नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड आणि ओरहान पामुक

वाचनाचं व्यसन लागलेल्यांसमोर असणारा एक चिरंतन प्रश्न म्हणजे एक पुस्तक वाचून झालं की पुढचं कोणतं हे कसं ठरवायचं? वाचक पट्टीचा असेल तर त्याच्या आजूबाजूला पुस्तकांचा खच पडलेला असतो. ‘बेग, बॉरो किंवा स्टील’ (इथं स्टील याचा अर्थ आंतरजालावरून इ-पुस्तकं मिळवणं असा घ्यावा.) यापैकी कोणत्याही पद्धतीने आणलेली पुस्तकं भोवताली ‘मला वाच, मला वाच’ असं म्हणत फेर धरून नाचत असतात. हा प्रश्न धसास लावण्यासाठी अस्मादिकांनी एका एक-सदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीने तातडीने वाचलीच पाहीजेत अशा पुस्तकांची यादी करण्याची उपसूचना मांडली. ही यादी केल्यानंतर तिचा आकार पाहून प्रश्न सुटलेला नाही असं लक्षात आलं. शेवटी समिती बरखास्त केली, सीता भरोसे जे पुस्तक वाचावसं वाटेल ते वाचावं असं ठरवलं आणि समोरच्या पुस्तकात डोकं खुपसलं.

ओरहान पामुकचा ‘अदर कलर्स’ हा लेख संग्रह मिळाला. त्याची अनुक्रमणिका बघत असताना पामुकनं त्याच्या आवडत्या लेखकांवर आणि पुस्तकांवर काही लेख लिहील्याचं दिसलं. चांगले लेखक जेव्हा इतर लेखकांवर किंवा पुस्तकांवर लिहीतात तेव्हा त्याच्या लुत्फ वेगळाच असतो. गावसकर समालोचन करत असताना मैदानातील वरकरणी साध्या वाटणार्‍या गोष्टींमागची मानसिक कारणं, डावपेच यावरच्या त्याच्या ‘स्पेशल कमेंट्स’ करतो तेव्हा त्या त्याच्या प्रदीर्घ अनुभवामधून आल्याचं जाणवतं आणि म्हणूनच त्याचं समालोचन इतरांपेक्षा वेगळं ठरतं. पामुक दस्तोयेव्स्की, कमू, सलमान रश्दी, व्हिक्टर ह्युगो अशा बर्‍याच लेखकांबद्दल बोलतो. यादी बघत असताना अचानक नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड दिसल्यावर वाचावसं वाटलं, मग त्यासाठी पामुकला काही काळ बाजूला ठेवलं.

पुस्तक वाचताना लक्षात घेण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे हा अनुवाद आहे, साहजिकच अनुवाद वाचताना जे अडथळे येऊ शकतात ते इथे गृहित धरावे लागतात. याचे बरेच अनुवाद उपलब्ध आहेत, मी वाचलेला अनुवाद रिचर्ड पीव्हर आणि लरिसा व्होलोखोन्स्की यांनी केला आहे. याच्या प्रस्तावनेत ते इतर उपलब्ध अनुवादांवर काहीसा टिकेचा सूर लावतात. त्यांच्या मते या आधी आलेल्या अनुवादांमध्ये मूळ कादंबरीचा सूर हरवला आहे. उदा. vygoda या शब्दासाठी आधीचे अनुवाद advantage हा शब्द वापरताअ पण रिचर्ड आणि लरिसा profit वापरतात. त्यांच्या म्हणण्यानुसार vygoda मध्ये जो नाद आहे तो profit या अनुवादात कायम राहतो. “And like vygoda, with its strongly accented first syllable, ‘profit’ leaps from the mouth almost with the force of an expletive, quite unlike the more unctuous ‘advantage’ or its Russian equivalent ‘preimushchestvo’…. Thus we arrive at the full music of this underground oratorio. अनुवादकांनी इतका सखोल विचार केलेला पाहून बरं वाटतं. अनुवाद वाचावासा वाटतो.

