• गुण गाईन आवडी

    लेख खरंतर उशिरा येतो आहे. डॉ. सी. एन. आर. राव यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली तेव्हा यायला हवा होता पण तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्या मिडियामध्ये जयजयकाराच्या घोषणा दुमदुमत होत्या. मागच्या लेखामध्ये आलेला एक धागा याही लेखात आहे – व्यक्तिपूजा आणि निरपेक्ष मूल्यमापन. साधारणपणे राजकारणी, खेळाडू, कलाकार यांच्या कारकीर्दीचं वेळोवेळी मूल्यमापन होत असतं. गांधी-नेहरू यांनी कोणत्या चुका केल्या, सचिनच्या पुलशॉटपासून त्याने निवृत्त व्हावं की नाही याच्या चर्चा, सिनेमाची समीक्षा तर नेहमी होतच असते. यात काही गैर नाही उलट प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला याला सामोरं जावंच लागतं. पण या अग्निपरीक्षेतून एक वर्ग अलगदपणे सुटला आहे आणि ते कुणाच्या फारसं लक्षातही आलेलं दिसत नाही. वर्तमानपत्रात वेळोवेळी झळकणाऱ्या ‘जगप्रसिद्ध’ शास्त्रज्ञांची यातून सुटका झाली आहे. यामागे अर्थातच वेगवेगळी कारणे आहेत. एकतर शास्त्रज्ञ म्हणजे कुणीतरी ‘लार्जर दॅन लाईफ’, विसराळू, प्रयोगशाळेत तासनतास काम करणारा प्राणी अशी जनमानसात (यात संपादकही येतात) प्रतिमा असते. त्यामुळे शास्त्रज्ञांनी कोणतंही विधान केलं तर ते तपासून न बघता हेडलायनीत टाकायचं हा शिरस्ता असतो. दुसरं म्हणजे शास्त्रज्ञाच्या कारकीर्दीचं मूल्यमापन करण्यासाठी संशोधन नेमकं कसं चालतं याची किमान तोंडओळख असणं गरजेचं असतं. लोकांकडे इतका वेळ किंवा इच्छा नसते त्यामुळे जगप्रसिद्ध भारतीय शास्त्रज्ञाने कुठलातरी शोध लावला अशी बातमी वाचली की संपादक, वाचक सगळे खूश होतात आणि दुसऱ्या दिवशी विसरून जातात. शोध नेमका काय आहे, जागतिक पातळीवर त्याचं स्थान काय या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं.

    लेख लिहिण्याचं कारण म्हणजे नुकतंच डॉ. राव यांनी आयआयटी मद्रास येथे बोलताना काही विधानं केली. कलाकार, लेखक यांची विधाने तर्कसंगत नसतील तर समजू शकतो, शास्त्रज्ञांचं सगळं आयुष्य मोजून-मापून विधाने करण्यात गेलेलं असतं. त्यामुळे शास्त्रज्ञांकडून भोंगळ विधाने आली तर आश्चर्य वाटतं. डॉ. राव यांचा पहिला मुद्दा होता की शास्त्रज्ञांनी ‘सेफ’ विषयात काम करू नये, त्याऐवजी जास्त संशोधन न झालेल्या वाटा चोखाळाव्यात. “In research, we must not want to do safe work.” सल्ला उत्तम आहे पण खुद्द डॉ. राव यांच्या कारकीर्दीकडे पाहिलं तर काय दिसतं? डॉ. राव यांच्या संशोधनामध्ये विशेष प्रसिद्धी मिळाली असं संशोधन ‘हाय टेंपरेचर सुपरकंडक्टिव्हिटी’ आणि ‘नॅनोटेक्नॉलोजी’ या दोन विषयात होतं. हे दोन्ही विषय त्या-त्या काळात सर्वात लोकप्रिय होते. विज्ञानात तत्कालीन लोकप्रिय विषयात संशोधन करण्याचा फायदा हा की संशोधनासाठी निधी चटकन मिळू शकतो. हे अर्थातच डॉ. राव यांनाही चांगलंच ठाऊक असणार. मुद्दा हा की डॉ. राव यांनी अनवट वाटा चोखाळून किती संशोधन केलं? मी रसायनशास्त्रज्ञ नाही त्यामुळे या मुद्द्यावर इतर मते जाणून घ्यायला आवडेल.

