इन्स्पेक्टर रीबस

इयन रँकिन स्कॉटलंडचा, एडिनबरा शहरातला. त्याची पहिली कादंबरी ‘नॉट्स अँड क्रॉसेस’ ही त्याने एक ‘मेनस्ट्रीम’ कादंबरी म्हणून लिहीली होती पण समीक्षकांनी तिची गणना ‘क्राइम फिक्शन’खाली केली. कादंबरीचं मुख्य पात्र इन्स्पेक्टर रीबस. रीबस हा रूढार्थाने हिरो नाही. मध्यमवयीन, घटस्फोट झालेला, एक मुलगी आहे ती आईबरोबर राहते. रीबस दारु, सिगारेट आणि जंक फूड यावर जगतो. त्याला पोलिस…

इयन रँकिन स्कॉटलंडचा, एडिनबरा शहरातला. त्याची पहिली कादंबरी ‘नॉट्स अँड क्रॉसेस’ ही त्याने एक ‘मेनस्ट्रीम’ कादंबरी म्हणून लिहीली होती पण समीक्षकांनी तिची गणना ‘क्राइम फिक्शन’खाली केली. कादंबरीचं मुख्य पात्र इन्स्पेक्टर रीबस. रीबस हा रूढार्थाने हिरो नाही. मध्यमवयीन, घटस्फोट झालेला, एक मुलगी आहे ती आईबरोबर राहते. रीबस दारु, सिगारेट आणि जंक फूड यावर जगतो. त्याला पोलिस चौकीत बसून ‘पेपरवर्क’ करण्याचा कंटाळा. त्याऐवजी गुन्हेगार, गँगस्टर, भुरटे चोर यांच्या मागावर राहणे, प्रसंगी त्यांची मदतही घेणे हे त्याला अधिक पसंत आहे. त्याचे दारु पिण्याचे अड्डेही सहसा ज्या ठिकाणी स्त्रिया किंवा सभ्य माणसं जात नाहीत असे बार आहेत. त्याला नियमांची फारशी फिकिर नाही. अनेक वेळा त्याला ‘इनसबऑर्डिनेशन’साठी सस्पेंड केलं आहे. असं झालं की तो शांतपणे जी केस हातात असेल तिच्या फायली घरी घेऊन जातो आणि तिथून काम सुरु ठेवतो. याचा अर्थ तो चांगला पोलिस अधिकारी नाही असा अजिबात नाही. किंबहुना गुंतागुंतीच्या केस सोडवण्याच्या त्याच्या कौशल्यामुळेच त्याची नोकरी आजपर्यंत टिकून आहे.

book cover of Knots and Crosses

रीबसचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने एकदा केस हातात घेतली की सस्पेंड होऊ दे, वरुन दबाव येऊ दे तो हातातली केस सोडत नाही. पोलिसांचं काम हेच त्याचं आयुष्य आहे. त्याचं लग्न मोडण्यालाही हेच कारण होतं. घरी आल्यावरही हातातील केस त्याचा पिच्छा सोडत नाहीत. त्याचा दुसरा छंद म्हणजे ६०-७० च्या दशकातील रॉक संगीत. रोलिंग स्टोन्स, बॉब डिलन यांच्यासह त्या काळातील अनेक बँड त्याचे आवडते. रँकिनलाही ही आवड असणार हे स्पष्ट आहे. त्याच्या काही कादंबर्‍यांची नावं या गाण्यावरुन घेतली आहेत, उदा. ‘द फॉल्स’. रँकिनने या कादंबर्‍यांमधून वेगवेगळे विषय हाताळले. पेडोफाइल, सिरियल किलर, राजकीय भ्रष्टाचार अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांवर या कादंबर्‍या आधारलेल्या आहेत. या वाचताना मला जॉन ल कारेची तीव्रतेने आठवण झाली. मग रँकिनची मुलाखत वाचताना त्याचाही तो आवडता लेखक आहे हे कळलं. कारेने जे गुप्तहेर कथांसाठी केलं तेच रँकिनने पोलिसदलासाठी केलं.

