• ऑल द प्रेसिडेंट्स मेन

    चित्रपट पांढर्‍या पार्श्वभूमीवर सुरु होतो. कदाचित पांढरा पडदा असावा किंवा दुसरे काही, अंदाज येत नाही. पाच सेकंद, दहा, पंधरा काहीच होत नाही. शेवटी वैतागून आपण चुळबूळ करायला लागतो तेवढ्यात बंदुकीतून गोळी सुटल्यासारखा आवाज येतो, कॅमेरा फोकस होतो आणि पडद्यावर J हे अक्षर उमटते. आपण टंकलेखन क्लोजअप मध्ये बघतो आहोत हे लक्षात येता येता ओळ टंकीत झालेली असते June 1, 1972.

    हा प्रसंग आहे ऑल द प्रेसिडेंट्स मेन ह्या चित्रपटाच्या सुरवातीचा. १९७२ ते १९७४ ही वर्षे अमेरिकेच्या इतिहासात विशेष ठरावीत. ह्याला कारण होते रिपब्लिकन राजवटीतील वॉटरगेट प्रकरण. १९७२ मध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयात घुसल्याच्या आरोपाखाली पाच लोकांना अटक झाली. हे पाचही लोक अमेरिकन गुप्तहेर संस्था सी. आय. ए. शी संबंधीत होते. त्यांच्याजवळ वॉकीटॉकी, फोन-टॅपिंगचे साहित्य अशी गुप्तहेरांच्या कामासाठी वापरली जाणारी उपकरणे सापडली. वृत्तपत्रांनी या घटनेकडे फारसे गंभीरपणे पाहीले नाही. अपवाद होते वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राचे दोन वार्ताहर : कार्ल बर्नस्टीन आणि बॉब वुडवर्ड. यापैकी बॉबला कामावर रूजू होऊन उणेपुरे नऊ महीने झाले होते. कार्ल त्यामानाने अनुभवी होता. तपास घेताना ह्या प्रकरणात सत्तारुढ रिपब्लिकन पक्षाने सी. आय. ए, एफ. बी. आय. आणि जस्टीस या सरकारी संघटनांचा वापर डेमोक्रॅटिक पक्षातील लोकांवर पाळत ठेवणे, त्यांचे चारित्र्यहनन करणे, त्यांची निवडणुकीत हरप्रकारे मुस्कटदाबी करणे अशासाठी केल्याचे उघडकीस आले. ह्या प्रकरणाची परिणिती अखेर राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्या राजीनाम्यात झाली. अमेरिकन राजकारणातील हा एक नीचतम बिंदू होता. या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी या दोन पत्रकारांनी जे अथक परिश्रम केले त्याची कहाणी आहे हा चित्रपट. ह्याचा आधार आहे त्यांनी लिहिलेले ह्याच नावाचे पुस्तक.

    ह्या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे हॉलीवूडमध्ये तयार होऊनही ह्यावर हॉलीवूडची छाप नाही. सर्व प्रसंग कृत्रिम नाट्यमयता न आणता नैसर्गिकरीत्या चित्रित केले आहेत. असे असूनही उत्कंठा शेवटपर्यंत कायम राहते. तुरळक अपवाद वगळता कुठल्याही प्रसंगात कॅमेरा फिरत नाही. खुर्चीच्या पायांमधून किंवा भिंगोर्‍या खेळल्याप्रमाणे गोल फिरत कॅमेर्‍याच्या कोलांट्याउड्या न मारतादेखील दिग्दर्शक कसा ‘दिसू’ शकतो याचे एक उत्कृष्ट उदाहरण. एक-दोन प्रसंगात कॅमेरा या दोघांपासून झूम-आऊट होत लॉग शॉटमध्ये शहराच्या विशालकाय इमारतींवर स्थिरावतो, एका बाजूला विशाल सत्ता आणि दुसर्‍या बाजूला दोन माणसे यातील विरोधाभास सूचित करणारा. दुसरी जाणवणारी गोष्ट म्हणजे कमीत कमी पार्श्वसंगीत. नेहमी ऐकू येतो तो टंकलेखन यंत्रांचा खडखडाट. त्यामुळेच क्लायमॅक्सच्या वेळी वापरलेले विवाल्दीचे संगीत अत्यंत परिणामकारक ठरते.

    या चित्रपटाचे दिग्दर्शक होते ऍलन पाकुला. वुडवर्ड आणि बर्नस्टीन यांच्या भूमिकेत अनुक्रमे रॉबर्ट रेडफोर्ड आणि डस्टीन हॉफमन आहेत. याशिवाय रेडफोर्ड पाकुलाबरोबर सहनिर्माताही होता. या चित्रपटाच्या कल्पनेपासून शेवटपर्यंत अनेक गोष्टींमध्ये रेडफोर्डचा महत्त्वाचा वाटा आहे. याचे चित्रीकरण आधी वॉशिंग्टन पोस्टच्या कार्यालयात करायचे ठरले होते. पण ते अशक्य आहे असे दिसल्यावर ह्या चमूने या वृत्तपत्राची आख्खी न्यूजरुम जशीच्या तशी स्टुडिओत उभी केली. अगदी कचरापेटीतील कचराही मूळ कार्यालयातून आणलेला होता. चित्रपटात कुठलीही राजकारणी व्यक्ती प्रत्यक्ष दिसत नाही. फक्त फोनवरून त्यांचे आवाज ऐकू येतात. याशिवाय काही ठिकाणी निक्सन आणि इतरांच्या दूरचित्रवाणीवरील फिती वापरल्या आहेत.