    पुढचा मुद्दा. हा तर सिक्सरच आहे. शास्त्रज्ञांनी निधी किंवा नोकरी यांच्याकडे लक्ष न देता निरलसपणे काम करावं. “He emphasized the importance of working without seeking benefits, money and grants, calling to mind exemplary scientists such as Newton and Faraday.” इतकं विनोदी वाक्य बरेच दिवसात ऐकलं नव्हतं. आणि जर असं असेल तर खुद्द डॉ. राव यांनी हा सल्ला अमलात का आणला नाही? सी. व्ही. रामन यांनी एक स्पेक्ट्रोमीटर घेऊन जे जागतिक दर्जाचं संशोधन केलं तसं डॉ. राव यांनी का केलं नाही? त्यांना प्रचंड निधी, अनेक सहकारी, पोस्टडॉक्स, विद्यार्थी यांची गरज का पडावी? आजपर्यंत डॉ. राव यांनी संशोधनासाठी जो निधी मिळवला तो करदात्यांच्या पैशातून आला होता. बंगलोरमध्ये डॉ. राव यांनी ‘जवाहरलाल नेहरु इन्स्टिट्यूट’ची स्थापना केली. त्यासाठीही सरकारकडून निधी मिळाला होता. मग इतरांनी हे करू नये असा सल्ला ते कसा देऊ शकतात? प्रयोगशाळा, संगणक इ. न वापरता आजच्या काळात न्यूटनसारखं संशोधन शक्य आहे का? आणि पैशाचा मोह न बाळगता संशोधन करायचं तर शास्त्रज्ञ आणि त्याच्या कुटुंबीयांनी खायचं काय? नोबेलविषयी बोलताना डॉ. राव म्हणाले, “If you want to get a Nobel prize, you must live very long, as long as you can,” म्हणजे काय? दीर्घायुष्य = नोबेल हे समीकरण कोणत्या तर्कात बसतं? उलट बहुसंख्य शास्त्रज्ञांनी त्यांच्या तरुणपणी केलेल्या कामाबद्दल त्यांना नोबेल मिळालं आहे. नोबेलसाठी जे गुण आवश्यक असतात त्याचा डॉ. राव यांनी उल्लेखही करू नये याचं आश्चर्य वाटतं.

    वर्तमानपत्रामध्ये येणाऱ्या संशोधनाच्या बातम्या आणि प्रत्यक्षात चालणारं संशोधन यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. डॉ. राव यांनी १५०० हून अधिक संशोधन निबंध प्रकाशित केले याचा उल्लेख प्रत्येक बातमीत आला होता. अधिकाधिक निबंध = सर्वोत्तम संशोधन हा निकष बहुतेक वेळा फसवा असतो. याचं एक उत्तम उदाहरण फ्रेडरिक सॅंगर याचं आहे. (जॉन बार्डीनही चालू शकेल.) बायोकेमिस्ट्रीमध्ये संशोधन करणाऱ्या सॅंजरने आयुष्यभरात राव यांच्या तुलनेत फारच कमी निबंध प्रकाशित केले पण या संशोधनातून त्याला दोन वेळा नोबेल पारितोषिक देण्यात आलं. संशोधनामध्ये सध्याचं स्पर्धात्मक युग बघता ‘पब्लिश ऑर पेरिश’ याला तरणोपाय नाही. पण केवळ संख्येवर लक्ष केंद्रित केलं तर गुणवत्ता खालावते हे कटू सत्य आहे.

    डॉ. राव यांचा गौरव करताना सगळीकडे त्यांना ‘फादर ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी इन इंडिया’ असं संबोधित करण्यात येत होतं. यात एक ग्यानबाची मेख आहे आणि ती फक्त या विषयातील शास्त्रज्ञांनाच कळू शकेल. नॅनो तंत्रज्ञान म्हणजे काय? आपल्याला डोळ्यांनी जी लहानात लहान वस्तू बघता येते तिचा आकार सुमारे ५० मायक्रॉन असतो. १ मायक्रॉन म्हणजे एका मीटरचे दहा लाख भाग केले तर त्यातील एका भागाची लांबी. आपल्या केसाची जाडी साधारण ५० ते २०० मायक्रॉन असते. एक मीटर लांबीचे शंभर कोटी भाग केले तर त्यातील एका भागाच्या लांबीला एक नॅनोमीटर असं म्हणतात. या नॅनो पातळीवरचं जग आपल्या नेहमीच्या जगापेक्षा बरंच वेगळं असतं. ‘ऍलिस इन वंडरलॅंड’मध्ये फिरताना ऍलिस जशी पावलोपावली आश्चर्यचकित होते तसंच या नॅनोजगतात फिरताना आपणही भांबावून जातो. तिथे जायचं झालं तर तिथली सृष्टी, तिथले नियम यांची ओळख करून घ्यावी लागते. आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने या अतिसूक्ष्म जगाचं नुसतं निरीक्षणच नाही तर त्या जगात मनसोक्त विहार करता येणंही आता शक्य झाले आहे. यासाठी जे तंत्रज्ञान आणि ज्या संकल्पना वापरल्या जातात त्यांना एकत्रितपणे ‘नॅनोटेक्नॉलॉजी’ असं नाव दिलं गेलं आहे. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र, नवीन औषधांची निर्मिती अशा अनेक क्षेत्रांमध्ये या नॅनो तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो आहे. डॉ. राव रसायनशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी नॅनोपार्टीकल्स या विषयात बरंच संशोधन केलं आहे. पण नॅनोपार्टीकल्स हा नॅनोतंत्रज्ञानाचा एक भाग आहे. नॅनो तंत्रज्ञानामध्ये नेहमी वापरला जाणारा एक महत्त्वाचा घटक ‘स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप’ आपल्या पुणे विद्यापीठात तयार करण्यात आला. नॅनोतंत्रज्ञानामध्ये ज्या अनेक शाखा येतात आणि ज्यावर भारतातील अनेक शास्त्रज्ञ काम करत आहेत त्यांच्याशी डॉ. राव यांचा दूरान्वयानेही संबंध नाही. अशा परिस्थितीत डॉ. राव यांना ‘फादर ऑफ नॅनोटेक्नॉलॉजी इन इंडिया’ म्हणून संबोधित करणे फक्त अतिशयोक्तीच नव्हे तर साफ चूक आहे. डॉ. राव यांच्या विकीवरील पानात नॅनोटेक्नॉलॉजी हा शब्दही सापडत नाही.

