमानपत्र, फेसबुक, ट्विटर सगळीकडे बातम्यांची लयलूट चालू होती. आणि च्यानेलवाले तर काय पाट बांधून तयारच असतात. सर्वसाधारणपणे अशा घटना किंवा ग्रहणं निर्विवादपणे लोकप्रिय असतात.

ग्रहण पहिल्यांदा बघण्याचा अनुभव निश्चितच रोमांचकारी असतो. लहानपणी खग्रास सूर्यग्रहण पहिल्यांदा पाहिलं होतं ते अजूनही लक्षात आहे. भर दुपारी काही काळ चांदण्या रात्रीचा अनुभव अविस्मरणीय होता. नंतर बरीच ग्रहणं पाहीली (आकाशातली आणि जमिनीवरचीही), तेव्हापासून ग्रहणांचं आकर्षण कमी झालं. आता तर कोणतेही प्रयत्न न करता ग्रहण दिसणार असेल तरच बघतो, त्यासाठी वाट वाकडी करून कुठे जाणं म्हणजे वेळेचा अपव्यय वाटतो. त्यातही सूर्यग्रहण खग्रास असेल तर ते होत असताना मला सूर्यापेक्षा जमिनीवरचा प्रकाशाचा खेळ बघायला अधिक आवडतो. ( हे म्हणजे पी. सी. सरकार स्टेजवर एका माणसाचे दोन तुकडे करण्यात तल्लीन झालेले आहेत, लोक आ वासून बघत आहेत आणि आपलं सगळं लक्ष मात्र त्यांच्या आशिष्टनकडे – असा प्रकार झाला.) ग्रहणांमध्ये खंडग्रास असेल तर सूर्याचा चतकोर तुकडा तोडलेला बघायला फारशी मजा येत नाही. मात्र कंकणाकृती सूर्यग्रहण असेल तर सूर्याची शेवटी जी अंगठी होते (माय प्रेशस!) ती बघायला छान वाटते.

अशा पार्श्वभूमीवर शुक्र सूर्यावरून जाण्याचं फारसं काही वाटलं नाही. लोकांना याचं खूप अप्रूप आहे हे ही दिसलं आणि ही तफावत का याचा शोध घ्यावासा वाटला. काही चित्रं पाहिली, व्हिडो बघितले. तरीबी काय फरक नाय पडला! अधिक्रमणाची जितकी चित्रं पाहिली त्यात मला सूर्य आणि त्याच्या प्रकाशाचे खेळच जास्त भावले. त्यात शुक्र नसता तरी ते तितकेच आवडले असते.

ग्रहणात निदान सूर्य झाकला जातो, इथे आपल्याला जे दिसतं आहे ते म्हणजे सूर्यावरून एक ठिपका जातो आहे. यात नेमकं रोमांचकारी असं काय आहे? हा प्रश्न उत्सुकतेच्या दृष्टिकोनातून विचारला आहे हे लक्षात घ्यावे. म्हणजे कोट्यावधी माणसांना जे भावतं त्याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही म्हणजे आपलाच काही ‘केमिकल लोच्या’ तर नाही ना अशी काळजीच्या झालरीने ओथंबलेली, डबडबलेली जिज्ञासा त्यामागे आहे. एक तर हा सगळा प्रकार पूर्णपणे पृथ्वीच्या दृष्टीकोनातून आहे (हाय कोपर्निकस!). तुम्ही आकाशात गेलात आणि अंतराळयान हवं तिथे न्यायची सोय असेल तर वाट्टेल तितक्या वेळा हवी ती ग्रहणं बघू शकाल. का ही घटना आयुष्यात एकदाच बघायला मिळेल असं कळलं तर तिच्याबद्दलचं आकर्षण वाढतं?

या दिशेने विचार करायला लागलं तर आणखी प्रश्न पडतात. कदाचित गोम इथेच आहे, एखाद्या गोष्टीचा प्रमाणाबाहेर विचार केला की असं काहीतरी होत असावं. पहिल्यांदा मोनालिसा बघितली तेव्हाही असंच झालं. जिच्याबद्दल जन्मभर ऐकलं होतं अशी कलाकृती साक्षात समोर पाहिली. अर्थात याआधीच ती इतक्या वेळा, इतक्या ठिकाणी पाहिली होती की तिच्याबद्दल अजिबात नाविन्य राहिलं नव्हतं. बरं, पाहिली ती पण लूव्ह्रच्या संरक्षक साखळीबाहेरून, आठ-दहा फूटांवरून. म्हणजे जवळून तिचे रंग कसे दिसतात हे ही बघता आलं नाही. आणि यात भर म्हणजे आजूबाजूला पर्यटक जमातीच्या लोकांची झुंबड लागलेली (त्यात अर्थात मी ही होतोच). या सगळ्या अनुभवांची बेरीज-वजाबाकी केली तर मोनालिसा बघण्याच्या अनूभूतीमध्ये शिल्लक काय राहिलं? अर्थात याचा अर्थ कुठेच न जाता सगळीकडचे फोटूच बघायचे असा नाही. प्रत्येक ठिकाणच्या प्रत्येक अनुभवाचा ‘अनुभव’ वेगळा असतो. व्हॅटिकन पहिल्यांदा बघताना त्याची भव्यता जशी अंगावर येते तो अनुभव कोणत्याही फोटोमध्ये येणं अशक्य आहे.

