पुन्हा कधीतरी…

अखेर आज बातमी आली. साठ्या क्लबचा प्रेसिडेंट झाला. ह्या क्लबसाठी रक्ताचं पाणी केलं पण कुणाला त्याची पर्वा नाही. आणि केलेलं बोलून दाखवायचा माझा स्वभाव नाही. विचार करता करता मन भूतकाळात गेलं…

स्वातंत्र्य मिळाल्यावर मला नेहमी दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागायच्या. एकदा तीनमूर्तीमध्ये गेलो असताना दार बंद, जवाहर कुणालाच आत येऊ देत नव्हता. पटेल, कृपलानी सगळे बाहेर ताटकळत उभे. मी आत गेलो तर जवाहर एकटाच पेशन्स खेळत बसलेला. मी म्हटलं, अरे देश चालवायचा सोडून हे काय? तर म्हटला, मला नाही इंटरेस्ट. त्याला काही अडचण आली की लगेच डिप्रेस व्हायचा. म्हटलं, असं करू नकोस. काय प्रॉब्लेम आहे? म्हणाला या सिव्हिल सर्व्हिसचं काय करायचं कळत नाहीये. मी त्याला समजावलं, काही झालं तरी आपली माणसं आहेत ती. त्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही. जवाहरला ते पटलं. त्याची मरगळ दूर झाली. त्यानं तिथल्या तिथे मला गृहमंत्रिपद देऊ केलं. “मला पदाचं आकर्षण नाही,” मी ताडकन उत्तर दिलं.

च्या मारी, साठ्यानं कुणाचा जॅक लावला कळत नाही.

असाच एकदा एका पार्टीत जेआरडी भेटला. त्याला विचारलं, सध्या काय चालू आहे? तर म्हटला की मालपुव्याची फ्याक्टरी टाकतो आहे. मी भुवया उंचावल्या तर म्हणाला की मला रोज रात्री मालपुवा खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. मी म्हटलं, जेआरडी असं करू नकोस. तुला हवं तर मालपुव्यासाठी दहा कुक ठेव. आज स्वतंत्र भारताला गरज आहे ती स्वदेशी विमानसेवेची. “व्हॉट अ ब्रिलियंट आयडिया!” जे आरडी चित्कारला आणि एअरइंडियाचा जन्म झाला. पहिल्या उड्डाणाला आम्ही दोघेही जातीने हजर होतो. “डिक्रा, आज टू नस्टास टर हे झाला नस्टा.” मोडक्यातोडक्या मराठीत माझे आभार मानताना जेआरडीचा कंठ भरून आल्याचं जाणवलं.

६०-६२ च्या काळात जॉनचे सारखे ट्रंककॉल यायचे. मग माझा बराचसा वेळ डीसीतच जायचा. ६२ च्या ‘बे ऑफ पिग्ज’ प्रकरणात आठवडाभर जॉननं मला जागचं हालू दिलं नाही. माझा मुक्काम ओव्हल ऑफिसच्या बाजूच्या खोलीतच होता. अखेर महायुद्ध टळलं तेव्हा कुठे मला परत यायला मिळालं. मी जाण्याआधी जॅकी म्हटली, “मी स्वत: केलेले प्यानकेक खाल्ल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही. असा वेंधळ्यासारखा नुसता बघत उभा राहू नकोस, मेपल सिरप वाढ लवकर.” (हे नंतरचं वाक्य जॉनला उद्देशून). मला एअरपोर्टवर सोडायला जॉन आणि रॉबर्ट दोघेही आले होते. एअरपोर्टवर फ्लाइटची वाट बघत असताना बारमध्ये ड्रिंक घ्यायला गेलो तर कुणीतरी जॉन आणि रॉबर्ट दोघांचीही पाकिटं मारली. त्यांचे रडवेले, हिरमुसलेले चेहरे बघवेनात, मग मीच ड्रिंकचे पैसे दिले, आणि घरी जाईपर्यंत असू द्यावेत म्हणून २०-२० डॉलर त्यांच्या खिशात कोंबले.