    डॉ. राव यांनी नेहमीच भारतीय राजकारण्यांची विज्ञानाबद्दलची उदासीनता आणि भारतातील विज्ञानाची खालावलेली पातळी यावर प्रखर टीका केली आहे. टीका योग्य आहेच पण इथेही एक तळटीप आहे. डॉ. राव यांनी आजपर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषविली आहे. यापैकी एक म्हणजे पंतप्रधानांना वैज्ञानिक सल्ला देणाऱ्या समितीचं अध्यक्षपद. इंदिरा गांधी, राजीव गांधी, देवेगौडा, गुजराल आणि मनमोहन सिंग या सर्वांच्या कार्यकालात डॉ. राव यांच्याकडे हे पद होतं. दर वर्षी बजेटमध्ये कुठल्या संशोधनाला किती निधी द्यायचा, देशाचं वैज्ञानिक धोरण ठरवायचं यासारख्या कामांमध्ये डॉ. राव यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. (ते एकटेच नव्हे, त्यांच्याबरोबर काम करणारे समितीमधील सर्व शास्त्रज्ञ.) याखेरीज देशाचं वैज्ञानिक भवितव्य ठरविणाऱ्या असंख्य कमिट्यांवर डॉ. राव यांनी काम पाहिले आहे. याचा अर्थ काय होतो? आज भारतीय विज्ञानाची जी परिस्थिती आहे त्याला काही अंशी तरी डॉ. राव जबाबदार आहेत. गेल्या पन्नास वर्षात भारतीय विज्ञानाची जी परिस्थिती झाली आहे त्याला कोण जबाबदार आहे? फक्त राजकारण्यांवर सगळा दोष ढकलणे कितपत योग्य आहे?

    संशोधन मुख्यत्वे दोन ठिकाणी चालत असतं. संशोधन संस्था आणि विद्यापीठं. संशोधनासाठी कुणाला किती निधी द्यायचा हे डॉ. राव ज्या कमिट्यांवर असतात त्या कमिट्या ठरवितात. यात बहुतेक वेळा विद्यापीठांना सावत्र वागणूक मिळते. विद्यापीठात संशोधन करण्यासाठी निधी मिळवणे किती दुरापास्त असतं हे तिथल्या प्राध्यापकांना चांगलंच ठाऊक असतं. संशोधनातील हे नाजूक कंगोरे कधीच समोर येत नाहीत पण त्या-त्या वर्तुळांमध्ये हे सुपरिचित असतं. भारतातील विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये कमीत कमी निधीमध्ये, अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करत उत्तम संशोधन चालतं पण दुर्दैवाने याला मिळायला हवी तेवढी प्रसिद्धी कधीच मिळत नाही.

    “With great power comes great responsibility.” देशाच्या विज्ञानाचं भवितव्यं अनेक वर्षे हातात असताना या जबाबदारीचा नेमका कसा वापर केला गेला याचं शक्य तितक्या निष्पक्षपणे मूल्यमापन होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सध्याची ‘गुण गाईन आवडी’ संस्कृती बघता हे शक्य नाही हे ही तितकंच खरं आहे. कदाचित आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर एकही नोबेल का नाही याचं एक कारण या दृष्टिकोनामध्ये दडलं असावं.


  • क्लॅप्टन इज गॉड

    एरिक क्लॅप्टनचा जन्म इंग्लंडमधल्या रिपली नावाच्या एका लहानशा खेड्यात झाला. लहानपणीच त्याला आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे जाणवलं. तो खोलीत आला की सगळे लोक क्षणभर स्तब्ध व्हायचे. त्याच्याबद्दल नातेवाइकांमध्ये कुजबूज चालू असायची. शेवटी त्याला कळलं की ज्यांना तो आई आणि बाबा म्हणतो ते त्याचे आजी-आजोबा आहेत. त्याची सख्खी आई त्यांची मुलगी. युद्धादरम्यान एका सैनिकाबरोबर झालेल्या प्रेमप्रकरणातून एरिकचा जन्म झाला. त्या काळी इंग्लंडमध्ये अनौरस संतती निषिद्ध मानली जात असे म्हणून त्याच्या आईने त्याला गुपचूप आजी-आजोबांकडे सोपवलं आणि ती निघून गेली. या धक्क्यातून एरिक कधीच सावरला नाही. याचा अर्थ त्याचं बालपण डिकन्सच्या कादंबरीसारखं खडतरच होतं असा नाही. आजी-आजोबांनी त्याच्यावर भरपूर प्रेम केलं. लहानपणीच त्याला संगीताची गोडी लागली. आधी रेडिओ आणि नंतर ग्रामोफोन. मग आजी-आजोबांच्या मागे लागून त्याने एक गिटार विकत घेतली. आवडलेलं गाणं अनेकदा ऐकायचं, मग ते गिटारवर वाजवण्याचा प्रयत्न करायचा. मनासारखं झालं की छोट्याश्या टेपवर ते रेकॉर्ड करायचं आणि मूळ गाणं आणि त्याचं गाणं यांची तुलना करायची. गाणं मनासारखं वाजवता येईपर्यंत एरिकची तपश्चर्या चालू राहायची. एकदा गिटारची एक तार तुटली, नवी घ्यायला पैसे नव्हते मग त्याने पाच तारा वापरून सराव चालू ठेवला. एकलव्याने द्रोणाचार्यांना गुरू मानून साधना केली होती, त्या काळातील जॅझ आणि ब्लूज संगीतकार यांना एरिकने गुरू मानलं. एरिकने कोणत्याही शिक्षकाडून संगीताचे धडे घेतल्याची नोंद नाही. असं दुसरं चटकन आठवणारं उदाहरण किशोरकुमारचं. रोलिंग स्टोन्स मासिकाने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या सर्वोत्कृष्ट गिटार वादकांच्या यादीत एरिकचा क्रमांक दुसरा किंवा तिसरा असतो. (पहिला अर्थातच जिमी हेंड्रिक्स.)