    या चित्रपटाचे चित्रीकरण दिग्दर्शक होते गॉडफादर चित्रित करणारे गॉर्डन विलीस. त्यांची खासियत म्हणजे कमी प्रकाशातील चित्रीकरण. यासाठीच त्यांचे ‘प्रिंस ऑफ डार्कनेस’ हे टोपणनाव पडले. या चित्रपटात प्रामुख्याने दोन ठिकाणी घडणारे प्रसंग आहेत. एकतर न्यूजरूम मध्ये किंवा बाहेर. बाहेर घडणार्‍या गोष्टी पडद्याआड आहेत, त्यातले खरे किती, खोटे किती हे माहीत नाही. याउलट न्यूजरूममध्ये आहे कठोर सत्य. ह्याला अनुसरून विलीस यांनी बाहेरचे बहुतेक सर्व प्रसंग कमी प्रकाशात किंवा जवळजवळ अंधारात चित्रित केले आहेत. आणि न्यूजरूममध्ये आहे भावनाविरहीत, फ्लूरोसंट असा प्रखर प्रकाश. या दोन्हींचा विरोधाभास खूपच प्रभावी झाला आहे.

    पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तेव्हा रेडफोर्ड किंवा हॉफमन यांच्या अभिनयाकडे फारसे लक्ष गेले नाही. कारण हा अभिनय होता हे कुठे जाणवलेच नाही, इतका तो नैसर्गिक होता. परत बघितला तेव्हा त्यांच्या अभिनयातील विविध बारकावे लक्षात येऊ लागले. हॉफमन/बर्नस्टीन सतत सिगरेट पिणारा, नर्व्हस एनर्जीने भरलेला, तथ्यांपेक्षा ‘गट फिलींग’वर जास्त विश्वास ठेवणारा. याउलट रेड्फोर्ड/वुडवर्ड शांत, मितभाषी, डोक्याने काम करणारा. दोघांमधील समान गोष्ट म्हणजे हार न मानता अथक परिश्रम करण्याची वृत्ती. कार्ल आणि बॉब यांचे स्वभाव, त्यांच्या लकबी, त्यांची एकमेकांशी वागण्याची पद्धत ह्या सर्वांची इत्थंभूत माहिती त्या दोघांकडून घेतली गेली होती. यासाठी रेडफोर्ड आणि हॉफमन यांनी त्या दोघांबरोबर बराच काळ व्यतीत केला. प्रसंगांशी पूर्णपणे तन्मय होण्यासाठी रेडफोर्ड आणि हॉफ़मन यांनी स्वतःच्या संवादांबरोबर एकमेकांचेही संवाद पाठ केले होते.

    ह्या चित्रपटातील बरेच प्रसंग लक्षात राहतात. माझा सर्वात आवडता प्रसंग रेडफोर्डचा आहे. वुडवर्डला बर्नस्टीनचा फोन येतो की वॉटरगेटमध्ये पकडलेल्या चोरट्यांपैकी एकाच्या बॅंक अकाउंटमध्ये केनेथ डॉलबर्ग या नावाने एक चेक आहे. वुडवर्ड त्याच्या टेबलासमोर येऊन बसतो. कॅमेरा मिड-शॉट, मागची ऑफिसातली गडबड आपल्याला दिसते. डॉलबर्गला फोन लागतो. तो प्रेसिडेंट रिइलेक्शन कमिटीचा मिडवेस्ट फायनान्स चेअरमन आहे हे कळते, पण त्याला चेकबद्दल विचारल्यावर तो फोन कट करतो. वुडवर्ड अस्वस्थ होतो, काय करावे याच्या विचारात. कॅमेरा अत्यंत हळूहळू पुढे सरकतो आहे. मग तो प्रेसिडेंट रिइलेक्शन कमिटीला फोन लावतो. तिथे कमिटी प्रमुख टाळाटाळीची उत्तरे देतो. त्याच्याशी वादावादी चालू असतानाच दुसर्‍या लाइनवर परत डॉलबर्गचा फोन येतो. त्याला एक सेकंद थांबायला सांगून वुडवर्ड कमिटी चेअरमनला वाटेला लावतो आणि परत डॉलबर्गकडे. कॅमेरा आता क्लोजअपमध्ये. डॉलबर्ग माहिती देत असतो. महत्त्वाचा प्रश्न, “तुमच्या नावाचा चेक चोरट्यांच्या अकाउंटमध्ये कसा आला?” “मी खरंतर हे तुम्हाला सांगायला नको.” वुडवर्डच्या चेहेर्‍यावर उत्कंठा, अपेक्षा अशा अनेक भावनांचा कल्लोळ. “मी तो चेक स्टॅंझ यांना दिला.” “आय बेग युअर पार्डन???” वुडवर्ड खुर्चीतून खाली पडायचा बाकी असतो. स्टॅंझ म्हणजे निक्सन यांच्या अर्थखात्याचे प्रमुख. हे प्रकरण इतक्या वरपर्यंत जाईल असे त्याच्या स्वप्नातही नसते. फोन संपवून तो घाईघाईने बातमी टंकित करत असतानाच परत बर्नस्टीनचा फोन येतो. वुडवर्ड त्याला ही आनंदाची बातमी देतो आणि शॉट संपतो. तब्बल पावणेसहा मिनिटांचा सलग शॉटमध्ये रेडफोर्डचा नैसर्गिक अभिनय. एका ‘मस्ट सी’ चित्रपटातील हा ‘मस्ट ऑब्झर्व्ह’ शॉट आहे.

