एक डाव मृत्युशी – द सेवन्थ सील

चित्रपट बघण्याची प्रत्येकाची कारणं आणि पद्धत वेगवेगळी असते. चित्रपट बघण्यामागच्या हेतूंमध्येही बरेचदा फरक असतो. काही लोक फक्त मनोरंजनासाठी चित्रपट बघतात, काहींना त्यातून आणखी काहीतरी हवं असतं. चित्रपटांचं वर्गीकरण अनेक प्रकारे केलं गेलं आहे. एक ढोबळ प्रकार म्हणजे जे चित्रपट बघताना फारसं डोकं वापरावं लागत नाही असे आणि जे डोक्याला त्रास देतात असे. जेम्स बॉन्डचे कितीही चित्रपट सलग बघितले तरी चालू शकतं. पण दिग्दर्शक जे सांगतो आहे त्यात बरेच पदर असले, त्याला अनेक संदर्भ असले तर असे चित्रपट विचारपूर्वक बघावे लागतात. असं करताना मलातरी अशा चित्रपटांना नेहमीपेक्षा अधिक वेळ द्यावा लागतो. म्हणूनच चित्रपट महोत्सव आणि आमची कुंडली जमत नाही. चित्रपट महोत्सवात रिट्रोस्पेक्टिव्ह विभागात चार-पाच दिवसात लागोपाठ दहा अन्तोनियोनी किंवा कुरोसावा बघणाऱ्यांबद्दल मला नेहमीच कौतुकमिश्रित आदरयुक्त हेवा वाटत आलेला आहे. उत्तमोत्तम चित्रपट बघण्याची संधी असूनही आमच्या औटडेटेड सीपीयुमुळे ते शक्य होत नाही हे आमचं दुर्दैव. एक बर्गमन बघितला तर तो बरेच दिवस पुरतो. त्यातही तो बघायचा मूड नसेल तर मुळात बघितलाच जात नाही आणि बघितल्यानंतरही पूर्णपणे पचविल्याशिवाय दुसरं त्याच ताकदीचं काही बघणं जमत नाही. याचा तोटा म्हणजे साहजिकच बहुतेक चित्रपट न बघितलेल्या यादीतच राहतात. पुस्तक आणि चित्रपटांमध्ये हा एक मुख्य फरक जाणवतो. पुस्तक वाचताना मध्ये थांबता येतं. चित्रपट सलग बघितला जातो आणि त्यातही माध्यम मुख्यत्वे दृकश्राव्य असल्याने अधिक परिणामकारक भासतं. अर्थात पुस्तकांमध्येही काफ्कासारखे लेखक सलग वाचणं जमत नाही.

सेवन्थ सील बर्गमनच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक. या लेखात चित्रपटाची जवळजवळ सगळी कथा उघड केलेली आहे कारण एक तर असं केल्याशिवाय वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा शक्य नाही. दुसरं म्हणजे ‘दा विंची कोड’प्रमाणे चित्रपटाची कथा सांगितली तर काय शिल्लक राहील असा प्रश्न इथे येऊ नये कारण चित्रपटातील इतर अनेक गोष्टी कथानकापेक्षा अधिक रोचक आहेत. तरीही कथानक उघड होऊ नये असं वाटत असेल तर इथे थांबावं. चौदाव्या शतकातील स्वीडनमध्ये एक सरदार – अन्तुनियश ब्लॉक – आणि त्याचा सेवक नुकतेच युद्धावरून घरी परतत आहेत. समुद्रकिनारी विसावा घेत असताना ब्लॉकची भेट साक्षात मृत्यूशी होते. “तू कोण आहेस? ” ब्लॉक विचारतो. “मी मृत्यू. ” “तू मला घेऊन जायला आला आहेस का? ” “मी बराच काळ तुझ्याबरोबर आहे. ”