    अभ्यासाकडे एरिकचं फारसं लक्ष नसायचं, अपवाद इंग्रजी भाषा आणि साहित्य. हे दोन्ही विषय त्याला आवडायचे. ब्रिटिश लोकांच्या छापील शब्दावरच्या प्रेमाशी हे सुसंगतच आहे. याखेरीज सिनेमाचीही त्याला आवड आहे. याचा परिणाम म्हणून एरिकच्या बोलण्यात डिकन्सपासून जपानी सिनेमा आणि ‘ब्लेड रनर’सारखे उल्लेख सहजपणे येतात. जवळच्या पबमध्ये गाणाऱ्या संगीतकारांना ऐकत-ऐकत स्वत: स्टेजवर जाऊन त्यांना साथ करणं त्याने सुरू केलं. हळूहळू लंडनच्या पबमध्ये कार्यक्रमांची आमंत्रणे यायला लागली. आधी ‘यार्डब्रेकर्स’ आणि नंतर ‘क्रीम’ या दोन ग्रूपमुळे ६० च्या दशकात एरिकला बरीच लोकप्रियता मिळाली. त्या दिवसात बीटल्सना जगाने डोक्यावर घेतलं होतं. ब्लूज संगीताशी नाळ असलेल्या एरिकला बीटल्सचं पॉप संगीत उथळ वाटायचं, आणि तरुणवर्गाने त्यांच्याप्रमाणे कपडे घालणं त्याला वेडपट वाटत असे. यथावकाश बीट्ल्सशी त्याचा बराच संबंध आला, त्यातही जॉर्ज हॅरिसनशी त्याची गाढ मैत्री झाली आणि ती शेवटपर्यंत टिकली. एकदा एका ग्रूपबरोबर असताना एक निग्रो खोलीत आला. मित्राने त्याची एरिकशी ओळख करून दिली. त्याचं नाव होतं जिमी हेंड्रिक्स. नंतर स्टेजवर जिमीला गिटार वाजवताना पाहून एरिकला आयुष्यात पहिल्यांदाच असुरक्षिततेची जाणीव झाली. याआधी त्याने असं काही पाहिलं नव्हतं. नंतर हेंड्रिक्स आणि त्याची चांगली मैत्री झाली. हे दोघे कोणत्याही क्लबमध्ये जाऊन प्रेक्षकात बसायचे. थोडा वेळ तिथलं संगीत ऐकल्यावर हे दोघे गिटार घेऊन स्टेजवर यायचे. क्लॅप्टन आणि जिमी हेंड्रिक्स एकत्र असल्यावर त्यांच्यासमोर वाजवू शकतील असे वादक अस्तित्वात नसावेत. त्या दुर्दैवी बॅंडचा कत्ल-ए-आम केल्यानंतर पुढचा क्लब.

    बहुतेक कलाकार कोणत्या न कोणत्या व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात. रोज दहा मैल धावून कादंबरी लिहिणारा मुराकामी एखादाच. आत्मचरित्र वाचत असताना आपण एरिकचा कबुलीजबाब ऐकत आहोत असं वाटायला लागतं. आपल्या चुका समोर ठेवताना तो कुठेही स्पष्टीकरण देत नाही. त्या काळच्या संगीतकारांमध्ये व्यसनाधीन असणं ही मामुली गोष्ट होती. अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे अनेक उत्तमोत्तम संगीतकार अकाली काळाच्या पडद्याआड गेले – एल्व्हिस प्रिसली, जिम मॉरिसन, जिमी हेंड्रिक्स. पुढची पंचवीस-तीस वर्षे एरिक वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेला होता. अनेकदा त्याला स्टेजवर आपण काय करत आहोत याचंही भान नसे. एकदा उभं राहणं शक्य नव्हतं म्हणून त्याने सगळा कार्यक्रम स्टेजवर पडून केला. बहुधा प्रेक्षकही त्याच्याइतकेच ‘टाइट’ असावेत कारण यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. दोनदा व्यसनमुक्ती केंद्रात गेल्यानंतर अखेर एरिक पूर्णपणे बरा झाला. आज त्याने उघडलेल्या संस्थेमुळे अनेक रुग्णांना फायदा होतो आहे.

