कालच सर पीटर स्टोथार्ड यांची मुलाखत वाचली. त्यांचे शब्द इतके प्रभावी होते की आमचे डोळे दिपले, मग गागल लावून बाकीची मुलाखत वाचली. आता इथे तुम्ही विचाराल, हे पीटर स्टोथार्ड कोण? हे ‘टाइम्स लिटररी रिव्ह्यू’चे संपादक आहेत आणि बुकर पारितोषिक निवड समितीवर आहेत. यांची दैदिप्यमान मुक्ताफळं पुढीलप्रमाणे, “पुस्तकांचं परीक्षण करणारे बरेच ब्लॉग आहेत हे चांगलंच आहे पण समीक्षकांची मतं आणि इतरांची (पक्षी : फाल्तू जन्तेची) मतं यांच्या दर्जामध्ये फरक असतो. इतके ब्लॉगर्स कोणती भलभलती पुस्तकं चांगली आहेत म्हणून सांगतात आणि लोकं वाचतात. यामुळे साहित्याची हानी होते आहे. सामान्य ब्लॉगर लोक समीक्षकांची गळचेपी करत आहेत.” काढली का नाय इकेट? याला म्हणता स्नॉबरी. काही म्हणा, टोपीकर ज्या अत्युच्च दर्जाची स्नॉबरी करतो ती आपल्यासारख्या लोकांना जमणं कधीही शक्य नाही. ही पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेली स्नॉबरी आहे, देवा. ही सहजासहजी मिळत नाही. दोन-तीनशे वर्षे जगावर राज्य करायचं, सगळ्यांचे खजिने लुटायचे, आणि मग हे सगळं मागासलेल्या जगाच्या भल्यासाठीच केलं अशी मखलाशी करायची असे अनेक उपद्व्याप केल्यानंतर ही स्नॉबरी रक्तात येते. सोपं काम न्हाई ते भावा!
पीटरबाबा काय म्हन्तोय धेनात आलं का? अभिजात साहित्य म्हणजे काय हे आम्ही तुम्हाला सांगूच, पण अभिजात समीक्षा कोणती हे ही आम्ही ठरवणार. आम्ही जे ठरवून देऊ तेच तुम्ही भक्तिभावानं वाचायचं. आणि तुम्हाला एखादं पुस्तक आवडलंच तर लगेच कळफलक बडवत जगाला सांगायला जाऊ नका, तुमची तेवढी लायकी नाही१.
पीटर साहेबांनी या वर्षी बुकरसाठी निवड करताना सात महिन्यात १४५ पुस्तकं वाचली. मी एक नंबरचा पुस्तकी किडा आहे पण हे वाचून मी बी पार हेलपाटलो बगा. २१० दिवसात १४५ पुस्तकं म्हणजे दीड दिवसाला एक पुस्तक२. अशा वेगानं पीटरसाहेब पुस्तक वाचणार, त्यातलं कोणतं चांगलं ते ठरवणार, त्याला बक्षीस देणार आणि ते आम्ही ब्रह्मवाक्य मानायचं? काहून? शेवटी समीक्षक – जरी खत्रूड असला तरीही – माणूसच असतो ना? मागे शंभर कुत्रे लागल्यावर माणूस ज्या वेगाने पळत सुटतो तितक्या वेगानं पुस्तकं वाचताना समीक्षेचा दर्जा खालावू शकत नाही का? पुस्तकाचा दर्जा ठरवताना त्याची वाक्यरचना, आशय, शब्द या सर्वांकडे लक्ष देणं अपेक्षित असावं. असं स्पीड रीडिंग करताना हे शक्य होतं? बरं, मग पीटरसाहेब बाकी काही करतात की नाही? उत्तर आहे, नाही. त्यांना कोणत्याही खेळात रस नाही आणि आयुष्यभरात त्यांनी फक्त सहा चित्रपट बघितले आहेत. संगीतात त्यांना रस आहे की नाही माहीत नाही. इथे आणखी एक मुद्दा येतो. ज्या माणसाला पुस्तकं सोडून बाकीचं जगच माहीत नाही, त्याला त्या पुस्तकांमध्ये जर ते बाकीचं जग असेल तर त्यात काय रस असणार? एखादं पुस्तक चित्रपट किंवा खेळाच्या पार्श्वभूमीवर असेल तर ते चांगलं की वाईट हे ते कसं ठरवणार?
