Categories
चित्रपट​

कलकत्ता त्रिधारा आणि इतर काही

रे यांनी ‘कलकत्ता त्रिधारे’खाली तीन चित्रपट केले – ‘प्रतिद्वंदी’ (१९७०), ‘सीमाबद्ध’ (१९७१) आणि ‘जन अरण्य’ (१९७६). तिन्हीमध्ये विषय साधारणपणे सारखेच – बेकारी, शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि व्यवसाय किंवा नोकरी मिळालीच तर ती टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भानगडी.

सत्यजित रे आजारी असताना त्यांना ऑस्कर मिळाल्याची घोषणा झाली आणि दूरदर्शनला अचानक त्यांचा शोध लागला. त्यावेळी त्यांचे अनेक चित्रपट एकापाठोपाठ एक दाखविण्यात आले. त्यातच ‘प्रतिद्वंदी’ही बघितला. नंतर रे यांचे चित्रपट परतपरत पाहिले आणि काही समान धागे तर काही वेगळ्या वाटा स्पष्ट झाल्या. सुरुवातीला, म्हणजे ‘पाथेर पांचाली’, ‘चारुलता’ किंवा ‘जॉलशाघर’ यामध्ये सुरेख फ्रेम मांडण्याची कल्पकता दिसते तिला नंतरनंतर रे यांनी फाटा दिलेला दिसतो. याचा अर्थ नंतरच्या चित्रपटातील फ्रेम लक्षणीय नाहीत असा नाही पण ‘पाथेर पांचाली’ मध्ये जसं नैसर्गिक सौंदर्य टिपलं आहे ते नंतर कमी झालेलं दिसतं – ‘कांचनजंघा’ ठळक अपवाद पण त्या चित्रपटात कथानकाचा महत्त्वाचा भाग कांचनजंघा शिखरच आहे. रे यांनी ‘कलकत्ता त्रिधारे’खाली तीन चित्रपट केले – ‘प्रतिद्वंदी’ (१९७०), ‘सीमाबद्ध’ (१९७१) आणि ‘जन अरण्य’ (१९७६). तिन्हीमध्ये विषय साधारणपणे सारखेच – बेकारी, शैक्षणिक क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि व्यवसाय किंवा नोकरी मिळालीच तर ती टिकवून ठेवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या भानगडी.

Poster for the movie Pratidwandi

या चित्रपटांवर युरोपमध्ये त्या काळात होणाऱ्या वेगवेगळ्या प्रायोगिक चित्रणशैलींचा प्रभाव अधिक ठळकपणे जाणवतो. ‘प्रतिद्वंदी’मध्ये रे यांनी (बहुधा पहिल्यांदाच) काही अनोखे प्रयोग केले आहेत. चित्रपट सुरु होतानाचा प्रसंग निगेटिव्हमध्ये दाखवला आहे – काळ्याचं पांढरं आणि पांढऱ्याचं काळं. नायक सिद्धार्थ याचे वडील मरतात आणि त्यांची प्रेतयात्रा निघालेली दिसते. स्मशानभूमीमध्ये दहन होईपर्यंतचे सर्व प्रसंग निगेटिव्हमध्ये आणि नंतर सिद्धार्थच्या चेहऱ्यावर कॅमेरा रोखल्यावर चित्र पॉझिटिव्हमध्ये बदलतं. नंतरच्या प्रसंगात सिद्धार्थ गच्च भरलेल्या बसमधून जाताना दिसतो – नोकरीच्या मुलाखतीसाठी. मागे ‘द बोर्न अल्टीमेटम’ आला तेव्हा त्यात हॅंडहेल्ड कॅमेऱ्याचा वापर करून चित्रित केलेल्या दृश्यांचा बराच बोलबाला झाला होता पण रे यांनी कितीतरी आधी हेच तंत्र वापरलं आहे. बसमधून जाताना बसणारे धक्के कॅमेऱ्यामध्ये स्पष्ट जाणवतात. मुलाखतीमध्ये नकार मिळाल्यानंतर सिद्धार्थ वशिल्यासाठी एका कार्पोरेटरला भेटायला जातो. या सलग घेतलेल्या प्रसंगात कार्पोरेटरचा चेहरा कधीही दिसत नाही, कॅमेरा त्याच्या खांद्यावरून सिद्धार्थकडे बघत राहतो. (इथे परत ‘बॉर्न अल्टिमेटम’मधील पत्रकार त्याच्या सोर्सला टोरिनोमध्ये भेटतो तो प्रसंग आठवतो.)