    १९९१ साली मॅनहॅटनमध्ये एका बिल्डिंगमध्ये एरिकचा चार वर्षांचा मुलगा कॉनर लपंडाव खेळत होता. एका खोलीतील खिडकी साफसफाई चालू असल्याने उघडी होती. खिडकी छतापासून जमिनीपर्यंत होती आणि तिला कठडा नव्हता. कॉनर धावत धावत आला आणि सरळ खिडकीमधून ४९ मजले खाली पडला. यानंतर काही महिने एरिक बधिर झाला होता. त्याच्या निकटवर्तियांना तो परत व्यसनाच्या आहारी जातो की काय अशी भिती वाटत होती. सुदैवाने तसं झालं नाही. एरिकने संगीतामध्ये कॅथार्सिस शोधला. रोज तो गिटार घेऊन बसायचा आणि गाणी लिहायचा. ही गाणी लोकांसाठी नव्हती. नंतर एका चित्रपटाच्या निर्मातीने ‘टीअर्स इन हेवन’ गाणं ऐकलं आणि ते चित्रपटात घातलं. हे गाणं एरिकचं सर्वाधिक लोकप्रिय गाणं ठरलं आणि यासाठी त्याला तीन ग्रॅमी पारितोषिकं मिळाली.

    एरिकने कधीही व्यावसायिक गणितं मांडून कलेशी प्रतारणा केली नाही. ज्या ब्लूज संगीताने त्याला प्रेरणा दिली त्याच्याशी तो नेहमी प्रामाणिक राहिला. बी. बी. किंगसारख्या संगीतकारांबरोबर काम करून त्याने आपल्या परीने हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला. आजच्या संगीताविषयी तो म्हणतो, “The music scene as I look at it today is little different from when I was growing up. The percentages are roughly the same—95 percent rubbish, 5 percent pure.”

    सुरुवातीच्या चित्राविषयी. १९६५ च्या सुमारास इंग्लंडमध्ये एरिकची लोकप्रियता शिखरावर असताना इज्लिंग्टनमध्ये ‘Clapton is God’ असं लिहिलेली ग्राफिटी दिसू लागली. त्या काळात घेतलेलं हे चित्र आयकॉनिक ठरलं. तंगडी वर करणारा कुत्रा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरतो. एक अर्थ एमिली डिकिन्सन म्हणते तसा ‘Fame is a fickle food.’ एरिकच्या व्यसनाधीन होण्यामागे अचानक मिळालेली प्रसिद्धी हाताळता न येणं हे ही एक कारण होतं. “My fear of loss of identity was phenomenal. This could have been born out of the “Clapton is God” thing, which had put so much of my self-worth onto my musical career.” ही ग्राफिटी त्याच्या अध:पाताला कारणीभूत ठरली असं मानलं तर तो कुत्रा दैव किंवा नियतीचं प्रतीक आहे असं मानता येतं. याखेरीज ६० च्या दशकातील सर्व बंधने आणि प्रस्थापित कल्पनांना धक्का देणाऱ्या हिप्पी विचारसरणीची ही एक प्रकारे नांदी होती असंही म्हणता येतं.


  • गाव मागचा मागे पडला

    ख्रिस स्ट्युअर्ट​ ‘जेनेसिस’ या बॅंडमधला ड्रमर. दोन अल्बम केल्यानंतर संगीताचे क्षेत्र सोडून युरोपमध्ये फिरून मेंढ्यांची लोकर काढणे, प्रवासविषयक पुस्तके लिहीणे अशी कामे केली. अखेर इंग्लंडमधले राहते घर विकून स्पेनमधल्या अन्दालुचिया या चिमुकल्या गावात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ‘ड्रायव्हिंग ओव्हर लेमन्स’ ही या प्रवासाची गोष्ट. अन्दालुचियावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेली, एका बाजूला बर्फाने आच्छादित पर्वत, घराजवळूनच जाणारी नदी, संत्री, लिंबं यांच्या बागा, फळफुलांची शेतं. तरीही शहरातून इथे स्थायिक व्हायचे म्हणजे सोपं काम नाही. नदीवर पूल बांधण्यापासून ते टेकडीवरच्या झर्‍यातून घरापर्यंत पाणी येण्याची व्यवस्था करण्यापर्यंत सगळी कामे स्वत:च करायची. मदतीला शेजारपाजारचे दोमिन्गोसारखे मित्र होतेच. एकदा मूलभूत गरजा भागल्यानंतर ख्रिस आणि त्याची बायको आना यांचे प्रयोग सुरू झाले. कुक्कूटपालन, मेंढ्या-बकर्‍या, डुकरे पाळणे, बागेतील शेती आणि मशागत. काही प्रयोग यशस्वी झाले तर काही सपशेल फसले.

