गेला महिनाभर जागतिक बुद्धीबळस्पर्धेमध्ये भारताचा विश्वनाथन आनंद आणि इस्त्राइलचा बोरिस गेलफांड यांच्यात विश्वविजेतेपदासाठी अटीतटीचे सामने सुरू होते. एका बंद खोलीत दोन लोक तीन तास डोक्याला हात लावून गप्प बसून राहणार. साहजिकच वृत्तपत्रांच्या दृष्टीने या लढतीची ‘न्यूज व्हॅल्यू’ फारच कमी होती, तिला पाचव्या-सहाव्या पानावरच्या एखाद्या कोपर्यात जागा मिळत होती. मूठभर खंदे बुद्धीबळ चाहते मात्र या लढतींकडे डोळे लावून बसले होते. याआधी आनंदने २००८ आणि २०१० मध्ये अनुक्रमे क्रामनिक आणि टोपोलोव्हला हरवून विश्वविजेतेपद मिळवलं आणि राखलं होतं.
बुद्धीबळ हे नाव चेस पेक्षा अधिक समर्पक आहे. अर्थात इथे प्रश्न फक्त बुद्धीचा नसतो. अशक्य कोटीतील मानसिक ताणाखाली कोण जास्त वेळ टिकून राहतो यावरही बरंच अवलंबून असतं. बुद्धीबळामध्ये कला आणि शास्त्र यांचा सुरेख संगम बघायला मिळतो. बुद्धिबळाच्या कोणत्याही डावात तीन भाग असतात. ओपनिंग, मिडल गेम आणि एंड गेम. अशा अत्युच्च पातळीवरील खेळांमध्ये सुरवातीच्या खेळ्या आणि या खेळ्यांचे वेगवेगळे उपप्रकार ठरलेले असतात. यांना स्टॅंडर्ड ओपनिंग्ज म्हणतात. उदा. सिसिलियन डिफेन्स किंवा किंग्ज इंडियन डिफेन्स इ. पांढर्याने पहिली खेळी केली की तिला कसे उत्तर द्यायचे हे काळा या स्टॅंडर्ड ओपनिंग्जमधून ठरवतो.
यावरून एखाद्याला वाटेल की सुरूवातीच्या खेळ्या ठरलेल्याच आहेत तर मग त्यात मजा काय राहीली? परिस्थिती एकदम उलटी आहे. अगदी पहिल्या खेळीवरूनही कसलेले खेळाडू बरेच अंदाज बांधू शकतात. उदा. पांढर्याने प्यादे डी चार घरात सरकवून सुरूवात केली तर तो विजयासाठी प्रयत्न करणार आहे हे स्पष्ट होते. याउलट त्याने घोडा एफ ३ घरात देऊन सुरूवात केली तर त्याला कोणताही धोका न पत्करता बरोबरीची अपेक्षा आहे असे मानले जाते. या सगळ्या ओपनिंग्ज आणि त्यांचे शेकडो उपप्रकार हे खेळाडू कोळून प्यालेले असतात. त्यामुळे कोणती ओपनिंग खेळली जात आहे हे एकदा निश्चित झालं की खेळ्या झटपट होतात१. मग काळा किंवा पांढरा कुणीतरी पुस्तकात दिलेल्या खेळीपेक्षा वेगळी (आणि कधीकधी अत्यंत दुर्मिळ अशी) खेळी – नॉव्हेल्टी – करतात. इथे खरा डाव सुरू होतो. आतापर्यंत बहुधा खेळ मिडल गेममध्ये आलेला असतो. अर्थात कधीकधी पहिल्या पाच-दहा खेळ्यांमध्येच नॉव्हेल्टी दिसते. उदा. आनंदने बाराव्या डाव्यात सहावी खेळी करताना बी ३ घरात प्यादे सरकवून बोरिसला बराच वेळ गुंतवून ठेवले होते. अर्थात बोरिसनेही याचे अचूक उत्तर दिले.
