विनोदी लेखकांना नेहमीच कमी दर्जाचं स्थान मिळालेलं आहे. दरबारात विदूषकाचं जे स्थान तेच साहित्यात विनोदी लेखकाचं. विनोद निर्माण करायला फारसे कष्ट पडत नाहीत असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे. ज्या निष्काळजीपणे लोक विनोदनिर्मिती करतात त्यात हे दिसून येतं. इथे गैरसमज नको. रोज आपण बोलताना ज्या चकाट्या पिटतो त्या काळजीपूर्वक पिटाव्यात असं म्हणणं नाही. पण विनोदी चित्रपट, मालिका किंवा विनोदी लेख यात कोणत्याही प्रकारचा विनोद थोड्या तरी प्रमाणात असावा ही अपेक्षा गैर नाही. बरेचदा लेख वाचल्यानंतर ह्यात विनोद कुठे होता असा प्रश्न पडतो. पुलंच्या ‘गाळीव इतिहासातील’ कोणतंही पान उघडून वाचावं. उच्च पातळीचा विनोद कसा असावा, ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत प्रतिभावंत कवींवर किंचितही ओरखडा न येऊ देता त्यांचं विडंबन कसं करावं अशा अनेक गोष्टी यात ज्या सफाईने साधलेल्या आहेत त्याला तोड नाही. (“ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम वगैरे संतमंडळींचे महाराष्ट्रावर फार मोठे उपकार आहेत. त्यांनी लिहिले नसते आणि संत व्हायचे सोडून भलत्या नादाला लागले असते तर ‘ओल्ड मराठी’च्या पेपरचे वांधे झाले असते.” “नामदेव पंजाबात लोकप्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. अजूनही मराठी लेखकाला अन्य भाषेत लोकप्रियता मिळाली तरी तेच होते.”) पण हे सगळं करण्यासाठी प्रतिभा लागते हेच मान्य नसतं. विनोद काय, कुणीही, कधीही करू शकतं.
पुलंवर भरपूर टीका झाली आणि होते आहे. पण त्यांचे टीकाकार एक गोष्ट लक्षात घेत नाहीत. त्यांना इतकी लोकप्रियता मिळण्यामागे मूलभूत कारण त्यांचा विनोद जातिवंत होता हे आहे. इथे लगेच आक्षेप येतो की आजच्या काळात त्यांचा विनोद शिळा झाला आहे. असा आक्षेप घेण्यामागे विनोदाच्या कार्यकारणभावाबद्दल अज्ञान दिसतं. कोणताही विनोद पहिल्यांदा ऐकताना जो परिणाम होतो तो परत ऐकताना होत नाही. विनोदाचं बलस्थान हे त्याच्यामध्ये जी अनपेक्षित कलाटणी असते तिच्यात असतं. ती कलाटणी एकदा कळली की विनोदाचं अर्धं आयुष्य संपतं. परत ऐकताना हसू येऊ शकतं पण कमी प्रमाणात येतं आणि तरीही लोक त्या विनोदाला ऐकत-वाचत राहिले तर त्यामागे दाद देण्याचा हेतू असतो. दुसरा मुद्दा – काही वेळा विनोद हा ‘ऑब्झरव्हेशनल कॉमेडी’ – आजूबाजूला जे दिसतं आहे त्यातील विसंगती शोधून त्यावर विनोद करणे – या प्रकारात येतो. जिम कॅरीपासून साइनफेल्डपर्यंत सर्व ‘स्टॅंड-अप’ कमेडियन्स या प्रकाराचा अवलंब करतात. पुलंच्या विनोदाचा काही भाग या प्रकारात मोडतो. साहजिकच या प्रकारच्या विनोदाला स्थल-कालाची बंधने असतात. त्या काळच्या पोस्ट खात्यावर केलेला विनोद आज जर ते पोस्ट खातं अस्तित्वातच नसेल तर कळायला कठीण जाणार. पण याचा अर्थ त्या विनोदाचा दर्जा कमी आहे असा होत नाही. आणि तरीही त्यात शाब्दिक कसरती, कोट्या वगैरेंची इतकी रेलचेल असते की त्या काळचं पोस्ट खातं बघितलं नसेल तरी आनंद लुटता यावा. पुलंचा इतर विनोद माणसांच्या स्वभावातील विसंगती (विसंगत्या?), भाषेच्या गमतीजमती यामुळे आनंद देऊन जातो.