पहिल्या पाच मिनिटाच्या आतच आलेल्या या प्रभावी प्रसंगामुळे चित्रपटाचा टोन निश्चित होतो. ही एक रूपककथा आहे आणि तिला ख्रिस्ती धर्माचे असंख्य संदर्भ आहेत – उदा. सेवन्थ सील हे नाव. ब्लॉकला बुद्धिबळाचा नाद आहे आणि आताही तो पट उघडून एकटाच खेळतो आहे. मृत्यूशी भेट झाल्यावर तो मृत्यूला एक डाव खेळण्याचं आव्हान देतो. जोपर्यंत मृत्यू त्याला हरवत नाही तोपर्यंत तो जिवंत राहू शकेल. डाव सुरू होतो आणि कथानक पुढे सरकतं. दुसरं उपकथानक रस्त्यावर खेळ करून उदरनिर्वाह करणारे कलाकार – जोसेफ, त्याची बायको मिया आणि छोटा मुलगा मिकायेल यांचं आहे. जोसेफला नेहमी दृष्टांत दिसत असतात. पहिल्याच प्रसंगात त्याला मेरी छोट्या येशूला घेऊन हिरवळीवरून जाताना दिसते. मियाला हे सगळे भास वाटतात आणि ती याकडे फारसं गंभीरपणे बघत नाही. ब्लॉकने मृत्यूकडे सवड मागितली आहे ती दोन कारणांसाठी. त्याला अंतिम सत्याचा शोध घ्यायचा आहे, देव खरंच आहे का आणि असला तर तो गप्प का याचं उत्तर हवं आहे. आणि दुसरं म्हणजे आपलं आतापर्यंतचं आयुष्य धर्मासाठी लढाया करण्यामध्ये व्यर्थ गेलं आहे असं त्याला वाटतं. त्यामुळे मरायच्या आधी त्याला काहीतरी अर्थपूर्ण करायची इच्छा आहे. तो चर्चमध्ये जाऊन धर्मगुरुपुढे हे सगळं सांगतो. तू मृत्यूशी डाव कसा जिंकशील हे विचारल्यावर तो त्याने आखलेला बेतही सांगतो. हे ऐकल्यावर धर्मगुरूच्या वेषातील मृत्यू आपला चेहरा उघड करतो. मृत्यू कोणत्याही नीतिनियमांना न जुमानणारा आहे.

मृत्यू फक्त ब्लॉकची सोबत करतोय असं नाही. प्लेगमुळे सगळीकडे वाताहत झाली आहे, माणसं किड्यामुंग्यांप्रमाणे मरत आहेत. वेगवेगळ्या रूपांमध्ये लोकांना मृत्यू सतत भेटत राहतो. (इथे चित्रपट रंगीत नाही हेच बरं असं वाटतं. ) आणि मृत्यूबद्दल वेगवेगळ्या लोकांच्या प्रतिक्रियाही बघायला मिळतात. चेटकीण असल्याच्या आरोपाखाली एका मुलीला जिवंत जाळण्याची शिक्षा दिलेली आहे. चर्चमध्ये एक चित्रकार भिंतीवर वेगवेगळ्या रूपात मृत्यूची चित्रं काढतो आहे. ब्लॉकची भेट जोसेफ आणि त्याच्या कुटुंबाशी होते आणि तो त्यांना त्याच्या किल्ल्यात येण्याचं आमंत्रण देतो. बरोबर त्याचा सेवक आणि इतर काही लोकही जायला निघतात. जाताना वाटेत चेटकिणीच्या शिक्षेची तयारी चालू असते. ब्लॉक तिला विचारतो, “तू खरंच सैतानाला भेटली आहेस का? ” “का? ” “मला त्याला देव आहे का हे विचारायचं आहे. ” हे सगळे जंगलात विसावा घेत असताना प्लेगच्या तडाख्यात सापडलेला गावातला एक माणूस पाण्यावाचून तडफडत प्राण सोडतो. आणि पुढच्याच क्षणी मृत्यू ब्लॉकबरोबर त्यांचा अर्धा राहिलेला डाव खेळायला येतो. डाव चालू असताना जोसेफला ब्लॉकबरोबर खेळणारा मृत्यू दिसतो आणि तो जीव वाचवण्यासाठी मिया आणि मिकाएलला घेऊन निघून जातो. ब्लॉक त्यांना जाताना बघतो आणि मृत्यूचं त्यांच्याकडे लक्ष जाऊ नये म्हणून सोंगट्यांना धक्का देऊन डाव उधळवतो. मृत्यू परत सोंगट्या ठेवताना किंचित बदल करतो आणि पुढच्याच खेळीत ब्लॉकवर मात करतो. “आपली पुन्हा भेट होईल ती वेळ तू आणि तुझे मित्र यांच्यासाठी अंतिम घटका असेल. ” “तू तुझी गुपितं सांगशील. ” “माझ्याकडे कोणतीही गुपितं नाहीत.” किल्ल्यात पोचल्यावर ब्लॉक, त्याची बायको आणि इतर लोक शेवटचं जेवण करतात. जेवण संपल्यावर काही वेळाने त्यांचे मागे लक्ष जातं, तिथे मृत्यू उभा असतो. त्याला पाहून त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया होतात. त्यांच्याबरोबर असलेली मुलगी त्याचं स्वागत करते तर ब्लॉक देवाची प्रार्थना करायला लागतो. चित्रपटाच्या शेवटी सकाळ झालेली असते. जोसेफ, मिया आणि मिकाएल जागे होतात. जोसेफला क्षितिजावर मृत्यू ब्लॉक आणि इतर लोकांना नाचत घेऊन जाताना दिसतो. मियाचा नेहमीप्रमाणे त्याच्यावर विश्वास बसत नाही. ते निघून जात असताना चित्रपट संपतो.