    चित्रपटाच्या शेवटी या दोघांना कळते की हे प्रकरण राष्ट्राध्यक्षांपर्यंत गेलेले आहे, पण अजून पुरावे मिळायचे बाकी असतात. दूरचित्रवाणी संचावर नुकत्याच निवडून आलेल्या निक्सन यांचा शपथविधी चाललेला आणि त्याच्या पार्श्वभूमीवर वुडवर्ड आणि बर्नस्टीन टंकलेखन करताना. शेवटच्या शॉटमध्ये परत टंकलेखन यंत्राचा क्लोज-अप आणि धडधड टंकित होणार्‍या वॉशिंग्टन पोस्टच्या हेडलाइन्स. शेवटची हेडलाईन.. “निक्सन रिझाइन्स” आणि चित्रपट संपतो.


  • ऑलिव्हर स्टोन आणि जेएफके

    मला आवडणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘पोलिटिकल थ्रिलर’ हा जोन्र प्रमुख आहे. दुर्दैवाने या प्रकारचे चित्रपट विशेष लोकप्रिय होत नाहीत असा गैरसमज आहे त्यामुळे असे चित्रपट फार निघातही नाहीत आणि जे निघतात त्यातले चांगले चित्रपट फारच कमी असतात. मराठीत ‘सिंहासन’चा सन्माननीय अपवाद वगळता त्या दर्जाचा दुसरा चित्रपट आठवत नाही. ‘आंधी’चं वैशिष्ट्य हे की त्या काळात इंदिरा गांधींवर व्यक्तिरेखा बेतणे धाडसाचं काम होतं, पण ‘आंधी’ राजकीय चित्रपट म्हणता येणार नाही, फार तर राजकीय पार्श्वभूमी असलेला चित्रपट म्हणता येईल.

    अशा परिस्थितीत हॉलिवूडकडे वळण्यावाचून पर्याय नाही. इथेही अशा प्रकारचे चित्रपट तुलनेने कमी असले तरी काही नावे नक्कीच लक्षात राहण्यासारखी आहेत. हॉलिवूडमध्येही राजकीय पार्श्वभूमी असणारे थ्रिलर बरेच आहेत – ‘ओडेसा फाईल’ पासून ते ‘एनिमी ऑफ द स्टेट’पर्यंत. पूर्णपणे राजकीय म्हणता येतील अशा चित्रपटात ‘थर्टीन डेज’ हा फारसा न गाजलेला चित्रपट महत्त्वाचा आहे. १९६२ मध्ये झालेल्या ‘क्युबन मिसाईल क्रायसिस’ च्या १३ दिवसांचं चित्रण यात आहे. या तेरा दिवसात केनेडी बंधूंनी हे प्रकरण कशा प्रकारे हाताळलं याचं चित्रण – अर्थातच अमेरिकेच्या दृष्टीकोनातून – या चित्रपटात आहे. अर्थात या दरम्यान नेमकं काय घडलं, केनेडी-कृश्चेव्ह यांनी गुप्त करार केला होता का यासारखे प्रश्न आजही अनुत्तरीत आहेत त्यामुळे चित्रपट कितपत खरा मानता येईल हा प्रश्नच आहे.

    याच प्रकारचा दुसरा एक चित्रपट विशेष उल्लेखनीय आहे आणि तो म्हणजे ऑलिव्हर स्टोनचा ‘जेएफके’. केनेडी हत्या प्रकरणावर आधारित हा चित्रपट जिम गॅरिसनच्या ‘ऑन द ट्रेल ऑफ असॅसिन्स’ या पुस्तकावर बेतला आहे. केनेडी यांची हत्या ली हार्वी ओसवाल्ड याने केली असं तत्कालीन सरकारने नेमलेल्या समितीचं मत होतं. जिम गॅरिसन न्यू ऑर्लिन्सचा डिस्ट्रिक्ट अटर्नी. केनेडी यांची हत्या एका माणसाने केली नसून त्यामागे मोठा कट होता असं गॅरिसनचं मत होतं. केनेडी हत्या प्रकरणी दाखल झालेला एकमेव खटला गॅरिसन यांनी दाखल केला होता.