पूर्वीच्या काळी पुस्तकं, शिक्षण, ज्ञानसंवर्धन फक्त एका वर्गाची मक्तेदारी असायची. पीटरजींना तेच अपेक्षित आहे असं दिसतं. नाही म्हणायला मागच्या वर्षी बुकर निवड समितीच्या अध्यक्षा स्टेला रिमिंग्टन यांनी “जी पुस्तकं लोक वाचतील आणि त्यांचा आनंद घेतील अशा पुस्तकांना पारितोषिक देण्यात यावं” असं म्हणून सगळ्यांचीच विकेट काढली होती. त्याला उत्तर म्हणून पीटर म्हणतात की ‘रीडेबिलिटी’ तितकीशी महत्त्वाची नाही. आरं बाबा, रीडेबिलीटी महत्त्वाची नाही ना, मग लिहू दे की ब्लॉगर लोकांना लिहायचं ते? तुझ्या पोटात का दुखतंय? पोटात अशासाठी दुखतंय की यांची जड शब्दातली बद्धकोष्ठी समीक्षा कुणी वाचायला तयार नाही. बहुतेक ब्लॉगर सामान्य वाचक असतात, त्यांना जे आवडतं किंवा आवडत नाही ते प्रामाणिकपणे लिहितात, वाचणारे वाचतात. पीटरच्या लेखी रोलिंगसारखे लेखक म्हणजे कस्पटासमान. आणि हॅरी पॉटर इतकं लोकप्रिय झालं त्याचा अर्थ ते नक्कीच फालतू असणार, तरी चालले सगळे रोलिंगबाईंच्या मागे. म्हणूनच रोलिंगबाईंना बुकर मिळणं शक्य नाही. सात पुस्तकांमध्ये एक प्रतिसृष्टी निर्माण करून जगभरातल्या लोकांना गुंतवून ठेवणं – त्यात काय मोठं? लोकप्रिय आहे ना मग ते चीपच असणार. त्यापेक्षा कुणालाही कळणार नाही असं एखादं पुस्तक लिहून दाखवा. साहित्याच्या कक्षा रूंदावून दाखवा. टोलकिनला नोबेल नाकारणारे याच जातीचे. विक्रम सेठला आजपर्यंत बुकर नामांकन मिळालेलं नाही ही गोष्ट बुकर समितीसाठी लाजिरवाणी आहे.
पीटरसाहेबांच्या मते फक्त मनोरंजन करणारी पुस्तकं महत्त्वाची नाहीत. अभिजात साहित्य म्हणजे काय हे दाखवणं समीक्षकाचं काम आहे. हे जरी मान्य केलं तरी हे तथाकथित अभिजात साहित्य खरंच अभिजात आहे हे कशावरून? आणि यांनी सांगितलं म्हणून लोक ते वाचतील का? वाचणार नसतील तर काय उपयोग? दुसरं – साहित्य खरंच अभिजात असेल तर त्याला समीक्षकांच्या सर्टिफिकेटची गरज आहे का? शेक्सपिअरची नाटकं, डिकन्सचे चित्रपट अजूनही का चालतात? शेरलॉक होम्स अजूनही का तग धरून आहे? त्यांना कुठल्या समीक्षकानं पास केलं होतं? अर्थात विल सेल्फप्रमाणे हे सगळे रद्दी असंच म्हणायचं असेल तर मुद्दाच खुंटला. (विल सेल्फ या वेळच्या बुकर स्पर्धेत आहे.)
असो, तर पीटरसाहेब सध्या बुकरसाठी अभिजात लेखक निवडण्यात मग्न आहेत. त्यांनी बुकर निवडून ‘हे वाच’ असं सांगेपर्यंत मी दुसरं काही वाचायचं नाही असं ठरवलं आहे. तुम्हीही पुस्तकांवर लिहू-बिहू नका. इथं साहित्याची हानी होते आहे त्याची कुणाला काळजीच नाही. वाचलं पुस्तक आणि चालले सांगायला जगाला आवडलं म्हणून.
पण मला एक वेगळीच चिंता आहे. पीटरसाहेबांना मराठी येत नाही त्यामुळे ते मराठी वाचणार नाहीत. मग मराठीत अभिजात काय आहे हे आपल्याला कसं कळणार?
—-
१. कल्पना करा, १०० वर्षांपूर्वी ब्लॉग असते आणि ही सुपीक कल्पना पीटरबाबाच्या डोक्यात आली असती तर काय झालं असतं? लगेच ऍक्ट पास करून सोम्या-गोम्यांचं ब्लॉगिंग बंद केलं असतं. तरीही लिहिलंच एखादं रसग्रहण, तर डायरेक्ट येरवडा. “टुम जैसा जाहिल, गवार लोग ब्लॉग लिखनेको नही मांगता.” इति नंतरच्या हिन्दी पिच्चरमधला टॉम अल्टर.
२. इथे वुडी ऍलन आठवला, “I took a speed reading course and read War and Peace in twenty minutes. It’s about Russia.”