विनोदाची एक गंमत असते. विनोदाचं सोंग घेता येत नाही. एखादी गोष्ट विनोदी असते किंवा नसते. असली तर लोकांना हसा म्हणून सांगावं लागत नाही, ते आपणहून मनमुराद हसतात. पण विनोदी नसेल तर त्या गोष्टीचं अस्तित्वच धोक्यात येतं. गंभीर लेख जमला नाही तर त्याचं खापर लोकांच्या माथी मारून सुटका करून घेता येते. विनोदी लेखाला लोक हसले नाहीत तर तो विनोदी नाही हे सिद्ध होतं, आणि मग त्याचं स्वरूप केविलवाणं होतं. अशा लेखातल्या तथाकथित ‘पंचेस’वर (असले तर – काही लेखांना पंच, बोलर, बॅट्समन काहीच नसतं.) हसू येत नाही, लेख विनोदी आहे हे सिद्ध करण्याची पराकाष्ठा केल्यामुळे आता तो गंभीरही होऊ शकत नाही. शांती न मिळालेल्या अतृप्त आत्म्याप्रमाणे बिचारा मध्येच कुठेतरी लटकत राहतो. जेरी साइनफेल्डनं यावर अनेकदा टिप्पणी केली आहे. (“It’s hard being a standup comic- sometimes they don’t laugh.” – Elaine Benes) एकदा जेरी अर्धवट झोपेत असताना त्याला एक विनोद सुचतो आणि तो लिहून ठेवतो. उठल्यावर त्याला काय लिहिलं आहे ते वाचता येत नाही. पूर्ण एपिसोड तो डॉक्टरांपासून नर्सपर्यंत सर्वांना काय लिहिलं आहे ते वाचायला सांगतो. शेवटी जेव्हा उलगडा होतो तेव्हा त्यात काहीच विनोदी नसतं. त्या वेळेला त्याला जे विनोदी वाटलं तो नंतर फुसका बार निघतो.
गंभीर लेखकांवर ‘एक्सपायरी डेट’ नसते. शंभर वर्षांनंतरही त्यांच्या लिखाणातील सखोलता वगैरेंवर लोक चर्चा करतात. बिचाऱ्या विनोदी लेखकाला मात्र लगेच कालबाह्य व्हावं लागतं. एकदा हसून झालं की लोक नवीन काय म्हणून विचारतात. पण गंभीर लेखकाइतकेच कष्ट विनोदी लेखकालाही घ्यावे लागतात याचा सोईस्करपणे विसर पडतो कारण विनोदी लेखकांना उच्चभ्रू वर्तुळात प्रवेश नाही. एखादा वुडी ऍलन अपवाद. हेच थोड्याफार फरकाने मनोरंजन करणाऱ्या लेखकांबद्दलही दिसतं. अगाथा ख्रिस्तीच्या कथा एकाच साच्यामधून आलेल्या आहेत अशी तिच्यावर टीका होते. पण इतक्या कथा लिहूनही लोकांना त्यात अजूनही रस आहे त्याअर्थी त्यात काहीतरी रंगतदार आहे आणि ते निर्माण करण्यासाठी कौशल्य लागत असेल हे मान्य होत नाही 1.