म्हणजे हे काही अनुभवांच्या बाबतीतच होतं असं म्हणायला जागा आहे. मोनालिसापेक्षा एक नेहेमीचं उदाहरण घेऊ. कोणताही उन्हाळा आला की हापूस झाल्ल्याशिवाय तो संपत नाही. उन्हाळ्यातला पहिला हापूस खातानाचा अनुभव विशेष असतो. ‘मधुर’ हे विशेषण फक्त आंबा या फळासाठी राखून ठेवावं असं बिल वगैरे पास करायला हरकत नाही. पण रोज सकाळ-संध्याकाळ हापूस खाल्ला तर किती दिवसात त्याचा कंटाळा येईल? बरं, हापूस खायला आपल्याला आवडतं म्हणजे त्यातला नेमका कोणता भाग आवडतो? इथे गाडी चिखलात जाते (काय भौ, निस्ते आंबे खाऊन र्‍हैले? हात धुवा ‘न गाडी ढकलायला या पटकन.) आमरसाचा पहिला घास घेतला की जीभ आणि मेंदू यांचा आर्केष्ट्रा सुरू होतो. खरं तर खायच्या आधीच आपण हापूस खाणार या कल्पनेनेच मेंदू तंबोरा वगैरे लावून तयारीत असतो. खाल्ल्यानंतर थोडा वेळ साखरेच्या हायवेवर आपली गाडी बुंगाट वेगाने जात असते. या सर्वांचा परिणाम म्हणजे खाल्यानंतर काही काळ तृप्ततेची भावना येते. हा सगळा विचार केला तर हा मुख्यत्वे मेंदूचा खेळ आहे हे लक्षात येतं. समजा हापूसऐवजी पायरीचा रस खाल्ला तर? काही लोकांना पायरीही खूप आवडते पण आवडत नसेल तर तो अनुभव येणार नाही. का? कारण मेंदू पूर्वीच्या अनुभवांशी याची तुलना करतो आणि त्यावरून हा अनुभव किती चांगला हे ठरवतो. अर्थात यात वैयक्तिक किंवा समूहाच्या आवडीनिवडींचाही मोठा भाग असतो. काही लोकांना आमरसाबरोबर भात खाल्ल्याशिवाय तृप्त वाटत नाही. इटालियन लोक पूर्ण शिजलेला पास्ता कधीच बनवत नाहीत. त्यांच्या मते खरा पास्ता म्हणजे जो खाताना दातांना किंचित चरचरीत (Al dente) लागतो तो. आणि वाईनच्या बाबतीत तर इतके नियम आहेत की वाईनच्या चवीचं वर्णन करणारे वेगळे शब्दकोष आहेत.

तृप्त करणार्‍या अनुभवाचं सार कशात आहे हा प्रश्न उरलाच. कदाचित याला एकच उत्तर नसावं, प्रत्येकानं आपापली उत्तरं शोधायची. गुरूदेव रवींद्रनाथ टागोर रोज सूर्य उगवताना त्याच्या स्वागताला हजर असायचे. दर दिवशी त्यांना वेगळी पहाट आणि वेगळा सूर्योदय भेटायचा. थोरो आज एका झाडाशी भेट ठरली आहे असं म्हणून मैलोनमैल बर्फ तुडवित जायचा. तसंच कदाचित शुक्राला पाहूनही लोकांना काहीतरी शब्दांच्या पलिकडलं मिळत असावं.

काय मिळतं हे शब्दात सांगणं बहुतेक वेळा शक्य नसतं. शब्दांच्या इतक्या चिंध्या केल्यावरही जे व्यक्त करता आलं नाही ते जपानी कवी मात्सुओ बाशोसारखे काही प्रतिभावंत मोजक्या शब्दांमध्ये सांगून जातात.

Along this road
Goes no one;
This autumn evening.