Categories
विज्ञान

ये सब क्या हो रहा है, बेटा दुर्योधन?

अमेरिकन फिजिकल सोसायटी ही संशोधन आणि विज्ञानाचा प्रसार यांच्याशी निगडित एक नावाजलेली संस्था आहे. एपीएसचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे ते पदार्थविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी मासिके गेली १०० वर्षे चालवत आहे. या मासिकांमध्ये अत्युच्च दर्जाचे निबंध प्रकाशित होत असतात, यांत प्रकाशित झालेल्या शोधांना बरेचदा नोबेल पारितोषिकही मिळालेलं आहे. हेच नेचर, एल्सेव्हिअर किंवा अमेरिकन असोसिएशन फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स (सायन्स मासिक) यांच्याबद्दलही म्हणता येईल. थोडक्यात, विज्ञानासाठी या संस्था आणि कंपन्या करत असलेलं काम उल्लेखनीय आहे. पण ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी की दिवसेंदिवस या सर्व संस्था धंदेवाईक होत चालल्या आहेत आणि त्यामुळे विज्ञानाच्या संशोधनामध्ये जी सचोटी आणि पारदर्शकता अपेक्षित आहे ती नाहीशी होत चालली आहे.

या मासिकांमध्ये लेख कसे प्रकाशित होतात? जगभरातील शास्त्रज्ञ त्यांच्या सरकारांकडून किंवा खाजगी कंपन्यांकडून संशोधनासाठी निधी जमवतात. शास्त्रज्ञ आणि त्यांचे विद्यार्थी रात्रीचा दिवस करून एखाद्या विषयावर संशोधन करतात आणि त्याचे निष्कर्ष लेखांमधून या मासिकांना पाठवतात. हे निष्कर्ष बरोबर आहेत की चूक हे कुणी ठरवायचं? यासाठी या मासिकांनी शेकडो परीक्षक किंवा रेफरी निवडलेले असतात. हे रेफरी म्हणजे त्याच विषयात काम करणारे इतर शास्त्रज्ञ. आपल्या संशोधनातून किंवा विद्यापीठात असतील तर संशोधन आणि शिकवणे यांच्या रामरगाड्यातून वेळात वेळ काढून हे शास्त्रज्ञ त्यांना पाठवलेले लेख तपासतात, त्यातील चुका शोधून काढतात आणि लेख प्रकाशित करायचा की नाही यावर निर्णय देतात. प्रत्येक लेख कमीत कमी दोन किंवा तीन रेफरींकडे जातो आणि त्यांचे अनुकूल मत असेल तर प्रकाशित केला जातो. हे करण्यासाठी या शास्त्रज्ञांना एक कपर्दीकही दिला जात नाही, केवळ विज्ञानासाठी हे लोक हे काम करतात.

लेख प्रकाशित झाल्यावर काय होतं? तो लेख तात्काळ पे वॉलमागे जातो. आता एखाद्याला वाटेल की निदान जे लोक एक पैसुद्धा न घेता रेफरी म्हणून काम करतात त्यांना तरी यात काही सवलत मिळेल? नो सर. पैसा फेको, तमाशा देखो. मी अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या ‘फिजिकल रिव्ह्यू लेटर्स’चा रेफरी आहे पण मला एखादा लेख वाचायचा असेल आणि मी वर्गणीदार नसेन तर मला किती दमड्या मोजाव्या लागतील माहीत आहे का? $२५ फक्त म्हणजे आजच्या दराने झाले १३५० रुपये फक्त. नीट लक्षात घ्या, ही त्या मासिकाच्या एका अंकाची किंमत नाहीये, अंकातल्या एका लेखाची किंमत आहे. एका लेखासाठी एखादा डॉलर असता तर प्रश्न नव्हता. हे तर हिमनगाचं टोक झालं. जर तुम्ही तुमचा एखादा लेख पाठवला आणि तो प्रकाशित करायला मान्यता मिळाली तर त्यासाठीही तुम्हाला पैसे मोजावे लागतात. त्यात परत त्यातल्या आकृत्या रंगीत हव्या असतील तर पैसे जास्त. हे पैसे बहुतेक वेळा तीन आकडी डॉलरच्या पटीत असतात. पुणे विद्यापीठात काम करत असताना अशी वेळ आली तर आम्ही मासिकाच्या संपादकांना ‘आम्हाला पैसे माफ करा’ असं पत्र पाठवीत असू (दे दान छुटे गिरान) आणि तेही उदार मनाने ही सवलत देत असत.

संशोधनाचे पैसे जनतेचे, ते प्रकाशित करायला यांना पैसे द्यायचे, मात्र त्याचं परीक्षण विज्ञानाच्या नावाखाली फुकट करायचं आणि लेख प्रसिद्ध झाल्यावर तो वाचायला परत जनतेकडूनच अवाच्यासव्वा पैसे घ्यायचे? इतकी लुटालूट तर चंबळचे डाकूसुद्धा करत नव्हते. बरं, संस्था किंवा विद्यापीठ यांच्यासाठी असलेले घाऊक वर्गणीचे दर इतके जास्त आहेत की हार्वर्डसारख्या विद्यापीठानेही हे परवडत नाही असं कबूल केलं आहे. हार्वर्डचा यासाठीचा वार्षिक खर्च आहे $३५ लाख फक्त. यातील काही मासिकांच्या वार्षिक वर्गणी $४०,००० हून जास्त आहे.

मागच्या शतकात आंतरजाल येण्याच्या आधी माहिती प्रसरणाचे सगळेच मार्ग कासवाच्या वेगाचे होते. सुदैवाने आता हे बदललं आहे आणि याचा परिणाम म्हणून आंतरजालाच्या माध्यमातून अशा प्रकारांना तोंड फोडणं सोपं झालं आहे. टिम ग्रोवर ऑक्सफर्डमधील एक गणितज्ञ. त्याला या सगळ्या प्रकाराचा वीट आला आणि त्याने एल्सेव्हिअर या प्रकाशन कंपनीवर  बहिष्कार घालण्याचं ठरवलं. त्याला अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळाला, त्यातून http://thecostofknowledge.com/ ‘कॉस्ट ऑफ नॉलेज‘ ही साईट उघडली गेली आणि त्यात आतापर्यंत १३,००० शास्त्रज्ञांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. प्लॉससारखी काही मासिकं सर्वांसाठी खुली आहेत. अर्थातच या कंपन्या याबाबत अनुकूल नाहीत आणि अमेरिकन सिनेटमध्ये याला प्रतिबंध करण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत. सोपा-पिपाचं बिल याच जातकुळीतलं. सर्व देशातील, सर्व नागरिकांसाठी ज्ञान मोफत उपलब्ध असायला हवं या अपेक्षेपोटी ऍरन स्वार्ट्झचा बळी गेला.

हे सर्व विचार आता आठवायचं कारण मला काल अमेरिकन फिजिकल सोसायटीची मेल आली. तुम्हाला कधी वेळ आहे ते सांगा, तुमचा वेळ महत्त्वाचा आहे हे आम्हाला माहीत आहे, याडा, याडा. ‘मला परीक्षण करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मासिकांना फुकट प्रवेश देत असाल तर करतो’ असं उत्तर त्यांना पाठवलं आहे.

—-

१. अल्ला के नाम पे दे दे बाबा, ये पेपर मुफत में पब्लिश कर दे बाबा, आज मंगलवार है बाबा, जर्नल का स्पेशल इशू निकलेगा बाबा, तेरे जर्नल का इंपॅक्ट फॅक्टर बढेगा बाबा, पेपर को नोबेल मिलेगा बाबा इ. इ.