या कादंबर्‍या आवडण्याचं कारण काय? एक म्हणजे यातील खरंखुरं चित्रण. यातील पात्रे खरी वाटतात कारण त्यांना अनेक पदर आहेत. पोलिसाचं काम म्हणजे केवल पिस्तुल घेऊन गुंडाच्या मागे पळत सुटणे हे नसून बरेचदा दिवसेंदिवस अंधार्‍या खोल्यांमध्ये जुनी कागदपत्रे शोधणे हे ही असतं. संशयित ताब्यात घेतल्यावर तो दोषी आहे किंवा नाही यावर पोलिस अधिकारी बेट्स घेऊन जुगार खेळतात. खुनाच्या जागी प्रेत बघताना अचानक रीबसला एक विनोद सुचतो. त्याचबरोबर काही केसेस जन्मभर त्याचा पिच्छा सोडत नाहीत. खुनी कोण आहे याचा सबळ पुरावा असूनही तांत्रिक कारणासाठी कोर्टाने त्याला निर्दोष सोडणे किंवा राजकीय दबावामुळे हातात आलेली केस बंद करावी लागणे.

एका ठिकाणी मात्र कादंबरी वाचताना खाली पडलो. परत उठलो आणि परत पडलो. अर्थात यात रँकिनचा दोष नाही. एका धोकादायक गँगस्टरची केस हाताळताना रीबसला वाटतं की आपल्या जिवाला धोका आहे. पण त्याच्याकडे पिस्तुल नसतं! किंबहुना कोणत्याच पोलिस अधिकार्‍याकडे पिस्तुल नसतं. मग रीबस एका ओळखीच्या गुंडाकडून बेकायदेशीर पिस्तुल विकत घेतो. हे उघडकीला येतं आणि त्याच्यावर कारवाई होते. इथे अनेक प्रश्न पडले. राणीच्या देशातील पोलिसांकडे पिस्तुल नसतं का? मग गुंडांशी सामना झाल्यावर ते काय करतात? आणि साहेबाला बंदुकीची इतकी अ‍ॅलर्जी तर इथे नेटिव्हांवर इतक्या फैर्‍या का झाडल्या?

स्कॉटिश टेलेव्हिजनने या कादंबर्‍यावर आधारित एक मालिका केली. आता स्कॉटीश टेलेव्हिजन ही काही फार नावाजलेली कंपनी नाही. तरीही मालिकांचा दर्जा उत्तम आहे. १४ कादंबर्‍यांवर आधारित एका तासाचे फक्त १४ भाग. प्रत्येक भागात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वकाही. पुढील भागात काय होणार वगैरे उत्कंठावर्धक काहीही नाही. कादंबर्‍या आणि मालिका यात काही फरक आहेत. काही पात्रे गाळलेली आहेत, काही कथांमध्येही बदल झालेला आहे. रीबसचं जे व्यक्तिमत्व कादंबर्‍यांमधून समोर येतं, ते मालिकेमधून तितकसं येत नाही.

हे सगळं वाचल्यावर, बघितल्यावर आपल्याकडे काय असा प्रश्न पडतो. इतर अनेक प्रकारांप्रमाणे ‘क्राइम फिक्शन’ हा प्रकारही आपल्याकडे दुर्लक्षित आहे, काही अपवाद वगळता. ‘रीबस’ मालिका बघितल्यावर शक्य तितकी कोरी पाटी ठेवून ‘सी.आय. डी.’ मालिकेचा एक भाग बघितला. बघवला नाही. दर्जात इतका फरक का? सोपं उत्तर – ‘रिबस’ मालिकेचे १४ भाग आणि ‘सी.आय. डी.’ चे १३४४. १०० पटीने संख्या वाढल्यावर दुसरं काय होणार?

—-

अवांतर – मालिकांवर बरंच काही लिहीलं गेलं आहे. प्रेक्षक म्हणतात चांगल्या मालिका बनत नाहीत म्हणून आम्ही बघत नाही. निर्माते/दिग्दर्शक म्हणतात प्रेक्षकांना चांगलं बघायची सवय नाही त्याला आम्ही करणार? हे दुष्टचक्र आहे. लवकरात लवकर मालिका कोण बनवतो याची स्पर्धा चालू असताना कोणत्याही एका निर्मात्याला वेळ देऊन मालिका बनवण्याचा धोका पत्करणं नको वाटतं. पण यामुळे प्रेक्षकांना चांगल्या मालिका बघायच्या नाहीत याला पुरावा मिळणे कठीण आहे. एका चॅनेलवर दर्जेदार मालिका आणि दुसरीकडे रतीब मालिका चालू असेल आणि तरीही प्रेक्षक चांगल्या मालिकेकडे दुर्लक्ष करत असतील तर यात तथ्य आहे असं मानायला हरकत नाही. एक मात्र खरं – जोपर्यंत वर्षाला अडीच-तीनशे भाग बनत राहतील तोपर्यंत यात सुधारणा होणे नाही.