चित्रीकरण करताना बर्गमनने निसर्ग आणि माणूस यांच्या एकत्रित प्रतिमांचा वापर अत्यंत प्रभावीपणे केला आहे. क्रुसावर असलेली येशूची प्रतिमा दोन-तीनदा दिसते. जोसेफला अंतिम सत्याचा शोध घ्यायचा आहे. इथे नचिकेत आणि यमाची गोष्ट आठवते. मात्र नचिकेताला यम सगळी रहस्ये सांगतो तर इथे मात्र मृत्यू सांगण्यासारखं काही नाहीच असं उत्तर देतो. देवाचा संदर्भ येऊनही देव आहे याचं चिन्ह कुठेही दिसत नाही. मुलीला जाळत असताना ब्लॉकला त्याचा सेवक विचारतो, “आता हिच्याकडे कोण बघणार? देवदूत, देव की सैतान? ” संपूर्ण चित्रपटावर मृत्यूची छाया असूनही शेवट आशादायी आहे. इथे रोशोमान आठवतो. जोसेफ, मिया आणि छोटा मिकायेल यांची तात्पुरती का होईना – मृत्यूच्या तावडीतून सुटका झाली आहे. ब्लॉकने यांना वाचवून त्याच्या आयुष्यात किमान एक अर्थपूर्ण काम केलं आहे. सगळीकडे मृत्यूचं थैमान चालू असतानाही काही मोजके प्रसंग जीवनाचं चैतन्य दाखवतात. जंगलात जोसेफ आणि मियाचा सहकारी झाडावर चढून बसलेला असताना मृत्यू येऊन झाड करवतीने कापायला लागतो. झाड पडल्यावर तो मरतो मात्र लगेच त्या कापलेल्या खोडावर एक खार येते आणि अन्न शोधू लागते. मृत्यू हे अंतिम सत्य असलं तरी दुसऱ्या बाजूला जीवनाचं रहाटगाडगं अव्याहतपणे चालू असतं हे ही तितकंच खरं आहे. चित्रपटात असे अनेक छोटे क्षण येतात जे लक्षात राहतात. उदा. ब्लॉक जोसेफ आणि इतरांबरोबर दूध आणि स्ट्रॉबेरी यांचा आस्वाद घेताना म्हणतो, “मला हे क्षण नेहमीच लक्षात राहतील. ” पार्श्वभूमीत ऐकू येईल न येईल असं मंद संगीत. ब्लॉक उठून चालत जातो आणि लगेच त्याच्या मागे उभा असलेला मृत्यू दिसतो. असे प्रसंग बघताना कदाचित प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असेल आणि आपली जी प्रतिक्रिया होते ती शब्दांमध्ये नेटकेपणे मांडणं शक्य होत नाही. इथे काहीतरी शब्दांच्या पलीकडलं घडत असतं.