दस्तोयेव्स्की सारख्या लेखकांचं एक वैशिष्ट्य हे की पुस्तकामध्ये जे समोर असतं ते फक्त हिमनगाचं टोक असतं. पूर्ण हिमनग बघण्यासाठी लेखक, त्याची पार्श्वभूमी, तत्कालीन परिस्थिती हे सगळं लक्षात घ्यावं लागतं. त्यामुळे पुस्तक वाचलं, बाजूला ठेवलं असं होत नाही. बहुतेक वेळा ‘क्लासिक्स’ समजल्या जाणार्‍या पुस्तकांमध्ये इतर क्लासिक्सचे संदर्भ असतात. (याच कारणासाठी नायपॉल सध्याच्या कादंबरी (novel) या साहित्यप्रकारातील नाविन्य संपलं आहे असं म्हणतात, प्रत्येक लेखक त्याच्या आधीच्या लेखकांच्या जाणीवा, अनूभूती उधार घेऊन काम चालवतो आहे.) पुन्हा अशा प्रकारच्या पुस्तकांमध्ये कथा असली तर ती ही अस्वस्थ करणारी असते. या सर्वांचा परिणाम म्हणजे प्रत्येक पुस्तकानंतर स्वत:मध्ये किंचित बदल झाल्याची जाणीव होते.

नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड एका निवेदकाची डायरी आहे. पहिला भाग त्याचा वाचकांशी संवाद. इथे निवेदक म्हणून तोच बोलतो आणि कधी कधी तुम्ही असं म्हणाल असं म्हणून दुसरी बाजूही तोच मांडतो. सुरूवातीला त्याची परिस्थिती स्पष्ट झाल्यावर तो एका सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन राहतो आहे असं कळतं. (यालाच तो अंडरग्राउंड असं म्हणतो.) त्या बोलण्यातून त्याचा स्वभाव दिसायला लागतो. एकलकोंडा, जगाविषयी आणि विशेषत: जगातील लौकिकार्थाने यशस्वी लोकांबद्दल त्याचा असूया आणि तुच्छता वाटते. पहिल्या भागातील या प्रदीर्घ संवादामध्ये तो तत्कालीन तत्वज्ञानातील ‘फ्री विल’ अस्तित्वात आहे का किंवा माणूस मुळात चांगला आहे याला काय आधार आहे यासारख्या काही कळीच्या मुद्यांना आव्हान देतो. इथे तेव्हाच्या रशियातील परिस्थिती लक्षात घ्यावी लागते. युरोपमध्ये ‘एनलायटनमेंट’चे वारे वाहत होते. रशियातील बुद्धिजीवींना याची भुरळ पडली होती आणि यावर आधारित एका ‘युटोपियन’ समाजाची संकल्पना मांडली जात होती. लेनिनच्या राजवटीची बीजे इथे रोवली गेली. या संकल्पनेचा प्रमुख प्रचारक चेर्निशेव्स्की याला उत्तर म्हणून दस्तोयेव्स्कीने नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड लिहीलं.

पुस्तकाचा दुसरा भाग कथेच्या स्वरूपात आहे. निवेदकाचे काही वर्गमित्र एका मित्राला पार्टी देणार असतात. निवेदक त्यांची इच्छा नसतानाही तिथे जातो, त्यांचा अपमान करतो. हे सर्व होत असताना आपले निवेदकाबद्दलचे मत बदलत जाते. पहिल्या भागात काही वेळा ज्यांची चुणूक दिसली असे त्याच्या स्वभावातील कंगोरे आता स्पष्टपणे समोर येतात. त्याचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्याला भास होत आहेत. एका त्रासिक माणसापासून मनोरूग्णापर्यंतच्या या प्रवासाचा एक परिणाम म्हणजे कादंबरीच्या शेवटी निवेदक anti hero ठरतो आणि तो स्वत:च हे कबूलही करतो. आपण खोल गर्तेत जात आहोत हे कळूनही स्वत:ला किंवा इतरांना वाचवण्याचा कोणताही प्रयत्न न करणारा, किंबहुना आपल्या या अध:पतनामधून एक आसुरी आनंद मिळवणारा हा निवेदक दस्तोयेव्स्कीच्या पुढच्या कादंबर्‍यांसाठी एक सुरूवात ठरलाच पण त्याचबरोबर तत्कालीन साहित्यामधील ही बंडखोरी नंतर इतर अनेक साहित्यिकांसाठी प्रेरणा ठरली.
नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड अस्तित्ववाद (Existentialism) या शाखेची सुरूवात मानली जाते.