विनोदी लेखनाच्या शोधात असताना एक जुनं पुस्तक सापडलं. कव्हर अर्धं फाटलेलं, पिवळी पानं, आत “GODFREY ATUDO 23RD MAY 1981” असं नाव आणि सही होती. अशा पुस्तकांचा प्रवास इतका झालेला असतो की आपल्या हातात ते नेमकं कसं आलं हे कळणं अशक्य असतं. पुस्तक होतं, वुडहाऊसचं “Leave it to Smith.” वाचायला सुरुवात केली आणि बरेच दिवसांनी मनमुराद हसण्याचा आनंद मिळाला. कथानक कोणत्याही मसाला चित्रपटाची कथा म्हणून शोभून दिसेल. ब्लॅंडींग्ज कॅसलच्या मालकिणीचा मौल्यवान हार आणि तो चोरण्यासाठी आलेले हौशे, नवशे आणि गवशे. वुडहाऊसच्या शाब्दिक कसरती अफलातून आहेतच, शिवाय प्रसंगनिष्ठ विनोदही लाजबाब आहे. वुडहाऊस, पुलं यासारख्या लेखकांचं एक वैशिष्ट्य हे की विनोदनिर्मितीसाठी त्यांनी वापरलेले शब्द अगदी अचूक असतात. उदा. कथेतील मुख्य पात्र स्मिथ – याला मासे अजिबात आवडत नसतात. त्यासाठीच तो मासेमारीच्या कंपनीतील नोकरी सोडतो. नंतर वर्तमानपत्रात नोकरीसाठी तो एक जाहिरात देतो. याबद्दल बोलताना तो सांगतो, “I am confidently expecting shoals of replies.” शोल चा अर्थ आहे माशांचा थवा. इथे वुडहाऊस इतर कोणताही शब्द वापरू शकला असता पण मग ते वाक्य सामान्य झालं असतं. शोल हा शब्द वापरल्यामुळे आधीचा माशांचा संदर्भ इथे अचूकपणे येतो.
वर्षानुवर्षे पुस्तकं वाचत असाल तर आपल्या आवडीनिवडींमध्ये कसा बदल होत जातो हे बघणं मनोरंजक असतं. आवडीनिवडींमागे असलेले छुपे पूर्वग्रह प्रभावी असतात. वुडहाऊस वाचणं सोडून दिलं होतं – कथानकात येणारा तोचतोपणा हे कारण असावं. फार मोठी चूक. वुडहाऊसची सूक्ष्म ते स्थूल अशी विनोदनिर्मिती किंवा अगाथा ख्रिस्तीचं ‘वॉटरटाइट प्लॉट’ अशा अनेक गोष्टी लक्ष दिल्या तर दाद देण्यासारख्या असतात. पण त्याऐवजी आपण आपल्याला काय हवं आहे ते शोधत बसलो तर हातात काहीच पडत नाही.
- बरेचदा इंग्रजी पुस्तकांच्या पहिल्या दोन-तीन पानावर अवघड शब्दांचे अर्थ मराठीत लिहिलेले आढळतात. इथे पुस्तक विद्रूप होणे ही बाब सोडली तर कुणीतरी प्रयत्नपूर्वक इंग्रजी वाचन करत आहे ही गोष्ट चांगली असते. दुर्दैवाने चार-पाच पानातच हा उत्साह संपलेला दिसतो. आजवर एकाही पुस्तकात सुरुवातीपासून शेवटापर्यंत शब्दांचे अर्थ लिहिलेले आढळलेले नाहीत. असं का झालं याचं उत्तर लगेच मिळतं. इंग्रजीत वाचायला सुरुवात करताना जर नायपॉल किंवा अमर्त्य सेन पासून सुरुवात केली जर अडचण दुहेरी होते. भाषेचा अडसर असतोच, शिवाय विषयही दुर्लभ असतो. त्याऐवजी वुडहाऊस, अगाथा खिस्ती किंवा हॅरी पॉटर यापासून सुरुवात केली तर सोपे जावे. किंवा कॉमिक्स याहूनही उत्तम. दुसरा मुद्दा – वाचताना प्रत्येक अडलेला शब्द बघण्याची गरज नाही. तसं केलं तर अर्ध्या तासातच शीण येईल. उलट अडलेले शब्द सोडून संदर्भावरून किती आकलन होते ते बघावे. एखादा शब्द परतपरत येत असेल तर बघायला हरकत नाही. ↩︎