मुळात चित्रपटाचा विषयच असा आहे ज्याबद्दल उघडपणे चर्चा बहुतेक वर्तुळांमध्ये केली जात नाही. उलट मृत्यू अटळ आहे हे माहीत असूनही तो विषय निघाला तर विषय बदलण्याकडे, हसण्यावारी नेण्याकडे किंवा आपल्याला याची चिंता नाही असं दाखवण्याकडे कल असतो. माणूस हा एकमेव प्राणी असा आहे की ज्याला आपला मृत्यू अटळ आहे ही स्पष्ट जाणीव आहे. असं असूनही मृत्यूबद्दल आपल्या भावना गुंतागुंतीच्या आणि बरेचदा ठराविक साच्याच्या असतात. मृत्यू म्हटलं की भय त्याच्या जोडीला आलंच. हे भय नेमकं कशाबद्दल आहे याचा विचार केला जात नाही. मृत्यू म्हणजे अशुभ, वाईट हे समीकरण इतकं पक्कं झालं आहे की यापलीकडे विचार संभवतच नाही. जवळचं कुणीतरी अचानक गेल्यावर आपल्याला मृत्यूचं भान येतं, पण आठवड्याभरात हरदासाची कथा मूळपदावर येते. यासाठीच रोमन सम्राट मार्कुस औरेलियस याने एक माणूस फक्त रोज मृत्यूची आठवण करून देण्यासाठी नेमला होता. “We need to understand the extraordinary beauty, strength and the vitality of death. ” असं म्हणणारे जे. कृष्णमूर्तींसारखे तत्त्वज्ञ तर फारच दुर्मिळ.

मृत्यूशी बुद्धिबळ खेळण्याची कल्पना रोचक आहेच पण खरं तर जन्माला आलेला प्रत्येक माणूस रोज हा डाव खेळतच असतो आणि कधीतरी तो हरणार हे ठरलेलं असतं. कुणी तुलनेनं लवकर हरतात तर कुणाला हरायला थोडा वेळ लागतो, इतकाच काय तो फरक.

—-

१. या चित्रपटातील वेगवेगळ्या प्रतिमा नंतर इतर अनेक रूपांमध्ये वापरल्या गेल्या. विशेषत: मृत्यूशी बुद्धिबळ खेळणारी प्रतिमा बरीच गाजली. वुडी ऍलनने त्याच्या ‘लव्ह ऍंड डेथ’ चित्रपटात शेवटी सेवन्थ सीलच्या ‘डान्स ऑफ डेथ’चं विडंबन केलं आहे. याच्या नायकालाही जोसेफप्रमाणेच दृष्टांत होत असतात. बर्गमन हे वुडी ऍलनचं दैवत, त्याच्या अनेक चित्रपटांवर बर्गमनच्या शैलीची छाप स्पष्ट दिसते. बर्गमनप्रमाणेच मृत्यू हा त्याच्या चित्रपटांच्या मुख्य विषयांपैकी आहे. त्याचं ‘डेथ नॉक्स’ हे एक अंकी नाटकही सेवन्थ सीलचं आणखी एक विडंबन आहे. विडंबन म्हणजे टवाळी हा नियम सिद्ध करणाऱ्या अर्थहीन आणि टुकार विडंबनांपलीकडे जाऊन दर्जा राखून केलेलं सकस विडंबन ही मूळ कलाकृतीला दिलेली दाद असते याचा इथे प्रत्यय येतो.