Categories
चित्रपट​ संगीत​

रंगरेजा

रहमान गाण्यांचे कोणतेही नियम पाळत नाही हे बरेचदा दिसलं आहे. पण काही वेळा गाण्याचं स्वरूपच असं असतं की त्यात बदल करायला फारशी संधीच नसते. उदा. पारंपारिक कव्वाली. अशा वेळेस रहमान काय करतो हे बघणं रोचक असतं आणि बारकाईनं पहिलं तर काही गमती दिसतात. हे म्हणजे ऑफ साइडला सात-आठ गड्यांची अभेद्य भिंत, ग्लेन मॅग्रा गुडलेंग्थ अधिकउणे १.७५ इंच अशा लेव्हलचा बॉल टाकतोय आणि या सगळ्यांना न जुमानता बॉल बाउंडरी लाइन के पार. गोरा हमाल लोक, चेंडू लाव. जल्दी. बॅट्समन – पैचान कोन?

रॉकस्टारमधली ‘कुन फाया कुन’ ही कव्वाली ऐकताना असाच अनुभव येतो.

या कव्वालीमध्ये गिटारचा वापर केला आहे. कव्वाली सुरू होते हजरत निझामुद्दीन औलिया यांच्या स्मरणाने. नंतर येते ‘रंगरेजा’ ची हाक. रंगरेजा म्हणजे कपडे रंगवणारा, ‘कुन’ म्हणजे ‘हो जा’ किंवा ‘तथास्तु’. ‘कुन फाया कुन’ चा अर्थ होतो ‘जशी इच्छा होती तसंच झालं’. कव्वालीचं पहिलं कडवं संपल्यावर एक ओळ येते, ‘सदक उल्लाह अल्लीउम अज़ीम’ आणि यानंतर गिटारचा एक तुकडा. या ओळीचा उत्तरार्ध – सदक रसुलहम नबी यूनकरीम, सलल्लाहु अलाही वसललम’ – नंतरच्या कडव्यानंतर येतो. ही रहमानची खासियत आहे. बहुतेक गाण्यांमध्ये दोन कडव्यांच्या मध्ये एकाच प्रकारचा तुकडा असेल तर तो प्रत्येक वेळी तसाच वाजवला जातो. रहमान शक्यतो तोच तुकडा वापरतच नाही, पण वापरायचाच झाला तरी त्यात असे बदल करतो. यामुळे दुसर्‍या कडव्यानंतर संपूर्ण तुकडा ऐकताना त्याच्या नाविन्यामुळे गोडी आणखी वाढते. शिवाय गाण्यात हे कडवं अधिक महत्वाचं आहे. ‘मुझ को हो दीदार मेरा’ ही सूफी वाटेने जाणारी मागणी त्यात केली आहे.

कव्वालीच्या शेवटी मुख्य स्वर चालू असतानाच पार्श्वभूमीत रंगरेजाचा आलापही चालू असतो. एकाच वेळी दोन किंवा अधिक स्वतंत्र सुरावटी/मेलडी वाजवण्याचा हा ‘पलीफनी‘ नावाचा प्रकार पाश्चात्य शास्त्रीय संगीतात विशेष लोकप्रिय आहे. सतराव्या शतकातील बरोक संगीतामध्ये बाखने पलीफनीचे अफलातून प्रयोग केले आहेत. बाख म्हणजे पलीफनीचा बेताज बादशहा. त्याच्या संगीतामध्ये अनेक सुरावटी स्वतंत्रपणे मनमुराद हिंडतात, मोक्याच्या ठिकाणी एकत्र येऊन एकमेकांना साथ देतात आणि परत स्वतंत्र वाटांनी जातात. नमुन्यादाखल चवथ्या ब्रॅंडेनबर्ग कोंचेर्तोचा हा भाग ऐकून पहा. यातलं प्रत्येक प्रमुख वाद्य स्वतंत्र सुरावट वाजवतं आहे. तुमचा कान जितका जास्त ‘तयार’ असेल तितके अधिकाधिक खजिने यात तुम्हाला सापडू शकतील. रहमानने ‘कुन फाया कुन’ मध्ये पलीफनीचा फारच थोडा वापर केला आहे. यापेक्षा रंगीला मधल्या ‘मंगता है क्या’ गाण्याच्या शेवटचा एक मिनिटभर श्वेता आणि रहमान यांनी गायलेली पलीफनी अशक्य आहे. आणि जुनं उदाहरण हवं असेल तर आरडी-किशोर-आशा यांचं ‘जाने जां, ढूंढता फिर रहा’ ऐकाच ऐका.

इतकं सगळं झाल्यावर कव्वालीत हे सगळं खरंच आहे का असा प्रश्नही विचारला जाऊ शकतो. पण कलेमध्ये हा एक फायदा असतो. तुम्हाला त्यातून जे मिळतं ते तुमच्यापुरतं सत्य असतं आणि अशी प्रत्येकाची सत्यं वेगळी असली तरी चालतं. म्हणूनच गोलमालमध्ये लकी शर्मा म्हणतो, “गाने में दोन और दो चार ही नही पाच हो सकते है, तीन हो सकते है, जीरो भी हो सकता है.”