    ‘जेएफके’ स्टोनने अत्यंत वेगळ्या प्रकारे हाताळला आहे. काही दिग्दर्शक पडद्यावर स्वत:चं अस्तित्व फारसं जाणवू देत नाहीत, स्टोन याच्या उलट आहे. काय घडलं याबाद्दला त्याचा आणि पर्यायाने चित्रपटाचा एक दृष्टीकोन आहे आणि तो आपलं सर्व कौशल्य पणाला लावून प्रेक्षकांना आपली बाजू पटवून देतो. जणू एका बाजूला चित्रपटात गॅरिसनचा खटला चालू असतानाच दुसरीकडे स्टोन प्रेक्षकांसमोर आपला खटला मांडतो आहे. परिणामकारक पार्श्वसंगीत, रंगीत आणि कृष्णधवल यांचा अनोखा वापर, अचूक कट्स, भेदक संवाद आणि प्रभावी अभिनय या सर्वांच्या संयोगाने स्टोन तीन तासांहून अधिक असं हे नाट्य आपल्यासमोर उभं करतो.

    इथे माझ्या आणखी एका आवडत्या चित्रपटाशी तुलना करण्याचा मोह आवरत नाही. वॉटरगेट प्रकरणावर आधारित पाकुलाचा ‘ऑल द प्रेसिडेंट्स मेन’. इथे पद्धत अगदी विरुद्ध आहे. पाकुला आणि निर्माता रेडफर्ड यांनी हा चित्रपट नेहमीच्या हॉलिवूड शैलीत करण्याचं कटाक्षाने टाळलं. कमीत कमी पार्श्वसंगीत आणि कॅमेर्‍याची हालचाल, कुठेही मेलोड्रामा नाही यामुळे या चित्रपटाला एखाद्या डॉक्यूमेंटरीचं स्वरूप येतं. इथे आणखी एक फरक असा की वॉटरगेट प्रकरणात सर्व तपशील उघड झाले होते त्यामुळे कुठेही संदेहाला जागा नव्हती.

    ‘जेएफके’ स्टोनने अत्यंत वेगळ्या प्रकारे हाताळला आहे. काय घडलं याच्या ज्या अनेक शक्यता आहेत त्यापैकी एक (किंवा काही शक्यतांचं मिश्रण) स्टोन आपल्यापुढे मांडतो. काही दिग्दर्शक पडद्यावर स्वत:चं अस्तित्व फारसं जाणवू देत नाहीत, स्टोन याच्या उलट आहे. काय घडलं याबाद्दला त्याचा आणि पर्यायाने चित्रपटाचा एक दृष्टीकोन आहे आणि तो आपलं सर्व कौशल्य पणाला लावून प्रेक्षकांना आपली बाजू पटवून देतो. जणू एका बाजूला चित्रपटात गॅरिसनचा खटला चालू असतानाच दुसरीकडे स्टोन प्रेक्षकांसमोर आपला खटला मांडतो आहे. परिणामकारक पार्श्वसंगीत, रंगीत आणि कृष्णधवल यांचा अनोखा वापर, अचूक कट्स, भेदक संवाद आणि प्रभावी अभिनय या सर्वांच्या संयोगाने स्टोन तीन तासांहून अधिक असं हे नाट्य आपल्यासमोर उभं करतो.


  • आर के नारायण आणि नोबेल पारितोषिक

    नेहमीचा घोळ – पुस्तक आणि त्याच्यावर आधारलेला चित्रपट. पुस्तक चांगलंच असतं, वाईट पुस्तकावर निर्माते आपले पैसे घालवत नाहीत. चित्रपट कधी पसंतीला उतरतो, कधी नाही. यातलं काय आधी हा ही एक वेगळा प्रश्न आहे. आधी चित्रपट बघितला तर मत पूर्वग्रहदूषित होण्याचा धोका वाढतो – वाचताना पात्रांच्या जागी कलाकार आपसूक समोर येतात. आधी पुस्तक वाचलं तर चित्रपट बघताना बहुतेक वेळा अपेक्षाभंग होतो कारण बराच बदल झालेला असतो. पण बहुतेक वेळा हा निर्णय आपोआप घेतला जातो. आर. के. नारायण म्हणजे स्वामी आणि मालगुडी हे समीकरण घट्ट झालं होतं. (‘स्वामी/मालगुडी डेज’ पुस्तक अधिक चांगलं की मालिका हा निर्णय करणं अशक्य व्हावं इतकं ते रूपान्तर सुरेख झालं आहे.) त्यामुळे या लेखकाने गाईडची कथा कशी सांगितली आहे याबद्दल उत्सुकता होती. (गाईड चित्रपटाची कथा सर्वश्रुत आहे त्यामुळे इथे शेवट उघड करण्याचा इशारा गैरलागू ठरावा.) नारायण त्यांच्या साध्या-सोप्या शैलीबद्दल प्रसिद्ध आहेत. फाफटपसारा नाहीच, किंबहुना ‘मिनिमलिस्टीक’ वाटावं असं त्यांचं लिखाण असतं. प्रस्तावनेत मायकेल गोर्रा यांनी म्हटल्याप्रमाणे “he is easy to read, and hard to understand.” असं असताना वाचायला सुरुवात केल्यावर नारायण एक अनपेक्षित धक्का देतात. कादंबऱ्यांमध्ये निवेदनाचे अनोखे प्रयोग फारसे बघायला मिळत नाहीत आणि साधी शैली असलेल्या नारायणांकडून अशी अपेक्षा अजिबातच नसते. कथा सुरू होते तृतीयपुरूषी निवेदनात. राजू तुरुंगामधून सुटून आल्यावर गावातील नदीकाठी बसलेला आहे आणि एका गावकऱ्याशी गप्पा मारतो आहे. काही वेळ त्यांच्या गप्पा झाल्यावर निवेदक अचानक, कोणतीही पूर्वसूचना न देता प्रथमपुरुषी निवेदनात जातो. आता राजू आपली कथा सांगतो आहे. ही जर चित्रपटाची पटकथा असती तर इथे फ्लॅशबॅक आला असता. ही भूतकाळाची कथा राजू सलग सांगत नाही, जशी आठवेल तशी सांगतो. कधी रोझी आणि मार्कोबरोबर घडलेल्या घटना, कधी त्याच्या लहानपणाचे प्रसंग. प्रथमपुरुषी आणि तृतीयपुरुषी निवेदकांची ही अदलाबदल कादंबरी संपेपर्यंत चालू राहते.