    ख्रिसची लिहीण्याची शैली सरळ आणि प्रामाणिक आहे. आयुष्याकडून फार गडगंज अपेक्षा न ठेवता निसर्गाच्या सान्निध्यात राहून साधं आयुष्य जगायचं ही माफक मागणी. आपल्या निर्णयाबद्दल तो फारसं बोलत नाही. इंग्लंडमधलं आयुष्य का नकोसं वाटलं याबद्दल ‘तिथे विम्याची नोंदणी करत बसण्यापेक्षा हे किती बरं’ असं एखादं मोघम वाक्य येतं. पण टेकडीवरच्या झर्‍यामधून पाचर खोदल्यानंतर येणारा पाण्याचा पहिला प्रवाह बघणे, शेळ्या-मेंढ्या टेकडीवर चरताना त्यांच्या गळ्यातील घंटा झाडाखाली बसून ऐकणे किंवा उन्हाळ्यात रात्री असह्य उकाडा झाल्यावत नदीत डुंबायला जाणे अशा वरकरणी साध्या पण अर्थपूर्ण गोष्टी करताना त्याला मिळणारा आनंद पाहून ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं त्याने म्हटलं नाही तरी आपल्याला ते जाणवत रहातं. “It was a thrill, that first day, watching as the water gathered and swelled and saturated the dry earth. It crept up the bank, pouring into the ant-hills and mole-runs, and little by little turned into a full-blown stream. Seeing it, I would splash through to the head and race around the next corner to await the miracle all over again.”

    व्ही. एस. नायपॉल साहित्यक्षेत्रातील मोठं नाव. ‘ऑन लिटररी ओकेजन्स’ हे त्यांनी वेळोवेळी लिहीलेल्या निबंधांचे पुस्तक, यात त्यांचं नोबेल पारितोषिक भाषणही आहे. नायपॉल बर्‍याच विषयांवर बोलतात, त्यातील एक मुख्य आणि परतपरत येणारा विषय म्हणजे स्वत:चा शोध. त्यांचे बालपण त्रिनिदादमध्ये गेलं, आजोबा मजूर म्हणून भारतातून आल्यानंतर नंतरच्या पिढ्या तिथेच स्थायिक झाल्या. त्यांच्या वडीलांनी लहानपणापासून तुला लेखक व्हायचय असं मनावर बिंबवलेलं. लहानपणी जे वाचायला मिळालं, डिकन्सपासून वेल्सपर्यंत, त्यातील वातावरण, पात्रे नेहेमी परकी वाटत राहीली. एकदा गावात झालेली रामलीला बघितली हाच काय तो भारतीय संस्कृतीचा परिचय. नायपॉल यांच्या शब्दात सांगायचं तर, ‘आम्हाला वाटलं की आम्ही आमच्याबरोबर भारचा एक तुकडा आणला आहे आणि तो एखाद्या गालिच्याप्रमाणे इथे पसरता येईल.’ हिंदी कळत होतं पण बोलता येत नव्हतं. ऑक्सफर्डला स्कॉलरशिप मिळाल्यावर नायपॉलना वाटलं की आता लेखकांच्या या देशात गेल्यावर आपल्या प्रतिभेला जाग येईल. पण तसं काहीच झालं नाही, उलट गोंधळ अजून वाढत गेला. अखेर इग्लंडमध्येच त्यांना स्वत:मध्ये दडलेला लेखक सापडला पण तो त्यांच्या लहानपणी घरासमोर जो रस्ता होता त्या रस्त्याच्या आठवणींमध्ये. रस्ता, घरं, तिथले लोक आठवत गेले आणि ‘मिगेल स्ट्रीट’ हे पुस्तक तयार झालं.

    पहिलं पुस्तक लिहील्यानंतर बाकीची आपोआप येतील ही त्यांची कल्पना फोल ठरली दुसर्‍या पुस्तकाच्या वेळी पाटी परत कोरी होती. योगायोगानं त्यांना त्रिनिदाद आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लिहीण्यासाठी आमंत्रण मिळालं. यासाठी आपण जिथे रहात होतो तिथल्या त्या भागाच्या इतिहासाचा अभ्यास करता आला. अंतर्मनात आणखी एक धागा जुळला आणि हेच प्रत्येक वेळी होत राहीलं. भारतीय वंश असूनही भारत परका होता. नेहरू, टागोर, गांधी किंवा आर. के नारायण यांच्या लेखनातून दिसणारा भारत एकांगी भासत होता. भारतात येऊन प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर भारतावर दोन पुस्तके लिहीली. एका ठिकाणी नायपॉल म्हणतात, “To take an interest in a writer’s work is, for me, to take an interest in his life; for one interest follows automatically the other.” थोडा विचार केल्यानंतर वाक्य पटायला लागतं. हॅम्लेट अनेक अर्थांनी श्रेष्ठ कलाकृती आहे पण शेक्सपिअरने ज्या काळात हॅम्लेट लिहीलं त्या काळातील रेनेसान्सचे युरोपभर उमटलेले प्रतिसाद, कॅथोलिक धर्माविरूद्ध मार्टीन लूथरने सुरू केलेलं बंड आणि प्रोटेस्टंट शाखेचा उदय, एनलायटनमेंटची सुरूवात हे सगळं लक्षात घेतलं तर ‘टु बी ऑर नॉट टू बी’ च्या अर्थाचे निराळे पदर उलगडतात. तसंच नायपॉल यांची पुस्तकं वाचल्यानंतर पुस्तकाच्या विषयापेक्षा नायपॉल यांची वेगळी ओळख पटायला लागते.

