अ शो अबाउट नथिंग

पूर्वीच्या काळी – म्हणजे भारत आर्थिक महासत्ता वगैरे व्हायला लागण्याच्या अगोदर – कोणतीही चांगली गोष्ट – पेणसिलीपासून ते मोटारगाडीपर्यंत – म्हणजे फारिन मेड हे समीकरण ठरलेले असे. आता सुदैवाने काळ बदलला आहे, सगळ्या वस्तू इथे मिळायला लागल्या आहेत. तरीही एका गोष्टीसाठी मात्र अजूनही पल्याडचे तोंड बघावे लागते आणि ती म्हणजे विनोद. विनोद हे माणसाचे नाव बरेच प्रचलित असले तरी जातिवंत, खळखळून हसायला लावणारा विनोद मात्र इथे दुर्मिळ झाला आहे. विनोद म्हटले की पुलंचे नाव समोर ठेवायला लोक तत्पर असतात. जातिवंत विनोदी साहित्य निर्मितीमध्ये त्यांचे काम नि:संशय उल्लेखनीय आहे. पण त्यानंतर काय? साहित्य तर सोडाच, पण इतर माध्यमांमध्येही विनोदाला फारसे गंभीरपणे घेतले जात नाही असे दिसते.

परदेशाचे तोंड बघावे लागते ते इथे. अमेरिकन सिटकॉम हा अफलातून प्रकार आपल्याकडे होणे शक्य नाही कारण त्याला जी मेहनत अपेक्षित आहे ती आपल्या मालिकांचे निर्माते-दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याकडून कदापि होणे नाही. तिथे पाट्या टाकून चालत नाही, प्रत्येक भाग स्वतंत्र त्यामुळे लांबण लावता येत नाही. प्रत्येक वर्षीच्या सीझनमध्ये अमुक भाग करायचे असे ठरलेले असते. वर्षाला घाऊक चारशे अन पाचशे भागांच्या खानावळीच्या पंक्ती उठवणार्‍यांना हे कसे जमावे? याच्या जवळ जाणारा एकमेव प्रकार मराठीत पाहिला मिळाला तो म्हणजे लहानपणी बघितलेला  ‘विच्छा माझी पुरी करा’ चा प्रयोग. मी पाहिलेल्या प्रयोदात विजय कदम, जानर्दन लवंगारे, दीपक शिर्के आणि किशोर नांदलसकर होते. तेव्हा हसून हसून जी पुरेवाट झाली तसा अनुभव परत आला नाही.

अमेरिकन सिटकॉममध्ये वेगवेगळ्या मालिकांचे चाहतेवर्ग आहेत. आमची फेवरिट म्हणजे साइनफेल्ड. इतरही आवडतात, ‘टू ऍंड अ हाफ मेन’ किंवा ‘रेमंड’ पण साइनफेल्डची सर कुणालाही येणार नाही असे आमचे ठाम मत आहे. गेली १०-१२ वर्षे या मालिकेचे भाग अनेकदा पाहूनही परत बघावेसे वाटतात हे विशेष. साइनफेल्ड मालिकेची कल्पना जेरी साइनफेल्ड आणि लॅरी डेव्हिड या दोघांच्या डोक्यातून निघाली. जेरी त्यावेळी स्टॅंड अप कॉमेडियन म्हणून नुकताच प्रसिद्ध होऊ लागला होता. लॅरी आणि त्याने मिळून या मालिकेची रूपरेखा निश्चित केली. त्यातील एक महत्वाचा भाग म्हणजे मालिकेत कोणत्याही प्रकारचे भावनात्मक प्रसंग यात नाहीत. ‘शो अबाउट नथिंग’ असे सूचक वर्णन करून रोजच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या निरर्थक वाटणार्‍या गोष्टींभोवती प्रत्येक भागाची कथा गुंफलेली आहे.

