उत्कंठावर्धक रहस्यमालिका : मिलेनियम ट्रिलॉजी

२००४ मध्ये स्टीग लारसन या स्वीडीश पत्रकाराने दोन जाडजूड कादंबर्‍यांची हस्तलिखिते एका प्रकाशकाकडे पाठवली. तिसर्‍या कादंबरीचे काम चालू होते. पहिल्या प्रकाशकाने हस्तलिखिते साभार परत पाठवली. (नंतर आपल्या या निर्णयाबद्दल त्याने कपाळ बडवून घेतले असणार.) दुसर्‍या एका प्रकाशकाने तीन कादंबर्‍यांसाठी स्टीग लारसनला करारबद्ध केले. तिसरी कादंबरी पूर्ण करून पाठवल्यानंतर काही दिवसांनी लिफ्ट बंद होती म्हणून ५० वर्षांचा लारसन काही मजले चढून गेल्यावर ऑफिसातच कोसळला आणि हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. या तीन कादंबर्‍या अनुक्रमे २००५, २००६ आणि २००७ मध्ये प्रकाशित झाल्या. मिलेनियम ट्रिलॉजी या नावाखाली या तीन कादंबर्‍यांनी इतिहास घडवला. २००८ मध्ये सर्वाधिक खप असलेल्या लेखकांच्या यादीत खालिद हुसेनीच्या पाठोपाठ लारसन दुसर्‍या क्रमांकावर होता.

या तीन कादंबर्‍या म्हणजे ‘द गर्ल विथ अ ड्रॅगन टॅटू’, ‘द गर्ल हू प्लेड विथ फायर’ आणि ‘द गर्ल हू किक्ड द हॉर्नेट्स नेस्ट’. कादंबर्‍यांची पृष्ठसंख्या नेहेमीपेक्षा थोडी जास्त आहे (५००-७०० पाने). तिन्ही कादंबर्‍या मिळून जवळजवळ १७०० पाने होतात.

कथेची नायिका लिस्बेथ सलांदर एकलकोंडी आहे. लहानपणी बापाच्या मारहाणीतून आईची सुटका व्हावी म्हणून बापाचा खून करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिची रवानगी मनोरूग्णालयात झाली. स्किझोफ्रेनिक, डिलुझनल, हिंसक प्रवृत्ती, सहकार्य न करण्याची वृत्ती अशी अनेक निदाने तिच्या रिपोर्टमध्ये आहेत. रूग्णालयातून सुटका झाल्यानंतरही पालकांकडून लैंगिक शोषण, दारूच्या नशेत असताना दोनदा पोलिसांकडून अटक. तिच्या बाजूने म्हणाव्या अशा फारच थोड्या गोष्टी तिच्याकडे आहेत. एक म्हणजे ती अत्यंत बुद्धीमान आहे आणि दुसरे ती एक अफलातून हॅकर आहे. या दोन गोष्टी आणि कुठल्याही प्रसंगामधून वाट काढण्याची तिची प्रवृत्ती यामुळे एकामागून एक कठीण परिस्थितींवर मात करण्यात ती यशस्वी होते. कथेचा नायक मिकेल ब्लूंकविस्ट बराचसा लारसनवर बेतलेला आहे. मिकेल पत्रकार आणि ‘मिलेनियम’ या वृत्तपत्राचा अर्धा मालक आहे.