    ही दोन पुस्तकं कुठल्याही दुकानात एका भागात सोडाच, एका खोलीतही दिसणार नाहीत कदाचित. ही एकामागून एक वाचली म्हणून त्यांच्यातला एक समान धागा लक्षात आला, नाहीतर ते ही झालं नसतं. ख्रिस किंवा नायपॉल दोघेही आपल्या सद्यस्थितीवर संतुष्ट नाहीत. दोघांनाही अस्वस्थ वाटतय, दोघांनाही आपल्या अस्वस्थतेवर आपापल्या परीने मार्ग शोधले आहेत. ख्रिसचा मार्ग ‘दिल से’ मार्ग आहे, जास्त विश्लेषण न करता (किंवा जास्त विश्लेषण केलं आहे असं न दाखवता कारण ब्रिटीश माणसं विचार न करता असा निर्णय घेतील यावर विश्वास बसणं कठीण. त्या जागी एखादा इटालियन किंवा स्पॅनिश असता तर गोष्ट वेगळी.) नायपॉल आत्मपरिक्षण आणि काहीसा कॅथार्टीक म्हणता येईल असा मार्ग शोधतात. प्रत्येक पुस्तक लिहील्यानंतर त्यांना स्वत:च्याच एका पैलूची ओळख होते.

    ख्रिसला जे हवंय ते वरकरणी सरळ आहे असं वाटतं पण तसं नसावं. शेतीच करायची तर ती इंग्लंडमध्येही करता आली असती पण त्याला स्पेन आवडतं. तिथे राहताना पहिल्यांदा एक ब्रिटीश जोडपं भेटतं तेव्हा ‘हे इथे कशाला आले’ असा विचार त्याच्या मनात चमकून जातो. ब्रिटीश संस्कृतीबद्दल नावड आणि दक्षिण युरोपमधील मोकळ्या-ढाकळ्या वातावरणाचं आकर्षण असा काहीसा हा पेच आहे असं वाटतं. जे इंग्लंड ख्रिसला नकोसं झालं त्याबद्दल नायपॉल यांना सुप्त आकर्षण होतं. (इथे ‘कलोनियल’ म्हणून जी ओळख जन्मत:च मिळाली त्याबद्दल ते विस्ताराने बोलतात.) पण त्यांच्यातला लेखक प्रगट झाला तो मात्र त्रिनिदाद आणि भारतातच. म्हणूनच ते म्हणतात, “To become a writer, that noble thing, I had thought it necessary to leave. Actually, to write, it was necessary to go back. It was the beginning of self-knowledge.”

    माणसाला नेमकं काय हवय यावर भल्याभल्यांनी लिहीलय. ख्रिसला अन्दालुचियामध्ये आपलं गाव सापडलं, नायपॉलना त्यासाठी आपल्या भूतकाळात दडलेली पाळंमुळं शोधावी लागली तर कुणाला टोक्योमधला चांगला चालणारा बार बंद करुन कादंबरी लिहायला घ्यावीशी वाटली. इथे बरोबर किंवा चूक असं काही नसतं.

    To each his own.


  • ये सब क्या हो रहा है, बेटा दुर्योधन?

    अमेरिकन फिजिकल सोसायटी ही संशोधन आणि विज्ञानाचा प्रसार यांच्याशी निगडित एक नावाजलेली संस्था आहे. एपीएसचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे ते पदार्थविज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी मासिके गेली १०० वर्षे चालवत आहे. या मासिकांमध्ये अत्युच्च दर्जाचे निबंध प्रकाशित होत असतात, यांत प्रकाशित झालेल्या शोधांना बरेचदा नोबेल पारितोषिकही मिळालेलं आहे. हेच नेचर, एल्सेव्हिअर किंवा अमेरिकन असोसिएशन फॉर ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स (सायन्स मासिक) यांच्याबद्दलही म्हणता येईल. थोडक्यात, विज्ञानासाठी या संस्था आणि कंपन्या करत असलेलं काम उल्लेखनीय आहे. पण ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी की दिवसेंदिवस या सर्व संस्था धंदेवाईक होत चालल्या आहेत आणि त्यामुळे विज्ञानाच्या संशोधनामध्ये जी सचोटी आणि पारदर्शकता अपेक्षित आहे ती नाहीशी होत चालली आहे.

    या मासिकांमध्ये लेख कसे प्रकाशित होतात? जगभरातील शास्त्रज्ञ त्यांच्या सरकारांकडून किंवा खाजगी कंपन्यांकडून संशोधनासाठी निधी जमवतात. शास्त्रज्ञ आणि त्यांचे विद्यार्थी रात्रीचा दिवस करून एखाद्या विषयावर संशोधन करतात आणि त्याचे निष्कर्ष लेखांमधून या मासिकांना पाठवतात. हे निष्कर्ष बरोबर आहेत की चूक हे कुणी ठरवायचं? यासाठी या मासिकांनी शेकडो परीक्षक किंवा रेफरी निवडलेले असतात. हे रेफरी म्हणजे त्याच विषयात काम करणारे इतर शास्त्रज्ञ. आपल्या संशोधनातून किंवा विद्यापीठात असतील तर संशोधन आणि शिकवणे यांच्या रामरगाड्यातून वेळात वेळ काढून हे शास्त्रज्ञ त्यांना पाठवलेले लेख तपासतात, त्यातील चुका शोधून काढतात आणि लेख प्रकाशित करायचा की नाही यावर निर्णय देतात. प्रत्येक लेख कमीत कमी दोन किंवा तीन रेफरींकडे जातो आणि त्यांचे अनुकूल मत असेल तर प्रकाशित केला जातो. हे करण्यासाठी या शास्त्रज्ञांना एक कपर्दीकही दिला जात नाही, केवळ विज्ञानासाठी हे लोक हे काम करतात.