इतकी माहिती पुस्तकाची प्रस्तावना आणि आंतरजालावरून मिळते. नंतर पामुकचा यावरचा लेख वाचल्यावर आणखी एक पदर उलगडला. पामुकनं हे पुस्तक त्याच्या तरूणपणात वाचलं होतं. त्या वेळी त्याला पुस्तकामध्ये हिमनगाचं फक्त वरचं टोक दिसलं होतं. यापलिकडे काहीतरी आहे याची जाणीव झाली मात्र – कदाचित त्यामुळे येणार्‍या अस्वस्थतेच्या भीतीनं – त्यानं याचा पाठापुरावा केला नाही. तीस वर्षांनंतर पुस्तक परत वाचताना त्याला दोस्तोयेव्स्की ‘इन बिटविन द लाइन्स’ काय म्हणतो आहे ते लक्षात आले.

पुस्तकाच्या पहिल्या भागात बरेचदा तत्कालीन युरोप आणि रशिया यांच्यावर टिप्पण्या आहेत. एकोणिसाव्या शतकातील रशियामधले बुद्धीजीवी खुराकासाठी संपूर्णपणे युरोपमधील एनलायटनमेंट चळवळीवर अवलंबून होते. त्यांच्या विचारांमध्ये आणि त्या विचारांमधून आलेल्या संकल्पनांमध्ये मूळ रशियन असे काहीही नव्हते, सगळ्या कल्पना उधार घेतलेल्या. दस्तोयेव्स्कीला या सगळ्या प्रकाराची चीड आली होती. पण – आणि इथेच पामुकच्या ‘स्पेशल कमेंट्स’चे महत्व स्पष्ट होते – खुद्द दस्तोयेव्स्की कोणत्या विचारांचे आचरण करत होता? त्यालाही बौद्धिक भूक भागवण्यासाठी युरोपकडे वळल्यावाचून गत्यंतर नव्हते. नोट्स फ्रॉम अंडरग्राउंडचा निवेदक जी चीड, असूया आणि आत्मप्रौढी व्यक्त करतो ती तो स्वत: कधीही पूर्णपणे युरोपियन होऊ शकणार नाही या भावनेतून आली आहे. दस्तोयेव्स्कीचा राग एनलायटनेमेंटवर नव्हता, तर हे विचार आपल्याकडे तिकडून येत आहेत आणि आपले बुद्धीजीवी त्यात आनंद मानत आहेत यावर होता. या विचारांचे अवलंबन करण्यात रशियाचा फायदा आहे हे ही त्याला कळत होते पण याच गोष्टीची चीडही येत होती. खूप नंतर आयुष्याच्या शेवटी ‘ब्रदर्स कारामाझॉव्ह’ लिहीताना रशियाच्या परपरांबद्दल आपल्याला किती तुटपुंजी माहिती आहे याबद्दल त्याने खंत व्यक्त केली होती.

पामुकला हा मुद्दा भावला याचे कारण टर्की रशियाप्रमाणेच युरोपच्या काठावर आहे. युरोपमध्ये होणार्‍या वैचारिक मंथनाच्या लाटा रशियाप्रमाणेच टर्कीमध्येही आल्या. टर्कीच्या साहित्यावर युरोपियन विचारवंतांचा मोठा प्रभाव आहे. याच कारणासाठी १९७० च्या दरम्यान नोट्स फ्रॉम अंडरग्राउंड चा अनुवाद टर्कीमध्ये प्रसिद्ध झाला तेव्हा त्याच्या प्रस्तावनेत दस्तोयेव्स्कीवर प्रखर टीका करण्यात आली.

आजच्या काळात तेव्हासारख्या कोणत्याही एक किंवा अधिक चळवळींचा पगडा नाही. त्यात भारतासारख्या बहुभाषिक, अनेक संस्कृतींची सरमिसळ असणार्‍या देशामध्ये राहत असताना प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होतात. १८६३ मध्ये लिहीलेले हे पुस्तक आज वाचताना मी या पुस्तकाकडे कोणत्या दृष्टीकोनातून पहावे असा एक विचार मनात येतो.