‘गोलमाल’वरून आठवलं. ‘गोलमालमध्ये उत्पल दत्तने अमोल पालेकरला खाल्लं’ अशा अर्थाचं वाक्य एकदा कुठेतरी वाचनात आलं होतं. ते वाचल्यावर मला उत्पल दत्त, अमोल पालेकर आणि ऋषिदा तिघांचीही आळीपाळीने दया आली. अर्थात पुढच्याच क्षणाला त्यांच्यावर दया करणारा ‘तू कोण टिकोजीराव’ असा प्रश्नही मनात आला.

खरं तर या चित्रपटात उत्पल दत्तपेक्षा अमोल पालेकरची भूमिका अधिक गुंतागुंतीची आहे. भवानीशंकरची व्यक्तीरेखा चित्रपटातच डेव्हीड म्हणतो त्याप्रमाणे ‘स्ट्रॉंग लाइक्स ऍंड डिसलाइक्स’ असलेली आहे. उत्पल दत्तने तिला पूरेपूर न्याय दिला आहे यात वादच नाही पण उत्पल दत्तसारख्या कसलेल्या कलाकाराकडून​ हे अपेक्षित आहे. याउलट रामप्रसादच्या भूमिकेमध्ये डबल नाही तर ट्रिपल रोल आहे आणि तिन्ही भूमिका अमोलने अशा खुबीने रंगवल्या आहेत की चित्रपट कितीही वेळा पाहीला तरी त्याचा ताजेपणा कमी होत नाही. चित्रपटाच्या सुरूवातीला आपल्याला दिसणारा रामप्रसाद क्रिकेट, फुटबॉल, हॉकी यांच्यामध्ये रमणारा आहे पण तो खुशालचेंडू नाही. आपल्यावर असलेल्या जबाबदारीची त्याला जाणीव आहे म्हणूनच फक्त १२% विद्यार्थी पास झाले असतानाही त्यात त्याचाही नंबर लागतो. या रामप्रसादला नोकरी मिळवण्यासाठी रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा व्हावं लागतं. या भूमिकेत अमोलने आधीच्या भूमिकेतील मजा करणारा भाग काढून टाकला आहे आणि गंभीर असणारा भाग अतिशयोक्ती वाटावी इतका ‘प्रोजेक्ट केला आहे. पण रामप्रसाद नुसता खाली मान घालून अभ्यास करणारा स्कालर नाही. या भूमिकेत असताना त्याला बरेचदा चलाखी वापरावी लागते. कधी ‘अगं अगं म्हशी मला कुठे नेशी’ म्हणत उत्पल दत्तला हवं तसं ‘मनूव्हर’ करायचं, तर कधी खुंटा हलवून बळकट करायचा आणि हे सगळं करताना पितळ उघडं पडलं तर हुशारीनं वेळ मारुन न्यायची, हे सगळे प्रकार त्याला करावे लागतात. ही चलाखी मूळ रामप्रसादमध्येच असणार हे उघड आहे.

नंतर कर्मधर्मसंयोगाने लक्ष्मणप्रसाद उर्फ लकी अवतरल्यावर या भूमिकेत अमोलने आधी केलं त्याच्या उलटं करताना कसलंही गांभीर्य नसणारा खुशालचेंडू तरूण रंगवला आहे. पण या तरूणात काही नव्या छटाही आहेत. मूळ रामप्रसाद वडीलधार्‍यांचा मान राखून असतो, लकी कुणाचीही बूज राखत नाही हे त्याच्या एंट्रीच्या ‘हाय माली! बुढ्ढा… है घर में?’ या वाक्यावरूनच स्पष्ट होतं. या तिन्ही भूमिकांमध्ये अमोलची देहबोली वेगवेगळी आहे. लकीचं किल्ली फिरवणं, देव आनंदची ष्टाइल मारणं किंवा प्रकरण हाताबाहेर जायला लागल्यावर मूळ रामप्रसादने डोक्यावर हात आपटून घेणं अशा अनेक लकबी यासाठी त्याने वापरल्या आहेत. या भूमिका बजावताना कधीकधी त्या एकमेकांत सांडतात. तीन वाजता फोन आल्यावर रामप्रसाद जोरात ‘सर, फोन’ म्हणून ओरडतो किंवा अचानक भवानीप्रसाद घरी आल्यावर आतून आईची हाक येते आणि लकी ‘मां’ म्हणून ओरडतो.

तर प्रत्येक वेळी ‘गोलमाल’ बघताना हे खाण्यापिण्याचं आठवायचं. तेव्हा या चित्रपटात कुणीही कुणाला खाल्लेलं नाही, सगळे उपाशीपोटीच कामं करत होते हे एकदा स्पष्ट करावं असं वाटलं.