    लेख प्रकाशित झाल्यावर काय होतं? तो लेख तात्काळ पे वॉलमागे जातो. आता एखाद्याला वाटेल की निदान जे लोक एक पैसुद्धा न घेता रेफरी म्हणून काम करतात त्यांना तरी यात काही सवलत मिळेल? नो सर. पैसा फेको, तमाशा देखो. मी अमेरिकन फिजिकल सोसायटीच्या ‘फिजिकल रिव्ह्यू लेटर्स’चा रेफरी आहे पण मला एखादा लेख वाचायचा असेल आणि मी वर्गणीदार नसेन तर मला किती दमड्या मोजाव्या लागतील माहीत आहे का? $२५ फक्त म्हणजे आजच्या दराने झाले १३५० रुपये फक्त. नीट लक्षात घ्या, ही त्या मासिकाच्या एका अंकाची किंमत नाहीये, अंकातल्या एका लेखाची किंमत आहे. एका लेखासाठी एखादा डॉलर असता तर प्रश्न नव्हता. हे तर हिमनगाचं टोक झालं. जर तुम्ही तुमचा एखादा लेख पाठवला आणि तो प्रकाशित करायला मान्यता मिळाली तर त्यासाठीही तुम्हाला पैसे मोजावे लागतात. त्यात परत त्यातल्या आकृत्या रंगीत हव्या असतील तर पैसे जास्त. हे पैसे बहुतेक वेळा तीन आकडी डॉलरच्या पटीत असतात. पुणे विद्यापीठात काम करत असताना अशी वेळ आली तर आम्ही मासिकाच्या संपादकांना ‘आम्हाला पैसे माफ करा’ असं पत्र पाठवीत असू (दे दान छुटे गिरान) आणि तेही उदार मनाने ही सवलत देत असत.

    संशोधनाचे पैसे जनतेचे, ते प्रकाशित करायला यांना पैसे द्यायचे, मात्र त्याचं परीक्षण विज्ञानाच्या नावाखाली फुकट करायचं आणि लेख प्रसिद्ध झाल्यावर तो वाचायला परत जनतेकडूनच अवाच्यासव्वा पैसे घ्यायचे? इतकी लुटालूट तर चंबळचे डाकूसुद्धा करत नव्हते. बरं, संस्था किंवा विद्यापीठ यांच्यासाठी असलेले घाऊक वर्गणीचे दर इतके जास्त आहेत की हार्वर्डसारख्या विद्यापीठानेही हे परवडत नाही असं कबूल केलं आहे. हार्वर्डचा यासाठीचा वार्षिक खर्च आहे $३५ लाख फक्त. यातील काही मासिकांच्या वार्षिक वर्गणी $४०,००० हून जास्त आहे.

    मागच्या शतकात आंतरजाल येण्याच्या आधी माहिती प्रसरणाचे सगळेच मार्ग कासवाच्या वेगाचे होते. सुदैवाने आता हे बदललं आहे आणि याचा परिणाम म्हणून आंतरजालाच्या माध्यमातून अशा प्रकारांना तोंड फोडणं सोपं झालं आहे. टिम ग्रोवर ऑक्सफर्डमधील एक गणितज्ञ. त्याला या सगळ्या प्रकाराचा वीट आला आणि त्याने एल्सेव्हिअर या प्रकाशन कंपनीवर  बहिष्कार घालण्याचं ठरवलं. त्याला अपेक्षेबाहेर प्रतिसाद मिळाला, त्यातून http://thecostofknowledge.com/ ‘कॉस्ट ऑफ नॉलेज‘ ही साईट उघडली गेली आणि त्यात आतापर्यंत १३,००० शास्त्रज्ञांनी पाठिंबा व्यक्त केला आहे. प्लॉससारखी काही मासिकं सर्वांसाठी खुली आहेत. अर्थातच या कंपन्या याबाबत अनुकूल नाहीत आणि अमेरिकन सिनेटमध्ये याला प्रतिबंध करण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत. सोपा-पिपाचं बिल याच जातकुळीतलं. सर्व देशातील, सर्व नागरिकांसाठी ज्ञान मोफत उपलब्ध असायला हवं या अपेक्षेपोटी ऍरन स्वार्ट्झचा बळी गेला.

    हे सर्व विचार आता आठवायचं कारण मला काल अमेरिकन फिजिकल सोसायटीची मेल आली. तुम्हाला कधी वेळ आहे ते सांगा, तुमचा वेळ महत्त्वाचा आहे हे आम्हाला माहीत आहे, याडा, याडा. ‘मला परीक्षण करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या मासिकांना फुकट प्रवेश देत असाल तर करतो’ असं उत्तर त्यांना पाठवलं आहे.

    —-

    १. अल्ला के नाम पे दे दे बाबा, ये पेपर मुफत में पब्लिश कर दे बाबा, आज मंगलवार है बाबा, जर्नल का स्पेशल इशू निकलेगा बाबा, तेरे जर्नल का इंपॅक्ट फॅक्टर बढेगा बाबा, पेपर को नोबेल मिलेगा बाबा इ. इ.