जागतिक स्पर्धेसाठी हे खेळाडू जेव्हा तयारी करतात तेव्हा कोणती ओपनिंग वापरायची आणि कोणती नाही यावर बराच वेळ विचार केला जातो. यासाठी सहाय्यक म्हणून दोघांकडेही कसलेल्या ग्रॅंडमास्टरांची टीम असते. यांना ‘सेकंड्स’ म्हणतात. सेकंड्स म्हणून आपला प्रतिस्पर्धी कुणाची मदत घेतो आहे याकडेही दोघांचे बारीक लक्ष असते कारण बरेचदा सेकंड्सने त्यांच्या कारकीर्दीत खेळलेल्या डावांचाही उपयोग केला जातो. याहूनही महत्वाचे म्हणजे या खेळाडूंना पडद्यामागून काही लोक मदत करत असतात. यांची नावे स्पर्धा संपल्याशिवाय समोर येत नाहीत. २०१० च्या टोपोलोव्हविरूद्धच्या सामन्यांसाठी आनंदला माजी विश्वविजेते कास्पारोव्ह आणि क्रामनिक यांनी मदत केल्याचे नंतर समोर आले तर यावेळी फिडे रेटींगप्रमाणे पहिल्या क्रमांकावर असलेला मॅग्नस कार्लसन त्याचा ‘पडद्यामागचा सेकंड’ असल्याची चर्चा जोरात आहे. प्रत्येक खेळाडू प्रतिस्पर्ध्याला किती आणि कसा चकित करू शकतो हे त्याच्या टीमच्या प्रिपरेशनवर अवलंबून असते. मिडल आणि एंड गेममध्ये खेळाडूंची कसोटी लागते कारण इथे टीमसोबत केलेली तयारी फारशी कामी येत नाही. प्रत्येक डाव वेगळा असतो.
यावेळच्या बारा डावांमध्ये सुरूवातीचे डाव सावधपणे एकमेकांचा अंदाज घेण्यात गेले. सुरूवातीला गेलफांडने काही डावांमध्ये आनंदला बुचकळ्यात पाडले होते. एकदा तर आनंद वेळेमध्ये मागेही होता. सातव्या गेममध्ये आनंदने काळ्या मोहर्यांकडून खेळताना निर्णायक खेळण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या अंगाशी आला. गेलफांडने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. पण दुसर्याच दिवशी आनंदने केवळ १७ खेळ्यांमध्ये विजय नोंदवून याची सव्याज परतफेड केली. आनंदने जो कट रचला होता तो इतका कुशल होता की गेलफांडच्या तर लक्षात आलाच नाही पण समालोचकांच्याही यावर दांड्या उडाल्या. शेवटच्या खेळीपर्यंत काळा वजीर अडचणीत येतो आहे याचा कुणाला पत्ताही लागला नाही. बाराव्या डावात आनंदला वेळेचा भरपूर फायदा असूनही त्याने बरोबरीचा प्रस्ताव का मांडला हे समालोचक क्रामनिकलाही कोड्यात टाकणारे होते.
सहाव्या डावात समालोचक म्हणून कास्पारोव्हने केलेल्या काही कमेंट्स बर्याच लोकांना आवडल्या नाहीत. हल्लीच्या जागतिक स्पर्धा उत्कृष्ट खेळाडूंमध्ये खेळल्या जात नाहीत हा त्याचा टोमणा गेलफांडला उद्देशून होता कारण गेलफांडचं रेटींग कमी आहे. हल्ली आनंद पूर्वीसारखा खेळत नाही असंही तो म्हटला. यात तथ्य असावे कारण या स्पर्धेमध्ये बरेचदा संधी असूनही आनंदने पूर्वीसारखा आक्रमक खेळ केला नाही. (कास्पारोव्हच्या टिप्पणीनंतरचे दोन्ही डाव निर्णायक झाले हा योगायोग रोचक आहे.) कास्पारोव्हकडे बघताना मला बरेचदा व्हिव्ह रिचर्ड्स आठवतो. दोघांमध्येही ऍरोगन्स ठासून भरलेला आहे पण याच्या मुळाशी त्यांच्याकडे असलेल्या असामान्य प्रतिभेवर असलेला विश्वास आहे. (कास्पारोव्हचा आयक्यू आहे १९०!.) मुद्दाम हीन लेखण्याचा हेतू यात असेल असे वाटत नाही. शिवाय कास्पारोव्हने ज्या कठीण परिस्थितीमध्ये विश्वविजेतेपद मिळवले त्याच्या तुलनेत या स्पर्धा त्याला फारच सोप्या वाटत असणार२.
