फसलेली पुस्तकं

माझी एक सवय सांगायला हवी. कोणतंही पुस्तक वाचताना ते फसलय असं लक्षात आलं रे आलं की माझा त्यातला इंटरेस्ट संपतो. मग एक तर मी तिथेच थांबवतो किंवा कथानकाचं पुढं काय झालं हे बघायचं असेल तर भरभर चाळून शेवटाला जातो आणि पंधरा-वीस मिनिटात ते पुस्तक (एकदाचं) संपवतो. ही सवय आपोआप आलेली नाही. पुस्तक धो-धो बोअर झालं तरी नेटानं संपवायचंच असा शेवटपर्यंत खिंड लढवण्याचा बाणेदार पवित्रा एकेकाळी होता. नंतर त्यातला फोलपणा लक्षात यायला लागला. आधीच वेळ कमी, पुस्तकं अमर्याद. मग न आवडलेल्या पुस्तकावर वेळ घालवण्यापेक्षा आवडीच्या पुस्तकावर का घालवू नये?

काही महिन्यांपूर्वी एक पुस्तक वाचलं, ‘व्हेन वी वेअर ऑर्फन्स.’ लेखक – काझुओ इशिगुरो. इशिगुरोचा जन्म जपानमधला, पण लहापणीच आई-वडीलांबरोबर इंग्लंडला गेला आणि तिथेच स्थाईक झाला. त्याची लेखनशैली विलक्षण आहे. एका गार्डीयनच्या टीकाकारानं लिहीलं होतं, ‘हे पुस्तक वाचताना मला बराच वेळ काहीतरी चुकतय अशी जाणीव होत होती पण काय ते लक्षात येत नव्हतं. मग अचानक लक्षात आलं – इशिगुरो फ्राजल व्हर्ब वापरतच नाही. त्यामुळे त्याचं इंग्रजी फार वेगळं वाटतं.’
इशिगुरो अत्यंत मोजक्या शब्दांमध्ये जे वर्णन करतो ते इतर लेखकांना दहा पानं खर्च करूनही जमलं नसतं. त्याचं ‘ऍन आर्टीस्ट इन फ्लोटिंग वर्ल्ड’ याआधी वाचलं होतं त्यामुळे अपेक्षा खूपच वाढल्या होत्या.

काही पुस्तकं फसत आहेत हे पहिल्या काही पानातच उमगतं. या पुस्तकाबाबत मात्र वेगळंच झालं. पुस्तकाच्या जवळजवळ २०९ व्या पानापर्यंत सगळं काही ठीक होतं. नंतर काही पानातच कळून चुकलं की हे फसतय. असं फार कमी पुस्तकांच्या बाबतीत होतं. हे असं का झालं याचा उलगडा इशिगुरोची मुलाखत वाचल्यावर झाला. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने या पुस्तकात अगाथा ख्रिस्तीप्रमाणे रहस्यकथा लिहायचा प्रयत्न केला होता. मात्र अगाथा ख्रिस्तीच्या कथेच्या शेवटी सर्व धागे जसे आपसूक जोडले जातात तसे त्याला इथे करणं जमलं नाही. यावरून ‘अगाथा ख्रिस्ती नेहेमी एकाच साच्याच्या कथा पाडत असते’ अशी टीका जरी होत असली तरी त्यातही किती कौशल्य असावे लागते याची जाणीव होते.

ही कथा आहे ख्रिस्तोफर बॅंक्स डिटेक्टीव्हची. यामागे शेरलॉक होम्सची प्रेरणा होती असं इशिगुरो म्हणतो. याचं लहानपण शांघायमध्ये जातं. तेव्हाच्या चीनमध्ये ओपियमचा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालू होता. याला बॅक्सच्या आईचा विरोध असतो. परिस्थिती टोकाला गेल्यानंतर अचानक त्याचे आईवडील बेपत्ता होतात. त्याला पुढील शिक्षणासाठी इग्लंडमध्ये पाठवलं जातं. यथावकाश तो एक प्रथितयश डिटेक्टीव्ह बनतो आणि योगायोगाने एका केसच्या संदर्भात आपल्या आई-वडीलांचं काय झालं याचा शोध घेण्याची संधी त्याला मिळते. यासाठी तो शांघायला परत जातो. कथानक घडतं दुसर्‍या महायुद्धाच्या आधी आणि ही केस यशस्वीपणे सोडवली तर एक जागतिक आपत्ती टळू शकेल असंही सूचित केलं जातं.

इथपर्यंत सगळं ठीक आहे. इशिगुरोची वर्णनं, संवाद, व्यक्तिरेखा नेहेमीप्रमाणेच मंत्रमुग्ध करणारे आहेत. पण जसजसा बॅक्स रहस्य सोडवण्याच्या जवळजवळ जातो, तसतशी त्याची कथानकावरची पकड सुटत आहे असे जाणवते. कथेचे निवेदन प्रथम पुरूषामध्ये आहे. अचानक निवेदकाचे स्वत:वरचे नियंत्रण सुटले आहे असे जाणवते. इतक्या वेळ भरवशाचा असलेला निवेदक अचानक बेभरवशाचा बनतो. मग आधी जे सांगितलं त्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न पडतोच. शिवाय प्लॉट कुठच्याकुठे जातो ते वेगळंच. एकूणात इशिगुरोला नेमकं काय साध्य करायचं होतं याबाबतचा गोंधळ शेवटपर्यंत कायमच राहतो. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला ‘मिस्टरी इन अ मिस्टरी’ करायची होती, पण उत्तरार्धात ही मिस्टरी इतकी ढिसाळ होते की होम्स किंवा अगाथा ख्रिस्तीशी तुलनाही अशक्य होते.

हे पुस्तक आवडलं का असा प्रश्न विचारला तर अमुक पानापर्यंत आवडलं असं उत्तर देईन. पूर्वार्धात इशिगुरोनं रंगवलेलं लंडनमधील वास्तव्य, त्याचं शांघायमध्ये गेलेलं बालपण केवळ अप्रतिम आहे. नंतर जे काय होतं ते वाचणं म्हणजे भारतीय संघ मजबूत स्थितीतून पराभवाच्या छायेत जाताना जसं वाटतं तसं काहीसं आहे.

—-

१. नुकतंच आर्थर सी. क्लार्कचं ‘रॉंदेवू विद रामा’ – वाचलं म्हणणार नाही – चाळलं. ‘हे राम’ म्हणायची पाळी आली. इतकं तूफान बोअर झालं की त्यापुढे ‘शैतानी दरवाजा’ बघणं, स्वत:च्या नखांचा रोज फोटो काढून ती किती वाढली आहेत ते मोजणं, ऑरकुटवरच्या कविता वाचणं, एक चमचा साखरेत किती दाणे येतात हे मोजणं हे सगळे प्रकार बंजी जंपिंग इतके इंटरेस्टींग वाटले असते.