    Book cover for the Guide

    नारायण यांना ही अनोखी शैली का वापरावी वाटली हे हळूहळू लक्षात येतं. या दुहेरी निवेदनातून राजूचे एकेक पैलू समोर येतात. राजूला मारुनमुटकून स्वामी बनवण्यात आलं आहे पण याचा अर्थ त्याचा यात काहीच सहभाग नाही असा नाही. किंबहुना हे का झालं याचं उत्तर राजू स्वत:च देतो. कोणत्याही गोष्टीला नाही म्हणणं त्याला जमत नाही. तो गाईड होण्यामागेही हेच कारण होतं आणि स्वामी होण्यामागेही. रेल्वेस्टेशनावर टूरिस्ट लोक आल्यावर त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत देत तो गाईड झाला, तर गावकऱ्यांच्या प्रश्नांना, अडचणींना चतुराईने उत्तरे देत स्वामी. “I never said, “I don’t know.” Not in my nature, I suppose. If I had the inclination to say “I don’t know what you are talking about,” my life would have taken a different turn.” हा राजूच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया आहे आणि हीच त्याची शोकांतिका आहे. नारायण यांच्या सहज शैलीत लपलेली संदिग्धता अनेक ठिकाणी दिसते. शेवटी राजू उपास करत असताना एक पत्रकार त्याला विचारतो, “have you always been a yogi?” यावर राजू त्याला गूढ उत्तर देतो, “Yes; more or less.”

    ‘गाईड’ हिंदी आणि इंग्रजी दोन भाषांमध्ये बनविण्यात आला. हिंदी आवृत्तीचे दिग्दर्शन विजय आनंद उर्फ गोल्डीने केलं, इंग्रजीसाठी पाश्चात्त्य दिग्दर्शक होता. (नाव आवर्जून आठवावं इतका प्रसिद्ध नसावा.) इंग्रजी आवृत्ती पाहिलेली नाही. हिंदी आवृत्तीमध्ये अनेक बदल केले आहेत. चित्रपट आणि पुस्तक यातील एक मुख्य फरक म्हणजे पुस्तकात मार्कोचं पात्र बरंच स्पष्ट आहे. पुस्तकात रोझीला पाहताक्षणीच ती विवाहित असूनही राजू तिच्या प्रेमात पडतो. रोझी-मार्कोची वारंवार भांडणे होतात पण जे घडतं त्याला तिघेही सारखेच कारणीभूत असतात. चित्रपटात मार्कोच्या व्यक्तिरेखेला फारसा वाव दिलेला नाही. रोझीने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न करणं, मार्कोचे इतर स्त्रियांशी संबंध हे प्रसंग पुस्तकात नाहीत. हे प्रसंग घातल्यामुळे जे घडलं त्याचा दोष मार्कोवर येतो. नायकाचं इतकं पदच्युत होणं कदाचित आनंद बंधूंना पटलं नसावं. सर्वात महत्त्वाचा बदल – राजू तुरुंगात गेल्यानंतर त्याची आणि रोझीची भेट होत नाही. रोझीचं पात्रं पुस्तक अर्धं संपल्यानंतर परत दिसत नाही. पुस्तकातील रोझी सेंटी वहिदाच्या तुलनेत बरीच रोखठोक वाटते. चित्रपटात रोझीचं पात्र शेवटी पारंपरिक हिंदी नायिकेच्या चाकोरीनेच जातं. आणि हो, मूळ कथा मालगुडीत घडते आणि राजू सौथ इंडियन असतो – सकाळी इडली आणि काफीचा ब्रेकफास्ट करणारा.