बारा डावांमध्ये बरोबरी झाल्यानंतर प्रत्येकी २५ मिनिटांचे चार टाय ब्रेकर सामने खेळण्यात आले. यातील दुसर्या डावात आनंदने अखेर गेलफांडला नमवण्यात यश मिळवले. बाकीचे सामने बरोबरीत सुटले असले तरी गेलफांडने आनंदला सहजासहजी जिंकू दिले नाही. बरेचदा त्याचे पारडेही जड होते. टाय-ब्रेकरमध्ये गेलफांडची मुख्य अडचण वेळेची होती. आनंद जलद खेळण्यात वाकबगार आहे, गेलफांडला त्या गतीने खेळणे अशक्य झाले आणि तेच त्याच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. तरीही या संपूर्ण स्पर्धेमध्ये आनंदचा खेळ थोडा दबावाखाली असल्यासारखा वाटला. हे तात्पुरते आहे किंवा कसे ते यथावकाश कळेलच.
परकायाप्रवेश शक्य असता तर मला या खेळाडूंच्या शरीरात जावून त्यांना बुद्धीबळाचा पट कसा दिसतो हे बघायला आवडलं असतं. प्रत्येक खेळीनंतर होणार्या आठ ते दहा खेळ्या ते सहज बघू शकतात. शिवाय समोर पट नसेल तरी यात फारसा फरक पडत नाही कारण आख्खा पट प्रत्येक सोंगटीसहीत त्यांना लख्ख दिसत असतो आणि खेळले गेलेले हजारो डावही त्यांच्या लक्षात असतात.
शेरलॉक होम्सच्या यशाचं एक मुख्य कारण होतं त्याची प्रखर बुद्धीमत्ता. खर्या आयुष्यात अशाच बुद्धीमत्तेचे काही आविष्कार या चौसष्ट घरांच्या मैदानावर बघायला मिळतात. आनंद जिंकला याचा ‘आनंद’ अर्थातच आहेच, पण गेलफांडनेही त्याला साजेशी टक्कर दिली याबद्दल त्याचेही हार्दिक अभिनंदन.
——–
१. एक कसलेला आणि एक नवशिका खेळाडू असा डाव असेल आणि नवशिक्याचे फंडे पक्के नसतील तर त्याची कशी अमानुष कत्तल होऊ शकते याचे एक उदाहरण कास्पारोव्ह आणि फेडोरोव्ह यांच्या डावात दिसतं. (डाव दिसत नसेल तर PGN viewer – pgn4web(Javascript) ला सेट करावा.) फेडोरोव्हने कसलाही विचार न करता केलेल्या आक्रमणाकडे कास्पारोव्ह तुच्छतेने दुर्लक्ष केले आहे, एखाद्या लहान मुलाच्या चापट्या असाव्यात त्याप्रमाणे. या डावाबद्दल कास्पारोव्ह म्हणतो, “If what he played against me had a name, it might be called the ‘Kitchen Sink Attack.’”
२. कास्पारोव्हला कार्पोव्ह आणि तत्कालीन रशियन सत्ताधारी दोघांचाही सामना करावा लागला. १९८४ च्या जागतिक स्पर्धेमध्ये तब्बल ४८ डाव खेळल्यानंतर (४० बरोबरी, पाच विजय, तीन पराभव) कार्पोव्ह हरतो आहे असे दिसल्याबरोबर प्रचंड ताणामुळे दोन्ही खेळाडूंचे मानसिक आरोग्य धोक्यात आहे असे कारण देत फिडेने स्पर्धा रद्द केली. हा निर्णय दोघांनाही मान्य नव्हता पण यामुळे विजेतेपद कार्पोव्हकडेच राहीले. यानंतर फिडेने स्पर्धेचे नियम बदलले. याखेरीज स्पर्धांमधील वातावरण जवळजवळ युद्धासारखेच होते. मारक्या म्हशींप्रमाणे एकमेकांकडे टक लावून बघणे, उशिरा येणे असे अनेक प्रकार केले जात असत. त्या मानाने गेलफांड आणि आनंद स्पर्धा चालू असतानाही एकमेकांकडे फारसे बघत नाहीत आणि दोघेही एकमेकांचा आदर करतात. तुलनाच करायची झाली तर कार्पोव्ह-कास्पारोव्ह म्हणजे भिकू म्हात्रे आणि गुरू नारायण यांची मांडवली आहे तर आनंद-गेलफांड म्हणजे चिदंबरम आणि जेटली यांची लोकसभेतील वादावादी आहे.