यातील प्रमुखे पात्रे चार. जेरी साइनफेल्डने स्वत:चीच भूमिका केली आहे, त्याचा शेजारी क्रेमर, मित्र जॉर्ज आणि मैत्रिण इलेन. जसजसे मालिकेचे भाग वाढत गेले तसतशी यातील प्रत्येकाची स्वभाववैशिष्ट्ये अधिक ठळक होत गेली. जेरी कधीही संतापत नाही, त्याने चिडून कुणावर ओरडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आवाज चिरकतो. जॉर्ज अतिशय चिंगूस मारवाडी आहे तर इलेनला एकही मैत्रिण नाही. यातील क्रेमरचे पात्र विशेष आहे. सुरूवातीला लॅरी डेव्हिडने आपल्या एका शेजार्‍यावर याची व्यक्तिरेखा बेतली होती (त्या शेजार्‍याचे नावही क्रेमर होते.) नंतर क्रेमरची भूमिका करणार्‍या मायकेल रिचर्ड्सने आपली कल्पनाशक्ति पणाला लावून या व्यक्तिरेखेत रंग भरायला सुरूवात केली. निरनिराळे आवाज काढणे, कधीही दारावर टकटक न करता धाडकन दरवाजा उघडून आत येणे, सतत धडपडणे अशा अनेक लकबींमुळे त्याच्या व्यक्तिरेखेला एक विशिष्ट आकार आला. असे होते आहे हे लक्षात आल्यावर मालिकेच्या लेखकांनी त्या व्यक्तिरेखेला शोभतील असे प्रसंग लिहीण्यास सुरूवात केली. कल्पनाशक्ति आणि मेहनत यांच्या जोरावर मायकेलने आपल्या पात्राला एक स्वतंत्र रूप मिळवून दिले. क्रेमर दरवाजा उघडून धाडकन आत का येतो? यावर मायकेलचे म्हणणे असे की क्रेमर जसा लोकांच्या आयुष्यात बिनबोलावता घुसतो त्यासाठी मला एक प्रतिमा हवी होती. त्याचे धाडकन आत येणे यात मला ती सापडली. जॉर्जचे पात्र लेखक लॅरी डेव्हीडवरच बेतले आहे. जॉर्जची भूमिका करणार्‍या जेसनला सुरूवातीला हे माहित नव्हते. एकदा एक प्रसंग वाचत असताना तो लॅरीला म्हणाला, “छे, असे कधी होणे शक्य आहे का?” त्यावर लॅरी म्हणाला, “का नाही? माझ्या बाबतीत झाले आहे.” ते ऐकल्यावर जेसनच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने लॅरीच्या लकबी जॉर्जच्या भूमिकेत आणायला सुरूवात केली.

याखेरीज जॉर्जचे आई-वडील फ्रॅंक आणि एस्टेल कोस्टान्झा, जेरीचे आई-वडील मॉर्टी आणि हेलन साइनफेल्ड, जेरीचे काका लिओ, जेरीचा शेजारी आणि जानी दुष्मन पोस्टमन न्यूमन ही पात्रेही महत्वाची आहेत. न्यूमन म्हणजे जुरासिक पार्कमधील जाड्या, भ्रष्ट प्रोग्रामर. जेफके सिनेमात त्याचे नाव न्यूमन होते तेच इथेही ठेवले. त्याची आणि जेरीची नेमकी का दुष्मनी आहे याचे कारण कधीच उघड केले जात नाही. जेरीच्या म्हणण्यानुसार सुपरमॅनला जसा एक खलनायक असतो तसा मला न्यूमन. जॉर्जचे आईवडील म्हणजे विक्षिप्तपणाचे अर्क आहेत. जॉर्जची आई आयुष्यात कधीही हसलेली नाही, वडील स्विमिंगपूलमध्ये चपला घालून पोहतात. अंकल लिओ बोलताना नेहेमी समोरच्याचा खांदा पकडतो. इतर कमी महत्वाची पात्रेही काही कमी नाहीत. जॉर्जचा बॉस, क्रूगर, क्रूगर इंडस्ट्रीजचा मालक आहे पण त्याला कंपनी गाळात चालली आहे याची अजिबात फिकीर नाही. जॉर्जला त्याच्या मानगुटीवर बसून काम करून घ्यावे लागते.

प्रत्येक भागात एखाद्या साध्याश्या वाटणार्‍या गोष्टीभोवती सर्व पात्रांच्या कथा गुंफल्या जातात. ही कथानक निर्मिती, सर्व पात्रांचे स्वभाव त्याला चपखल बसणे आणि त्यातून होणारी निखळ विनोदनिर्मिती ही या मालिकेची वैशिष्ट्ये म्हणता येतील. लोकांच्या विक्षिप्त सवयी – उदा. बोलताना खूप जवळ उभे राहणे, फोनवर तासनतास बोलत राहणे यासारख्या गोष्टींचा विनोदासाठी कसा उपयोग करावा हे बघण्यातच मजा आहे. एका भागात जेरी चक्क पर्स घेऊन हिंडतो आणि त्यामुळे गदारोळ झाल्यावर शेवटी जगाला ओरडून सांगतो, “यस, आय कॅरी अ पर्स!” याखेरीज गॉडफादर, जेएफके, अपोकॅलिप्स नाऊ या चित्रपटांची उत्कृष्ट विडंबने साइनफेल्डमध्ये बघायला मिळतात. काही भागांमध्ये तर जेरी आणि जॉर्ज एनबीसीमध्ये मालिका तयार करण्यासाठी बोलणी करायला जातात या सत्य घटनांवरच आधारलेले आहेत.

१९८९ ते १९९८ असे नऊ सीझन केल्यानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर असताना आणि च्यानेलची पुढच्या सीझनसाठी प्रत्येक भागाला पन्नास लाखांची ऑफर असतानाही जेरी साइनफेल्डने मालिका संपवण्याचा निर्णय घेतला. अर्थात मालिका संपली म्हणून तिची लोकप्रियता थांबली नाही. मालिकेच्या पुन:प्रसारणामुळे मिळालेल्या उत्पन्नाने जेरी साइनफेल्डला फोर्ब्ज मासिकाच्या दडगंज श्रीमंतांच्या यादीमध्ये नेऊन ठेवले.