    नारायण यांनी ‘गाईड’ प्रदर्शित झाल्यानंतर एकलेख लिहिला होता. देव आनंद त्यांना भेटायला येण्यापासून पुढे काय-काय होत गेलं याचं दिलखुलास वर्णन यात आहे. सुरुवातीला ते इतका मोठा स्टार आपल्याला भेटायला आला या कल्पनेनेच हुरळून गेले होते. निर्माता-दिग्दर्शक आणि त्यांचा लवाजमा आल्यानंतर नारायण यांनी म्हैसूरच्या आसपासची मालगुडीशी मिळतीजुळती ठिकाणं त्यांना दाखविली. हळूहळू बैठका वाढायला लागल्या आणि कथेवरचा नारायण यांचा ताबा सुटू लागला. मग राजू मालगुडी सोडून कुठेतरी उत्तर हिंदुस्थानात गेला. शेवटीशेवटी इतके बदल झाले की नारायण यांनी त्यात लक्ष घालणं सोडून दिलं. अर्थात या सर्व प्रकरणात नारायण विजय आनंदचा उल्लेख कुठेही करत नाहीत. देव आनंद आणि आंग्लभाषिक दिग्दर्शक हे दोघेच त्यांच्या टीकेचे धनी होतात. बऱ्याच वर्षांपूर्वी ‘चंदेरी’मध्ये गोल्डीची मुलाखत वाचली होती. त्यात त्यानेही इंग्रजी आवृत्तीचा खरपूस समाचार घेतला होता. पुस्तक आणि चित्रपट यातील आणखी एक मुख्य फरक म्हणजे नारायण यांनी शेवट संदिग्ध ठेवला आहे. Raju opened his eyes, looked about, and said, “Velan, it’s raining in the hills. I can feel it coming up under my feet, up my legs—” He sagged down. हे शेवटचं वाक्य आहे. आता यावरून खरंच पाऊस पडला की नाही हे ज्याचं त्यानं ठरवावं. किंबहुना राजू शेवटी मरतो की नाही हे ही नक्की नाही. चित्रपटात शेवट सकारात्मक आहे – पाऊस येतो – यावर टीका होऊ शकते आणि ती योग्यही असेल पण एक गोष्ट विसरता कामा नये. १९६५ मध्ये आपली अन्नधान्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. इतकी की खुद्द पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी जनतेला आठवड्यातून एक दिवस उपास ठेवण्याचं आवाहन केलं होतं. चित्रपटाचा शेवट बघताना ही पार्श्वभूमी विसरता कामा नये. देशात दुष्काळ पडलेला असताना चित्रपटाचा शेवट सकारात्मक करणं निर्मात्यांना अधिक सोयीचं वाटलं असावं.

    गोल्डीच्या म्हणण्यानुसार गाईडमध्ये काही क्षण देव आनंदने अभिनयाची उच्च पातळी गाठली आहे. गोल्डीच्या काही फ्रेम्स लक्षवेधक आहेत. वहां कौन है तेरा गाण्यात देव पुलावर चालत असताना एक शॉट आणि नंतर पुलाची लांबी दाखवणारा शॉट, स्पिलबर्गची आठवण करून देणारे सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवरचे शॉट. गाईडमधील एक महत्त्वाची बाब म्हणजे शैलेन्द्रची गाणी. गुलजार शैलेन्द्रबद्दल म्हणतो, “वो हिंदी या उर्दू में नही लिखते. उनकी जुबान हर एक हिंदुस्थानी की जुबान है.” साधे तरीही अर्थपूर्ण शब्द ही शैलेन्द्रची खासियत. आणि बर्मनदांनी सगळी गाणी अप्रतिम केली आहेत. गाण्यामधून कथानक कसं पुढे सरकतं याचं सुरेख उदाहरण या चित्रपटात दिसतं. ‘सैंया बेइमान-क्या से क्या हो गया’ गाण्यातील चित्रीकरण ऑपेराच्या जवळ जाणारं आहे. ‘वहां कौन है तेरा’ गाणं संपेपर्यंत राजू स्वामीपदाच्या पहिल्या पायरीला आलेला असतो आणि हे कसं होतं हे गोल्डीने अत्यंत सहजरीत्या दाखवलं आहे – एक साधू त्याची भगवी शाल झोपलेल्या देव आनंदच्या अंगावर पांघरतो आणि राजूच्या स्वामीपदाचा प्रवास सुरू होतो.

    नारायण यांच्यावर वेळोवेळी बरीच टीका झाली. टीका करण्यात नायपॉल आघाडीवर होते. नारायण यांच्या कथांमध्ये तत्कालीन भारत कुठेच दिसत नाही हा टीकेचा मुख्य मुद्दा होता. कदाचित नारायण यांना फ्रेंच लेखक गुस्ताव्ह फ्लोबेरने सुरू केलेल्या वास्तववादाच्या पठडीत बसून भारतातील धुळीचं, कचऱ्याचं साग्रसंगीत वर्णन करण्यापेक्षा स्थलकालांच्या बंधनातून मुक्त असलेल्या एका काल्पनिक भारतातील गोष्टी अधिक महत्त्वाच्या वाटत असाव्यात. त्यांनी एकदा नायपॉल यांना म्हटलं होतं, “India will go on.” नारायण यांच्या इतर वाक्यांप्रमाणेच या वाक्यातूनही अनेक अर्थ सूचित होतात.
    —-