प्रत्येक लेखक आपापल्या आवडीनुसार आणि कथेच्या मागणीनुसार निवेदक आणि त्याचा दृष्टीकोन यांची निवड करतो. ‘डेव्हीड कॉपरफिल्ड’मध्ये डिकन्सने प्रथम पुरूष निवेदक वापरला नसता तर ती कादंबरी तितकी प्रभावी ठरली नसती कारण तिचे स्वरूप आत्मचरित्रासारखे आहे. रहस्यकथेमध्ये खून कुणी केला हे शोधायचे असेल तर निवेदक खुनी असून चालणार नाही. (अपवाद : अगाथा ख्रिस्तीच्या एका कथेत निवेदकानेच खून केलेला असतो. कथा कोणती ते सांगत नाही, उगीच रसभंग नको.) साय-फाय, रहस्यकथा यात बहुतेक वेळा निवेदक तृतीय पुरूष असतो. बरेचदा या तृतीय पुरूष निवेदकाचा दृष्टीकोन सर्वज्ञाचा असतो. त्याला सगळीकडे काय चालले आहे त्याची माहिती असते आणि तो पात्रांच्या मनातले विचारही जाणतो. याउलट ‘हॅरी पॉटर’मध्ये निवेदक तृतीय पुरूष आहे मात्र त्याचा दृष्टीकोन सर्वज्ञाचा नाही तर हॅरीचा आहे. हॅरीला ज्या गोष्टी माहीत आहेत त्याच गोष्टी निवेदकाला आणि पर्यायाने वाचकांना माहीत आहेत.

लारसन तृतीय पुरूष सर्वज्ञाचा दृष्टीकोन निवडतो. निवेदक पात्रे आणि घटना यांच्यामधून वेगाने वाट काढत जातो. पात्र बदलले की बहुतेक वेळा नवीन पात्राच्या नावाने नवीन परिच्छेद सुरू होतो. लारसेनची प्रसंगांचे वर्णन करण्याची शैली वेळ न घालवता चटकन मुद्यावर येते. चटपटीत संवादांमुळे कथानकाचा वेग कुठेही कमी झाल्याचे जाणवत नाही.

पहिल्या कादंबरीत मिकेल एका ४० वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाचा शोध लावण्याचे काम करत असताना योगायोगाने त्याची भेट लिस्बेथशी होते. तिच्या मदतीने तो या रहस्याचा छडा लावण्यात यशस्वी होतो. दुसर्‍या कादंबरीत अनेक नाट्यपूर्ण घटनांमध्ये लिस्बेथवर तीन खुनांचा आरोप येतो आणि ती फरार होते. तिसर्‍या कादंबरीत लिस्बेथला अटक आणि तिच्यावरील खटला चालू असताना या सर्व घटनांना एक वेगळीच कलाटणी मिळते. हे सर्व संक्षेपात सांगण्याचा कारण असे की मिकेल आणि लिस्बेथ यांच्याखेरीज यात आणखी बरीच महत्वपूर्ण पात्रे आहेत. दुसर्‍या महायुधादरम्यान स्वीडनमध्ये निर्माण झालेल्या नाझी संघटना, ७०-८०च्या दशकातील स्वीडनमधील राजकीय घडामोडी, स्विडीश सिक्युरिटी सर्व्हिस अर्थात सॅपो ही स्वीडीश सरकारपासूनही गुप्त ठेवलेली संघटना, १९८६मधील स्वीडीश पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या या सर्व घटनांचे संदर्भ कादंबरीत घडणार्‍या घडामोडींना आहेत. यामुळे प्रत्येक कादंबरीचा कॅनव्हास आधीपेक्षा विस्तृत होत जातो. हे सर्व प्रत्यक्ष वाचण्यातच मजा आहे. कादंबरी स्वीडनमध्ये घडत असल्यामुळे सर्व पात्रे अर्थातच स्विडीश आहेत. त्यामुळे बरेचदा Wadensjöö किंवा Svavelsjö सारख्या नावांचा उच्चार कसा करावा ते कळत नाही. परिणामत: वाचनात मधूनमधून व्यत्यय येतो. अर्थात यामुळेच कादंबरीला खरेखुरे स्विडीश वातावरण मिळते हे ही खरेच. अगाथा ख्रिस्ती, एनिड ब्लिटन यांचे उल्लेख किंवा “The strange thing about the dog is that it did not bark, my dear Watson” हे वाक्य वाचल्यानंतर लारसनची साहित्यिक स्फूर्तिस्थाने कोण असावीत याचा अंदाज येतो.