चित्रपटाची कथा फारशी गुंतागुंतीची नाही. सिद्धार्थ आणि त्याच्या मित्रांचे रोजचे प्रसंग, घरी आई आणि भावंडांबरोबर घडणाऱ्या गोष्टी, मध्यांतरानंतर एक नायिकाही येते. कथानकापेक्षा रे यांची विविध बारकावे टिपण्याची आणि प्रसंगी त्यावर मर्मभेदी कॉमेंट करण्याची शैली अधिक तीव्रतेने जाणवते. सिद्धार्थ एका सिनेमाला जाऊन बसतो तेव्हा तिथे न्यूजरील चाललेलं असतं. १९७०-७१ च्या बजेटचं कौतुक, इंदिरा गांधी हसतमुखाने सह्या करताना आणि याद्वारे देशात सगळं किती आलबेल चाललं आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न. ७० चं दशक प. बंगालच्या दृष्टीने आणि व्यापकरीत्या भारताच्या दृष्टीने अतिशय अशांत होतं. ‘चारूलता’सारख्या संवेदनशील, काव्यमय विषयातून रे यांना ‘कलकत्ता त्रिधारे’सारख्या धगधगत्या विषयांना हात घालावासा वाटला यामागे तेव्हाची परिस्थिती बऱ्याच प्रमाणात कारणीभूत आहे.

सीमाबद्ध

त्रिधारेपैकी सर्वात शेवटी आलेल्या ‘जन अरण्य’वर आधीच लिहून झालेलं आहे. ‘सीमाबद्ध’मध्ये नायक सीलिंग फॅन बनवणाऱ्या कंपनीत मोठ्या पदावर नोकरी करतो आहे. एक मोठी ऑर्डर तयार होत असताना मालात मोठी चूक असल्याचं लक्षात येतं. ऑर्डर वेळेवर पोचवली नाही तर नुकसान होणारच, शिवाय कंपनीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न. म्हणून नायक एका कामगार नेत्याला हाताशी धरून संप घडवून आणतो. संप मिटेपर्यंत मिळालेला वेळ कंपनीच्या पथ्यावर पडतो, ऑर्डर यथावकाश पूर्ण होते आणि यामुळे नायकाची बढती होते. हे सर्व मूकपणे बघत असते नायकाची मेव्हणी (शर्मिला टागोर). ती पहिल्यांदाच बहिणीकडे आलेली असते. नायकाचा हुद्दा पाहून ती प्रभावित होते पण हळूहळू खरी परिस्थिती तिच्या लक्षात येते. शेवटी रे यांनी नेहमीप्रमाणे प्रतीकांचा सुरेख वापर केला आहे. बढती मिळाल्याची बातमी घेऊन नायक घरी येतो तर लिफ्ट बंद. एक एक मजले चढताना तो अधिकाधिक थकून जातो आणि शेवटी जेव्हा घरी पोचतो तेव्हा पूर्णपणे पराभूत झालेला असतो.

तिन्ही चित्रपटांचे शेवट सुखद नाहीत. तरी त्या मानाने ‘प्रतिद्वंदी’च्या शेवटाला एक संवेदनशील किनार आहे. मुलाखती देऊन नोकरी मिळत नाही असं पाहून शेवटी नायक एका आडगावात नोकरी पत्करतो – सुरुवातीला भेटलेल्या कार्पोरेटरच्या वशिल्याने. तिथे खोलीत बसलेला असतानाचा त्याला बाहेर एका पक्ष्याचा किलबिलाट ऐकू येतो. तो बाहेर जाऊन बघतो, त्याचवेळी एक प्रेतयात्रेत चाललेला रामनामाचा घोषही ऐकू येतो. आवाज ऐकून नायक वळतो आणि चित्रपट संपतो. गंभीर विषय असला तरीही रे यांच्यात दडलेला सौंदर्य टिपणारा कवीमनाचा दिग्दर्शक कधीकधी असा अनपेक्षितपणे दिसून जातो. ‘सीमाबद्ध’ आणि १९७६ मध्ये आलेला ‘जन अरण्य’ यामध्ये मात्र रे नायकाचं सरळसरळ अध:पतन दाखवतात. देशात आणीबाणी चालू असताना दुसरं काही अपेक्षितही नसतं.