    १. नारायण यांनी हिंदूमध्ये आणि इतरत्र बरीच वर्षे लेख लिहिले. त्यांचे हे लेख अनेक कारणांसाठी वाचनीय आहेत. तांदुळावरचं रेशनिंग संपल्यानंतर नारायण यांचा एक लेख आला होता. लेख नर्मविनोदी असला तरी त्यामागचं भीषण वास्तव जाणवल्यावाचून राहवत नाही. रेशनिंग सुरू होतं तेव्हा कुठेही लग्नसोहळा असेल तर पाहुण्यांना आपापला शिधा बरोबर घेऊन जावा लागत असे. अचानक अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची धाड पडली तर काय करायचं यासाठी हा खटाटोप. अधिकारी आले तर कचऱ्यात पत्रावळी किती यावरून किती धान्य वापरलं याचा हिशेब घेत असत आणि धान्यवापर मर्यादेत आहे किंवा नाही हे ठरवीत असत. कधीकधी समारंभ सुरू असताना यजमान एका रांगेतील लोकांना हळूच नेत्रपल्लवी करून बोलावीत. हे लोक शक्य तितक्या गोपनीयतेने एका अज्ञातस्थळी जात आणि गुपचुप जेवण उरकून येत. त्यांचं झाल्यावर मग पुढची रांग. आज आयप्याडवर टिचक्या मारत नेहरूंच्या समाजवादावर टीका करणं फार सोपं आहे कारण आजच्या पिढीला त्या काळच्या परिस्थितीचं आकलन होणं अशक्य आहे. अन्न सुरक्षा बिलाला सुखवस्तू मध्यमवर्गियांकडून आर्थिक बोजा पडेल अशी कारणं दिली जातात त्यावरून हे दिसतं. आज आपली अर्थव्यवस्था कितीही खालावली तरीही मध्यमवर्गाला उपाशी राहण्याची वेळ येणार नाही. सोन्यावरची ड्यूटी कमी केली किंवा गॅस सबसिडी वाढवली तरीही सरकारवर आर्थिक बोजा पडतोच पण फक्त गरिबांसाठीच्या सवलतींच्या वेळीच हे कारण पुढे केलं जातं. मध्यमवर्गियांना सवलती मिळतात तेव्हा पडणाऱ्या आर्थिक बोज्याबद्दल कुणी चकार शब्दही काढत नाही.

    एके काळी नारायण यांना नोबेल मिळण्याची अफवा जोरात होती. त्यावर लिहिलेल्या एका लेखात नारायण यासुनारी कावाबाटाचं उदाहरण देतात. त्याला नोबेल मिळाल्यावर मुलाखतीत नेहमीच्या “कसं वाटतंय?” या प्रश्नावर तो म्हटला, “काय वाटायचं? इथे येतायेता प्रवासात एक दिवस गेला.” नोबेलच्या पैशांचं काय करणार यावर म्हटला, “एखादी खुर्ची किंवा सोफा घ्यावा म्हणतो, कुणी आलं तर बसायला तरी होईल.” हे सांगितल्यावर नारायण म्हणतात, “नोबेल निवडण्याचे जे काही निकष असतील ते असोत पण विजेता कुणाचंही साहाय्य न घेता स्वीडनला येऊ शकेल आणि मिळालेले पैसे हवे तसे खर्च करू शकेल इतका धडधाकट असतानाच त्याला पारितोषिक देण्यात यावं.”


  • ब्लॉगलेखन – काही विस्कळीत विचार

    ब्लॉग या माध्यमाला माझी आजही पसंती आहे आणि त्याची काही कारणे आहेत. ब्लॉगमुळे तुमची स्वत:ची अशी ओळख निर्माण होते. हल्ली ‘स्क्रोल’सारखी बरीच संकेतस्थळे उपलब्ध आहेत जिथे लेख प्रकशित होऊ शकतो. त्यामुळे तुमची तेवढ्यापुरती प्रसिद्धी होते. पण एक-दोन दिवसात संकेतस्थळावर येणाऱ्या जात-आरक्षण-एनआरआय-हिंदू धर्म-अंधश्रद्धा यावरच्या चर्चा-कविता-गझल-केळाच्या सालाच्या धिरड्याची पाककृती-कविता-चित्रपटांची परीक्षणं-कविता-आधी आलेल्या सर्व कविता आणि गझलांची विडंबनं-आम्हीही विनोदी लिहितो असं दाखविणारे पण एकदाही हसू न येणारे भिजलेल्या माऊच्या पिलापेक्षा जास्त केविलवाणे लेख-इतर वाचनीय लेख या सर्वांच्या भाऊगर्दीत तुमचा अभ्यासपूर्ण लेख कुठे जातो तुम्हालाही पत्ता लागत नाही. एखादा नवीन माणूस संकेतस्थळावर आला तर त्याला तुमचा लेख सापडेल याची शक्यता किती? सापडला तरी दोन मिनिटात त्याचं लक्ष दुसरीकडे जातं.