शीत युद्धादरम्यानच्या काळात युरोपियन देशांमधील एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी खेळले गेलेले डावपेच आणि त्यासाठी बळी पडलेली सामान्य जनता यांचे पर्यवसान हिंसा, क्रौर्य, सूड, निर्दयता यासारख्या भावनांमध्ये रंगून निघालेल्या एका dark, bordering on ominous अशा कथेमध्ये होते. वाचताना ‘सिन सिटी’मधील काहीशी सरियल रंगसंगती आठवते. नायिका सलांदर तिने स्वत: निश्चित केलेल्या मूल्यांना निश्चित जपते, पण बहुतेक वेळा ही मूल्ये समाजाने ठरवलेल्या नीतिमत्तेच्या चौकटीत बसत नाहीत. त्या मानाने मिकेल बराच सरळ आहे पण अंतिम ध्येय महत्वाचे की त्यासाठी चोखाळलेली वाट महत्वाची असा प्रश्न आल्यावर त्यालाही कधीकधी तो पाळत असलेल्या पत्रकारितेच्या मूल्यांशी तडजोड करावी लागते.

कट्टर उजव्या विचारसरणीच्या संघटना, स्वीडनमध्ये ८०-९० च्या काळात निघालेल्या निओनाझी संघटना यांचा लारसनने नेहेमीच विरोध केला. याबद्दल त्याला बरेचदा खुनाच्या धमक्याही मिळाल्या होत्या. त्याचा मृत्यू नैसर्गिक नव्हता असे काही लोक मानतात. स्त्रियांच्या हक्कांसाठी लढण्यात त्याने बरेच योगदान दिले. याच्या अनुषंगाने त्याने एक्स्पो नावाचे मासिक काढले. कादंबरीतील मिलेनियम हे मासिक एक्सपोशी मिळतेजुळते आहे.

मिलेनियम सिरीज युरोपात लोकप्रिय झालीच पण अमेरिकेतही या कादंबर्‍यांवर वाचकांच्या उड्या पडाव्यात हे विशेष आहे. हॅरी पॉटरचा अपवाद सोडला तर अमेरिकन वाचक अमेरिकन पार्श्वभूमी नसलेल्या कथांकडे फारसे आकर्षित होताना दिसत नाहीत. मिलेनियम सिरीजवर तीन स्वीडीश चित्रपट निघालेच आहेत, याशिवाय इंग्रजी चित्रपटही स्वतंत्रपणे निघणार आहेत. यात डॅनियल क्रेग मिकेलच्या आणि रूनी मारा सलांदरच्या भूमिकेत दिसतील तर दिग्दर्शक आहे सोशल नेटवर्क फेम डेव्हिड फिंचर. कादंबर्‍यांच्या हक्काचे करार बदलण्याचे प्रयत्नही चालू आहेत. तसे झाल्यास जेम्स बॉंडप्रमाणे सलांदर-मिकेल जोडीच्या कथांची मालिका सुरू होऊ शकेल. लारसनच्या संगणकावर चौथ्या पुस्तकाचे हस्तलिखित अपूर्ण स्वरूपात आहे. त्याची पार्टनर एव्हा गॅब्रिएलसन हिचा चौथी कादंबरी पूर्ण करण्याचा मानस आहे.

कोणताही पूर्वानुभव नसताना एकापाठोपाठ एक तीन तूफान लोकप्रिय कादंबर्‍या लिहीणे लारसनला कसे जमले असा प्रश्न पडणे साहजिक आहे. कदाचित सॉमरसेट मॉम म्हणतो तेच खरे. “There are three rules for writing a novel. Unfortunately, no one knows what they are.”

Comments

One response to “उत्कंठावर्धक रहस्यमालिका : मिलेनियम ट्रिलॉजी”

  1. Ashish Avatar

    या कादंबऱ्यांच्या पानांची संख्या बघून वाचून होईल का कधी असे वाटते. खरे सांगू, एवढे वाचले तर माझ्यासारख्याचा मेंदू उतू जाईल अशी उगीचच भीती वाटते हाहा

    आमच्यासारख्या लोकांसाठी या पुस्तकांवरून सिनेमे काढणारे देवदूतच म्हणायला पाहिजेत.

    लेख छान आहे.
    द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू हा सिनेमा नावावरून फँटसीपट असेल असे वाटले होते त्यामुळे पहिलाच नाही. आता पाहतो.