रे यांच्या चित्रपटात काही थीम्स किंवा प्रसंग परतपरत घडताना दिसतात. उदा. सर्व मुख्य पात्रांनी एकत्र पिकनिकला जायचं हा रे यांचा पेटंट प्रसंग म्हणता येईल. बहुतेक वेळा ही पिकनिक हसतखेळत सुरू होते पण नंतर कथानकाच्या गाभ्याशी जे मुद्दे असतात त्यांच्यापर्यंत जाऊन पोचते. ‘अरण्येर दिनरात्री’मध्ये ‘मेमरी गेम्स’ खेळताना विविध पात्रांचे उल्लेखनीय पैलू समोर येतात, ‘कापुरूष’मध्ये मुख्य पात्र तीनच पण पिकनिकमध्येच कथानक महत्त्वाचं वळण घेतं. ‘कांचनजंघा’मध्ये तर सगळी पात्रं बाहेरच फिरत असतात, एकमेकांना भेटतात आणि परत आपापल्या दिशेने जातात. ‘शाखा-प्रोशाखा’मध्ये आजोबा आजारी असतात म्हणून सर्व कुटुंबीय भेटायला येतात. त्यांची प्रकृती सावरल्यावर पिकनिकला जातात आणि तिथे संघर्षाचे मुद्दे समोर येतात. (इथे बंगाली लोकांना पिकनिक करणं विशेष आवडत असावं अशीही एक शक्यता असू शकेल.)

रे यांचं भरपूर गाणी असलेल्या हिंदी चित्रपटांशी त्यांचं नातं फारसं जुळलं नाही. तरीही त्यांच्या चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीचे रोचक पडसाद जागोजागी आढळतात. ‘अभिजान’ या वहिदा रेहमान आणि सौमित्र चॅटर्जी यांच्या भूमिका असलेल्या चित्रपटाशी त्या काळच्या हिंदी चित्रपटांचं बरंच साम्य आढळतं. यात सौमित्राने नेहमीपेक्षा वेगळी म्हणजे एका ड्रायव्हरची भूमिका केली आहे आणि वहिदा एक नाचगाणं करणारी. यात ड्रायव्हरचा क्लीनर हिंदी गाणी गाताना दाखवला आहे. किंवा ‘कांचनजंघा’मध्ये एका तरुणाच्या ट्रान्झिस्ट्ररमधून ‘हाल कैसा है जनाब का?’ ऐकू येतं. हे असे तुकडे का टाकले असावेत याविषयी मला नेहमी कुतूहल वाटतं. एक शक्यता म्हणजे त्या काळी बंगाली समाजात असलेली हिंदी गाण्यांची लोकप्रियता – तिचं हे एक प्रतिबिंब. दुसरी शक्यता रोचक आहे पण तिला काहीही आधार नाही. संगीताचं चित्रपटातील महत्त्वाचं स्थान त्यांनी कधीच नाकारलं नाही. पार्श्वसंगीतामुळे प्रसंगाला एक वेगळी मिती लाभते हे त्यांच्या चित्रपटातील अनेक प्रसंगावरून दिसतं. पण या बाजूने विचार करणाऱ्या लोकांना कधीकधी हिंदी चित्रपटातील गाणी अनावश्यक आणि अस्थानी वाटू शकतात. रे यांचं हे मत नक्कीच होतं. मग नेहमी गंभीर चित्रपट काढणाऱ्या रे बाबूंना कधी कधी गंमत म्हणून एखादा हिंदी गाण्याचा तुकडा टाकावा असं वाटलं असेल का?