एकदा डीसीवरून येताना मध्ये लंडनला हॉल्ट होता. डाउनिंग स्ट्रिटवर डोकावलो तर मॅगी ‘दोन उलटे, एक सुलटा’ करत बसली होती. म्हटलं, हे निवृत्तीनंतरचे उद्योग आताच कशाला? तर म्हटली, या फॉकलंड प्रश्नाचं काय करायचं कळत नाहीये. मग मी तिला आपल्याकडच्या दोन-चार शौर्याच्या गोष्टी सांगितल्या, झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई वगैरे. ते ऐकून ती सावरल्यासाखी वाटली. दुसऱ्या दिवशी पेपर उघडला तर बाईंनी डायरेक्ट अर्जेंटीनावर हल्लाच केलेला. नंतर बकिंगहॅमलाही जाऊन आलो. एलिझाबेथला नाचणीच्या धिरड्याची रेसिपी हवी होती. तिथेच फिलीपही होता. त्याच्या क्यारेजमध्ये राजवाड्याला एक चक्कर मारून आलो.

मुंबईला गेलो की मनोहर गावसकरांकडे माझं नेहमी येणंजाणं असायचं. असाच एकदा गेलो असताना खाली सुनील एकटाच खेळत होता. त्याला एक ओव्हर टाकली. कसाही बॉल टाकला तरी त्याच्या बॅटने सरळ रेषा सोडली नाही हे माझ्या चाणाक्ष नजरेनं टिपलं. त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन वर गेलो तर सामानाची बांधाबांध चाललेली. हे काय म्हणून विचारलं तर मनोहर म्हटला की नवीन जागा मिळते आहे. तिथे सुनीलला खेळायला प्रशस्त ग्राउंडही आहे. मी लगेच त्याला थांबवलं, म्हटलं, “मनोहर, ही चूक करू नकोस. त्या पोराचा स्ट्रेट ड्राइव्ह इथे दोन्ही बाजूच्या बिल्डिंगांमुळे आपसूक तयार होतो आहे. त्यात खोडा घालू नकोस.” मनोहरला ते पटलं. त्यानं बेत क्यान्सल केला. यथावकाश सुनीलचा स्ट्रेट ड्राइव्ह जगप्रसिद्ध झाला. आजही सुनील भेटला की मिस्कीलपणे हसून स्ट्रेट ड्राइव्हची ऍक्शन करून दाखवतो. असाच सचिनच्या पुल शॉटचाही किस्सा आहे, त्याविषयी पुन्हा कधीतरी.

आता तर काय, जेटसेटिंगचं युग. कालच मॉस्कोची आठवड्याची ट्रीप उरकून परत आलो. पुतिन म्हणत होता, सगळ्या पत्रकारांना जेलमध्ये टाकतो. त्याला म्हटलं, “वालोजा, वालोजा, असं करू नकोस. पत्रकारांची अशी सरळसरळ मुस्कटदाबी केलीस तर तुझ्यात आणि बराकमध्ये फरक काय राहिला?” “तसाही फरक कुठे आहे?” पुतिनचा बिनतोड वकिली मुद्दा. परत येऊन बूड टेकतोय तर लगेच ओबामा स्काइपवर. पुतिन काय म्हणत होता? म्हटलं, तू रेकॉर्ड केलंच असशील की सगळं. मध्येच मिशेल डोकावून गेली. स्वस्तात प्लंबर कुठे मिळेल म्हणून विचारत होती. मग बराक तिच्यावर उखडला, “माझं इथे महत्त्वाचं बोलणं चालू असताना तुझं काय मध्येच?” “साधा प्लंबर आणता येत नाही आणि देश चालवायला निघालेत.” अनपेक्षितपणे घरचा आहेर मिळाल्यावर बराक कळवळला. त्यांना वाटेला लावलं तर सारकोझीचा फोन – परत चान्स मिळेल का म्हणून विचारत होता. म्हटलं, मस्य, इतकं सोपं असतं का ते? तर म्हटला सोपं नाहीये म्हणून तर तुला फोन केला. म्हटलं अरे बाबा, मला बर्रर्र लावून काही उपयोग नाही, झ स्वी देझोले.

हे सगळं चालू असताना क्लबकडे दुर्लक्ष झालं आणि साठ्यानं डाव साधला. चालायचंच. असंच एकदा व्हॅटिकनमध्ये पोप जॉन पॉलच्या बाबतीतही झालं होतं, त्याविषयी पुन्हा कधीतरी.