    याउलट ब्लॉग म्हणजे निगुतीने तयार केलेली बाग असते. अर्थात अशी बाग एका आठवड्यात तयार होत नाही, तिच्या मशागतीसाठी वेळ द्यावा लागतो. जेव्हा नवीन कुणी ब्लॉगवर येतो तेव्हा त्याला प्रत्येक कोपऱ्यात तुमच्या बागकामाची साक्ष देणारं काहीतरी सापडतं. तुमचा एक लेख आवडला तर वाचक याने अजून काय लिहिलंय बघूयात असं म्हणून अनेक लेख वाचतो. फारच आवडला तर मित्र-मैत्रिणींनाही सांगतो. पाच वर्षांपूर्वी लिहिलेला लेखही इथे चुटकीसरशी सापडू शकतो. वर्गीकरण केल्यामुळे वाचकाच्या आवडीप्रमाणे हवं ते – संगीतावरचं लेखन किंवा पुस्तकांवरचे लेख – चटकन सापडतं. मुख्य म्हणजे इकडे-तिकडे लक्ष जाईल असं इथे काहीही नसतं. नवीन आलेल्या माणसाला ब्लॉगवर जे विविध लेख उपलब्ध असतात त्यावरून एका भेटीतच ब्लॉग लेखकाचा अंदाज येतो. तुम्ही विनोदी लिहिता की गंभीर, कोणत्या विषयांवर लिहिता हे सगळं पाहून तो ब्लॉगवर परत यायचं का नाही हे ठरवतो.

    मराठीत ब्लॉगलेखन म्हणावं तसं रुजलं नाही याचं वाईट वाटतं. मराठीत ब्लॉगलेखनाचा एकुणात प्रवास बघता याचा फार उत्कर्ष होईल असं सध्या तरी वाटत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे हौशी ब्लॉगर वगळता (त्यांचाही सुरुवातीचा उत्साह असेपर्यंत) वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर लोक इकडे फिरकलेलेही दिसत नाहीत. (काही अपवाद आहेत पण ते बोटावर मोजण्याइतके.) अमिताभ घोषसारख्या प्रथितयश लेखकाला ब्लॉग लिहिण्यासाठी वेळ मिळतो तर बाकीच्यांना का मिळू नये? कारण काही असो, मराठीतील नट, दिग्दर्शक, गायक, संगीतकार, शास्त्रज्ञ, शासकीय अधिकारी, वकील, व्यावसायिक यापैकी फारच थोडे लोक ब्लॉगकडे वळले आहेत. याचा आणखी एक परिणाम म्हणजे काही तुरळक अपवाद वगळता विशिष्ट विषयाला वाहिलेले ब्लॉग (niche) अस्तित्वातच नाहीत. जोपर्यंत हे बदलत नाही, तोपर्यंत ब्लॉगविश्व मर्यादित राहील असं वाटतं.

    आपल्याकडे एकुणातच कशाचीही पर्वा न करता हवं ते करणारी माणसं कमी होत चालली आहेत असं वाटतं. या बाबतीत पाश्चात्त्यांचं आणि विशेषकरून अमरूंचं उदाहरण घेण्यासारखं आहे. व्यक्तिगत स्वातंत्र्य हे मूल्य सर्वात वर असल्यामुळे बरेचसे लोक चाकोरीची, समाजाची पर्वा न करता त्यांच्या आतल्या आवाजाला साथ देऊन जे हवं ते करत असतात. याची कित्येक उदाहरणे इंग्रजी ब्लॉगविश्वात सापडतात. कोणतेही मूल्य द्यावे न लागता रोज उत्तमोत्तम कॉमिक स्ट्रिप देणाऱ्या ‘पीएचडी कॉमिक्स’पासून ‘एक्सकेसीडी‘पर्यंतच्या नव्या दमाच्या कलाकारांची फौजच तयार झाली आहे.

    मराठी आणि इंग्रजी ब्लॉगविश्वातील दरी कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे असं वाटत राहतं. इंग्रजीत हे ब्लॉगर्स ज्या सातत्याने लेखन करत आहेत त्याला कुर्निसात. त्यांच्या सन्मानार्थ वन ऍंंड ओन्ली रजनी .

    —-

    १. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे नागरिक.

    २. गाणं सुरू होतानाचा कोरसनंतरचा स्वर खुद्द रहमानचा, नंतरच्या ओळी रहमानच्या मुलीच्या – खातिजाच्या आवाजात आहेत. नंतर येतो एसपी – यंदिरा, यंदिरा. पहिल्या कडव्याच्या सुरुवातीला एसपीची एक ओळ उच्च स्वरात, दुसरी खालच्या स्वरात असं चालू राहतं. यानंतर एसपी एक सुरेल लकेर घेतो (३:०३). ही सुरावट संपल्यानंतर दोन ओळी वेगळ्या स्वरात (३:२८), शेवटी हे हे अशी लकेर. मग कोरस ‘पुधिया मानिधा, भूमिक्कवा’. पहिल्या कडव्याचा हा क्रम लक्षात ठेवा. आता दुसऱ्या कडव्यात परत एसपी वरच्या आणि खालच्या स्वरात सुरुवातीच्या ओळी म्हणतो पण नंतर आधीची लकेर येण्याऐवजी पहिल्या कडव्यात शेवटी आल्या होत्या त्याच्या जवळ जाणाऱ्या दोन ओळी येतात (४:५३) आणि मग पहिल्या कडव्याची शेवटची लकेर – मधली अख्खी सुरावट गायब. हे कडवं पूर्णपणे वेगळ्या दिशेने जातं. दोन कडव्यात पूर्वार्ध सारखा, पण उत्तरार्ध पूर्ण वेगळा. इस्कू बोलते एआर.